मज्जिगे हुळी

Submitted by मेधा on 13 March, 2011 - 21:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोहळ्याचे चौकोनी तुकडे दोन कप
अर्धा कप ओले खोबरे
४-५ हिरव्या मिरच्या
१ चमचा च डाळ, १ चमचा तीळ, १/२ चमचा जिरे
.अर्धी वाटी घट्ट दही - जरासे आंबट असावे.
फोडणी साठी मोहरी, हिंग , सुक्या मिरच्या कढीपत्ता

क्रमवार पाककृती: 

कोहळ्याचे तुकडे, हळद मीठ घालून थोड्या पाण्यात शिजत लावावेत.

चमचाभर खोबरेल तेलात मिर्च्यांचे तुकडे परतून घ्यावेत. मिर्च्या बाजूला काढून च डाळ, तीळ व जिरे परतून घ्यावे.

मिरच्या व खोबरे बारीक वाटावे. शेवटी च डाळ, जिरे व तीळ घालून ३० सेकंद वाटावे.
कोहळा शिजला की वाटण व दही घालावे. लागेल तसे मीठ घालावे. एखादी उकळी येऊ द्यावी, दही घातल्यावर फार उकळू नये.
आवडत असल्यास खोबरेल, नाहीतर साध्या तेलावर मोहरी , हिंग हळद , सुक्या मिरच्या, कढीपत्ता यांची फोडणी करून भाजीत ओतावी.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

कोहळा, तवशे, मोठी काकडी इत्यादी ( कोकणीत उदुकुळी - पाणीदार ) भाज्यांचा हा टिपिकल प्रकार. दुधी, झुकिनी, स्क्वाश वगैरे घालून पण करता येईल.

मज्जिगे म्हणजे ताक, पण या भाजीत दहीच घालतात, तरी मज्जिगे हुळी का म्हणतात कोण जाणे !

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, छान वाटते आहे कृती. थोडा अवियल सारखाप्रकार आहे ना? इथे कोहळा मिळाला नाही तर अजून काय (काकडी सोडून) वापरता येईल? आणि पाककृती सार्वजनिक करशील का?

वा वा, बंगलोरात खायचे मी बर्‍याचदा हा प्रकार.... मला नाव वाचून आधी मठ्ठ्याचा अजून एखादा प्रकार असावा असे वाटले होते.

अरे वा! मला ताक/दह्यातले प्रकार भारी आवडतात, तेव्हा नक्की करून बघणार.

>> पाणीदार भाज्यांचा हा टिपिकल प्रकार.
अंजली, म्हणजे दुधी भोपळा, यल्लो स्क्वाश, दोसाकाई (हे इन्ग्रोत मिळतं), कलिंगडातला पांढरा गर वगैरेंची करता येईल बहुतेक.

मेधा, छान आहे हा प्रकार. फार्मर्स मार्केटमधे कोहळा मिळतो आणुन करावे लागेल.

तवशे म्हणजे सांबार काकडी ना? त्याचे सांबार नेहेमीच्या सांबारपेक्षा वेगळे असते असे कळले. मी नेहेमीच्या सांबारातच ती काकडी घालते कधीकधी. तुला ते सांबार ठावूक असेल तर रेसिपी देशील का?

तवसं असे असते http://en.wikipedia.org/wiki/File:GNTdosakai.jpg

अंजली_१२, हुळी म्हणजे आंबट!!

हुळी हा शब्द आंबट अशा अर्थाने पण वापरतात बहुतेक बिसीबेळे हुळी अन्ना ( ज्याला शुद्ध मराठीत भिशीब्याळी अण्णा म्हणतात ) त्याचा अर्थ गरम ( बिसी ) डाळ ( बेळे ) हुळी ( आंबट ) भात ( अन्ना) असा होतो. कैर्‍या , चिंचा हुळी आहेत का नाहीत वगैरे अर्थाने वापरला जातो.

हुळी म्हणजे आंबट!!>>> हुळी म्हणजे आमटी/सांबार हो ! स्मित >> नक्कीच नाही. हुळी म्हणजे आंबटच! कानडी शब्द आहे.

घरी विचारल्यावर कळलंय की हुळी हा शब्द आंबट म्हणुन पण वापरतात अन पातळसर आमटी सारख्या पदार्थांना पण वापरतात. भेंडी, फरसबी, कच्ची केळी, वगैरे घालून पण हुळी करतात. सर्वसाधारणपणे यात डाळ नसते.