डाळिंब्यांची उसळ

Submitted by सायो on 11 July, 2008 - 18:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोड आलेले वाल / डाळिंब्या, फोडणीचं साहित्य, थोडासा गुळ, छोटा सुक्या खोबर्‍‍याचा तुकडा, हिरव्या मिरच्या(चविप्रमाणे), जिरं, एखादं आमसूल, थोडं ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ,कढिपत्ता, हवं असल्यास किंचित लाल तिखट.

क्रमवार पाककृती: 

वाल/डाळिंब्यांना मोड काढावेत. मोड आलेल्या डाळिंब्या गरम पाण्यात टाकाव्यात म्हणजे सालं पटपट निघून येतील. सगळ्या डाळिंब्यांची सालं काढून झाली की कुकरला लावून एक शिट्टी करुन घ्यावी.
सुक्या खोबर्‍याचा एक छोटा तुकडा गॅसवर भाजून घावा.व मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना त्यात थोडं जिरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ घालावं. तेलाची मोहरी,जिरं, हिंग,हळद,कढिपत्ता घालून फोडणी करुन घ्यावी. त्यावर शिजलेल्या डाळिंब्या घालाव्यात. एक उकळी आल्यावर त्यात वाटलेला मसाला, गूळ, आमसूल, मीठ घालावे.हवं असल्यास थोडं लाल तिखटही घालावं. पाणी अंगासरशी असू द्यावे. वरुन ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी.

अधिक टिपा: 

डाळिंब्या गरम पाण्यात टाकल्याने कुकरला एकच शिट्टी पुरते आणि नंतरही जास्त शिजवायला लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
आईची रेसिपी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्लर्प!
Happy मी एका ठिकाणी कूकरच्या ऐवजी गॅसवरच मंद आचेवर शिजवलेली (केवढे पेशन्स!) उसळ खाल्ली होती. आहाहा!! अप्रतिम!

हे कडवे वाल ना? याला 'वालाचं बिर्डं' ही म्हणतात. बहुतेक सीकेपी लोकांच्यात दर गुरुवारी करतात किंवा करायचे. आमच्याकडेही भयंकर आवडतात. नवरा अमराठी असूनही आवडीनं खातो फक्त तो याला 'वॉल' म्हणतो. Happy

मीही कुकरमधे न शिजवता डायरेक्ट शिजवते. फार काही जास्त वेळ लागत नाही. मात्र अशावेळी गूळ / साखर एक वाफ आल्यावर घालावे. किंचित आल्या-लसणाचं वाटण लावलं तर वालाचा उग्र वास नाहिसा होतो. अगदी शिजेलसं पाणी घालून सुकं बिर्डंही उत्तम लागतं. सुकं करताना चमच्यानं न हालवता, संडशीत धरून पातेल्यात हासडावं. अगदीच नाहीतर अगदी हलक्या हाताने चमचा फिरवावा.

हो मामी, कडवे वालच.

डाळिंब्याची उसळीसाठी नवर्‍याने १०० पैकी १०० मार्क दिले आज. म्हणजे झक्कास झाली हे सांगायला नकोच.

आई करते कधीतरी. पण मला सालं काढून बिरडं करता येईल याचा कॉन्फिडंस नाही आला अजूनतरी. (आईला कधी करताना बघितलं पण नाहीये. नुसतंच खाण्याचं काम केलंय). आता एकदा तिकडून वाल आणून करून बघावेच. Happy

एरवी डब्यासाठी करताना मी प्रेशर पॅनमधे फोडणी करून त्यात डाळिंब्या परतून , बाकी साहित्य घालून दोन शिट्या काढते. पण पुजेसाठी किंवा खास प्रसंगी डाळिंब्या करायच्या असल्यास नारळाच्या दुधात शिजवत ठेवते आणि मग वरून फोडणी घालते.
दादरच्या प्रकाश हॉटेलमधे मिळणारी डाळिंब्यांची उसळ नारळाच्या दुधातलीच असते.

सायो, गोडा मसाला नाही का घालत डाळिंब्यांना?

सायो, बिरड्याची कृती थोडी वेगळी आहे. त्याला रस जास्त असतो.
इथे मृ ने दिली आहे - http://www.maayboli.com/node/7628

त्यातही थोडाफार फरक असतो. मी गरम मसाला घालत नाही, जिरे वाटणात घेते आणि टोमॅटो अजिबात नाही. आमसूल किंवा कैरीच.

पाहिली मृची रेसिपी. खूपच वेगळी आहे. रश्श्याचा रंगही खूपच वेगळाय. त्यावर मी बराच टिपी केलाय नी रेसिपी आठवतही नाहीये Uhoh

मी गोडा मसाला घालते आणि मंजूडी म्हणाली तशी प्रेशर पॅनमधे करते. हिरव्या मिरच्या नाही घालत आणि आमसूलही. लाल तिखट, मीठ, मसाला, गूळ. भरपूर ओलं खोबरं आणि कोथिंबीर मस्ट!
अशीही करून बघेन आता.
तसंच नारळाच्या दुधाचं प्रथमच ऐकलं. तोही प्रयोग करणेत येईल.

त्याची रेसिपी खास वेगळी अशी नाहिये गं. सोललेल्या डाळिंब्या नारळाच्या दुधात शिजवत ठेवायच्या. शिजत आल्या की बाकी माल मसाला, ओलं खोबरं घालून वरून फोडणी घालायची. आणि नारळाच्या दुधाचं प्रमाण ऐच्छिकच.. मी डाळिंब्या बुडतील इतकं घेते, डाळिंब्या शिजण्यासाठी कमी पडलं तर पाणी घालता येतं.

कडवे वाल/डाळिंब्या/बिरड्या हा माझा विक पॉईंट!
कोणत्याही पद्धतीने/कशाही केल्या/केली तरी आवड्णारच. मी पण सुट्याच गॅसवर शिजवते.
मोड आणायला आईची पद्धत. आज रात्री भिजवले, उद्या रात्री उपसले, परवा परत पाण्यात घातले आणि मग सकाळी घरादाराला सोलायला बसवले Happy
आता ह्या विकेंडला करायलाच हवी.

आमच्याकडे हि लाल आणि हिरवी अशा दोन्ही पद्धतीने होते. मग उरलेच तर पडवळ, कंटोळी अशा भाज्यात किंवा, खिचडी मधे.

एकदा आमच्या शेजारणीने आईला कृति विचारून वालाची डाळ वापरुन ही कृति केली होती, आणि आईला नमुना पाठवला होता, तेव्हापासून आई जरा जास्तच करते आणि तिला पाठवते..

मामी... हिरवे वाटण... !!

मागच्याच आठवड्यात जुन्या माबो मधली तुझी रेसिपी पाहून वालाची उसळ केली होती सायो. आणी ती इतकी छान झाली होती की आज परत बेत आहे. मी खोबरं जिरं आणी कोथिंबीर मिक्सर मधून काढतानाच त्यात नारळाचं दूध टाकलं होतं आणी परत लागेल तसं अ‍ॅड केलं उसळीत. छान चव येते नारळाच्या दुधाची.

मी मृ च्या पद्धतीने बिरडं केलय. आता हे करुन बघेन. परवाच वाल आणलेत.

अल्पना, गरम पाण्यात घातले वाल तर खूप पटापट सालं निघतात गं.

व्वा! आमच्याकडे अशाच पध्दतीने व्हायची वालाची उसळ. आज्जीला खूप आवडायची. दर शुक्रवारी वाल सोलायचा कार्यक्रम असायचा, रात्रीची रेडियोवरची श्रुतिका ऐकता ऐकता. आणि शनिवारी सकाळी त्याची ह्याच प्रकारच्या रेसिपीने उसळ. आता घरी कोणी इतके वाल सोलायचे कष्ट (!) घेण्यात इंटरेस्टेड नसल्यामुळे आयती मिळाली तरच खातो! Wink

मी पण अशीच करते. फक्त कुकरला न लावता खूप वेळ शिजत ठेवते मंद आचेवर. मला वाल खूप शिजलेले नाही आवडत. अगदी बोटचेपे आवडतात.
इकडे अमेरिकेत कडवे वाल मिळतात का?

मी पण एरव्ही तेच वापरते गं. देशातून आणते दरवेळी , तेव्हढचं ३-४ दा कडव्या वालाचं बिरडं मिळतं खायला.

मामी वालाच बिरड माझ वीक पॉईंट्.आमच्याकडे वालाची डाळ मिळते त्याची सूकी भाजी करतात. शीवाय पावसाळ्यात ऊगवलेले वालाचे मोड खायला देखील मजा येते. श्रावणात आमच्याकडे घराघरातून बिड्डा भाताचा बेत असतो.

पांढरे वाल म्हणजे पावटे. ते गोडसर असतात. तेही चांगलेच लागतात.

कडव्या वालाची अथवा पावट्याची डाळही मिळते. मिश्र डाळींचं आंबटवरण करताना त्यात ही वालाची डाळही थोडी घातली तर खुप वेगळा स्वाद येतो. मात्र आंबटवरणाला लसूण आणि लाल मिरच्यांची झणझणीत फोडणी मस्ट!

आई उन्हाळ्यात ५-६ किलो (किंवा जास्तही असेल) वाल विकत घ्यायची मग ते निवडण्याचा कार्यक्रम असायचा. एकदम खराब वाल टाकायचे. जे तेजस्वी, टपटपीत असतील ते वेगळे आणि टाकाऊ नसलेले पण बेस्टही नसलेले वेगळे करायचे. सगळ्यात चांगल्या वालांना रोज सकाळी उन्हात टाकायचं आणि संध्याकाळी घरात आणून ठेवायचं असं ७-८ दिवस करायचं. मग त्यांना एरंडेल तेल लावून ड्ब्यात बंद करून ठेवायचं. असे ते वाल वर्षभर टिकत. दुसर्‍या क्रमांकाच्या वालाची डाळ करून आणायची आणि वापरायची.

माझी पद्धतही सेम सायोसारखीच, कढीपत्ता मायनस, आणि जर नैवेद्याला नसेल, तर वाटणात लसणाच्या दोन पाकळ्या प्लस. मस्त लागते.
मन्जू, नारळाच्या दूधाची आयडिया भारी आहे.

अकु, अगं मोड आलेले वाल मिळतात की विकत. 'मूगअनमटकीवाऽऽऽल' Happy भाजीवाल्यांकडे असतात सर्रास भिजवलेली कडधान्ये.

Oops! डाळीब्यांच्या ऐवजी मी डाळींब वाचल, नंतर समजल वाल म्हणजे डाळींब्या. शब्दसंग्रह वाढवायला पाहीजे.
असो, माझी आई आमसुल ऐवजी टॉमॅटो वापरून मोड आलेल्या वालाची (बिरड्याची) भाजी बनवते, त्याची चव आणि रंग तर अप्रतिम, रेसेपी नंतर कधीतरी वाढेन Happy

Pages