चवडे (फोटोसह)

Submitted by डॅफोडिल्स on 28 October, 2011 - 05:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या मैदा,
२ चमचे बारिक रवा,
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन
चिमुट्भर मिठ
अर्धी वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी डाळं(फुटाणा डाळ्/पंढरपुरी डाळं) पिठ करुन.
चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड
तळण्यासाठी तुप किंवा तेल

क्रमवार पाककृती: 

२ वाट्या मैदा, २ चमचे बारिक रवा, चविपुरते चिमुट्भर मिठ आणि चमचाभर पिठीसाखर व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे.

चार चमचे तेल कडकडित गरम करुन हे मोहन मैद्यात घालून जरुरीप्रमाणे थंड पाणी घालून घट्टसर पिठ मळावे. करंज्यांसाठी करतो तसा घट्ट गोळा करून तासभर झाकून ठेवावे.

वाटीभर डाळं मिक्सर मध्ये बारिक करून पिठीसाखरे सारखे बारिक पिठ करावे.
मग पिठी साखर आणि हे डाळ्यांचं पिठ एकत्र करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड मिसळावी.

तळणासाठी तेल किंवा तुप तापत ठेवावे.
मग मैद्याच्या पिठाचे पेढ्या एवढ्या आकाराचे एकसारखे गोळे करुन घ्यावे.

**फुलक्या एवढी किंवा जरा लहान एक पातळ पुरी लाटावी, मिडीयम हाय वर तळून ताटात काढावी, लगेच त्यावर चिमटीने साखर आणि डाळ्यांची पिठी भुरभुरावी, चमचा आणि झार्‍याच्या सहाय्याने पटकन अर्धी घडी करावी, पुन्हा साखर पिठी भुरभुरून पुन्हा पटकन घडी करावी. (आपण पोळी ज्याप्रकारे घडी करतो तश्या ह्या दोन घड्या कराव्यात).**

पुन्हा दुसरी पुरी... सगळी प्रोसेस पुन्हा .. असं करत सगळे चवडे बनवावेत.

हे बघा हे असे दिसतील चवडे..

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

** हे काम अत्यंत पटापट करायचे आहे.
पुरी ताटात काढली की गॅसची आच कमी करणे.
पुरीवर एका हाताने साखर + पिठी भुरभुरावी.
लगेच मग हात भाजू नये म्हणून एका हातात चमचा आणि दुसर्‍या हातात झारा घेउन पटकन फोल्ड करावी. (जरासा उशिर झाला तर पुरी मोडते.)
एकटीने करायला भरपूर मारामारी होईल.. मदतनिस असेल तर साखर पेरणी किंवा तळणी एकेकाने करता येईल.
थोडीशी तळणा नंतरची कृती किचकट आणि नाजूक असली तरी करंज्यां पेक्षा अगदी सोप्पी आहे.
ह्या चवड्यांची चव त्या साखर + डाळ्यां मुळे अप्रतिम येते.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे चिरोटे आहेत का?>>> नाही. याला चवडेच म्हणतात.
माझी आईपण करायची नेहमी चवडे. ती किसलेले खोबरे+ पिठीसाखर्+ वेलदोडापूड घालायची चवड्यांत.

धन्स डॅफो. Happy

छानच.
माझी आई करते. ती राजगिर्‍याच्या लाह्या वापरते. प्रचंड लगबगीने करावा लागतो हा प्रकार.

पिठीसाखर्+ वेलदोडापूड घालायची चवड्यांत>>>
अरे हो खरं मी पण घातलीये वेलचि जायफळ पुड.. एडीटले.

चेतन देते पाठवून.. पण कुरियर ने मोडेल हे नाजुक प्रकरण. Proud
आणि तो तळतानाचा दरवळ... अहाहा... तो मिसशिल ..

प्राची, केलेस की नमुना म्हणून मला पाठवून दे बरं Wink

मी बिगरी यत्तेतली असल्याने इतक्या वरच्या अभ्यासक्रमाला हात घालायची हिंमत नाही, पण फार म्हणजे फारच चविष्ट वाटतोय हा प्रकार.

मी_मस्तानी,

चवडे मस्त दिसताहेत... कौशल्याचे काम आहे.
ती पुरी नंतर कडक कशी होते? रोजच्या पुर्‍यासारखीच तर पीठ मळले आहे ना?

आज केले.
जास्त घाट घातलाच नव्हता. थोडेच केले, त्यातले काही घडी घालतानाच पुरी मोडली. काही नंतर डब्यात भरताना मोडले. काही मस्त झाले आहेत.
मा का चु?

लहानपणी जो पदार्थ खूप आवडीने खायचे तो स्वतः बनवून खायला मस्त वाटले.
आईच्या कष्टांची, सुगरणपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली. Happy
धन्यवाद डॅफो.

वा वा मस्त वाटते आहे मला. मस्तानी, प्राची मला पुन्हा चवडे बनवल्यासारखे समाधान वाटते आहे. आहा ... पोहोचला तो दरवळ इथपर्यंत. Happy