लांब केस कापवतानाचे अनुभव

Submitted by क्षिती on 8 September, 2011 - 12:29

नमस्कार,

माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट आहेत. पण आता लग्नानंतर व नोकरी मुळे अजिबात लक्ष द्य़ायला वेळ होत नाही. लक्ष देता येत नाही म्हणुन कधी कधी थोडी चिडचिड पण होते.

मी कधीच केस छोटे ठेवले नाहित. अगदी शाळे पासुन लांब सड़क केस आहेत. आता केस कापुन छोटे करण्याच्या विचारात आहे. नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन. मी माझे केस कापवुन एकदम बॊय कट किंवा बॉब कट करण्याचा विचार करते आहे (तेच सध्या मॆनेज करु शकेन अस वाटत आहे).

मी दोनदा पार्लर मधे जाऊन केस न कापवताच परत आले. हिम्मतच होत नाही, केस कापवायची. मला तुमचे पहिल्यांदा केस कापवतानाचे किंवा पहिल्यांदा लांब केस कापवतानाचे अनुभव सांगाल का सखी. थोडा धीर हवा आहे. निर्णय घ्यायला मदत करा प्लिज.

पुण्यात एखाद चांगल पार्लर पण सुचवा ना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भांडारकर रोड , टायटन शो रुम समोर च्या लेन मधे गॅझेल तिथे मॅलनी नावाची मुलगी आहे, ती मस्तं करते हेअरकट्स.
पूर्वी हॉटेल अरोरा टॉवर्स च्या सलोन मधे जस्बिर अरोरा टॉप स्टायलिस्ट होता, पण नाशिक ला मुव्ह झाला बहुदा तो.
बाकी लांब केसांचा शॉर्ट हेअरकट विषयी एक्सपिरिअन्स नाही त्यामुळे लिहु शकत नाही Proud

पहिल्यांदा एकदम शॉर्ट केलेस तर झेपवणार नाहीत कदाचित.. थोडी थोडी लांबी कमी करावी असे म्हणतात. लूक चेंज करायला केस पूर्ण कापायला नको.. पुढे फीदर कट, फ्लिक्स वै. केला तरी पुरतो.

हे क्षिती, खरंच इतके मॅनेज होत नाहीत का केस? बघ शक्यतो नको कापुस. आता परत लांब केसच फॅशनमधे आहेत. आणि Shockingly नको चेंज करुस लुक. बघ शक्यतो आधी लेयर्स ठेव आणि खांद्यापर्यंत किंवा थोडे खाली रहातील एवढे लांब ठेव मग हळुहळु त्याच्या पुढच्या खेपेस अजुन अजुन लहान कर. म्हणजे आवडलं नाही किंवा सुट झालं नाहीचा धोका रहात नाही.

आणि लहान केस ठेवताना तुझा चेहरा, एकुण पेहराव, फिगर याचा नक्की विचार कर. साडीवर लहान केस चालतील का, तशी फिगर आणि चेहरा आहे का, हा विचार कर. मराठी बायकांना सणवार आणि समारंभांमधे साडी नेसणं अटळ असतं, तेव्हा सुट होईल का हा विचार कर. स्लीम आणि उंच लोकांना साडीवरही लहान केस शोभतात (आणि लांब कानातलेही). हा सगळा विचार कर. मग पश्चाताप होतो आणि वेळ गेलेली असते. माझ्या मैत्रिणीने सध्याच हा मुर्खपणा केला आणि आता येताजाता माझा जीव काढते आहे, म्हणुन तुझ्यासाठी नाही पण तुझ्या नवरा आणि मित्रमैत्रिणींच्या मनःशांतीसाठी एवढा लांबलचक सल्ला. Wink

माझीही सेम कथा आहे. वेणी घालून जाम वैतागले होते. म्हणून लेयर करुन आले. लांबी फार कमी नाही केली. पण तरी रोजच्या व्यापांमुळे सेट करणे, रोज मोकळे सोडणे मला जमत नाही. तेव्हा आता पुन्हा वाढवायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा पहिल्याइतके वाढायची वाट बघते. वेणी तर वेणी Wink

>>>नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन >>>अगदी अगदी ! नवरा असेच म्हणतो अन मग आपण छान लाम्बसडक केस कापतो. काही दिवस बरे जातात अन मग त्याला (अन आपल्यालाही) परत लाम्ब केसच आवडू लागतात. स्वानुभव Happy तेव्हा विचार करून काप ग !

एकाचवेळी छोटे करु नकोस! हळु हळु कापत मग खांद्यापर्यंत लांबीचे कर! भरपुर फोटो काढुन घे कापण्यापुर्वी! Happy

>>>नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन >>>अगदी अगदी ! नवरा असेच म्हणतो अन मग आपण छान लाम्बसडक केस कापतो. काही दिवस बरे जातात अन मग त्याला (अन आपल्यालाही) परत लाम्ब केसच आवडू लागतात. स्वानुभव स्मित तेव्हा विचार करून काप ग !>>>>>>>> हे अगदी खरे आहे..

मी यातून गेले आहे.. प्लीज नका कापू केस.. माझे केस अगदी शाळे पासुन लांब सड़क होते. लग्नानंतर नोकरी व मुलामुळे मी कापले होते.. माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट होते.. मी त्याचे अगदी कानापर्यत कमी केले होते.. पण आता परत वाढवून पुर्ववत झाले आहेत..

पुन्हा विनंती.... प्लीज नका कापू केस...

Happy
लांब केस हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे ना??? Happy

केस रेशमी आणि थोडेफार सरळ, सुळसुळीत असतील तर लांब लांब स्टेप्स घेऊन कट केल्यावर मोकळे सोडुनही जास्त मॅनेज करावे लागणार नाही. तेच जर कुरळे असतील तर मात्र केस मोकळे ठेवणे प्रचंड त्रासाचे जाईल. माझे आधी कुरळे होते आणि ते मोकळे सोडले की जाम बोंगा व्हायचा. त्यापेक्षा वेणी परवडली असे वाटायचे. त्यामुळे केसाची जातकुळी काय आहे ते लक्षात घेऊन निर्णय घ्या.

मी यातून गेले आहे.. प्लीज नका कापू केस.. माझे केस अगदी शाळे पासुन लांब सड़क होते. लग्नानंतर नोकरी व मुलामुळे मी कापले होते.. माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट होते.. >>>> सेम सेम फक्त मुलाऐवजी मुलगी वाच. नक्को कापू केस. पण कमरेचे पाठीपर्यंत, मग शोल्डरपर्यंत जा जास्तीत जास्त.. मग नाही आवडल तर पुन्हा वाढवू शकते.. रात्री विंचरत जा. साधनाला अनुमोदन, कुरळे असतील तर कठीण आहे संभाळणे.. पण सरळ, सुळसुळीत असतील तर नको ग कानापर्यंत वगैरे कापू.. :कळवळून समजावणारी बाहुली: Happy

माझा पण हाच अनुभव.. फक्त मी कोणत्याही कारणास्तव नाही तर स्वतच्या शहाणपणामुळे कापलेले, आणि आता तर वाढतही नाही आहेत लवकर.. Sad

आई आई ग!! नको ती आठवण!! माझे ही कॉलेजला जाईस्तोवर चांगले लांबसडक केस होते. बावळटपणा करुन 'यु कट' केला. नि ते मोकळे भुरभुर केसांची नंतर वाट लागली! नंतर जी 'कात्री' लागली केसांना ती लागलीच! नका कापु प्लिज !!:(

एकदा मन घट्टं करा आणि कापा बिनधास्त. केस आपल्यासाठी असतात, आपण केसांसाठी नसतो. योग्य प्रकारे निगा राखणे होत नसेल तर जरुर कापा. Happy

रैना + १
अश्विनीमामी+१
तोच लुक, तीच हेअरस्टाइल कंटाळा येत असेल.. जरुर कर मेक ओव्हर, , गो फॉर इट !
चांगला स्टायलिस्ट बघ, आधी कन्सलेटेशन घे, गुगल इमेज सर्च करून जसा कट तुला आपेक्षित आहे त्याची प्रिंट आउट काढून घेऊन जा दाखवायला.

माझं वैयक्तिक मत आहे कि कापू नयेत. त्यासाठी मी माझा अनुभव देते.
माझे स्वतःचे लांब केस आहेत. आणि ते मी साधारण वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे कळत्या वयात समजून-उमजून वाढवायला चालू केले आणि ते भरपूर वाढले. त्यामुळे मी ठरवलं होतं की कुणाच्या सांगण्यावरून मी कधी केस कापणार नाही. (कारण माझ्या मोठ्या बहिणीने तिच्या नवर्याच्या सांगण्यावरून तिचे लांब केस कापून एकदम मानेपर्यंत कमी केले. )
तर आता माझ्या लग्नाला १० वर्षे होवून २ मुली आणि नोकरी सांभाळून केस अजून लांब ठेवले आहेत.
मलाही पूर्वी वाटायचं की लांब केसांमुळे काही वेगळी स्टाईल करता येत नाही आणि फार काकूबाई दिसते असं. पण साधरण २-३ वर्षांपूर्वी माझ्या पार्लर वालीने मला पुढचे केस (केसांचा खूप कमी ब्लॉक घेऊन) साधारण हनुवातीच्या वरपर्यंत कापायचा सल्ला दिला आणि मी तसे ते कापले. त्यामुळे लूक बराच बदलला. आणि आजकाल मी केसांची वेणी न घालता केसांना मागून एक पीळ देऊन क्लच पिन लावून बांधते. त्याने पोनीटेल बांधल्याचा लूक येतो. (लांब केस असूनही मॉड). म्हणजे अगदी केस न कापता स्टाईल आणि लूक बदलता येऊ शकतो.

वाढ आहे ना केसांना अजून मग काप हवे तसे. वर्षदीडवर्षात पोचतील परत आहेत त्या उंचीला.
ज्या काळात केसांना चांगली वाढ असते त्या काळात सलग ५-७ वर्ष न कापलेले केस आणि सलग दीडदोन वर्ष न कापलेले केस हे साधारण सारख्याच लांबीला येतात.

माझे केस आता कंबरेपर्यंत आहेत पण मी ५०व्या वाढदिवशी डायना कट करुन घेणार आहे असे आधीच डिक्लेअर केले आहे Proud

बाबु, तुझे केस आहेत का रे अजुन डोक्यावर?? Happy

एक सांगू का? केस धुणे-वाळवणे याला वेळ लागतो मोठ्या केसांना पण रोजची एक वेणी वळणं सोप्पं असतं. कमरेपर्यंत केस असतील तर अगदीच सोप्पं.
छोटे केस म्हणजे बॉयकट केला तरच तो ज्याला मेंटेनंस फ्री म्हणू तसा होतो. केस खांद्याशी रूळते किंवा जस्ट खाली आलेले असले तर सत्रा भानगडी असतात. पटकन चिकट दिसायला लागतात, धड बांधता येत नाहीत, धड मोकळे सोडता येत नाहीत. रोजचे रोज धुणे हे बॉयकटसारखे सोप्पे नसतेच. त्यामुळे वेळाच्या दृष्टीने म्हणायचे तर कमरेपर्यंत सरळ केस ज्याची पटकन वेणी घालता येईल किंवा मग बॉयकट हेच बरे. Happy

गुस्ताखी माफ! येथे बोलू नये पण साहस करत आहे.

लांब केस हा प्रकार दुर्मीळ झालेला आहे इतकेच वाटते. महत्भाग्य समजावे माणसाने, लांब केस असल्यास!

पहिले व शेवटचे पोस्ट! Happy

-'बेफिकीर'!

बागुलबुवा, Biggrin

खरयं, केसांची योग्य ती काळजी घेणं कठीण होत असेल तर थोडे थोडे कमी करुन बघायचे नाही आवडलं तर पुन्हा वाढवायचे हाकानाका घरकी खेती है! (असा विचार करुन मी एकदा एकदम बारीक केस केले होते, आणि तसे चांगले दिसतात असं मित्र (आणि मैत्रीणी) म्हणायचे.)

बॉबकट तसा चांगलाच दिसतो. फक्त लोकांना आपल्या चेहरा वेगळ्या स्टाईलमध्ये आणि विशेषतः लग्न, मुले वगैरे झाल्यावर अचानक बॉबकट मध्ये पाहण्याची सवय नसते त्यामुळे वेगवेगळे कमेंट्स येतात.

मी केस अगदी तीन-चार इंच ते आता दिड-दोन फुट पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे वाढवलेले/राखलेले आहेत. and i enjoyed it. i dont care what others say as long as i am happy with it..... Happy

कापू नका हो अशी पर्सनल विनंती. नीरजाला अनुमोदन. तो बॉय कट विचित्र वाढतो बरंका. कानावरून दोन शिंगांसारखे केस वाढले की पार्लर गाठावेच लागते. मिस्टर आणि मुलाबरोबर दर महिन्याला एक फेरी मस्ट! Proud Light 1 जोक्स अपार्ट, हे सर्व कट मेन्टेन करावे लागतात. स्टेप्स/ फ्लिक्स जास्त वाढल्या की शेप जातो, परत कापाव्या लागतातच. त्यालाही लांब केस असताना जितका वेळ लागायचा तो लागतोच. थोडक्यात, एकदा कापून विषय संपत नाही. छान लांब केस आहेत, देणगी समजून निगा घ्यावी, फार तर मॅनेजेबल होतील असे कापावे, पण एकदमच सफाई नको! इथे आम्ही केस चांगले नाहीत म्हणून हळहळतो, तिथे तुम्ही असलेले कापता! चालायचंच! Happy

थोडक्यात काय की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे! सर्व प्रकारचे सल्ले आलेले आहेत! Biggrin
काय केलंत शेवटी ते लिहा!

आणि हो पस्तिशीनंतर तशीही केसांची वाढ कमी होते नॉर्मली. केसांची जाडी पण कमी होते तेव्हा मग छोटे केस ठेवून मेंटेन बिंटेन करावेत.

तो बॉय कट विचित्र वाढतो बरंका.<< पन्नाशीला पोचेतो दर महिन्याला बॉय कट भसाभसा वाढण्याची भिती नाही. आणि तोवर दर महिन्याला स्टायलिस्ट इत्यादी उद्योग वेळ/ खिसा या दृष्टीने परवडू लागतील ही आशा. नाहीतर क्रू कट आहेच. धार्मिक लोकांना सांगायचं बालाजीला दान केले आणि आपल्या जगात इश्टायल म्हणून मिरवायचं हा का ना का... Wink

अजून १०-१५ वर्षात केस मस्त पूर्ण पांढरे झाले की एकदम नफिसा अली स्टाइल बॉयकट करणारे मी

मी तुझ्या पुढे आहे. केस पांढरे झालेयतच आता फक्त ५० साव्या वाढदिवसाचा इंतजार..... Happy जास्त वाट पाहावी लागणार नाहीये तशी....
मेंदी घालुन घालुन कंटाळा आला आता.

आणि हो पस्तिशीनंतर तशीही केसांची वाढ कमी होते नॉर्मली

नाही गं, माझा अनुभव उलटा आहे. भरी जवानीमे केस वाढावेत म्हणुन काय काय उपाय करुन झाले. तेव्हा मेले वाढत नव्हते आणि आता पांढरे झालेत तर दोन आठवड्यात १ सेमी वाढतात आणि मग तो पांढरा भांग भरुन काढायला परत मेंदी लावावी लागते. जल्ला मेला वैताग. कापुन मस्त प्लॅटिनम ब्युटी म्हणुन मिरवायचा अस्सा मोह होतो.. पण घरचे......

Pages