हिंदी गाण्यांचे वापरात नसलेले साचे.

Submitted by दिनेश. on 6 October, 2011 - 07:11

आजकाल सकाळ संध्याकाळ प्रवासात माझा अर्धा पाऊण तास जातो. अंतर केवळ ८ किमीचे पण तेवढा
वेळ जातोच. ड्रायव्हर गाडी चालवत असतो, आणि मी मात्र एफ़ एम वर हिंदी गाणी ऐकत असतो.
इथे सकाळी कपाचा ऎंड कॉफी असा एक चांगला कार्यक्रम असतो. (हा कार्यक्रम Soundasiafm.com
वर उपलब्ध आहे.) त्यातल्या गाण्यांपेक्षा मला निवेदक जेसी आणि जीत यांच्या गप्पा ऐकायला आवडतात.
त्याबरोबर हवामानाचा अंदाज (जो कधीच खरा ठरत नाही.) आणि ठळक बातम्या यांच्यासाठी ऐकतो.
पण आज लिहायचे कारण म्हणजे, त्यात वाजवली जाणारी गाणी. हि गाणी अगदि नवीन असतात.

याच एफ़ेम स्टेशनवर दिवसभरात आणि रात्रीही जुनी सुंदर गाणी लावतात आणि त्यातले निवेदनही
चांगले असते, पण आमच्या येण्याजाण्याच्या वेळेत मात्र नवीनच गाणी ऐकवली जातात.

कबूल केले पाहिजे, कि यापैकी ऐकून झाल्यावर लगेच एकाही गाण्याचे शब्द मला सांगता येणार नाही्त.
सेनोरिता सारखी काही गाणी, सिनेमा बघितल्यामूळे ओळखीची वाटतात, पण बाकिची हिंदी होती कि
पंजाबी होती का इंग्लीश होती, हे ही मला सांगता येणार नाही.
सगळ्यात सामायिक जर मला काही वाटत असेल तर -
१) असप्ष्ट शब्दोच्चार : पुर्वीचे गाणे मला अनोळखी असले तरी त्यातले शब्द मी उतरवून घेईन, इतके
स्पष्ट ऐकू येतात. आताच्या गाण्यातले शब्द मात्र मला अजिबात कळत नाहीत.
हि सुरवात कधी झाली ते सांगता येत नाही, पण असे अगदी पहिले गाणे मला आठवतेय ते, रेमोचे
प्यार तो होनाही था. मला तर ते फ्यार ठो ओनाई ठा, असेच ऐकू आले होते.
या कलाकारांचे शिक्षण हिंदीतून झाले नसेलही, पण संगीतकाराने तसा आग्रह धरायला नको होता का ?
शुक्रतारा मंद वारा, गाण्यापुर्वी अरूण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी मराठी गाणे गायले नव्हते. पण
ते गाणे ऐकल्यावर हे खरे वाटेल का ? श्रीनिवास खळ्यांनी, लताच्या आवाजात अथर्वशीर्ष सादर केले
होते. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा नव्हे तर अक्षराचा उच्चार खणखणीत आहे.

२) गेंगाणा स्वर : आता कधी कधी गाण्यात मधेच एक गेंगाणा स्वर ऐकू येतो. हा स्वर मानवी
गळ्यातून नक्कीच आलेला नसतो. याला गेंगाणा म्हणायचे कि आणखी काही ते पण मला सांगता
येणार नाही. पण हा स्वर बहुदा, कॉम्प्यूटरच्या मदतीने काढत असावेत.

३) एकापेक्षा जास्त व्यक्तीचे आवाज. गाणे एकच व्यक्ती गात असते पण दोन व्यक्ती एकत्र गाताहेत
असा परिणाम साधलेला असतो. आणि हे सहज चाळा म्हणून केल्यासारखे वाटते. असा परिणाम
आर्डीने पण काही गाण्यात साधला होता (क्या जानू सजन (लता), उलझन हजार कोई डाले, हो
बदन जलता है (दोन्ही आशा))
अजय देवगणच्या, आक्रोश मधे पण आझादी कि करे सौदेबाजी असे एक जरा बरे गाणे होते,
त्यातहि असाच परिणाम जाणवला मला. पडद्यावर तर ते गाणे बॅकग्राऊंडलाच वाजते.

४) एकसुरी ताल. खरे तर मी हा विचित्र शब्द प्रयोग करतोय, पण मला म्हणायचेय ते हे
कि ताल प्रकर्षाने जाणवतो, पण त्यात काही नाविन्य दिसत नाही. बहुतेक तो चार ते पाच
मात्रांचाच असतो. आणि तो नेहमीच गायक गायिकेच्या वरचढ वाजत असतो. कोण, कुणाला
साथ करतेय तेच कळत नाही. अगदीच नवीन काही ऐकायला मिळत नाही असे नाही.
गुजारिश मधल्या उडी उडी मधे जरा वेगळा ताल होता. सैफ़ आणि दिपिका च्या एका गाण्यातही
(चन्ना रे चन्ना रे ) काही वेगळे आढळले होते.
पण दादरा, झपताल, रुपक सारखे ओळखीचे ताल अजिबातच ऐकायला मिळत नाहीत.

५) परदेशी गाण्यांचा प्रभाव.
आता खुपदा परदेशात(च) चित्रीकरण होत असल्याने काही परदेशी धुन गाण्यात ऐकू येतात.
सात खून माफ़ मधल्या डार्लिंग वर रशियन गाण्यांचा प्रभाव होता तर जिंदगी ना मिलेगी दोबारा
मधे स्पॅनिश सुरावटी होत्या. त्या जरा अनोख्या असल्याने कानाला गोड वाटतात. पण हे अलिकडचेच
असे मात्र नाही.
अपनी कहानी छोड जा वर रशियन सुरावटीची छाप होती तर सायोनारा सायोनारावर जपानी.
ओये ओये वर स्वाहिली गाण्याची होती तर लडकियोंसे ना मिलो तूम वर अरेबिक.
पण परदेशी धुनींपेक्षा मला पंजाबी शब्द आणि सुरावटींचा नको तितका प्रभाव आढळतो.

अरेच्चा पण माझ्या लेखाचा हेतू हा नव्हता, तर पुर्वी जे काही साचे वापरात होते, ते आता
मोडल्याचे जाणवतेय, त्याबद्दल लिहायचे होते. असे काही साचे बघू या.

१) भजन
पुर्वी प्रेक्षक जास्त भाविक होते म्हणा कि आणखी काहि. पण अनेक सुंदर भजने त्याकाळात निर्माण
झाली. मैने प्रभु आजतक तूमसे कुछ नही मांगा सारखा एखादा संवाद झाला, कि भजन यायचेच.
हे रोम रोम मे बसनेवाले राम (नीलकमल) प्रभु तेरो नाम (हम दोनो) असे थेट भजनाचे प्रसंग
असायचे किंवा आडवळणाने एखादा डोस द्यायचा असायचा. ना मै धन चाहू ( काला बाजार)
कधी तरी सगळेच अवघड होऊन बसलेले असायचे. तेरी है जमी (द बर्निंग ट्रेन)
पण शेवटचे असे भजन तर मला लगान मधलेच आठवतेय ( तेरे बिना हमका ) नंतर काही
सुफ़ी रचना आल्या. पण त्यातला आवेश, गान प्रकार हा जरा वेगळाच असायचा. आपल्याकडे
भजनात शांत रस दिसतो. पण मुस्लीम धर्मातील भजनात थोडा बेभानपणा असतो.
हा प्रकार प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नीट लक्षात येणार नाही. पण जॉन अब्राहम आणि अस्तादचा
जो अफ़गाणिस्तानमधला सिनेमा आला होता (काबूल ना ?) त्यात असा एक प्रसंग होता.

२) गझल
गझल हा शब्द ऐकला कि सिनेमासंदर्भात माझ्या पिढीच्या आधीच्या लोकांना मदनमोहन आणि
लताच आठवणार. अदालत, जहॉंआरा, दस्तक, गझल, मेरा साया, वह कौन थी असे अनेक
चित्रपट या दोघांनी गाजवले. पण बाकिच्या संगीतकारांनी देखील प्रसंगानुरुप उत्तम चाली बांधल्या.
रोशन, शंकर जयकिशन, जयदेव अशी अनेक नावे घेता येतील. मग मधे हा गायनप्रकार मागे
पडला. मग जगजित सिंग, गुलाम अली, पंकज उदास, सुरेश वाडकर, मनहर आदी लोकांनी
काही उत्तम गझला दिल्या. आता मात्र हा गायनप्रकार चित्रपट्संगीतातून गायब झाल्यासारखा
वाटतोय. सरफरोश नंतर चांगली गझल ऐकल्याचे आठवत नाही.

३) कव्वाली

चित्रपट संगीतात हा गायनप्रकार लोकप्रिय होताच पण त्या काळात मुंबईतही कव्वाली गायनाचे
कार्यक्रम व्हायचे. शकिला बानू भोपाली, जानी बाबू कव्वाल अशी मातब्बर मंडळी यायची.
चित्रपटांपैकी बरसात कि रात, (इश्क इश्क है, निगाहे नाजके मारोंका, जी चाहता है चूम लू)
कभी ए हकिकते मुंतजर (दुल्हन एक रात की) निगाहे मिलाने को ( दिल ही तो है)
चांदी का बदन (ताजमहाल) अल्ला ये अदा (मेरे हमदम मेरे दोस्त) जब इश्क कही हो जाता
(आरजू ) अशा कितीतरी कव्वाल्या आवर्जून संग्रही ठेवण्यासारख्या आहेत.
हम किसीसे कम नही, अमर अकबर ऎंथनी मधेही कव्वाल्या होत्या. शिरडीवाले साईबाबा तर
एकेकाळी रेल्वेतल्या भिकारी लोकांचे पेटंट गाणे होते. आर्डीने मग बर्निंग ट्रेन मधे, पल दो पल
अशी खणखणीत कव्वाली दिली.. पुढे मात्र हा प्रकार गायबच झाला. अगदी अलिकडे वन्स
अपॉन अ टाईम मधे कव्वाली सदृष्य काहितरी ऐकले खरे.

४) मुजरा

मला नेमके माहित नाही कि मुंबईत ताडदेवच्या कोठेवाल्या अजून मुजरा सादर करतात का, पण
हा प्रकार चित्रपटात खुप लोकप्रिय होता. अगर दिलबर कि रुसवाई (खिलौना), रुठे सैया (देवर)
चाहे तो मोरा जिया लैले (ममता) तस्वीरे मुहोब्बत ( संघर्ष) हम हाले दिल सुनाएंगे (मधुमति)
दिल कि कहानी (ताजमहाल) साकिया आज मुझे (साहब बीबी और गुलाम) हे माझे आवडते
मुजरे. रात बी है कुछ भिगी भिगी (मुझे जीने दो ) हा सर्वात जास्त आवडता.
पण या संदर्भात दोन चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय चालणार नाही तो म्हणजे पाकिजा
आणि उमराव जान. पाकिजात मीना कुमारी नृत्यनिपुण नसली तरी सितारा देवीच्या नृत्य दिग्दर्शनाने
वेगळीच जान आली होती. रेखाच्या उमराव जान मधे अशाच्या गायनाचा मोठा वाटा होता.
मला ऐश्वर्याच्या उमराव जानचा पण उल्लेख करायला हवा. ती त्यात सुंदर नाचली असली तरी
गाणी मात्र अत्यंत सुमार होती.
देवदास मधला माधुरीचा, मार डाला, मात्र मला विशेष आवडला नव्हता, जून्यापैकी नर्तकी नावाच्या
सिनेमात नंदाने आणि तवायफ़ मधे रति अग्निहोत्रीने सुमार मुजरे पेश केले होते. नजर लागे
राजा तोरे बंगले पर, (काला पानी) नलिनी जयवंतचा नाचही काहि खास नाही.
अलिकडे नव्या सिनेमात असा मुजरा बघितल्याचे आठवतच नाही.

५) शास्त्रीय गायन आणि नृत्य

लता आणि आशा बरोबरच, मन्ना डे आणि रफ़ी हे शास्त्रीय गायनात तरबेज कलाकार सक्रिय होते
तोपर्यंत शास्त्रीय रागांवर आधारीत गाणी खुलत होती. प्रसंगानुरुप अनेक दिग्गज शास्त्रीय संगीत
गायकांनी पण आपला आवाज चित्रपटासाठी दिला होता. (मी इथे यादी देत बसलो तर पाने पुरणार
नाहीत.)
या गाण्य़ांना अनेकवेळा शास्त्रीय बृत्यांची पण जोड मिळत असे. मुख्य प्रवाहातल्या सर्वच नसल्या
तरी वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, आशा पारेख, पद्मिनी, रागिणी, कुमकुम,संध्या या शास्त्रीय नृत्यात
पारंगत होत्या. त्यामूळे गाणे आणखीहि खुलत असे. या अभिनेत्रींबरोबरच काही कमी माहित असलेल्या
अभिनेत्रींनी पण उत्तम शास्त्रीय नृत्य पेश केलीत. उदा. रत्ना (लागा चुनरी मे दाग), विजया चौधरी
(पायलवाली देखना) बेला बोस (तेरे नैना तलाश करे जिसे) अनिता गुहा (प्रितम दरस दिखाओ)

कुठलीही सुरेल रचना हि कुठल्या ना कुठल्या शास्त्रीय रागावर आधारीत असतेच तरीपण आताच्या
गाण्यातले राग, ठळकपणे जाणवत नाहीत एवढे खरे. जोपर्यंत मी विविध भारतीवर संगीत सरिता
ऐकत होतो तोपर्यंत तरी नव्या चित्रपटातील गाणी रागाच्या नमुन्यादाखल वाजवत नसत.
शेवटचे असे गाणे ऐकले ते, हम दिल दे चुके सनम मधले. सूरसंगम नंतर शास्त्रीय नृत्यगायनावर
आधारित चित्रपटही आल्याचे आठवत नाही. शबानाचा रागा, अपवदात्मकच.
शेवटचे उत्तम क्लासिकल नृत्य आठवतेय ते तब्बूचे, तक्षक मधले (रंग दे नाही, नुसतेच भरतनाट्यम
केलंय)

६) कॅबरे

कॅबरे आणि हेलन हे जवळजवळ समानार्थी शब्द आहेत. पण हेलन यायच्या आधी कक्कू अशी नृत्ये
सादर करत होतीच. हेलन ने देखील इतर नृत्यप्रकार लिलया पेलले होते. तिने अगदी वैजयंतीमालाशी
मुकाबला केला होता (डॉ.विद्या, शतरंज) तिने कॅबरेला मात्र एक दर्जा मिळवून दिला. ती कुशल नर्तिका
तर होतीच त्यामूळे तिच्या नृत्यामधे अश्लील हावभाव करायची तिला गरज वाटली नाहि. ते आणले
बिंदूने. पुढे हेलनलापण तसे करावे लागले (इंतकाम, डॉन, राम बलराम, इन्कार)
अगदी क्वचितच मुख्य अभिनेत्री अशी नृत्ये सादर करत असत. मुमताज (हमजोली) आणि नर्गिस
(रात और दिन) तिच्या समकालीन अशा पद्मा खन्ना, जयश्री टी, मीना टी (या तिघी कथ्थक नर्तिका
होत्या. शिवाय फ़रियाल हे पण नाव ऐकल्याचे आठवतेय.

पण पुढे मुख्य नायिकाच अशी नृत्ये सादर करु लागला. झीनत, परवीन बाबी, रिना रॉय या पहिल्यावहिल्या
नट्या. पुढे अगदी माधुरी, मनिषा, उर्मिला पर्यंत हेच चालले.
याचेच पुढचे रुप म्हणजे आयटम सॉंग म्हणायचे का ? पण असली गाणी सादर करणा-या राखी सावंत,
मल्लिका शेरावत, याना गुप्ता, बिपाशा आदी काही नृत्यनिपुण वाटत नाही, त्यामूळे बराचसा नाच कॅमेराच
करतो.

७) डिस्को

ट्रॅव्होल्टाच्या सॅटरडे नाईट फीव्हर नंतर आपल्याकडे डिस्को गाण्यांची लाट आली होती. उषा उत्थपने
आधी अशी काही गाणी आणली. मग आशाचे हथकडी मधले गाणे आले होते (डिस्को स्टेशन) ते रिना
रॉयने सादर केले होते. मग परवीन बाबीचे पण नो पार्किंग असे शब्द असलेले गाणे आले होते.

मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर नावाचा सिनेमाच होता पण आता फारसा कुणाला आठवत नसेल
असा स्टार नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात कुमार गौरव आणि रति अग्निहोत्री होते.
नाझिया हसनच्या आवाजात गाणी होती त्यात. त्या काळात बहुतेक सिनेमात डिस्को गाणी
असायची. पण ही ट्रेंड लवकरच मागे पडली.

८) लोकगीत.

भारतभरातील समृद्ध लोकसंगीताचा बाज अनेक हिंदी गाण्यात दिसला. अनिल विश्वास, सलील चौधरी
सचिनदेव बर्मन यांनी बंगाली लोकसंगीताचा छान वापर केला. गुजराथी ( मै तो भूल चली बाबूल का
देस) मुत्तूकोडी कव्वारी हडा (मल्याळम) चढ गयो पापी बिछुआ (आसामी) थाणे काजळीया बनालू
(राजस्थानी) आहे मैया सोने का बनायो (मध्यप्रदेश) कि मै झुठ बोलिया, कोय ना (पंजाबी)
घे घे घे रे, घे रे सायबा (गोवा) अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
लोकसंगीतातून आलेल्या रागांचा वापर पण काहि प्रतिभावान संगीतकारांनी करुन घेतला होता.
तू चंदा मै चांदनी ( रेश्मा और शेरा-लता-जयदेव-राग पिलू / देस / मांड ) बिरजमे होली खेलत नंदलाल
(गोदान-रफि-पं. रविशंकर-राग काफि)

मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच उदाहरणे आठवताहेत.
दर्याकिनार एक बंगलो, मच गया शोर सारी नगरी रे, एक दो तीन वगैरे. मनोजकुमारच्या शिरडी के साईबाबा मधे,
शिव भोला भंडारी असे वाघ्या मुरळीचे गीत होते (पडद्यावर सचिन आणि उषा चव्हाण ) . अशांती मधे लवंगी मिरची
अशी एक लावणी होती (पडद्यावर शबाना, झीनत आणि परवीन) पण चाल काही लावणीची वाटत नव्हती.
चुनरी संभाल गोरी मधे लेझिम वाजलेय, वास्तव मधे मराठी आरती आहे तर सई परांजपेच्या साज मधे
एक नाट्यगीत सदृष्य गाणे आहे. पण फारसे काही नाहीच.

याशिवाय लोरी, युगुलगीते, लग्नगीते असेही काही साचे होतेच.
आता प्रतिसादातही अनेक साचे सापडतील मला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायिकेचा/ नायकाचा अनुनय करणारी गाणी. ह्यात बहुदा एक पार्टी रुसलेली असायची

अच्छा जी मैं हारी
यूँ तो हमने लाख हसीन देखे है
देखो कसम से देखो कसम से
तुम मुझे यूँ भुला ना पाओगे
हाय हाय ये मजबूरी
रूठे रूठे पिया
रूठना जाना तुमसे कहूँ तो
है अपना दिल
ऊपर वाला जान कर अनजान है
मेरे सामने वाली खिड़की में
अच्छा चलोजी बाबा माफ़ कर दो

"मोहन कि मीरा" कडे असलेल्या वैविध्यपूर्ण साठ्याला सलाम !

~ खरं तर मला या मीरा यांच्या नावामुळेच आणखीन् एक [गायब] झालेला साचा आठवतोय, तो साचा म्हणजे "मीरा, राधा,' सारख्या स्त्रियांनी आपापल्या कृष्णासाठी/रामासाठी गायिलेली भक्ती रसातील गाणी.

१. "जैसे राधाने माला जपी श्याम की" ~ 'तेरे मेरे सपने
२. "श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूंही बदनाम" ~ 'गीत गाता चल'
३. "मधुबन मे राधिका नाचे रे" ~ कोहिनूर [जरी रफीचे असले तरी भक्तीगीतात येईल]
४. "मेरे रोम रोम मे बसनेवाले राम" ~ नीलकमल

~ या गाण्यांचा रूढ अर्थाने 'भजन' म्हणता येणार नाही हे नक्की; पण भक्तीभाव जरूर आहे.

मी आज सकाळी राहत आणि श्रेयाचे बॉडिगार्ड मधले गाणे ऐकत होतो. दो लब्जोंमे बयॉं ना हो पाये (का असेच काहितरी) सुरावट चांगली होती, पण एरवी मोकळ्या गळ्याने गाणारे हे दोघे, आवाज चोरुन का गायलेत ? का ही पण नवी ट्रेंड

पुर्वी, किनरे आवाज असणारे (उदा कमल बारोट ) कधी आवाज चोरुन गात नसत. लता, रफी तर सोडाच पण महेंद्र कपूरही मोकळ्या आवाजासाठी आवडायचा.

किनरा किंवा चोरटा आवाज खास गाण्यांसाठी असायला
आ दिलसे दिल लगाले - नवरंग - आशा (तसेच गोरी बाहुली कुठुन आली, डोळे हे जुल्मी गडे)
लताने याल्ला याल्ला दिल ले गया, किंवा आजा रिमझिम के ये प्यारे मधे तारस्वरात आवाज लावलाय.
किशोरनेही एकाच गाण्यात एक मोकळा आणि एक किनरा आवाज लावलाय.

नावेतील गाण्यांमधे अजून भर-

जिस गली में तेरा घर ना हो बालमा- कटी पतंग

चिंगारी कोई भडके- अमरप्रेम

प्यार की कश्ती में- कहो ना प्यार है

हैय्या हो- दयावान

प्यार पर बस तो नही है मेरा लेकिन फिर भी-

@ दिनेश ~

~ पूर्ण गाणे एकाच शॉट्मध्ये चित्रित करण्याचा प्रयोग चक्क सन १९५१ मध्ये झाला होता. दिलीपकुमार-मधुबालाच्या 'तराना' चित्रपटात. तलत मेहमूदचे ते लोकप्रिय गाणे "एक मै हुं एक मेरी बेकसी की शाम है".

हिरोने बाईचा ड्रेस घालणे, हिरॉईनने पुरुषाचा ड्रेस घालणे..

कजरा मुहोब्बतवाला.

आमीर खानचे एक कुठलेतरी आहे... स्त्रीचा वेष घालून..

मेरे अंगने मे .. बच्चन

अशोक, ते गाणे शोधायला पाहिजे यूट्यूबवर मला.

परिणिता मधे रेल्वेतले पण गाणे होते ना. त्यातच रेखाचे जे गाणे होते तो पण एक जूना साचा.

पुर्वी वॉल्ट्झ च्या लयीत पण काही गाणी आली होती. (लगानमधे तसा नाच होता, पण गाणे नव्हते.)

दिल कि गिरह खोल दो .. ( रात और दिन ) या गाण्यावर तर बॉलडान्सच होता. पण मदनमोहनने आशाला एक छान गाणे या लतीत दिले होते.

शोख नजर कि बिजलीया, दिलपे मेरे गिराये जा
मेरा ना कुछ खयाल कर, तू यूही मुस्कुराये जा

वह कौन थी, गाणे हेलनच्या तोंडी आहे पण नाच नाही.

चा चा चा, या नृत्यप्रकारावर पण काही गाणी होती. या नावाचा सिनेमा पण होता.

जामोप्या, क्रॉस ड्रेसिंग वाली गाणी शम्मी कपूर, ऋषि कपूर, अमजद खान, विश्वजीत आदी बर्‍याच जणांनी सादर केलीत.
पण मला सगळ्यात अनोखे वाटले होते ते प्राण चे जंगल मे मंगल या सिनेमातले. मला वाटतं चक्क लताचा आवाज होता. हे गाणे आहे यू ट्यूबवर.

cross dressing ची गाणी कुणीतरी लिहा म्हणजे यु ट्युबवर शोधता येतील

"दिल चाहता है" मधील तनहाई गाण्यात ढोल/ड्रम वाजवलेला आहे त्याला लेझिमचा बाज आहे. पुर्वी गणपती विसर्जनात वगैरे त्या तालावर लेझिम वाजयचे.

नावेतील गाणे: नदिया के पानी ओ रे, नदिया के पानी (सवेरा), चलो दिलदार चलो (पाकिझा), नदिया चले चले रे धारा (सफर)

मला आवडणारे टांग्यातीएल गाणे: लता आणि रफीचे "ये हवा ये मस्ताना मौसम" (अकेली मत जैयो) मदन मोहनचे संगीत आणि पडद्यावर मीना कुमारी, राजेंद्र कुमार. http://www.youtube.com/watch?v=_gu8R3BG6SM&feature=related

पुर्वापार चालत आलेली आनि अजुनही सिनेमात असलेली गाणी म्हन्जे "बिदाई गीत"

दिनेश ~

खरं सांगायचं झाल्यास तरानाच्या 'त्या' गाण्याची यूट्युब लिंक माझ्याकडे होतीच पण या नेटदुनियेतील माझे ज्ञान अगदीच तोकडे असल्याने मला ती लिंक इथे त्या प्रतिसादासमवेत कशी द्यायची हेच कळाले नाही, त्यामुळे केवळ गाण्याच्या ओळीच देणे भाग पडले.

क्षमस्व.

[कुणीतरी गाईड शोधतो या बाबतीत, म्हणजे पुढे अशी अडचण येणार नाही.]

लॉजिकल अंताक्षरीत पूर्वी मजा यायची , या सगळ्या थीम्स झाल्या आहेत.
लॉजिकल अंताक्षरीत पूर्वी पानं भरून वाहिलेली ' डबल मिनिंग द्वयर्थी गाणी' कॅटॅगरी झाली का ? Proud
९० च्या काळात तर पूर आला होता असल्या गाण्यांना.. लोटन कबुतर, खेत गये बाबा बजार गयी मा, मै तेरा तोता, दरवाजा खुल्ला छोड आयी नीन्द के मारे, मुझको राणाजी माफ करना, भोली भाली लडकी , कल संयाने ऐसी टाइप असंख्य गाणी.
लॉजिकल अंताक्षरीचं सर्वात लक्षात राहिलेलं लॉजिक म्हणजे नंद्यानी ( निनाद जोशी) दिलेलं ' ज्या गाण्यां नंतर अ‍ॅक्सिडेन्ट होतो अशी गाणी'.. भारी होत हे लॉजिक.. किती तरी गाणी सपडली..

छान लेख दिनेशदा. प्रतिसादात सापडलेले साचेही एक से एक. Happy
<< नजर लागे राजा तोरे बंदले पर >> मला हे आत्तापर्यंत तेरे बंगले पर असं ऐकू यायचं Lol
बंदला म्हणजे काय ??

दिनेशदा, अजून एक साचा 'फोनवरची गाणी':-

मेरे पीया गये रंगून.....
जलते हैं जिसके लिये.... (या गाण्यातला नूतनचा मुद्राभिनय अशक्य होता)
अलिकडचं 'संघर्ष' मधलं मुझे रात दिन...आणि 'बागबान' मधलं मैं यहां तू वहां....

या साच्यातली ही चार च आठवतायत Happy

अजुन एक साचा
स्वत:ला (नायक/नायिका) अधोरेखित करणारी/स्वत:ची स्तुती करणारी गाणी. Happy

१. मै हूं झुम झुम झुम झुमरू (किशोर कुमार, झुमरू)
२. मेरी गलियोंसे लोगों कि यारी बढ गयी (लता मंगेशकर, धर्मात्मा)
३. मै हूं खुशरंग हिना (लता मंगेशकर, हिना)
४. मुझको देखोगे जहां तक मुझको पाओगे वहा तक (सुरेश वाडकर, राम तेरी गंगा मैली)
५. मै चली मै चली देखो प्यार कि गली (लता मंगेशकर, पडोसन)
६. मेरे दिलने जो मांगा मिल गया (लता मंगेशकर, रखवाला)
७. कितने दिवाने मेरे कितने दिवानो कि मै (खतुबा....) (आशा भोसले, अलिबाबा और चालीस चोर)
८. दुनिया का मेला, मेले में लडकी (लता मंगेशकर, राजा जानी)
९. जानेवालो जरा होशियार यहां के हम है राजकुमार (मो. रफी, राजकुमार)
१०. मै पल दो पल का शायर हु (मुकेश, कभी कभी)
११. सांवला रंग है मेरा, रेशमी अंग है मेरा (आशा भोसले, रामपूर का लक्ष्मण)

हि आणि अशीच अजुन भरपूर गाणी....... Happy

याच साच्यातील सध्याची काही गाणी - शीला कि जवानी, मुन्नी बदनाम हुई, जलेबी बाई Proud

शोख नजर कि बिजलीया, दिलपे मेरे गिराये जा
मेरा ना कुछ खयाल कर, तू यूही मुस्कुराये जा

वह कौन थी, गाणे हेलनच्या तोंडी आहे पण नाच नाही.
>>>>

दिनेशदा
हे गाणे हेलेन च्या तोंडी नाही. हे गाणे लागे पर्यंत हेलेन मेलेली असते. हे गाणे एक दुय्यम नटी च्या तोंडी आहे. आणि हे गाणे बर्फात स्केत्टिंग करताना आहे. ती नटी मनोज कुमारच्या हॉस्पिटल मधली नर्स असते. हे गाणे शेवटी शेवटी आहे.

किशोरनेही एकाच गाण्यात एक मोकळा आणि एक किनरा आवाज लावलाय.>>>>>

ले गयी मरा दिल तेरि तिरछी नजरिया ओ गुजरिया

प्राण आणि स्वतः किशोर. किशोर कुमार ह्यात बाई झालाय. आणि त्यानेच हे गाणे दोन आवाजात गायले आहे.

अजुन एक साचा

गावातील कार्यक्रमास नायक/नायिका यांना आमंत्रण (किंवा काहितरी उत्सवाचे निमित्त) आणि गावकर्‍यांसारखीच वेषभुषा करून नाचगाणी Happy

१. रामा रामा गजब हुई गवा रे (लता मंगेशकर, नया जमाना)
२. सुन चंपा सुन तारा कोई जिता कोई हारा (लता मंगेशकर/किशोर कुमार, अपना देश)
३. मैने देखा तुने देखा ... इक दुश्मन जो दोस्तोंसे प्यारा है (लता मंगेशकर/किशोर, दुश्मन)
४. ठंडी हवाओं ने गोरी का घुंगट उठा दिया (आशा भोसले/किशोर कुमार, प्रेमनगर)
५. के आया सावन झूम के (लता/रफी, आया सावन झूम के)
६. आ मेरे हमजोली आ (लता/रफी, जीने कि राह)

अनिलभाई , दीपांजलि

ह्यातले बहुतेक साचे लॉजिकल अनंताक्षरी वर झालेले आहेत. >>>>>

खरे आहे. पण इथे आपण वापरात नसलेल्या सच्यांचा विचार करतो आहे.

ले गयी मरा दिल तेरि तिरछी नजरिया ओ गुजरिया >>>आके सीधी लगी जैसे दिलपे कटरीया ओ सावरीया, ओ तेरी तिरछी नजरीया (चित्रपट: हाफ तिकिट)

मित फोनवरचे अजून एक गाणे. " नींद उड जाए तेरी चैन से सोने वाले..."
शर्मिला, ते गाणे " खीजा के फूल से आती कभी बहार नही "असे नसून " फिझा के फूल से..." असे आहे.

" खीजा के फूल से आती कभी बहार नही "असे नसून " फिझा के फूल से..." असे आहे.>>>>>नाही नाही ते "खीजां के फूल" असंच आहे. Happy

रुणुझुणु - बंदला नाही, बंगलाच आहे ते. इतका सुंदर ठेका पण त्यावर ततकार करणे नलिनी जयवंत ला जमले नव्हते. तिच्या चेहर्‍याचा क्लोजप आहे त्यावेळी.
( नलिनी जयवंत अलिकडेच वारल्याचे वाचले, खुप एकाकी होती. गेली त्यानंतर दोन दिवस कुणाला खबरही नव्हती. )

मीरा -- शोख नजरकी.. हेलनवर नाही ! किती वर्षे झाली ते गाणे बघून ! हा चित्रपट घरी प्रोजेक्टर आणून बघितला होता.

डिजे - ती द्वर्थी गाणी लवकर बंद झाली म्हणायची !

जिप्स्या : आता खुप दिवसात नायिकेचे वा नायकाचे नाव असलेला सिनेमाच आला नाही. (गझनी हे खलनायकाचे नाव होते !) म्हणून असे झाले असेल का ?

मित : लीडर मधले कही भूलसे ये ना समझ लेना, पण फोनवरच आहे.

@ दिनेश आणि मोहन कि मीरा ~

'ती' हेलेन नाही हे जितके खरे तितकेच ती त्या हॉस्पिटलमध्ये नर्स नसते हेही खरे.

ती अभिनेत्री होती "प्रविण चौधरी" [देमार चित्रपटातून चमकत असे] आणि ती असते मनोजकुमार ज्या डॉक्टरची ट्रीटमेन्ट घेत असतो त्या के.एन.सिंग यांची कन्या. डॉक्टरांच्या मनी मनोजकुमार आपला जावई व्हावा अशी इच्छा असते. त्यामुळे त्यानीच हेलेन {मनोजची प्रथम प्रेयसी} हिचा काटा काढला असावा अशी प्रेक्षकांची समजूत होते.

@ अस्मानी ~

शर्मिला फडके यानी 'खिजा के फूल से' असा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. जरी गाणे ऐकताना आपल्याला जरून "फिजा के फूल से" असे ऐकू येते.

"खिजा के फूल" चा अर्थ 'कोमेजून गेलेले फूल'. चित्रपटातील नायक बेकारीमुळे गांजलेला दाखविला असून अशा परिस्थितीत तो प्रेयसीच्या प्रेमाचा स्वीकार करू इच्छित नाही, म्हणून गाण्यातून तो तिला 'परिस्थितीनुसार कोमेजून गेलेल्या फूलाकडून बहराची अपेक्षा तू ठेवू नकोस' असे सांगत आहे.

वाहनावर स्वार होऊन गायलेली गाणी हा साचा उल्लेखून झाला का?

सायकलः मै चली मै चली
कारः चला जाता हू,
टांगा: एलो जी सनम हम आ गये
स्कूटर, बाईकः ये दोस्ती हम नही तोडेंगे, दिवाना चित्रपटाचे टायटल साँग
हेलिकॉप्टरः शम्मी आणि शर्मिलाचे एक गाणे चित्रपत लव्ह इन पॅरिस बहुतेक
बसः कितने भी तू कर के सितम

Pages