देशील का?

Submitted by मंदार-जोशी on 15 August, 2011 - 08:36

पावसाचं कौतुक मला नाही फारसं
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
नकळत माझं मन
शोधू लागलंय साम्य त्याच्यात
आणि तुझ्या केसांच्या गंधात

या मातीच्या गंधासारखाच
तुझ्या केसांचा गंधही
जाणीव करुन देतो मला
की रोजच्या रहाटगाडग्यात
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला
बंद करुन ठेवलंय आधीच,
माझ्या हृदयाच्या कुपीत
त्याच्या जोडीला हवाय मला "तो"

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?

deshilka.GIF

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?

वाहवा !!!!

वरील ओळी फार्फारच आवडल्या.

सुंदर.,हळु .........वार कविता.

मस्तच आहे कविता...

अवांतरः
पण हे नाही आवडलं...
देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला

आम्हाला दोन्ही वेगवेगळे गंधच हवेत..उगाच भेसळ नको. Wink

अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे>>> Happy

ही कविता फारच आवडली मंदार!!

@ देवकाका
काका, ते असं आहे खरं तर......

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला बंद करुन ठेवलंय आधीच,

वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?

हे विचार मुक्तछंद कवितात सहजपणे मांडता येतात.
विचार चांगले असले की यमक आणि छंदाशी झटापट करावी
लागत नाही.

मंदार, यामुळे मला मुक्तछंद कविता आवडु लागली आहे.

मंदार छान लिहायला लागलायस.
तुझ्या कॉलेज जीवनातल्या गोड जखमा पुन्हा डोकं वर काढू लागल्यात काय? Happy

पुलेशु!!

अरे व्वा!!
स ह ज आणि म्हणून सुंदर!!

मंदार, त्या श्रीमंतीचा उल्लेख, वापर, खरोखर दमदार...
जियो!! Happy

मंदार,
खुप आवडली !
Happy

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?

छान वाक्य !
हे वाचताना मला ते "स्वप्नात, साजना.... येशील का?" हे गाण्यातलं वाक्य आठवलं...

अरे वा.........छान आहे............
मागणे अगदी मना पासुन आले आहे............

आता कोणी " घेशील का ?" सुध्दा कविता करावी...........

याने आपल्या मनातले सांगीतले .....आता समोर च्या व्यक्तीचे सुध्दा भाव वाचायला आवडेल.... Happy

Pages