सिनेमा आणि संस्कृती: भाग- १ "लग्न"२ continued..

Submitted by शर्मिला फडके on 16 June, 2011 - 01:35

"लग्न"-१ इथे.

हिंदी सिनेमांमधल्या लग्नांचा प्रवास सुरु होतो ’ पहली मुलाकात’ पासून. आता ही टिपिकल मुलाकात सुद्धा कशी तर ’तिला’ पाहून ’त्याने’ प्रेमात पडायचे आणि तिने मात्र दुर्लक्ष करायचे. रागवायचे, अगदी तुसड्यासारखे वागायचे. असं केल्याशिवाय छेडछाडीचा स्कोप कसा मिळणार? क्वचित दोघेही एकमेकांना पाहून डायरेक्ट प्रेमातच पडल्याचीही उदाहरणे आहेत.. आंखो ही आंखो में.. असं म्हणत.
पण थोडक्यात काय तर पहली मुलाकात आवश्यकच.
बागेत, रस्त्यावर, ट्रेनमधे, एअरपोर्टवर, समारंभात, प्रवासात.. हिंदी सिनेमातल्या नायक नायिका जगात कुठही अचानक भेटू शकतात आणि त्यांना आपल्यातल्या जन्म जन्मांतरीच्या रिश्त्याची ओळख पटू शकते. हिंदी सिनेमांमधे पहली मुलाकात ही लग्नापर्यंतच्या प्रवासातली सर्वात महत्वाची आणि आवश्यक पायरी मानली असली तरी बहुतेक वेळा ती खुलवली जाते फ़क्त गाण्यंच्याच माध्यमांतून. पहिल्या भेटीनंतर, परिचय, एकमेकांची ओळख म्हणजे स्वभाव, आवडीनिवडी यांतून परस्परांचा अंदाज घेत, भांडण, गैरसमज, समजुतदारपणा यांचे टप्पे ओलांडत मग परस्परांसोबत लग्नाच्या आणाभाका घेण्यापर्यंतचा प्रवास हा गाण्यांचे थांबे घेत घेत पार पडल्याने फ़ार कमी वेळा यात भावनिक तीव्रता जाणवली.

इंग्रजी सिनेमांमधे मात्र ही गाणी प्रकरण नसल्याने प्रथम भेटीच्या प्रसंगांना खुलवण्यात दिग्दर्शकांची कसोटी लागलेली अनेकदा दिसून आली.

'पी.एस. आय लव्ह यू' नावाच्या एका भावरम्य सिनेमात त्या दोघांचे लग्न होऊन दहा वर्षांचा काळ उलटला असतो. आणि मग तो ट्युमरमुळे मरतो. आजारपणाच्या काळात त्याला जाणवतं की लग्नानंतरच्या दहा वर्षांत ती भावनिक दृष्ट्या आपल्यावर नको इतकी अवलंबून राहिलेली आहे. तिच्या आयुष्याचा फ़ोकसच संपूर्णपणे बदलून गेला आहे. आपण गेल्यानंतर तिला पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आयुष्याची उभारणी करणे किती कठिण जाईल या जाणिवेतून तो अस्वस्थ होतो आणि मग तो तिला पत्र लिहून ठेवतो. आपल्या मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या काही काळात तिला सावरायला मदत करणारी, तिला मार्गदर्शन करणारी, काही निर्णय घ्यायला मदत करणारी ही सारी पत्रं तिला खरंच खूप उपयोगी पडतात.
आणि मग तिला एक पत्र वाचताना कळते की आता हे शेवटचे पत्र.

या पत्रात त्याने ते दोघं दहा वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा भेटले होते त्यावेळचा प्रसंग वर्णन केला असतो. पडद्यावर हा सारा भागच अत्यंत सुरेख खुलवला आहे. आयर्लंडमधे ती हिच हायकिंग करायला आली असताना एकदा रस्ता चुकते आणि त्याला ती रस्त्याच्या मधोमधच अत्यंत गोंधळून जाऊन उभी राहिलेली दिसते.
हिरव्या पिवळ्या गवताच्या कुरणावर एखाद्या रंगीबेरंगी पुष्पगुच्छासारखी ती दिसत असते.
"इतके रंग एकाच व्यक्तिच्या अंगावर मी पहिल्यांदाच पहात होतो," तो मिश्किलपणे पत्रात लिहितो. तिचा निळा पिवळ्या फ़ुलांचा शर्ट, केशरी स्कार्फ़, लाल हॅट, ब्राऊन शूज, पांढरा बेल्ट, जांभळा स्कर्ट. इतके सारे रंग अंगावर ल्यायलेली ती असतेही खूप वेगवेगळ्या तर्‍हेतर्‍हेच्या आवडीनिवडी, छंद, उत्साह मनात जपलेली. उन्मुक्त. तिला रस्ता दाखवत चालत जात असताना त्या दोघांची मैत्री होते. खूप गप्पा करतात ते. ती त्याला कविता म्हणून दाखवते, शब्द विसरत असते मधून मधून पण तरी तिचा उत्साह प्रचंड असतो.

" मला काहीतरी करुन दाखवायचय आयुष्यात. काहीतरी वेगळं." ती त्याला सांगते.
" काय करायचय?" तो कुतुहलाने विचारतो.
"माहीत नाही." प्रामाणिक भाबडेपणाने ती म्हणते," काय ते माहित नाही. पण काहीतरी स्वत:चं. जे फ़क्त मीच करु शकते."

तो पत्रात तिला लिहितो- 'आपल्या त्या पहिल्या भेटीत तुझ्या प्रेमात मी पडलो आहे हे जाणवण्याचा हाच तो क्षण. तु मला आवडलीस. तुझा उत्साह, तुझ्यातली कला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं सगळं आवडलं. आणि तुझा गोंधळही आवडला. तुला नक्की काय करायचय याचा निर्णय घेणं अवघड जातय हे मला समजलं. जोपर्यंत तुला आयुष्यात काय हवय, कुठपर्यंत जायचय हे कळत नाही तोपर्यंत एका दिशा दाखवणार्‍याची गरज तुला नेहमीच भासणार हे मला कळत होतं. तुझ्यावर प्रेम आहे हे उमगलं तेव्हाच मला हेही समजलं होतं. तुला नीट मुक्कामाला पोचवेन हे मी तुला वचन दिलं होतं. आता दहा वर्षांनंतर मला जाणवतय की आपण खूप प्रेमाचा संसार केला असला तरी तुला ती दिशा दाखवायचय अजून राहूनच गेलं. मला ती पहिली भेट आत्ता आठवतेय आणि त्या रस्त्यावरची तु .. जिला काहीतरी स्वत:च करायचं होतं ती मला नीट आठवतेय. पण तु मात्र तिला विसरुन गेलीस.'
पत्र पुरं करताना तो तिला धीर देतो आणि सांगतो, ते माझं वचन आता पुरं होईल. तुला ती दिशा नक्की मिळेल.

लग्न म्हणजे नुसतं एकमेकांवर प्रेम करणं नाही. किंवा खरं तर प्रेमाचा अर्थच मुळी एकमेकांची क्षमता समजून घेत त्याप्रमाणे एकमेकांचं व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न करत जाणे. एकमेकांच्या सोबतीने प्रवास करताना एकमेकांना सतत ओळखत रहाणे. सिनेमामधे पहिल्या भेटीचा प्रसंग पडद्यावर दाखवताना दिग्दर्शकाने किती सुरेख हा अर्थ उलगडून दाखवला!

आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा अकबर' या भव्य, पोषाखी चित्रपटातही तरुण अकबर आणि जोधाने एकमेकांच्या व्यक्तिमत्वांची ओळख करुन घेत, भिन्न संस्कृतींमधून आलेल्या एकमेकांच्या चालीरिती जाणून घेत, समज गैरसमजांवर मात करुन परस्परांच्या ओढीची खात्री पटवत मग प्रेमाच्या कबुलीपर्यंतचा प्रवास आणि तोही लग्न झाल्यावर खूप छान, नजाकतीने खुलवला होता.

भारतीय समाज व्यवस्थेमधे खरं तर एकमेकांना ओळखण्याचा, समजा गैरसमजांच्या कसोटीचा काळ हा लग्नानंतरच सुरु होतो. पण दुर्दैवाने सिनेमांच्या पडद्यावर नेमकी तिथेच 'द एन्ड' ची पाटी येत असल्याने याचे चित्रण दिग्दर्शकांनी अगदी क्वचित केले.. यात बासू भटटाचार्यांचे नाव सर्वात आधी घेणे आवश्यक आहे हे निश्चित. बासूदांनी सत्तरच्या दशकापासून अनुभव, आविष्कार, गृहप्रवेश पासून आस्था पर्यंतच्या सिनेमांमधून पती पत्नी नात्यातले चढ उतार, ताण, अस्थिरता यांचे बर्‍यापैकी वास्तव चित्रण केले.

१९७१ मधे आलेला बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न व्यवहाराचे सांधे जुळून येताना ही लग्नव्यवस्था आपलं पारंपरिक रुप कसं बदलत गेली (किंवा अजिबात बदलत गेली नाही) याचं यथार्थ चित्रण करणारा ठरला.आश्चर्य वाटाव्या इतक्या खरेपणाने लग्नसंबंधांमधली गुंतागुंत यात बासूदांनी दाखवली.

'अनुभव' ब्लॆक ऍन्ड व्हाईट होता. कलात्मक सिनेमांची जी लाट नंतरच्या काळात आली त्यातलाच हा आर्टी सिनेमा म्हणून अनेकांनी तो हेटाळलाही. पण शहरांमधल्या बदलत्या लग्नसंबंधांचे चित्रण थेट वास्तवाने या आधी कोणीच केले नव्हते. त्रुफ़ांच्या चित्रपटांचा प्रभाव आहे असा समीक्षकी दावाही अनेकांनी केला पण यातली सुंदर गाणी, चित्रपटाची हाताळणी, कलात्मकता, पेहेराव आणि मुख्यत: पात्रांचे व्यक्तीचित्रण यांतून हा संपूर्णपणे आधुनिक भारतीय चित्रपटच वाटला हे नक्की.

अमर (संजिव कुमार) आणि मिता (तनुजा) हे मुंबईत रहाणारे लग्नाला सहा वर्ष उलटून गेलेले सुखवस्तू घरातले जोडपे. सहा वर्षांमधेच लग्नाला शिळेपणा आलेला. परस्परांविषयीच्या ओढीला ओहोटी लागलेली. संबंधांमधे तोच तोच पणा डोकावत असलेला.
अमर वर्तमानपत्राचा कायम बिझी संपादक आणि मिता घरात छान छान साड्या नेसून, नीट केस बांधून परफेक्ट पत्नी दिसायचा प्रयत्न करणारी. आपल्या लग्नात नकळत साचलेपणा आलाय, शारीरीक ओढही वाटेनाशी झालीय हे लक्षात आल्यावर मात्र मिता आपल्या दिखावू पत्नीपणाचा बुरखा काढून फ़ेकून देते. घरातल्या सार्‍या कामाचा ताबा घेतलेल्या जुन्या नोकरांना काढून टाकते, स्वत: स्वयंपाक करायला लागते, नवर्‍याकडे वैयक्तिक लक्ष पुरवायला लागते.

वरवर पारंपारिक वाटणार्‍या या दृष्यांमधून सिनेमा चक्क अगदी फ़ेमिनिस्ट वाटावा अशा तर्‍हेने झुकतो. घराचा कंट्रोल घेत असतानाच मिताला स्वत:च्या आयुष्याचा ताबा मिळतो आणि मग नवर्‍याचा आणि संसाराचा. त्याच्या ऑफ़िसात तो बॉस असेल पण घरात संपूर्णपणे तो मिताच्या म्हणण्याला मान देतो, तिच्याबद्दल त्याला आदर वाटायला लागतो. एकत्र जेवण घ्यायला लागताना हळूहळू अमर आणि मिता एकमेकांना नव्याने ओळखायला लागतात.

आणि मग मिताचा जुना कॉलेजातला मित्र अमरचा असिस्टंट म्हणून येतो. मिताचा तो जुना प्रियकर असतो. अमरला हे अर्थातच माहित नसते. मिताला तो अजूनही आवडतो पण आपल्या लग्नाला कोणताही धोका पोचवण्याची तिची तयारी नसते. जुन्या मित्राला ती उगीचच मुद्दाम डाफ़रुन बोलते. अमरला जेव्हा कळतं की मिताचा हा जुना मित्र तेव्हा तो अस्वस्थ होतो. मिता प्रत्येकवेळी अमर जेलस झाला की मनातून खूष होते. वरवर तिने कितीही अस्वस्थ झाल्याचा आव आणला तरी मनातून ती खुष आहे, नवर्‍याच्या जेलसीतून त्याच्या प्रेमाची खात्री पटतेय म्हणून. नवर्‍याला थोडी असुरक्षितता वाटलेली चांगलीच, म्हणजे तो पुन्हा आपल्या प्रेमाला गृहित धरण्याची चूक करणार नाही हे ती उमगून आहे. मिताचा संपूर्ण ताबा आहे आता घरावर, नवर्‍यावर, संसारावर आणि मुख्य म्हणजे स्वत:वर.

बासूदांची फ़िल्म खर्‍या अर्थाने मॉडर्न आणि धीट होती. आधुनिक बदलत्या समाजशैलीतल्या लग्नांचे असे चित्रण अगदी आताच्या काळातही नंतर फ़ारसे कोणी केले नाही. मिताचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध तिच्या नंतरच्या आयुष्यात नवर्‍याला तिने स्वीकारायला लावणे, इतकेच नाही तर आधीच्या प्रियकराशी कोणत्याही दडपणाखाली किंवा चोरटेपणाने न वागता, आता ह्या लग्नात तुला स्थान नाही हे ठामपणे स्पष्ट करणे आणि तरीही तो आवडतो हे न नाकारणे, लग्नात निर्माण होणारे पेचप्रसंग आत्मविश्वासाने सोडवणे, सुखी संसार असेल तरच नातेसंबंध सुखाचे होतात हे ओळखून असणे, आणि संसार सुखाचा होण्यात मोठा वाटा पत्नीचाच असतो याची जाणीव पतीलाही करुन देणे हे बासूदांनी पडद्यावर फ़ार छान दाखवले.

भारतीय संस्कृतीची नाळ बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेत असताना समाज ज्या स्थित्यंतरांमधून जात होता ते सिनेमाच्या पडद्यावर स्पष्टपणे दाखवू शकणारे असे फ़ार थोडे दिग्दर्शक.
बासूदांनी त्यानंतर अजून दोन सिनेमांमधून, आविष्कार आणि गृहप्रवेश, हाच धागा पुढे नेला आणि भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली.

continued...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. प्रतिक्रियाही. Happy
आगाऊ, 'मै, मेरी पत्नी और वो' बद्दल अनुमोदन. सतत काहीतरी काँप्लेक्स मनात घेऊन संसारात वावरणारा टिपिकल भारतीय नवरा राजपालने छान दाखवला आहे.

मै, मेरी पत्नी और वो' बद्दल अनुमोदन.>> हो रितू पर्णा फार सुरेख दिसते. राजपालची धडपड पण अगदी समजून जाते.

"...सोडून देणार्‍या कॅडिश प्रव्रूत्तीच्या माणसाशी का कृतज्ञ राहावे लागेल. ..."

~ वेल, क्वाएट डिस्प्युटेबल ऑब्जेक्शन.
मुळात राहुल (फोटोग्राफर) तिच्या घरी येतो तो तिला 'सीड्युस' करण्यासाठी आलेला नसतो तर टिपिकल भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या घरातील हालचाली टिपून त्याबाबतचे फोटोफीचर करून ते 'लाईफ' मॅगेझिनमध्ये प्रसिद्ध करणे, यासाठी. सारे आयुष्यच अमेरिकन मोकळ्या संस्कृतीत घालविले असल्याने त्याचे त्या घरातील तितक्याच सहजतेने वावरणे अन्य कुणालाही खटकत नाहीच, पण पारोमालाही तो त्यामुळेच भावतो. त्याच्यासमवेत कलकत्त्यातील विविध ठिकाणी फिरताफिरता, ते फोटोत बंदिस्त करता करता पारोमा त्याच्या दिलखुलास स्वभावात मिसळून जाते. तिथे 'सेक्स' चा प्रश्न ऐरणीवरचा नसून ती क्रमशः येणारी एक अटळता होते.

त्याने परत अमेरिकेला निघून जाणे हे त्याच्या स्वभावाशी मिळतेजुळतेच दिसत्ये. राहता राहिला 'कृतज्ञते'चा भाग, तर निदान कोणत्यातरी निमित्ताने का होईना, राहुलमुळे कधीही विसरले न जाणारे आयुष्यातील काही क्षण टिपता आले हेही तिला भावलेले असते. तिची त्याच्याबाबत कोणतीही तक्रार नाहीच.

पारोमा राहूनच गेलाय माझा बघायचा. पंचवटीही नाही पाहीला. खरं तर हे दोन्ही सिनेमे बघायचे राहीलेत हेच लक्षात नव्हतं. प्रतिक आणि अश्विनी तुमचे खास आभार या सिनेमांचे सविस्तर उल्लेख केल्याबद्दल.

अ‍ॅडमिन लेखनाचा धागा वाहता होण्याला प्रतिबंध केलात त्याबद्दल धन्यवाद.

आम्हाला फिल्म मेकिंग शिकवायला अन्वेषा भट्टाचार्य होती. (बासुदाची मुलगी) एकदा सहज असंच बोलताना बासुदाच्या चित्रपटातील पति पत्नीचे नाते हा विषय निघाला.

त्यावेळेला मॅडम म्हणाल्या की, "एखादा माणसाने बनवलेले चित्रपट हे त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आरसा असू शकत नाही, माझी आई ज्या स्थितीतून गेलिये ते बघितल्यानंतर माझा चित्रपटातील नात्यावरचा विश्वास उडालेला आहे." (हे बोलताना पण त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं.)

** मला बासुदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं तेव्हा माहित नव्हतं. त्यानंतरही कधी जाणून घ्यावंसं वाटलं नाही. **

रिंकी भट्टाचार्यांनी बासूदा आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे. शारिरीक मारहाणीच्या तक्रारीही त्यांनी नोंदवल्या होत्या. बासूदांनी आपल्या 'आविष्कार' मधून त्यांच्या वैवाहिक नातेसंबंधांच्या त्याच फेजचं चित्रीकरण केलं आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून अर्थातच त्याचं बर्‍यापैकी ग्लोरिफाईड व्हर्शन पडद्यावर आलं.

नंदिनी...

अन्वेषा भट्टाचार्य (आता अन्वेषा आर्य) यानी जे मत व्यक्त केले त्या अनुषंगानेच मी या धाग्याच्या पहिल्या पानावर मत व्यक्त केलेच आहे की, जोपर्यंत 'रिंकी भट्टाचार्य' यांचे त्या लग्नाबाबतचे मत आपणास कळत नाही तोपर्यंत काहीसे एकांगीच होत राहील आपले विचार....त्या ट्रीऑलॉजीबाबत.

रिंकी यांचे 'भारतीय विवाह आणि स्त्रीची अवहेलना' या विषयावरील संशोधन हे इंग्रजी मॅगेझिन्सपुरतेच मर्यादित राहिल्याने त्याचा सर्वदूर असा प्रसार झालेला नाही. नवी दिल्लीच्या रॉनी पब्लिकेशन तसेच मधु किश्वर आयोजित काही बैठकीमध्ये मी त्यांचे (रिंकी यांचे) या संदर्भातील विचार ऐकले आहेत, त्यावरून त्या 'लग्न' विषयावरील अनेक कंगोर्‍याच्या अनुभवसंपन्न व्यक्ती आहेत हे चटकन लक्षात येत असे. त्यानी लिहिलेले Behind Closed Doors हे भारतीय कुटुंब व्यवस्थेतील 'पत्नी आणि तिचे स्थान' या विषयावरील ज्वलंत नमुना होऊ शकते, इतकी त्यातील वेदना प्रकर्षाने त्यानी रेखीत केली आहे. त्यावर आधारित त्यानी स्वतःच 'चार दिवारी' नावाची एक डॉक्युमेंटरी तयार करून दूरदर्शनकडे दिली होती (असे त्याच म्हणाल्या...) पण पुढे काय झाले? कुठे आणि का अडकली ती फिल्म...? याचे उत्तर कुणाकडे असणार? खाजगी पातळीवरील फिल्म क्लब्ज आणि सोसायटीज या माध्यमाद्वारे ज्याना ती पाहावयास मिळाली असेल (मी पाहिलेली नाही)...ते त्याविषयी भरभरून बोलतात.

अन्वेषा यांचे 'पडद्यावर दाखविल्या जाणार्‍या नातेसंबंधा' विषयीचे मत नि:संशय चिंतनीय आहे. पण शेवटी चकाकत्या दुनियेतील बाहुल्या पाहण्यासाठीच जर मायबाप प्रेक्षक पैसे मोजणार असेल तर त्या मायावी दुनियतील डोंबारी त्याला भावेल असेच चित्रे दाखविणार ना !!

(आणखी थोडेसे खाजगीच....त्यांचा मुलगा आदित्य भट्टाचार्य यानेही बापाच्याच पावलावर पाऊल टाकून आपले संसारशकट विस्कटले...शशी कपूरची मुलगी संजना बरोबरचा त्याचा विवाहही असाच भरकटत जाऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटात झाले. असो....)

शर्मिला, आवडला हा भाग. तुझ्या ओघवत्या लेखनशैलीमुळे वाचायला मजा येतेय.

प्रतीक, अश्विनीमामी, यांच्या पोस्टीही छान आहेत.

'पारोमा' पाहिला नाहीये, पण त्याबद्दल वाचतांना अमोल पालेकरच्या 'अनाहत'ची आठवण झाली मला. त्याने 'अनकही', 'अनाहत', 'पहेली' इ. सिनेमांतून अतीशय रंजक पद्धतीने अतीशय मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.

@ स्वाती....

~ 'पारोमा' बद्दल वाचताना तुम्हाला 'अनाहत' ची आठवण झाली तीत काहीसे साम्य असले तरी दोन्हीचे प्रवाह भिन्न आहेत. मी दोन्ही चित्रपट पाहिलेले आहेत. पारोमा आणि शीलावती मध्ये फरक आहे तो पहिलीला आपली मर्यादा कितीपर्यंत आहे हे राहुलच्या उत्स्फूर्त अशा सहवासात कळत नाही तर दुसरीला तिचा नवरा मल्ला राजाच तिने दुसर्‍याकडे जावे असा आग्रह धरतो. परोमाचा राहुल तिच्यात गुंतत नाही (किंबहुना तो त्याचा स्वभावच नाही....मात्र म्हणून तो संधीसाधू आहे असेही नाही...अपरिहार्यतेमुळे आलेल्या त्या एकाच प्रसंगानंतर तो देश सोडून निघुनच जातो..) तर दुसरीकडे शीलवती त्या दुसर्‍यात त्याची गरज संपल्यानंतरही गुंतून जाते....

दोन्हीही स्त्रीत्वच्या शोकांतिकाच, पण पहिलीबद्दल जशी करुणा वाटते, तशी दुसरीबद्दल वाटत नाही.

प्रतीक, धन्यवाद.
करुणा मला वाटली. स्त्री म्हणून नाही, माणूस म्हणून.
एखाद्या अत्यंत अद्भुतरम्य आणि दुष्प्राप्य गोष्टीची चव चाखायला मिळणं हे वरदान म्हणावं की शाप इतकी ती नंतरची तगमग जीवघेणी असेल ना?

आत्ता ही पोस्ट लिहिता लिहिताच आऊटसोर्स्ड नावाच्या सिनेमातला 'व्हेकेशन इन गोवा' हा संदर्भही आठवला.

पारोमा मी बघितलेला नाहीये, पारोमाचा कथा वाचून मला Bridges of Madison County आठवला. यातली फ्रॅन्चेस्कापण एका अर्थाने मुलाबाळांत सुखी असलेली गृहिणी दाखवली आहे आणि रॉबर्ट हा नॅशनल जिओग्राफीचा फोटोग्राफर तिच्या गावी फोटोग्राफीसाठी येतो आणि अकल्पित त्यांची भेट होते.

Bridges of Madison County>> मी सिनेमा नाही पाहिलाय. पण पुस्तक सुंदर आहे. अश्विनीने एका दिवाळी अंकात सुरेख लिहिलं होतं ह्या पुस्तकाबद्दल.

@ रूनी आणि सावनी...

शर्मिला फडके यांच्या या लेखामुळे तुम्ही Bridges of Madison County चा केलेला उल्लेख पाहून मन खरेच हर्षभरीत झाले. पन्नाशीच्या आसपास पोहोचलेली आणि संसारमग्न असूनही एकलेपणाच्या झळा सोसणारी एक काऊंटी वुमन आणि दुसरीकडे पन्नाशी उलटून गेलेला आणि केवळ नोकरीनिमित्ताने मॅडिसन रीजनमध्ये आलेला एक गृहस्थ या दोघांची अनोखी आणि भावणारी प्रेमकथा किती हळुवारपणे वॉलरने चितारली आहे हे ती कादंबरी वाचताना लक्षात येते....No wonder it was one of the most talked about and successful novels published in 1992.

या ना त्या कारणाने मी मेरिल स्ट्रीप आणि क्लिंट इस्टवूड अभिनीत तो चित्रपट पाहिलेला नाही (पण आता जरूर पाहीन...); तरीही मेरिलला फ्रॅन्सेस्काच्या भूमिकेबद्दल ऑस्कर नॉमिनेशन मिळाल्याची माहीत असल्याने तिने ती व्यक्तिरेखा किती प्रभावीपणे सादर केली असणार यात शंकेला वाव नाही.

वयातील साम्य सोडल्यास "पारोमा" आणि "फ्रॅन्सेस्का" या दोन्ही व्यक्तिरेखा भिन्न मानल्या पाहिजेत. पारोमा, अपघाताने जीवनात आलेल्या एक उत्साहाचा खळाळता झरा असलेल्या तरूणात आपल्या 'तारुण्यातील पण आता संसाराच्या रामरगाड्यात हरवलेले दिवस' शोधते, तर फ्रॅन्सेस्का आणि रॉबर्ट थेट प्रेमातच पडतात, पागल होतात आणि अपरिहार्यतेमुळे नंतर अलगही होतात. [इथे हेही सांगणे गरजेचे आहे की, वॉलरची गाजलेली कादंबरी १९९२ ची असून अपर्णा सेनचा "पारोमा" १९८४ चा होता.]

वॉलरच्या मनातील किंकेड हा नायक या कादंबरी आणि चित्रपटानंतरही सतत जागृत राहिल्याने त्याने २००२ मध्ये पहिल्या कादंबरीचा उपसंहार म्हणून 'अ थाऊजंड कंट्री रोड्स' हे पुस्तक लिहिले....हेही बरेच प्रसिद्ध झाले. इथे किंकेड परत "त्या" हुरहूर लावणार्‍या आठवणीसाठी मॅडिसन काऊंटीकडे जातो...मूळ घटनेनंतर १६ वर्षांनी....आणि....!

(पण नको...ज्याना "ब्रिजेस...." नंतरच्या कथानकाबद्दल उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी इथे उपसंहाराचे सार सांगणे ठीक नाही.)

"पारोमा" मधील विवाहित स्त्रीचे त्यानंतर काय होते हे अपर्णा सेन यानी गुलदस्त्यातच ठेवले.

Pages