हिंदी गाण्यांचे वापरात नसलेले साचे.

Submitted by दिनेश. on 6 October, 2011 - 07:11

आजकाल सकाळ संध्याकाळ प्रवासात माझा अर्धा पाऊण तास जातो. अंतर केवळ ८ किमीचे पण तेवढा
वेळ जातोच. ड्रायव्हर गाडी चालवत असतो, आणि मी मात्र एफ़ एम वर हिंदी गाणी ऐकत असतो.
इथे सकाळी कपाचा ऎंड कॉफी असा एक चांगला कार्यक्रम असतो. (हा कार्यक्रम Soundasiafm.com
वर उपलब्ध आहे.) त्यातल्या गाण्यांपेक्षा मला निवेदक जेसी आणि जीत यांच्या गप्पा ऐकायला आवडतात.
त्याबरोबर हवामानाचा अंदाज (जो कधीच खरा ठरत नाही.) आणि ठळक बातम्या यांच्यासाठी ऐकतो.
पण आज लिहायचे कारण म्हणजे, त्यात वाजवली जाणारी गाणी. हि गाणी अगदि नवीन असतात.

याच एफ़ेम स्टेशनवर दिवसभरात आणि रात्रीही जुनी सुंदर गाणी लावतात आणि त्यातले निवेदनही
चांगले असते, पण आमच्या येण्याजाण्याच्या वेळेत मात्र नवीनच गाणी ऐकवली जातात.

कबूल केले पाहिजे, कि यापैकी ऐकून झाल्यावर लगेच एकाही गाण्याचे शब्द मला सांगता येणार नाही्त.
सेनोरिता सारखी काही गाणी, सिनेमा बघितल्यामूळे ओळखीची वाटतात, पण बाकिची हिंदी होती कि
पंजाबी होती का इंग्लीश होती, हे ही मला सांगता येणार नाही.
सगळ्यात सामायिक जर मला काही वाटत असेल तर -
१) असप्ष्ट शब्दोच्चार : पुर्वीचे गाणे मला अनोळखी असले तरी त्यातले शब्द मी उतरवून घेईन, इतके
स्पष्ट ऐकू येतात. आताच्या गाण्यातले शब्द मात्र मला अजिबात कळत नाहीत.
हि सुरवात कधी झाली ते सांगता येत नाही, पण असे अगदी पहिले गाणे मला आठवतेय ते, रेमोचे
प्यार तो होनाही था. मला तर ते फ्यार ठो ओनाई ठा, असेच ऐकू आले होते.
या कलाकारांचे शिक्षण हिंदीतून झाले नसेलही, पण संगीतकाराने तसा आग्रह धरायला नको होता का ?
शुक्रतारा मंद वारा, गाण्यापुर्वी अरूण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी मराठी गाणे गायले नव्हते. पण
ते गाणे ऐकल्यावर हे खरे वाटेल का ? श्रीनिवास खळ्यांनी, लताच्या आवाजात अथर्वशीर्ष सादर केले
होते. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा नव्हे तर अक्षराचा उच्चार खणखणीत आहे.

२) गेंगाणा स्वर : आता कधी कधी गाण्यात मधेच एक गेंगाणा स्वर ऐकू येतो. हा स्वर मानवी
गळ्यातून नक्कीच आलेला नसतो. याला गेंगाणा म्हणायचे कि आणखी काही ते पण मला सांगता
येणार नाही. पण हा स्वर बहुदा, कॉम्प्यूटरच्या मदतीने काढत असावेत.

३) एकापेक्षा जास्त व्यक्तीचे आवाज. गाणे एकच व्यक्ती गात असते पण दोन व्यक्ती एकत्र गाताहेत
असा परिणाम साधलेला असतो. आणि हे सहज चाळा म्हणून केल्यासारखे वाटते. असा परिणाम
आर्डीने पण काही गाण्यात साधला होता (क्या जानू सजन (लता), उलझन हजार कोई डाले, हो
बदन जलता है (दोन्ही आशा))
अजय देवगणच्या, आक्रोश मधे पण आझादी कि करे सौदेबाजी असे एक जरा बरे गाणे होते,
त्यातहि असाच परिणाम जाणवला मला. पडद्यावर तर ते गाणे बॅकग्राऊंडलाच वाजते.

४) एकसुरी ताल. खरे तर मी हा विचित्र शब्द प्रयोग करतोय, पण मला म्हणायचेय ते हे
कि ताल प्रकर्षाने जाणवतो, पण त्यात काही नाविन्य दिसत नाही. बहुतेक तो चार ते पाच
मात्रांचाच असतो. आणि तो नेहमीच गायक गायिकेच्या वरचढ वाजत असतो. कोण, कुणाला
साथ करतेय तेच कळत नाही. अगदीच नवीन काही ऐकायला मिळत नाही असे नाही.
गुजारिश मधल्या उडी उडी मधे जरा वेगळा ताल होता. सैफ़ आणि दिपिका च्या एका गाण्यातही
(चन्ना रे चन्ना रे ) काही वेगळे आढळले होते.
पण दादरा, झपताल, रुपक सारखे ओळखीचे ताल अजिबातच ऐकायला मिळत नाहीत.

५) परदेशी गाण्यांचा प्रभाव.
आता खुपदा परदेशात(च) चित्रीकरण होत असल्याने काही परदेशी धुन गाण्यात ऐकू येतात.
सात खून माफ़ मधल्या डार्लिंग वर रशियन गाण्यांचा प्रभाव होता तर जिंदगी ना मिलेगी दोबारा
मधे स्पॅनिश सुरावटी होत्या. त्या जरा अनोख्या असल्याने कानाला गोड वाटतात. पण हे अलिकडचेच
असे मात्र नाही.
अपनी कहानी छोड जा वर रशियन सुरावटीची छाप होती तर सायोनारा सायोनारावर जपानी.
ओये ओये वर स्वाहिली गाण्याची होती तर लडकियोंसे ना मिलो तूम वर अरेबिक.
पण परदेशी धुनींपेक्षा मला पंजाबी शब्द आणि सुरावटींचा नको तितका प्रभाव आढळतो.

अरेच्चा पण माझ्या लेखाचा हेतू हा नव्हता, तर पुर्वी जे काही साचे वापरात होते, ते आता
मोडल्याचे जाणवतेय, त्याबद्दल लिहायचे होते. असे काही साचे बघू या.

१) भजन
पुर्वी प्रेक्षक जास्त भाविक होते म्हणा कि आणखी काहि. पण अनेक सुंदर भजने त्याकाळात निर्माण
झाली. मैने प्रभु आजतक तूमसे कुछ नही मांगा सारखा एखादा संवाद झाला, कि भजन यायचेच.
हे रोम रोम मे बसनेवाले राम (नीलकमल) प्रभु तेरो नाम (हम दोनो) असे थेट भजनाचे प्रसंग
असायचे किंवा आडवळणाने एखादा डोस द्यायचा असायचा. ना मै धन चाहू ( काला बाजार)
कधी तरी सगळेच अवघड होऊन बसलेले असायचे. तेरी है जमी (द बर्निंग ट्रेन)
पण शेवटचे असे भजन तर मला लगान मधलेच आठवतेय ( तेरे बिना हमका ) नंतर काही
सुफ़ी रचना आल्या. पण त्यातला आवेश, गान प्रकार हा जरा वेगळाच असायचा. आपल्याकडे
भजनात शांत रस दिसतो. पण मुस्लीम धर्मातील भजनात थोडा बेभानपणा असतो.
हा प्रकार प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नीट लक्षात येणार नाही. पण जॉन अब्राहम आणि अस्तादचा
जो अफ़गाणिस्तानमधला सिनेमा आला होता (काबूल ना ?) त्यात असा एक प्रसंग होता.

२) गझल
गझल हा शब्द ऐकला कि सिनेमासंदर्भात माझ्या पिढीच्या आधीच्या लोकांना मदनमोहन आणि
लताच आठवणार. अदालत, जहॉंआरा, दस्तक, गझल, मेरा साया, वह कौन थी असे अनेक
चित्रपट या दोघांनी गाजवले. पण बाकिच्या संगीतकारांनी देखील प्रसंगानुरुप उत्तम चाली बांधल्या.
रोशन, शंकर जयकिशन, जयदेव अशी अनेक नावे घेता येतील. मग मधे हा गायनप्रकार मागे
पडला. मग जगजित सिंग, गुलाम अली, पंकज उदास, सुरेश वाडकर, मनहर आदी लोकांनी
काही उत्तम गझला दिल्या. आता मात्र हा गायनप्रकार चित्रपट्संगीतातून गायब झाल्यासारखा
वाटतोय. सरफरोश नंतर चांगली गझल ऐकल्याचे आठवत नाही.

३) कव्वाली

चित्रपट संगीतात हा गायनप्रकार लोकप्रिय होताच पण त्या काळात मुंबईतही कव्वाली गायनाचे
कार्यक्रम व्हायचे. शकिला बानू भोपाली, जानी बाबू कव्वाल अशी मातब्बर मंडळी यायची.
चित्रपटांपैकी बरसात कि रात, (इश्क इश्क है, निगाहे नाजके मारोंका, जी चाहता है चूम लू)
कभी ए हकिकते मुंतजर (दुल्हन एक रात की) निगाहे मिलाने को ( दिल ही तो है)
चांदी का बदन (ताजमहाल) अल्ला ये अदा (मेरे हमदम मेरे दोस्त) जब इश्क कही हो जाता
(आरजू ) अशा कितीतरी कव्वाल्या आवर्जून संग्रही ठेवण्यासारख्या आहेत.
हम किसीसे कम नही, अमर अकबर ऎंथनी मधेही कव्वाल्या होत्या. शिरडीवाले साईबाबा तर
एकेकाळी रेल्वेतल्या भिकारी लोकांचे पेटंट गाणे होते. आर्डीने मग बर्निंग ट्रेन मधे, पल दो पल
अशी खणखणीत कव्वाली दिली.. पुढे मात्र हा प्रकार गायबच झाला. अगदी अलिकडे वन्स
अपॉन अ टाईम मधे कव्वाली सदृष्य काहितरी ऐकले खरे.

४) मुजरा

मला नेमके माहित नाही कि मुंबईत ताडदेवच्या कोठेवाल्या अजून मुजरा सादर करतात का, पण
हा प्रकार चित्रपटात खुप लोकप्रिय होता. अगर दिलबर कि रुसवाई (खिलौना), रुठे सैया (देवर)
चाहे तो मोरा जिया लैले (ममता) तस्वीरे मुहोब्बत ( संघर्ष) हम हाले दिल सुनाएंगे (मधुमति)
दिल कि कहानी (ताजमहाल) साकिया आज मुझे (साहब बीबी और गुलाम) हे माझे आवडते
मुजरे. रात बी है कुछ भिगी भिगी (मुझे जीने दो ) हा सर्वात जास्त आवडता.
पण या संदर्भात दोन चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय चालणार नाही तो म्हणजे पाकिजा
आणि उमराव जान. पाकिजात मीना कुमारी नृत्यनिपुण नसली तरी सितारा देवीच्या नृत्य दिग्दर्शनाने
वेगळीच जान आली होती. रेखाच्या उमराव जान मधे अशाच्या गायनाचा मोठा वाटा होता.
मला ऐश्वर्याच्या उमराव जानचा पण उल्लेख करायला हवा. ती त्यात सुंदर नाचली असली तरी
गाणी मात्र अत्यंत सुमार होती.
देवदास मधला माधुरीचा, मार डाला, मात्र मला विशेष आवडला नव्हता, जून्यापैकी नर्तकी नावाच्या
सिनेमात नंदाने आणि तवायफ़ मधे रति अग्निहोत्रीने सुमार मुजरे पेश केले होते. नजर लागे
राजा तोरे बंगले पर, (काला पानी) नलिनी जयवंतचा नाचही काहि खास नाही.
अलिकडे नव्या सिनेमात असा मुजरा बघितल्याचे आठवतच नाही.

५) शास्त्रीय गायन आणि नृत्य

लता आणि आशा बरोबरच, मन्ना डे आणि रफ़ी हे शास्त्रीय गायनात तरबेज कलाकार सक्रिय होते
तोपर्यंत शास्त्रीय रागांवर आधारीत गाणी खुलत होती. प्रसंगानुरुप अनेक दिग्गज शास्त्रीय संगीत
गायकांनी पण आपला आवाज चित्रपटासाठी दिला होता. (मी इथे यादी देत बसलो तर पाने पुरणार
नाहीत.)
या गाण्य़ांना अनेकवेळा शास्त्रीय बृत्यांची पण जोड मिळत असे. मुख्य प्रवाहातल्या सर्वच नसल्या
तरी वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, आशा पारेख, पद्मिनी, रागिणी, कुमकुम,संध्या या शास्त्रीय नृत्यात
पारंगत होत्या. त्यामूळे गाणे आणखीहि खुलत असे. या अभिनेत्रींबरोबरच काही कमी माहित असलेल्या
अभिनेत्रींनी पण उत्तम शास्त्रीय नृत्य पेश केलीत. उदा. रत्ना (लागा चुनरी मे दाग), विजया चौधरी
(पायलवाली देखना) बेला बोस (तेरे नैना तलाश करे जिसे) अनिता गुहा (प्रितम दरस दिखाओ)

कुठलीही सुरेल रचना हि कुठल्या ना कुठल्या शास्त्रीय रागावर आधारीत असतेच तरीपण आताच्या
गाण्यातले राग, ठळकपणे जाणवत नाहीत एवढे खरे. जोपर्यंत मी विविध भारतीवर संगीत सरिता
ऐकत होतो तोपर्यंत तरी नव्या चित्रपटातील गाणी रागाच्या नमुन्यादाखल वाजवत नसत.
शेवटचे असे गाणे ऐकले ते, हम दिल दे चुके सनम मधले. सूरसंगम नंतर शास्त्रीय नृत्यगायनावर
आधारित चित्रपटही आल्याचे आठवत नाही. शबानाचा रागा, अपवदात्मकच.
शेवटचे उत्तम क्लासिकल नृत्य आठवतेय ते तब्बूचे, तक्षक मधले (रंग दे नाही, नुसतेच भरतनाट्यम
केलंय)

६) कॅबरे

कॅबरे आणि हेलन हे जवळजवळ समानार्थी शब्द आहेत. पण हेलन यायच्या आधी कक्कू अशी नृत्ये
सादर करत होतीच. हेलन ने देखील इतर नृत्यप्रकार लिलया पेलले होते. तिने अगदी वैजयंतीमालाशी
मुकाबला केला होता (डॉ.विद्या, शतरंज) तिने कॅबरेला मात्र एक दर्जा मिळवून दिला. ती कुशल नर्तिका
तर होतीच त्यामूळे तिच्या नृत्यामधे अश्लील हावभाव करायची तिला गरज वाटली नाहि. ते आणले
बिंदूने. पुढे हेलनलापण तसे करावे लागले (इंतकाम, डॉन, राम बलराम, इन्कार)
अगदी क्वचितच मुख्य अभिनेत्री अशी नृत्ये सादर करत असत. मुमताज (हमजोली) आणि नर्गिस
(रात और दिन) तिच्या समकालीन अशा पद्मा खन्ना, जयश्री टी, मीना टी (या तिघी कथ्थक नर्तिका
होत्या. शिवाय फ़रियाल हे पण नाव ऐकल्याचे आठवतेय.

पण पुढे मुख्य नायिकाच अशी नृत्ये सादर करु लागला. झीनत, परवीन बाबी, रिना रॉय या पहिल्यावहिल्या
नट्या. पुढे अगदी माधुरी, मनिषा, उर्मिला पर्यंत हेच चालले.
याचेच पुढचे रुप म्हणजे आयटम सॉंग म्हणायचे का ? पण असली गाणी सादर करणा-या राखी सावंत,
मल्लिका शेरावत, याना गुप्ता, बिपाशा आदी काही नृत्यनिपुण वाटत नाही, त्यामूळे बराचसा नाच कॅमेराच
करतो.

७) डिस्को

ट्रॅव्होल्टाच्या सॅटरडे नाईट फीव्हर नंतर आपल्याकडे डिस्को गाण्यांची लाट आली होती. उषा उत्थपने
आधी अशी काही गाणी आणली. मग आशाचे हथकडी मधले गाणे आले होते (डिस्को स्टेशन) ते रिना
रॉयने सादर केले होते. मग परवीन बाबीचे पण नो पार्किंग असे शब्द असलेले गाणे आले होते.

मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर नावाचा सिनेमाच होता पण आता फारसा कुणाला आठवत नसेल
असा स्टार नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात कुमार गौरव आणि रति अग्निहोत्री होते.
नाझिया हसनच्या आवाजात गाणी होती त्यात. त्या काळात बहुतेक सिनेमात डिस्को गाणी
असायची. पण ही ट्रेंड लवकरच मागे पडली.

८) लोकगीत.

भारतभरातील समृद्ध लोकसंगीताचा बाज अनेक हिंदी गाण्यात दिसला. अनिल विश्वास, सलील चौधरी
सचिनदेव बर्मन यांनी बंगाली लोकसंगीताचा छान वापर केला. गुजराथी ( मै तो भूल चली बाबूल का
देस) मुत्तूकोडी कव्वारी हडा (मल्याळम) चढ गयो पापी बिछुआ (आसामी) थाणे काजळीया बनालू
(राजस्थानी) आहे मैया सोने का बनायो (मध्यप्रदेश) कि मै झुठ बोलिया, कोय ना (पंजाबी)
घे घे घे रे, घे रे सायबा (गोवा) अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
लोकसंगीतातून आलेल्या रागांचा वापर पण काहि प्रतिभावान संगीतकारांनी करुन घेतला होता.
तू चंदा मै चांदनी ( रेश्मा और शेरा-लता-जयदेव-राग पिलू / देस / मांड ) बिरजमे होली खेलत नंदलाल
(गोदान-रफि-पं. रविशंकर-राग काफि)

मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच उदाहरणे आठवताहेत.
दर्याकिनार एक बंगलो, मच गया शोर सारी नगरी रे, एक दो तीन वगैरे. मनोजकुमारच्या शिरडी के साईबाबा मधे,
शिव भोला भंडारी असे वाघ्या मुरळीचे गीत होते (पडद्यावर सचिन आणि उषा चव्हाण ) . अशांती मधे लवंगी मिरची
अशी एक लावणी होती (पडद्यावर शबाना, झीनत आणि परवीन) पण चाल काही लावणीची वाटत नव्हती.
चुनरी संभाल गोरी मधे लेझिम वाजलेय, वास्तव मधे मराठी आरती आहे तर सई परांजपेच्या साज मधे
एक नाट्यगीत सदृष्य गाणे आहे. पण फारसे काही नाहीच.

याशिवाय लोरी, युगुलगीते, लग्नगीते असेही काही साचे होतेच.
आता प्रतिसादातही अनेक साचे सापडतील मला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे माहीती.........
रा. वन ची सुध्दा ऐकुन बघा...... तो अजुन एक प्रकार म्हणुन टाकावा लागेल

मस्त लिहिलंय. Happy

सुरूवातीचं नवीन गाण्यांबद्दल लिहिलंय त्याला अगदी अगदी!
मी सलग ३-४ नवीन गाणी ऐकू शकत नाही एफ.एम.वर; काना-डोक्याला कटकटच व्हायला लागते.

क्या बात है दिनेशभौ.
एकदम लहान होवुन गेलो बघा. Happy
पाण्यातली गाणी आठवताहेत का?
यमुनाजळी खेळू खेळ कन्हया, का लाजता..
मेरे मनकी गंगा..

मस्त ऑबझर्वेशन दिनेशदा.

एक उत्कृष्ट अल्लाची विनवणी आठवतेय. अब्दुल्लातील 'ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे मंजूर है, सामने तेरे तेरा बंदा बहोत मजबूर है' ही आतपर्यंत पीळ घालणारी आर्त हाक! त्यातलं ते अरेबिक म्युझिक, ते अंगावर येणारं वाळवंट आणि 'अल्लाSSSS मुल्लाSSSSS' ची हाळी (ही मात्र गाण्याचा भाग न बनता अजून मागून, अस्पष्टपणे आली असती तर अधिक उठावदार वाटली असती असं मला वाटतं). अप्रतिम!

मुजरा : एक हेमामालिनीने केलेला मुजरा आठवतोय. 'मेहेरबानो कदरदानो, कर लो मुलाकात आखरी, है ये मुजरे की रात आखरी'. समोर खामोशकुमार शत्रुघ्न बसलाय. चित्रपटाचं नाव काही आठवत नाहीये.

लोकगीत : चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजडेवाली मुनिया.

दिनेशदा, खरंच नवीन गाण्यांचे उच्चार कळतच नाहीत. ह्या गणपतीत एका गाण्याने उच्छाद मांडला होता. मी माझ्या मुलाला म्हटलंसुद्धा "किती नाकात गातोय रे हा!" तर माझा मुलगा म्हणाला " अग आजच्या काळातला ए-वन गायक आहे हा! " मी गप्पच बसले.

'जुने ते चांगले आहे' सांगायला नव्याची yardstick लावायला लागणे हा विरोधाभास आहे का ? नव्या गाण्यांमधे काहीच चांगले सापडत नसेल तर कदाचित तुम्ही योग्य ते ऐकत नसाल असा विचार केलायत का ? खरच काय जुने नि काय नवे हे दर पिढीनुसार बदलत असते. त्यावर हे स्टँप मारायचा आपल्याला हक्क आहे का ?

*दिनेश, तुमच्या ह्या लेखाची सुरूवात हे फक्त निमित्त वरच्या प्रश्नांसाठी. चित्रपट, संगीत ह्या बाफवर तुम्ही वरचेवर लिहिलेले वाचून विचारायचे होते. कोणाला काय आवडावे किंवा त्याची प्रतवारी कशी करावी हे सांगायचा हेतू नाहि. फक्त दुसरी बाजू बघूया का हे विचारायचे होते.*

) गेंगाणा स्वर : आता कधी कधी गाण्यात मधेच एक गेंगाणा स्वर ऐकू येतो. हा स्वर मानवी
गळ्यातून नक्कीच आलेला नसतो. याला गेंगाणा म्हणायचे कि आणखी काही ते पण मला सांगता
येणार नाही. पण हा स्वर बहुदा, कॉम्प्यूटरच्या मदतीने काढत असावेत.

<<<< हा इफेक्ट चांगला वाटतो , संगीतकार वापर कसा करतो त्यावर आहे.
ए. आर. रेहमान चं 'ओ हमदम सुनियो रे' गाण्यात असा कंप्युटराइज्ड आवाज आहे, पण छान वाटतो.
इथे ऐका (२:३५ ते २:४०) http://www.youtube.com/watch?v=a0zirHHztKE&feature=related
इथे 'ओ जानिया शाम को खिडकीसे नंतर 'चोरी चोरी नंगे पांव चान्द आयेगा' या एका ओळीला हा इफेक्ट कसला सही वाटलाय.

मराठीचा प्रभाव असलेल्या गाण्यात मुंगडा राहिलं.
अलीकडे आलेल्या गाण्यां मधे मै तेरा तोता तू मेरी मैना (पाप कि दुनिया), हमको आज काल है इंतजार (सैलाब),गल्यान साखली सोन्याची (दिल है के मानता नही), तेरा ही जलवा (वाँटेड), मला लागली कोणाची हिचकी (रिस्क), तुझको फिरसे जलवा दिखानाही होगा (डॉन२), आयला रे आयला हात तिच्या मायला( खट्टा मीठा-नवा), देखा जो तुझे यार दिलमे बजी गिटार(अपना सपना मनी मनी).. अजुन बरीच सापडतील.
पण पंजाबी- भोजपुरी वरून घेतलेल्या लोकगीतां इतकी जानतेला अपिल होत नसावीत :).

आकाशवाणीचे कार्यक्रम सध्याच्या एफ.एम.च्या जमान्यात कुणी ऐको वा ना ऐको, पण जुनी सदाबहार गाणी आणि त्यासोबत निवेदकाकडून सांगितल्या जाणार्‍या गाण्यासंदर्भातील त्या हृद्य आठवणींना तोड नाही. एफएमच्या काही स्टेशन्सनी कानसेनांच्या अशा आवडीचा कानोसा घेतल्याने मग त्यानीही 'पुरानी जीन्स', 'कुछ लम्हे', 'याद आ गयी' अशा शीर्षकांनी जुन्या गाण्यांना आपल्या वेळापत्रकात बर्‍यापैकी वेळ दिला आहे हे मान्य; पण विविध भारती आणि आकाशवाणी ज्याप्रमाणे दोन गाण्यांच्यामध्ये जाहिराती प्रसृत करत नाही, त्यानुसार एफएमची तशी पॉलिसी नसल्याने १९५४-५५ चे लताचे मन प्रसन्न करणारे गाणे आले आणि त्यानंतर तलत असेल तर मध्येच जाहिरातींचा आणि किंकाळ्या स्वरूपातील निवेदनांचा जो भडिमार होतो तो केवळ असह्य.

दिनेश यांनी जे उपविभाग देवून 'मेमरी डाऊनलेन' खुणावली आहे; ती मनमोहक आहे. फार प्रसन्न वाटले त्या विभागातील सविस्तर टिपण्या.

१. भजन : अगदी जुने नाही आणि नवेही नाही अशा काळात एकदोन भजनाचे प्रसंग ठळकपणे आठवतात, पैकी एक : 'शागिर्द' मधील सायराबानू म्हणते ते "कान्हा आन् पडी मै तेरे द्वार" आणि दुसरे 'मनचली' मधील संजीवकुमारचे 'फेक भजन ~ तनमनधन सब है तेरा" ~ दोन्हीही लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचीच हाही एक योगायोग.

२. कव्वाली : लेखात ज्या कव्वालींचा उल्लेख झाला आहे त्या सातत्याने या गटातील टॉपर्स आहेतच आणि आज या घडीलाही यूट्युबवर त्याना जगभरातून हिट्स बसल्या जातात, इतकी त्यांची ख्याती आहे. 'मेरे हमदम...." ची तर मुमताझच्या अदाकारीने कातील झाली आहे. काय भन्नाट सादरीकरण केले आहे तिने !

'हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोने' या 'अल हिलाल' मधील कव्वालीकडे या प्रकाराचे जनकत्व जाते. ही कव्वालीदेखील आज तितकीच लोकप्रिय आहे.

४. मुजरा : येस्स ~~ परत मुमताझ "अगर दिलबर की रुसवाई". सर्वार्थाने कोठीवरील मुजरा आणि तिची अदाकारी. मेहमुदच्या 'छोटे नवाब' मध्येही अमिताचा असाच एक उत्तम मुजरा आहे "चुरा के दिल बन रहे है भोले, जैसे कुछ जानते नही". कर्णमधुर.

५. शास्त्रीय गाणी आणि नृत्ये ~ दिनेश यांच्या मतापुढे जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही.

६. कॅबरे : हेलेनला १००% मार्क्स या प्रकारात. 'इंतकाम' वा 'कारवाँ' मधील तिची अदाकारी काहीशी अश्लिल हावभावाकडे झुकली गेली होती तरीही तिच्या नृत्यप्रवासात तिने कॅबरेला पडद्यावर दर्जा दिला होता हे मान्य करावे. विजय आनंदने तिच्या या गुणाचा 'ज्युवेल थीफ' च्या 'बैठे है क्या उसके पास' मध्ये जसा उपयोग करून घेतला तो लक्षात राहण्यासारखाच. याच चित्रपटात गोल्डीने 'फरियाल' लादेखील एक कॅबरे डान्स दिला होतो, पण त्यावर गाणे नव्हते.

८) लोकगीत : लेखात दिलेली उदाहरणे फार बोलकी आहेत या प्रकाराबाबत. मला आठवते प्रकर्षाने ते भोजपुरी लोकसंगीताचा वापर केलेले "गंगा जमुना' मधील "नैन लड गयी रे" आणि त्यानंतर "लम्हे" मधील राजस्थानी "म्हारे हिवरा मे लग गई कटार" ~ ईला अरूण. मला वाटते प्रीती झिंटाचे 'भूमरो भूमरो श्याम रंग' हे 'मिशन काश्मिर' मधील गाणेही काश्मिरी लोकगीतावरच आधारित असेल (नक्की माहीत नाही.)

या साच्याव्यतिरिक्त आणखीन् एक, निदान जुन्या काळाततरी, होते, ते म्हणजे 'बालगीत'. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीचे कथानक असो वा प्रियकराने लग्नाचे वचन देऊन नंतर विश्वासघाताने उद्ध्वस्त झालेली नायिका 'कुमारी माता' बनते, मग त्या मुलाच्या भविष्याकडे लक्ष देताना आपले दु:ख विसरत जुन्या आठवणी 'बालगीता' च्या माध्यमाद्वारे मांडते, अशी कथानकेही पडद्यावर येत असत. 'बालगीता'त "ओ मेरे लाल आजा" (मदर इंडिया), "दादी अम्मा मान जाव" (जिंदगी), "नन्हा मुन्ना राही हूं" (सन ऑफ इंडिया), "चुन चुन करती आयी चिडीया" (अब दिल्ली दूर नही), "चक्के मे चक्का" (ब्रह्मचारी), "ओ मेरे नन्हे फरिश्ते" (एक फूल दो माली), "तेरे बचपनको जवानी की दुवाँ मांगती हू" (मुझे जीने दो), "लकडी की काठी" (मासूम) आदी.

असो. कधीही गंगा न आटणारा हा विषय आहे, हे सत्य.

दिनेशदा, सुंदर लेख Happy

मला तर ते फ्यार ठो ओनाई ठा >>>>>:फिदी:

पण जॉन अब्राहम आणि अस्तादचा
जो अफ़गाणिस्तानमधला सिनेमा आला होता (काबूल ना ?) >>>>काबूल एक्स्प्रेस

सरफरोश नंतर चांगली गझल ऐकल्याचे आठवत नाही.>>>>>अनुमोदन

अब्दुल्लातील 'ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे मंजूर है, सामने तेरे तेरा बंदा बहोत मजबूर है' ही आतपर्यंत पीळ घालणारी आर्त हाक! त्यातलं ते अरेबिक म्युझिक, ते अंगावर येणारं वाळवंट आणि 'अल्लाSSSS मुल्लाSSSSS' ची हाळी (ही मात्र गाण्याचा भाग न बनता अजून मागून, अस्पष्टपणे आली असती तर अधिक उठावदार वाटली असती असं मला वाटतं). अप्रतिम! >>>>>मामीला १००० मोदक Happy

हिमेश रेशमिया साचा.. हल्ली नवीन काही ऐकू आले नाही या साच्यात.>>>>येतोय येतोय Happy

येस्स ~~ परत मुमताझ "अगर दिलबर की रुसवाई". सर्वार्थाने कोठीवरील मुजरा आणि तिची अदाकारी. >>>>अशोकजींना अनुमोदन Happy माझंही आवडतं गाणं. Happy

मुजर्‍यावरून आठवलं की मी कुठल्यातरी गाण्यात जया भादुरीला मुजरा सादर करताना पाहिलं होतं.>>>>"पहले सौ बार इधर और उधर देखा है तब कही डर के तुम्हे एक नजर देखा है"
चित्रपट "एक नजर" (सोबत अमिताभ बच्चन). भन्नाट नाचलीय जया भादुरी Proud

आझादी कि करे सौदेबाजी>>>>

'आजा दिलकी करें सौदेबाजी' असं आहे ते. Happy

एक हेमामालिनीने केलेला मुजरा आठवतोय. 'मेहेरबानो कदरदानो, कर लो मुलाकात आखरी, है ये मुजरे की रात आखरी'. समोर खामोशकुमार शत्रुघ्न बसलाय. चित्रपटाचं नाव काही आठवत नाहीये.>>>
युद्ध.

असामी, रोज नवीन गाणी ऐकूनच हे लिहिले आहे. नव्यातली लक्षात राहिलेली गाणीही लिहिली आहेत्च कि. बाकि मला काय आवडावे हे एफ एम नाही तर माझे मीच ठरवणार ना ?

डि.जे.
मलाही काही मराठी प्रभाव असलेली गाणी आठवली.
महेश भट च्या एका सिनेमात गल्यान साकली सोन्याची होते. बहुतेक रोमा मणिक नाचली होती त्यावर. शम्मी कपूर्चे गोविंदा गाणे तर आहेच की.
वहिदा रेहमान आणि धर्मेंद्र चा फागुन नावाचा सिनेमा होता. त्यात पिया संग खेलो होली, असे लताचे गाणे आहे. त्याचे सादरीकरण लावणीटाईप आहे, पण चाल तशी वाटत नाही.

प्राची, आज दिलकी करे सौदेबाजी का ? (कान तपासायला हवेत माझे आता.)

जामोप्या, हो पियानो. शेवटचे गाणे, साजन मधले आठवतेय. (त्यालाही १८ वर्षे झाली.)

मुजरा -- ममता मधे अगदी पहिलाच मुजरा आहे. लताचे गाणे आहे.
सुरवात अशी होते
दिलदार के कदमोंपे, पहले तो खंजर रख दिया,
फिर कलेजा रख दिया, सर रख दिया, दिल रख दिया
और कहा
चाहे तो मोरा जिया लैले सावरिया, फेरके नैना न जा,
न जा मै वारी रसिया..

पण सुचित्रा सेनचा नाच प्रभावी नाही.

आणखी एक मुजरा आठवला तो, अदालत मधला

जा जा रे जा साजना, जाके देस पराये

लता आणि आशा नि गायलाय, पण लताची चाल संथ (नर्गिस बसून म्हणते) तर आशाची चाल जलद. दोघींचे शब्द एकच आहेत.

मुन्नी बदनाम हुई, पण एका बिहारी गाण्यावर आधारित आहे असे एका मित्राने सांगितले. पण मूळ गाणे फारच उत्तान आहे, असे तोच म्हणाला.

दक्षिणेकडचे डब होऊन आलेल्या सिनेमातील गाण्यांचा नवा प्रकार आहे. चाल तर तिच ठेवायची पण शब्द मात्र हिम्डि अशी कसरत करत केलेली हि गाणी, कुची कुची राकम्मा सारख्या शब्दरचनांना जन्म देऊन गेली.

मकबूल मधे पण मुजरा होता का ? आठवत नाही. ओमकारा मधली बहुतेक गाणी लोकगीतांवरच होती.

आणि बाँबे डायरी (हेच नाव ना ? आमिर, प्रतिक चा सिनेमा) मधले बेगम अख्तर ची एक लखलखती तान किती परिणामकारक झाली होती !

आजकाल एक दोन पंजाबी मिक्स ढॅणढॅण गाणी, एखाद सुफी किंवा तत्सम गाण, एक हिंग्लिश गाण आणि एक सायलेंट गाण (जे बहुदा सॅड मूडच असतं) असा जवळ जवळ फॉर्म्युला ठरून गेलाय!

महेश भट च्या एका सिनेमात गल्यान साकली सोन्याची होते. >>> 'दिल है कि मानता नही'

'हीना' मधले 'देर ना हो जाये' हे गाणेही 'कव्वाली' प्रकारातलेच आहे.

मुन्नी बदनाम हुई, पण एका बिहारी गाण्यावर आधारित आहे असे एका मित्राने सांगितले. पण मूळ गाणे फारच उत्तान आहे, असे तोच म्हणाला.
<<< मुन्नी पारंपारीक लोकगीतावरून घेतलय असं वाचलं, या आधी कुठल्या तरी मुव्ही मधे 'लौंडा बदनाम हुआ नसीबन तेरे लिए' पण येऊन गेलय.

गल्यान साखली 'दिल है के मानता नही' मधे आहे.

>>दक्षिणेकडचे डब होऊन आलेल्या सिनेमातील गाण्यांचा नवा प्रकार आहे. चाल तर तिच ठेवायची पण शब्द मात्र हिम्डि अशी कसरत करत केलेली हि गाणी, कुची कुची राकम्मा सारख्या शब्दरचनांना जन्म देऊन गेली.

मध्यंतरी स्वानंद किरकिरेने एका मुलाखतीत सांगितले होते की "रॉबोट" साठी गाणी लिहणं ही एक चूक होती पण व्यावसायिक संबंध सांभाळण्यासाठी अश्या ऑफर्सना नकार देता येत नाही.

मला वाटते की आपण मुलात जी तुलना करतो आहोत तीच चुकीची आहे. we are comparing an apple with the ब्रिंजल.
तो काल एक सुवर्ण काल होता. त्याची तुलना आज कशी होणार!! मग त्यात गाण्याचे शब्द, रागदारी, आलाप, सुस्पष्ट उच्चार, सगळ्याची गुणवत्ता, हे सगळे आले.

हां आता काही situation नुरूप गाणी इतिहास जमा झाली आहेत. आज काल समाज इतका बदलला आहे, की काही प्रसंग आपल्या जीवनातुनाच बाद झाले आहेत. पूर्वी कैब्रे होता, आता night clubs आहेत, पूर्वी मुजरे होते, आता डांस बार आले. पूर्वी मंदिरात भजने म्हणायचे, आज सिनेमाच्या गाण्यांच्या तालावर भजने म्हणतात, गजल गायला लागणारी हलुवारता आता उरलीच नाहिये, तेवढा वेळ लोकां कड़े नाही. सिनेमा मध्ये पण बदल सहाजिक आहेत.

आर्थात चित्रपटाच्या विषयाची विविधता आता जास्त आहे. तेंव्हा एक साच्यातिल पिक्चर बनत. आता खुपच विविधता बघायला मिलते. उदा. शैतान, देव.डी. , हजार ख्वाइशे ऐसी भी, किंवा अगदी मुख्य लाटेत ही जिंदगी ना मिलेगी दोबारा, माय नेम इज खान, यांचे विषय वेग़ले होते. पूर्वी आशा पध्धतिने सिनेमा बनत नसत. जे बनत होते ते लोकां पर्यंत पोहोचत नसत. उदा. शाम बेनेगल चे चित्रपट, आपल्या पैकी किती जणांनी चित्रपट गृहात जावून पाहिले? ते चित्रपट नंतर जेंव्हा दूर दर्शन वर दाखवले तेंव्हाच लोकप्रिय झाले. तेंव्हाचे म्हणजे साधारण १९७० तो २००० पर्यंत एका साच्यातिल चित्रपट बनत. अगदी पूर्वी परत सुवर्ण काल असल्याने, विषयातील वैविध्य चिक्कार होत. अगदी देव-राज-दिलीप घ्या, मनोज कुमार घ्या, अगदी राजेंद्र कुमार घ्या, सगल्यानिच वेग वेगळ्या विषया वरील चित्रपट केले. अगदी राजेश खन्ना पण सुदैवी होता ( उदा, बावर्ची, आनंद, खामोशी, जोरू का गुलाम) पण जेंव्हा अमिताभ नावाचे वादल आले तेंव्हा गाणी, हलुवारता, संगीत वगैरे सगळे झूट वाटायला लागले. फ़क्त सूड, सूड आणि सूड. आशा परिस्तिथि मध्ये कोण शास्त्रीय संगीत वगैरे बघतोय ? हीरो ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करत होता तिथे संगीत, शास्त्रीय नाच, गझल, आशा प्रकारांना थारा न्हवता. त्या मुलेच आशा situations सिनेमातून नाहिशा झाल्या.

अजून चार प्रकार आठवले.

बड्डे साँग्ज : याचे दोन उपप्रकार होते. लहान मुलांच्या बड्डेच्या वेळी म्हणायची गाणी आणि मोठ्यांच्या बड्डेच्या वेळी म्हणायची गाणी. लहान मुलांच्या बड्डेसाँगात 'मुलं म्हणजे कशी देवाघरची फुलं' टाईप भावना ओतप्रोत भरलेल्या असायच्या. मोठ्यांच्या बड्डेसाँगला नुकत्याच जमलेल्या ताज्या ताज्या प्रेमाची पार्श्वभूमी असायची आणि मग प्रेमाच्या ग्वाह्या पाट्या भरभरून ओतल्या जायच्या.

पियानो गाणी : हा एक स्वतंत्र अथवा मोठ्यांच्या बड्डेसाँग मध्येच बेमालूम मिसळलेला प्रकार होता. स्वतंत्र असेल तर नायकाचा बहुतांशी प्रेमभंग झाल्यावर तो पियानो बडवत गाणं म्हणायचा. बड्डे असेल तर सहसा प्रेमाच्या त्रिकोणातला तिसरा दुर्लक्षित कोन हे गाणे म्हणायचा. यात कधी कधी साईड हिरॉईनचे नाचकामही साईड-डिश म्हणून पेश केले जायचे.

पिकनिक साँग्ज: नायिका आणि तिच्या चार-पाच सख्या सहलीला जाताना गाणं हमखास होईच होई. त्यात त्या जवानी, स्वातंत्र्य आणि हवापाणी किती छान आहे अशा टाईपची वर्णनं असलेली गाणी म्हणायच्या. गाण्याच्या शेवटी एक छोटासा अ‍ॅक्सिडेंट होऊन नायक नायिकेला भेटायचा.

स्टेज शोज : नृत्यकला पारंगत हिरवीण असली एक स्टेज शो असायचाच. त्याचा मुख्य कथेशी कधी संबंध असे तर कधी नसे. बरेचदा हिरवीणीचं पारडं अजून जड करण्याकरता आणि भारतीय संस्कृतीच कशी श्रेष्ठ आहे हे पब्लिकच्या मनावर ठसवण्याकरता हिरवीण कथ्थक आणि देवाच्या गाण्यावर आणि दुसरी (बरेचदा तिच्यापेक्षा छान नाचणारी, जास्त मेकप आणि कमी कपडे घातलेली) नर्तिका पाश्चात्य सुरावटीवर नाचताना दाखवायचे. गाण्याच्या शेवटी ती दुसरी नर्तिका दमून खाली पडायची आणि अर्थातच पाश्चात्य संस्कृतीचा पराभव व्हायचा. फारच बाळबोध प्रकार असायचा हा.

एक सोलिड मुजरा म्हणजे " साथिया आज मुझे नींद नहीं आएगी" चित्रपट " साहब, बीबी और गुलाम" नर्तकी मीनू मुमताज ( महमूद ची बहिण आणि मुमताज अलीची मुलगी ) फारच सुन्दर नृत्य. बाकी

रेखा = सलाम-ए-इश्क मेंरी जान === मुक्कदर का सिकंदर

वहीदा = रात भी है कुछ भीगी भीगी == मुझे जीने दो

कव्वाली

ऋषि कपूर = पर्दा है परदा , शिर्डी वाले साईं बाबा ( भक्ति पर कव्वाली ) = अ.अ.अ.

अजुन एक situationa

हीरो ला बांधून ठेवले आहे आणि हिरविन सगळ्या गुंडां समोर नाचते आहे. किंवा हीरो आपल्या ग्रुप बरोबर नाचत आहे.

जबतक है जान जाने जहाँ मई नाचूंगी = शोले

तोबा तोबा क्या होगा = मी. नटवरलाल

यम्मा यमा = शान

आता वापरात नसलेला आणखीन् एक साचा म्हणजे "अतृप्त आत्मा" म्हणत असलेली गाणी.

एकेकाळी गाण्याच्या लोकप्रियतेचा हा जबरदस्त फॉर्म्युला होता आणि एकट्या लताने गायलेल्या असल्या गाण्यांची Haunting Melodies म्हणून HMV ने स्वतंत्र रेकॉर्डही काढली होती. प्रेक्षकांनाही पांढर्‍या साडीतील ती 'चेटकीण, हडळ, प्रेतात्मा' फार भावायची आणि अगदी थेट अशोक कुमार, दिलीप कुमार, मनोज कुमार, धर्मेन्द्र, विश्वजीत, राजकुमार आदी तडफड्ये त्या "पांढर्‍या अप्सरा" (होय हडळ असली तरी ती अप्सरासमच दिसायला पाहिजे हे एक ट्रेड सिक्रेटच होते) च्या मागे स्वतःचे डोळे पांढरे करत स्वैरावैरा धावत असल्याचे दाखविले जात असे.

'महल' मधील 'आयेगा आनेवाला', 'वह कौन थी" मधील "नैना बरसे रिमझिम", 'मेरा साया' मधील 'मेरा साया तेरे साथ होगा", 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी', 'बीस साल बाद' मधील "कही दीप जले कही दिल" आदी गाणी या 'अतृप्त आत्म्यां"ची. अजुनही असतील. 'नील कमल' हा एकमेव चित्रपट असावा ज्यात नायक 'भूत' दाखविला गेला आहे आणि तो या जन्मातील नायिकेला 'तुझको पुकारे मेरा प्यार"......असा त्याच्यावतीने म.रफी पुकार देत आहे.

मराठीतही "सामना" मध्ये 'हा महाल कसला...' हे लताच्याच आवाजातील छान आणि प्रभावी 'प्रेतात्मा' धर्तीचे गाणे होते, गाजलेही खूप.

पण काळाच्या ओघात हा प्रकार पडद्यावरून लुप्त होत गेला.

रेखा = सलाम-ए-इश्क मेंरी जान === मुक्कदर का सिकंदर >>>>>>+१

हीरो ला बांधून ठेवले आहे आणि हिरविन सगळ्या गुंडां समोर नाचते आहे. किंवा हीरो आपल्या ग्रुप बरोबर नाचत आहे.>>>>येस्स्स्स Proud

अजुन एक
मार दिया जाय के छोड दिया जाय (यात हिरो आणि हिर्वीन दोघांना बांधुन ठेवलंय आणि
खल(सह?)नायिका नाचतेय. Happy

आता वापरात नसलेला आणखीन् एक साचा म्हणजे "अतृप्त आत्मा" म्हणत असलेली गाणी.>>>>अगदी अगदी Happy

Pages