सिनेमा आणि संस्कृती: भाग- १ "लग्न"

Submitted by शर्मिला फडके on 16 June, 2011 - 01:16

सिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.

सिनेमा आणि संस्कृती या दोन गोष्टींचा प्रवास अगदीच हातात हात घालून नाही, पण एकमेकांना समांतर असा नक्कीच चालू असतो. १९१३ साली दादासाहेब फाळक्यांनी पहिला बोलपट प्रदर्शित केला त्यानंतर आज तब्बल ९८ वर्षे लोटली. समाज आणि संस्कृतीमधे या सर्व कालावधीत जी काही स्थित्यंतरे झाली त्याचं प्रतिबिंब नंतरच्या काळात आलेल्या सर्व चित्रपटांमधे अगदी जसंच्या तसं नसेल उतरलं तरी पण निदान रुढी, परंपरा, चालीरिती, रिवाज, फॅशन्स या सार्‍यानचं काळाच्या ओघात बदलत जाणारं रुप चित्रपटांमधून नक्कीच जाणवेल असं उमटत गेलं.

हिंदी सिनेमांमधेही प्रयोग झाले, स्थित्यंतरं झाली, जागतिक सिनेमाच्या तोडीचे दिग्दर्शन, कथा अपवादाने का होईना पडद्यावर दिसल्या, त्या अ‍ॅप्रिशिएटही झाल्या पण मुख्य प्रवाहात बनत रहाणारे सिनेमे आणि ते बघणारे प्रेक्षक कुठेतरी पक्के परंपरावादीच राहिले. स्त्रिया, स्त्री-पुरुष नातेसंबंध, रितीरिवाज, मुले, सणवार, एकत्र कुटुंब पद्धती, खेड्यांमधली जीवनपद्धती, शहरी जीवन, नोकरीधंदा, तरुण पिढी, म्हातारी होत गेलेली पिढी अगदी सगळ्या सगळ्यांवर सिनेमे आले पण त्यांचा मुळ गाभा हा भारतीय समाजजीवनातल्या परंपरांचे गोडवे गाणारा, नात्यांमधल्या घट्ट विणीचे कौतुक करणाराच राहीला.

या सर्व सिनेमांच्या स्टोर्‍या पडद्यावर साकार झाल्या तेव्हा पारंपरिक नाती, रिवाजांचे बोचणारे कंगोरे, टोचणारे कोपरे मोठ्या खुबीने गुळगुळीत केले गेले, चालिरितींना, परंपरांना सोयीनुसार कधी भडक, अवास्तव स्वरुप देऊन तर कधी मवाळ, कुणाच्या धार्मीक, भावनीक संवेदनांना न दुखवेल असं सौम्य करुन सिनेमाच्या पडद्यावर साकार केलं गेलं. तसं केलं की (च) सामान्य प्रेक्षक सुखावतो ह्याची पक्की जाण जणू हे असे सिनेमा बनवणार्‍यांच्या गुणसूत्रांमधे, आणि जुन्या चालिरितींना ग्लोरिफाय करणं म्हणजेच आदर्शवादी भारतीय संस्कृतीची परंपरा पुढे चालवणं अशी जाण ते इथल्या प्रेक्षकांच्या गुणसूत्रांमधे जन्मतःच येत असावी.

साहजिकच मग संस्कृतीचं जे प्रतिबिंब सिनेमांमधे उमटत गेलं ते दिखाऊ, झगमगीत आणि फँटसीचा मुखवटा चढवून. इथल्या काचेच्या चंद्राचं चांदणं कितीही झगमगतं दिसलं तरी राहीलं आभासीच. समाजातल्या काळ्या वास्तवाला उलट एक रुपेरी झिलई चढवण्याची किमया त्यामुळे सहजी शक्य झाली.

या सार्‍याचं अगदी सहजी नजरेसमोर येणारं उदाहरण म्हणजे सिनेमांच्या पडद्यावर आत्तापर्यंत साकार झालेली 'लग्न'. फिल्मी भाषेतच बोलायचं तर 'शादी'.

सिनेमांमधे लग्नाशी संबंधित चित्रपटांची सुरुवातीच्या काळापासून मोठी परंपरा आहे. अगदी आधीचे सामाजिक समस्यांवरचे 'कुंकू' किंवा 'अछुत कन्या' पासून 'वर्‍हडी वाजंत्री' ते 'नवरी मिळे नवर्‍या' ला आणि अलीकडच्या सनई चौघडेसारखे मराठी सिनेमे असोत, बटबटीत पंजाबी लग्न भव्यपणे हिंदी पडद्यावर आणणारे चोप्रा-जोहर असोत किंवा अलीकडच्या काळातले पार्टनर स्वॅपिंगवर आधारीत मल्टिप्लेक्सी मुव्हीज असोत 'लग्न' हीच मुख्य थीम.

हिंदी-मराठीच कशाला? हॉलिवुडच्या सिनेमांमधेही 'वेडिंग' या थीमशी संबंधित चित्रपटांची अक्षरशः भली मोठी यादीच आहे. अगदी १९३५ साली आलेल्या 'द वेडिंग नाईट' पासून २००९ मधल्या 'ब्राईड वॉर्स' पर्यंत. या अशा सिनेमांमधून दिसणार्‍या लग्नांमधे किती तोच तोचपणा आहे, किती वेगळेपणा आहे, दिखाऊगिरी किती आणि वास्तव किती यावर नजर टाकली तर आपोआपच एक मोठा वेगवेगळ्या संस्कृतींचा एकत्रित ओघ त्यातून दिसतोय असं वाटतं.

------------------------------------------

साठ सत्तरच्या दशकातले अगदी मोजके अपवाद वगळता पडद्यावर आलेला प्रत्येक हिंदी सिनेमा कुठेना कुठेतरी लग्नाशीच संबंधित होता. सिनेमातलं सगळं काही शेवटी होणार्‍या लग्नाच्या दिशेनेच चाललेले. त्याचे-तिचे भेटणे, त्यांचे लडाई-झगडे, त्यातूनच मग ती सुप्रसिद्ध मोहोब्बत, प्यार के वादे-इकरार वगैरे. मग लग्न ठरवणे, खानदान की इज्जत, मग अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, हाणामार्‍या, दु:ख, जुदाई मग परत एकत्र येणे आणि या सार्‍या प्रवासानंतर (प्रत्येक टप्प्यावरची प्रसंगांना अनुसरुन गाणी ऐकल्यानंतर अर्थात)एकदाची शेवटी येणारी 'द एन्ड'ची पाटी हिंदी सिनेमाचा प्रेक्षक जेव्हा वाचतो तेव्हा त्याचा अर्थ त्याच्या मनात आपोआप 'तो आणि ती सुखाने नांदू लागले' असाच इंटरप्रिट केला जाईल अशीच रचना त्या अख्ख्या सिनेमाची.

काही सिनेमांमधे लग्न अ‍ॅक्चुअली दाखवली आणि तरीही स्टोरी पुढे सरकत राहीली खरी पण तो प्रवास बहू, सांस्,देवर वगैरे नात्यांच्या खाचखळग्यांमधूनच जाणारा राहीला. थोडाफार दर्दभराच हा प्रवास! त्याचाही प्रेक्षक स्वतंत्र. पण तो असतोच. म्हणून मग हा प्रवास.

काही थोडंफार वास्तवाचे भान असणार्‍याच दिग्दर्शकांनी चक्क वैवाहिक जीवन, त्यातले ताण-तणाव, समज गैरसमज वगैरेही दाखवले. किंवा मोडलेली लग्नंही. ती कां मोडली यावर भाष्य,विश्लेषण मात्र फारशी सखोल नव्हती. नातेसंबंधातली गुंतागुंत, गहराई ही कुठे ना कुठे कळत न कळत म्हणा किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या अशा चित्रपटांमधूनही बहुतांशी शेवटी सुखी होणार्‍या लग्नाशीच संबंधीत राहिली.
भारतीय लग्नसंस्कृतीतला पडद्यावरच्या आणि प्रत्यक्ष आयुष्यातही जाणवण्यासारखा बदल झाला गेल्या काही वर्षांमधे.

१९९४ मधे 'हम आपके है कौन' पडद्यावर झळकला. आणि त्यातल्या निशा आणि प्रेमच्या लग्नाने संपूर्ण भारतातल्या लग्नसंस्कृतीतच आमुलाग्र बदल घडवून आणला. तोपर्यंत 'लग्न' हा एक धार्मिक समारंभ म्हणूनच प्रामुख्याने मानला गेलेला. त्या त्या घरांच्या आर्थिक परिस्थितीनुसार, सामाजिक प्रतिष्ठेनुसार हे लग्नसमारंभ 'दणक्यात', 'साधेसुधे' 'जेवणावळ-पंगती' सोबत कधी कधी 'रिसेप्शन'ही असणारे असे पार पडत होते. पण मग हा सिनेमा आला आणि लग्नसमारंभ बघता बघता एक 'इव्हेन्ट' झाला. त्याना 'शोकेस'चं स्वरुप आलं. डिझायनर साड्या, प्रोफेशनल मेकप, मेहेंदी-संगित, व्हिडिओ शुटिंग, पंचतारांकित बुफे, स्टेज डेकोरेशन्स, थीम, डिजे, बारात, फुलांच्या पायघड्या, पालखी, बिदाई.. एक ना दोन. शोकेसमधल्या सजावटीला अक्षरशः उत येत गेला. 'HaHK' काय कमी होता म्हणून मग त्यानंतर २००१ साली आला मीरा नायरचा 'मान्सून वेडिंग'. मग २००४ ला गुरिन्दर चढ्ढाचा 'ब्राईड अ‍ॅन्ड प्रेज्युडिस' आला.

जोहर-चोप्रा ब्रॅन्ड सिनेमे मधल्या काळात येतच होते. यावेळीच परदेशातल्या 'वेडिंग प्लॅनर्स' मंडळींचा यात शिरकाव झाला. एन आर आय मंडळींच्या हौसेमौजेला 'भारतीय लग्नां'मुळे एक नवे झगमगते परिमाणच लाभले आणि बघता बघता ही भारतीय लग्नं जगभरात 'अ बिग फॅट इन्डियन वेडींग' म्हणून 'ब्रॅन्डेड' झाली. मिलियोनेर वेस्टर्नर्स त्यासाठी जयपूर उदयपूरचे महाल, ताज हेरिटेजचे स्वीट्स महिनोनमहिने बुक करुन या 'एक्झॉटिक इव्हेन्ट्स'चा आनंद लुटायला लागली. त्यासाठी भारतातल्या काही शहरांत खास 'वेडिंग मॉल्स' बांधले गेले. भारतातली ही नवी 'लग्न-संस्कृती इतकी भरभराटीला आली की न्यूयॉर्क टाईम्सने तिची दखल ' अकरा बिलियन यूएस डॉलर्स' इतक्या प्रचंड ताकदीची आणि दरवर्षी २५% वेगाने वाढत जाणारी 'वेडिंग इंडस्ट्री' म्हणून घेतली.

असं म्हणतात एखादी परंपरा पिढ्यानपिढ्या वाहती रहाते तेव्हा एक संस्कृती जन्माला येते. भारतीय 'लग्नसंस्कृती' आहे त्या स्वरुपात विकसित व्हायला अशाच अनेक पिढ्या उलटून गेल्या असणार. आणि मग अशी नेमकी कोणती ताकद या हिन्दी सिनेमांमधे होती / आहे की त्यांमुळे ही संस्कृती एका पिढीपेक्षाही कमी काळात अशी आमुलाग्र बदलून जावी?
सिनेमांचा प्रभाव संस्कृतीवर इतका पडू शकतो? की सिनेमा संस्कृती हीच आपली संस्कृती मानणारी एक नवी पिढीच आता उत्क्रांत झाली आहे?

'फादर ऑफ द ब्राईड' सिनेमामधे 'डिझायनर वेडिंग' हवं असा हट्ट करुन बसलेल्या आपल्या मुलीच्या आणि पत्नीच्या भरमसाठ पैशांची उधळपट्टीने हैराण झालेला वधुपिता (स्टीव्ह मार्टिन) म्हणतो," मला वाटत होतं 'लग्नं' हा एक साधासुधा प्रकार आहे. मुलगा आणि मुलगी भेटतात, प्रेमात पडतात, तो तिच्यासाठी अंगठीची खरेदी करतो, ती स्वत:साठी पोशाख निवडते आणि मग ते दोघे 'आजन्म एकत्र रहाण्याच्या' शपथा घेतात. पण असं समजणं ही माझी चूक होती. त्याला दोघांचं 'लग्न होणं' म्हणत असावेत बहुतेक. 'लग्न-समारंभ' हा एक मला सर्वस्वी अनोळखी प्रकार आहे. अनोळखी आणि महागडा." हे वाक्य म्हणणारा स्टीव्ह मार्टिन पाहिला आणि मजाच वाटली. सिनेमांमुळे 'लग्नसंस्कृती' बदलली म्हणताना अजून एका सिनेमातच त्यावरची टीका ऐकायला मिळावी!

ठरवून केलेली लग्न किंवा अ‍ॅरेन्ज्ड मॅरेजेस हे भारतीय समाजपद्धतीमधले एक महत्वाचे, अगदी युनिक असे अंग. भारतीय लग्नसंस्कृती उभारली गेली आहे तीच मुळी दोन कुटुंबांनी आपल्या मुलामुलींची लग्ने जुळवायची आणि दोन कुटुंबांमधले नातेसंबंध दृढ करायचे याच समजुतीच्या पायावर. अर्थातच मग कुटूंब आणि ज्यांची लग्न होणार असतात ते दोघे यांच्यातला संघर्ष लग्न ठरताना आणि झाल्यावरही होणे अटळ असते.
अर्थातच त्यामुळे पटकथाकारांना पडद्यावर रोमॅन्टिक, नाट्यमय प्रसंग, संवाद, गाणी पेरायला पुरेपुर स्कोपही मिळत असे त्यामुळे प्रेक्षकही खुश. गेल्या पिढीतल्या या नायिका नायकावर कितीही जीव तोडून प्रेम केलं तरी 'शादी मां बाप के मर्जीके बिना' होणार नाही हे मान्य करणार्‍या होत्या. अगदी यश चोप्रांच्या रोमॅन्टिक 'कभी कभी' मधली राखीही अमिताभला त्याच्या शायरीचं स्फुर्तीस्थान आपणच आहोत हे माहित असूनही, त्याच्यावर प्रेम करुनही, आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणे नाकारताना अगदी 'आपल्याला तसा अधिकारच नाही' वगैरे सांगत अमिताभला समजावते. यातूनच मग पुढे वेगळ्या धार्मिक, सांस्कृतीक पार्श्वभुमीवरचे, लग्न ठरताना होणार्याश संघर्षांवरचेही चित्रपट प्रचंड गाजले. उदा. एक दुजे के लिये, बॉम्बे.

नव्या पिढीच्या सिनेमांमधुन या संघर्षाचे अधिकच तीव्र पडसाद उमटणे अपरिहार्य होते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांची पुढची पिढी या संघर्षाला कशी सामोरी जाते, भारतीय लग्नसंस्कृतीचा हा अविभाज्य भाग समजावून घेण्याच्या प्रयत्नात त्यांना येणारे यश-अपयश हेही हिंदी सिनेमांमधे दिसले. नागेश कुकनूरच्या हैद्राबाद ब्ल्यूज हा याअर्थाने पहिला प्रातिनिधीक चित्रपट म्हणायला हरकत नाही. विपुल शहाचा 'नमस्ते लंडन' याच संघर्षावर बेतला होता.

झुंपा लाहिरीच्या कादंबरीवर आधारीत, मिरा नायरच्या 'द नेमसेक' मधून याच संघर्षाचा एक वेगळा पैलू अवचित दिसला. सर्वसाधारणपणे स्वैराचारी, मुक्त, संसार मोडणारी बहू दाखवायची तर ती पाश्चात्य असा एक प्रचलित प्रघात हिंदी सिनेमाने रुढ करुन दिला होता त्याला 'द नेमसेक'मधल्या लग्नातून छेद गेला.
आपल्या परदेशात जन्मलेल्या मुलाचे लग्न तिथेच जन्मलेल्या मुलीसोबत करुन द्यायला लागणार हे नाईलाजाने मान्य केलेल्या तब्बूला त्यातल्या त्यात ती मुलगीही भारतीय, अगदी आपल्यासारखीच सुसंस्कृत बंगाली घरातल्या आईबापांच्या पोटी जन्माला आलेलीच असावी असं वाटतं आणि आपल्या मुलाचे लग्न ती हट्टाने अशा एका मुलीशी लावून देते. पण नंतर ती मुलगी दुसर्‍याच एका मुलावर आधीपासून प्रेम करत असलेली, पण आईवडिलांच्या आग्रहामुळे लग्न करायला मान्यता देणारी निघते. लग्नानंतरही ती आपलं प्रकरण चालूच ठेवते आणि मग नंतर अपरिहार्यपणे त्यांचा घटस्फोट होतो. मुलगा नंतर एका समजुतदार, त्याच्यावर आधीपासून प्रेम करणार्‍या अमेरिकन मुलीशी लग्न करुन खरा सुखी होतो. 'द नेमसेक'मधे परदेशात स्थायिक झालेल्या कुटुंबातील इतर सामाजिक बदलांना यशस्वीपणे तोंड देणार्‍या पण लग्नसंस्कृतीमधले पारंपारिकत्व अट्टाहासाने जपायचा प्रयत्न करणार्‍या भारतीयांची मानसिक ओढाताण छान दिसून आली.

क्रमशः--

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त...

बडजात्यानी जोवर एकत्र कुटुंब पद्धतीवर चित्रपट काढले तेव्हा ते तुफान चालले.

मै प्रेम की दिवानी हू मधे दिग्दर्शकच कन्फ्युज झाल्याने अख्खा चित्रपट गंडलाय.

क्रमशः वाचून आनंद झाला असा दुर्मिळ लेख!!!
हम आपके... इतपतच कथाबीज असलेला पण त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रभावी हॉलीवूडपट म्हणजे 'माय बिग फॅट ग्रीक वेडींग'. रच्याकने, हआहैकौ केवळ मार्केटींगच्या दृष्टीनेही माईलस्टोन आहे. एकाच वेळी हजारो प्रिंट्सने प्रदर्शित झालेला तो पहिला सिनेमा.
मै प्रेम की दिवानी हू मधे दिग्दर्शकच कन्फ्युज झाल्याने अख्खा चित्रपट गंडलाय.>>> हे सुरज बडजात्याने नंतर उघडपणे मान्यही केले. त्याच्या मते श्रीमंत एकत्र कुटूंब, त्यातले नातेसंबंध यातच तो वाढला त्यामुळे या सर्व गोष्टी तो जास्त प्रभावीपणे मांडू शकला. या चौकटीच्या बाहेर जाताच तो गडबडला.

पैसे दो जूते लो

या गीतानंतर मराठमोळ्या लग्नांमध्येही नवर्‍या मुलाचे शूज पळवायला सुरुवात झाली.

लेख आवडला.

भारतातली ही नवी 'लग्न-संस्कृती इतकी भरभराटीला आली की न्यूयॉर्क टाईम्सने तिची दखल ' अकरा बिलियन यूएस डॉलर्स' इतक्या प्रचंड ताकदीची आणि दरवर्षी २५% वेगाने वाढत जाणारी 'वेडिंग इंडस्ट्री' म्हणून घेतली. <<< LOL! हे माहीत नव्हतं.

दुसरा भाग आधी वाचला. खरेच विषयाचा अवाका मोठा आहे. मी तर म्हणेन, हिंदी आणि इंग्रजी असे दोन भाग करावेत.

मस्त. Happy
अजून भाग आलेत का? शोधते.

(मागच्या पुढच्या भागांची लिंक प्रत्येक भागात देता आली तर बरं.)

मस्त .. Happy

नेमसेक मध्ये त्यचं त्या अमेरिकन मुलीशी लग्न होतं की ABCD मुलीशी? आता आठवत नाही, पण मला वाटलं वडील गेल्यावर त्याचं ब्रेक-अप होतं अमेरिकन मुलीबरोबर ..

तसंच बाकीची उदाहरणं बघता नेमसेक चं उदाहरण फार चपखल नाही वाटलं ..

मालिका छान चालुये.. बाकी हम आपके म्हणजे हिंदी सिनेमातला सर्वात ओव्हरहाइप्ड हिट मुव्ही मधे गणला जावा.. चित्रपटाच्या नावा खाली निरनिराळ्या समारंभांची गाणी , अति भयानक कपडे, डोक्यात जाणारी फॅमिली केरॅक्टर्स, काही अति प्रेमळ, अति अल्लड्पणाचा आव आणणार्‍या प्रौढ मुली आणि अतिशय लाजाळु (तरीही समधीला लुक्स देणारी)समधन Proud
तो 'बहु बेगम' नावाचा सिनेमा तर बघून हसू येतं ..कहर होता !
नीट स्टोरी आठवत नाही पण दुल्हन पळून जाते बहुदा आणि लखनवी खान्दन कि इज्जत वाला बाप रिकामीच डोली पाठवतो सासरी आणि तो नवराही झूठी नवाबी शान राखण्यासाठी दुल्हन मिळालीच नाही हे लपवून ठेवतो .. म हा न Biggrin

दीपांजली, त्या डोलीत मीनाकुमारी असते हे लक्षात घे. तिला उचलून आणण्यापेक्षा डोलीवाल्यांनी रिकामी डोली वाहणे पसंद केले असावे Proud

अतिशय लाजाळु (तरीही समधीला लुक्स देणारी)समधन >> Lol हे तर हिंदी सिनेमात आजवर अनएक्स्प्लोअर्डच होतं बहुधा. क्रेडिट द्यायलाच पाहिजे हआहैको ला. Proud

मस्त चाललंय शर्मिला. पुढचंही वाचतो आहे. Happy 'तूम क्या जानो रमेशबाबू, एक चूटकी सिंदूर की कीमत..' हे आजच्या (नव्या पिढीतल्या) ५-७ वर्षांच्या मूलीही अभिनयासकट म्हणून दाखवतात, यातच सारं आलं. स्टफ है, स्टफ!

हम आपके पेक्षा डोक्यात जातो तो विवाह. सलमान माधुरी बघण्यालायक तरी होते, ती अमृता राव "आत्ता यवढी लाजू का मग तेवढी लाजू" करत लाजते. शाहिद कपूर कायमचाच कन्फ्युज आणि चेहर्‍यावर अजूनची "आय अ‍ॅम अ कॉम्लॅन बॉय" चे भाव.

त्यातही बडजात्याचा शहाणपणा असा आहे की, दुल्हन भाजली तर पाहिजे, पण तिच्या चेहर्‍यावर एक डाग पडता कामा नये. चेहरा तसाच सुंदर टवटवीत पाहिजे.

लग्नावरचा असाच ग्रेट सिनेमा म्हणजे, हम दिल दे चुके सनम. च्याय्ला, आपल्याला आता "समीर" नामक व्यक्तीची गरज नाही. आपण या अजय देवगणसारख्या दिसणार्‍या माणसाबरोबर आयुष्य काढू शकतो हे समजल्यावर परत त्या समीरला भेटून "आता मला तुझ्यापेक्षा चांगला माणूस भेटलाय" हे सांगायची काय गरज? आपलं आपण गुजरातला परत यावं. ढाळ ढोकळी, खमण, फाफडा असले बनवत बसावे. नाही, त्या समीरला बोलावून त्याला भला मोठा डायलॉग ऐकवून मग विशाल(?)कडे परत जयचे. तवर तो विशाल तिथे गॅसवर. बायको सोडून गेली आता काय करू? चा भाव चेहर्‍यावर घेऊन. त्याला तरी आधी सांगायचे की "जरी मी त्याला भेटायला जात असले तरी परत तुझ्याचकडे येणार आहे. तवर हॉटेलातून चेक आऊट करू नकोस. कुठल्यातरी नाईटक्लबमधे भटकायला जाऊ नकोस, मी येइस्तोवर जेवण मागवून ठेव." वगैरे वगैरे. Proud (ती परत आल्यावरचे विशालचे एक्क्ष्प्रेशन्स बघितल्यावर त्याला आनंद झालाय दु:ख झालय का आश्चर्य वाटलय त्याची टोटल लागतच नाही)

तरीही, हा शिनुमा थेटरात बसून पंचवीसेक वेळा बघितला. का???? एका डायलॉगसाठी... आठवा, सलमान खान एका ब्रिजवरून धावत येताना काय ओरडत येतो!!!

तरीही, हा शिनुमा थेटरात बसून पंचवीसेक वेळा बघितला. का???>>> तू येडीएस आणि मी पण

पण मी तो ऐशूसाठी बघितला. (तेंव्हा संस्कृती / मुल्य वगैरे काहीही मनात नव्हतं Proud )

तरीही, हा शिनुमा थेटरात बसून पंचवीसेक वेळा बघितला. का???? एका डायलॉगसाठी... आठवा, सलमान खान एका ब्रिजवरून धावत येताना काय ओरडत येतो!!!
<<<< नंदु साठी ना Proud
बाकी हम आपके मधला सलमान (अ‍ॅज ऑलवेज) बघण्या सारखा होताच, पण माधुरी.. ... अ श क्य प्रौढ आणि काकु टाइप्स , त्यात ते कपडे.. !
हम दिल मुळात ' वो सात दिन' वरून घेतलेला ना ?

Pages