दशकपूर्तीच्या निमित्ताने - २ (पाऊलखुणा)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पाऊलखुणा

"जुन्या मायबोलीत शोधलं तर तुझ्या नावाने आलेली बहुतेक पाने रेसिप्या किंवा रेसिप्यांच्या धाग्यांचीच असतात!" असं एकजण मला म्हणाली होती. "आहारशास्त्र आणि पाककृती" हा नेहमीच माझा आवडता विभाग राहिला आहे. मध्यंतरी "थिन्क टँक" वरच्या चर्चेत वेबमास्तरांनी मायबोलीवरचा हा विभाग म्हणजे "थिन्क टँकच" आहे असे सांगितले होते.

पर्टू नंतर मायबोलीवर येईनासा झाला तेव्हा पीकेनेच (परागकण) पर्टुच्या रेसिपीज धाग्यावर त्याची आठवण काढली होती. "ह्यो पर्ट्या कुटं गेला रं? आणि ती लालूबी काय लिवते म्हणल्याली, तिनंबी काय लिवलं नाय.." मी काही पर्टुची जागा भरुन काढली नाही पण रेसिप्या लिहायला सुरुवात केली. नंतर कधीतरी वर्गीकरण झाले आणि 'पर्टुच्या रेसिपीज' फोल्डरमधल्या रेसिपीज नवीन वर्गवारीत विभागल्या गेल्या.

परदेशात आल्यावर इथे उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरुन आपले पदार्थ करणे, नवीन पदार्थ करणे हे प्रयोग आपसूकच सुरु होतात. हवामान, उपकरणे यांचं वेगळेपण हा अजून एक घटक. आत्ता जे मिळायला लागले आहेत तेवढ्या प्रकारचे भारतीय पदार्थ तेव्हा मिळत नसत, अगदी 'इन्स्टंट' वाले सुद्धा. "अमेरिकेत गुलाबजाम कसे करावे" या धाग्यावर तेव्हा व्हिप्पिन्ग क्रीम, मैदा,पॅनकेक मिक्स, मावा पावडर पासून रिकोटा चीजपर्यंत घटक वापरुन गुलाबजामच्या कृती होत्या/आहेत. त्यातच पुढे "खवा कसा करायचा?" इ. ओघाने आलेले प्रश्नही आहेत. Wink

मी आणि पर्टुने जुन्यात लिहीलेल्या काही रेसिपीज मी नवीन मायबोलीत आणल्या, काही अजून जुन्यातच आहेत.आता "रोगन जोश" आणायला हवा. "झणझणीत अस्सल कोल्हापुरी (गुळमट नसलेली) चवदार पुडाची वडी उर्फ बाकरवडी" असे लांबलचक नाव असलेली मी लिहिलेली एक रेसिपी अजून जुन्या मायबोलीत आहे. कंसातले शब्द फार महत्त्वाचे आहेत Happy त्यावेळी माझा "आम्ही कोल्हापुरी" शिवाय इतरत्रही संचार सुरु झाला होता. तेव्हा विशिष्ठ गावच्या धाग्यावर जाऊन त्यांच्याच सुप्रसिद्ध बाकरवडीबद्दल काहीतरी वाद झाला. चाफा आणि सँडीशी (sandy_g). मग मी आमच्या पद्धतीची बाकरवडी कशी मस्त असते त्याची असे लांबलचक नाव देऊन रेसिपी टाकली! तेव्हा दीपांजली माझ्या बाजूने होती (पण ती तेव्हापासून माझी मैत्रीण नाही, एका V and C पासून आहे, ते पुढे येईलच. Happy ) आता वादाचे तपशील आठवत नाहीत. बहुतेक वेळा असंच होतं, तपशील विसरतात, भांडण उरतं. पण या बाबतीत पुढे तेही उरलं नाही ही चांगली गोष्ट. Happy

त्यावेळी "रेसिपी हवी आहे, माहीत आहे का" हे विचारण्यासाठी 'Looking for' या इंग्रजी नावाचा धागा होता. त्याच्या डोक्यावर लाल अक्षरात इंग्रजीतच 'रेसिप्या या धाग्यावर टाकू नका!' या अर्थाची सूचना होती पण लोक तिथंच टाकायचे. तेव्हा तिथे मिलिंदा आणि मी लक्ष ठेवत असू. मिलिंदा 'गब्बर आ जायेगा' सारखा कुप्रसिद्ध होता. (तरी काही लोक ऐकायचे नाही ही गोष्ट वेगळी.)

माझे तिथले अजून आवडते ठिकाण म्हणजे Nandita ने सुचवल्याप्रमाणे मी आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी हा धागा उघडला होता. त्याच्या डोक्यावरची सूचना मी लिहिलेली आहे. शेवटचे वाक्य तेव्हा महत्त्वाचे होते कारण तसे वाद होत असत. हा सुद्धा माझ्या आवडीचा धागा होता. तिथे एकदा psg(की q? पूनम, पौर्णिमा) ने चकलीच्या सोर्‍याबद्दल विचारले होते. बरेच सल्ले आले, मी तिला मारुतीचा मेटलचा घ्यायला सांगितला. कधीकधी इथल्या चर्चा इतक्या परिणाम करतात की नंतर मला स्वप्न पडले, मी आणि पूनम चालत कुठेतरी फिरायला चाललो आहोत आणि मी तिला चकलीच्या सोर्‍याबद्दल सांगत आहे! Lol हे मी तिला कळवलंसुद्धा होतं. (एवढं होऊन तिने शेवटी मी सांगितलेला नाहीच घेतला वाटतं.)

मी मायबोलीवर आल्यावर सुरुवातीच्या काळातच 'कभी खुशी कभी गम' रिलीज झाला होता. तेव्हा "'कभी खुशी कभी गम' कसा वाटला?" असा धागा मी सुरु केला. तिथे लोकांनी आपापली मते, परीक्षण इ. लिहीले आणि मग यथावकाश तिथे इतर चित्रपटांची चर्चा सुरु झाली. कोणत्याही विषयाचा आवाका वाढवणे हे काम मायबोलीकर पूर्वीपासूनच करत आले आहेत. मग त्या धाग्याचे नाव बदलले गेले आणि 'चित्रपट कसा वाटला?' धागा अस्तित्वात आला.

'परदेशात रहाताना' हा एक विभाग मी नेहमी वाचायचे आणि तिथं लिहायचेही. २००३ च्या सुरुवातीला भारताने परदेशी भारतीयांना दुहेरी नागरिकत्व देण्याबद्दल प्रसारमाध्यमात चर्चा सुरु झाली. त्यासाठी मी दुहेरी नागरिकत्व हा धागा उघडला होता. Happy माहिती मिळाली पण तिथे नंतर 'दुहेरी कशाला हवे?' मग 'भारत-अमेरिका युद्ध झाले तर..?' इत्यादी फाटे फुटले आणि वाद झाला. तरी मी एकदा तिथे संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन 'तिळगूळ घ्या गोड बोला' असंही म्हटलं आणि झक्की तिथे अजिबात फिरकलेले नव्हते! vinaydesai (परदेसाई) होतेच पण ते वादात नव्हते. त्या वर्षाच्या शेवटी ते विधेयक पास झाले.

परदेशात आपल्या 'बबल' मध्ये रहाणार्‍यांबद्दल 'समांतर'वर मी चर्चा सुरु केली होती. तिकडे मात्र झक्की आहेत. keya (Anjali_28, अंजली) आहे आणि Abedekar ('लाल्वाक्का' नाव येण्यापूर्वी याने पहिल्यांदा मला 'लालूकाकू' केले होते.) 'अबे' आहे. अबे नेहमी इंग्रजीत लिहायचा. त्याच्याही मागे मराठी लिहिण्याबद्दल कटकट केली पण मिंग्रजीपेक्षा ते परवडले असे माझे मत होते. अंजली, बेटीने देवनागरीत चांगली मते मांडली आहेत. तिथे नंतर सगळे रोमन मराठी आणि इंग्रजी सुरु झाल्याने मी फिरकलेले दिसत नाही. Wink

'तुम्हाला काय वाटतं?' उर्फ ' 'V and C' दोन मोठ्या वादांत मी भाग घेतला होता ते धागे आता तिथे नाहीतच. (कारण माहीत नाही) पहिला म्हणजे 'सौंदर्यस्पर्धांच्या अनुषंगाने..' (म्हणजे थोडक्यात 'निमित्ताने' च की! असली नावे देताना आता सावध राहिले पाहिजे.) या चर्चेमध्ये पहिल्यांदा 'स्त्रिया, कमी कपडे, सौंदर्याची मोजमापे, पुरुष, स्पर्धा कशाला?' इ. चा उहापोह झाला. तिथे Shrini च्या मुद्द्यांना खोडायला मी लिहायला गेले आणि मग 'लगे रहो!' म्हणत डीजे (दीपांजली) आली. (तेव्हा 'गो!' ही टर्म नव्हती.) तेव्हापासून डीजे माझे मैत्रीण आहे. Happy तिथे मध्येच लिंबूटिंबू पण जोरात लढत होता असा त्याचा दावा आहे, पण मला हे नेमके आठवत नाही.

दुसरा वाद होता 'एम. एफ. हुसेन' आणि त्यांनी काढलेली हिंदू देवदेवतांची चित्रे. तेव्हापासून Gs1(जीएस) माझा मित्र आहे. Lol

हळदी-कुंकू सारखा "वाचनीय" तसंच, देव म्हणजे काय? या हजारांवर पोस्ट्सचा धागा अजून आहे. 'देव' वरच्या झक्कींच्या लेखनाबद्दल मी त्यांना त्यांची "इतर" पोस्ट्स माफ केली आहेत. Happy आणि Multiple IDs हा खरंतर वेगळ्या लेखाचा विषय वाटला होता, पण तिथे जे आहे त्याचीच पुनरावृत्ती होईल.

जुन्या मायबोलीत असेपर्यंत माझी 'अंताक्षरी' फेरी कधी चुकली नाही. मायबोलीवर आल्यानंतर प्रथम तिथंच जाणं व्हायचं. साध्या मराठी अंताक्षरीत सारखं सारखं 'ल' यायचं म्हणून नंतर त्याऐवजी 'अ, आ, इ, ई...." घेता येईल अशी सूट मिळाली मग पुन्हा कधी 'लिंबोणीच्या' लिहिलं नाही.

मराठी लॉजिकल अंताक्षरीवर 'भक्तिगीते', 'नाट्यगीते', 'पाऊस', 'सण', एखाद्या गायक-गायिकेची गाणी असे ठराविक विषय दर थोडे दिवसांनी येत. त्यात नाविन्य म्हणून एकदा 'आयडींची नावे असलेली गाणी' असे लॉजिक निघाले होते. हिंदी लॉजिकलमध्ये बरेच विषय असायचे. अनोखे बोल, अंगप्रदर्शन असलेली गाणी, नायक-नायिका पावसात भिजतात ती गाणी, वाहनात बसून म्हटलेली गाणी, वाद्य वाजवत म्हटलेली गाणी. लॉजिकल मराठी-हिंदी दोन्हीकडे अधूनमधून चालणारी 'कडव्यांची अंताक्षरी' माझी आवडती होती. कडव्याची सुरुवात शेवटच्या अक्षराने हवी, गाण्याची नाही. यामुळे पूर्ण गाणी आठवली जात.

नवीन मायबोलीत आल्यावर मात्र अंताक्षरी सुटली. आता ती 'अनंताक्षरी' झाली आहे. मुद्दाम धागा शोधून आता तिथे जाणे होत नाही. कधी डोकावले तर गाणं लिहीत नाही. पण ललितांसारखे जुने मेंबर अजूनही तिथे जातात ते पाहून मजा वाटली.

गुलमोहरावरही नेहमी फिरकत असे. क्वचित काही फुटकळ लिहिलंही होतं. त्याचा पसारा कमी होता तेव्हा बरचसं वाचलं जायचं. लोक तिथे लिहिताना नंतर आवर्जून देवनागरी वापरु लागले होते. 'निर्णय' हे शीर्षक असलेल्या डझनभर गोष्टी वाचल्या तश्याच सगळ्या कविता, गझल, ललितं आणि विनोदी साहित्य वाचलं. देवनागरी झाल्यापासून 'कुजबूज' वाचली. तेव्हा मायबोलीवरचा वावर वाढल्याने ती बरीचशी कळूही लागली होती. वळायला थोडा वेळ लागला. आधी कळत नसल्यामुळे ते 'जुन्या' लोकांसाठी केलेले 'कंपूलेखन' वाटायचे. Happy नंतरच्या काही अंकांत मग माझं नावही 'झळकलं'. 'कुजबूज' मध्ये तुमचा उल्लेख झाला म्हणजे तुम्ही 'लक्षवेधी' (कोणत्यातरी अॅन्गलने) आहात एवढे नक्की!

काही वर्षं जाऊनही कोल्हापूरच्या मायबोलीकरांची संख्या मात्र फारशी वाढली नव्हती. सीमा बर्‍यापैकी नियमितपणे येऊ लागली. बिट्टू, मनीष, झकासराव, अनामिक, स्वरुप, ऋतु_हिरवा हे अधूनमधून यायचे. मग दक्षिणा आली. (Dineshvs) दिनेशदा होतेच. (यांना कोणत्याही गावात टाकले तरी चालेल मी कोल्हापुरात टाकले.) सध्या मनकवडा, निवांत पाटील, kop असे काही नवे कोल्हापूरकर दिसतात.

हीच गत माझ्या आत्ताच्या गावाची. तिथे तर चिटपाखरु नसायचे. पूर्वी Virginia,Maryland,DC साठी एकच धागा होता. नंतर त्यातून MD बाजूला काढले. तसे तेव्हा sami, Dswati(स्वाती_दांडेकर), zakkas, kaarta हे मायबोलीकर होते. समि पूर्वी पार्ल्यात असायची. नंतर ती गायब झाली. बाकीचे अजूनही अधूनमधून येतात. पण माझ्याइतके पडीक माझ्या गावचे कोणी मायबोलीवर यायला मला २००७ (रुनी) पर्यंत वाट बघावी लागली.

इथे वावर वाढला तसे संवाद वाढले, वाद झाले. पण "भांडण झाले घोर तरीही, येत रहावे जात रहावे" म्हणून आणि "परस्परांना त्रास तरीही, परस्परांविण ना गत्यंतर" (पुढची ओळ हृद्य असल्याने लिहीत नाही) ओळखून आजतागायत येणं होतंच आहे.

या मायबोलीवरच्या ओळखीने झालेल्या मित्र मैत्रिणींना मग प्रत्यक्षात भेटण्याचीही संधी मिळाली. त्याबद्दल पुढल्या भागात.. "गटग/जीटीजी, एवेएठी आणि कल्लोळ - वृत्तांतापलिकडचे"

दशकपूर्ती -१

विषय: 
प्रकार: 

मी पैली! Happy
आता मग वाचते!

....वाचलंपण! खूप आवडलं. जुनी मायबोली कशी होती ती हळूहळू कळतंय.

हा ही भाग चांगला. इतके जुने तपशील तुझ्या लक्षात आहेत (अगदी कशावरून पासून ते कोणा व्यक्तीपर्यंत) याचे आश्चर्य वाटले.

केवढं काय काय लक्षात आहे तुझ्या.
पण आता आपण वेगवेगळ्या माबोवर होतो की काय असं वाटायला लागलंय मला हा लेख वाचून Proud

श्री, जुन्या लिंका आयई मधेच बर्‍या दिसतात. फाफॉ मधे त्याची रूंदी वाढते, मजकूर गायबतो इत्यादी.. तसेच आयईमधे वाचण्यासाठी सुद्धा तुला शिवाजी फॉन्ट(१,२ आणि ५) उतरवावा लागेलच.

केवढं ते लक्षात आहे.. कोण कधीपासून मित्र वगैरे... Proud

मी पन कोल्हापूरचाच की वोऽ.. पण अजून आपण मित्र नाही. त्यामुळे तुम्हाला लक्षात रहाणार नाही. सोडा Proud Light 1

लालू , मी कालच तुला विचारणार होते कि "कोल्हापूरी बाकरवडी" लक्षात आहे का? म्हणुन. Wink
त्यावेळी मी तशी नविन नविन होते मायबोलीवर. पार्ल्यात तेव्हा फक्त मेनु लिहिण्यासाठी जात असु. योगी नेहमी तिथे पेहरादार च काम करायचा. आणि गंमत म्हणजे त्यान आजतागायत(पार्ले आद्य असुनही) मेनु लिहिला नाहीये.(बरोबर ना रे योगी? ) पण खरा टाईमपास pp (आत्ताच पुपु) वर व्हायचा. तिथे पुण्यात रहाणारे कोणीच नव्हत खरं. सगळे इथले. चाफ्याने बाकरवडीचा विषय काढलेला आणि चितळेंची "The best" अस काही तरी म्हटलेल. त्यावरन वादावादी सुरु झाली. मग तीन गट पडले.(अर्थात मायबोलीची परंपरा Proud ) एक चितळे बाकरवडीच्या बाजुने , दुसरे चितळे विरुद्ध(कसली गुळमट असते ती अस म्हणणारे) आणि तिसरा नेहमी प्रमाणे बघे. Proud मग चाफा "गागुचका" म्हणाला. ज्यांना चितळे बाकरवडी आवडत नाही त्यांना. मग नुस्ती धम्माल खडाजंगी सुरु झाली. दुसर्‍या दिवशी तुझी रेसीपी आली. Lol दुपार झाल्यावर परत नेहमी प्रमाणे टाईमपास सुरु.

मला हे सगळं आठवतय (म्हणजे लालूची आणि माझी माबो एकच असावी :फिदी:)

माझ्या आठवणीत अंताक्षरीचे नाव पहिले पासूनच (किमान २००० पासून तरी) "अनंताक्षरी" आहे. तेव्हा ट्री व्ह्यु मधे दिसतांना फोल्डर "अंताक्षरी" दिसायचे आणि आतले ४ बीबी मात्र "अनंताक्षरी" नावाने होते. इतकी वर्षे नॉन स्टॉप सुरु असलेल्या या अंताक्षरीची नोंद गिनीज बुकात आणि लिमका बुकात करायला हवी अ‍ॅडमिनने. फार पुर्वी यात एक "शिघ्रकवींची अंताक्षरी" पण होती तिचीच पुढे "झुळूक" झाली.
नव्या मायबोलीत तो जुन्यातला ट्री व्ह्यु गेल्याने फार हळहळ वाटलेली. एका नजरेत सगळ्या हितगुजवर कुठे काय इन्टरेस्टींग सुरू आहे समजायचे.

लालू तुझ्या प्रत्येक भागावर मी आता कायतरी झब्बू देणारच. (नाही म्हटल्यास मी माझी वेगळी दशकपुर्ती सुरू करीन :हाहा:)

नव्या मायबोलीत तो जुन्यातला ट्री व्ह्यु गेल्याने फार हळहळ वाटलेली. एका नजरेत सगळ्या हितगुजवर कुठे काय इन्टरेस्टींग सुरू आहे समजायचे.<<< करोडो मोदक

हेच्चेच, मला इतरच काय काय पण आठवतंय म्हणून म्हणलं लालूची आणि माझी माबो वेगळी की काय ते.. Happy

कळलं ते मला. मी गमतीत म्हटलं Happy आता नव्या मायबोलीत तर जो तो आपापल्या आवडीच्या ग्रुप्स मधेच सामिल असेल तर इतर ग्रुप्स मधे काय सुरू आहे ते समोर सुद्धा येत नाही. त्यामुळे प्रत्येकाची खरच आपापली वेगळी मायबोली आहे म्हटल्यास आतिशयोक्ती अजिबात राहणार नाही.

नव्या मायबोलीत तो जुन्यातला ट्री व्ह्यु गेल्याने फार हळहळ वाटलेली. एका नजरेत सगळ्या हितगुजवर कुठे काय इन्टरेस्टींग सुरू आहे समजायचे.>>>
हो हो, ती पद्धत छान होती. नवीन प्रतिसाद कोणाचा आहे ते कळायचे, त्यामुळे मुद्दाम जाऊन प्रतिसाद वाचावा की नाही हे ठरवता यायचे. Wink Proud

Happy मस्त. मजा आहे ना कसली... व्हर्च्युअल आठवणी आणि व्हर्च्युअल मैत्री.... प्रत्यक्षात कशी कोणाशी ओळख, मैत्री इत्यादी झाली तेही वाचायला आवडेल.

मस्त. मलाही आठवते, प्रथम कुणाशी कसा वाद झाला, कशा ओळखी झाल्या , बिनसल्या Happy
गाजलेले वाद तर एवर्ग्रीन एकदम , सौन्दर्यस्पर्धा, आपल्या प्रथा, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव म्हणजे काय, वाकून नमस्कार Happy , हे कधी बदलणार? Lol

खरंच खूपच जुने संदर्भ आठवतायत तुला. तुझ्या लेखाच्या निमित्ताने जुन्या माबो आयडींचीही आठवण होतेय जे आता इथे दिसत नाहीत.

वाकून नमस्कार Lol
कुणी एक सोनाली (?) म्हणून आयडी होती. तिनं सगळ्या सासूसासर्‍यांना कामाला लावलं पाहिजे असं काहीस लिहीलं होतं Lol त्यानंतर जे धमाल सुरू झाली...

माझ्या आठवणीत अंताक्षरीचे नाव पहिले पासूनच (किमान २००० पासून तरी) "अनंताक्षरी" आहे. तेव्हा ट्री व्ह्यु मधे दिसतांना फोल्डर "अंताक्षरी" दिसायचे आणि आतले ४ बीबी मात्र "अनंताक्षरी" नावाने होते.<<< हो.

त्यामुळे प्रत्येकाची खरच आपापली वेगळी मायबोली आहे म्हटल्यास आतिशयोक्ती अजिबात राहणार नाही. <<< प्रत्येकाचा हत्ती वेगळा. Happy

लालू, तुझा तो बाकरवडीच्या पाकृचा बीबी त्या कंसातल्या पुरवणीनेच माझ्या लक्षात आहे.

ट्रीव्ह्यू. सोमवारी सकाळी येऊन उघडला की एक दिवसाचा ट्रीव्ह्यू एकदम रिकामा असायचा. मग तीन दिवसांचा उघडायला लागायचा. पण तासादोनतासातच अख्खा ट्रीव्ह्यू पुन्हा उभा राहायचा. Lol नव्या मायबोलीत आल्यावर त्या ट्रीव्ह्यूसाठी अ‍ॅडमिनकडे जिथे सांधा मिळेल तिथे टुमणे वाजवले.

ओह लिंक बघितल्यावर आठवलं लालू. पण मग बहुतेक कोतबो किंवा तत्सम ठिकाणी मी_ना यांनी पण असंच काहीतरी लिहिलं होतं नव्या माबो वर किंवा 'जुन्यापासून नव्यापर्यंत' या माबोच्या काळात...

मध्यन्तरी एक स्वराली आली होती इथे. तेव्हा मी विचारलं पण होतं लोकांना ही 'ती' स्वराली तर नव्हे? म्हणून . पण सगळ्यांना संदर्भ आठवत नसावा बहुधा तेव्हा.
नी, मी_ना चा वेगळाच एक वादग्रस्त बाफ होता. Happy चांगलाच लक्षात आहे बर्‍याच लोकांच्या तो!!

Pages