सिनेमा आणि संस्कृती: भाग- १ "लग्न"२ continued..

Submitted by शर्मिला फडके on 16 June, 2011 - 01:35

"लग्न"-१ इथे.

हिंदी सिनेमांमधल्या लग्नांचा प्रवास सुरु होतो ’ पहली मुलाकात’ पासून. आता ही टिपिकल मुलाकात सुद्धा कशी तर ’तिला’ पाहून ’त्याने’ प्रेमात पडायचे आणि तिने मात्र दुर्लक्ष करायचे. रागवायचे, अगदी तुसड्यासारखे वागायचे. असं केल्याशिवाय छेडछाडीचा स्कोप कसा मिळणार? क्वचित दोघेही एकमेकांना पाहून डायरेक्ट प्रेमातच पडल्याचीही उदाहरणे आहेत.. आंखो ही आंखो में.. असं म्हणत.
पण थोडक्यात काय तर पहली मुलाकात आवश्यकच.
बागेत, रस्त्यावर, ट्रेनमधे, एअरपोर्टवर, समारंभात, प्रवासात.. हिंदी सिनेमातल्या नायक नायिका जगात कुठही अचानक भेटू शकतात आणि त्यांना आपल्यातल्या जन्म जन्मांतरीच्या रिश्त्याची ओळख पटू शकते. हिंदी सिनेमांमधे पहली मुलाकात ही लग्नापर्यंतच्या प्रवासातली सर्वात महत्वाची आणि आवश्यक पायरी मानली असली तरी बहुतेक वेळा ती खुलवली जाते फ़क्त गाण्यंच्याच माध्यमांतून. पहिल्या भेटीनंतर, परिचय, एकमेकांची ओळख म्हणजे स्वभाव, आवडीनिवडी यांतून परस्परांचा अंदाज घेत, भांडण, गैरसमज, समजुतदारपणा यांचे टप्पे ओलांडत मग परस्परांसोबत लग्नाच्या आणाभाका घेण्यापर्यंतचा प्रवास हा गाण्यांचे थांबे घेत घेत पार पडल्याने फ़ार कमी वेळा यात भावनिक तीव्रता जाणवली.

इंग्रजी सिनेमांमधे मात्र ही गाणी प्रकरण नसल्याने प्रथम भेटीच्या प्रसंगांना खुलवण्यात दिग्दर्शकांची कसोटी लागलेली अनेकदा दिसून आली.

'पी.एस. आय लव्ह यू' नावाच्या एका भावरम्य सिनेमात त्या दोघांचे लग्न होऊन दहा वर्षांचा काळ उलटला असतो. आणि मग तो ट्युमरमुळे मरतो. आजारपणाच्या काळात त्याला जाणवतं की लग्नानंतरच्या दहा वर्षांत ती भावनिक दृष्ट्या आपल्यावर नको इतकी अवलंबून राहिलेली आहे. तिच्या आयुष्याचा फ़ोकसच संपूर्णपणे बदलून गेला आहे. आपण गेल्यानंतर तिला पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आयुष्याची उभारणी करणे किती कठिण जाईल या जाणिवेतून तो अस्वस्थ होतो आणि मग तो तिला पत्र लिहून ठेवतो. आपल्या मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या काही काळात तिला सावरायला मदत करणारी, तिला मार्गदर्शन करणारी, काही निर्णय घ्यायला मदत करणारी ही सारी पत्रं तिला खरंच खूप उपयोगी पडतात.
आणि मग तिला एक पत्र वाचताना कळते की आता हे शेवटचे पत्र.

या पत्रात त्याने ते दोघं दहा वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा भेटले होते त्यावेळचा प्रसंग वर्णन केला असतो. पडद्यावर हा सारा भागच अत्यंत सुरेख खुलवला आहे. आयर्लंडमधे ती हिच हायकिंग करायला आली असताना एकदा रस्ता चुकते आणि त्याला ती रस्त्याच्या मधोमधच अत्यंत गोंधळून जाऊन उभी राहिलेली दिसते.
हिरव्या पिवळ्या गवताच्या कुरणावर एखाद्या रंगीबेरंगी पुष्पगुच्छासारखी ती दिसत असते.
"इतके रंग एकाच व्यक्तिच्या अंगावर मी पहिल्यांदाच पहात होतो," तो मिश्किलपणे पत्रात लिहितो. तिचा निळा पिवळ्या फ़ुलांचा शर्ट, केशरी स्कार्फ़, लाल हॅट, ब्राऊन शूज, पांढरा बेल्ट, जांभळा स्कर्ट. इतके सारे रंग अंगावर ल्यायलेली ती असतेही खूप वेगवेगळ्या तर्‍हेतर्‍हेच्या आवडीनिवडी, छंद, उत्साह मनात जपलेली. उन्मुक्त. तिला रस्ता दाखवत चालत जात असताना त्या दोघांची मैत्री होते. खूप गप्पा करतात ते. ती त्याला कविता म्हणून दाखवते, शब्द विसरत असते मधून मधून पण तरी तिचा उत्साह प्रचंड असतो.

" मला काहीतरी करुन दाखवायचय आयुष्यात. काहीतरी वेगळं." ती त्याला सांगते.
" काय करायचय?" तो कुतुहलाने विचारतो.
"माहीत नाही." प्रामाणिक भाबडेपणाने ती म्हणते," काय ते माहित नाही. पण काहीतरी स्वत:चं. जे फ़क्त मीच करु शकते."

तो पत्रात तिला लिहितो- 'आपल्या त्या पहिल्या भेटीत तुझ्या प्रेमात मी पडलो आहे हे जाणवण्याचा हाच तो क्षण. तु मला आवडलीस. तुझा उत्साह, तुझ्यातली कला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं सगळं आवडलं. आणि तुझा गोंधळही आवडला. तुला नक्की काय करायचय याचा निर्णय घेणं अवघड जातय हे मला समजलं. जोपर्यंत तुला आयुष्यात काय हवय, कुठपर्यंत जायचय हे कळत नाही तोपर्यंत एका दिशा दाखवणार्‍याची गरज तुला नेहमीच भासणार हे मला कळत होतं. तुझ्यावर प्रेम आहे हे उमगलं तेव्हाच मला हेही समजलं होतं. तुला नीट मुक्कामाला पोचवेन हे मी तुला वचन दिलं होतं. आता दहा वर्षांनंतर मला जाणवतय की आपण खूप प्रेमाचा संसार केला असला तरी तुला ती दिशा दाखवायचय अजून राहूनच गेलं. मला ती पहिली भेट आत्ता आठवतेय आणि त्या रस्त्यावरची तु .. जिला काहीतरी स्वत:च करायचं होतं ती मला नीट आठवतेय. पण तु मात्र तिला विसरुन गेलीस.'
पत्र पुरं करताना तो तिला धीर देतो आणि सांगतो, ते माझं वचन आता पुरं होईल. तुला ती दिशा नक्की मिळेल.

लग्न म्हणजे नुसतं एकमेकांवर प्रेम करणं नाही. किंवा खरं तर प्रेमाचा अर्थच मुळी एकमेकांची क्षमता समजून घेत त्याप्रमाणे एकमेकांचं व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न करत जाणे. एकमेकांच्या सोबतीने प्रवास करताना एकमेकांना सतत ओळखत रहाणे. सिनेमामधे पहिल्या भेटीचा प्रसंग पडद्यावर दाखवताना दिग्दर्शकाने किती सुरेख हा अर्थ उलगडून दाखवला!

आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा अकबर' या भव्य, पोषाखी चित्रपटातही तरुण अकबर आणि जोधाने एकमेकांच्या व्यक्तिमत्वांची ओळख करुन घेत, भिन्न संस्कृतींमधून आलेल्या एकमेकांच्या चालीरिती जाणून घेत, समज गैरसमजांवर मात करुन परस्परांच्या ओढीची खात्री पटवत मग प्रेमाच्या कबुलीपर्यंतचा प्रवास आणि तोही लग्न झाल्यावर खूप छान, नजाकतीने खुलवला होता.

भारतीय समाज व्यवस्थेमधे खरं तर एकमेकांना ओळखण्याचा, समजा गैरसमजांच्या कसोटीचा काळ हा लग्नानंतरच सुरु होतो. पण दुर्दैवाने सिनेमांच्या पडद्यावर नेमकी तिथेच 'द एन्ड' ची पाटी येत असल्याने याचे चित्रण दिग्दर्शकांनी अगदी क्वचित केले.. यात बासू भटटाचार्यांचे नाव सर्वात आधी घेणे आवश्यक आहे हे निश्चित. बासूदांनी सत्तरच्या दशकापासून अनुभव, आविष्कार, गृहप्रवेश पासून आस्था पर्यंतच्या सिनेमांमधून पती पत्नी नात्यातले चढ उतार, ताण, अस्थिरता यांचे बर्‍यापैकी वास्तव चित्रण केले.

१९७१ मधे आलेला बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न व्यवहाराचे सांधे जुळून येताना ही लग्नव्यवस्था आपलं पारंपरिक रुप कसं बदलत गेली (किंवा अजिबात बदलत गेली नाही) याचं यथार्थ चित्रण करणारा ठरला.आश्चर्य वाटाव्या इतक्या खरेपणाने लग्नसंबंधांमधली गुंतागुंत यात बासूदांनी दाखवली.

'अनुभव' ब्लॆक ऍन्ड व्हाईट होता. कलात्मक सिनेमांची जी लाट नंतरच्या काळात आली त्यातलाच हा आर्टी सिनेमा म्हणून अनेकांनी तो हेटाळलाही. पण शहरांमधल्या बदलत्या लग्नसंबंधांचे चित्रण थेट वास्तवाने या आधी कोणीच केले नव्हते. त्रुफ़ांच्या चित्रपटांचा प्रभाव आहे असा समीक्षकी दावाही अनेकांनी केला पण यातली सुंदर गाणी, चित्रपटाची हाताळणी, कलात्मकता, पेहेराव आणि मुख्यत: पात्रांचे व्यक्तीचित्रण यांतून हा संपूर्णपणे आधुनिक भारतीय चित्रपटच वाटला हे नक्की.

अमर (संजिव कुमार) आणि मिता (तनुजा) हे मुंबईत रहाणारे लग्नाला सहा वर्ष उलटून गेलेले सुखवस्तू घरातले जोडपे. सहा वर्षांमधेच लग्नाला शिळेपणा आलेला. परस्परांविषयीच्या ओढीला ओहोटी लागलेली. संबंधांमधे तोच तोच पणा डोकावत असलेला.
अमर वर्तमानपत्राचा कायम बिझी संपादक आणि मिता घरात छान छान साड्या नेसून, नीट केस बांधून परफेक्ट पत्नी दिसायचा प्रयत्न करणारी. आपल्या लग्नात नकळत साचलेपणा आलाय, शारीरीक ओढही वाटेनाशी झालीय हे लक्षात आल्यावर मात्र मिता आपल्या दिखावू पत्नीपणाचा बुरखा काढून फ़ेकून देते. घरातल्या सार्‍या कामाचा ताबा घेतलेल्या जुन्या नोकरांना काढून टाकते, स्वत: स्वयंपाक करायला लागते, नवर्‍याकडे वैयक्तिक लक्ष पुरवायला लागते.

वरवर पारंपारिक वाटणार्‍या या दृष्यांमधून सिनेमा चक्क अगदी फ़ेमिनिस्ट वाटावा अशा तर्‍हेने झुकतो. घराचा कंट्रोल घेत असतानाच मिताला स्वत:च्या आयुष्याचा ताबा मिळतो आणि मग नवर्‍याचा आणि संसाराचा. त्याच्या ऑफ़िसात तो बॉस असेल पण घरात संपूर्णपणे तो मिताच्या म्हणण्याला मान देतो, तिच्याबद्दल त्याला आदर वाटायला लागतो. एकत्र जेवण घ्यायला लागताना हळूहळू अमर आणि मिता एकमेकांना नव्याने ओळखायला लागतात.

आणि मग मिताचा जुना कॉलेजातला मित्र अमरचा असिस्टंट म्हणून येतो. मिताचा तो जुना प्रियकर असतो. अमरला हे अर्थातच माहित नसते. मिताला तो अजूनही आवडतो पण आपल्या लग्नाला कोणताही धोका पोचवण्याची तिची तयारी नसते. जुन्या मित्राला ती उगीचच मुद्दाम डाफ़रुन बोलते. अमरला जेव्हा कळतं की मिताचा हा जुना मित्र तेव्हा तो अस्वस्थ होतो. मिता प्रत्येकवेळी अमर जेलस झाला की मनातून खूष होते. वरवर तिने कितीही अस्वस्थ झाल्याचा आव आणला तरी मनातून ती खुष आहे, नवर्‍याच्या जेलसीतून त्याच्या प्रेमाची खात्री पटतेय म्हणून. नवर्‍याला थोडी असुरक्षितता वाटलेली चांगलीच, म्हणजे तो पुन्हा आपल्या प्रेमाला गृहित धरण्याची चूक करणार नाही हे ती उमगून आहे. मिताचा संपूर्ण ताबा आहे आता घरावर, नवर्‍यावर, संसारावर आणि मुख्य म्हणजे स्वत:वर.

बासूदांची फ़िल्म खर्‍या अर्थाने मॉडर्न आणि धीट होती. आधुनिक बदलत्या समाजशैलीतल्या लग्नांचे असे चित्रण अगदी आताच्या काळातही नंतर फ़ारसे कोणी केले नाही. मिताचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध तिच्या नंतरच्या आयुष्यात नवर्‍याला तिने स्वीकारायला लावणे, इतकेच नाही तर आधीच्या प्रियकराशी कोणत्याही दडपणाखाली किंवा चोरटेपणाने न वागता, आता ह्या लग्नात तुला स्थान नाही हे ठामपणे स्पष्ट करणे आणि तरीही तो आवडतो हे न नाकारणे, लग्नात निर्माण होणारे पेचप्रसंग आत्मविश्वासाने सोडवणे, सुखी संसार असेल तरच नातेसंबंध सुखाचे होतात हे ओळखून असणे, आणि संसार सुखाचा होण्यात मोठा वाटा पत्नीचाच असतो याची जाणीव पतीलाही करुन देणे हे बासूदांनी पडद्यावर फ़ार छान दाखवले.

भारतीय संस्कृतीची नाळ बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेत असताना समाज ज्या स्थित्यंतरांमधून जात होता ते सिनेमाच्या पडद्यावर स्पष्टपणे दाखवू शकणारे असे फ़ार थोडे दिग्दर्शक.
बासूदांनी त्यानंतर अजून दोन सिनेमांमधून, आविष्कार आणि गृहप्रवेश, हाच धागा पुढे नेला आणि भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली.

continued...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नाचे 'तीन' भाग आहेत असे खुद्द लेखिकेनेच एका प्रतिसादात म्हटले असल्याने तिन्ही भागांच्या वाचनाचा 'आनंद' पुरेपूर घेतल्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणार आहे.....!

दरम्यान एका आगळ्यावेगळ्या लेखनाची अनुभूती घेत आहे, इतकेच म्हणतो.

शर्मिलाताई, लग्न या विषयावरील वेगवेगळे पैलू दाखवणार्‍या एकेका उत्कृष्ट चित्रपटाचं थोडक्यात कां होईना, पण पी.एस. प्रमाणे परिक्षण केलंत तर हा विषय ३ भागांत आटोपणं हा आमच्यावर अन्याय ठरेल... आणि त्या उत्तम चित्रपटांवरही!!

वा वा मस्तच .. P.S. वरचं खुप आवडलं .. माझा अजूनही बघून झाला नाहीये ..

अनुभव खरंच मस्त होता .. त्यातलं 'मुझे जा ना कहो मेरी जाँ ..' मला खुप आवडतं .. आनि ह्यात जुना प्रियकर म्हणून महेर कोठारी (?) आहे त्यावरून मला नेहेमी 'रजनीगंधा' पण आठवतो .. एका प्रकारे सिमीलरच वाटतात मला दोन्ही ..

पुढच्या लेखात उल्लेख असेल-नाही कळत नाही पण मासूम आणि इजाजत पण मला उल्लेखनीय वाटतात नवरा-बायको नात्यात .. नसीरुद्दीन शहा आणि शबाना मासूम मध्ये आणि परत नसीरुद्दीन शहा आणि रेखा ह्यानीं फार छान कामं केली आहेत ..

तसंच वेगळ्या कॅटेगरीतला चितचोर पण मला खुप आवडला होता ..

आता वाटतंय नुसतंच नवरा-बायको नातेसंबंधावरच्या चित्रपटांवर लिहायचं झालं तर शेकड्यांनीं लिहायला लागेल एव्हढे नुसते हिंदीच चित्रपट लक्षात येतील ..

वा... वा..
दोन्ही भाग वाचले.. मस्त झाले आहेत एकदम.. हा भाग तर खूपच रंगलाय.. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत..
चायना पोस्टनंतर ही पण मालिका छान होणार एकदम !

दोन्ही भाग आवडले.
बासुदांनी त्यांच्या आत्मचरित्रात या सिनेम्यांबद्दल लिहिलेलंही वाचनीय आहे.. अर्थात त्यात प्रक्रियेचा भागच जास्त.

उत्तम लेख. पी. एस. अजून बघितला नाही. धीरच झाला नाही पण आता बघेन. पहिला भाग वाचते आता. बासु दांचे सिनेमे पाहिले आहेत. गृहप्रवेश पण मस्त आहे. या विषयावर खूप लिहीणयासारखे आहे.

माझी फेवरिट रिलेशनशिप, संगम मधील राज वैजू, व राजेश मुमताज, रिलेशन शिप खराब होण्या आधी. सुनो कहा गाणे असलेल्या सिनेमात. घर मधील रेखा- विनोद. बावर्ची मधील लग्ने. ( बायको कपाटातून बिस्किट डबा काढून नवर्‍याला बिस्किटे देते. त्यांचे प्रेम अगदी फील होते. .

शर्मिला, खूपच मस्त लिहित्येय्स.... 'पी.एस. आय लव्ह यू' बद्दल तर फारच छान लिहीलय्स... परत बघायला लागणार. 'अनुभव' पण सुंदरच होता.

रेखा- विनोदचा 'घर', संजीव कपूर - रेहानाचा 'दस्तक' हे पण नवरा-बायको नातेसंबंध दाखवणारे खुप वेगळे चित्रपट. 'ऑंधी' देखिल..

पर्ल पदमसी आणि अशोक कुमार यांचा 'खट्टा मिठा' खरतर कॉमेडी चित्रपट पण यात ती दोघं आपल्या कुटुंबासाठी उतारवयात लग्न करतात ही त्याकाळातल्या (अजुनही कदाचित) चित्रपटांसाठी फारच धाडसी कन्सेप्ट Happy

उत्तम! फक्त तीन भाग खरेच कमी आहेत.
नविन आलेल्या सिनेमापैकी राजपाल यादवचा 'मै, मेरी पत्नी और वो' हाही एक उल्लेखनीय सिनेमा. उंची आणि सौदर्य या मुद्द्यावर आपण बायकोपेक्षा कमी आहोत या न्यूनगंडाने पछाडलेला नवरा, त्याचा रुबाबदार मित्र आणि समजूतदार बायको. सिनेमाच्या शेवटी त्याचा संशय जातो, पण त्यांना जुळं होतं आणि जुळं होण्यामागची आपल्या संस्कृतीने पढवलेली कारणे त्याला नव्या संशयाकडे घेउन जाताना सिनेमा संपतो.

@ अश्विनीमामी....

"( बायको कपाटातून बिस्किट डबा काढून नवर्‍याला बिस्किटे देते. त्यांचे प्रेम अगदी फील होते. ....)

~ सुरेख निरिक्षण. मलाही हा प्रसंग अगदी नैसर्गिक वाटला होता. अशा छोट्या छोट्या तुकड्यांमुळे आपण पडद्यावर एखादा चित्रपट पाहात नसून प्रत्यक्ष आपल्याच घरात उलगडणारे नाट्य पाहात आहोत असा भास होतो.

"बावर्ची' मध्येच ए.के.हंगल बाजार करून आल्यानंतर ती पिशवी पत्नी (दुर्गा खोटे) कडे देतात आणि त्यानी ती घेतल्यावर पुढच्याच मिनिटाला त्याना थांबवून पिशवीतून आपली 'बाटली' काढून घेतात, त्यावेळी दुर्गाबाईंच्या चेहर्‍यावरील भाव टिपण्यासारखे आहेत.

शिवाय बावर्चीने केलेल्या चविष्ठ वांग्याच्या भाजीला मटणाची उपमा देऊन 'आपल्या बायका ज्यावेळी मटण करतात त्यावेळी वांगे खाल्ले असेच वाटते...' असा शेरा मारल्यावर ऊषा किरण यांचा सात्विक संताप पाहण्यासारखाच आहे.

वाहता गप्पांचा धागा झालाय का हा चुकून? आता दुरुस्त कसं करायचं? मी लेखनाचा धागा म्हणूनच सुरु केलं होतं पण.

सशल अगदी बरोबर. नवरा बायकोच्या नातेसंबंधांचं चित्रण हिंदी सिनेमांमधे कसं केलं गेलय यावर अक्षरशः शेकड्यांनी उदाहरणं घेऊन लिहावं लागेल. माझ्या लेखनाचा उद्देश सिनेमा आणि समाज या दोन्हीमधून दिसणारी संस्कृती किती समांतर, किती वास्तव आणि अतिरंजित यांचा वेध घेणं आहे. नातेसंबंधांवर वेगळी मालिका करावी लागेल.

झक्की Biggrin
दबंग अगदी मनापासून पाहिलेला दिसतोय , पण ते पैसे सल्लुच्याच आईचे असतात (कि सलमानचे च?) , मख्खी(ज्याचं लग्न होउ घातलेलं असत तो सावत्र भाऊ ) तो चोरतो , (पण मुली कडच्यांना खर्च नको या उदात्त हेतूने बरका)
चोरी लक्षात येते म्हणून ऐत्या मांडवात सल्लुबा !

दबंग सिनेमातले लग्न यावर मी काही विचार मांडले होते, पण ते या धाग्याच्या मूळ विषयाशी सुसंगत नसावेत. म्हणून येथील लिखाण दुसरीकडे हलवले आहे.

"...भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली. ..."

~ कथालेखक असो वा दिग्दर्शक, त्यांच्या खाजगी आयुष्याच्या त्याना दुखावणार्‍या/सुखावणार्‍या छाया चित्रपट माध्यमातून मांडण्याचे ते स्वातंत्र्य अशासाठी घेतात की, ज्यामुळे त्यांच्या मनातील एक कोपरा सुखावून जातो. बासू भट्टाचार्यही त्याला अपवाद नसणार. शर्मिला फडके यानी वर उल्लेख केलेल्या ट्रिऑलॉजीमध्ये बासुंच्या लग्नापासूनच सुरू झालेली ताणतणावाची मालिका त्यानी त्या त्या कथानकातून प्रकर्षाने मांडलेली दिसत्ये. 'अनुभव' मधील पतीपत्नीचा अबोला, 'आविष्कार' मधील सासर्‍याकडून होणारे जावयाचे मूल्यमापन, तर "गृहप्रवेश' मधील पत्नीच्या उदासिनतेमुळे पतीचे 'बाहेर' जाणारे लक्ष. यावर बासुदांचे विश्लेषणही तितकेच प्रभावी वाटते.

अर्थात ही झाली 'मेल अ‍ॅटिट्यूड'. बासुदांचे काऊंटरपार्ट रिंकी भट्टाचार्य यांचीही काही बाजू असेलच, पण त्यांच्याकडे चित्रपट हे माध्यम नसल्याने त्यांची प्रतिक्रिया अंधारातच राहिली. बासू भट्टाचार्य यानी 'लग्न' संदर्भात निर्मिती केलेल्या या सर्व चित्रपटांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यानी मुख्य कलाकारांची पडद्यावरील नावे बदलली नाहीत. तिन्ही चित्रपटात 'अमर' आणि 'मानसी' राहिले (अनुभव मध्ये 'मीता' होती...पण ते नावही मानसीच्या जवळचे)

इतकेच काय, पण रेखाला घेऊन त्यानी काढलेला (व काहीसा वादग्रस्त ठरलेला) "आस्था" ही याच पठडीतील....फक्त लग्नानंतर नायिका घेत असलेले वेगळे अनुभव, जे संस्कृतीच्या विरोधातील मानले गेले. [यातही 'अमर' आणि 'मानसी' च]

बासु भट्टाचार्य यांचाच....आणि 'लग्न' विषयावरील पाचवा चित्रपट होता "पंचवटी". पण हा मी पाहिला नसल्याने त्यावर भाष्य करू शकत नाही. मला वाटते या चित्रपटाची तशी चर्चाही कुठे झालेली नाही...दिप्ती नवल मुख्य नायिका होती इतकेच.

पंचवटी सुरेख सिनेमा होता. दीप्ती फार मस्त दिसते. पतीकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सुरेश ओबेरॉय
मोठा दीर याकडे आकर्षित होते. अशी काहिशी कथा आहे. गाणी मस्त. दीप्ती बहुतेक नेपाळी स्त्री दाखविली आहे.

चोखेर बाली पण मस्त. ऐश्वर्या राय उगीचच हिरोच्या वैयक्तिक जीवनात व मॅरिड लाइफ मध्ये घुसायचा प्रयत्न करते. त्यातील बायको अवखळ व सुरेख आपली रैमा सेन.

एक जबरदस्त सिनेमा पारोमा. अपर्णा सेनचा. लग्न संबंधात स्त्रीची कशी कुचंबणा होते. पुवडू नवरा, स्वच्छंदी मित्र व सेल्फ सेंटर्ड मुले. राखी शेवटी स्वत्व शोधते. तिच्या नवर्‍याचे वागणे बघून मला फार संताप येत असे.

चुपके चुपके मध्ये पण धर्मेंद्र शम्मू अगदी गोड व रिलेशनशिप मध्ये असलेले वाटतात. भेटायची आतुरता
जीजाजींचे वर्चस्व नाकारू पाहणारा गोड पती. धर्मेंद्रच्या हसण्यातच त्यांचे सुख दिसते. व्हेरी विनिन्ग.

"पारोमा...." ~ जबरदस्त....पण कितीजणांच्या पचनी पडला हेही शोधणे कठीण जाऊ नये. राखीच्या चित्रपट कारकिर्दीचा मागोवा घेतल्यास केवळ हाच एकमेव ठरावा असाच होता. मला वाटते अपर्णा सेनचाही तो पहिलाच प्रयत्न असावा.

"राखी शेवटी स्वत्व शोधते"...असे एक वाक्य आले आहे, पण मला वाटते ती त्या लाईफ मॅगेझिनच्या "ईझी गोईंग नेचर' मुळेच त्याच्याकडे लोहचुंबकाप्रमाणे खेचली जाते. लग्नानंतर एका मोठ्या कुटुंबातील कामात आपले व्यतीत होणारे २४ तास, ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे असे मानणारी परोमा अचानक ' मोकळा श्वास' घेते ते परिवर्तन तिला जादुमयच वाटते...त्याला कारणीभूत परत तोच फोटोग्राफर.

परोमाचा शेवट तर प्रश्नचिन्हांकितच आहे.

(वर रैमा सेनचा उल्लेख आहे. अपर्णा सेनच्याच "दी जपानीज वाईफ" मध्ये दाखविलेली विधवा ही तीच रैमा सेन का?)

"जपानीज वाईफ"....तर राहुल बोस स्पेशल आहे.

परोमाचा शेवट तर प्रश्नचिन्हांकितच आहे.>> तिला पूर्ण सिनेमा भर एका झाडाचे नाव आठवत नसते. बेलाडोना बहुतेक. प्रत्येक वेळी ती ब्लँन्क होते पण शेवटच्या सीन मध्ये तिला ते नाव आठवते. ते तिच्या लग्नापूर्वीच्या लहान पणच्या आयुष्याशी कनेक्टेड असते. हे सर्व लाइफ मॅगेझिन चा फोटोग्राफर तिचे फोटो शूट करून, तिला मुक्त कामजीवनाची ओळख करून निघून जातो. त्याला हिच्यात अडकायचे नसतेच. पण नंतर हिचा संसार कोलॅप्स होतो. फोटोज आल्यावर नवरा तिला वाईट बोलतो पण त्याच वेळी तिला सुखी करायची क्षमता आपल्यात नाही ती दुसर्‍याबरोबर सुखी होते हे नवरा सहन करू शकत नाही. फक्त एका दुसर्‍या माणसाशी अपघाताने संबंध आल्याने व त्यालाही तिने ट्रॅप वगैरे केलेले नाही. साधा आकरषणाचाच प्रकार आहे तरी तो( नवरा) तिला मी एका वेश्ये बरोबर राहू इच्छित नाही असे म्हणतो. त्यांच्या घरात एक पूर्वी काही प्रेमप्रकरण असलेली व त्यासाठी शिक्षा म्हणून वर गच्चीत एका खोलीत कोंडून ठेवलेली एक वेड्सर स्त्री असते
नात्यातलीच. त्या खोलीतच शेवटी राखी जाते बहुतेक. व मग तिला त्याझाडाचे नाव आठवते.
नवा मित्र/ दुसरा पुरूष म्हणजे स्वत्वाचा शोध नाही. त्यातून बाहेर पडल्यावर तो शोध सुरू होतो.

"बेलाडोना..." होय. कथानकात अपर्णा सेननी जाणीवपूर्वक या प्लॅन्टचा उपयोग करून घेतला आहे (आणि तीच त्या कथानकाची समर्पकताही होय...). "पारोमा" ची वैवाहिक जीवनाबद्दल काहीच तक्रार नसते....असायचे कारणही नाहीच. कर्तबगार नवरा, दोन मुले, सासू, जावा, नणंद, दीर, नोकरचाकरानी भरलेले घर....आबादीआबाद...असे असताना ती स्वतःला 'बेलाडोना' म्हणवून घेणे साहजिकच...कारण बेलाडोनाचा अर्थ "रुपसुंदरी". या झाडाच्या पानाचा उपयोग चेहरा सतेज राहण्यासाठी स्त्रिया करतात असा समज आहे....तो फोटोग्राफर हे बेलाडोनाचे मेटॅफर आहे. त्याच्यामुळे पारोमाला आपल्या गालावरील लाली वाढली आणि डोळ्यात चमक परत आली असा आभास होतो....जी ती सुखी संसाराच्या धबडग्यात विसरून गेलेली असते.

पण बेलाडोनाला एक शापही आहे...तो म्हणजे त्याच्या अतिवापराने त्यातील रसाचे विषात रूपांतर होऊ शकते...."पारोमा" लाही त्या फोटोग्राफररुपातील 'बेलाडोना'चेच विष बाधते...अखेरीस. पण असे असले तरी आपल्या हरवलेल्या दिवसाच्या आठवणी हॉस्पिटलच्या त्या रूममध्ये असलेल्या बेलाडोनाच्या प्लॅन्टकडे पाहून ती त्याच्याशी कृतज्ञच राहते.

ती त्याच्याशी कृतज्ञच राहते.>> हे नाही पटले पण सिनेमा सुरेख आहे. परत मिळाला तर बघितला पाहिजे.
सोडून देणार्‍या कॅडिश प्रव्रूत्तीच्या माणसाशी का कृतज्ञ राहावे लागेल. शिवाय भरलेल्या घरातल्या ग्रुहिणीच्या जीवनातही काही लक्युना असतात हे अधोरेखित केले आहे.

Pages