अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बसमध्ये मी माझ्या विंडो सीटवर बसले.बाबा खाली उभे होते.खिडकीतून आमच्या गप्पा चालू होत्या

हाही एक अमानवीयच अनुभव. व्होल्वो मधे अस बोलता येत!!!???

मला अस सांगितल जात की पोवळ मला आवश्यक आहे. एकदा आईने मला पोवळ्याची माळ घालायला दिली. इतका संतापलो की काही विचारू नका. आईने पटकन माळ काढून घेतली. आणि खरोखर मी शांत झालो.
कदाचिच ती माळ एका मावशीने दिलेली होती म्हणूनही असू शकेल...

एक दिल दिहला देने वाली रोंमटे खडी कर देने वाली न्युज मी आता वाचलेय
तुम्हालाही धक्का बसेल

त्यातून सावरल्यावर आता मी लिहीतोय.

आपल्या इथे एक व्यक्ती गेली दहा वर्ष चार दिवस सासूचे सिरीयल फॉलो करतेय

मी कधीच अंगठी, माळ वगैरै घालत नाही.

परंतु एकदा मला एका ज्योतिष्याने मोती असलेली चांदिची अंगठी घालायला सांगितली. मी आधी दुर्लक्ष केले. पण नंतर सहज वाटले म्हणुन अंगठी बनवुन घालायला सुरुवात केली.

अंगठी घालायला लागल्यापासुन थोडे अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली. दोन-तीनदा माझे मित्रांशी भांडण सुद्दा झाले. खुप चिडचिड व्हायला लागली.

काही दिवसांनी अंगठी काढुन देव्हार्यात ठेवली. तेव्हापासुन सगळं ताळ्यावर आले. त्यानंतर आजतागायत मी अंगठी, माळ वगैरै घातलेली नाही

गुगु.. वरची पोस्ट कृपया उडवाल? ह्या बीबीशी काही संबंध नाही नि त्यामुळे वादावादी होऊन.. बीबी बंद होईल.

जाई जुई
नक्कीच या बीबी शी संबधीत आहे पण तू बहुदा भारतात नसावीस नाहीतर या वाक्याचा शहाराच उमटेल ई टिव्ही पहाणा-या कोणाच्याही अंगावर

खर सांगायच तर 'वाद होईल या गोष्टी वरूनच वादाला तोंड फुटत कारण मी तो पोस्ट टाकल्यावर बरेच लोक बघून गेलेत कोणी नाही आल भांडायला.

धन्यवाद गुगु..!

मला त्या सिरिअलच्या भयानकतेची कल्पना आहे.. पण तरीही कोणाला काय आवडते ह्याचा मी पब्लिक बीबीवर उल्लेख करू इच्छित नाही. माझ्या आजीला/आईला कदाचित यागोघ भयंकर आवडत असेल नि बोन्स किंवा सीएसआय पहाणे अमानवी? त्यामुळे बदल केलात त्याबद्दल खरच धन्यवाद!

आणि कोणी भांडायला आले नाही ही त्यांची सभ्यता! Happy

मंडळी कृपया भरकटू नका मूळ विषयापासून...
इथे सगळ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे लिहीण्याचा हक्क आहे परंतु विषयाशी संदर्भ नसलेल्या पोस्टमुळे अनेकांचा विरस होतो...
गुगु - तुमची पोस्ट कितीही तुम्हाला भयानक वाटत असली तरी ती अमानवीय नक्कीच वाटत नाही...कृपया ती संपादित करावीत अशी नम्र विनंती...
या उप्पर तुमची मर्जी..

मनस्मी....मी आजपर्यंत कधीच अ‍ॅडमिनकडे कुठलीही तक्रार किंवा विनंती केलेली नाही..
मी जरी या विषयाला सुरूवात करून दिली असली तरी अन्य लोकांनी त्यात खूप भर घातली आहे. त्यामुळे मी हे सर्व त्यांच्यावरच सोपावतो. ज्यांना अशा अमानवीय गोष्टींमध्ये रस आहे ते येऊन इथे पोस्ट टाकतीलच आणि त्याच बरोबर अशा अवांतर पोस्टपण येतील..तरीदेखील तुमचा सल्ला एकून तसे अ‍ॅडमिनना नक्की कळविन. Happy

.

कोण कुठल्या धबधब्याला कधी गेले आम्हाला काडीचा इंटरेस्ट नाही.>> मनस्मी, धबधब्याजवळ गेल्याशिवाय का तिथल्या अमानवी गोष्टी कळनारेत?

मला वाटत आहे की या बाफला विनाकारण वेगळे वळण लागत आहे. आपण हे सर्व टाळून पुन्हा एकदा अमानविय घटनांवर येऊ शकतो का...??????
अ‍ॅडमिन या बाफला टाळे लावण्यापूर्वी अजुन काही अमानविय गोष्टी असतील तर त्या कृपया शेअर कराव्यात अशी सर्वांना विनंती...

क्रुपयाssssss..... शांतता राखा......!

मझ्या आजी बरोबर घडलेला लहानसा"अमानविय" किस्सा. आजीने सांगीतल्या प्रमाणे.
.
.
.
.
.
.
.
सत्यघटना
ठीकाण: राजापुर (ताम्हणे)
दिनांक : १९७५-१९८० दरम्यानचा काळ

शिमग्याची रात्र होती, त्या वेळी गावात विज नव्ह्ती .सणानीमित्त रात्रि उशिरा पर्यंत गावात रेलचेल चालु होती. पुरण पोळी, राजगिर्‍याचे लाडु, मोदक, वडे असे विविध पदार्थ बनवाण्याची आधिपासुनच आजिला खुप हौस. हे सर्व पदार्थ त्यावेळी तिने घरात बनवविले होते. ही घटना त्याच वेळेची.

स्वयंपाक घरात एक खिड्की आहे, त्या खिड्कीचे तोंड मागे जंगलाकडे उघडते. त्या वेळी 'भोकाचे वडे' हा पदार्थ बनवताना स्वयंपाकघराच्या खीड्कीतुन एक 'हड्कुळा हात'... हळुच 'आत' आला...आजीने
समोर पाहीले...तर एक भुर्सट्लेली बाई..अस्तव्यस्त पांढरे केस चेहर्‍यावर पड्लेले...कोमेजलेली.. खरबडीत हाताची त्वचा ...२-३ ईच लांब नखे. अजीला समजण्यास वेळ नाही लागला की ही बाई कोण ते. तिने लगेच कढईतुन 'उकळते तेल'.. ज्यात वडे उकळ्वले जात होते.., जेवढे येईल तेवढे 'झार्‍यामधे' घेउन तिच्या हातावर टाकले... आणि त्या बाईने ओरडतच जंगलाकडे धुम ठोकली. अर्थातच तिला त्या घनदाट जंगलात शोधायला जाण्याची गरज नव्हती.

* आजी म्हणते ती 'जखीण' होती (गावात राहणारे जुने जाणकार समजु शकतील). तिने वडे मांगण्यासाठी हात पुढेकेला होता, वडा दिला असता तर तिचि अभद्र छाया नेहमीच घरावर राहीली असती.
असे प्रकार गावात त्यावेळी कुणाबरोबरही राजरोस घडायचे. आणि आज..............आज अधे मधे घडतात.

बापरे चातक..
माझ्या मैत्रीणी च्या मोठ्या बहिणीचे लग्न ,सैन्य आधिकार्‍याशी झाले होते. आग्र्याला कँपमधे त्यांना नवीन घरी शिफ्ट व्हायचे होते. सामान सुमान लावेस्तो बरीच रात्र झाली. सर्व आवरून बहीण हवा खायला म्हणून गच्चीत गेली. तो समोरच्या घराच्या गच्चीतली बाई तिला इशारा करून म्हणाली कि तुमच्या अंगणाचं दार बंद करायचं राह्यलय म्हणून. बहीणीने तिचे आभार मानले आनी लगेच खाली जाऊन दार लावून घेतले.
सकाळी जाग आल्यावर बाहेर अंगणात आल्यावर सहज समोर पाहिले तर तिची भीतीने गाळणच उडली.. समोर फक्त जंगल होतं,घर,गच्ची वगैरे काहीच नव्हतं.
त्या घरात असतांना तिला असे बरेच अनुभव आले..कि ती स्वैपाक करत असता कुणीतरी तिच्या खांद्याजवळ येऊन पाहात आहे..इ.इ.
पण बाकी काही त्रास नव्हता म्हणून ते त्या घरात ३ वर्षं राहिले .. चक्क!!!

३ वर्ष??? धन्य आहे तुझी मैत्रीण वर्षू!!! आमच्या आधीच्या भाड्याच्या घरात मला कोणीतरी बघतंय, कोणीतरी आहे असे भास बर्‍याच वेळेस व्हायचे, पण त्रास नसल्यामुळे आणि भितीही वाटत नसल्यामुळे मला वाटलं माझ्याच मनाचे खेळ असावेत...

सगळ्यांचे अनुभव वाचतेय... नवीन अनुभव येऊंद्यात , मंडळी!!! Happy

पण बाकी काही त्रास नव्हता म्हणून ते त्या घरात ३ वर्षं राहिले .. चक्क!!!
बाकी काही त्रास नव्हता ????????????????? काही भुत सभ्य असतात हेही खरंच म्हणा !
Lol

माझा चुलत भाऊ आणी वहिनी अमरावतीला भाड्यावर घ्यायला घरं पाहात होते. असच एक घर पाहात असता,माझी वहिनी सर्व खोल्या पाहून झाल्यावर न्हाणीघर पाहायला म्हणून आत शिरली. त्याबरोबर तिचा श्वास घुटमल्यासारखा झाला..खूपच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे लगेच तिकडून बाहेर पडली. बाहेर आल्याबरोबर तिला बरं वाटू लागलं.
मग शेजारच्या लोकांशी बोलताना समजलं कि काही वर्षांपूर्वी त्या घरमालकांच्या सुनेने न्हाणीघरात स्वतःला जाळून आत्महत्या केली होती..

अमरावतीलाच माझी आई लहानपणी ज्या वाड्यात राहात असे, त्यांच्या एका खोलीत वेळी अवेळी,चमेली चा दरवळ येत असे.. अगदी कुणी चमेली चा गजरा घालून एका दारातून आत शिरून ,दुसर्‍या दारातून बाहेर पडावे तसा. विशेष म्हणजे वाड्याच्या आसपास सुद्धा चमेली चे झाड नव्हते.

आता एकेक किस्से आठवतायेत लहानपणी ऐकलेले.. तेंव्हा हे किस्से ऐकताना जीव कंठाशी यायचा Happy

वर कुणीतरी पंचधातूच्या अंगठीबद्दल लिहिलंय, त्यावरून आठवलं. मागे (मी डीप्लोमा ला असताना) डोंबिवलीला एका नवग्रहाच्या अंगठीची आणि दागिन्यांची जाहीरात आणि प्रदर्शन पाहून आत घुसलो आणि एका व्यक्तीने नवग्रहांचा आयुष्यावर कसा चांगला इफेक्ट पडतो वगैरे सांगून एक अंगठी आम्च्या गळ्यात मारली. मी ज्या दिवसापासून ती अंगठी घातली त्या दिवसापासून वाईट अनुभव येत राहीले. उदा. लहान सहान गोष्टींत उगीचच मनस्ताप होणे, कुणाशीही अकारणच वाद होणे, महत्त्वाच्या नोट्स् ऐन परीक्षेच्या कालावधीत गायब होणे वै. मग कुणीतरी त्या अंगठीचा त्याग करण्याचे सुचविले. त्याप्रमाणे ती अंगठी खाडीत विसर्जित करून आलो तर सगळे लगेच थांबले. त्या हरवलेल्या नोट्सही नंतर सापडल्या.

चातक, वर्षू नील, बाप रे Sad

आजी-आजोबांच्या आठवणीतला एक किस्सा. अमानवीय म्हणता येणार नाही. पण इतक्या वर्षानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. तेव्हा आजी-आजोबा, आई आणि तिच्या २ बहिणी फॉरेस्ट खात्याच्या बंगल्यात रहात होते. बंगल्याच्या अंगणाला फाटक आणि तारांचं कुंपण सुध्दा. पण ते ओलांडून गेलं की बाहेर सगळं जंगलच. ते ज्या खोलीत झोपत त्याला खिडक्या नव्हत्या. त्यामुळे रात्री दरवाजा उघडा टाकून हे "महान" लोक झोपत असत. दरवाजा थेट बंगल्याच्या अंगणात उघडत होता.

एके रात्री असेच झोपले असताना आजीला अचानक रात्री जाग आली. सहज तिचं दरवाज्याकडे लक्ष गेलं तर दाराच्या बाहेरच्या पायर्‍यांवर काहीतरी किंवा कोणीतरी दबा धरून बसलेलं तिला धूसर चन्द्रप्रकाशात दिसलं. काय आहे - जनावर का माणूस का आणखी काही - ह्याचा तिला अंदाज येईना. आजी प्रचंड घाबरली आणि ३ मुलं सोडून पलीकडे झोपलेल्या आजोबांना उठवायला तिने हात लांब केला. हलक्या आवाजात "अहो उठा, पायर्‍यांवर बघा काहीतरी आहे" असं ती सांगू लागली. आजोबांना जाग नाही म्हणून तिने त्यांच्याकडे पहायला तिथे नजर वळवली आणि परत दरवाज्यात बघते तर तिथे काहीही नाही.

एव्हाना आजोबा उठले होते. त्यांनी आजीच्या विरोधाला न जुमानता टॉर्च आणि पिस्तूल घेऊन सबंध बंगल्याला फेरी मारली पण कुठे काही दिसलं नाही. त्यानंतर हे लोक कितीही उकडत असलं तरी दार बंद करून झोपायला लागले हे सांगायला नको.

आता प्रश्न हा आहे की ते होतं काय? आजवर अनेक वेळा आम्ही (म्हणजे मी आणि आई, भाऊ भूताखेतांना मानत नाही किंवा तसं दाखवतो बहुतेक. "एक दिवस दिसलं की कळेल" अश्या माझ्या भविष्यवाणीलासुध्दा हसतो!) ह्यावर चर्चा केली आहे.

१. आजीला भास झाला असावा. एखाद्या झाडाची सावली वगैरे. पण आजीच्या मते तिने बराच वेळ निरखून पाहिलं आणि पूर्ण खात्री झाल्यावरच आजोबांना उठवायचा प्रयत्न केला. तसंच ह्याआधी कधीच काही दिसलं नव्हतं.

२. एखादं जंगली जनावर असावं. शाकाहारी असेल तर ते बंगल्याच्या आत येऊन बसून काय करणार? मांसाहारी असेल तर त्याने आधीच हल्ला करून ३ मुलांपैकी एखादीला उचललं असतं.

३. जिवंत माणूस - चोर वगैरे. त्याने धाक दाखवून लुटायचा प्रयत्न केला असता. नुस्तं बसून राहून त्याला काय मिळणार?

४. काही अमानवीय - घाबरवण्याचा उद्देश असता तर तो दारात बसून नक्कीच साध्य झाला नाही.

काय होतं कोणास ठाऊक

ही घटना घड्लीये माझ्या मोठ्या दिरांसोबत . ते एअरफोर्स मध्ये १५ वर्शे नोकरीला होते , तिथुन रिटायर झाल्यावर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत काम करण्यास सुरुवात केली . ते भुताखेतांना काय देवालाही मानत नाहीत.
ही घटना आहे १५ वर्षापुर्विची . त्यांची ड्युटी तेव्हा वा़कड नाक्याला होती. पावसाळ्याचे दिवस होते. रात्री सेकंड शिफ्ट करुन ते निघाले. पाऊस झिमझिमतच होता . वाकड हा तसा त्या काळात निर्मनुष्य रस्ता असलेला भाग .रात्री मोटरसायकलीवरुन घरी येत असताना समोरुन एका स्त्रीने गाडी अडवली. एवढ्या रात्री एक स्त्री घरदार सोडुन इथे काय करत असेल? ही भांडुन बिंडुन तर आली नाही ना ह्या विचारात त्यांनी गाडी थंबिवली. स्त्री साधारण २५- ३० ची होती. अंगावर दागिने , तिने दिरांना विचारले , भोसरीला सोडता का? दिरांना नक्की वाटले कि ही भांडुन घर सोडुन निघालिये , अश्या अवस्थेत एकटीला तिथे सोडंणे बरे नव्हे हा विचार करुन त्यांनी तिला गाडीवर बसायला सांगितले
ती मागे गाडीवर बसली . भोसरी जवळ आल्यावर तिने एका फाट्काजवळ त्यांना सोडण्यास सांगितले दिरांनी तिला घरापर्यंत पोहचवतो असेही सांगितले त्यावर ती म्हणाली नको हा पायाखालचा रस्ता आहे मी जाईन आणि ती अंधारात निघुन गेली, ती घरी नीट जाते का हे बघण्यासाठी दीर ही गाडीवरुन खाली उतरले व फाटकातुन आत जाउ लागले तोच एका म्हातार्‍याने त्यांना आवाज दिला . दिरांनी त्यांना सर्व सांगुन ती घरी व्यवस्थित पोहचली का हे बघुन येतो असे सांगितल्यावर तो म्हातरा म्हणाला जा बाबा जा ती अशीच रोज एकाला इथे आणते तु घरी जा , दिरांना काही कळेना .ते गाडीकडे जाण्यास वळ्ले आणि पुन्हा म्हातार्याला काही विचरावे म्हणुन मागे पाहतात तो म्हातारा ही नव्हता एवढ्यात म्हातारा कुठे जाणार म्हंणुन दिरांनी इकडेतिकडे पाहिल्यावरही तो दिसला नाही .त्यांच्या मनात एक अनामिक भिती चमकुन गेली पण ते घाबरण्यारणार्‍यापैकी नव्हते
दुसर्‍या दिवशी सकाळी ते पुन्हा त्या फाटकापाशी गेले आणि पाहतात तो काय ती भोसरीची स्मशान भुमी होती ..........

पुणे विद्यापीठातल्या कँटीन जवळ एके ठिकाणी कुठल्याशा ब्रिटिश राणीचे थडगे आहे, तिकडे म्हणे रात्री १२ वाजता घोड्याच्या टापांचा आवाज येतो. बग्गी जाताना येतो तसा! कॉलेजच्या दिवसात बर्‍याचदा मित्रांबरोबर पैजा लागायच्या. एकदा मित्र-मित्र गेलोही होतो, पण तसा काही आवाज ऐकला नाही.

कोणाला याबद्दल काही माहिती आहे ?

भुत जेवढी सतावतात
त्याला आपली पितरही तेवढीच दुर लोटतात.
पितर त्रास होऊ नाही म्हणुन त्यांना रोखतात
असे म्हणतात.

मी खेड्यात रहात असताना
एका वाड्यात भुत आहे असे लोक म्हणत होती
आम्ही क्रिकेट त्या वाड्याजवळच खेळत असु. शॉट मारला की बरेच वेळा चेंडु त्या वाड्यात जायचा. वाडा पुर्ण अंधःकारमय होता. सर्वत्र जाळे तरी ही मी भीती वाटत असली तरी सुध्दा चेंडी आणायला त्या वाड्यात कित्येकदा गेलो अगदी पाला पाचोळ्याचा आवाज झाला तरीही अंगावर काटा यायचा. पण मी धीर धरत पुन्हा पुन्हा त्या वाड्यात उतरत होतो. बाकी कोणी हिंमत केली नाही.
तरी म्हणतातच
भित्यापाठी ब्र्म्हराक्षस

बापरे स्वप्ना...मला अशा वेळी जाम भिती वाटली असती. अर्थात भुताची नाही तर प्राण्याचीच. तुझी दुसरी शक्यता जास्त आहे. जंगली जनावर असे लगेच आले की हल्ला कर असा प्रकार करत नाही. आधी ते सर्व धोके, प्रतिकार झाल्यास पळून जाण्याचे मार्ग सर्व न्याहाळून मगच असे धाडसी पाऊल उचलते. कारण अगदी नरभक्षक झाले तरी त्यांच्या मनात मनुष्यप्राण्याबद्दल एक भिती असते आणि बेसावध मनुष्यावरच हल्ला करण्याचा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे कदाचित ते पाहणी करत असतानाच नेमके तुझ्या आज्जीने पाहिले असावे आणि आपली उपस्थिती ऊघड झाल्याचे पाहून त्याने पोबारा केला असावा.

आशुचँप, आम्हालाही तसंच वाटतं. तरी बरंय, आमच्या आईसाहेबांना उचलून नेलं नाही. नाहीतर मी आज इथे नसते Proud

आता आणखी एक अनुभव.....अगदी ताजा म्हणजे एक तासापूर्वीचा. अमानवी नाही म्हणता येणार पण स्पष्टीकरण सापडलं नाहिये. सध्याची क्लायन्ट साईट घराजवळ आहे. त्यामुळे सध्या लंचला घरी यायला जमतंय. आईचा मिस्ड कॉल आला की मी ऑफिसमधून निघते. आज कॉल १:३८ ला आला. पण काम अर्धवट सोडून लगेच निघता येईना म्हणून मी १० मिनिटांनी निघाले. ऑफिस ते घर अंतर चालत साधारण दहा मिनिटं. चावीने दार उघडून आत शिरणार तोच पुन्हा आईचा फोन. मी फोन न उचलता दार उघडून आत आले तर आई स्वयंपाकघरात. मी तिला म्हटलं "अग, आले मी आता. फोन बंद कर" तर ती म्हणाली की फोन तिच्याजवळ नाहिये, लिव्हिंग रूममध्ये टी-टेबलवर आहे. आम्ही दोघी लिव्हिंग रूममध्ये गेलो तर फोन टी-टेबलवर. तिने फोन हातात घेऊन पाहिला तर माझा नंबर डायल केलेला दिसत होता. माझा फोन अजून वाजतोय. शेवटी तिने तिचा फोन उघडून कट केला.

मी लॉग चेक केला तर माझ्या फोनवर पहिला कॉल १:३८ आणि दुसरा १:५७ चा होता. म्हणजे मध्ये १९ मिनिटांचा फरक. आई म्हणाली की एकदा कॉल केल्यावर ती किचनमध्ये गेली त्यानंतर तिने फोनला हात लावला नाही. बाबा बेडरूममध्ये होते. घरात आणखी कोणीच नाही.

अलार्म snooze करता येतो तशी फॅसिलिटी unanswered कॉलसाठी मोबाईलमध्ये अस्ते का ते मला माहित नाही. पण आईच्या फोनमध्ये तरी नाहिये कारण ती जवळजवळ रोजच मला मिस्ड कॉल देते. पण कधी असा अनुभव आला नाही. ऑटोडायल फॅसिलिटी नाहिये. मी तिचं कॅलेन्डर चेक केलं पण त्यातही काही रिमायन्डर वगैरे सेट झाला नव्हता. आहे काय हे गौडबंगाल? Uhoh

हा माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा
३१ डिसेंबर च्या रात्री सगळे मजबूत पार्टी करून घरी येत होते, डोंबिवलीला साधारण १५ वर्षापूर्वी MIDC एरिया सुमसान असायचा, मित्राने याला घरडा सर्कल पर्यंत सोडल, पुढे हा चालतच निघाला
वाटेत त्याने चुकून कोणीतरी तिठ्यावर ठेवलेली किंवा केलेली "करणी" ओलांडली, पुढे त्याला काहीच आठवत नव्हतं, जेव्हा जाग आली तेव्हा तो खंबाळपाडा नावाचं एक गाव आहे ६ किमी वर तिथे एक ओसाड शेतात बसून होता
आणि तोंडात भरपूर राख भरलेली होती.

त्याला नंतर जो ताप भरला तो डायरेक्ट २५ ३० दिवसांनी उतरला, आणि नंतरही किती दिवस त्याला पोर्णिमा ,अमावास्येला ताप भरायचा
पुढे त्याला एका संतानी हनुमानाची उपासना दिली, नंतर सर्व त्रास बंद झाले

आमच्या ओळखीत अजून एक गृहस्थ होते
त्यांना कर्णपिशाछाने झपाटले होते, दिवसातले २४ तास , त्यांच्या कानात ते शिव्या द्यायचं , भयानक आवाज काढायचे, दिसायचे मात्र नाही.
ते कुठे देवळात गेले किंवा सत्संगाला गेले कि त्रास बंद व्हायचा, पण बाहेर आले कि पुन्हा सुरु, संसारी मनुष्य किती वेळ देवळात बसणार ना,
वेड्यागत अवस्था झाली होती त्यांची
नंतर त्यांचे पुढे काय झाले देव जाणे

आता हैदराबाद हॉण्टेड हॉस्टेलचे किस्से

वरच्या मोबाईल किश्श्यावरून आठवला

माझा पहीलाच मोबाईल तो एरीयल वाला नोकियाचा भक्कम...
आम्हाला बाहेर जायच होत मित्राचा फोन आला म्हणून मी आवरून त्याच्या रूमवर गेलो. त्याच्या रूममधे मी माझ्या मोबाईलचे मेसेज चेक केल्याच आठवतय, शिवाय तो मोडला होता त्यामुळे मी पाठीमागे लावलेली चिकटपट्टी नीट केली.
जायला निघालो तर मोबाईल सापडेच ना.
त्याची सगळी रूम पालथी घातली. मग तो म्हणाला की आपण तुझ्या रूमशी जाऊ आणि मी नंबर फिरवतो.

माझ्या रूमच्या गॅलरीला लागून एक गच्ची होती तिथे गेलो. मी त्याला म्हणत होतो उगाच काहीतरी प्रयत्न करतोय मला पक्क आठवतय की मोबाईल घेऊन आलेलो. तसच माझ्या हातात पाहील्याच त्यालाही आठवत होत.

त्याने नंबर फिरवला आणि
मोबाईल रूम मधेच वाजला

आजही दोघे तो किस्सा आठवला की थक्क होतो.

बाप रे! किती भयानक!

मुंबईत रस्त्यावर मिरची-लिंबू बर्‍याचदा दिसतात. बहुतेक वेळा ते कारमध्ये समोर टांगलेले असतात ते जुने झाले की काढून फेकलेले असतात, त्यात करणी वगैरेचा प्रकार नसतो अशी कितीही मनाची समजूत घातली तरी त्याला बगल देऊनच जायचं हा शिरस्ता. कधीमधी भातसुध्दा टाकलेला दिसतो - गुलालासकट. फक्त एकदा वरळीहून सिध्दीविनायकाला येताना उजवीकडून रविन्द्र नाट्यमंदिरकडे जाणारा रस्ता आहे तिथे कोपर्‍यावर सुया टोचलेली काळी बाहुली पाहिली होती तेव्हा खूप हादरले होते. Sad

Pages