डाळिंब्यांची उसळ

Submitted by सायो on 11 July, 2008 - 18:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोड आलेले वाल / डाळिंब्या, फोडणीचं साहित्य, थोडासा गुळ, छोटा सुक्या खोबर्‍‍याचा तुकडा, हिरव्या मिरच्या(चविप्रमाणे), जिरं, एखादं आमसूल, थोडं ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ,कढिपत्ता, हवं असल्यास किंचित लाल तिखट.

क्रमवार पाककृती: 

वाल/डाळिंब्यांना मोड काढावेत. मोड आलेल्या डाळिंब्या गरम पाण्यात टाकाव्यात म्हणजे सालं पटपट निघून येतील. सगळ्या डाळिंब्यांची सालं काढून झाली की कुकरला लावून एक शिट्टी करुन घ्यावी.
सुक्या खोबर्‍याचा एक छोटा तुकडा गॅसवर भाजून घावा.व मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना त्यात थोडं जिरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ घालावं. तेलाची मोहरी,जिरं, हिंग,हळद,कढिपत्ता घालून फोडणी करुन घ्यावी. त्यावर शिजलेल्या डाळिंब्या घालाव्यात. एक उकळी आल्यावर त्यात वाटलेला मसाला, गूळ, आमसूल, मीठ घालावे.हवं असल्यास थोडं लाल तिखटही घालावं. पाणी अंगासरशी असू द्यावे. वरुन ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी.

अधिक टिपा: 

डाळिंब्या गरम पाण्यात टाकल्याने कुकरला एकच शिट्टी पुरते आणि नंतरही जास्त शिजवायला लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
आईची रेसिपी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, भारी विषय काढून ३ वर्ष व्हायला आली. त्यावर दोन दिवसांपूर्वीच पहिलं पोस्ट आलं आडोचं. इतकी वर्ष हा बाफ अगदी दुर्लक्षित होता.;)

अरे बाप रे! तब्बल ३ वर्षांनी हा धागा वर आलाय की....
पौर्णिमा, धन्स गं. मी पाहिलेत भाजीवालीकडे मोड आलेले वाल. आता ठरवून करायला हवी डाळिंब्यांची उसळ, तरच होईल. (मेंदूला वालाच्या खरेदीची सवय उरली नाहीए. ;-))

ते भाजीवाल्यांकडे मिळणारे वाल कुठल्या पाण्यात भिजवतात कुणास ठावूक. त्यापेक्षा एक वीक एंड खास वाल सोलण्यासाठी राखीव ठेवावा.

सायो, वालाला मोड यायला वेळ लागणारच ना ? Proud

रच्याकने, परवा शोनूची ब्रेडची कृती अशीच १ की २ वर्षांनी वर आली. तिच्या ब्रेडचं पीठ फर्मेंट व्हायला तेव्हढा वेळ लागत असेल Wink

मी परवा केली डाळिंब्यांची उसळ वा वालाचं बिरडं...या रेस्पीप्रमाणे...झक्क झालं होतं...
पण....बुवा खूपच काम आणि तशी इतर उसळींसारखीच लागली....(म्हणजे जमली नाही म्हणावं का?)

हे घ्या
dalimbitaat.jpg

हे घ्या
dalimbi usal.jpg

मस्तच झालेली.
मी हिरवी मिरची घालत नाही,लाल तिखट आणि वाटप घातलंय.

कढईत थोडी उसळ शिल्लक असतानाच भात परतून घेतला आणि मस्त डाळिंबी भातही खाल्ला.(आमची ब्वा कोंकणी पद्धत - पातेले पुसून खाण्याची Happy )

आडोबाई या नव्या माबोवर (म्हणजे जुनीच आहे आता) पटापट चित्र चिकटवता येत नाहीत.
मगाशी चिकटवलेलं चिकटलंच नाही हो.

सायो, छान झाली गं उसळ. सोलणे कंटाळवाणे असल्याने खूप दिवस करत नव्हते. साबांना मसाला आवडत नाही. तरी ह्या पद्धतीने केलेली आवडली. थांकु!

कुकरात शिजवल्याने अन परत शिजवल्याने त्या एकदम मउ होणार नाहीत का? डाळिंब्या शिजायला खुप सोप्या असतात.

ओहो माझी अत्यंत आवडती... स्लर्प!!

आमची ब्वा कोंकणी पद्धत - पातेले पुसून खाण्याची >> साती Wink Happy अगदी अगदी!! आणि अशी चमचमीत रेसिपी असेल तर तेवढी तरी वाया का घालवा?? Wink

मस्त आहे रेसिपी!
करावी म्हणून वाल भिजत घातले. मोड आलेल्या वालांमधे काही काळ्सर दिसताहेत. एखाददुसरा पूर्ण काळा झालाय. म्हणजे खराब निघाले का ते वाल ? ते काळे टाकुनच द्यायचे ना?

माझाही आवडता प्रकार. आतां तर पावट्याच्या शेंगा [वाल पापडी] यायला लागल्यात बाजारात. त्यातल्या ताज्या पावट्यांची उसळही अप्रतिम [अर्थात सोलण्याची मेहनत आहेच तिथंही ] !

Pages