अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चातका, तू टाकलेला किस्सा मी आता वाचतोय..... सगळच अमानवीय मित्रा........

आणि मला खात्री आहे की तो किस्सा फक्त आणि फक्त मलाच दिसतोय Wink कदाचित हेही अमानवीयच म्हणायला हवं Proud

तू टाकलेला किस्सा मी आता वाचतोय..... सगळच अमानवीय मित्रा........>> मग मंद्यालाही दिसायला हवा होता ना.. Uhoh

केनेथ अँडरसन सगळ्यांना त्याच्या शिकारकथांबद्दल माहीती आहे. पण त्याने एका पुस्तकात एक आख्खे प्रकरण त्याला आलेल्या अमानविय अनुभवांवर लिहीले आहे. त्याचे तपशीलवार आणि चित्रमय वर्णन आणि ते अनुभव सॉलीड रोमांचक आहेत. इथे अनुवाद टाकण्याची परवानगी असेल तर काही निवडक प्रसंग टाकावे म्हणतो

चॅंप, निवडक प्रसंगाना निदान माझी तरी काही हरकत नाहीय. येउ देत.

सर्व प्रकारचे अनुभव समजायला हवे.

हू हू ..... दातखळी बसलीय हे वाचुन. भीती + अंधार + थंडी हे combination भुतांना पुरक असते
तसे science सुध्दा जग कीती समजु शकलेय भूत नाही म्हणायला?

मला फक्त "अमानवीय" वाचुनच दोन-तीन दिवस (रात्र) झोप लागली नाही.मला रात्री तो म्हातारा आणी ती मळवट भरलेली बाईसारखे दिसत होते. मला जर खरोखरचं भुत दिसलं ना तर माझी हालत सुध्दा त्या रिक्शावाल्यासारखी होईल.(डायरेक्ट वरची तिकिट)

एक जुना अनुभव... साधारण १९९५ मधला !
आता त्याबद्दल लिहीताना एवढे काही भितीदायक वगैरे वाटत नाही. त्यावेळी मात्र वाईट हालत झाली होती. आमचा सेल्सचा जॉब, त्यामुळे फिरती नोकरी. एकदा असेच नांदेडला गेलो होतो. मुळात पगार फारसा नव्हता आणि कंपनीही छोटीच होती. त्यामुळे राहण्यासाठी एखादे छोटेसे लॉजच शोधावे लागायचे. तेव्हा देखील मी नांदेड बसस्टँडच्या जवळचेच एक छोटेसे लॉज शोधले होते. सगळ्यात वर टेरेसवर दोन छोट्या खोल्या होत्या, त्यापैकी एक मी घेतली होती. भाडे रुपये ६०/- फक्त.
रुममध्ये फक्त दाराच्या उजव्या बाजुला असलेला एक लाकडी पलंग आणि डाव्या बाजुला एक टेबल खुर्ची. एक पाण्याचा डेरा आणि भिंतीतलेच एक फडताळवजा कपाट. मी माझी बॅग टेबलावर ठेवून पलंगावर ताणुन दिली. दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो तेव्हा पलंग (ज्यावर मी झोपलो होतो तो) दाराच्या डाव्या बाजुला होता आणि टेबल-खुर्ची उजव्या बाजुला.
आपल्यालाच काही तर भास झाला असेल रात्री. चुकुन आपण पलंग उजव्या तर टेबल खुर्ची डाव्या बाजुला आहे असे समजलो असु अशी मी स्वत:ची समजुन घातली. (कारण रात्री ११च्या दरम्यान पोचलो होतो मी, खुप दमलो होतो)
त्या दिवशी दिवसभर काम करुन परत आलो. नीट बघीतले टेबल खुर्ची दाराच्या उजव्या बाजुला आणि डाव्या बाजुला लाकडी पलंग. मी थकलेला असल्याने शांतपणे झोपुन गेलो लगेच. सकाळी उठलो तेव्हा परत जागा बदललेल्या होत्या. पलंग उजव्या बाजुल तर टेबल-खुर्ची डाव्या बाजुला !

नंतर त्या लॉज मालकाला विचारले तर त्याने हसण्यावारी उडवुन लावले, म्हणाला साहेब तुम्हाला जास्त झाली असेल काल रात्री. (मी आयुष्यात पहिल्यांदा ड्रिंक घेतलं ते १९९७ च्या जुन महीन्यात!)

>>इथे अनुवाद टाकण्याची परवानगी असेल तर काही निवडक प्रसंग टाकावे म्हणतो

मला तरी असं वाटतं की ह्यासाठी दुसरा बीबी उघडला तर बरं होईल. कारण जरी तुम्ही 'हे अनुवादित आहे' अशी नोंद टाकून हे अनुभव दिलेत तरी ज्या लोकांना मूळचं पुस्तक वाचायची इच्छा आहे ते तुमची मूळ पोस्ट वाचणार नाहीत पण त्यावर आलेले प्रतिसाद त्यांना कसे टाळता येतील? त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्यासाठी दुसरा बीबी उघडावा.

विशाल, बापरे! वर्षाने विचारलेला प्रश्न मलाही पडलाय.

स्वप्ना...अगदी मान्य...
नुसतेच भयकथा लिहीण्यापेक्षा जीम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन यांच्या लिखाणाबद्दल मला काय वाटले, दोघांच्या लिखाणात काय फरक होता आदी गोष्टींबद्दल लिहावे असे वाटते आहे. तुला काय वाटते

विशाल्या, अरे रात्रीचं कोणीतरी "टाईम प्लीज" असं हाताला थूक लावून म्हणालं असणार.... Proud
ते पलंग आणि टेबल शिफ्ट करताना... तुला अति थकल्याने कळलं नाही बहुतेक.
शिवाय, तू झोपलेलास पलंगावर.... सकाळी उठल्यावर टेबलवर नव्हतास हे काय कमी आहे???? ते खोडकर भूत असणार..... तुला त्रास द्यायचा नसणार त्याला. Wink

आशु, मीही तुला पावा तेच म्हणणार होतो की..... त्याच्या कथा वेगळ्या छाप, हवेतर इथे लिंक दे त्याची.

कारण इथे स्वानुभव कथन आहे, तिथे इतरांचे अनुभव.

विशाल त्या खोलीला समोरासमोर दोन दारं होती का? तसं असेल तर या गोष्टीला स्पष्टीकरण आहे.

एक उत्सुकता. झोपताना दाराकडे डोकं असायचं की पाय? आणि उठल्यावर?

६४२-४६३४४ (तुम्ही पूर्वाश्रमीचे आशुचॅम्प काय?), नेकी और पूछ पूछ? नक्कीच टाका एक मस्त लेख. तो वाचून माझ्यासारखे ह्या दोघांचं लिखाण न वाचलेले कोणी असले(च) तर त्यांना खूप उपयोग होईल. Happy इथे लिंक द्या त्या लिखाणाची म्हणजे कोणाचं मिसणार नाही.

नुसतेच भयकथा लिहीण्यापेक्षा जीम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन यांच्या लिखाणाबद्दल मला काय वाटले, दोघांच्या लिखाणात काय फरक होता आदी गोष्टींबद्दल लिहावे असे वाटते आहे. >>>

ठीक आहे चँप्....पण लक्षात घे दुसरा असल्या प्रकारचा कोणताही धागा काढल्यास, या धाग्यातली आत्ता पर्यंत ची जी "लय" आहे ती तुटेल आणि सर्वच इंटरेस्ट निघुन जाइल. (कुणी कितीही नाही म्हटलं तरी) सर्व विस्कळीतपणामुळे प्रतिसाद वाटले जातील. आणि 'या' धाग्याचा 'मुळ रोमांच' नाहीसा होईल.

"उठल्यासुट्ल्या तु आता हे असले धागे काढु लागला" हे लोकांना बोलण्यास कारण मिळेल.

माझ्या मते तु फक्त निवडक प्रसंग इथे टाकायला हरकत नाहीय. कुणाला आवडले नाही अवडले सर्व प्रकारचे प्रतिसाद इथेच राहतिल या पानावर. आणि या पानाची परंपरा अखंडराहील. २००० प्रतिसादा पर्यंत. त्यात तिच उत्सुकता असेल जी सुरुवातीला होती आणि आत्ताही आहे.

बाकी तुझी मर्जि मित्रा.

मामी, एकच दरवाजा होता खोलीला. अवघी ८X१० ची खोली असेल. बाकी माझी झोपण्याची अवस्था आहे तशीच होती. Wink
वर्षूतै, स्वप्ना मी तिसर्‍या दिवशी सकाळीच ते हॉटेल सोडले आणि नांदेडही. पुढचे डेस्टीनेशन बीड होते. Happy

आणखी एक असाच अनुभव. पण माझा नाही तर माझ्या आज्जीने सांगीतलेला, ती आण्णांच्या वेळी (माझे वडील) गरोदर असतानाचा....

माझे पणजोबा श्री. गणेश भगवंत कुलकर्णी, हे घोटी (आमचे गाव) आणि आजुबाजुच्या चार गावचे कुलकर्णी होते. साहजिकच सारा गोळा करण्याचे काम त्यांच्याकडे असे. ते नेहमी आजुबाजुच्या गावातून घोड्यावरुन चक्कर मारत. (सारा वर्षातून एकदाच गोळा केला जाई) त्यावेळी एस.टी. किंवा इतर कुठली वाहने पोहोचली नव्हती त्या भागात. (कदाचित नसतीलच अजुन. ) पणजोबा त्यावेळी घोड्यावरूनच फिरायचे. एकदा आप्पा (पणजोबा) असेच रात्री तीन-साडे तीनच्या दरम्यान घरी आले. वेळ नेहमीचीच असल्याने पणजी जागीच असायची. त्यावेळी नेमकी आज्जीपण कशासाठी तरी उठली होती. आप्पांनी घोड्याच्या पाठीवर टांगलेल्या पिशवीतून दोन मोठ्या अगदी दोन-दोन फुटी समया बाहेर काढल्या आणि पणजीकडे दिल्या. "नीट ठेव जपून, अस्सल सोन्याच्या आहेत."
पणजीला शंका आली म्हणुन तिने विचारलं "कुठून आणल्या आहेत?"
तसे आप्पा हसुन म्हणाले," अगं दुधाळ्याच्या माळावर जत्रा भरली होती. तिथं घेतल्या विकत?"
तशी पणजीने दोन्ही समया घराबाहेर फेकुन दिल्या. "माझी सुन गर्वारशी आहे, असलं विष नको घरात."
"अगं अस्सल सोन्याच्या आहेत त्या." म्हणून आप्पांनी पुन्हा उचलल्या आणि एका बारदानात (पोते) गुंडाळून दिंडीदरवाज्यापाशी असलेल्या एका कोनाड्यात ठेवुन दिल्या. सकाळी बघता येइल काय करायचे ते असा विचार करुन.
सकाळी उठल्या-उठल्या गावच्या वडराला बोलवणे पाठवले. (ही वडर मंडळी चोर्‍या-मार्‍या करत, असला माल विकतही घेत) त्याला आप्पांनी सांगितले "तिथे कोनाड्यात माल आहे" बघ काय देतोस ते?
वडराने बारदान बाहेर काढलं आणि आतल्या वस्तु बाहेर काढल्या. त्यात दोन लांबलचक हाडे होती.
आज्जी शपथेवर सांगायची की रात्री तीने समया पाहील्या होत्या.
खरे खोटे देव जाणे. पण ही दंतकथा आमच्या घरातल्या प्रत्येक पोरासोराने एकदा का होइना ऐकली आहे. Happy

माझा नवरा एम बी ए ला असताना त्याचं कॉलेज आणि होस्टेल एका डोंगरावर होतं . तो एरिआ भरपुर मोठा होता पण गावापासुन बराच लांब होता. त्यांच्या होस्टेल मधली एक रुम कॉलेजने कधीच कोणालाच रहायला दिली नव्हती .त्या लॉबीमधे फिरताना पण प्रचंड प्रेशर यायचं या मुलांना. रात्री नेहमीच चित्र विचित्र आवाज यायचे. विशेषतः लहान मुलांच्या रड्ण्याचे. तिथे तर कुठलीच वस्ती नव्हती . त्या परिसरात फक्त एम बी ए आणि फार्मसी ची कॉलेज होती आणि दरवर्षी एका स्ट्रीमचा मुलगा मृत्यु पावायचा. हे तिथे वर्षानुवर्ष चाललय..

बाप रे! Sad

हा माझ्या आजोबांच्या काळातला किस्सा आहे. एका माणसाने तीन लग्न केली होती . पहिल्या दोन बायका मेल्या होत्या. पण दुसर्‍या बायकोच्या वडिलांनी त्यांच्या लग्नात या माणसाला त्यांचा एक वाडा गिफ्ट दिला होता. त्या वाड्यात एक छोटा बोळ होता तिथुन जाताना नेहमीच सगळ्यांना भिती वाटायची. त्याचं तिसरं लग्न झाल्यावर त्या बाईला त्या बोळात म्हणे ही दुसरी बायको दिसायची आणि म्हणायची माझ्या बापाचं घर आहे. तुम्ही कोण राहणारे?

विशाल, २ प्रश्न आहेतः

१. तुमच्या आप्पांनी रात्री त्या समया "दिंडीदरवाज्यापाशी असलेल्या एका कोनाड्यात" ठेवून दिल्या होत्या. रात्री त्या समया कोणी काढून घेण्याची शक्यता होती काय? म्हणजे कोणी नोकर-चाकर वगैरे?
२. दुधाळ्याच्या माळावरच्या जत्रेतून त्या समया आणल्या होत्या. तिथे जाऊन आप्पांनी चौकशी केली नाही का?

आता इतक्या वर्षांनंतर ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणं शक्य नाही तरी कुतूहलापोटी विचारलं.

आता माझ्यासोबत घडलेला एक किस्सा सांगते. अमानवी नाही म्हणता येणार, कदाचित ह्याचं काही शास्त्रीय स्पष्टीकरणही असू शकेल.

मी प्रोजेक्टनिमित्त परदेशात होते. मी आणि एक कलीग एका २ बेडरूम अपार्टमेन्टमध्ये रहात होतो. एके दिवशी ती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर गेल्यामुळे रात्री उशीरा येणार होती. मी साधारण १२ वाजेपर्यंत लिव्हिंग रूममध्ये टीव्ही पाहिला. आणि मग आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपले. रात्री कधीतरी मोठ्या आवाजाने जाग आली. टीव्हीचा मोठा आवाज होता तो. मी तिरमिरीत उठले. कलीगनेच परत आल्यावर टीव्ही लावला असणार म्हणून लिव्हिंग रूममध्ये गेले तर तिथे कोणी नव्हतं, नुस्ताच मोठ्याने टीव्ही चालू होता. मी टीव्ही बंद केला. ही टीव्ही लावून आपल्या खोलीत गेली की काय म्हणून तिच्या खोलीकडे गेले पण दरवाजा बंद होता, ढकलून आत गेले तर बाईसाहेब ढाराढूर झोपलेल्या. मी अर्धवट झोपेत होते त्यामुळे आपल्या रूममध्ये जाऊन मी दरवाजा लावून घेतला. बिछान्यावर पडल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की टीव्ही तिने लावला नव्हता तर मग कोणी लावला?

मी काही मित्रमैत्रिणींना हे सांगितलं तेव्हा त्यांनी केबल कंपनी काही अ‍ॅडजस्टमेन्ट करत असेल वगैरे सांगितलं. केबल कंपनी असा आपला टीव्ही चालू करू शकते, ते पण रिमोटली? बरं रिमोट बिघडला आहे म्हणावं तर त्याआधी किंवा नंतरही असा त्रास कधी झाला नाही. खरं तर त्या घरात हा एक प्रसंग सोडला तर कधीच काही जाणवलं नाही.

काही टिव्हीमध्ये अलार्म सिस्टीम असते. तशी काही सोय होती का त्या मॉडेलमध्ये, स्वप्ना?

आमच्या जुन्या (नऊ वर्षांपूर्वी घेतलेल्या) टिव्हीत अशी सोय होती.

टीव्ही रिफर्बिश्ड होता का? कारण आमच सध्याचा जो जीपीएस आहे तो रिफर्बिश्ड आहे. रात्रीतुन कधीही चालु होतो मधनच, पुर्ण स्वीच ऑफ केलेला असला तरी. आणि म्हणतो "यु हॅव्ह रीच्ड युवर डेस्टीनेशन" आणि आपोआप बंद होतो. अस महिन्यात कमीत कमी २दा होतंच.

स्वप्ना... दुधाळ्याची जत्रा हा प्रकार तुला माहीत असण्याची शक्यताच नाही त्यामुळे हे प्रश्न साहजिकच आहेत. रात्री दिड दोन वाजता कुठली जत्रा भरणार? आमच्या गावात दुधाळ्याचा माळ हा देवचारासाठी कुख्यात आहे. दर अमावस्येला रात्री बाराच्या नंतर तिथे जाळ दिसतो म्हणे. गावातल्या लोकांच्या मते तिथे वेताळाची जत्रा भरते Happy
अनेक दंतकथांपैकी ही एक. Happy
आणि हा काळ साधारण माझ्या वडीलांच्या जन्माच्या वेळचा आहे. म्हणजे किमान ६५ वर्षापुर्वीचा !
त्याकाळी खेडेगावातून ब्राह्मणाला देव मानण्याची पद्धत होती. आणि आमच्या घरी तर तेव्हा दिवसभर अन्नछत्र चालु असायचे. गावातला कुणीही आला तरी जेवल्याशिवाय जायचा नाही. त्यामुळे गावात आजही आमचे स्थान खुप चांगले आहे. खोटे वाटेल पण आजही आम्ही गावी गेलो की त्यावेळची ७०-८० वर्षाची म्हातारी माणसे आम्हा पोरासोरांच्याही पाया पडायला बघतात. आजही गावात आमच्या घरच्या कुठल्याही पुरुषाला देव म्हणुनच संबोधले जाते. म्हणजे विजुदेव (आण्णा) , पतुदेव (काका) आणि विशुदेव (अस्मादिक).
त्यामुळे चोरीची शक्यता जवळ-जवळ नाहीच. Happy

Pages