हिंदी गाण्यांचे वापरात नसलेले साचे.

Submitted by दिनेश. on 6 October, 2011 - 07:11

आजकाल सकाळ संध्याकाळ प्रवासात माझा अर्धा पाऊण तास जातो. अंतर केवळ ८ किमीचे पण तेवढा
वेळ जातोच. ड्रायव्हर गाडी चालवत असतो, आणि मी मात्र एफ़ एम वर हिंदी गाणी ऐकत असतो.
इथे सकाळी कपाचा ऎंड कॉफी असा एक चांगला कार्यक्रम असतो. (हा कार्यक्रम Soundasiafm.com
वर उपलब्ध आहे.) त्यातल्या गाण्यांपेक्षा मला निवेदक जेसी आणि जीत यांच्या गप्पा ऐकायला आवडतात.
त्याबरोबर हवामानाचा अंदाज (जो कधीच खरा ठरत नाही.) आणि ठळक बातम्या यांच्यासाठी ऐकतो.
पण आज लिहायचे कारण म्हणजे, त्यात वाजवली जाणारी गाणी. हि गाणी अगदि नवीन असतात.

याच एफ़ेम स्टेशनवर दिवसभरात आणि रात्रीही जुनी सुंदर गाणी लावतात आणि त्यातले निवेदनही
चांगले असते, पण आमच्या येण्याजाण्याच्या वेळेत मात्र नवीनच गाणी ऐकवली जातात.

कबूल केले पाहिजे, कि यापैकी ऐकून झाल्यावर लगेच एकाही गाण्याचे शब्द मला सांगता येणार नाही्त.
सेनोरिता सारखी काही गाणी, सिनेमा बघितल्यामूळे ओळखीची वाटतात, पण बाकिची हिंदी होती कि
पंजाबी होती का इंग्लीश होती, हे ही मला सांगता येणार नाही.
सगळ्यात सामायिक जर मला काही वाटत असेल तर -
१) असप्ष्ट शब्दोच्चार : पुर्वीचे गाणे मला अनोळखी असले तरी त्यातले शब्द मी उतरवून घेईन, इतके
स्पष्ट ऐकू येतात. आताच्या गाण्यातले शब्द मात्र मला अजिबात कळत नाहीत.
हि सुरवात कधी झाली ते सांगता येत नाही, पण असे अगदी पहिले गाणे मला आठवतेय ते, रेमोचे
प्यार तो होनाही था. मला तर ते फ्यार ठो ओनाई ठा, असेच ऐकू आले होते.
या कलाकारांचे शिक्षण हिंदीतून झाले नसेलही, पण संगीतकाराने तसा आग्रह धरायला नको होता का ?
शुक्रतारा मंद वारा, गाण्यापुर्वी अरूण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी मराठी गाणे गायले नव्हते. पण
ते गाणे ऐकल्यावर हे खरे वाटेल का ? श्रीनिवास खळ्यांनी, लताच्या आवाजात अथर्वशीर्ष सादर केले
होते. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा नव्हे तर अक्षराचा उच्चार खणखणीत आहे.

२) गेंगाणा स्वर : आता कधी कधी गाण्यात मधेच एक गेंगाणा स्वर ऐकू येतो. हा स्वर मानवी
गळ्यातून नक्कीच आलेला नसतो. याला गेंगाणा म्हणायचे कि आणखी काही ते पण मला सांगता
येणार नाही. पण हा स्वर बहुदा, कॉम्प्यूटरच्या मदतीने काढत असावेत.

३) एकापेक्षा जास्त व्यक्तीचे आवाज. गाणे एकच व्यक्ती गात असते पण दोन व्यक्ती एकत्र गाताहेत
असा परिणाम साधलेला असतो. आणि हे सहज चाळा म्हणून केल्यासारखे वाटते. असा परिणाम
आर्डीने पण काही गाण्यात साधला होता (क्या जानू सजन (लता), उलझन हजार कोई डाले, हो
बदन जलता है (दोन्ही आशा))
अजय देवगणच्या, आक्रोश मधे पण आझादी कि करे सौदेबाजी असे एक जरा बरे गाणे होते,
त्यातहि असाच परिणाम जाणवला मला. पडद्यावर तर ते गाणे बॅकग्राऊंडलाच वाजते.

४) एकसुरी ताल. खरे तर मी हा विचित्र शब्द प्रयोग करतोय, पण मला म्हणायचेय ते हे
कि ताल प्रकर्षाने जाणवतो, पण त्यात काही नाविन्य दिसत नाही. बहुतेक तो चार ते पाच
मात्रांचाच असतो. आणि तो नेहमीच गायक गायिकेच्या वरचढ वाजत असतो. कोण, कुणाला
साथ करतेय तेच कळत नाही. अगदीच नवीन काही ऐकायला मिळत नाही असे नाही.
गुजारिश मधल्या उडी उडी मधे जरा वेगळा ताल होता. सैफ़ आणि दिपिका च्या एका गाण्यातही
(चन्ना रे चन्ना रे ) काही वेगळे आढळले होते.
पण दादरा, झपताल, रुपक सारखे ओळखीचे ताल अजिबातच ऐकायला मिळत नाहीत.

५) परदेशी गाण्यांचा प्रभाव.
आता खुपदा परदेशात(च) चित्रीकरण होत असल्याने काही परदेशी धुन गाण्यात ऐकू येतात.
सात खून माफ़ मधल्या डार्लिंग वर रशियन गाण्यांचा प्रभाव होता तर जिंदगी ना मिलेगी दोबारा
मधे स्पॅनिश सुरावटी होत्या. त्या जरा अनोख्या असल्याने कानाला गोड वाटतात. पण हे अलिकडचेच
असे मात्र नाही.
अपनी कहानी छोड जा वर रशियन सुरावटीची छाप होती तर सायोनारा सायोनारावर जपानी.
ओये ओये वर स्वाहिली गाण्याची होती तर लडकियोंसे ना मिलो तूम वर अरेबिक.
पण परदेशी धुनींपेक्षा मला पंजाबी शब्द आणि सुरावटींचा नको तितका प्रभाव आढळतो.

अरेच्चा पण माझ्या लेखाचा हेतू हा नव्हता, तर पुर्वी जे काही साचे वापरात होते, ते आता
मोडल्याचे जाणवतेय, त्याबद्दल लिहायचे होते. असे काही साचे बघू या.

१) भजन
पुर्वी प्रेक्षक जास्त भाविक होते म्हणा कि आणखी काहि. पण अनेक सुंदर भजने त्याकाळात निर्माण
झाली. मैने प्रभु आजतक तूमसे कुछ नही मांगा सारखा एखादा संवाद झाला, कि भजन यायचेच.
हे रोम रोम मे बसनेवाले राम (नीलकमल) प्रभु तेरो नाम (हम दोनो) असे थेट भजनाचे प्रसंग
असायचे किंवा आडवळणाने एखादा डोस द्यायचा असायचा. ना मै धन चाहू ( काला बाजार)
कधी तरी सगळेच अवघड होऊन बसलेले असायचे. तेरी है जमी (द बर्निंग ट्रेन)
पण शेवटचे असे भजन तर मला लगान मधलेच आठवतेय ( तेरे बिना हमका ) नंतर काही
सुफ़ी रचना आल्या. पण त्यातला आवेश, गान प्रकार हा जरा वेगळाच असायचा. आपल्याकडे
भजनात शांत रस दिसतो. पण मुस्लीम धर्मातील भजनात थोडा बेभानपणा असतो.
हा प्रकार प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नीट लक्षात येणार नाही. पण जॉन अब्राहम आणि अस्तादचा
जो अफ़गाणिस्तानमधला सिनेमा आला होता (काबूल ना ?) त्यात असा एक प्रसंग होता.

२) गझल
गझल हा शब्द ऐकला कि सिनेमासंदर्भात माझ्या पिढीच्या आधीच्या लोकांना मदनमोहन आणि
लताच आठवणार. अदालत, जहॉंआरा, दस्तक, गझल, मेरा साया, वह कौन थी असे अनेक
चित्रपट या दोघांनी गाजवले. पण बाकिच्या संगीतकारांनी देखील प्रसंगानुरुप उत्तम चाली बांधल्या.
रोशन, शंकर जयकिशन, जयदेव अशी अनेक नावे घेता येतील. मग मधे हा गायनप्रकार मागे
पडला. मग जगजित सिंग, गुलाम अली, पंकज उदास, सुरेश वाडकर, मनहर आदी लोकांनी
काही उत्तम गझला दिल्या. आता मात्र हा गायनप्रकार चित्रपट्संगीतातून गायब झाल्यासारखा
वाटतोय. सरफरोश नंतर चांगली गझल ऐकल्याचे आठवत नाही.

३) कव्वाली

चित्रपट संगीतात हा गायनप्रकार लोकप्रिय होताच पण त्या काळात मुंबईतही कव्वाली गायनाचे
कार्यक्रम व्हायचे. शकिला बानू भोपाली, जानी बाबू कव्वाल अशी मातब्बर मंडळी यायची.
चित्रपटांपैकी बरसात कि रात, (इश्क इश्क है, निगाहे नाजके मारोंका, जी चाहता है चूम लू)
कभी ए हकिकते मुंतजर (दुल्हन एक रात की) निगाहे मिलाने को ( दिल ही तो है)
चांदी का बदन (ताजमहाल) अल्ला ये अदा (मेरे हमदम मेरे दोस्त) जब इश्क कही हो जाता
(आरजू ) अशा कितीतरी कव्वाल्या आवर्जून संग्रही ठेवण्यासारख्या आहेत.
हम किसीसे कम नही, अमर अकबर ऎंथनी मधेही कव्वाल्या होत्या. शिरडीवाले साईबाबा तर
एकेकाळी रेल्वेतल्या भिकारी लोकांचे पेटंट गाणे होते. आर्डीने मग बर्निंग ट्रेन मधे, पल दो पल
अशी खणखणीत कव्वाली दिली.. पुढे मात्र हा प्रकार गायबच झाला. अगदी अलिकडे वन्स
अपॉन अ टाईम मधे कव्वाली सदृष्य काहितरी ऐकले खरे.

४) मुजरा

मला नेमके माहित नाही कि मुंबईत ताडदेवच्या कोठेवाल्या अजून मुजरा सादर करतात का, पण
हा प्रकार चित्रपटात खुप लोकप्रिय होता. अगर दिलबर कि रुसवाई (खिलौना), रुठे सैया (देवर)
चाहे तो मोरा जिया लैले (ममता) तस्वीरे मुहोब्बत ( संघर्ष) हम हाले दिल सुनाएंगे (मधुमति)
दिल कि कहानी (ताजमहाल) साकिया आज मुझे (साहब बीबी और गुलाम) हे माझे आवडते
मुजरे. रात बी है कुछ भिगी भिगी (मुझे जीने दो ) हा सर्वात जास्त आवडता.
पण या संदर्भात दोन चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय चालणार नाही तो म्हणजे पाकिजा
आणि उमराव जान. पाकिजात मीना कुमारी नृत्यनिपुण नसली तरी सितारा देवीच्या नृत्य दिग्दर्शनाने
वेगळीच जान आली होती. रेखाच्या उमराव जान मधे अशाच्या गायनाचा मोठा वाटा होता.
मला ऐश्वर्याच्या उमराव जानचा पण उल्लेख करायला हवा. ती त्यात सुंदर नाचली असली तरी
गाणी मात्र अत्यंत सुमार होती.
देवदास मधला माधुरीचा, मार डाला, मात्र मला विशेष आवडला नव्हता, जून्यापैकी नर्तकी नावाच्या
सिनेमात नंदाने आणि तवायफ़ मधे रति अग्निहोत्रीने सुमार मुजरे पेश केले होते. नजर लागे
राजा तोरे बंगले पर, (काला पानी) नलिनी जयवंतचा नाचही काहि खास नाही.
अलिकडे नव्या सिनेमात असा मुजरा बघितल्याचे आठवतच नाही.

५) शास्त्रीय गायन आणि नृत्य

लता आणि आशा बरोबरच, मन्ना डे आणि रफ़ी हे शास्त्रीय गायनात तरबेज कलाकार सक्रिय होते
तोपर्यंत शास्त्रीय रागांवर आधारीत गाणी खुलत होती. प्रसंगानुरुप अनेक दिग्गज शास्त्रीय संगीत
गायकांनी पण आपला आवाज चित्रपटासाठी दिला होता. (मी इथे यादी देत बसलो तर पाने पुरणार
नाहीत.)
या गाण्य़ांना अनेकवेळा शास्त्रीय बृत्यांची पण जोड मिळत असे. मुख्य प्रवाहातल्या सर्वच नसल्या
तरी वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, आशा पारेख, पद्मिनी, रागिणी, कुमकुम,संध्या या शास्त्रीय नृत्यात
पारंगत होत्या. त्यामूळे गाणे आणखीहि खुलत असे. या अभिनेत्रींबरोबरच काही कमी माहित असलेल्या
अभिनेत्रींनी पण उत्तम शास्त्रीय नृत्य पेश केलीत. उदा. रत्ना (लागा चुनरी मे दाग), विजया चौधरी
(पायलवाली देखना) बेला बोस (तेरे नैना तलाश करे जिसे) अनिता गुहा (प्रितम दरस दिखाओ)

कुठलीही सुरेल रचना हि कुठल्या ना कुठल्या शास्त्रीय रागावर आधारीत असतेच तरीपण आताच्या
गाण्यातले राग, ठळकपणे जाणवत नाहीत एवढे खरे. जोपर्यंत मी विविध भारतीवर संगीत सरिता
ऐकत होतो तोपर्यंत तरी नव्या चित्रपटातील गाणी रागाच्या नमुन्यादाखल वाजवत नसत.
शेवटचे असे गाणे ऐकले ते, हम दिल दे चुके सनम मधले. सूरसंगम नंतर शास्त्रीय नृत्यगायनावर
आधारित चित्रपटही आल्याचे आठवत नाही. शबानाचा रागा, अपवदात्मकच.
शेवटचे उत्तम क्लासिकल नृत्य आठवतेय ते तब्बूचे, तक्षक मधले (रंग दे नाही, नुसतेच भरतनाट्यम
केलंय)

६) कॅबरे

कॅबरे आणि हेलन हे जवळजवळ समानार्थी शब्द आहेत. पण हेलन यायच्या आधी कक्कू अशी नृत्ये
सादर करत होतीच. हेलन ने देखील इतर नृत्यप्रकार लिलया पेलले होते. तिने अगदी वैजयंतीमालाशी
मुकाबला केला होता (डॉ.विद्या, शतरंज) तिने कॅबरेला मात्र एक दर्जा मिळवून दिला. ती कुशल नर्तिका
तर होतीच त्यामूळे तिच्या नृत्यामधे अश्लील हावभाव करायची तिला गरज वाटली नाहि. ते आणले
बिंदूने. पुढे हेलनलापण तसे करावे लागले (इंतकाम, डॉन, राम बलराम, इन्कार)
अगदी क्वचितच मुख्य अभिनेत्री अशी नृत्ये सादर करत असत. मुमताज (हमजोली) आणि नर्गिस
(रात और दिन) तिच्या समकालीन अशा पद्मा खन्ना, जयश्री टी, मीना टी (या तिघी कथ्थक नर्तिका
होत्या. शिवाय फ़रियाल हे पण नाव ऐकल्याचे आठवतेय.

पण पुढे मुख्य नायिकाच अशी नृत्ये सादर करु लागला. झीनत, परवीन बाबी, रिना रॉय या पहिल्यावहिल्या
नट्या. पुढे अगदी माधुरी, मनिषा, उर्मिला पर्यंत हेच चालले.
याचेच पुढचे रुप म्हणजे आयटम सॉंग म्हणायचे का ? पण असली गाणी सादर करणा-या राखी सावंत,
मल्लिका शेरावत, याना गुप्ता, बिपाशा आदी काही नृत्यनिपुण वाटत नाही, त्यामूळे बराचसा नाच कॅमेराच
करतो.

७) डिस्को

ट्रॅव्होल्टाच्या सॅटरडे नाईट फीव्हर नंतर आपल्याकडे डिस्को गाण्यांची लाट आली होती. उषा उत्थपने
आधी अशी काही गाणी आणली. मग आशाचे हथकडी मधले गाणे आले होते (डिस्को स्टेशन) ते रिना
रॉयने सादर केले होते. मग परवीन बाबीचे पण नो पार्किंग असे शब्द असलेले गाणे आले होते.

मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर नावाचा सिनेमाच होता पण आता फारसा कुणाला आठवत नसेल
असा स्टार नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात कुमार गौरव आणि रति अग्निहोत्री होते.
नाझिया हसनच्या आवाजात गाणी होती त्यात. त्या काळात बहुतेक सिनेमात डिस्को गाणी
असायची. पण ही ट्रेंड लवकरच मागे पडली.

८) लोकगीत.

भारतभरातील समृद्ध लोकसंगीताचा बाज अनेक हिंदी गाण्यात दिसला. अनिल विश्वास, सलील चौधरी
सचिनदेव बर्मन यांनी बंगाली लोकसंगीताचा छान वापर केला. गुजराथी ( मै तो भूल चली बाबूल का
देस) मुत्तूकोडी कव्वारी हडा (मल्याळम) चढ गयो पापी बिछुआ (आसामी) थाणे काजळीया बनालू
(राजस्थानी) आहे मैया सोने का बनायो (मध्यप्रदेश) कि मै झुठ बोलिया, कोय ना (पंजाबी)
घे घे घे रे, घे रे सायबा (गोवा) अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
लोकसंगीतातून आलेल्या रागांचा वापर पण काहि प्रतिभावान संगीतकारांनी करुन घेतला होता.
तू चंदा मै चांदनी ( रेश्मा और शेरा-लता-जयदेव-राग पिलू / देस / मांड ) बिरजमे होली खेलत नंदलाल
(गोदान-रफि-पं. रविशंकर-राग काफि)

मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच उदाहरणे आठवताहेत.
दर्याकिनार एक बंगलो, मच गया शोर सारी नगरी रे, एक दो तीन वगैरे. मनोजकुमारच्या शिरडी के साईबाबा मधे,
शिव भोला भंडारी असे वाघ्या मुरळीचे गीत होते (पडद्यावर सचिन आणि उषा चव्हाण ) . अशांती मधे लवंगी मिरची
अशी एक लावणी होती (पडद्यावर शबाना, झीनत आणि परवीन) पण चाल काही लावणीची वाटत नव्हती.
चुनरी संभाल गोरी मधे लेझिम वाजलेय, वास्तव मधे मराठी आरती आहे तर सई परांजपेच्या साज मधे
एक नाट्यगीत सदृष्य गाणे आहे. पण फारसे काही नाहीच.

याशिवाय लोरी, युगुलगीते, लग्नगीते असेही काही साचे होतेच.
आता प्रतिसादातही अनेक साचे सापडतील मला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक साचा -
इना मिना डिका... काही तरी निरर्थक किंवा गमतीशीर शब्द घेऊन केलेली गाणी. किशोरदांची खूपच सापडतील.

एकच गाणे पण हिरो व हिरॉईनसाठी पुरुष व स्त्री गायकाने गायलेले -
शर्मिली - खिलते है गुल यहाँ - किशोरदा व - आशाजी नसून लताजी - धन्यवाद जिप्सी....
अंदाज - जिंदगी एक सफर - किशोरदा व आशाजी

अशोक, खरेच परत फुरसतीने हे चित्रपट बघायचेत.

शशांक, निरर्थक शब्दांचा साचा अजून वापरात आहे !!!
जून्यापैकी, दगा दगा वई वई (लता - काली टोपी लाल रुमाल ) आपुची गापुची गम गम ( लता - त्रिशूल ) तम्मा तमा लोगे (थानेदार ) अशी काही. रमैया वस्तावैया हे जूने गाणे, सुस्मिता सेनचा चिंगारी मधे परत वापरले होते.

दोन व्हर्जनमधले गाणे मात्र ऐकून बरेच दिवस झाले.

रुणुझुणु - बंदला नाही, बंगलाच आहे ते. >> Lol तुमचा टायपो मी खरा मानला होता तर. स्वतःच्या अज्ञानावर किती खात्री आहे बघा मला !

शर्मिली - खिलते है गुल यहाँ - किशोरदा व आशाजी>>>>>>शशांक हे गाणं आशाजींच्या आवाजात नसुन लताजींच्या आवाजात आहे. Happy

अजुन काही :
१. हमे तुमसे प्यार कितना (कुदरत, किशोर व परवीन सुलताना)
२. सागर किनारे दिल ये पुकारे (सागर, किशोर/ लता)
३. न हम तुम्हे जाने ना तुम हमे जानो (बात एक रात कि, हेमंतकुमार/सुमन कल्याणपूर)
४. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना (मुकद्दर का सिकंदर, किशोर कुमार/आशा भोसले)
५. दिल हुम हुम करे घबाराए (रूदाली, लता मंगेशकर/भुपेन हजारिका)
६. तुम मुझे युं भुला ना पाओगे (पगला कही का, मो. रफी/लता मंगेशकर)
७. चंदन सा बदन चंचल चितवन (सरस्वतीचंद्र, लता मंगेशकर/मुकेश)
८. अहले दिल युं भी निभा लेते है (दर्द, भुपेंद्र/लता मंगेशकर)
९. तेरे नैना क्यो भर आए (गीत, महेन्द्र कपूर/लता मंगेशकर)
१०. रात और दिन दिया जले (रात और दिन, मुकेश/लता मंगेशकर)

अजुनही बरीच गाणी Happy

दिनेशदा, मस्तच आहे लेख तुमचा आणि त्यावरचे प्रतिसादपण भारीच. कसलं जबरी कलेक्शन झालंय. तुमच्याबरोबरच मोहन कि मीरा, जिप्सी आणि जामोप्यांचे विशेष आभार. त्यांनी मस्त भर टाकली आहे यात. अजुन ही कोणी कोणी माहितीत भर टाकली आहे त्या सगळ्यांचे आभार.

यामधे लोरी हा साचा आलाच नाहीए. आजकाल हिरॉइन्स स्वतःच्या ग्लॅमरस इमेजला धक्का लागु नये म्हणुन बहुतेक अशा भुमिका स्विकारत नसतील. हल्लीच्या सिनेमामधे लोरीज नाहीतच.

खैर मलाही लिरिक्स आठवत नाहीत, पण मुला/लीला झोपवणार्‍या सिनेमातल्या सिचुएशन्स आणि आया आठवताहेत. 'आराधना' मधली एक लोरी...... कोणी सांगेल का शब्द?

नंतर शेवटची लोरी मला मिशन कश्मिरमधली - 'छिप जा चंदा राजा सोजा' हीच आठवते.

लोरीचा उल्लेख केलाय मी,
माझ्या आवडत्या काही

नन्ही कली सोने चली, हवा धीरे आना ( सुजाता, गीता दत्त )
आज कल मे ढल गया (बेटीबेटे - लता )
आजा री आ, निंदिया तू आ ( दो बीघा जमीन - लता )

अमिताभ बच्चन आणि मौशुमी चॅटर्जीच्या बेनाम मधे लताचीच एक छान लोरी आहे. सदमा मधे पण एक चांगली लोरी आहे.

मधुबाला आणि दिलीपकुमारची कुठली रे. अगदी सुरेल आहे.. नेमकी आता आठवत नाहिये. अलबेला मधे पण एक आहे ना ?

यामधे लोरी हा साचा आलाच नाहीए. आजकाल हिरॉइन्स स्वतःच्या ग्लॅमरस इमेजला धक्का लागु नये म्हणुन बहुतेक अशा भुमिका स्विकारत नसतील. हल्लीच्या सिनेमामधे लोरीज नाहीतच. >>>>अगदी अगदी Happy
धन्स मने, आठवण करून दिल्याबद्दल Happy

'आराधना' मधली एक लोरी...... कोणी सांगेल का शब्द? >>>>>चंदा है तु मेरा सुरज है तु Happy

१. लल्ला लल्ला लोरी दुध कि कटोरी (मुक्ती, मुकेश/लता मंगेशकर)
२. गुडिया रानी बिटिया रानी (लम्हे, लता मंगेशकर)
३. आज कल में ढल गया दिन हुआ तमाम (बेटी बेटे, लता मंगेशकर)
४. आ री आ जा निंदिया तु (कुंवारा बाप, किशोर/लता मंगेशकर)
५. आजा निंदिया आजा नैनन बीच समा जा (लोरी, लता मंगेशकर)
६. सुरमयी अंखियोंमे नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे (सदमा, येसुदास)

हेलिकॉप्टरः शम्मी आणि शर्मिलाचे एक गाणे चित्रपत लव्ह इन पॅरिस बहुतेक>>>>>आसमान से आया फरीश्ता Happy

टांगा: एलो जी सनम हम आ गये>>>>चल प्रेम नगर जायेगा बतलाओ तांगेवाले (जिद)

जिप्सी, थॅंक्स ! मुळ लेख मनापासुन वाचला आणि शेपुट तसंच राहुन गेलं. Happy शेवटच्या दोन ओळी वाचल्याच नव्हत्या. धांदरटपणा ! Happy

आज कल में ढल गया दिन हुआ तमाम - ही तर सहीच आहे लोरी. काय सुंदर शब्द आहेत ना ! आणि इतकी मऊसुत आहे कि खरंच डोळ्यावर गुंगी येते. Happy

लोरी :
दिलीपकुमार - मधुबाला : बेइमान तेरे नैनव निंदिया न आए ---हे का?

अलबेला : धीरे से आजा री अंखियन में

किस्मत : धीरे धीरे जारे बादल धीरे धीरे जा
मेरा बुलबुल सो रहा है शोरगुल न मचा

शेवटच्या दोन ओळी वाचल्याच नव्हत्या.>>>>खरंतर मीही घाईघाईत नव्हत्या वाचल्या Happy आता दिनेशदांनी सांगितल्यावर परत पाहिल्या Proud Wink

आज कल में ढल गया दिन हुआ तमाम - ही तर सहीच आहे लोरी. काय सुंदर शब्द आहेत ना ! आणि इतकी मऊसुत आहे कि खरंच डोळ्यावर गुंगी येते>>>>>>अगदी अगदी Happy

भरत, मला चैन नसती पडली, हे शब्द मिळाले नसते तर.

लोरी गाताना गायक / गायिका इतका हळुवार आवाज लावतात ना, कि बस्स.
(अगदी रहावत नाही उल्लेख केल्याशिवाय, नीज माझ्या नंदलाला... ची कशाचीच तुलना नाही होऊ शकत.)

"जुगलबंदी" ची दखल घ्यायची राहिली का ?
१] बैजू बावरा
२] बसंत बहार
३] पडोसन - जुगलबंदी म्हणायची का ?

दिनेश + जिप्सी

~ एवढ्या सार्‍या कलेक्शनमध्ये 'रेल्वे गीत' साचा राहिलाय का ? बहुतेक राहिला असावा. तर त्याचीही अगदी सायगल जमान्यापासून एकेकाळी चांगलीच महती होती हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटातूनही. पण आजकाल हा साचाही लोप पावलाय असे दिसत्ये :

'रेल्वे गीत"

१. "दुनिया तुफान मेल" ~ 'जवाब' कानन देवी
२. "राही मतवाले तू छेड एकबार मन की सितार" ~ वारिस - तलत आणि सुरैय्या [यातील सुरैय्याला पाहून वेडा असलेलादेखील आणखीन् वेडा होऊन जाईल. एचएमव्हीने काढलेल्या रेकॉर्डमध्ये फक्त तलत आणि शेवटची एक ओळ सुरैय्याला दिलेली आढळते. पण चित्रपटात सुरैय्याच्या तोंडीही याच गाण्याचे सॅड व्हर्जन आहे, जे अतिशय सुरेख आहे.]
३. "अपनी तो हर आह एक तुफान है" ` ~ कालाबाझार, देव आनंद वहिदा रेहमान
४. "है अपना दिल तो आवारा" ~ सोलवाँ साल, देव वहिदा
५. 'गाडी बुला रही है, शिटी बजा रही है" ~ दोस्त, धर्मेन्द्र
आणि
६. "पाकिजा' तील ते अगदी सिग्नॅचर ट्यून झालेले ~ "यूंही कोई मिल गया था, सर राह चलते चलते" ~ रेल्वेचा जबरदस्त इफेक्ट. मूळ रेकॉर्डिंगमध्ये शेवटची ती पुलावर थांबलेली रेल्वेची शिट्टी नव्हती; पण संगीतकार नौशाद आणि अमीन सायानी यानी जाणीवपूर्वक त्या शिट्टीचा समावेश ज्यावेळी एल.पी.बाजारात आणली त्यावेळी केला होता आणि त्यामुळे त्या गाण्याला 'साहेबजान' च्या नजरेने पाहता एक आगळाच 'नॉस्टॉल्जिया' चा दर्जा प्राप्त झाला.

अजूनही 'रेल गीते' आठवली तर द्यावीत.

अहाहा... काय आठवण केलीत! रेलगीतांची यादी 'आराधना' तील 'मेरे सपनो की रानी कब आयेगी तु' गाण्याशिवाय पुरी होऊच शकत नाही.

<<'गाडी बुला रही है, शिटी बजा रही है"<<
या गाण्याची चालच खुप नॉस्टॅल्जीक करते... नि भरीस किशोरचा आवाज. Happy

विधातामधील 'हाथोंकी चंद लकीरों का, ये खेल है बस तकदीरोंका ' हे गाणं पण रेलगीत आहे.

बर्निंग ट्रेन मधली कव्वाली रेल्वेत आहे, प्रार्थनाही रेल्वेतच आहे.
परिणिता मधे एक रेल्वेतले गाणे आहे.
चल छैंया छैंया ला पण रेल्वेगाणेच म्हणावे लागेल.
गुरु देव मधले, ऋषिकपूर श्रीदेवीचे, जयपूरसे निकली गाडी.. वेगळ्या अर्थाने रेल्वेगीत.
दादामुनीचे रेलगाडी रेलगाडी.. हेही वेगळ्या अर्थाने रेल्वेगीत.
दोस्त मधले, गाडी बुला रही है मधे रेल्वे आहे.
बालिका वधु मधल्या.. बडे अच्छे लगते है मधेही असाच रेल्वेचा शॉट आहे.
उर्मिला मातोंडकर आणि शाहरुखचे, चमत्कार मधले ये बिच्छु मुझे काट खायेगा पण रेल्वेमधलेच.
बदल जाये अगर माली, चमन होता नही खाली, हे महेंद्र कपूरचे गाणे पण रेल्वेतलेच.

व्वा!! मस्तच जमलय कलेक्षन!!! Happy

माझ्याकडुन काही साचे...

१. बिदाई गीतं (झालाय का हा साचा?) - दुल्हन निघाली सासरी जायला... प्रियकर, सख्या नाहीतर आई-वडिल यांनी गायलेली गाणी....

२. ससुराल/नैहर गीतं - माझं सासर / माहेर कित्ती चांगलं आहे असं सांगणारी गाणी....

३. बाबुल गीतं - "ओ बाबुल प्याssssssरे....." हेमामालिनीचे हे गीत एकदम फेमस Happy

४. नशिली गीतं - हिरो किंवा हिरॉईन दारू पिऊन.टर्रर्रर्रर्र..... "कैसे रहुं चुप की मैने पी ही क्या है, होश अभीतक है बाकी...." , " कोई सागर दिल को बहेलाता नही...." राजकुमार, अजुन एक मीनाकुमारीचं गाणं अजिब्बात आठवत नाहिये.....साकी, पैमाना वगैरे शब्दही गायबच झालेत

५. चाँद/सुरज/तारे गीतं - चंद्र, सूर्य, तारे यांना उद्देशुन म्हंटलेली गाणी ...खोर्‍याने आहेत पण इतक्यात कुठलं चांगल ऐकलेलं आठवत नाही....

६. भँवरा गीतं - आजकाल भवर्‍याना भाव नाही, नव्या नट न्ट्या बागेत जात नाहित... Proud जुनी खुप सुंदर सुंदर गाणी - "भॅंवरे की गुंजन है मेरा दिल....", "दिलका भँवर करे पुकार...", "गुनगुना रहे है भॅवरे..."

७. खाजगी मैफल गीतं - "का करु सजनी, आये ना बालम....", "जब दिप जले आना...", "रिमझीम गीरे सावन....",

८. शृंगार गीतं - हिरॉइन नटताना किंवा साजनसाठी नटणार आहे अश्या सिच्युएशन मधली गाणी - " सजना है मुझे, सजना के लिये....", " तेरे लिये पलकोंकी झालर बुनु...." , "मेरी बिंदिया, तेरी निंदिया ना उडा दे..."

९. घर/घरोंदा/संसार गीतं - शेवटचं अपना घर, मेरा घर अश्या टाइपचं गाणं - 'डर' चित्रपटातलं जुही-सनी चं - "छोटासा घर है ये मगर..." हेच आठवतय त्यानंतर आली आहेत का अशी गाणी?

१०. खत/पत्र/चिठ्ठी गीतं - आजकाल एसएमएस, इमेल्स, ट्वीटरच्या जमान्यात खत, पत्र, चिठ्ठ्या गायबल्या Lol - " खत लिख दे संवरिया के नाम बाबु, कोरे कागज पे लिख दे सलाम बाबु...", "चिठ्ठी आयी है वतन से चिठ्ठी आयी है...", "ये मेरा प्रेमपत्र पढकर...", "डाकिया डाक लाया... " आणि हे सगळ्यात भारी..... "कबुतर जा जा जा.. पहेले प्यार की दुसरी चिठ्ठी तिसरे को दे आ....." Lol

लताचा एक छान मुजरा सापडला
भरोसा कर लिया था जिसपे, उसीने हमको लुटा है
कहातक नाम गिनवाये, सभीने हमको लुटा है

चित्रपट : प्रभात, संगीत मदनमोहन
http://www.youtube.com/watch?v=eytIVKgD43Y&feature=related

त्यामधलाच दुसरा.
साकिया करिब आ (जाहिदा आहे ना ती ?)
http://www.youtube.com/watch?v=U-AgD5YiVWM&feature=related

आणखी एक लताचाच
सईंया से वादा.. शशिकला, चित्रपट ठाकूर जर्नैल सिंग

http://www.youtube.com/watch?v=rzw1rRQQ77w&feature=related

रेल्वे गीत...

"हम दोनो दो प्रेमी, दुनिया छोड चले..." राजेश खन्ना, झिनत आहेत ना या गाण्यात?

यामधे लोरी हा साचा आलाच नाहीए. आजकाल हिरॉइन्स स्वतःच्या ग्लॅमरस इमेजला धक्का लागु नये म्हणुन बहुतेक अशा भुमिका स्विकारत नसतील. हल्लीच्या सिनेमामधे लोरीज नाहीतच.
<<<
सॉरी, विषयान्तर.. पण हे वाक्य अजिबातच नाही पटलं.. मायबोलीवरच्या वादग्रस्तं ' आई मम्मी होतीये' कावेते सारखं टाइप वाटलं Proud ( निदान आज कालचे 'हिरो-हिरॉइन' अस म्हणा.)
लोरी म्हणल्यावर 'हिरॉइन चाच उल्लेख का ? लोरी आईनेच म्हणावी का ? Happy
'मै जागु तुम सो जाओ' म्हणणारा ब्रम्हचारी मधला शम्मी कपुर, 'धीरेसे आजा रे' गाणारा भगवान , 'सुरमई आंखियोमे ' म्हणणारा कमल हसनही आहेत, त्यांना आठवा :).
ग्लॅमरस हिरॉइन्स करतात कि आईचे रोल्स, ऐश्वर्या(कुछ न कहो), माधुरी (अंजाम),लेटेस्ट काजोल ( वी आर फॅमिली) , विद्या बालन (पा) ...बरीच उदाहरणं सापडतील.
मुळात तशी गाणी लिहिली जात नाहीत किंवा सिचुएशन, स्टोरीज नसतील तर अ‍ॅक्टर-अ‍ॅक्ट्रेसेस काय करणार !

रेलगीतांमधलं एक मस्त गाणं ' धन्नो की आखोंमें है चांद का सुरमा'. मस्त गाणं होतं हे.

दीपांजली, अगं इतका काही विचार करुन लिहिलं नव्हतं मी कि तिनीच का लोरी गायची आणि त्यानी का नाही वगैरे. कदाचित आईचा आवाज गोड असतो जास्त. बाबासारखा खडबडीत नसतो, म्हणुन मला असं वाटलं असेल मला. Happy माझ्या बाबानी गाणी म्हटली तर आम्ही झोपण्यापेक्षा पळापळ केली असती बहुतेक, म्हणुन मी असं लिहिलं असेल. Happy फार सिरियसली घेवु नकोस, माझं स्टेटमेंट.

हा साचा राहिलाय का यादीत..
लहानपणी मेळ्यात 'बिछडलेल्या' किंवा ताटातूट झालेली भावंडे ,मोठेपणी फॅमिली साँग्स म्हणून एकमेकाना शोधून काढतात.. झालच तर फॅमिली साँग मुळे 'खोई हुई याददाश्त' सुध्धा परत येणारी गाणी.
१)यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे..

२)फूलोंका तारोंका सबका कहना है..एक हजारोंमे मेरी बहना है

३)जिंदगी इक नई जंग है..जीत जायेंगे हम, तू अगर संग हैं

४) क्या हुआ तेरा वादा,वो कसम वो इरादा

५) जब जब बहार आई,और फूल मुस्कुराये,मुझे तुम याद आये

आणखी एक साचा..
गाण्यामधे कसला तरी क्लु दिलेला असतो. Happy
कोणाला आठवतात का ही गाणी.
दिनेशभौ गाणी लिहा बघु ह्या साच्यातली. Happy

गाण्यामधे कसला तरी क्लु दिलेला असतो.
कोणाला आठवतात का ही गाणी.>>>>>

१. राज कि बात कह दू तो जाने महफिल में फिर क्या हो (ध॑र्मा, आशा/रफी)
२. कही पे निगाहे कही पे इशारा (सीआयडी, शमशाद बेगम)
३. हाय शरमाऊ किसी किसीको बताऊ...अपनी प्रेमकहानिया (मेरा गाव मेरा देस, लता मंगेशकर)

Pages