आजकाल सकाळ संध्याकाळ प्रवासात माझा अर्धा पाऊण तास जातो. अंतर केवळ ८ किमीचे पण तेवढा
वेळ जातोच. ड्रायव्हर गाडी चालवत असतो, आणि मी मात्र एफ़ एम वर हिंदी गाणी ऐकत असतो.
इथे सकाळी कपाचा ऎंड कॉफी असा एक चांगला कार्यक्रम असतो. (हा कार्यक्रम Soundasiafm.com
वर उपलब्ध आहे.) त्यातल्या गाण्यांपेक्षा मला निवेदक जेसी आणि जीत यांच्या गप्पा ऐकायला आवडतात.
त्याबरोबर हवामानाचा अंदाज (जो कधीच खरा ठरत नाही.) आणि ठळक बातम्या यांच्यासाठी ऐकतो.
पण आज लिहायचे कारण म्हणजे, त्यात वाजवली जाणारी गाणी. हि गाणी अगदि नवीन असतात.
याच एफ़ेम स्टेशनवर दिवसभरात आणि रात्रीही जुनी सुंदर गाणी लावतात आणि त्यातले निवेदनही
चांगले असते, पण आमच्या येण्याजाण्याच्या वेळेत मात्र नवीनच गाणी ऐकवली जातात.
कबूल केले पाहिजे, कि यापैकी ऐकून झाल्यावर लगेच एकाही गाण्याचे शब्द मला सांगता येणार नाही्त.
सेनोरिता सारखी काही गाणी, सिनेमा बघितल्यामूळे ओळखीची वाटतात, पण बाकिची हिंदी होती कि
पंजाबी होती का इंग्लीश होती, हे ही मला सांगता येणार नाही.
सगळ्यात सामायिक जर मला काही वाटत असेल तर -
१) असप्ष्ट शब्दोच्चार : पुर्वीचे गाणे मला अनोळखी असले तरी त्यातले शब्द मी उतरवून घेईन, इतके
स्पष्ट ऐकू येतात. आताच्या गाण्यातले शब्द मात्र मला अजिबात कळत नाहीत.
हि सुरवात कधी झाली ते सांगता येत नाही, पण असे अगदी पहिले गाणे मला आठवतेय ते, रेमोचे
प्यार तो होनाही था. मला तर ते फ्यार ठो ओनाई ठा, असेच ऐकू आले होते.
या कलाकारांचे शिक्षण हिंदीतून झाले नसेलही, पण संगीतकाराने तसा आग्रह धरायला नको होता का ?
शुक्रतारा मंद वारा, गाण्यापुर्वी अरूण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी मराठी गाणे गायले नव्हते. पण
ते गाणे ऐकल्यावर हे खरे वाटेल का ? श्रीनिवास खळ्यांनी, लताच्या आवाजात अथर्वशीर्ष सादर केले
होते. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा नव्हे तर अक्षराचा उच्चार खणखणीत आहे.
२) गेंगाणा स्वर : आता कधी कधी गाण्यात मधेच एक गेंगाणा स्वर ऐकू येतो. हा स्वर मानवी
गळ्यातून नक्कीच आलेला नसतो. याला गेंगाणा म्हणायचे कि आणखी काही ते पण मला सांगता
येणार नाही. पण हा स्वर बहुदा, कॉम्प्यूटरच्या मदतीने काढत असावेत.
३) एकापेक्षा जास्त व्यक्तीचे आवाज. गाणे एकच व्यक्ती गात असते पण दोन व्यक्ती एकत्र गाताहेत
असा परिणाम साधलेला असतो. आणि हे सहज चाळा म्हणून केल्यासारखे वाटते. असा परिणाम
आर्डीने पण काही गाण्यात साधला होता (क्या जानू सजन (लता), उलझन हजार कोई डाले, हो
बदन जलता है (दोन्ही आशा))
अजय देवगणच्या, आक्रोश मधे पण आझादी कि करे सौदेबाजी असे एक जरा बरे गाणे होते,
त्यातहि असाच परिणाम जाणवला मला. पडद्यावर तर ते गाणे बॅकग्राऊंडलाच वाजते.
४) एकसुरी ताल. खरे तर मी हा विचित्र शब्द प्रयोग करतोय, पण मला म्हणायचेय ते हे
कि ताल प्रकर्षाने जाणवतो, पण त्यात काही नाविन्य दिसत नाही. बहुतेक तो चार ते पाच
मात्रांचाच असतो. आणि तो नेहमीच गायक गायिकेच्या वरचढ वाजत असतो. कोण, कुणाला
साथ करतेय तेच कळत नाही. अगदीच नवीन काही ऐकायला मिळत नाही असे नाही.
गुजारिश मधल्या उडी उडी मधे जरा वेगळा ताल होता. सैफ़ आणि दिपिका च्या एका गाण्यातही
(चन्ना रे चन्ना रे ) काही वेगळे आढळले होते.
पण दादरा, झपताल, रुपक सारखे ओळखीचे ताल अजिबातच ऐकायला मिळत नाहीत.
५) परदेशी गाण्यांचा प्रभाव.
आता खुपदा परदेशात(च) चित्रीकरण होत असल्याने काही परदेशी धुन गाण्यात ऐकू येतात.
सात खून माफ़ मधल्या डार्लिंग वर रशियन गाण्यांचा प्रभाव होता तर जिंदगी ना मिलेगी दोबारा
मधे स्पॅनिश सुरावटी होत्या. त्या जरा अनोख्या असल्याने कानाला गोड वाटतात. पण हे अलिकडचेच
असे मात्र नाही.
अपनी कहानी छोड जा वर रशियन सुरावटीची छाप होती तर सायोनारा सायोनारावर जपानी.
ओये ओये वर स्वाहिली गाण्याची होती तर लडकियोंसे ना मिलो तूम वर अरेबिक.
पण परदेशी धुनींपेक्षा मला पंजाबी शब्द आणि सुरावटींचा नको तितका प्रभाव आढळतो.
अरेच्चा पण माझ्या लेखाचा हेतू हा नव्हता, तर पुर्वी जे काही साचे वापरात होते, ते आता
मोडल्याचे जाणवतेय, त्याबद्दल लिहायचे होते. असे काही साचे बघू या.
१) भजन
पुर्वी प्रेक्षक जास्त भाविक होते म्हणा कि आणखी काहि. पण अनेक सुंदर भजने त्याकाळात निर्माण
झाली. मैने प्रभु आजतक तूमसे कुछ नही मांगा सारखा एखादा संवाद झाला, कि भजन यायचेच.
हे रोम रोम मे बसनेवाले राम (नीलकमल) प्रभु तेरो नाम (हम दोनो) असे थेट भजनाचे प्रसंग
असायचे किंवा आडवळणाने एखादा डोस द्यायचा असायचा. ना मै धन चाहू ( काला बाजार)
कधी तरी सगळेच अवघड होऊन बसलेले असायचे. तेरी है जमी (द बर्निंग ट्रेन)
पण शेवटचे असे भजन तर मला लगान मधलेच आठवतेय ( तेरे बिना हमका ) नंतर काही
सुफ़ी रचना आल्या. पण त्यातला आवेश, गान प्रकार हा जरा वेगळाच असायचा. आपल्याकडे
भजनात शांत रस दिसतो. पण मुस्लीम धर्मातील भजनात थोडा बेभानपणा असतो.
हा प्रकार प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नीट लक्षात येणार नाही. पण जॉन अब्राहम आणि अस्तादचा
जो अफ़गाणिस्तानमधला सिनेमा आला होता (काबूल ना ?) त्यात असा एक प्रसंग होता.
२) गझल
गझल हा शब्द ऐकला कि सिनेमासंदर्भात माझ्या पिढीच्या आधीच्या लोकांना मदनमोहन आणि
लताच आठवणार. अदालत, जहॉंआरा, दस्तक, गझल, मेरा साया, वह कौन थी असे अनेक
चित्रपट या दोघांनी गाजवले. पण बाकिच्या संगीतकारांनी देखील प्रसंगानुरुप उत्तम चाली बांधल्या.
रोशन, शंकर जयकिशन, जयदेव अशी अनेक नावे घेता येतील. मग मधे हा गायनप्रकार मागे
पडला. मग जगजित सिंग, गुलाम अली, पंकज उदास, सुरेश वाडकर, मनहर आदी लोकांनी
काही उत्तम गझला दिल्या. आता मात्र हा गायनप्रकार चित्रपट्संगीतातून गायब झाल्यासारखा
वाटतोय. सरफरोश नंतर चांगली गझल ऐकल्याचे आठवत नाही.
३) कव्वाली
चित्रपट संगीतात हा गायनप्रकार लोकप्रिय होताच पण त्या काळात मुंबईतही कव्वाली गायनाचे
कार्यक्रम व्हायचे. शकिला बानू भोपाली, जानी बाबू कव्वाल अशी मातब्बर मंडळी यायची.
चित्रपटांपैकी बरसात कि रात, (इश्क इश्क है, निगाहे नाजके मारोंका, जी चाहता है चूम लू)
कभी ए हकिकते मुंतजर (दुल्हन एक रात की) निगाहे मिलाने को ( दिल ही तो है)
चांदी का बदन (ताजमहाल) अल्ला ये अदा (मेरे हमदम मेरे दोस्त) जब इश्क कही हो जाता
(आरजू ) अशा कितीतरी कव्वाल्या आवर्जून संग्रही ठेवण्यासारख्या आहेत.
हम किसीसे कम नही, अमर अकबर ऎंथनी मधेही कव्वाल्या होत्या. शिरडीवाले साईबाबा तर
एकेकाळी रेल्वेतल्या भिकारी लोकांचे पेटंट गाणे होते. आर्डीने मग बर्निंग ट्रेन मधे, पल दो पल
अशी खणखणीत कव्वाली दिली.. पुढे मात्र हा प्रकार गायबच झाला. अगदी अलिकडे वन्स
अपॉन अ टाईम मधे कव्वाली सदृष्य काहितरी ऐकले खरे.
४) मुजरा
मला नेमके माहित नाही कि मुंबईत ताडदेवच्या कोठेवाल्या अजून मुजरा सादर करतात का, पण
हा प्रकार चित्रपटात खुप लोकप्रिय होता. अगर दिलबर कि रुसवाई (खिलौना), रुठे सैया (देवर)
चाहे तो मोरा जिया लैले (ममता) तस्वीरे मुहोब्बत ( संघर्ष) हम हाले दिल सुनाएंगे (मधुमति)
दिल कि कहानी (ताजमहाल) साकिया आज मुझे (साहब बीबी और गुलाम) हे माझे आवडते
मुजरे. रात बी है कुछ भिगी भिगी (मुझे जीने दो ) हा सर्वात जास्त आवडता.
पण या संदर्भात दोन चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय चालणार नाही तो म्हणजे पाकिजा
आणि उमराव जान. पाकिजात मीना कुमारी नृत्यनिपुण नसली तरी सितारा देवीच्या नृत्य दिग्दर्शनाने
वेगळीच जान आली होती. रेखाच्या उमराव जान मधे अशाच्या गायनाचा मोठा वाटा होता.
मला ऐश्वर्याच्या उमराव जानचा पण उल्लेख करायला हवा. ती त्यात सुंदर नाचली असली तरी
गाणी मात्र अत्यंत सुमार होती.
देवदास मधला माधुरीचा, मार डाला, मात्र मला विशेष आवडला नव्हता, जून्यापैकी नर्तकी नावाच्या
सिनेमात नंदाने आणि तवायफ़ मधे रति अग्निहोत्रीने सुमार मुजरे पेश केले होते. नजर लागे
राजा तोरे बंगले पर, (काला पानी) नलिनी जयवंतचा नाचही काहि खास नाही.
अलिकडे नव्या सिनेमात असा मुजरा बघितल्याचे आठवतच नाही.
५) शास्त्रीय गायन आणि नृत्य
लता आणि आशा बरोबरच, मन्ना डे आणि रफ़ी हे शास्त्रीय गायनात तरबेज कलाकार सक्रिय होते
तोपर्यंत शास्त्रीय रागांवर आधारीत गाणी खुलत होती. प्रसंगानुरुप अनेक दिग्गज शास्त्रीय संगीत
गायकांनी पण आपला आवाज चित्रपटासाठी दिला होता. (मी इथे यादी देत बसलो तर पाने पुरणार
नाहीत.)
या गाण्य़ांना अनेकवेळा शास्त्रीय बृत्यांची पण जोड मिळत असे. मुख्य प्रवाहातल्या सर्वच नसल्या
तरी वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, आशा पारेख, पद्मिनी, रागिणी, कुमकुम,संध्या या शास्त्रीय नृत्यात
पारंगत होत्या. त्यामूळे गाणे आणखीहि खुलत असे. या अभिनेत्रींबरोबरच काही कमी माहित असलेल्या
अभिनेत्रींनी पण उत्तम शास्त्रीय नृत्य पेश केलीत. उदा. रत्ना (लागा चुनरी मे दाग), विजया चौधरी
(पायलवाली देखना) बेला बोस (तेरे नैना तलाश करे जिसे) अनिता गुहा (प्रितम दरस दिखाओ)
कुठलीही सुरेल रचना हि कुठल्या ना कुठल्या शास्त्रीय रागावर आधारीत असतेच तरीपण आताच्या
गाण्यातले राग, ठळकपणे जाणवत नाहीत एवढे खरे. जोपर्यंत मी विविध भारतीवर संगीत सरिता
ऐकत होतो तोपर्यंत तरी नव्या चित्रपटातील गाणी रागाच्या नमुन्यादाखल वाजवत नसत.
शेवटचे असे गाणे ऐकले ते, हम दिल दे चुके सनम मधले. सूरसंगम नंतर शास्त्रीय नृत्यगायनावर
आधारित चित्रपटही आल्याचे आठवत नाही. शबानाचा रागा, अपवदात्मकच.
शेवटचे उत्तम क्लासिकल नृत्य आठवतेय ते तब्बूचे, तक्षक मधले (रंग दे नाही, नुसतेच भरतनाट्यम
केलंय)
६) कॅबरे
कॅबरे आणि हेलन हे जवळजवळ समानार्थी शब्द आहेत. पण हेलन यायच्या आधी कक्कू अशी नृत्ये
सादर करत होतीच. हेलन ने देखील इतर नृत्यप्रकार लिलया पेलले होते. तिने अगदी वैजयंतीमालाशी
मुकाबला केला होता (डॉ.विद्या, शतरंज) तिने कॅबरेला मात्र एक दर्जा मिळवून दिला. ती कुशल नर्तिका
तर होतीच त्यामूळे तिच्या नृत्यामधे अश्लील हावभाव करायची तिला गरज वाटली नाहि. ते आणले
बिंदूने. पुढे हेलनलापण तसे करावे लागले (इंतकाम, डॉन, राम बलराम, इन्कार)
अगदी क्वचितच मुख्य अभिनेत्री अशी नृत्ये सादर करत असत. मुमताज (हमजोली) आणि नर्गिस
(रात और दिन) तिच्या समकालीन अशा पद्मा खन्ना, जयश्री टी, मीना टी (या तिघी कथ्थक नर्तिका
होत्या. शिवाय फ़रियाल हे पण नाव ऐकल्याचे आठवतेय.
पण पुढे मुख्य नायिकाच अशी नृत्ये सादर करु लागला. झीनत, परवीन बाबी, रिना रॉय या पहिल्यावहिल्या
नट्या. पुढे अगदी माधुरी, मनिषा, उर्मिला पर्यंत हेच चालले.
याचेच पुढचे रुप म्हणजे आयटम सॉंग म्हणायचे का ? पण असली गाणी सादर करणा-या राखी सावंत,
मल्लिका शेरावत, याना गुप्ता, बिपाशा आदी काही नृत्यनिपुण वाटत नाही, त्यामूळे बराचसा नाच कॅमेराच
करतो.
७) डिस्को
ट्रॅव्होल्टाच्या सॅटरडे नाईट फीव्हर नंतर आपल्याकडे डिस्को गाण्यांची लाट आली होती. उषा उत्थपने
आधी अशी काही गाणी आणली. मग आशाचे हथकडी मधले गाणे आले होते (डिस्को स्टेशन) ते रिना
रॉयने सादर केले होते. मग परवीन बाबीचे पण नो पार्किंग असे शब्द असलेले गाणे आले होते.
मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर नावाचा सिनेमाच होता पण आता फारसा कुणाला आठवत नसेल
असा स्टार नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात कुमार गौरव आणि रति अग्निहोत्री होते.
नाझिया हसनच्या आवाजात गाणी होती त्यात. त्या काळात बहुतेक सिनेमात डिस्को गाणी
असायची. पण ही ट्रेंड लवकरच मागे पडली.
८) लोकगीत.
भारतभरातील समृद्ध लोकसंगीताचा बाज अनेक हिंदी गाण्यात दिसला. अनिल विश्वास, सलील चौधरी
सचिनदेव बर्मन यांनी बंगाली लोकसंगीताचा छान वापर केला. गुजराथी ( मै तो भूल चली बाबूल का
देस) मुत्तूकोडी कव्वारी हडा (मल्याळम) चढ गयो पापी बिछुआ (आसामी) थाणे काजळीया बनालू
(राजस्थानी) आहे मैया सोने का बनायो (मध्यप्रदेश) कि मै झुठ बोलिया, कोय ना (पंजाबी)
घे घे घे रे, घे रे सायबा (गोवा) अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
लोकसंगीतातून आलेल्या रागांचा वापर पण काहि प्रतिभावान संगीतकारांनी करुन घेतला होता.
तू चंदा मै चांदनी ( रेश्मा और शेरा-लता-जयदेव-राग पिलू / देस / मांड ) बिरजमे होली खेलत नंदलाल
(गोदान-रफि-पं. रविशंकर-राग काफि)
मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच उदाहरणे आठवताहेत.
दर्याकिनार एक बंगलो, मच गया शोर सारी नगरी रे, एक दो तीन वगैरे. मनोजकुमारच्या शिरडी के साईबाबा मधे,
शिव भोला भंडारी असे वाघ्या मुरळीचे गीत होते (पडद्यावर सचिन आणि उषा चव्हाण ) . अशांती मधे लवंगी मिरची
अशी एक लावणी होती (पडद्यावर शबाना, झीनत आणि परवीन) पण चाल काही लावणीची वाटत नव्हती.
चुनरी संभाल गोरी मधे लेझिम वाजलेय, वास्तव मधे मराठी आरती आहे तर सई परांजपेच्या साज मधे
एक नाट्यगीत सदृष्य गाणे आहे. पण फारसे काही नाहीच.
याशिवाय लोरी, युगुलगीते, लग्नगीते असेही काही साचे होतेच.
आता प्रतिसादातही अनेक साचे सापडतील मला.
गाण्यामधे कसला तरी क्लु
गाण्यामधे कसला तरी क्लु दिलेला असतो.
कोणाला आठवतात का ही गाणी.
>>>>>
जहां तेरी ये नजर है मेरी जाँ मुझे खबर है..
अरे दिवानो, मुझे पहचानो कहांसे आया मै हूं कौन
ये जवानी हद्द करदे (सरफरोश).. क्लु शोधायला आलेला इन्स्पेक्टर सलिम , क्लु देणारी बारबाला :).
गाण्यामधे कसला तरी क्लु
गाण्यामधे कसला तरी क्लु दिलेला असतो.
झुमका गिरा रे,बरेली के बाजार मे
हे रेलगीत ओळखा : पडद्यावर ऋषी
हे रेलगीत ओळखा : पडद्यावर ऋषी कपूर आणि पेंटल आणि त्यांना प्लेबॅक आशा-उषा.
व्हिक्टोरिया नं २०३च्या रिमेकमध्ये एक क्लु देणारं गाणं होतं, ज्यात रस्त्यांची (त्यांना देण्यात आलेल्या नेत्यांची) नावे गुंफून व्हिलनच्या अड्ड्याचा पत्ता पोलिसांना कळवला होता.
रेलगीत- छुक छुक छक छक बाँबे
रेलगीत- छुक छुक छक छक बाँबे से बरोडा तक- तुम कहो तबतक गाते रहें हम- रफूचक्कर
वर्षू बरोबर
वर्षू बरोबर
विक्टोरिया चा रीमेक पाहण्याची
लहानपणी मेळ्यात 'बिछडलेल्या'
लहानपणी मेळ्यात 'बिछडलेल्या' किंवा ताटातूट झालेली भावंडे ,मोठेपणी फॅमिली साँग्स म्हणून एकमेकाना शोधून काढतात.. झालच तर फॅमिली साँग मुळे 'खोई हुई याददाश्त' सुध्धा परत येणारी गाणी.
गाण्यामधे कसला तरी क्लु
गाण्यामधे कसला तरी क्लु दिलेला असतो.>>>>
जरा मन की तिवडिया खोल सैय्या तेरे द्वार खडे... कोहिनूर.. दिलीपकुमार.. नटी कोण माहीत नाही.
"दोस्त - दोस्ती" साचा आहे का
"दोस्त - दोस्ती" साचा आहे का अजून जिवंत ? एकेकाळी मात्र याची चलती होती चांगलीच.
१. "कोई जब राह ना पाये, मेरे संग आये, मेरी दोस्ती मेरा प्यार" - 'दोस्ती'
२. "दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा" - 'संगम'
३. "फूलों से दोस्ती है काटोंसे यारी" - 'दुनिया झुकती है"
४. "ये दोस्ती हम ना छोडेंगे" - 'शोले'
५. "तेरी मेरी दोस्ती प्यार मे बदल गई" - 'दोस्ताना'
अजून असणार. जरूर द्यावीत.
शिरडी के साईबाबा वरून आठवले.
शिरडी के साईबाबा वरून आठवले. या चित्रपटातील सर्व कलाकारांचा मेकअप अगदी नैसर्गीक वाटतो. जराही बटबटीत नाही. याउलट टिव्हीवर रामानंद सागर यांची साईबाबावर एक सिरीयल येवून गेली. त्यातील मेकअप फारच बटबटीत होता.
शिरडी के साईबाबा मधे मराठमोळं वातावरण फारच छान जपल्या गेलंय.
चित्रपटातील मेकअप, ड्रेपरी यांवरही यासारखा माहितीपुर्ण लेख येवू शकतो.
मस्त रे. आता पहिले प्रतिसाद
मस्त रे. आता पहिले प्रतिसाद वाचून मग प्रतिसाद लिहीणार.
"दोस्त - दोस्ती" साचा आहे का
"दोस्त - दोस्ती" साचा आहे का अजून जिवंत ? एकेकाळी मात्र याची चलती होती चांगलीच.
<<
अता त्याला 'दोस्ताना' म्हणतात , मा दा लाडला बिगड गया
जोक्स अपार्ट पण 'दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन' सही होतं दोस्ती साच्यातलं .
३ इडियट्स मधलं 'बहती हवासा था वो, उडती पतंग सा था वो' पण झकास !
क्लू वाली गाणी..(म्हणजे या
क्लू वाली गाणी..(म्हणजे या गाण्यांनंतर रहस्यभेद होतो)
१) मेरा नाम शबनम है (कटी पतंग)
२) आज की रात कोई आनेको है (अनामिका)
३) गुमनाम है कोई (गुमनाम)
४) रहते थे कभी जिनके दिलमे (ममता)
५) आज मौसम बडा बेईमान है (लोफ़र)
६) होठोंपे ऐसी बात (ज्वेल थीफ़)
७) आज हम अपनी दुवाओंका असर (पाकिजा)
दोन मित्रांमधली दोस्ती आता
दोन मित्रांमधली दोस्ती आता अधिक विस्ताराने किंवा खोलवर एक विषय म्हणून येतेय.
पुर्वी नुसती गाण्यातूनच यायची.
शोले, संगम, सच्चाई, दोस्ती या कहाण्या आता जरा वरवरच्या वाटायला लागल्यात.
मस्त आहे लेख. वाचतेय अजुन
मस्त आहे लेख. वाचतेय अजुन
हिरोचे सोलो गाणे सुरुवातीला.
हिरोचे सोलो गाणे सुरुवातीला. म्हण्जे क्कित्ती तो दिलदार नि छानै नै टाइप. जमीर मध्ये अमिताभचे, झालस्तर मुसाफिर हुं यारो टाइप. हिरो गिटार व बॅग घेओन गवतातून दर्या खोर्यातून प्रवास करतो. बस किंवा ट्रेन ने जाण्याऐवजी.
करण जोहर साचा.
सुरुवातीस बबली कॉलेज गाणे. त्यात हिरो बॉल ला किक मारणार व घामाचे केस कपाळावरून फिरविणार मग एक पार्टी सॉन्ग मग एक रोमँटिक साँग, मग एक धमाका साँग मग अजून एक रोमँटिक गाणे
मग एक ट्रेडिशनल गाणे. मग सर्व गाण्याच्या जिलब्या पाडून झाल्या कि कथानकात नाट्य कथा इत्यादि आण्ण्याची निकड भासली की चित्रपट गळफट्तो व लांबत जातो. संपतो. परत नव्या उत्साहाने तेच दळण.
अरे १) देशभक्ती पर गीतः मेरे
अरे
१) देशभक्ती पर गीतः मेरे देश की धरती जहां डाल डाल पर
२) समाजवादी गाणी: साथी हाथ बढाना. रोटी कपडा मकान इत्यादी. ती दूरदर्शन वर न्यूजरीलच चालू आहे अशी वाट्त.
३) नाते दर्शक गाणी: भाई बहन का ब्यार, मां के गीत. करण अर्जून मधले पहिले गाणे मला खरेच आवड्ते. सासर माहेरची गीते. मैंतो भूल चली बाबुल का देश ( हे पाणी टिपत डोळ्यातले.)
४) मौसम वाली गीते: सावन, बादल मेघा रे मेघारे, बरसात, इत्यादि आज मौसम बडा बेइमान है
५) त्योहारों के गीतः होली दिवाली करवा चौथ डांडिया. हे मेन.
६) ख्रिशचन गाणी: ओ मारिया, मायकेल दारू पीके दंगा करता है
७) बार मधील गाणी: सागर मधील एक गाणे, हम मधील जुम्मा चुम्मा. ( परवा रेकॉर्ड केले पण मग मुलीसमोर बघायचीच लाज वाटली म्हणून डिलीट केले. अमित पण असा वागायचा? )
८) भिकार्यांच्या थ्रू फिलॉसॉफी गाणी: आदमी मुसा फिर है . तुम एक पैसा देदो.
९) मदीना गाणी: दादा सिनेमात एक फार लांबडे गाणे होते. हसन हुसेन बलिदान इत्यादी वाली गाणी.
शादी ची गाणी. के थ्री जी मधील एक गाणे.
१०) साखरपुड्याचे गाणे: हम आप के है कौन, दस इत्यादीत ही सिच्युएशन आहे.
११) रीजनल गाणी जसे राजस्थानी गीते. घूंघटातल्या बायका
१२) शहर वर्णन पर गाणे: इ है बंबई नगरिया, चांदणीतले दिल्लीचे गाणे.
१३) डेटिंग परिस्थितीतले गाणे: कहो ना कहो. मड्डर, तुझे मिलनेको कभी कभी.
१४) कॉलेजातील मुशाइरा किंवा स्पर्धा: हसिनोंसे पहले धूलका फूल
१५) रात्र ह्या थीम वरील गाणी:
१६) नशा ह्या थीम वरील गाणी.
पीळ गाणी : मुहब्बत अब तिजारत
पीळ गाणी : मुहब्बत अब तिजारत बन गई है , ये पति पत्नी और तवायफ है अशी जी आपण ऐकूच शकत नाही. नाहीतर डिस्पिरीन घेउन अज्ञात वासात जावेच लागेल अशी गाणी. आता पुरे करावे.
हुस्न आणि शारिरीक अवयवांची
हुस्न आणि शारिरीक अवयवांची स्तुती करणारी (मोस्टली उर्दू) गाणी, यात प्रामुख्याने- आंख/नजर, गेसू/जुल्फे यांची गाणी सर्वाधिक. पलके, गोरा रंग, होठ, जोबन अधून मधून.
दिल हाही एक अवयव धरला तर सगळीच हिंदी गाणी यात धरायला हवीत.
बचपनमधून जवानीत प्रवेश करतानाची गाणी झालीत का?
उदा.
आज मै जवान हो गयी हूं, गुलसे गुलीस्तान (काहीही) हो गयी हूं..
जा जा जा मेरे बचपन कही जाके छूप जा ना..
पत्रांद्वारे प्यार का संदेसा पाठवायची गाणी आणि डाकियाची गाणी (हे झालं असणारच बहुतेक)
फूल तुम्हे भेजा है खत में
झोका हवा का आज भी
डाकिया डाक लाया
लॉजिकल अंताक्षरीमधले विषयच इथे डॉक्यूमेन्ट होताहेत एका परीने.
अश्विनीमामी.. पीळ गाणी साचा आवडला. मात्र अजूनही तो जोमाने चालूच आहे
घोड्याच्या टापांचा बीट असलेली
घोड्याच्या टापांचा बीट असलेली गाणी/ टांगागाणी - उदा. - कभी ना कभी तो कही ना कही .., मेरे संग संग आया तेरी .. हा बीट असलेलं शेवटचं गाणं बहुतेक अंदाज अपना अपनामधील..
मला तर आताशा कैलाशखेरोफोबिया या रोगाची लागण झाली आहे. तारस्वरातील त्याचा आवाज एफेम नि जाहिरातींमुळे अतिपरीचयात.. सारखा झालाय व डोक्याला शॉट देतो.
काल मी अगदी नेटाने यू ट्यूबवर
काल मी अगदी नेटाने यू ट्यूबवर वह कौन थी बघितला (नेटाने कारण संपुर्ण रात्रभर तो डाऊनलोड करावा लागला)
सर्व गाणी सुंदर आणि साधनाचे मोहक रुप, क्या कहने. शेवटपर्यंत सस्पेन्स छान राखला होता.
यात आशा रफी चे मला आठवत नसलेले चिकी रिकि चिकी रिकि असे एक गाणे आहे. त्यावर हेलन आणि मनोजकुमारचा ट्वीस्ट आहे. हा नाच माझ्या लहानपणी आम्ही सगळी मुले करायचो. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबानपर वर पण असाच ट्वीस्ट आहे.
आणखी एक नाच, ज्याचे नाव मला माहीत नाही. दोन्ही हात वर करुन ते मनगटापासून हलवायचे.
नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे वर असा नाच आहे.
अरे वा !!! दोन दिवस बिझी
अरे वा !!! दोन दिवस बिझी होते, तर बरीच मजल मारलिये सगल्यान्नी.
अजुन एक साचा : स्टेज प्रोग्राम / आकाशवाणी इ. वर mhantaleli गाणी
१. शीशा हो या दिल हो
२. हमने तुमको देखा
३. रंग और नूर की बरात किसे -
४. हमने देखि है उन आँखों
५. अब तो है तुमसे
६. लूटे कोई मन का नगर
७. तेरे मेरे मिलन की ये रैना
८. मीत ना मिला रे मनका
९. आते जाते खुबसूरत आवारा सडकों पे
१०. मैं पल दो पल का शायर
११. बीते हुवे लम्हों की कसक
१२. अब तेरे बिन जी लेंगे हम
१३. आइना मुझसे मेरी पेहेलिसी सूरत मांगे
गॅरेजमधली गाणी. व्यवसायात्मक
गॅरेजमधली गाणी. व्यवसायात्मक गाणी. लेलो रे लेलो बाबू नारियल पानी लेलो. गरम गरम चाय पिलो.
चक्कू छुरीयां तेज करा लो.
मस्त लेख आणि मस्त भर
मस्त लेख आणि मस्त भर सगळ्यांची..
खरेच लॉजिकल अंताक्षरीची आठवण झाली.. अजून सुरू आहे का ती?
रेलगाडी मध्ये : छैय्या छैय्या , होगा तुमचे प्यारा कौन ओ कांचन ओ कांची... ऋषी आणि पद्मिनी ((झाली असतील तर क्षमस्व)
ह्यात फक्त हिंदी गाण्यांचेच साचे का? मराठी पण लिहा
लोरी/अंगाई - निंबोणीच्या झाडामागे
बाईक - रोते रोते आते हैं सब.. हे गाणे नायक स्वतःविषयी सांगतोय ह्या साच्यात पण बसेल
जिंदगी एक सफर हैं सुहाना,
कार : चल चल री चल मेरी राम पियारी, ये दिल ना होता बेचारा, पुकारता चला हू मैं
(विषयांतर - ठोकळयांवर चित्रित झालेली चांगली गाणी असा विषय झालाय का माबोवर?)
नाव : रुलाके गया सपना मेरा, आणि चक्क 'दो लफ्जोंकी' राहिले की काय ह्या यादीत?
कार/ट्रेन/बस : हो गया हैं तुझको तो प्यार सजना
मला कुणीतरी त्या ना ना करते
मला कुणीतरी त्या ना ना करते प्यार... या नाचाचे नाव सांगा.
आकाशवाणी गाणी... ऐ अजनबी तू
आकाशवाणी गाणी... ऐ अजनबी तू भी कभी.. किंग खान आहे त्यात!
आईचा आवाज गोड असतो जास्त.
आईचा आवाज गोड असतो जास्त. बाबासारखा खडबडीत नसतो >> या वाक्याला प्रचंड आक्षेप.
बाकी चर्चा मस्त चालू आहे.
दिनेश ~ "ना ना करते...." शशी
दिनेश ~
"ना ना करते...." शशी कपूर आणि नंदा डान्स हा 'स्वींग डान्स' जातकुळीतील. याचेच "स्टाईलिश" तसेच "रीफाईन्ड" व्हर्जन म्हणजे "टॅन्गो".
शिमॉक दावरच्या डान्सिग स्कूलमध्ये जी जोडपी केवळ अॅरोबिक सदृश्य 'व्यायामा'साठी डान्स शिकू इच्छितात त्याना 'स्वींग डान्स स्टेप्स' शिकविल्या जातात.
आईचा आवाज गोड असतो जास्त.
आईचा आवाज गोड असतो जास्त. बाबासारखा खडबडीत नसतो >> या वाक्याला प्रचंड आक्षेप.
>>>>>>>>>
अनुमोदन !! आमच्या बाबाचा ( म्हणजे पतिराजांचा ) आवाज फार छान आहे. गेली १० वर्षे रोज रात्री तो माझ्या, म्हणजे त्याच्या मुलीला अतिशय गोड गाणी म्हणून झोपवतो. ती १० वर्षांची (घोड़ी ) झाली तरी गाणे ऐकल्या शिवाय झोपत नाही.
थोड़े विषयांतर ::: मराठीत किती छान अंगाई गीते झाली. माझ्या मुलीच्या आवडीचे म्हणजे " गुणी बाळ असा जागशी का रे वाया, निज रे निज शिवराया"
हुश्श्श्श... पहिल्यापासुन
हुश्श्श्श... पहिल्यापासुन सर्व फलक न थांबता वाचून काढला.
एक साचा अजुनपर्यंत कोणीच दिलेला नाहीये तो म्हणजे प्राण्यांवर आधारीत गीते,
चल चल मेरे साथी ओ मेरे हाथी
जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा
हाथी जैसी चाल घोडे जैसी दूम
चल र वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको
जोडी बैलाची खिल्लारी
जास्त आठवत नाहीयेत आत्ता, कोणाला आठवत असतील तर सुचवा.
Pages