रायतं

Submitted by मृण्मयी on 15 August, 2008 - 19:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सिमला मिरच्या -मोठ्या-२ किंवा लहान आकाराच्या-३
२ वाट्या दही
चवीप्रमाणे मीठ
चवीप्रमाणे साखर
तिखट
शेंगदाण्याचा कूट- अर्धी वाटी
तेल-मोहरी-हिंग (मोहरीऐवजी जीरं)
ओला नारळ (असल्यास) वाटून किंवा किसून -पाव वाटी
बारिक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

सिमला मिरचीला तेल लावून, गॅसवर भाजून नंतर झाकून ठेवायचं.
गार झाली की साल काढून बारिक तुकडे करायचे किंवा कुस्करून घ्यायचं.
दही, मीठ, साखर, तिखट आणि शेंगदाण्याचा कूट (नसला तरी चालतं) घालून वरून हिंग मोहरी किंवा हिंग जीर्‍याची फोडणी द्यायची.
वरून चिरलेली कोथिंबीर घालायची.
सि. मि. भाजायची नसेल तर बारिक चिरून, तेलात खमंग परतून घेतली तरी चालते. ओला नारळ घालून आणखी चव येते.
असंच परतून लाल भोपळ्याचं, भेंडीचं (फोडी तळून), वांग्याचं (पातळ कापट्या तळून) आणि उकडलेल्या बटाट्याचं रायतं करता येतं. एकदा वांग्याच्या रायत्यात लोणचं मसाला घालून पण खाल्लंय मैत्रीणीकडे. छान लागलं.

वाढणी/प्रमाण: 
साग्रसंगीत जेवणाबरोबर ४ माणसांना पुरेल. नाहीतर एकट्याला चार दिवस! :)
अधिक टिपा: 

फोडणीत कढीलिंबाची पानं, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि तीळ घालून छान स्वाद येतो.

माहितीचा स्रोत: 
खरंच आठवत नाही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिरची भाजुन घेतली कि लगेच, वर्तमानपत्राच्या तूकड्यात गुन्डाळून ठेवायची. थंडी झाली कि नळाखाली वाहत्या पाण्यात धूवायची, साले पटकत निघतात. हा माझा आवडीचा प्रकार आहे.

माझ्या सा.बा. पडवळाचा तुकडा उरला असेल तर त्याचेही वरील प्रकारे रायतं करतात. न भाजता नुसते कुकरमधे भात वगैरे लावतो तेव्हा ताटली मधे ठेउन उकडून हातान कुस्करून वरील प्रमाणे साहित्य घालून केले तरी छान लागते.

मृण्मयी, दोन शंका:

१> सिमला मिरचीला तेल लावून, गॅसवर भाजून नंतर झाकून ठेवायचं.
-- हे भरताला वांगं भाजतो तसं भाजायचं का? का तेल लावुन मिरच्या कढईत ठेवून भाजायच्या?

२> दही, मीठ, साखर, तिखट आणि शेंगदाण्याचा कूट (नसला तरी चालतं) घालून वरून हिंग मोहरी किंवा हिंग जीर्‍याची फोडणी द्यायची.
-- वरुन फोडणी म्हणजे काय? मी कढईमध्ये तेल गरम करतो, मोहरी-हिंग टाकतो फोडणी साठी.. वरुन फोडणी म्हणजे गरम कढईत आधी दही-मीठ-साखर-तिखट वगैरे टाकुन मग त्याच्यावर तेल-हिंग टाकायचं का?

टण्या,

वांग्यासारखंच भाजायचं देठाला धरून...

सर्वसाधारणपणे भाज्या आपण फोडणीला घालतो, म्हणजे कढईत फोडणी करुन त्यावर भाजी आणि इतर मीठ मसाला घालून शिजवतो. आणि कोशिंबीरींना वरून फोडणी घालतो, म्हणजे आवश्यक पदार्थ एकत्र करून त्यावर फोडणी ओतायची.
म्हणजे ह्या रायत्यामध्ये कुस्करलेली मिरची, दही, मीठ, साखर, तिखट आणि शेंगदाण्याचा कूट सगळं एका भांड्यात आधी नीट एकत्र करायचं आणि वेगळ्या छोट्या कडल्यात किंवा पळीत थोड्या तेलाची फोडणी करायची आणि ती ह्या भांड्यात ओतून रायत्यात मिसळायची.

अशी वरून घालायच्या फोडणीची पळी किंवा छोटं कडलं वेगळं मिळतं.

मन्जु, थान्कु थान्कु.. मला मिरच्या गॅसवर भाजणं शक्य नसल्यानं मी तेलात परतून घेइन. किसलेलं खोबरं मिळालं नुकतच इन्डियन स्टोअर मध्ये त्यामुळे ते पण आहे. शेंगदाणे पण आहेत. लाटण्यान त्याचं कूट करतो. पहिल्यांदाच एखाद्या पाककृतीला लागणारं सर्व साहित्य माझ्याकडे उपलब्ध आहे. Happy

>>>>
वाढणी/प्रमाण:
साग्रसंगीत जेवणाबरोबर ४ माणसांना पुरेल. नाहीतर एकट्याला चार दिवस! Happy
>>>>

Lol ३ लहान सिमला मिरच्या म्हणजे एकट्याला ४ दिवस???? मृण्मयी हा तर एका जेवणाचा एकट्याचा आहार झाला. Happy

टण्या, मंजु सांगतेय तसं करायचं! Happy
तोंडीलावणं म्हणून लोणचं चटणीसारखं खाल्लं तर पुरेल. नुस्तंच वाटीत घेऊन खाल्लं तर लागलीच संपवशील. Happy
ह्यात प्रमाण वगैरे खरं तर फार नाही पाळायचं. भरपूर दही आणि १ मिरची किंवा चार मिरच्या अन वाटीभर दही! कसंही चालतं! तिखटामीठाचा अंदाज बरोबर असला की झालं!
गुड्लक टण्या!
(असतील तर 'वाळवणातल्या-भरलेल्या-भारतीय दुकानात मिळणार्‍या-मिरच्या' तळ (फोडणीच्याच तेलात.) आणि गार झाल्या की कुस्करून रायत्यात घाल. मSSस्त चव!

मी काल केले होते हे. मस्त लागते. थँक्स गं मृणमयी.

कालचं माझ्या कोंकणी कलीगने कारल्याच रायतं आणलं होत. वाटलं होत ती भाजी किंवा चटणी असेल. पण तिने खोबरे आणि कारल्याची बारीक तुकडे एकत्र करून रायतं बनवलं होत. त्यात तिने धने रगडून टाकले होते.

मृण्मयी, परवा केले होते मिरच्यांचे असे भरित. मस्तं झालं होतं. मला अश्या मिरच्या भाजुन, पण 'रेड बेल पेपर' वापरुन स्पॅनिश सलाड माहिती होतं. पण हिरव्या भाजुन काही माहित नव्हतं. खरं म्हणजे मला त्या मोठ्या शिमला मिरच्यांची भाजी कशीही केली तरी आवडत नाही. उग्रच लागतात मला त्या. ज्या लहान ढोबळ्या / ढब्बु मिरच्या मिळायच्या पूर्वी, त्यांची पीठ पेरुन किंवा भरुन दोन्ही भाज्या मला आवडायच्या. पण आता त्या दिसतच नाहीत. नाशिकला दिसायच्या कधी कधी. पण ह्या मोठ्या शिमला मिरच्या वापरुन छान रेसिपी मिळाली आता.

>>>'रेड बेल पेपर' वापरुन स्पॅनिश सलाड
इंटरेस्टिंग वाटतंय. कसं करतात?

सिमला मिरचीच रायत करुन बघेन.

कुकर मधे वाफवलेल्या लाल भोपळा / तोंडली / बटाटा / शिजवलेला पालक ह्यांच पण रायत मस्तच लागत

मृण्मयी, तसं काही अवघड नाही आणि खुप ग्रेट वगैरे नाही पण ठिक लागतं, पण स्पॅनिश लोकांना 'वॅअव' वाटते. माझ्या द्रुष्टीने तो स्पेनच्या रेस्टॉरंट मध्ये मिळणार्‍या फक्त ३-४ शाकाहारी पदार्थांपैकी एक आहे, इतकचं.

एनसालादा दे पिमीएन्तो रोखो:
साहित्यः लाल शिमला मिरच्या, टोमॅटो, कांदे, लसूण, एक्स्ट्रा वर्जिन ओलिव्ह तेल, मीठ, साखर, व्हिनीगर, जिरे पावडर (आवडल्यास)
प्रमाण : किती मिरच्या किती टोमॅटो पेक्षा क्वांटिटी ने देते. - (म्हणजे चिरलेली ¡quantity¡) मिरचीच्या निम्मे टोमॅटो, टोमॅटोच्या निम्मा कांदा, कांद्याच्या निम्मा लसूण.
कृती : लाल शिमला मिरच्या तेल लावून, गॅसवर भाजून नंतर झाकून ठेवायच्या. गार झाल्या की साल काढून बोटा इतक्या लांब आणि रूंद (उभ्या) चिरायच्या. टोमॅटो, कांदे ही मोठे उभे चिरुन घ्यायचे. लसूण थोडा ठेचल्या सारखा करुन घ्यायचा, पेस्ट नाही.
गॅस वर पातेल्यात दोन चमचे तेल घालुन चिरलेले टोमॅटो घालायचे. चवी प्रमाणे मीठ व साखर घालायची. ५ मिनीट परतून पाणी जरा आटलं की लसूण घालायचा. परत २ मिनीट परतून गॅस बंद करायचा. लसूण खुप परतु नये, ¡just¡ तेलाला त्याचा ऍरोमा लागला पाहिजे.
नंतर एका बोउल मध्ये भाजलेल्या मिरच्या, परतलेले टोमॅटो, कच्चे कांदे, एकत्र करुन वरतुन पुन्हा एक्स्ट्रा वर्जिन ओलिव्ह तेल, व्हिनीगर, मीठ, जिरे पावडर चवीप्रमाणे घालायचे. मिरच्या आणि टोमॅटोचे सुटलेले पाणी त्यातच राहु द्यायचे. ते आंबट गोड पाणी, तेल मिश्रण स्पॅनिश ब्रेडशी छान लागतं, तसे खातात ती लोकं, ते मात्र मला आवडतं. ओलिव्ह तेल मात्र छान चवीचे असणे गरजेचे आहे. सर्व्ह करताना लसूणीचे तुकडे वेचुन घ्यावे. आवडत असतील तर ठेवता येतील.

मस्त वाट्त्ये रेसिपी............करुन बघते......धन्यवाद सनश...म्रिन्मयी

सानाश बरेच दिवसांनी...येत रहा अधूनमधून.

हो गं भाग्या, जवळ जवळ २ वर्षांनी आले मी मायबोलीवर. कारण २ वर्षांपूर्वी आम्ही भारतात कायमचे परत आलो, इथे नोकरी धरली, मग वेळंच मिळायचा नाही, आता मात्र पुन्हा येत जाईन ¡regularly¡.

मृ. तुझ्या पद्धतीने रायतं केले होतं, एकदम मस्त झाले होते.

परवा केलं होतं रायतं.... मस्त झाले. आता भेंडीचे पण करुन बघेन

असं रायतं मी मोड आलेल्या मुगाचं केलं होतं. छान झालं.