अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा सुरवातीपासून वाचायला घेतला आहे... Happy एकूण ५४३ प्रतिसाद वाचायचे म्हणजे उद्या बरंच वेळ खर्ची घालावा लागणार आहे... Happy वाचून झाला की पुन्हा प्रतिसाद देईन.. Happy

ह्या धाग्यावर पूर्वी कोणीतरी भारतातल्या हॉन्टेड जागांविषयी विचारणा केली होती. एनडीटीव्ही गुड टाईम्स "इंडियाज मोस्ट हॉन्टेड" हा अर्ध्या तासाचा प्रोग्रॅम सुरु झालाय. शुक्रवारी रात्री १० ला असतो. रिपिट टेलिकास्ट शनिवारी संध्याकाळी ६:३० आणि रविवारी रात्री ११ वाजता. आत्तापर्यंत २ एपिसोड्स झालेत - एक दिल्लीतल्या जमालीकमालीवर आणि दुसरा राजस्थानातल्या एका जुन्या काळच्या उजाड शहरावर - भानगढवर.

हि २४ वर्षापुर्विचि गोष्ट आहे.आमच्या मुलाचि डिलिव्हरि व्ह्यायच्या आधि हिच्या स्वप्नात एक आजोबा यायचे. अंगात कोट व डोक्यावर काळि टोपि.आमच्या घराच्या दारात ऊभे रहायचे व हिने विचारले कि आत या ना ,पाणि देऊ तर म्हणायचे कि नको ,मि तुमच्याच घरात येणार आहे. यथावकाश आम्हाला मुलगा झाला. नंतर काहि वर्षांनि जुने फोटो बघताना एका आजोबांचा फोटो हिने पाहिला व तिला आश्चर्यच वाटले. कारण तो फोटो माझ्या वडिलांच्या आजोबांचा होता व तेच हिच्या नेहमि स्वप्नात यायचे.

तिथे दिवेकर नावाच्या ब्राम्हणाचे भूत आहे असे म्हणतात..
अनेक जणांनी ते पाहिल्याचे दाखले दिले आहेत...

पान ११ वरील आशुचँपची कमेंट..

>>> आमचा अनुभव थोडा वेगळा आहे.. तो मी मागे लिहिला होता.
http://www.maayboli.com/node/21977

सध्या जो समज तोरण्याबाबतीत ट्रेकर्समध्ये आहे तो म्हणजे येथे चकवा मारतो किंवा गडावर दिवेकरचे भूत दिसते. ह्यामुळे गडावर कोणी फारसे रहत नाही. गडावरील एकमेव राहण्याची जागा असलेल्या मेंगजाईच्या मंदिराचे छप्पर अर्धे उडून गेले आहे.(हल्लीच ते नीट केले आहे असे ऐकले आहे.) २००२ साली देवीच्या मूर्तीवरती छप्पर आहे तर पुढच्या भागावर नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे रात्रभर पत्रे वाजत होते. मंदिराला २ दरवाजे असून एक समोर तर एक डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूचा दरवाजा आतून बंद होता तर समोरचा दरवाजा आम्ही आतून बंद करून घेतला होता. वाघ्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यात झोपला होता. त्यारात्री आम्ही झोपी गेलो तेंव्हा आम्हाला एक विचित्र अनुभव आला.

***रात्री मध्येच अभिजित आणि हर्षद दोघांना सुद्धा एकसारखे स्वप्न पडले. दोघांनाही स्वप्नामध्ये मंदिरामध्ये आमच्या भोवती सगळीकड़े सापच साप फिरत आहेत असे दिसत होते. आत साप आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा सगळीकड़े सापच साप. छप्पराचे पत्रे प्रचंड जोरात वाजत होते. आता दोघांनाही कोणीतरी दार वाजवतय असे वाटले. त्या आवाजाने त्यांचे स्वप्न तुटले आणि दोघांनाही खरोखर जाग आली. अभि दरवाजा उघडून बघतो तर काय बाहेर कोणीच नाही. किर्र्र्रररर अंधारामध्ये काय दिसणार होते. तितक्यात हर्षदने उजेड पडावा म्हणुन तेलाचा टेंभा मोठा केला होता. दोघांनाही पडलेले स्वप्न एकच होते असे जेंव्हा त्यांना कळले तेंव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. इतका वेळ मी मात्र गाढ झोपेत होतो. दोघांनी मला उठवायचे कष्ट घेतले नाहीत. अभिने पूर्ण देवळामध्ये टॉर्च मारून साप वगैरे नाही ना अशी खात्री करून घेतली. कोपऱ्यात झोपलेला वाघ्या कुत्रा मात्र आता जागेवर नव्हता. नेमका काय सुरु आहे तेच त्या दोघांना कळेना. दोघेपण चुपचाप झोपून गेले. (अर्थात हे सगळ मला सकाळी उठल्यावर कळले.)

आता माझी पाळी होती. काही वेळाने मला सुद्धा हेच स्वप्न पडले आणि ह्यापुढे जाउन तर एक सापाने माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दंश केला असे स्वप्नामध्ये जाणवले. अंगठ्यावर दंश बसल्याच्या खऱ्याखुऱ्या जाणिवेने मी खाडकन जागा झालो. डोक्याखालची टॉर्च घेतली आणि पायावर लाइट मारला. सर्पदंशाचे २ दात कुठे दिसतात का ते बघायला लागलो. पूर्ण पाय तपासला. अगदी डावापाय सुद्धा तपासला. कुठेच काही नाही. आता मी मंदिरामध्ये टॉर्च फिरवली. बघतो तर काय माझ्यासमोरच्या भिंतीला एक पांधऱ्या रंगाची कुत्री बसली होती आणि ती माझ्याकडेच बघत होती. मी टॉर्च मारल्या-मारल्या तिचे डोळे असे काही चमकले की मी टॉर्च लगेच बंद केली. त्या कुट्ट अंधारामध्ये सुद्धा तिचा पांढरा रंग सपशेल उठून दिसत होता. मी अभि आणि हर्षदला उठवायच्या फंदात पडलो नाही. मी सुद्धा चुपचाप झोपी गेलो. सकाळी जेंव्हा आम्ही उठलो तेंव्हा माझी स्टोरी ऐकून हर्षद आणि अभिजित एकमेकांकड़े तोंड आ वासून बघत होते. आता त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली. आता तोंड आ वासायची वेळ माझी होती. मी सुद्धा त्यांच्याकड़े बघतच बसलो. सूर्योंदय कधीच झाला होता. आम्ही उठून बाहेर आलो आणि बघतो तर काय वाघ्या आणि त्याच्या बाजूला ती पांढरी कुत्री ऊन खात पडले होते. हा वाघ्या रात्रभर कुठे गेला होता काय माहीत...

आम्ही आता नाश्त्याच्या तयारीला लागलो. कारण फटाफट किल्ला बघून आम्हाला गड सोडायचा होता. नाश्ता बनवून, खाउन मी भांडी घासायला गेलो तर समोरून ते 'श्री शिवप्रतिष्ठान' वाले येत होते. त्यांना नमस्कार केला आणि काल राहिलात कुठे असे विचारले. कळले की राजगड आणि तोरणाला जोड़णाऱ्या डोंगर रांगेवर एका वाडीत त्यांनी मुक्काम केला होता. जेंव्हा मी त्याला आम्ही इकडेच देवळामध्ये राहिलो असे सांगीतले तेंव्हा तो ओरडलाच. "काय्य्य... इकडे राहिलात??? काही दिसल का तुम्हाला???" मी त्याला आमची रात्रीची स्टोरी सांगीतली. आता आ वासायची पाळी त्यांची होती. आम्हाला आलेला अनुभव हा भन्नाट, विचित्र आणि मती गुंग करणारा होता. (तुम्हाला कोणाला असा काही अनुभव असेल तर तो जरूर कळवावा.)

आमच्या शेजारि रहानार्या मामि मरण पावल्या त्यांच्या कडे माझे यने जाने
सारखे असायचे ३ ल्या त्यांचि अस्थि घरा बाहेर ठेवल्या होत्या , रात्रि ३ च्या सुमारास
मला आमचि खिड्कि उघल्याचे जानवले तिथे पांढरि धुसर आक्रुति ज्याला लाल डोळे होते आनि ति मला रागाने
सांगत होते चल येतेस ना उठ चल आनि पाठि मागे मामि उभ्या होत्या अत्यंत क्षिन झ्याल्या होत्य डोळे खोल गेले होते
मला ओरड्ता येत नव्हते दुसर्या दिवशि मी आजारि

अजुन हि मला ते दुश्य आठवते

दोन्ही अनुभव खतरनाक आहेत. तसे इथले सगळेच किस्से भयंकर आहेत. वाचताना एवढी भिती नाही वाटत पण नंतर ते आठवून आठवून मी घाबरत असते.
Skype Emoticons

आपण सर्वांनी घरात-गावात, वेशीवर-रात्रीचे रस्त्यावर विविध ठिकाणाचे भूतानुभव ऐकले-पाहिले आहेत. तसे अनेक किस्से आधी येऊन गेले आहेतच... पण 'समुद्रातले भुत' हा प्रकार कधी ऐकला आहे का?

४ वर्षापूर्वी बोटीवर कामाला लागलो. २ वर्ष एकच बोटीवर होतो. तिथे आमच्या खात्यात एक नवा स्पानिश मुलगा कामाला लागला होता. आणि तो माझ्या रूममध्येच राहायचा. तो ज्या दिवशी बोटीवर आला त्याचदिवशी जवळच कुठल्यातरी एका बोटीवर एक फिलीपिनो पाण्यात पडून मेला. (फिलीपिन्स मधल्या लोकांना बोटीवर फिलीपिनो म्हणतात) ही बातमी आम्हाला कळली तेंव्हा सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. पण त्याला त्या रात्री झोपताना त्या फिलीपिनोचे भुत आमच्या खोलीत दिसले. मी त्यावेळी काम करत होतो. आता खरेतर त्याने त्या मेलेल्या माणसाला पाहिलेले पण नव्हते पण तो फिलीपिनोच होता असे त्याचे म्हणणे. तो इतका घाबरला की परत खोलीत गेलाच नाही. दुसरीकडे कुठेतरी जाऊन झोपला. माझे काम संपले आणि मी झोपायला जाणार तर तो मला सांगत होता की तू जाऊ नकोस... मला विश्वास नाही असे नाही पण मला आत्तापर्यंत कधीही थेट अनुभव आलेला नाही म्हणून मी त्याला समजावत खोलीत गेलो आणि झोपी गेलो. मला कुठलेच भुत मात्र दिसले नाही...

त्या मित्राला पुन्हा एकदा २-३ दिवसांनी तेच भुत बोटीच्या दुसऱ्या एका डेकवर दिसले. मग मात्र ती चर्चा संपूर्ण बोटीवर पसरली... आमच्या येथे २५ वर्ष काम केलेला न्यूझीलंडचा एक जण म्हणाला,"I have worked offshore for 25 years but never seen Ghost. But yet I have seen many people who look like ghost" हा हा...

ठाणे पूर्वेला आधी मी जिथे राहायचो त्यामागेच खाडीचा परिसर होता. नाला ओलांडला की मिठागरे सुरू व्हायची. थोडा पाणथळ आणि दलदलीचा भाग देखील होता. आम्ही खूप लहान असताना आमच्या इथे राहणाऱ्या एका ताईने तिथे २ भुते पाहिली असे ती सांगायची. आता ती भुते का माणसेच होती देव जाणे पण अजून २-३ जणांनी त्याला अनुमोदन दिले होते.

मला कधी विश्वास बसायचा नाही म्हणून एकदा अंधारात मी नाल्याच्या भिंतीवर चढून पलीकडे बघायचा प्रयत्न करत होतो. इतक्यात एकाने मागून गुपचूप येऊन घाबरवले. च्यायला... नंतर साल्याला असा धुतला.. Happy

नंतर सुद्धा गच्चीवर जाऊन मी रात्रीचा तिथे काही दिसते का ते बघत बसायचो... बहुदा आमच्या आवाजाने तिथून भुते पळून गेली असावीत...

पक्का भटक्या, अभिने रात्री दार उघडलं तेव्हा वाघ्या बाहेर गेला असल्याची शक्यता आहे. कदाचित तेव्हाच ती पांढरी कुत्री आत आली असेल. अर्थात ते दोघे सकाळी खोलीच्या बाहेर कसे ह्याचं मात्र काही स्पष्टीकरण मला सुचत नाही. अर्थात सकाळी ते दिसले म्हणजे सजीव सृष्टीतले असावेत. सर्वांना सापांची स्वप्नं पडणं हे मात्र अजब आहे.

माझा एक मजेशीर अनुभव. ह्यात सुपरनॅचरल काहीही नाही.

एमबीए करत असताना एके दिवशी रात्री मी जेवून डॉर्मवर परत आले. बाकीच्या तिघीजणी अजून आल्या नव्हत्या. खोलीचा दरवाजा उघडून आत जाणार एव्हढ्यात बाहेरच्या कॉमन रूममध्ये असलेला टीव्ही आपोआप चालू झाला. आणि चॅनेलवर कुठलीतरी हॉरर सिरियल चालू होती. मी खरं तर दचकलेच. पण जाऊन टीव्ही बंद केला. मग दुसर्‍या दिवशी सकाळी बोलताना एका रूममेटला हे सांगितलं. ती हसायला लागली. म्हणाली की त्या रिमोटमध्ये काही प्रॉब्लेम आहे, बहुतेक बॅटरीचा. तिने पण १-२ वेळा टीव्ही आपोआप चालू होताना पाहिला होता. टीव्हीसमोरच्या टेबलवरच रिमोट ठेवलेला असायचा. मग तिने माझ्यासमोरच रिमोटच्या बॅटर्‍या काढून रूमसर्व्हिसवाल्याकडे दिल्या. म्हणाली 'आता टीव्ही आपोआप चालू झाला तर काही खरं नाही". आम्ही हसलो. सुदैवाने तसं काही झालं नाही. आणि बॅटरी बदलल्यावर टीव्हीचं आपोआप चालू होणं बंद झालं. Happy

एक छोटासा किस्सा... पण खराखुरा..

कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. मित्राच्या घरी रात्रभर गप्पा मारण्यासाठी (नोंद: फक्त गप्पा मारण्यासाठीच :P) जमलो होतो.. पहाटेचे २-३ वाजले होते. सर्व लाईट्स बंद. फक्त बाहेरच्या खोलीत एक मंद उजेड पडेल असा दिवा सुरू होता. सर्वजण जसे जिथे मिळेल तिथे टेकून बसलो होतो. माझे तोंड आतल्या खोलीकडे होते असा मी बसून बोलत होतो. अचानक मला एक लहान मुलगा आतून डोकावून बघतोय असे स्पष्ट दिसले. अगदी समोर काही फुटांवर. हा भास असेल?

अगदी एखादा सेकंद... काही कळलेच नाही. मी सर्रकन उठलो आणि बाकीच्या सर्वांकडे बघायला लागलो. कोणाला काहीच कळेना. मी म्हणालो.. आतल्या खोलीत कोणीतरी आहे असे वाटतंय. सर्वांची पाचावर धारण... एकाची फुल्टू हालत खराब.. मी म्हणालो आत जाऊन बघुया. लाईट लावत लावत आत गेलो. कोणीच नाही. मग सर्व रात्र घरातल्या लाईट्स चालू ठेवून गप्पा मारत बसलो... त्या पण भुताच्या. सकाळी जाताना मित्र बोलला.. तुला जसा भास झाला तसा मला अनेकदा ह्या घरात होतो..

काही महिन्यांपुर्वी (आणखी) एक भयानक स्वप्न पडलं, त्यात आमच्या भावकीतलं कुणीतरे वारल्याच दिसलं, त्यात मला दिसलं कि आमच्या जवळच्या शेताजवळ शेजारचे,गावचे लोक कुणाच्या तरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते,झोपेतुन मी पहाटे घाबरुन उठलो, आणि स्वप्नाची नेहमीप्रमाणे नोंद केली.
शेवटी एकदाच न राहवल्यामुळे संध्याकाळी गावी कॉल केला, तर माझे चुलत आजोबा (वयस्कर) आदल्या दिवशी दुपारी वारल्याच समजलं.

पुण्यात सध्या राहतोय त्या घरातली गोष्ट! घर भाड्याने घेतलंय. ३ बेडरूम आहेत. पैकी एक मालकाने त्याचे सामान ठेउन बंद केलीय.

काही दिवसांपूर्वी आई पुण्यात आली. ती झोपायची त्या खोलीत तिला रात्री सतत भास व्हायचे.. कधी कुणी आवाज देउन उठवायचे नि काय काय.. एकदा तर म्हणे तिला एक हात दिसला होता तिला जागे करणारा. नंतर मग आम्ही तिला आमच्या खोलीत झोपायला सांगितलं आणि आम्ही नवरा बायको तिच्या खोलीत झोपयला लागलो. आम्हाला मात्र कधी असला त्रास झाला नाही..... त्याही अगोदर कधी झाला नव्हता म्हणा...

अरे हा धागा परत मागे पडला
असो मी एक किस्सा सांगतो. मुलुंड मधे माझ्या मित्राच्या शाळेतल्या दोन मुलांच्या बाबतीत घडलेला.

तर ती दोघ रात्रीअभ्यास करत गॅलरीत बसलेली. साधारण सहावी सातवीत असतिल तेव्हा.
श्वेतांबरा नावाची सिरीयल लागायची.
त्यानी अशीच एक श्वेतंबरा पाहीली ती त्यांच्या कडे पाहून हसली. त्याकाळी मुलुंडचे रस्ते दिवसाही सुनसान असायचे त्यात रात्रीच्या वेळ...

त्यातला एक मुलगा वेडा झाला आणि एक गेला.

पुढे मला वाटत शिशीर शिंदेने या श्वेतांबराला पकडलेल. तो जोशी म्हणून कोणीतरी होता बँक ऑफ इंडीयात नोकरी करणारा. मुलगी गेल्यामुळे डोक्यावर परीणाम हो ऊन रात्रीचा फिरायचा खोटे केस पांढरी साडी आणि खोटे दात लावून.

आठवतेय श्वेतांबरा. मुलगी बिलगी काही गेली नव्हती. विक्रुत माणूस होता तो. चांगला बँकेत मॅनेजर होता. भरपूर कथा ऐकू येत तेव्हा ह्या भुताच्या जी.व्ही.स्कीमच्या परिसरात. नवघर रोड पोलिस चौकीच्या शेजारी रहायचा पण पोलीस सुद्धा वचकून असत्.गगनभेदी वाला कोण तो थत्तेच ना? त्याने आर्टिकल्स लिहिले होते त्यावर.

sad0020.gif

ह्म्म्म्म

बापरे!

>>मला अजून नाही दिसलं गं भूत आणि असले अनुभव पण नाही आले......
भुतांचं भाग्य थोर Proud ** दिवा घेणे **

मला नाही आला कधी भुताचा अनुभव, पण माझ्या जुन्या कंपनी मध्ये माझे मित्र मला सांगायचे का रात्र पाळी नंतर घरी जाताना त्यांच्या गाडी समोर एक बाई उभी राहायची, तो तेव्हा वसई ला राहायचा, रोड खूप सुनसान असायचा आफ्टर १२, तर त्याच्या गाडी चा चालक कधी गाडी थांम्ब्वायचा नाही, त्याला सवय झाली होती अशा प्रकारची अस खूपदा घडला होतं म्हणे, मित्र म्हणायचा कि आपण मनात विचार सुधा आणायचा नसतो कि मला भूत बघायचे आहे कारण मग आपल्या त्या शक्ती जागृत होऊन असे अनुभव चालू होतात, खर खोटं ईश्वर जाणे!!!

Pages