महिला दिन २०११ - स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो - १)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2011 - 13:03

नमस्कार,

महिला दिन २०११ निमीत्ताने आपण खेळूया एक खोखो !

कधी कधी एखादा शब्द स्वतःभोवती अनेकपेडी अर्थांचे, अनुभवांचे, जाणिवा आणि समजांचे, क्वचित गैरसमजांचेही पदर घेऊन येतो. असा शब्द ऐकला, वाचला आणि काहीच फरक न पडता, तिथेच सोडून पुढे गेलं असं घडत नाही. अगदी उघडपणे नाही तरी मनातल्या मनात का होईना आणि अख्खं मन व्यापून नसेल तरी मनाच्या एखाद्या कोपर्‍यात, काही क्षणांपुरती का होईना, बरीवाईट प्रतिक्रिया उमटतेच.

असाच एक शब्द म्हणजे 'स्त्रीमुक्ती'.

बर्‍याच जणांच्या जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या कुतुहलाचा तर काहीजणांच्या टिंगलटवाळीचाही. मुख्य म्हणजे बर्‍याच जणींना आत्मभान देणारा. हक्क आणि त्याचबरोबरीने येणार्‍या जबाबदार्‍यांची जाणीव करून देणारा. स्वतःलाच जोखायला आणि ओळखायला शिकवणारा. मुक्त, मुक्त म्हणजे तरी काय म्हणे? एखादी साधी, सोपी, सरळ आणि बहुसंख्य समाजमनाला मान्य होणारी व्याख्या आहे का? कोण्या एका वा एकीला जी व्याख्या मान्य असेल, जवळची वाटेल, तशी त्याच तीव्रतेने दुसर्‍या व्यक्तीला महत्वाची आणि आपलीशी वाटेलच, असं नसतंच कधी.

तरीही, स्वतःच्या मनात डोकावून स्वतःलाच हा प्रश्न विचारुन पाहिला आहे कधी? स्त्रीमुक्ती ह्या शब्दातून तुम्हांला काय अपेक्षित आहे? काय वाटतं? तुमचेही काही विचार असतील, अनुभव असतील, मतं असतील. इतरांप्रमाणेच असतील, वा हटके. जोवर ही मतं, विचार तुमचे स्वतःचे आहेत, प्रामाणिक आहेत, तोवर ते इतरांसमोर मांडायला, चर्चा करायला काय हरकत आहे?

तर, तुमची स्वतःची मतं, विचार मांडायला संयुक्ताने तुम्हांला संधी उपलब्ध करुन द्यायचं ठरवलंय. तेव्हा, येणार्‍या महिला दिनानिमित्त, 'स्त्रीमुक्तीबद्दलच्या माझ्या कल्पना' हा विषय घेऊन तुमचे विचार, मतं आणि अनुभव आम्हांलाही सांगाल?

साधारण कल्पना अशी -

'स्त्रीमुक्तीबद्दलच्या माझ्या कल्पना' (मी पाहिलेली/अनुभवलेली/ आचरणात आणलेली स्त्रीमुक्ती) ह्यावर तुमची मतं, विचार, अनुभव, निरीक्षणं लिहिणं अपेक्षित आहे. या मनमोकळ्या गप्पा असल्यामुळे किमान किंवा कमाल शब्दमर्यादा नाही. तुमचं लिहून झालं की तुम्ही आणखी दोन व्यक्तींना 'खो' देऊन लिहितं करू शकाल.
- आपण स्त्री किंवा पुरूष कोणालाही 'खो' देऊ शकता. प्रत्येकी २ 'खो' देता येतील.
- जिला/ज्याला 'खो' दिला आहे त्या व्यक्तीने जास्तीत जास्त २४ तासांत आपले पोस्ट टाकणे अपेक्षित आहे. काही कारणाने जर आपण 'खो' घेऊ शकत नसाल तर तसे नमूद करुन पर्यायी खो देऊ शकता.
- हा धागा १ आठवडा चालू राहील.

तळटीप
१. हा धागा मॉडरेटेड आहे याची कृपया नोंद घ्यावी.
२. आपले सहकार्य अपेक्षित आहे. कृपया विरोधी मतांच्याही मतस्वातंत्र्याचा आदर राखून आपली मते मांडावी.

३. आपल्याला खो मिळू शकला नसेल, व आपल्याला खोमध्ये भाग घेऊन काही मतं मांडायची असल्यास, संयोजकांच्या विपूमध्ये तसे कळवावे.

संयोजक खो (१) अरुंधती कुलकर्णी
अरुंधती खो (१)- मानुषी , अरुंधती खो (२)- हिरकु (मुदतवाढ)
मानुषी खो (१) - वर्षू नील मानुषी खो (२) - चिनूक्स
हिरकु खो (१)- मामी, , हिरकु खो (२)- टण्या
टण्या खो (१)- ऋयाम, टण्या खो (२)- पराग
मामी खो (१)- ठमादेवी, मामी खो (२)- अश्विनीमामी
ठमादेवी खो (१) - डॉ. कैलास गायकवाड ठमादेवी खो (२) - मवा
अश्विनीमामी खो (१) - आशूडी अश्विनीमामी खो (२) - पौर्णिमा
आशूडी खो (१) - प्राची आशूडी खो (२) - शैलजा
शैलजा खो (१) - सायो शैलजा खो (२) - मिनोती

अरुंधती कुलकर्णी | 7 March, 2011 - 21:08
'स्त्रीमुक्तीबद्दलच्या माझ्या कल्पना' (मी पाहिलेली/अनुभवलेली/ आचरणात आणलेली स्त्रीमुक्ती)

दृश्य एक : बंगलोरजवळचा एक छोटासा पाडा. माझी मैत्रीण तेथील अशिक्षित, आदिवासी जमातीतील बायकांना ज्यूटच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण द्यायला जाते. बहुतेकींचे नवरे बिनाकामाचे. ताडी ढोसतात व त्या नशेत बायकांना मारहाण करून त्यांनी कष्टाने मिळवलेले पैसे हिसकावून घेतात. एका स्वयंसेवी संस्थेने ह्या स्त्रियांना मोलमजुरी व्यतिरिक्तही उत्पन्न मिळावे म्हणून त्यांच्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केले. आणि ह्या सर्व महिलांना पोस्टात बचत खाते उघडायला, आपल्या नावाची सही करायला शिकवले. मी तिथे गेले तेव्हा काहीजणींची पोस्टातील बचत खात्याची कोरी करकरीत पासबुके आली होती. मोठ्या गर्वाने त्या हातातील पासबुके आपल्या शिक्षिकेला दाखवत होत्या. एकीने लाजत लाजत आमच्या आग्रहाखातर तेथील धुळीत स्वतःच्या नावाची सही करून दाखवली. स्वयंपूर्णतेकडे ह्या स्त्रियांनी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल.

दृश्य दोन : पुण्याच्या वडारवाडी झोपडपट्टीतील एक झोपडीवजा घर. इथे पंधरा ते अठरा वयोगटातील दहा-बारा मुली एकत्र जमल्या आहेत. माझी एक मैत्रीण त्यांना इमिटेशन ज्वेलरी बनवायला, व्यावसायिक पद्धतीची मेंदी काढायला व हातकागदाच्या सुंदर सुंदर पिशव्या बनवायला शिकवत आहे. उद्देश हाच की जेमतेम चौथी-पाचवी पर्यंत शिकलेल्या, इतरांच्या घरी धुणी-भांडी-वरकाम करणार्‍या या मुलींना स्वतःतील कलाही जोपासता यावी तसेच उत्पन्नाचा अजून एक मार्ग खुला व्हावा. एकमेकींच्या हातांवर काढलेली मेंदी दाखवताना त्या मुलींच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद अवर्णनीय असतो.

दृश्य तीन : एका मुस्लिम शिक्षण संस्थेच्या स्त्रियांसाठीच्या महाविद्यालयातील सभागृह. व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या शेवटच्या दिवशी एरवी गोष्यात वावरणार्‍या सर्व मुलींना जेव्हा ''हम होंगे कामयाब'' गाण्याच्या धुनेवर गायला, ताल धरायला सांगितले जाते तेव्हा त्यांच्या डोळ्यांत लकाकलेली स्वप्ने केवळ बघण्यासारखी असतात. खुलेपणाने हसत, एकमेकींना प्रोत्साहन देत त्या हलकासा पदन्यास करतात. एकमेकींचे हात घट्ट पकडून रिंगण धरतात. त्यांच्या नजरेत चमकणारा आत्मविश्वास आणि ओठांवरचे खळाळते हास्य भारावून टाकणारे असते.

दृश्य चार : प्रसूतितज्ञ मैत्रिणीचा एका गावात असलेला दवाखाना. बाहेर तपासणीसाठी आलेल्या अनेक स्त्री रुग्णांमध्ये काही जेमतेम सतरा - अठरा वर्षांच्या लग्न झालेल्या मुली. मैत्रीण वैतागून सांगते, तिच्याकडे येणाऱ्या केसेसमधील अनेक स्त्रिया वयाच्या सतरा-अठराव्या वर्षीच माता होतात. बहुतेक स्त्रिया अ‍ॅनिमिक किंवा कुपोषित. त्यातून त्यांना जर मुलगी झाली तर सासरचे लोक बाळ-बाळंतिणीला बघायलाही फिरकत नाहीत. अशा मुलींचे, त्यांना होणाऱ्या मुलींचे भवितव्य तरी काय? मैत्रीण कळवळून विचारते. माझ्याकडेही उत्तर नसते.

भारतातील स्त्रियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण : ५४. १७ %
युनिसेफच्या अहवालानुसार भारतातील जन्म झालेल्या परंतु त्यानंतर काहीही ठावठिकाणा नसलेल्या मुलींची संख्या : ५० दशलक्ष
वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत विवाह होणाऱ्या भारतीय स्त्रियांचे प्रमाण : ४४. ५%
सोळाव्या वर्षाअगोदरच विवाह होणाऱ्या भारतीय स्त्रिया : २२. ६%
दहा - बारा वर्षांपूर्वीच्या राष्ट्रीय पातळीवरील गुन्हा-नोंदीच्या अहवालानुसार भारतात स्त्रियांविरुद्ध गुन्ह्यांच्या नोंदी : १५, ४६८ बलात्कार, ३२, ३११ विनयभंगाचे गुन्हे, हुंडाबळी ६६९९, कौटुंबिक हिंसाचार ४३८२.
सोळा किंवा त्याहून कमी वयाच्या मुलींवर होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण : ३०%.
विवाहित स्त्रियांमधील कुपोषण : ३३%
भारतीय स्त्रियांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण : ५६. २%

भारतासारख्या प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या देशातील स्त्रियांसंदर्भातील हे आकडे आहेत, तर अजून अविकसित देशांमधील आकडेवारीची कल्पनाच न केलेली बरी!

अनेक शतके उलटून गेली, परंतु स्त्रियांना आजही समाजात दुय्यम दर्जा दिला जातो हे उघड वास्तव आहे. कायदे, नियम, घटना, न्यायव्यवस्था यांनी ह्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी लक्षणीय पावले उचलली आहेत. समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळतात. ह्या लढ्याला स्त्री-मुक्तीचे नाव जरी मिळाले तरी खरे म्हणजे ती आहे जगण्याची धडपड! स्त्री -मुक्तीचा विषय व्यापक असला तरी तिची व्याख्या व्यक्तीसापेक्ष आहे. परंतु उद्देश मात्र एकच आहे; स्त्रीला एक माणूस म्हणून खुलेपणाने जगता येण्याचा!

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-मुक्तीसारख्या विषयाला हात घालताना माझ्या घरातील स्त्रियाच माझ्या डोळ्यांसमोर उभ्या ठाकतात.

आमच्या घरात मी खंबीर, कार्यकुशल आणि धडाडीच्या स्त्रियांचा वावर जास्त पाहिला आहे. खडतर परिस्थितीत उगाच न रडता, नशिबाला - स्त्री जन्माला वगैरे कसलेही बोल न लावता पुढ्यातील कामे सफाईने पार पाडणार्‍या ह्या स्त्रिया.... जास्तीच्या जबाबदार्‍यांनी डगमगून न जाणार्‍या, वेळप्रसंगी स्वतंत्र निर्णय घेणार्‍या व त्या निर्णयांशी ठाम राहणार्‍या माझ्या आयुष्यातील आई, आजी, मावश्या....

स्त्री-मुक्ती सारखे शब्द आजीच्या काळात प्रचलितही नसतील कदाचित. तिच्या वेळी समाजातील सर्व समीकरणेच वेगळी होती. कोंकणातील एका आडगावातील इ. स. १९२१-२२ च्या दरम्यानची दहा-अकरा वर्षांची बालविधवा म्हटल्यावर तिचे भवितव्य केशवपन करून, आलवण नेसून गोठ्यात मुक्काम करायचा, इतरांच्या संसारांत राब राब राबायचे आणि आयुष्य पिचत काढायचे हेच जवळपास पक्के होते. परंतु थोरल्या बंधूंच्या प्रयत्नांमुळे तिला पुण्यात कर्व्यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत शिकायची संधी मिळाली आणि तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. समाजात सन्मानाने जगण्याची, आत्मनिर्भर होण्याची वाट तिच्यासाठी खुली झाली.

आजीच्या लेखी तिला कर्व्यांच्या संस्थेत मिळालेले शिक्षण, नंतर संस्थेच्याच अनाथ हिंदू महिलाश्रम शाळेत तिने केलेली प्राथमिक शिक्षिकेची नोकरी, माझ्या आजोबांशी झालेला तिचा विवाह, नोकरीच्या निमित्ताने सुधारक मंडळींशी आलेले संबंध व समाजात पुन्हा प्रतिष्ठेने जगता येणे हेच खूप होते. नातेवाईकांशी दुरावा पत्करून, तत्कालीन रूढिप्रिय समाजात आत्मसन्मानाने वावरताना तिला कमी चटके बसले नाहीत. पण एक दुर्लक्षित, असहाय जिणे जगण्यापेक्षा तिला परिस्थितीचे चटके खात मानाने जगणे मान्य होते. ''इच्छा तिथे मार्ग'' हे तर तिच्या साऱ्या आयुष्याचे घोषवाक्य होते. परंपरा, चालीरीती, कर्मकांडापासून तिने स्वतःला अलिप्त ठेवले. पण माणुसकीचा धर्म जपला. त्या काळात अर्थार्जनाबरोबरच आजीने घराजवळ रंगीत माडी असलेल्या मन्ना नायकिणीच्या मुली-नातींना, आजूबाजूच्या गोरगरीब समाजातील अनेक मुलामुलींना मोफत शिकविले.

केवळ शिक्षणामुळे तिला हे सारे शक्य झाले.

लोकांनी टीका केली तरी त्याकडे लक्ष द्यायचे नसते, आपण जेव्हा स्वतःशी ठाम असतो तेव्हा बाकीचे जग गेले चुलीत, ही आजीची विचारसरणी होती.

माझ्या आईला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता आले. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळाला. अनेक वर्षे प्राध्यापकांच्या संघटनेच्या कामाचा सशक्त अनुभव, सहकार्‍यांच्या वेतन किंवा सुविधांसाठी सरकारी पातळीवर घेतलेले प्रयत्न, आंदोलने, संप, पुरुष सहकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चे, संघटना पातळीवर केलेले समाजकार्य अशा आघाड्यांवर काम करताना तिच्यापाशी अनुभवांची भली थोरली शिदोरीच जमा झाली.

प्राध्यापकी करताना आईने अनेक विद्यार्थिनींना फक्त अर्थशास्त्राचेच धडे दिले नाहीत, तर शिकण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रवृत्त केले. ''पोरींनो, भरपूर शिका, स्वावलंबी बना. घरच्यांनी, नवऱ्याने सांगितले म्हणून कोठेही न वाचता सह्या ठोकू नका, '' ती विद्यार्थिनींना कायम सांगत असे. आईच्या बऱ्याचशा विद्यार्थिनी या आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील किंवा अल्पशिक्षित समाजातील होत्या. कॉलेज संपलं की चार घरी जाऊन धुणी-भांड्याची कामं करण्यापासून ते घरातील विरोधाला न जुमानता अर्धपोटी राहून शिक्षण कसेबसे चालू ठेवणाऱ्या. त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांना वेळप्रसंगी मार्गदर्शन करणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना मुलीचे लग्न लवकर न करण्याविषयी - तिला पुढे शिकू देण्याविषयी समजावणे, कोणा मुलीवर घरी दारुडा बाप किंवा मोठा भाऊ हात उचलत असतील - मारहाण करत असतील तर त्यांना योग्य समज देणे, त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देणे अशा अनेक गोष्टींकडे तिला अध्यापना व्यतिरिक्त लक्ष द्यावे लागत असे.

अनेकदा आमचा पत्ता शोधत तिच्या विद्यार्थिनी घरी तिला भेटायला यायच्या. ''मॅडम, घरच्यांनी लग्न ठरवलंय. परीक्षेपर्यंत थांबणार नाही म्हणतात. मला पुढं शिकायचंय हो.... '' म्हणत ओक्साबोक्शी रडणाऱ्या मुली. किंवा ''घरी माझ्या शिक्षणासाठी खर्च करायला पैसा नाही म्हणतात, मला पुढे शिकता नाही येणार, '', ''आमच्याकडे मुलींना कोणी जास्त शिकवत नाहीत, लवकर लग्न करून देतात आणि लग्नानंतर घराबाहेरही पडता येत नाही, '' असे म्हणून हताश झालेल्या मुली. त्यांना धीर देणं हे सोपं काम नसायचं. बहुतेक वेळा घरचे लोक काही ऐकायच्या मनस्थितीतच नसायचे. अशा परिस्थितीत आई त्या मुलीला लग्नानंतरही जमेल तसे आपले शिक्षण पुरे करण्याचा, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा सल्लाच काय तो देऊ शकत असे. एका केसमध्ये अल्पवयीन मुलीला एका शेटाला विकायला निघालेल्या घरच्यांच्या तावडीतून तिला पोलिसांच्या मदतीने सोडवून तिच्या योगक्षेमाची व शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करताना आईने केलेला जीवाचा आटापिटा आजही मला आठवतो.

खूपदा रस्त्याने जाताना कधी ह्या जुन्या विद्यार्थिनी भेटल्या की त्या आईचा हात घट्ट पकडून भरभरून बोलत असत. आपण आपलं शिक्षण कसं पूर्ण केलं, थोडेफार कमावू लागलोय ह्याच्या कहाण्या सुनावत असत. कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करायचा नाही हे आई प्रत्येक बॅचच्या मुलींना बजावून सांगायची. तरीही कोणा विद्यार्थिनीच्या हुंडाबळीची किंवा सासरच्यांचा छळ असह्य होऊन केलेल्या आत्महत्येची बातमी आली की तिला खूप वाईट वाटत राहायचं. डोळ्यांमधली स्वप्ने नीट उमललीही नसताना त्या कोवळ्या वयातील मुलींचे मृत्यू काळजाला घरं पाडून जायचे.

आज निवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा इतरांना कसा उपयोग होईल ह्यासाठी ती सदोदित प्रयत्नशील असते. घरात काम करणाऱ्या मोलकरणीलाही ''मुलींना शिकव, त्यांना शिळेपाके खायला लावू नकोस, मुलाचे फाजील लाड करू नकोस, मुलींबरोबर त्यालाही कामाची सवय लाव, त्यांना शिक्षणासाठी काही मदत हवी असेल तर सांग, मी करेन, '' हे ती बजावून सांगत असते.

आई व आजी नोकरी करत होत्या, आर्थिक दृष्ट्या कोणावर अवलंबून नव्हत्या. तरीही त्यांना संघर्ष वा घरातील कष्ट चुकले नाहीत. उलट घरी व बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागले. वेळप्रसंगी तडजोड, नाराजी, मतभेद, असहकार यांची अग्निदिव्ये त्यांनाही पार करायला लागली. काही संबंध दुरावायलाही लागले. पण ती किंमत चुकती करायची त्यांची तयारी होती. त्याबद्दल त्यांना कधीच खेद वाटला नाही. एकदा निर्णय घेतल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आणि इतरांच्या टीकेची भीड बाळगली नाही. त्यांना मनात त्रास तर नक्कीच झाला असणार.... पण तो त्रास त्यांनी पचविला. बाईला केवळ ती बाई आहे म्हणून समाजात किंवा घरात कमीपणा घ्यायला लागणे, तिला एक माणूस म्हणून मनासारखे जगता न येणे, आपली मते - विचार व्यक्त करता न येणे आणि विनाकारण त्रास सहन करावा लागणे ह्याबद्दल त्यांचे विचार तेव्हाही सुस्पष्ट होते व आहेत.

मी आजवर काही स्त्री सक्षमीकरण, सबलीकरणाच्या परिषदांना गेले, तेथील मान्यवर वक्त्यांचे स्त्री-मुक्तीवरील विचार ऐकले, कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकले, त्यातून बरीच माहितीही मिळाली. काही प्रकल्पांना भेटी दिल्या, काहींसाठी निधी संकलनाचे कार्यक्रमही केले. या निमित्ताने उच्चभ्रू समाजातील स्त्रियांना सहन करावा लागणारा हिंसाचार जसा पाहिला तसे झोपड्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना भोगावे लागणारे अत्याचारही पाहिले. त्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या, त्यांना न्याय मिळवून देणार्‍या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना माझा सलाम!

एक गोष्ट नक्की... आई-आजीने ज्या प्रकारे आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचे प्रश्न सोडवत, त्यांना जमेल तसा मार्ग दाखवत जगून दाखविले त्याचा परिणाम माझ्या मनावर सर्वाधिक झाला. कदाचित इतरांच्या मते ती 'स्त्रीमुक्ती' नसेलही... पण त्यांच्या घट्ट पाय रोवून जगण्यातून माझ्या मनातील स्त्रीला विलक्षण बळ मिळाले. त्यांच्यासारख्या अनेक अग्रेसर स्त्रियांच्या व दूरदर्शी पुरुषांच्या योगदानामुळे मला आज त्यांच्या काळात असलेल्या संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागत नाही. भविष्यकाळात पुढच्या पिढ्यांसमोर कदाचित वेगळी आव्हाने असतील. तोपर्यंत तरी स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे साध्य झाले असावे अशी आशा करूयात.

-- अरुंधती

[* लेखातील स्त्रियांसंदर्भातील टक्केवारी ही काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या विविध मान्यताप्राप्त अहवालांमधील आहे. ]

टण्या | 8 March, 2011 - 15:04
स्त्री-मुक्तीबद्दल बोलताना हमखास पुरुष विरुद्ध स्त्री, पुरुषाने स्त्रीवर गाजवलेले वर्चस्व ह्या विषयावर वाद सुरू होतात. मग मुद्दे येतात की स्त्री हीच स्त्रीची वैरी आहे, सासवा सुनांचा छळ करतात वगैरे वगैरे. इथे आपण एक महत्त्वाची बाब नजरेआड करतो - समाजात 'स्त्री'स पुरुषापेक्षा कमी लेखले जाते, समाज 'स्त्री'स कमी लेखतो. इथे समस्त पुरुष, समस्त स्त्रीया, उच्चवर्ग, गरीब असा भेदभाव वा विविध घटक स्वतंत्रपणे काम करत नसून संपूर्ण समाज 'स्त्री'स कमी लेखण्यास जबाबदार असतो. आणि समाजात तुम्ही-आम्ही सर्वच आलो.

वरती अनेकांनी स्त्री-मुक्ती, त्याची गरज, वैयक्तिक अनुभव दिलेले आहेत. पण नेमक्या कुठल्या टप्प्याशी समाज पोचला तर स्त्री मुक्त झाली असे म्हणता येईल? ह्याची आपल्याला यादी करता येईल का?
त्यादृष्टीने माझा एक प्रयत्नः

१. स्त्री-भृण/स्त्री-अर्भक हत्या संपूर्णपणे बंद होणे व स्त्री-पुरुष गुणोत्तर नैसर्गिक पातळीवर येणे - हा अत्यंत महत्त्वाचा निकष असेल कारण स्त्री-भृण/अर्भक हत्येसारखा अत्यंत नीच-निंदनीय प्रकार ह्या समाजात स्त्री म्हणुन जन्मास येण्यास दिली जाणारी टोकाची तुच्छता दर्शवतो.
२. सर्व प्रकारच्या व्यवसायातून व नोकरीतून स्त्री-पुरुषांचे प्रमाण हे समसमान असणे - इथे सर्वोच्च पदापासून सर्वात खालच्या पातळीवरील (नोकरीच्या) नोकर्‍या अपेक्षित आहेत. जेव्हा हे प्रमाण समान असेल तेव्हा ते अप्रत्यक्षपणे असे दर्शवेल की:
अ) शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध असणे व त्या संधींचा लाभ घेण्यात लिंगाधारीत भेदभाव न होणे - उदाहरणार्थ एखाद्या घरातील मुलगा व मुलगी ह्यांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षणाची संधी मिळणे, ना की मुलगा आहे म्हणुन पेमेंट सीटला प्रवेश व मुलगी आहे म्हणुन तिला मिळेल त्या ठिकाणी. अगदी उच्चवर्णीय मध्यमवर्गातदेखील सर्रास असे दिसून येईल की मुलीला १२वी नंतर पेमेंट सीटला MBBS ला प्रवेश मिळतो पण ती BAMS ला प्रवेश घेते पण त्याच घरातल्या मुलाला पेमेंट सीटचे पैसे भरून इंजिनीअरींग-मेडिकलला प्रवेश घेतला जातो.
ब) हा निकष पुरुष स्त्रीस आपल्यापेक्षा कनिष्ठ समजत नाहीत व स्त्री-अधिकारी हे समाजात सहजपणे सामावून घेतले जातात हे दर्शवतो.
३. लष्करात स्त्रीयांना समान संधी - हा निकष मुद्दाम वेगळा लिहिण्याचे कारण म्हणजे लष्करासारख्या नोकरीत स्त्रीयांना समान संधी मिळणे हे त्यांच्या शारिरीक क्षमतेबाबत भेदभाव न करण्याचे लक्षण आहे तसेच अधिक महत्त्वाचे म्हणजे लष्करातील नोकरीत घरापासून दूर इतर सहकर्मचार्‍यांसोबत एकत्र राहणे-अनेक महिने व्यतीत करणे ह्या वेगळ्या वातावरणात एक स्त्रीस स्त्री म्हणुन कुठलाही अडथळा येत नाही याचे लक्षण आहे. इथे लष्करातील कडक शिस्त व शिक्षा हे deterrent म्हणुन अपेक्षित नसून कुठल्याही बाह्य दबावाशिवाय सर्व सहकर्मचार्‍यांनी स्त्रीयांना समान वागणून देणे अपेक्षित आहे.
४. एखाद्या घटस्फोटीत/आपल्या जोडीदारापासून विभक्त राहणार्‍या व नवरा\जोडीदाराचे निधन झालेल्या स्त्रीस कुठल्याही पातळीवर ह्या कारणास्तव भेदभाव, त्रास न होणे. योनिशुचितेची बेगडी संकल्पना समाजाने मागे टाकल्याचे हे एक लक्षण असेल. अर्थात हा टप्पा येण्यासाठी स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा असणे, जोडीदारासोबत राहणे, वेळ व्यतीत करणे व त्यानंतर लग्नाचा निर्णय घेणे, लग्न अथवा एकत्र राहण्यातून दोन्ही जोडीदारांना वेगवेगळे होण्याची समान संधी उपलब्ध असणे व वेगळे झाल्यावर पुन्हा नवीन जोडीदार शोधताना 'ह्या पुर्वी एक जोडीदार होता' ह्या कारणास्तव संधी कमी न होणे हे निकष समाजात स्त्री मुक्त झाल्याचे असतीलच पण त्याजोडीने समाज संधी-समानतेच्या बाबतीत प्रगल्भ झाल्याचेदेखील लक्षण असेल.

मामी | 9 March, 2011 - 03:06
आताच्या स्थितीला स्त्रीमुक्ती ही अनेक पातळ्यांवरची लढाई आहे - सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तीक आणि हो, धार्मिक. यातील धार्मिक बाब सध्या बाजूलाच ठेवूया. तो एक स्वतंत्र आणि अतिशय संवेदनाशील विषय आहे. बाकीच्या तीन गोष्टि बघूया :

१. सामाजिक : समाजात वावरताना, समाजाकडून असलेल्या अपेक्षा, मिळणारी गैरवर्तणूक, उपहास. नोकरी-व्यवसायात डावी वागणूक. सर्व सामाजिक रुढि पुढे नेण्यासाठी स्त्रीवर होणारी सक्ती, समाजापेक्षा वेगळा विचार करणार्‍या पुरुषाचा उदोउदो पण तीच जर स्त्री असेल तर तिची कुचेष्टा. लग्न न झालेल्या प्रौढ स्त्रीया, परित्यक्ता, विधवा यांना होणारे त्रास, असे अनेक मुद्दे आहेत.

२. कौटुंबिक : कुटुंबातही, घरचे रितीरिवाज पाळण्याची सुनेवर (आणि केवळ सुनेवरच. यातून घराण्याचा तो कुलदिपक असणारा तिचा नवरा मात्र स्वतंत्र) होणारी सक्ती, हुंडा, स्त्रीगर्भ-चिकीत्सा, मुला-मुलीत भेदभाव, स्त्री-कुपोषण या गोष्टी येतात. अगदी, बचत करतानाही मुलाच्या शिक्षणाकरता आणि मुलीच्या लग्नाकरता अशा बचती केल्या जातात. अगदी शिकल्यासवरलेल्या समाजातही. फार काय याच गोष्टी टिव्हीवरल्या जाहिरातींतूनही ठळक केलेल्या असतात.

या गोष्टींबद्दल वर बर्‍याच जणांनी उदबोधक चर्चा केली आहेच.

३. वैयक्तिक : हा एक वेगळाच लढा आहे. आपला आपल्याशी. शिक्षणाने आत्मभान येतं, अर्थार्जनाने आत्मनिर्भरता येते आणि या दोन्हीमुळे आपल्या आयुष्याच्या दोर्‍या आपल्या हाती ठेवण्याचा आत्मविश्वास येतो. स्वतःचे विचार, निर्णय आणि त्यांचे परिणाम पारखून घेऊन त्यांची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी आपल्याला एक स्वयंपूर्ण व्यक्ती बनवू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एक व्यक्ती आहोत आणि आपल्यालाही आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे हे प्रत्येक स्त्री ने लक्षात ठेवले पाहिजे.

उच्चशिक्षित, उच्चभ्रु स्त्रियादेखिल वैयक्तीक पातळीवर लढताना दिसत नाहीत. कारण दिलेल्या / सांगितलेल्या गोष्टी तशाच्या तशा स्विकारण्याची वृत्ती. हे का? आणि असच का? असे प्रश्न का बरं मनात येत नसतील? वरवर मॉडर्न कपडे घातले की झाले? विचारांचं काय? मुलींनी २०-२१ व्या वर्षी लग्न करावीत, वेळाच्यावेळी मुलं होऊ द्यावीत हे असे विचार आजुबाजुच्या मैत्रिणींकडून ऐकले की धक्काच बसतो. अशा कितीतरी तर्‍हा - माझी मुलगी आधीच सावळी आहे म्हणून 'तिला स्विमिंगला पाठवू नको' असे एकीने मला सांगितले की तो प्रसंग, 'जग किती वाईट आहे, मी माझ्या मुलींना एकटं कधीही कुठेही पाठवणार नाही' असं एका सधन घरातल्या मॉडर्न स्त्रीचं वक्तव्य, कोर्टात वकिली करणार्‍या बाईला स्लीवलेस घालायची नवर्‍याकडून बंदी, डॉक्टर असलेल्या स्त्रीयाही सणवार साजरे करताना मासिकपाळीचा अडसर मानताना पाहिल्या तेव्हा ..... कितीतरी प्रसंग. वैज्ञानिक दॄष्टिकोन, साच्यापेक्षा वेगळा विचार करून तो आमलात आणण्याची धमक प्रयत्नपूर्वक अंगी बाणवली पाहिजे. प्रत्येक आईने आपल्या मुलीकरता हे स्त्रीधन द्यायलाच हवं.

स्त्रीमुक्ती ही बहुपेडी, बहुआयामी आणि दीर्घकालीन अशी प्रोसेस आहे. फार दूरपासून छोट्या छोट्या पावलांनी चालत आजपर्यंत आली आहे, अजूनही फारशी मोठी झेप घेतलेली नाही. पण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहता निदान समाजमंथन सुरू आहे, जनजागरण होत आहे आणि यातूनच कधीतरी एक 'यशस्वी पहाट' येईलच अशी मी आशा बाळगून आहे.

ठमादेवी | 9 March, 2011 - 14:03
हे माझं मामीच्या खो ला उत्तर...
मला एक घटना आठवते इथे...
एक इंजीनिअर मुलगी... पण तिला लग्नानंतर नोकरी सोडायला भाग पाडलेलं. दोन मुलं होती तिला. एकदा माहेरी नागपूरला जाउन आईसोबत सासरी मुंबईत आली. सासरच्यांनी लहानग्या मुलाला घरात घेतलं आणि तिला बाहेर ठेव्लं... तीन दिवस ती रोज जायची. गयावया करायची... पण त्यांनी तिला घरात घेतलं नाही. शेवटी चौथ्या दिवशी तिला घरात रेकॉर्डरसमोर बसवून आपलं म्हणणं मान्य करायला लावल, सर्व अटी मान्य करायला लावल्या आणि मगच तिला घरात घेतलं गेलं... पण तिच्या आईने तिची साथ दिली नाही... वपुंच्या कथेची साधर्म्य असलेली ही प्रत्यक्षात घडलेली घटना अहे.
मामी म्हणते त्याप्रमाणे स्त्रीमुक्तीचा लढा खूप निरनिराळ्या पातळीवर लढला जातोय... आजच माझा एक मित्र म्हणाला, स्त्रीमुक्तीची सध्या भारतात रुजू पाहत असलेली संकल्पना ही ब्राह्मण स्त्रियांनी आणलेली आहे... त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना इतर समाजातल्या स्त्रियांना लागू होतातच असं नाही... त्याच्या मते आजच्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया गौरी देशपांडेचे विचार वाचून त्याप्रमाणे वागण्याचं ठरवतात पण त्यांना सावित्रीबाईंचे स्त्रीमुक्तीचे विचार माहीत नाहीत...
मला असं वाटतं की स्त्री मुक्ती म्हणजे केवळ स्त्रियांचा छळ थांबवणं नाही तर माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणं आहे... अर्थात, देणारं इथे कुणीच नाही. कुणालाही तो अधिकार नाही. भारतात नागरिकांना, मग तो स्त्री असो वा पुरूष कोणताही हक्क बहाल करण्याचा हक्क फक्त घटनेचा आहे... मात्र आपण आपले हक्क आणि त्याच्या मर्यादा ओळखणं आवश्यक... भारतातल्या बहुसंख्य स्त्रियांना हे हक्कच माहीत नाहीत...
कायदा आपल्या हक्कांचं संरक्षण करतो असं म्हणतात... पण भारतीय न्यायव्यवस्था ही इतकी भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे की तिच्याकडून न्यायाची अपेक्षा करणंच चूक आहे असं बहुसंख्य स्त्रियांना वाटतं. वर्षानुवर्षं लांबत चाललेले खटले पाहून हे मात्र पटतं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड...

मानुषी | 9 March, 2011 - 14:25
स्त्री मुक्ती विरोधातली काही उदाहरणे . .......
१) माझ्या मैत्रिणीला दुसरी मुलगी झाली. म्हणून भेटायला गेलो. हॉस्पिटलमधे सुतकी वातावरण. सासूबाई चेहेरा टाकून बसलेल्या. मी बाळ पाहिलं छान गुटगुटीत सुंदर निरोगी चमकदार डोळ्यांची मुलगी. मी मैत्रिणीचं अभिनंदन केलं. ती म्हणाली, " तूच पहिली अभिनंदन करणारी. सगळे सांत्वनासाठी येतात. पाठीवरून हात वगैरे फिरवतात. वर म्हणतात ...बेटर लक नेक्स्ट टाईम...आता तूच सांग...या बेटर लकसाठी मी अजून एक तिसरा चान्स घेऊ? आणि तेव्हाही काय गॅरंटी...मुलगाच होईल याची? तिसरा चान्स शक्यच नाही. नंतर माझ्या देखतच दोघी तीघी आल्या आणि तो सांत्वनाचा भयंकर कार्यक्रम झाला. अगदी तिच्या पाठीवरून हात वगैरे फिरवून. मला चीड आली होती...पण ! एक सुंदर निरोगी जीव जन्माला आलाय ही सेलेब्रेट करण्याची घटना नाही का? अश्या सांत्वनाला येणार्‍यांनी शेवटी मैत्रिणीला रडवलं.
इतकं सगळं होऊनही पुन्हा दोन वर्षांनी ती तिसर्‍यांदा प्रेग्नंट राहिली. मी म्हटलं...अगं ? तर म्हणाली घरात सासूबाई, नणंदा नवर्‍याला टोमणे मारून, समक्ष सांगून या ना त्या मार्गाने खूप त्रास देताहेत. मग आम्ही हा डिसिजन घेतला. आता परत "गणपती पाण्यात"....पण शेवटी तिला गणपतीच पावला(?)..........आणि ते(कुटुंब) सुखाने नांदू लागले. अशी खूप कुटुंबे आमच्या ग्रूपमधे आहेत की ज्यांना पहिल्या दोन मुली आहेत...आणि तिसरा मुलगा आहे.
आता ही सुशिक्षित मैत्रिण आणि तिचा सुशिक्षित नवरा समाजाच्या आणि कुटुंबातल्या इतर जेष्ठ व्यक्तींच्या दबावाला का बळी पडतात? आणि तिसर्‍या मुलाचा का निर्णय घेतात? जोपर्यंत मुलगा आणि मुलगी हा भेदभाव नष्ट होत नाही तोपर्यंत अश्या घटना घडतच रहाणार.
२) अजून एक शेजारी.... तीन पिढ्या ---एकत्र कुटुंब....म्हणजे ...दाजी आणि सावित्रीबाई यांची चार मुलं आणि त्यांची कुटुंबे.....या चार मुलांपैकी प्रत्यकाला कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार मुलं आहेत. हे सर्व एकत्र रहातात. यातील दाजींच्या मुलांपासून उदा. घेऊया. मुलांचे अती लाड आणि मुली नेहेमी धाकात. त्यामुळे एक चांगलं झालं.....मुली सगळ्या शिकल्या मोठ्या झाल्या. दाजींच्या नाती बी.ए., बी.कॉम होऊन काही तरी छोट्या मोठ्या नोकर्‍या करून आपापले संसार छान करताहेत. पण मुलं अगदी दाजींच्या मुलांपासून कुणीही शिकले नाहीत. कारण मुलांना रागवायचं नाही. आता दाजींचे दोन नातू....एक पोलीस आहे. याल दोन मुलं आहेत. यातली मुलगी वेल बिहेव्ह्ड, हुशार, रांगोळ्या वगैरे छान घालते.घरातही आईला मदत करते. कारण तिला धाकात ठवलं . दुसरा मुलगा आहे. पूर्णपणे वाह्यात. १० वर्षांचा असेल. पण भयंकर उनाड आहे. मग अती झालं की वडील(पोलिस) त्याला इतकं मारतात की अगदी त्याला जखमा होतात. पण पुन्हा लगेच येरे माझ्या मागल्या.
आता या दाजींच्या कुटुंबातली चौथी पिढी ...पण तेच चालू आहे.
पुन्हा तेच...मुलगा मुलगी भेदभाव...चांगले कपडे चांगलं अन्न, चांगल्या फॅसिलिटीज आधी घरातल्या मुलांना ...मग मुलींना....पण मग नंतरच्या करिअरच्या शर्यतीत ही मुलं मागे पडतात. कारण यांना कष्ट करण्याची, तडजोड करण्याची सवयच नसते. आणि शिक्षणाचे महत्व न समजल्यामुळे ....वेळच्या वेळी अभ्यास न केल्यामुळे उत्तम प्रतीच्या शिक्षणाला ही मुले मुकतात. स्वता:विषयी भ्रामक कल्पना घेऊन वावरतात.घरातल्या....विशेषतः बायकांनीच.....याला खत पाणी घातलेले असते...यांचा इगो पॅम्पर केलेला असतो. मग या मुलांची पुढची पिढी कॉन्व्हेन्ट/इंग्रजी माध्यमात जाते...घातली जाते. उत्तम शिक्षण म्हणजे इंग्रजी अशी गैरसमजूत ! इथेही स्त्रीयांनीच आपले विचार बदलण्याची गरज आहे.
३)माझी एक मैत्रीण. तिचा नवरा आय आयआयटीयन. भयंकर ब्रिलियंट. त्याची आमच्या गावात एम आय डीसीत इंडस्ट्री आहे. ही मैत्रीण बी.कॉम आहे. घरच्या व्यवसायात छान मदत करते. ती कालच सांगत होती..( आम्ही मैत्रीणींनी काल क्लबमधे women's day साजरा केला...तेव्हा आज नवर्‍याच्या जेवणाची घरी काय व्यवस्था केली यावर प्रत्येकीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकत होतो...तेव्हा ती हे बोलली.) ती म्हणाली ," माझं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही जेवत होतो...जेवता जेवता मला मिरची लागली तर ...मी नवर्‍याला म्हणाले, ...अनिल, पटकन पाणी दे ना प्लीज....(मी नवर्‍याला एकेरी संबोधते यावरच पहिला मोठा आक्षेप होता............दोनदा सांगितलं....अनिल उठलाच नाही....फक्त माझ्याकडे कटाक्ष टाकला. माझ्या तोंडात जाळ झालेला होता....मीच ऊठून शेवटी पाणी घेतलं. रात्री तो मला म्हणाला इथे आपल्या खोलीत काहीही सांग........तुला अगदी पाण्याची अंघोळ घाली.......पण तिथे आई, दादा, वहिनी यांच्यासमोर असं पाणी बिणी मागून माझ्या इज्जतीचा फालुदा करत जाऊ नको.
आता आय आय टी त उत्तम शिक्षण घेतलेल्या अनिलला बायकोला आधी माणूस म्हणून वागवायला पाहिजे हेही जर समजत नसेल तर ..............................?
त्याच्या घरी वर्षानुवर्षे जी पुरुषप्रधान संस्कृती जोपासली गेली त्याचे हे परिणाम. हे ही बदलणे स्त्रीच्याच हातात आहे.
४)समोर एक कुटुंब रहाते. हे जोडपं बँकेत नोकरी करते. त्यांना दोन मुली आहेत. त्या बाई किती तरी वर्षे मुलगा होण्यासाठी ट्रीटमेंट घेत होत्या. बर्‍याच वेळा त्यांनी अ‍ॅबोर्शन केल्याचं कानावर यायचं. हे बरीच वर्षं चाललं. नंतर मी तर ही गोष्ट विसरून गेले. मोठ्या मुली १८/२० वर्षाच्या झाल्या. बाई रस्त्यात भेटल्या. त्या प्रेग्नंट असाव्यातसं वाटलं. धक्काच बसला. तरी खूपच अशक्त आणि ढेपाळलेल्या वाटल्या. मी दाखलंच नाही की मला त्यांची गुड न्यूज(?) समजलीये. माहिती नाही ...पण मला खूप ऑकवर्ड वाटत होतं...आणि काय प्रतिक्रीया व्यक्त करावी याची मनात जुळवाजुळवच होईना. नंतर कधी तरी काही महिन्यांनी भेटल्या. तर चांगलंच लक्षात येईल एवढी प्रगती दिसत होती. मग मला दखल घ्यावीच लागली.
तर त्या म्हणाल्या.."म्हणजे काय...मला वाटलं ...मागच्या खेपेला आपणा रस्त्यात भेटलो तेव्हाच तुझ्या लक्षात आलं असेल". मी अभिनंदन केलं. तर म्हणाल्या, " अगं मुली काय जातील आपापल्या घरी लग्न करून...आपल्याला सांभाळायला उतार वयात कुणी नको का? आणि आपण एवढं कमावलंय, एवढी इस्टेट करून ठेवलीये त्याला वारस नको का? म्हणून घेतला गं हा डिसिजन."
यथावकाश त्या बाळंत झाल्या ...त्यांना जुळं झालं एक मुलगा, एक मुलगी. त्यांनी गर्भ लिंग चिकित्सा आधीच केली होती. मुलं मोठी होत होती. मुलांचे वडील गावातच पण खूप लांबच्या ब्रॅंचला जायचे.
या बाईंनी बँकेची कसलीशी परिक्षा दिली आणि त्यांची बदली ऑफिसरपदावर पुण्याला झाली. बाई पुण्याला गेल्या. फ्लॅट भाड्याने घेतला. मोठ्या मुलीतली २ नंबरची मुलगी पुण्यात शिकायला ठेवली. आता बाई आणि त्यांची ही २ नं ची मुलगी आता पुण्यात एकत्र राहू लागली. ही जुळी मुलं अजून प्राथमिक शाळेतच. सांभाळायाला बाई ठेवली. सगळा संसाराचा भार त्या सगळ्यात मोठ्या मुलीवर. तिला ग्रॅज्युएशननंतर पुण्यात एमबीएला अ‍ॅडमिशन मिळालेली. पण सर्वानुमते ती नाकारून या सर्वात मोठ्या मुलीने गावातच राहून आईचा संसार सांभाळला सुरवात केली. काही छोटे मोठे कोर्सेस ती करतेय. पण विशीतल्या मुलीला.... जुळी भावंडं, एकदा हार्ट अ‍ॅटेक येऊन गेलेले वडील यांची काळजी घेता घेता अभ्यास कसा जमेल? आता ही जुळी मुलं पूर्ण वेळ गल्लीतच पडीक असतात. पूर्णपणे अंडरनरिश्ड, आणि शरिरावर इतक्या ठिकाणी पडल्याझडल्याच्या, स्टिचेसच्या खुणा...कारण आमच्या गल्लीतून वहाने फार जोरात जातात आणि ही (खेळणारी सगळीच) मुलेही अंगात वारं भरल्यासारखी पळत असतात. त्यांना कित्येक वेळा छोटे मोठे अ‍ॅक्सिडेंट झालेत. आईची करिअर बाबतची अतिमहत्वाकांक्षा म्हणायची ....की मोठ्या कुटुंबासाठीची तरतूद करण्यासाठी हे सर्व करणां ओघानंच आलं असं म्हणायचं? पण त्या सर्वात मोठ्या मुलीवर अन्याय होत नाही का?
आता या बाई स्वता:वर किती अत्याचार अन्याय करून घेत आहेत..वर्षानुवर्षं!आधी मुलासाठी प्रयत्न...मग गर्भ लिंग चिकित्सा...मग अ‍ॅबॉर्शन्.......मग परत प्रयत्न........पहिल्या दोन मुली असूनही मुलगा पाहिजे हा अट्टाहास? या बाईंच्या हेल्थविषयी कुणीच विचार करत नाही? बाईंची मानसिकता काय होती? आणि ती घरातली मोठी मुलगी तिला आलेली चांगली संधी तिला गमावावी लागली.
अशी कित्येक उदाहरणे आजूबाजूला आहेत. हीच परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आपल्या सारख्या स्रियांनी करायला हवा....जो मला वाटतं आपण सार्‍याजणी ...आपल्याला जे संस्कार मिळाले...आपल्याला जी भेदभावरहित वागणूक मिळाली............करतच आहोत.

अश्विनीमामी | 9 March, 2011 - 15:11
इथे मांडलेल्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन.

माझे खालील मुद्दे:

१) प्रत्येक स्त्रीने माणूस म्हणूनच जगले पाहिजे.
२)पुरुष वर्चस्व हे केवळ सोशल कंडिशनिंग मधून आले आहे व एका शक्तिमान गटाने त्यांच्या हातातील शक्ती व सत्ता कायम राहावी म्हणून ह्या ५० % माणसांना त्यांच्या टाचेखाली राहायला शिकविले आहे भाग पाडले आहे. त्यातील काही माणसे उत्तम जेलरगिरी करतात. रूढी, धार्मिक रिच्यूअल्स मधून बायकांना सिस्टिमॅटिकली घाबरवून ठेवले जाते. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नाकारले जाते व मग जिवंत राहण्यासाठी प्रत्येक बाई कुठे तरी जमवून घेते. शारीरिक, मानसिक व भावनिक , वैचारिक या पातळ्यांवर. तसे तिला करावे लागू नये. त्याची खरे तर गरज नाही.
३)पुरुषांना घाबरण्याची काहीच गरज नाही हे प्रत्येक मुलीस शिकविले गेलेच पाहिजे.
४) आर्थिक स्वातंत्र्याशिवाय स्त्री स्वातंत्र्य हे व्यर्थ आहे.
५) स्त्रीयांच्या दृष्टीकोनातून अर्थव्यवस्था, जागतिक राजकारण उभारले गेले पाहिजे तरच व्यर्थ शस्त्रस्पर्धा,
दुसर्‍या राजवटींवर आपला हक्क गाजवायची खुमखुमी ( ज्यात हकनाक जीव जातात व पैसा वाया जातो - जो शिक्षण, इन्फ्रा, शेती मध्ये वापरता येइल. ) असे खास पुरुषी दुर्गूण बाजूला पडून सहकार, सामोपचार,
सर्वांनी मिळून राहणे व बालसंगोपन करणे अश्या स्त्री प्रव्रुत्तींना प्रोत्साहन मिळेल.
५) पुरुषप्रधान संस्क्रूतीत बाईस अब्यूज सहन करायला लावतात त्याची गरजच नाही. अब्यूज सहन करणार नाही अशी झीरो टॉलरन्स पॉलिसी हवी प्रत्येक स्त्रीची.
६) आपले शरीर, व आपले रिप्रॉडक्टिव राइट्स यावर स्त्रीचाच अंतिम हक्क हवा.
७) स्त्री भावनांना दुय्यम लेखले जाऊ नये.
८) मेन आर गुड अप टू अ पॉइंट. आफ्टर दॅट वी हॅव टू डिपेंड ऑन अवर ब्रेन्स

आशूडी | 9 March, 2011 - 16:20
खो देऊन लिहायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद अश्विनीमामी. तुमच्या ५,६ आणि ८ क्र ला जोरदार अनुमोदन.
इथे इतक्या सार्‍या लोकांनी आधीच मुद्देसूद लिहीले आहे की आता काय लिहू हा प्रश्नच! मुळात 'स्त्रीमुक्ती' म्हणजे 'स्त्री ला माणूस म्हणून जगण्याचा पुरुषांइतकाच समान हक्क' हा धागा सार्‍यांच्या पोस्टीतून स्पर्शून गेला. त्याच अनुषंगाने काही प्रसंग आठवले ते तसेच सांगते.
१. लग्न ठरवताना मुलीचे शिक्षण, पगार हा मुलापेक्षा अधिक असलेला मान्य नाही. मुलगी हवी तेवढी'च' शिकलेली आणि कमावणारी मात्र हवी. प्रेमविवाह असेल आणि अशी काही तडजोड त्या दोघांनाही मान्य असेल तरीही दोघांच्याही घरचे बजावून विचारत राहणार, "बघ हं, नाकापेक्षा मोती जड होईल!" पुढे 'आणीबाणी'च्या प्रसंगी सासू भात्यातले हे ब्रम्हास्त्र काढणारच, "तेव्हाच सांगितलेलं ऐकलं असतंस तर...! " म्हणजे मुलगी कमी शिकलेली, कमी कमावणारी असती तर हा भांडणाचा प्रसंग उद्भवलाच नसता का काय! घरात येणार्‍या पैशाला 'बायकोचा' म्हणून वेगळा वास असतो का?

२. आमच्या मुलाचे आम्ही लग्न ठरवत आहोत फार काही अपेक्षा नाहीत मुलीबद्दल. पण मुलगी एकुलती एक अजिबात नको. भाऊ असला तर उत्तम! का पण? नाही म्हटलं तरी आपल्या मुलावर तिच्या आईवडीलांची जबाबदारी येत नाही का? !!! (यापुढे शब्दगंगा वाहिली तरी शब्दांनी उमटलेले हे डाग कधीच पुसले जाणार नाहीत, आय नो च! )

३. काही कारणाने एका जोडप्याला अनेक वर्षे मूल होत नाही. त्याबद्दल अनेक प्रसंगात त्या स्त्रीला इतर अनेक स्त्रियांकडूनच नाही नाही ते ऐकवले जाते, अत्यंत हीन वागणूकही दिली जाते. त्या पुरुषाकडे कोणताही पुरुष अशा संशयी नजरेने कधीच पाहत नाही. मूल असणे ही पुरुषांच्या जीवनाची इतिकर्तव्यता कुठे आहे? काही दिवसात डॉक्टर कडून रिपोर्टस येतात. दोष पुरुषात असतो. एकमेकांना सांभाळून घेत, आधार देत दोघे घरी येतात. घरी आल्यावर बायको दोष आपल्यातच असल्याचे जाहीर करते. तिला दिली जाणारी घृणास्पद वागणूक चालूच राहते. पुरुषाला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करण्याचे सल्ले दिले जातात. पण त्याला 'सत्य' माहित असल्याने तो ते नाकारतो. त्यातून त्याला 'आजन्म एकपत्नीव्रती राम' असल्याचे पदक मिळते. त्याची सीता मात्र रोज नव्याने अग्निदिव्य पार करते. अशा शहीद होण्यातून तिने काय मिळवले? स्वतःत दोष असल्याची कबुली देऊन तिची ही पिळवणूक थांबवावीशी आजही त्या रामाला का वाटत नाही?

शिकून 'सुशिक्षित' झालेल्या खाऊनपिऊन सुखी माणसांच्या घरातल्या या कहाण्या. जिथे 'स्त्री' ला तिचे स्वतःचेच आयुष्यही जगण्याचा हक्क नाकारला जातोय तिथवर जाऊन पोहोचण्याची माझी तर छातीच नाही!

संयोजक खो (२)- चेतन
चेतन खो (१)- आशुतोष०७११
, चेतन खो (२)- श्यामली
आशुतोष०७११ खो (१)- ललिता_प्रीति, आशुतोष०७११ खो (२)- फारएण्ड
ललिता_प्रीति खो (१)- अश्विनी_के, ललिता_प्रीति खो (२)- अँकी
www.maayboli.com/node/24210

संयोजक खो (३)- सिंडरेला
सिंडरेला खो (१)- वैद्यबुवा, सिंडरेला खो (२)- नताशा-एक फुल
किंवा आगाऊ
आगाऊ खो (१) दाद, आगाऊ खो (२)- नानबा
वैद्यबुवा खो (१) साजिरा, वैद्यबुवा खो (२)- मैत्रेयी
साजिरा (खो) रैना साजिरा खो (२) झक्की
http://www.maayboli.com/node/24212

संयोजक खो (४)- दीपांजली
दीपांजली खो (१)- अंजली, दीपांजली (खो २)- सीमा
अंजली खो (१)- डेलिया, अंजली (खो२)- जागोमोहनप्यारे
सीमा खो (१)- पेशवा, सीमा खो (२)- मृणमयी
http://www.maayboli.com/node/24211

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख पोस्ट्स येतायत. मवा लिही गं. तुझा नंबर मी शोधत होते, तुला लिहायला सांगावं म्हणून. Happy

अकु, मी माझ्या पोस्ट्मध्ये लिहिलंय की माझं इथल्या लोकांमध्ये अथवा बायकांमध्येही मिसळणं होत नाही. इथलं स्त्रियांचं जीवन, त्यांना कशी वागणूक दिली जाते हे सगळं कळायला त्यांच्याशी चांगली ओळख हवी किंवा त्यांच्यात ऊठबस हवी. म्हणून इथल्या एका मैत्रिणीला विचारून थोडंफार लिहिलं.

आशियाई देशातलं म्हणशील तर जपानमधल्या व्यक्तिंनी काही लिहिलं तर तिथे काय परिस्थिती आहे हे कळू शकेल म्हणूनच 'सायो' ला सांगितलं. तसंच सावली, मंजिरी ह्याही आहेतच.

खो देऊन लिहायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद अश्विनीमामी. तुमच्या ५,६ आणि ८ क्र ला जोरदार अनुमोदन.
इथे इतक्या सार्‍या लोकांनी आधीच मुद्देसूद लिहीले आहे की आता काय लिहू हा प्रश्नच! मुळात 'स्त्रीमुक्ती' म्हणजे 'स्त्री ला माणूस म्हणून जगण्याचा पुरुषांइतकाच समान हक्क' हा धागा सार्‍यांच्या पोस्टीतून स्पर्शून गेला. त्याच अनुषंगाने काही प्रसंग आठवले ते तसेच सांगते.
१. लग्न ठरवताना मुलीचे शिक्षण, पगार हा मुलापेक्षा अधिक असलेला मान्य नाही. मुलगी हवी तेवढी'च' शिकलेली आणि कमावणारी मात्र हवी. प्रेमविवाह असेल आणि अशी काही तडजोड त्या दोघांनाही मान्य असेल तरीही दोघांच्याही घरचे बजावून विचारत राहणार, "बघ हं, नाकापेक्षा मोती जड होईल!" पुढे 'आणीबाणी'च्या प्रसंगी सासू भात्यातले हे ब्रम्हास्त्र काढणारच, "तेव्हाच सांगितलेलं ऐकलं असतंस तर...! " म्हणजे मुलगी कमी शिकलेली, कमी कमावणारी असती तर हा भांडणाचा प्रसंग उद्भवलाच नसता का काय! घरात येणार्‍या पैशाला 'बायकोचा' म्हणून वेगळा वास असतो का? Happy

२. आमच्या मुलाचे आम्ही लग्न ठरवत आहोत फार काही अपेक्षा नाहीत मुलीबद्दल. पण मुलगी एकुलती एक अजिबात नको. भाऊ असला तर उत्तम! का पण? नाही म्हटलं तरी आपल्या मुलावर तिच्या आईवडीलांची जबाबदारी येत नाही का? !!! (यापुढे शब्दगंगा वाहिली तरी शब्दांनी उमटलेले हे डाग कधीच पुसले जाणार नाहीत, आय नो च! Happy )

३. काही कारणाने एका जोडप्याला अनेक वर्षे मूल होत नाही. त्याबद्दल अनेक प्रसंगात त्या स्त्रीला इतर अनेक स्त्रियांकडूनच नाही नाही ते ऐकवले जाते, अत्यंत हीन वागणूकही दिली जाते. त्या पुरुषाकडे कोणताही पुरुष अशा संशयी नजरेने कधीच पाहत नाही. मूल असणे ही पुरुषांच्या जीवनाची इतिकर्तव्यता कुठे आहे? काही दिवसात डॉक्टर कडून रिपोर्टस येतात. दोष पुरुषात असतो. एकमेकांना सांभाळून घेत, आधार देत दोघे घरी येतात. घरी आल्यावर बायको दोष आपल्यातच असल्याचे जाहीर करते. तिला दिली जाणारी घृणास्पद वागणूक चालूच राहते. पुरुषाला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करण्याचे सल्ले दिले जातात. पण त्याला 'सत्य' माहित असल्याने तो ते नाकारतो. त्यातून त्याला 'आजन्म एकपत्नीव्रती राम' असल्याचे पदक मिळते. त्याची सीता मात्र रोज नव्याने अग्निदिव्य पार करते. अशा शहीद होण्यातून तिने काय मिळवले? स्वतःत दोष असल्याची कबुली देऊन तिची ही पिळवणूक थांबवावीशी आजही त्या रामाला का वाटत नाही?

शिकून 'सुशिक्षित' झालेल्या खाऊनपिऊन सुखी माणसांच्या घरातल्या या कहाण्या. जिथे 'स्त्री' ला तिचे स्वतःचेच आयुष्यही जगण्याचा हक्क नाकारला जातोय तिथवर जाऊन पोहोचण्याची माझी तर छातीच नाही!
माझा खो : प्राची आणि शैलजा

@ मंजुडी >>> मुकु, आकडेवारी उत्तम????

अग तिने मांडलेली आकडेवरी बद्दल अचंबीत झालो म्हणुन तसे लिहीले

स्वतःत दोष असल्याची कबुली देऊन तिची ही पिळवणूक थांबवावीशी आजही त्या रामाला का वाटत नाही? >>>> ही पिळवणूक तिनेच रामाचा पर्दाफाश करुन थांबवावी, तीच तर स्त्रीमुक्ती. :). त्याला प्रेम त्यागाचे पदर आले की संपलं सगळं.

स्वतःत दोष असल्याची कबुली देऊन तिची ही पिळवणूक थांबवावीशी आजही त्या रामाला का वाटत नाही?>>>>>> हा प्रिन्सेस सिंड्रेला सिंड्रोम झाला नां? त्यानी तिची सुटका करायची! मुळात तिनं खोटं सांगायचं कशाला? त्यालाच सांगु द्यायचं. त्यानं खरं सांगितलं तर प्रश्नच नाही. तो खोटं बोलला तर अशा माणसाबरोबर आयुष्य कसं काढणार?
आणि खोटं सांगुन ही पिळवणूक आयुष्यभर सहन करण्याइतकं त्याच्यात काही चांगलं आहे तर तिच्या निर्णयाचे ते परिणाम आहेत. तिनं आधी तो विचार केलाच असेल नां?

सॉरी रहावलचं नाही.

एखाद्या जोडप्याला मुल होणे, किती वर्षांनी, किती मुलं किंवा अजिबात न होणे, न होऊ देणे हा संपूर्णपणे फक्त त्या दोघांचाच प्रश्न असावा. आपल्याकडे अजुनही जोडप्यानं तो निर्णय घेण्यात त्यांच्यावर येणारा दबाव, आजी आजोबांना नातवाचं तोंड बघायचय वगैरें चा जास्त भाग असतो.

खो क्र. २ च्या लिंकवर क्लिक केलं तर 'पान हरवलं आहे' असा मेसेज दिसतोय. इतर दोन लिंक्सवर क्लिक केलं तर त्या त्या खो ची पानं दिसतात.

सगळ्यांचे विचार /अनुभव वाचले. स्त्री मुक्तीच्या दिशेने, किंवा उद्देशाने स्वतः काय केलंय, त्यात काय अडचणी आल्या, त्यावर कसा मार्ग काढला हे पण वाचायला आवडेल . मुलगा व्हावा यासाठी कोणी कोणी किती अघोरी प्रयत्न केले याचे किस्से थोड्याफार फरकाने सर्वांनाच माहित असतील. तेच अजून परत परत वाचून वांझोटे दु:ख होणार तेवढेच. त्यापेक्षा इतरांनी अडचणीतून मार्ग कसा काढला हे वाचल्याने प्रबोधन होउ शकेल .

मेधाला अनुमोदन. आता सगळे खो वाचल्यावर तेच ते मुद्दे रिपीट होतायत असं वाटतंय. परिस्थिती दुर्दैवी आहे हे खरंच, पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात, वर्तुळात कोणी काही प्रयत्न या बाबतीत केले असतील तर त्याबद्दल वाचायला खरंच आवडेल.

ललिता, ध्यानात आणून दिल्याबद्दल आभार. सुधारले आहे. Happy

.

प्रतिसासादाबद्दल सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या पोस्ट विचार करायला लावणार्‍या. स्वाती, मेधा म्हणतायत तसं काय करता येईल/ काय केलं वाचायला आवडेल.

ह्म्म... सगळ्यांचे मुद्दे वाचले. बहुतेक सर्वच पटले. शैलजाताईंनी विचारलं तेव्हा म्हटलं काही वेगळं आहे का खरच आपल्याकडे लिहायला? स्त्रीवर होणार्‍या अन्यायाच्या किंवा तिला मिळणार्‍या दुय्यम वागणुकीच्या घटना सांगाव्याशाही वाटत नाहीयेत आता.
असो..
माझा एक वेगळा मुद्दा आहे..
स्त्री+पुरुष = १००% समाज.
आता EQ वर यांची वर्गवारी करायची झाल्यास..
त्यात ५०% सामान्यवर्ग. म्हणजे आपण का जगतो, कशासाठी, कोहं? हे प्रश्न न पडणारा..
अजुन २५% रसिक म्हणता येईल असा. आयुष्य छान जगणारा.
अजुन १५% कलाकार, शास्त्रज्ञ वै.
कदाचित ५% किंवा त्याहीपेक्षा कमी आहे म्हणजे, 'अवलिया','वल्ली','फकीर' वै. सदरात मोडणारी लोक. या वर्गातल्या स्त्रिया म्हणजे ए़कूण लोकसंख्येच्या ०.२५% पण नसतील. तरीही मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की "वल्ली" किंवा "फकीर" सदरातली स्त्री कोणाला कधी भेटली आहे का? जर हा एक स्वभावाचा प्रकार आहे तर नक्कीच तो स्त्रियांमध्येही असणार पण अशा स्त्रिया असतात कुठे? स्त्री म्हणुन जगताना हा समाज तिला इतकं निर्धास्त, बेफिकीर राहुच देत नाही. मग अशी स्त्री मनस्वी होते, धडाडीची होते, सगळंकाही होते पण जे ती असते ते होत नाही.

मगाशी कोणाच्यातरी पोस्ट मध्ये मी गौरी देशपांडेंचा उल्लेख वाचला मी. गौरी वाचुन हल्लीच्या स्त्रिया स्वतंत्र व्हायला बघतात. सावित्रीबाई त्यांना माहिती नाहीत वै.
मला असं वाटतं की गौरीच्या आणि सावित्रीबाईंच्या स्वातंत्र्याच्या कल्पनांची तुलना करणं हेच मुळात चूकीचं आहे. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं झालं की, "अश्मयुगात साधा अग्नी मिळवण्यासाठी धडपडावं लागायचं माणसाला आणि आता अंतराळात फिरतोय तरी समाधानी नाही ."उपाशी माणसला अस्व्तित्वाचे प्रश्न पडत नसतात. त्याला खायला मिळणं ही त्या क्षणी प्राथमिक गरज असते. सावित्रीबाईंना त्या गरजेसाठीच खूप मोठा लढा द्यावा लागलाय. जगण्याचा हक्क मिळण्याची प्राथमिक गरज. गौरीविषयी बोलायचं झाल्यास तिच्या सगळ्याच नायिका वेगळा IQ आणि EQ धारण करणार्‍या होत्या. त्यामुळे ती वृत्ती असणार्‍या माणसांना पण तितक्याच सहजपणे वावरता येणं-न येणं याविषयी लिहिलय गौरीने. आणि माझा हाच मुद्दा आहे की त्या वर्गातील स्त्रियांना एक स्त्री म्हणुन येणारी जास्तीची बंधनं/अपेक्षा न लादता त्यांना हवं तसं जगता आलं पाहिजे.

अजुन १-२ गोष्टी अशा की,
आज एका मध्यमवर्गीय समाजात मुलीला मुलाच्याच बरोबरीने वाढवलं जातं. पण अशा घरातल्या मुलाने समाजकार्यांत/राजकारणात उतरायचा निर्णय घेतला आणि अशा घरातल्या मुलीने समाजकार्यांत/राजकारणात उतरायचा निर्णय घेतला या दोन प्रसंगात मिळणार्‍या प्रतिसादात नक्कीच फरक आहे.

एखादी गोष्ट, "अर्रे! मुलगी असून शास्त्रज्ञ्/मेकॅनिकल एंजि./टॅक्सीवाली/......(अनेक पर्याय आहेत)" हा आश्चर्योद्गार जेव्हा यायचा बंद होईल त्यावेळी समाजात खरी समानता आली असेल.

मुळात गौरी वाचून 'आम्ही' स्वतंत्र व्हायला बघतो हे कुणी सांगितलं ? मला तो मुद्दा अजिबातच नाही पटला.

अश्विनीमामींची पोस्ट आवडली. सगळ्याच छान लिहित आहेत. पण मेधाला अनुमोदन.

स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकं काय? स्त्री मुक्तीची चळवळ नक्की 'स्त्री' ला कशापासून 'मुक्ती' मिळवून देण्यासाठी सुरु झाली? पुर्वापार चालत आलेली बंधनं, जोखडं झुगारून देऊन स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा, तिच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करायचा हक्क मिळावा. त्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून तिच्याकडे बघितले जावे, एक माणूस म्हणून तिच्या मर्यादा, तिच्या क्षमता यांकडे बघितले जावे. यासाठी ही चळवळ होती.
ही चळवळ सुरु झाली तेव्हा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. चळवळीने हळूहळू जोर पकडला आणि आता काही प्रमाणात ही परिस्थिती बदललेली आहे. माझे काही अनुभव मला हेच सांगून जातात.

मी लहानपणापासून काहीश्या secured वातावरणात वाढले. आईवडलांनी आम्हां दोघी बहीणींना वाढवताना कधीही मुली म्हणून वेगळे नियम्/निकष लावले नाहीत. नातेवाईक वगैरेंकडूनही त्या प्रकारची वागणूक मिळाली नाही. लग्नानंतरही बायकोला एक वेगळे आकाश देणारा नवरा मिळाला, सुनेकडून त्याच त्या जुन्या अवास्तव अपेक्षा न ठेवणारे सासर मिळाले. त्यामुळे, मला कधीच झगडावे लागले नाही. पण हळूहळू आजूबाजूच्या इतर बायकांच्या रोजच्या लढाया बघून मला जाणवले की सगळेच एवढे नशीबवान नसतात. या बायकांसाठी आपण काही करू शकलो तर.... हा विचार मनात यायचा. AWWA (Army Wives Welfare Association)ची सदस्य म्हणून काम करताना मी काही प्रमाणात बायकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू शकले/ शकते. Happy

आता माझे काही अनुभव सांगते.
अ)अनुभव जे मला अस्वस्थ करून गेले.
१. युनिटमधल्या जवानांच्या बायकांना 'आर्मीने त्यांना दिलेले हक्क/सुविधा' याविषयी एक भाषण ठेवले होते. नियमानुसार नवर्‍याचा पगार ज्या अकाउंट्मध्ये जमा होतो, ते नवरा-बायकोचे जॉइंट अकाउंट असावे. 'किती जणींचे जॉइंट अकाउंट नाहीये?' या प्रश्नाला ९५% बायकांचा हात वर होता. त्यात अगदी रिटायरमेंटला पोहोचलेल्या जवानांच्या बायकाही होत्या. "क्या करना है अकाउंट? वोही पैसा निकालके लाते है बँकसे." अशी उत्तरे मिळाली. हे अगदी अपेक्षित होतं. पण त्या ९५% मध्ये काही ऑफिसरच्या बायकाही (उच्चशिक्षित) होत्या, हे पाहून मी थक्क झाले. Sad
२. नवरा पगाराचे पैसे दारूत उडवतो, मारहाण करतो. ह्या तक्रारी नेहमीच्या आहेत. Sad

ब) अनुभव जेव्हा मला अत्यंत चीड येते.
१. समान हक्काची भाषा करतानाच जेव्हा काही स्त्रिया आपण स्त्री आहोत म्हणून झुकते माप मिळावे अशी अपेक्षा ठेवतात. केवळ स्त्री आहोत म्हणून रात्रपाळी करणार नाही, जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबणार नाही, अंगमेहनतीची कामे करणार नाही, खडतर पोस्टींग्ज घेणार नाही अश्या अटी घालणार्‍या बायका पाहते. तेव्हा खूप राग येतो.
२. स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांना आळा घालण्यासाठी जे कायदे आहेत त्यांचा गैरवापर करणारे महाभाग पाहिले की संताप येतो.
३. स्त्रीमुक्तीच्या अतिरेकी संकल्पना बाळगणार्‍या स्त्रिया.

क) अनुभव जे मला सुखावून गेले
१. मी एका छोट्या गावात जन्मले, वाढले. अगदी लहानपणापासून ज्यांना काकी/आज्जी/वहिनी म्हणत आले, त्यांच्यांत झालेले काही बदल मला सुखावून जातात. माझ्या लहानपणी बायका घराबाहेर पडून नोकर्‍या करत नव्हत्या. ज्या करत होत्या, त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत असे ते आता लिहित बसत नाही. जास्त कशाला माझ्या आईने घरबसल्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली तेव्हा 'नवर्‍याचा पगार कमी पडायला लागला काय?' अश्या टिप्पण्या ऐकाव्या लागल्या. Sad स्त्रीमुक्ती हा शब्द केवळ चेष्टेतच घेतला जायचा. ' कामंधामं नसणार्‍या बायकांचे उद्योग' अशी व्याख्या होती.
पण नुकतेच गावी गेले तर माझ्या सगळ्या या वहिन्या (साधारण चाळीशीतल्या असतील सगळ्या) काही ना काही व्यवसाय करत आहेत. कोणी दुकान चालवतेय, कोणी पापड्/लोणची करून विकतेय, कोणी फराळाचे पदार्थ करून विकतेय, कोणी शिकेकाई, आयुर्वेदिक पावडरींचा व्यवसाय करतेय. एक वहिनी तर ज्वारेच्या लाह्या देशपरदेशात विकते. शिवाय या सगळ्या एकत्र येऊन संस्कार वर्ग चालवतात. नेहमीची भिशी आहेच. इतरही समाजकार्य करतात. सगळ्या मिळून एखाद्या ट्रीपला जातात. व्यवसायातून मिळणारा पैसा घरातही हातभार लावतो, शिवाय त्यांचा आत्मविश्वासही खूप वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना घरातून पूर्ण सपोर्ट मिळतोय. मुलांचा, नवर्‍याच्या, सासरच्यांचा. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.

मला वाटते, जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःचा एक स्त्री म्हणून विचार करण्याआधी एक माणूस म्हणून विचार करेल तेव्हाच ती खरी मुक्त होईल.

माझा खो
१. मनिषा लिमये
२. सायली

अरुंधतीने इतकी छान सुरुवात केली आहे उपक्रमाची की पुढील सर्वच पोस्ट्स चांगल्या आणि विचारप्रवर्तक आल्या आहेत. अश्विनीमामींचे पोस्ट खूप आवडले.
सर्वांचे चर्चिलेले मुद्दे पटलेच आहेत, त्यामुळे आता ते वगळून बाकीचे मुद्दे लिहीते.

स्त्री-मुक्ती हा शब्दच फार मोठा आहे. सगळ्यांनी त्याचा चांगला परामर्श घेतला आहे. आणि ते सगळे 'स्त्री ही आधी एक माणूस आहे' हे अधोरेखित करत आहेत, ते सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे आता तो प्राथमिक विचार मान्य करुन पुढच्या मुद्द्यांकडे वळू.
(माझ्या लिखाणातील मते शहरी स्त्रियांबद्दलच सिमीत आहेत, कारण खेडेगावातील स्त्रियांविषयी मला निश्चित माहीती नाही.)

१. आपल्या स्वतःच्या बाबतीत घडणार्‍या घटना / निर्णय घेणे हे आपण स्वतःसाठी करु शकतो, ही जाणीव प्रत्येक स्त्री ला होईल तेव्हा स्त्री-मुक्ती ची सुरुवात होईल.

२. यापुढे घराचे निर्णय / मुलाबाळांच्या बाबतीतले निर्णय.
यात मला कायम जाणवणारी गोष्ट म्हणजे हे जे निर्णय स्त्री ने जबाबदारी घेऊन घ्यायचे असे आपण म्हणतो त्यात शेवटपर्यंत अंतिम निर्णय तिनेच घ्यायचा व त्याच्या परीणामांची जबाबदारीही एक व्यक्ती म्हणून तिनेच घ्यायची असे झाले तर खरी मुक्ती. पण बहुतांश स्त्रिया ह्या सुरुवातीचे चाचपणे/चौकशी/विचार केल्यावर अंतिम निर्णय घेताना मात्र त्यावर घरातल्या पुरुष सदस्याची मान्यता घेऊन मगच पुढील पाऊल उचलतात. हे एक घर म्हणून योग्यच, परंतू दुसरी बाजू अशी होते की शेवटी आपण स्वतः हे काम केले असा आत्मविश्वास कुठेतरी येता येता राहून जातो.
'नंतर काही प्रॉब्लेम आला तर माझ्यावर नको यायला' किंवा अश्याच काही विचारांनी ते काम तडीस जात नाही. असे जेव्हा होणार नाही, व स्त्रिया पुरुषांच्या मदतीशिवाय काम पूर्ण करुन ते निभावून नेतील तेव्हा स्त्री मुक्त होईल.

३. स्वेच्छेने लग्न न करणार्‍या / मूल होऊ न देणार्‍या स्त्री ला समाजाकडून जी वागणूक मिळते ती निश्चितच तेच करणार्‍या पुरुषांपेक्षा वेगळी असते. तरी न डगमगता तो निर्णय तडीस नेतात त्या मुक्त स्त्रिया. मग घर घ्यायला गेल्यावर तिथल्या लोकांनी दिलेली वागणूक ते घर ताब्यात मिळेपर्यंत केलेला मुस्कटदाबीचा प्रयत्न या कशालाच दाद न देता, एकदाही वडिल/मित्र्/भाऊ अश्या कूठल्याही पुरुषाला बरोबर न नेता, आज स्वतःच्या घरात सन्मानाने राहणारी माझी एक बहीण खरी मुक्त स्त्री. तिला सलाम.

४. मुळात आपल्याला कोण काय वागणूक देतंय यापेक्षा आपण कोणाकडून काय वागणूक घ्यायची हे स्त्री ला स्वतःला ठरवता आले पाहीजे. आपण कोण आहोत , आपल्या मर्यादा काय अन आपल्यातली शक्ती काय हे स्वतःला माहीत असले की इतरांच्या बोलण्या-वागण्याचा त्रास होतच नाही.

५. इतरांपेक्षा आपण चांगले आहोत हे दाखविण्याच्या नादात इतर स्त्रियांचा हक्क न हिरावून घेणे. म्हणजे अमकी-तमकी मुलाला डे-केअर मध्ये सोडते पण मी किती लक्ष देते इ. / ढमकी कसलेच सण्-वार, रिती-भाती पाळत नाही, मी मात्र किती नेटकी इ इ.

आपण स्त्री आहोत म्हणून स्वतःच काही वेगळे न वागणे हे प्रत्येक स्त्री ला करावेसे वाटले पाहीजे.
म्हणजे आत्ता खालील या साध्या सोप्या छोट्या गोष्टी आठवत आहेत.
१. उठसूठ घरी-दारी कोणत्याही कठीण प्रसंगात काही न सुचून रडायला सुरुवात करणे, आणि ते स्त्रीत्वाच्या नावाखाली खपवून नेणे. मी तर ऑफीसमध्येही बॉससमोर निर्लज्जपणे रडणार्‍या मुली पाहील्या आहेत.
२. व्यक्ती म्हणून सर्व हक्क मागताना व्यक्ती म्हणून सर्व कर्तव्येही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडणे. उदा. पोलिसाने पकडल्यावर दंड भरणे, त्यावेळी मुलगी म्हणून त्याने सोडून द्यावे ही अपेक्षा नको. किंवा रांगेत स्त्री म्हणून पुढे जायची अपेक्षा करणे.
३. स्त्री म्हणून उगाच इमोशनल असण्याचा अभिमान बाळगणे. खरे तर कुठल्याही प्रसंगात खंबीरपणे उभे राहून आत्मविश्वास दाखवणे हे मुक्त स्त्री चे लक्षण आहे.
४. घरातील बारीक्-सारीक कामे, जसे की वर चढून माळ्यावरुन सामान काढून देणे, घरातील एलेक्ट्रीसिटीची जुजबी कामे, गाड्यांचे पंक्चर काढ्णे/दुरुस्ती, व्यवहाराची बोलणी करणे, ही पुरुषांची कामे आहेत असे समजून ती टाळणे. वास्तविक पाहता ही सर्व कामे घरातील कामे आहेत व मला वेळ असेल तर मी ती नक्कीच करेन असा प्रयत्न झालाच पाहीजे.

स्त्री-मुक्ती म्हणजे 'प्रत्येक स्त्री ने स्वतः मुक्त होणे' इतकेच नसून 'आपल्याप्रमाणेच इतर स्त्रीयांनाही मुक्त होण्याचा अधिकार आहे' ही जाणीव होऊन त्याप्रति आपली जबाबदारी निभावणे, आणि 'स्त्री काय किंवा पुरुष काय कोणालाच कोणापासून मुक्ती मिळवायची/मागायची वेळ येऊ नये, सर्वजण माणूस आहेत हे समजून तसे आपले वर्तन ठेवणे'.

(सध्या इतके लिहीले आहे, मोठे वाटले म्हणून आणखी नाही लिहीले, पण हे जर लोकांचे वाचून झाले तर आणखी लिहीन. )

माझा खो - १. मंदार्_जोशी आणि २. रुणुझुणू
तसेच यांना जमणार नसेल तर पर्यायी खो- १. जिप्सी आणि २. dreamgirl

मवा ...... आपण स्त्री आहोत म्हणून स्वतःच काही वेगळे न वागणे हे प्रत्येक स्त्री ला करावेसे वाटले पाहीजे........या मुद्द्याला अनुमोदन.....

समान हक्काची भाषा करतानाच जेव्हा काही स्त्रिया आपण स्त्री आहोत म्हणून झुकते माप मिळावे अशी अपेक्षा ठेवतात. केवळ स्त्री आहोत म्हणून रात्रपाळी करणार नाही, जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबणार नाही, अंगमेहनतीची कामे करणार नाही, खडतर पोस्टींग्ज घेणार नाही अश्या अटी घालणार्‍या बायका पाहते. तेव्हा खूप राग येतो.>>>>

प्राची, तुझ्या ह्याच मुद्द्यामुळे माझ्या मनात स्त्री मुक्ती ह्या शब्द्दाबद्दल खूप गोंधळ आहे. आपण जेव्हा स्त्री पुरुष समानता म्हणतो तेव्हा मॅटर्निटी लिव्ह, रात्री उशिरापर्यंत काम न करणे , किंवा स्त्री म्हणून मिळणारी काही आरक्षणं ह्याचं काय? जरा कुणीतरी ह्यावरही लिहा.

प्राची, तुझ्या ह्याच मुद्द्यामुळे माझ्या मनात स्त्री मुक्ती ह्या शब्द्दाबद्दल खूप गोंधळ आहे. आपण जेव्हा स्त्री पुरुष समानता म्हणतो तेव्हा मॅटर्निटी लिव्ह, रात्री उशिरापर्यंत काम न करणे , किंवा स्त्री म्हणून मिळणारी काही आरक्षणं ह्याचं काय? जरा कुणीतरी ह्यावरही लिहा.

<< आरक्षण वगैरे गोष्टी मला पटत नाहीत पण मॅटर्निटी लिव्ह योग्य वाटते कारण जन्म स्त्री च देते , मोठ्या फिजिकल चेन्ज नंतर हा ब्रेक घेण्याची तरतूद गैर नाही वाटत.

मॅटर्निटी लीव्ह ह्यावर आक्षेप असण्याचे काहीच कारण नसावे. जवळपास सर्वच देशातून बाळंतपणात हक्काची रजा मिळणे हा कायदा आहे.
रात्रपाळीत काम करणे वगैरे अपेक्षा स्त्रीयांकडून धरताना रात्रपाळीत काम करण्याच्या, कामाच्या जागी येण्या-जाण्याच्या ज्या जागा आहेत तिथे एका स्त्रीस किती सुरक्षितता आहे हे बघणे गरजेचे आहे. जर स्त्रीस रात्री काम करण्यास पुरुषापेक्षा अधिक धोका संभवत असेल (जे त्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे) तर स्त्रीयांना रात्रपाळीत पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यास सक्ती करणे वा अपेक्षा बाळगणे चूक. जर समान धोका-सुरक्षितता असेल तर मात्र स्त्री-पुरुष भेदभाव असणे अयोग्य.
स्त्रीयांसाठी आरक्षणदेखील न्याय्य आहे. समानतेचे जे प्राथमिक निकष आहेत त्यात न्यायसंस्थेसमोरील समानता, घटनेने दिलेली समानता वगैरे अंतर्भूत आहेत त्याप्रमाणे संधीची समानता हा एक महत्त्वाचा निकष आहे. अनेक वर्षे दाबून राहिलेल्या समाजाच्या ह्या घटकास संधीची समानता उपभोगण्यासाठी आरक्षण देणे योग्य आहे. भारतात आरक्षण व राजकारण हे असे काही गुंतलेले आहे की ह्यावर अधिक चर्चा नको. तरी एका लेखातील महत्त्वाचा भाग (संपूर्ण लेख इथे वाचता येईल http://plato.stanford.edu/entries/equal-opportunity/#4 )

Formal equality of opportunity requires that positions and posts that confer superior advantages should be open to all applicants. Applications are assessed on their merits, and the applicant deemed most qualified according to appropriate criteria is offered the position. Alternatively, applicants are winnowed by fair competition, and the winner or winners get the superior advantages.

Under what conditions is the distribution of liberties, opportunities, and goods that society makes available to persons just or morally fair? The equality-of-opportunity distributive justice theorist answers that the distribution is just only if it satisfies the norm of equality of opportunity, which requires that unchosen inequalities should be eliminated and that inequalities that arise from the choices of individuals given equal initial conditions and a fair framework for interaction should not be eliminated or reduced.

अश्विनीमामी, अगदी नेमकं लिहीलत. तुमच्या कडून बरच काही शिकण्यासारखं आहे! Happy जबरदस्त!

आशूडी, खो दिल्याबद्दल आभार आणि अंजली, आधी तूही दिलेल्या खोबद्दल धन्यवाद.

बहुतांश जणांनी बरेचसे वेगवेगळे मुद्दे मांडले आहेतच, तेह्वा तेच पुन्हा लिहित नाही. काही स्वानुभव लिहिते.

लहानपणी आईबाबाबरोबर फिरायला गेलं आणि कोणी ओळखीचं वा गोतावळ्यापैकी भेटलं, की हमखास एकच 'मुलगी' का हा प्रश्न कानावर हटकून पडायचा. तेह्वा लहान वयात जाणवलं नाही पण, आता लक्षात येतं की त्या प्रश्नामागे भोचक कुतूहल, आश्चर्य, 'अरेरे...' हा भाव, निव्वळ आगाऊपणा आणि तत्सम बरंच काही असणार. फक्त आई आणि बाबाच नव्हे तर कधी कधी आजी आजोबाही माझ्याबद्दलच्या अशा एकटीच मुलगी वा नात असण्याच्या प्रश्नांना सामोरे जायचे आणि समर्पक उत्तरंही द्यायचे. त्या वयात आपल्याशिवाय अजून दुसर्‍या अपत्याची गरज आई बाबाला वाटत नाही, ही भावनाच फार स्पेशल होती! एकदम भारीच वाटायचं. समज येता येता, एकदा मनाने घेतलं की खरंच ह्यांना मुलगा नाही म्हणून मनातून वाईट वाटत असेल का.. आई बाबाला हे बोलून दाखवल्यावर त्यांनी माझ्या डोक्यातली ही कीड तेह्वाच कायमची काढून टाकली. त्यानंतर मनात हा प्रश्न कधीच डोकावला नाही. आणि खरंच, मला कधीच दुय्यम वा अति स्पेशल वागणूकही कधीही मिळाली नाही, पण माझंही स्वातंत्र्य नेहमीच जपलं गेलं आणि लहान वयात आणि नंतरही मोठं होताना माझ्याही मताला किंमत होती. जबाबदारीच्या जाणीवा करुन देताना हक्कही मिळाले आणि स्वतःची तत्वं आणि रास्त मतं ह्यांना जपण्याचं आणि पाठपुरावा करायचं भानही. अन्यायाला विरोध करण्याचा कणखरपणाही. मुख्य म्हणजे हे सारं अगदी सहज, रोजच्या वागण्यातून, लहान सहान प्रसंगांमधून आपोआप अंगी बाणत गेलं. एक व्यक्ती आणि स्त्री म्हणूनही माझ्यामधे असलेल्या आत्मविश्वासाचं सारं श्रेय ह्या कुटुंबियांना.

एकदा कॉलेजमधून घरी चालत येत होते आणि वाटेत एक बसस्टॉप लागायचा. पदपथावर गर्दी होती म्हणून बसस्टॉपच्या पुढच्या बाजूने जायला, बस येत नाही ना हे बघून, मी पदपथावरुन खाली उतरले. आजूबाजूला उभी असलेल्या व्यक्तींची ओझरती नोंद मनात एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून झाली होती. इतक्यात मी चालताना एका वयस्कर इसमाने - ज्यांना पाहून आजोबा उभे दिसतायत बससाठी अशी मनात नोंद झाली होती - मधेच बसला थांबवतात तशा पद्धतीने हात पूर्ण पुढे घातला, तो अशा हिशेबाने की मला त्यांचा स्पर्श झाला असता. झटक्यात हे लक्षात येणं आणि ब्रेक लावल्यासारखं थांबायला होणं, मी पुन्हा मागे वळून बस येते आहे का पाहणं - बस काही नव्हती - आणि उद्देश लक्षात आल्यावर चिडचिडून बाजूने जायला दोन पावलं चालले मात्र, मागून खसखस ऐकू आली. एक टोळकं झालेल्या प्रसंगावर खिदळत होतं हे समजलंच, मला 'आजोबा' वाटलेल्या इसमाच्या चेहर्‍यावर कशी गंम्मत केली टाईप हसू. इतकी चीड आली की पुन्हा परत जाऊन मी त्या इसमाच्या लक्षात येण्याआधी त्याच्या मुस्काटात वाजवली! गर्दी अवाक्! टोळकं अवाक्! इसम हेलपाटलाच असावा. तो हल्ला खूप अनपेक्षित असावा. मीही नंतर दोन मिनिटं गडबडलेच, पण तशी मुस्काटात दिल्यावर तिथेच खूप सुटल्यासारखं - हलकं हलकं वाटलं होतं, हे अजूनही आठवतं. तेह्वा मात्र तिथून शांतपणे निघून आले. ही हिंम्मत माझ्यामधे पैदा केली ती माझ्या घरात मिळालेल्या वातावरणाने. स्वतःचा आत्मसन्मान जपणं इतकंही कठीण नाही आणि तो स्वतःचा स्वतःलाच जपायला लागतो ह्याचंही हे पहिलं प्रॅक्टीकल. नेहमीसाठी लक्षात ठेवलं आहे.

कॉलेजमध्ये शिकताना इंजिनियरींगचे छोटे जॉब, मशीन्स हाताळणी वगैरे आम्हां मुलींना जमतच न्हायी, हे तिथल्या मामांचं एखादीचंही कामातलं कौशल्य न पाहताच, सुरुवातीपासूनच ऐकलेलं मत. सगळेच जॉब आम्ही स्वतः करुन त्यांच्याकडे तपासायला नेल्यावर सुरुवातीला तरी कुरकुरत का होईना, ते पास केलेले. मात्र सुपरिटेंडंट मात्र अतिशय सहृदय होते आणि असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही, हेही तेवढंच खरं. काही मुली असल्या कामाचा कंटाळा करुन बाहेरून जॉब करुन आणत, हेही. पुढे आयटी क्षेत्रात नेटवर्कींग मधली नोकरी शोधायला लागल्यावर चांगल्या मोठ्या कंपन्यांमधूनही मी पुरुष नसल्याने नकार ऐकलाय, आणि तुम्ही प्रोग्रॅमिंग का करत नाही, मग नोकरी देऊ असा एका वरिष्ठ एचआरवाल्याचा सल्लाही. त्यावर प्रोग्रॅमिंग आवडत नाही आणि करण्यात रस नाही म्हणून, हे उत्तर देऊन बाहेर पडले. यथावकाश हव्या त्याच क्षेत्रात नोकरीची संधी मिळवून आज हाताखाली टीम आहे. कामाच्या ठिकाणी कधीच स्त्री म्हणून सवलती, फायदे मागितले नाहीत, त्याचवेळी स्त्री आहे म्हणून कोणीही दुय्यम लेखायला पाहत असेल, तर तीही संधी दिलेली नाही. आजही माझ्या कामाच्या फिल्डमधे भारतात तरी कमी स्त्रिया आहेत मात्र.

आता शेवटचा अनुभव सांगते.

माझा बाबा गेला, त्याआधी कधीतरी बोलता बोलता त्याने मला सांगितलेलं, हे बघ, मी गेल्यावर उगाच भाराभार कर्मकांडं करत बसू नकोस. तुझ्या मनाच्या समाधानासाठी आवश्यक असेल, तितकंच कर हवं तर. काही नाही केलंस तरी चालेल. काहीही होत नाही. शरीरातून चैतन्य निघून गेलं की संपलं. पण काही केलस तर तर ते तू करायचंस.

बाबा गेला आणि आम्ही त्याला घेऊन वैकुंठात पोहोचलो. पुण्यातले नेहमीचे गुरुजी आले. मी अंत्य संस्कारांच्या विधींसाठी बसणार म्हणून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. पुरुष कोणी नाही का वगैरे विचारणा झाली, पुरुष मुंडण करतात वगैरे ऐकवून झालं. इलेक्ट्रीक फरनेसचा ऑप्शन निवडला म्हणून अधिकच नाराजी. मीच वडिलांच्या इच्छेनुसार त्यांना अग्नि देणार आणि हवंच असेल तर मुंडणही करेन म्हटल्यावर अतिशय नाराजीने त्यांनी आपलं काम सुरु केलं. काही अनावश्यक विधी करायचे नाहीत, म्हटल्यावर त्यांचा राग अनावर झाला असावा. असं असेल, तर तुम्ही तुमच्या आईना इथे बोलावून सती जायला सांगा, तोवर मी पुढे जाणार नाही असं त्यांनी घुश्श्यात सांगितल्यावर मात्र माझा संयम संपला. तुम्ही हे मला लिहून द्या आणि इथे साक्षीदार आहेतच, मी आताच पोलीस कंप्लेट करते, म्हटल्यावर पुढचे संस्कार व्यवस्थित झाले. त्या प्रसंगामधून निभावलो. मी एका पित्याचा मुलगा असो वा मुलगी - त्याची इच्छा पूर्ण करायचा माझा हक्क आणि जबाबदारी मी पार पाडू शकणार नाही, हे मला सांगायचा आणि अशा प्रकारे अडवायचा कोणाला अधिकार आहे? मी त्यांना तो का द्यावा?

ह्या अशा आणि इतरही अनेक भल्या बुर्‍या प्रसंगांमधून मी शिकले आहे आणि शिकतेही आहे, की स्वतःच स्वतःची आधी बूज राखायची, मग इतरेजणही राखू लागतात. समोरच्या व्यक्तीला तिने अनादर व्हावा असं काही न करेतोवर आदर जरुर द्यायचा, पण मिंधं व्हायचं नाही. बरोबर आणि चूक ह्यात गल्लत करायची नाही. एक व्यक्ती म्हणून सगळ्यांशी बरोबरीच्या नात्याने वागायचं आणि इतरही तशीच वागणूक देतात, ह्याबाबतीत सजग रहायचं. आणि काही चूक घडत असेल तर त्यविरुद्ध एकटं पडलं तरी आवाज उठवायचा. निर्भय जगायचं.

आणि, हे असे अनुभव घेऊन मी स्वत: काही चांगलं करते का? तर, नक्कीच प्रयत्न करते, पण मला जमतं तसं थोडंफार, मर्यांदा आहेत आणि त्यांची जाणीवही.

एका एचाअयव्ही बाधित कष्टकरी आईला, तिच्या मुलांच्या भवितव्यासाठी ती काम करुन पैसे जमवते, म्हणून जमतील तशी आणि तिच्या तब्येतीला झेपतील तशी कामं देते, कारण ती स्वाभिमानी माऊली असेच पैसे स्वीकारत नाही.

ऑफिसमधल्या हाउसकीपींग स्टाफपैकी एकीची काही आर्थिक अडचण तिने बोलून दाखवल्यावर तिला माझ्याबरोबर कंपनीनेच दिलेल्या गाडीमध्ये बरोबरच ऑफिसमध्ये घेऊन जाते. मलाही एक मैत्रीण मिळते.

कुठे आजोळी खेड्यातल्या मुलांमुलींसाठी - मुख्यत्वे मुलींसाठी पुस्तकं नेते, आणि असंच इतर छोटं मोठं काहीबाही.

माझ्या मनाचा कौल घेऊन माझे लहानसहान निर्णय मला स्वतःला घेता येणं आणि त्याच्या भल्या बुर्‍या परिणामांना सामोरं जायचीही तयारी असेल, तर मग मी मुक्तच आहे की.

माझा खो सायो आणि मिनोतीला.

Pages