महिला दिन २०११ - स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो - १)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2011 - 13:03

नमस्कार,

महिला दिन २०११ निमीत्ताने आपण खेळूया एक खोखो !

कधी कधी एखादा शब्द स्वतःभोवती अनेकपेडी अर्थांचे, अनुभवांचे, जाणिवा आणि समजांचे, क्वचित गैरसमजांचेही पदर घेऊन येतो. असा शब्द ऐकला, वाचला आणि काहीच फरक न पडता, तिथेच सोडून पुढे गेलं असं घडत नाही. अगदी उघडपणे नाही तरी मनातल्या मनात का होईना आणि अख्खं मन व्यापून नसेल तरी मनाच्या एखाद्या कोपर्‍यात, काही क्षणांपुरती का होईना, बरीवाईट प्रतिक्रिया उमटतेच.

असाच एक शब्द म्हणजे 'स्त्रीमुक्ती'.

बर्‍याच जणांच्या जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या कुतुहलाचा तर काहीजणांच्या टिंगलटवाळीचाही. मुख्य म्हणजे बर्‍याच जणींना आत्मभान देणारा. हक्क आणि त्याचबरोबरीने येणार्‍या जबाबदार्‍यांची जाणीव करून देणारा. स्वतःलाच जोखायला आणि ओळखायला शिकवणारा. मुक्त, मुक्त म्हणजे तरी काय म्हणे? एखादी साधी, सोपी, सरळ आणि बहुसंख्य समाजमनाला मान्य होणारी व्याख्या आहे का? कोण्या एका वा एकीला जी व्याख्या मान्य असेल, जवळची वाटेल, तशी त्याच तीव्रतेने दुसर्‍या व्यक्तीला महत्वाची आणि आपलीशी वाटेलच, असं नसतंच कधी.

तरीही, स्वतःच्या मनात डोकावून स्वतःलाच हा प्रश्न विचारुन पाहिला आहे कधी? स्त्रीमुक्ती ह्या शब्दातून तुम्हांला काय अपेक्षित आहे? काय वाटतं? तुमचेही काही विचार असतील, अनुभव असतील, मतं असतील. इतरांप्रमाणेच असतील, वा हटके. जोवर ही मतं, विचार तुमचे स्वतःचे आहेत, प्रामाणिक आहेत, तोवर ते इतरांसमोर मांडायला, चर्चा करायला काय हरकत आहे?

तर, तुमची स्वतःची मतं, विचार मांडायला संयुक्ताने तुम्हांला संधी उपलब्ध करुन द्यायचं ठरवलंय. तेव्हा, येणार्‍या महिला दिनानिमित्त, 'स्त्रीमुक्तीबद्दलच्या माझ्या कल्पना' हा विषय घेऊन तुमचे विचार, मतं आणि अनुभव आम्हांलाही सांगाल?

साधारण कल्पना अशी -

'स्त्रीमुक्तीबद्दलच्या माझ्या कल्पना' (मी पाहिलेली/अनुभवलेली/ आचरणात आणलेली स्त्रीमुक्ती) ह्यावर तुमची मतं, विचार, अनुभव, निरीक्षणं लिहिणं अपेक्षित आहे. या मनमोकळ्या गप्पा असल्यामुळे किमान किंवा कमाल शब्दमर्यादा नाही. तुमचं लिहून झालं की तुम्ही आणखी दोन व्यक्तींना 'खो' देऊन लिहितं करू शकाल.
- आपण स्त्री किंवा पुरूष कोणालाही 'खो' देऊ शकता. प्रत्येकी २ 'खो' देता येतील.
- जिला/ज्याला 'खो' दिला आहे त्या व्यक्तीने जास्तीत जास्त २४ तासांत आपले पोस्ट टाकणे अपेक्षित आहे. काही कारणाने जर आपण 'खो' घेऊ शकत नसाल तर तसे नमूद करुन पर्यायी खो देऊ शकता.
- हा धागा १ आठवडा चालू राहील.

तळटीप
१. हा धागा मॉडरेटेड आहे याची कृपया नोंद घ्यावी.
२. आपले सहकार्य अपेक्षित आहे. कृपया विरोधी मतांच्याही मतस्वातंत्र्याचा आदर राखून आपली मते मांडावी.

३. आपल्याला खो मिळू शकला नसेल, व आपल्याला खोमध्ये भाग घेऊन काही मतं मांडायची असल्यास, संयोजकांच्या विपूमध्ये तसे कळवावे.

संयोजक खो (१) अरुंधती कुलकर्णी
अरुंधती खो (१)- मानुषी , अरुंधती खो (२)- हिरकु (मुदतवाढ)
मानुषी खो (१) - वर्षू नील मानुषी खो (२) - चिनूक्स
हिरकु खो (१)- मामी, , हिरकु खो (२)- टण्या
टण्या खो (१)- ऋयाम, टण्या खो (२)- पराग
मामी खो (१)- ठमादेवी, मामी खो (२)- अश्विनीमामी
ठमादेवी खो (१) - डॉ. कैलास गायकवाड ठमादेवी खो (२) - मवा
अश्विनीमामी खो (१) - आशूडी अश्विनीमामी खो (२) - पौर्णिमा
आशूडी खो (१) - प्राची आशूडी खो (२) - शैलजा
शैलजा खो (१) - सायो शैलजा खो (२) - मिनोती

अरुंधती कुलकर्णी | 7 March, 2011 - 21:08
'स्त्रीमुक्तीबद्दलच्या माझ्या कल्पना' (मी पाहिलेली/अनुभवलेली/ आचरणात आणलेली स्त्रीमुक्ती)

दृश्य एक : बंगलोरजवळचा एक छोटासा पाडा. माझी मैत्रीण तेथील अशिक्षित, आदिवासी जमातीतील बायकांना ज्यूटच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण द्यायला जाते. बहुतेकींचे नवरे बिनाकामाचे. ताडी ढोसतात व त्या नशेत बायकांना मारहाण करून त्यांनी कष्टाने मिळवलेले पैसे हिसकावून घेतात. एका स्वयंसेवी संस्थेने ह्या स्त्रियांना मोलमजुरी व्यतिरिक्तही उत्पन्न मिळावे म्हणून त्यांच्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केले. आणि ह्या सर्व महिलांना पोस्टात बचत खाते उघडायला, आपल्या नावाची सही करायला शिकवले. मी तिथे गेले तेव्हा काहीजणींची पोस्टातील बचत खात्याची कोरी करकरीत पासबुके आली होती. मोठ्या गर्वाने त्या हातातील पासबुके आपल्या शिक्षिकेला दाखवत होत्या. एकीने लाजत लाजत आमच्या आग्रहाखातर तेथील धुळीत स्वतःच्या नावाची सही करून दाखवली. स्वयंपूर्णतेकडे ह्या स्त्रियांनी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल.

दृश्य दोन : पुण्याच्या वडारवाडी झोपडपट्टीतील एक झोपडीवजा घर. इथे पंधरा ते अठरा वयोगटातील दहा-बारा मुली एकत्र जमल्या आहेत. माझी एक मैत्रीण त्यांना इमिटेशन ज्वेलरी बनवायला, व्यावसायिक पद्धतीची मेंदी काढायला व हातकागदाच्या सुंदर सुंदर पिशव्या बनवायला शिकवत आहे. उद्देश हाच की जेमतेम चौथी-पाचवी पर्यंत शिकलेल्या, इतरांच्या घरी धुणी-भांडी-वरकाम करणार्‍या या मुलींना स्वतःतील कलाही जोपासता यावी तसेच उत्पन्नाचा अजून एक मार्ग खुला व्हावा. एकमेकींच्या हातांवर काढलेली मेंदी दाखवताना त्या मुलींच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद अवर्णनीय असतो.

दृश्य तीन : एका मुस्लिम शिक्षण संस्थेच्या स्त्रियांसाठीच्या महाविद्यालयातील सभागृह. व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या शेवटच्या दिवशी एरवी गोष्यात वावरणार्‍या सर्व मुलींना जेव्हा ''हम होंगे कामयाब'' गाण्याच्या धुनेवर गायला, ताल धरायला सांगितले जाते तेव्हा त्यांच्या डोळ्यांत लकाकलेली स्वप्ने केवळ बघण्यासारखी असतात. खुलेपणाने हसत, एकमेकींना प्रोत्साहन देत त्या हलकासा पदन्यास करतात. एकमेकींचे हात घट्ट पकडून रिंगण धरतात. त्यांच्या नजरेत चमकणारा आत्मविश्वास आणि ओठांवरचे खळाळते हास्य भारावून टाकणारे असते.

दृश्य चार : प्रसूतितज्ञ मैत्रिणीचा एका गावात असलेला दवाखाना. बाहेर तपासणीसाठी आलेल्या अनेक स्त्री रुग्णांमध्ये काही जेमतेम सतरा - अठरा वर्षांच्या लग्न झालेल्या मुली. मैत्रीण वैतागून सांगते, तिच्याकडे येणाऱ्या केसेसमधील अनेक स्त्रिया वयाच्या सतरा-अठराव्या वर्षीच माता होतात. बहुतेक स्त्रिया अ‍ॅनिमिक किंवा कुपोषित. त्यातून त्यांना जर मुलगी झाली तर सासरचे लोक बाळ-बाळंतिणीला बघायलाही फिरकत नाहीत. अशा मुलींचे, त्यांना होणाऱ्या मुलींचे भवितव्य तरी काय? मैत्रीण कळवळून विचारते. माझ्याकडेही उत्तर नसते.

भारतातील स्त्रियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण : ५४. १७ %
युनिसेफच्या अहवालानुसार भारतातील जन्म झालेल्या परंतु त्यानंतर काहीही ठावठिकाणा नसलेल्या मुलींची संख्या : ५० दशलक्ष
वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत विवाह होणाऱ्या भारतीय स्त्रियांचे प्रमाण : ४४. ५%
सोळाव्या वर्षाअगोदरच विवाह होणाऱ्या भारतीय स्त्रिया : २२. ६%
दहा - बारा वर्षांपूर्वीच्या राष्ट्रीय पातळीवरील गुन्हा-नोंदीच्या अहवालानुसार भारतात स्त्रियांविरुद्ध गुन्ह्यांच्या नोंदी : १५, ४६८ बलात्कार, ३२, ३११ विनयभंगाचे गुन्हे, हुंडाबळी ६६९९, कौटुंबिक हिंसाचार ४३८२.
सोळा किंवा त्याहून कमी वयाच्या मुलींवर होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण : ३०%.
विवाहित स्त्रियांमधील कुपोषण : ३३%
भारतीय स्त्रियांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण : ५६. २%

भारतासारख्या प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या देशातील स्त्रियांसंदर्भातील हे आकडे आहेत, तर अजून अविकसित देशांमधील आकडेवारीची कल्पनाच न केलेली बरी!

अनेक शतके उलटून गेली, परंतु स्त्रियांना आजही समाजात दुय्यम दर्जा दिला जातो हे उघड वास्तव आहे. कायदे, नियम, घटना, न्यायव्यवस्था यांनी ह्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी लक्षणीय पावले उचलली आहेत. समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळतात. ह्या लढ्याला स्त्री-मुक्तीचे नाव जरी मिळाले तरी खरे म्हणजे ती आहे जगण्याची धडपड! स्त्री -मुक्तीचा विषय व्यापक असला तरी तिची व्याख्या व्यक्तीसापेक्ष आहे. परंतु उद्देश मात्र एकच आहे; स्त्रीला एक माणूस म्हणून खुलेपणाने जगता येण्याचा!

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-मुक्तीसारख्या विषयाला हात घालताना माझ्या घरातील स्त्रियाच माझ्या डोळ्यांसमोर उभ्या ठाकतात.

आमच्या घरात मी खंबीर, कार्यकुशल आणि धडाडीच्या स्त्रियांचा वावर जास्त पाहिला आहे. खडतर परिस्थितीत उगाच न रडता, नशिबाला - स्त्री जन्माला वगैरे कसलेही बोल न लावता पुढ्यातील कामे सफाईने पार पाडणार्‍या ह्या स्त्रिया.... जास्तीच्या जबाबदार्‍यांनी डगमगून न जाणार्‍या, वेळप्रसंगी स्वतंत्र निर्णय घेणार्‍या व त्या निर्णयांशी ठाम राहणार्‍या माझ्या आयुष्यातील आई, आजी, मावश्या....

स्त्री-मुक्ती सारखे शब्द आजीच्या काळात प्रचलितही नसतील कदाचित. तिच्या वेळी समाजातील सर्व समीकरणेच वेगळी होती. कोंकणातील एका आडगावातील इ. स. १९२१-२२ च्या दरम्यानची दहा-अकरा वर्षांची बालविधवा म्हटल्यावर तिचे भवितव्य केशवपन करून, आलवण नेसून गोठ्यात मुक्काम करायचा, इतरांच्या संसारांत राब राब राबायचे आणि आयुष्य पिचत काढायचे हेच जवळपास पक्के होते. परंतु थोरल्या बंधूंच्या प्रयत्नांमुळे तिला पुण्यात कर्व्यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत शिकायची संधी मिळाली आणि तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. समाजात सन्मानाने जगण्याची, आत्मनिर्भर होण्याची वाट तिच्यासाठी खुली झाली.

आजीच्या लेखी तिला कर्व्यांच्या संस्थेत मिळालेले शिक्षण, नंतर संस्थेच्याच अनाथ हिंदू महिलाश्रम शाळेत तिने केलेली प्राथमिक शिक्षिकेची नोकरी, माझ्या आजोबांशी झालेला तिचा विवाह, नोकरीच्या निमित्ताने सुधारक मंडळींशी आलेले संबंध व समाजात पुन्हा प्रतिष्ठेने जगता येणे हेच खूप होते. नातेवाईकांशी दुरावा पत्करून, तत्कालीन रूढिप्रिय समाजात आत्मसन्मानाने वावरताना तिला कमी चटके बसले नाहीत. पण एक दुर्लक्षित, असहाय जिणे जगण्यापेक्षा तिला परिस्थितीचे चटके खात मानाने जगणे मान्य होते. ''इच्छा तिथे मार्ग'' हे तर तिच्या साऱ्या आयुष्याचे घोषवाक्य होते. परंपरा, चालीरीती, कर्मकांडापासून तिने स्वतःला अलिप्त ठेवले. पण माणुसकीचा धर्म जपला. त्या काळात अर्थार्जनाबरोबरच आजीने घराजवळ रंगीत माडी असलेल्या मन्ना नायकिणीच्या मुली-नातींना, आजूबाजूच्या गोरगरीब समाजातील अनेक मुलामुलींना मोफत शिकविले.

केवळ शिक्षणामुळे तिला हे सारे शक्य झाले.

लोकांनी टीका केली तरी त्याकडे लक्ष द्यायचे नसते, आपण जेव्हा स्वतःशी ठाम असतो तेव्हा बाकीचे जग गेले चुलीत, ही आजीची विचारसरणी होती.

माझ्या आईला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता आले. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळाला. अनेक वर्षे प्राध्यापकांच्या संघटनेच्या कामाचा सशक्त अनुभव, सहकार्‍यांच्या वेतन किंवा सुविधांसाठी सरकारी पातळीवर घेतलेले प्रयत्न, आंदोलने, संप, पुरुष सहकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चे, संघटना पातळीवर केलेले समाजकार्य अशा आघाड्यांवर काम करताना तिच्यापाशी अनुभवांची भली थोरली शिदोरीच जमा झाली.

प्राध्यापकी करताना आईने अनेक विद्यार्थिनींना फक्त अर्थशास्त्राचेच धडे दिले नाहीत, तर शिकण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रवृत्त केले. ''पोरींनो, भरपूर शिका, स्वावलंबी बना. घरच्यांनी, नवऱ्याने सांगितले म्हणून कोठेही न वाचता सह्या ठोकू नका, '' ती विद्यार्थिनींना कायम सांगत असे. आईच्या बऱ्याचशा विद्यार्थिनी या आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील किंवा अल्पशिक्षित समाजातील होत्या. कॉलेज संपलं की चार घरी जाऊन धुणी-भांड्याची कामं करण्यापासून ते घरातील विरोधाला न जुमानता अर्धपोटी राहून शिक्षण कसेबसे चालू ठेवणाऱ्या. त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांना वेळप्रसंगी मार्गदर्शन करणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना मुलीचे लग्न लवकर न करण्याविषयी - तिला पुढे शिकू देण्याविषयी समजावणे, कोणा मुलीवर घरी दारुडा बाप किंवा मोठा भाऊ हात उचलत असतील - मारहाण करत असतील तर त्यांना योग्य समज देणे, त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देणे अशा अनेक गोष्टींकडे तिला अध्यापना व्यतिरिक्त लक्ष द्यावे लागत असे.

अनेकदा आमचा पत्ता शोधत तिच्या विद्यार्थिनी घरी तिला भेटायला यायच्या. ''मॅडम, घरच्यांनी लग्न ठरवलंय. परीक्षेपर्यंत थांबणार नाही म्हणतात. मला पुढं शिकायचंय हो.... '' म्हणत ओक्साबोक्शी रडणाऱ्या मुली. किंवा ''घरी माझ्या शिक्षणासाठी खर्च करायला पैसा नाही म्हणतात, मला पुढे शिकता नाही येणार, '', ''आमच्याकडे मुलींना कोणी जास्त शिकवत नाहीत, लवकर लग्न करून देतात आणि लग्नानंतर घराबाहेरही पडता येत नाही, '' असे म्हणून हताश झालेल्या मुली. त्यांना धीर देणं हे सोपं काम नसायचं. बहुतेक वेळा घरचे लोक काही ऐकायच्या मनस्थितीतच नसायचे. अशा परिस्थितीत आई त्या मुलीला लग्नानंतरही जमेल तसे आपले शिक्षण पुरे करण्याचा, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा सल्लाच काय तो देऊ शकत असे. एका केसमध्ये अल्पवयीन मुलीला एका शेटाला विकायला निघालेल्या घरच्यांच्या तावडीतून तिला पोलिसांच्या मदतीने सोडवून तिच्या योगक्षेमाची व शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करताना आईने केलेला जीवाचा आटापिटा आजही मला आठवतो.

खूपदा रस्त्याने जाताना कधी ह्या जुन्या विद्यार्थिनी भेटल्या की त्या आईचा हात घट्ट पकडून भरभरून बोलत असत. आपण आपलं शिक्षण कसं पूर्ण केलं, थोडेफार कमावू लागलोय ह्याच्या कहाण्या सुनावत असत. कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करायचा नाही हे आई प्रत्येक बॅचच्या मुलींना बजावून सांगायची. तरीही कोणा विद्यार्थिनीच्या हुंडाबळीची किंवा सासरच्यांचा छळ असह्य होऊन केलेल्या आत्महत्येची बातमी आली की तिला खूप वाईट वाटत राहायचं. डोळ्यांमधली स्वप्ने नीट उमललीही नसताना त्या कोवळ्या वयातील मुलींचे मृत्यू काळजाला घरं पाडून जायचे.

आज निवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा इतरांना कसा उपयोग होईल ह्यासाठी ती सदोदित प्रयत्नशील असते. घरात काम करणाऱ्या मोलकरणीलाही ''मुलींना शिकव, त्यांना शिळेपाके खायला लावू नकोस, मुलाचे फाजील लाड करू नकोस, मुलींबरोबर त्यालाही कामाची सवय लाव, त्यांना शिक्षणासाठी काही मदत हवी असेल तर सांग, मी करेन, '' हे ती बजावून सांगत असते.

आई व आजी नोकरी करत होत्या, आर्थिक दृष्ट्या कोणावर अवलंबून नव्हत्या. तरीही त्यांना संघर्ष वा घरातील कष्ट चुकले नाहीत. उलट घरी व बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागले. वेळप्रसंगी तडजोड, नाराजी, मतभेद, असहकार यांची अग्निदिव्ये त्यांनाही पार करायला लागली. काही संबंध दुरावायलाही लागले. पण ती किंमत चुकती करायची त्यांची तयारी होती. त्याबद्दल त्यांना कधीच खेद वाटला नाही. एकदा निर्णय घेतल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आणि इतरांच्या टीकेची भीड बाळगली नाही. त्यांना मनात त्रास तर नक्कीच झाला असणार.... पण तो त्रास त्यांनी पचविला. बाईला केवळ ती बाई आहे म्हणून समाजात किंवा घरात कमीपणा घ्यायला लागणे, तिला एक माणूस म्हणून मनासारखे जगता न येणे, आपली मते - विचार व्यक्त करता न येणे आणि विनाकारण त्रास सहन करावा लागणे ह्याबद्दल त्यांचे विचार तेव्हाही सुस्पष्ट होते व आहेत.

मी आजवर काही स्त्री सक्षमीकरण, सबलीकरणाच्या परिषदांना गेले, तेथील मान्यवर वक्त्यांचे स्त्री-मुक्तीवरील विचार ऐकले, कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकले, त्यातून बरीच माहितीही मिळाली. काही प्रकल्पांना भेटी दिल्या, काहींसाठी निधी संकलनाचे कार्यक्रमही केले. या निमित्ताने उच्चभ्रू समाजातील स्त्रियांना सहन करावा लागणारा हिंसाचार जसा पाहिला तसे झोपड्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना भोगावे लागणारे अत्याचारही पाहिले. त्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या, त्यांना न्याय मिळवून देणार्‍या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना माझा सलाम!

एक गोष्ट नक्की... आई-आजीने ज्या प्रकारे आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचे प्रश्न सोडवत, त्यांना जमेल तसा मार्ग दाखवत जगून दाखविले त्याचा परिणाम माझ्या मनावर सर्वाधिक झाला. कदाचित इतरांच्या मते ती 'स्त्रीमुक्ती' नसेलही... पण त्यांच्या घट्ट पाय रोवून जगण्यातून माझ्या मनातील स्त्रीला विलक्षण बळ मिळाले. त्यांच्यासारख्या अनेक अग्रेसर स्त्रियांच्या व दूरदर्शी पुरुषांच्या योगदानामुळे मला आज त्यांच्या काळात असलेल्या संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागत नाही. भविष्यकाळात पुढच्या पिढ्यांसमोर कदाचित वेगळी आव्हाने असतील. तोपर्यंत तरी स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे साध्य झाले असावे अशी आशा करूयात.

-- अरुंधती

[* लेखातील स्त्रियांसंदर्भातील टक्केवारी ही काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या विविध मान्यताप्राप्त अहवालांमधील आहे. ]

टण्या | 8 March, 2011 - 15:04
स्त्री-मुक्तीबद्दल बोलताना हमखास पुरुष विरुद्ध स्त्री, पुरुषाने स्त्रीवर गाजवलेले वर्चस्व ह्या विषयावर वाद सुरू होतात. मग मुद्दे येतात की स्त्री हीच स्त्रीची वैरी आहे, सासवा सुनांचा छळ करतात वगैरे वगैरे. इथे आपण एक महत्त्वाची बाब नजरेआड करतो - समाजात 'स्त्री'स पुरुषापेक्षा कमी लेखले जाते, समाज 'स्त्री'स कमी लेखतो. इथे समस्त पुरुष, समस्त स्त्रीया, उच्चवर्ग, गरीब असा भेदभाव वा विविध घटक स्वतंत्रपणे काम करत नसून संपूर्ण समाज 'स्त्री'स कमी लेखण्यास जबाबदार असतो. आणि समाजात तुम्ही-आम्ही सर्वच आलो.

वरती अनेकांनी स्त्री-मुक्ती, त्याची गरज, वैयक्तिक अनुभव दिलेले आहेत. पण नेमक्या कुठल्या टप्प्याशी समाज पोचला तर स्त्री मुक्त झाली असे म्हणता येईल? ह्याची आपल्याला यादी करता येईल का?
त्यादृष्टीने माझा एक प्रयत्नः

१. स्त्री-भृण/स्त्री-अर्भक हत्या संपूर्णपणे बंद होणे व स्त्री-पुरुष गुणोत्तर नैसर्गिक पातळीवर येणे - हा अत्यंत महत्त्वाचा निकष असेल कारण स्त्री-भृण/अर्भक हत्येसारखा अत्यंत नीच-निंदनीय प्रकार ह्या समाजात स्त्री म्हणुन जन्मास येण्यास दिली जाणारी टोकाची तुच्छता दर्शवतो.
२. सर्व प्रकारच्या व्यवसायातून व नोकरीतून स्त्री-पुरुषांचे प्रमाण हे समसमान असणे - इथे सर्वोच्च पदापासून सर्वात खालच्या पातळीवरील (नोकरीच्या) नोकर्‍या अपेक्षित आहेत. जेव्हा हे प्रमाण समान असेल तेव्हा ते अप्रत्यक्षपणे असे दर्शवेल की:
अ) शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध असणे व त्या संधींचा लाभ घेण्यात लिंगाधारीत भेदभाव न होणे - उदाहरणार्थ एखाद्या घरातील मुलगा व मुलगी ह्यांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षणाची संधी मिळणे, ना की मुलगा आहे म्हणुन पेमेंट सीटला प्रवेश व मुलगी आहे म्हणुन तिला मिळेल त्या ठिकाणी. अगदी उच्चवर्णीय मध्यमवर्गातदेखील सर्रास असे दिसून येईल की मुलीला १२वी नंतर पेमेंट सीटला MBBS ला प्रवेश मिळतो पण ती BAMS ला प्रवेश घेते पण त्याच घरातल्या मुलाला पेमेंट सीटचे पैसे भरून इंजिनीअरींग-मेडिकलला प्रवेश घेतला जातो.
ब) हा निकष पुरुष स्त्रीस आपल्यापेक्षा कनिष्ठ समजत नाहीत व स्त्री-अधिकारी हे समाजात सहजपणे सामावून घेतले जातात हे दर्शवतो.
३. लष्करात स्त्रीयांना समान संधी - हा निकष मुद्दाम वेगळा लिहिण्याचे कारण म्हणजे लष्करासारख्या नोकरीत स्त्रीयांना समान संधी मिळणे हे त्यांच्या शारिरीक क्षमतेबाबत भेदभाव न करण्याचे लक्षण आहे तसेच अधिक महत्त्वाचे म्हणजे लष्करातील नोकरीत घरापासून दूर इतर सहकर्मचार्‍यांसोबत एकत्र राहणे-अनेक महिने व्यतीत करणे ह्या वेगळ्या वातावरणात एक स्त्रीस स्त्री म्हणुन कुठलाही अडथळा येत नाही याचे लक्षण आहे. इथे लष्करातील कडक शिस्त व शिक्षा हे deterrent म्हणुन अपेक्षित नसून कुठल्याही बाह्य दबावाशिवाय सर्व सहकर्मचार्‍यांनी स्त्रीयांना समान वागणून देणे अपेक्षित आहे.
४. एखाद्या घटस्फोटीत/आपल्या जोडीदारापासून विभक्त राहणार्‍या व नवरा\जोडीदाराचे निधन झालेल्या स्त्रीस कुठल्याही पातळीवर ह्या कारणास्तव भेदभाव, त्रास न होणे. योनिशुचितेची बेगडी संकल्पना समाजाने मागे टाकल्याचे हे एक लक्षण असेल. अर्थात हा टप्पा येण्यासाठी स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा असणे, जोडीदारासोबत राहणे, वेळ व्यतीत करणे व त्यानंतर लग्नाचा निर्णय घेणे, लग्न अथवा एकत्र राहण्यातून दोन्ही जोडीदारांना वेगवेगळे होण्याची समान संधी उपलब्ध असणे व वेगळे झाल्यावर पुन्हा नवीन जोडीदार शोधताना 'ह्या पुर्वी एक जोडीदार होता' ह्या कारणास्तव संधी कमी न होणे हे निकष समाजात स्त्री मुक्त झाल्याचे असतीलच पण त्याजोडीने समाज संधी-समानतेच्या बाबतीत प्रगल्भ झाल्याचेदेखील लक्षण असेल.

मामी | 9 March, 2011 - 03:06
आताच्या स्थितीला स्त्रीमुक्ती ही अनेक पातळ्यांवरची लढाई आहे - सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तीक आणि हो, धार्मिक. यातील धार्मिक बाब सध्या बाजूलाच ठेवूया. तो एक स्वतंत्र आणि अतिशय संवेदनाशील विषय आहे. बाकीच्या तीन गोष्टि बघूया :

१. सामाजिक : समाजात वावरताना, समाजाकडून असलेल्या अपेक्षा, मिळणारी गैरवर्तणूक, उपहास. नोकरी-व्यवसायात डावी वागणूक. सर्व सामाजिक रुढि पुढे नेण्यासाठी स्त्रीवर होणारी सक्ती, समाजापेक्षा वेगळा विचार करणार्‍या पुरुषाचा उदोउदो पण तीच जर स्त्री असेल तर तिची कुचेष्टा. लग्न न झालेल्या प्रौढ स्त्रीया, परित्यक्ता, विधवा यांना होणारे त्रास, असे अनेक मुद्दे आहेत.

२. कौटुंबिक : कुटुंबातही, घरचे रितीरिवाज पाळण्याची सुनेवर (आणि केवळ सुनेवरच. यातून घराण्याचा तो कुलदिपक असणारा तिचा नवरा मात्र स्वतंत्र) होणारी सक्ती, हुंडा, स्त्रीगर्भ-चिकीत्सा, मुला-मुलीत भेदभाव, स्त्री-कुपोषण या गोष्टी येतात. अगदी, बचत करतानाही मुलाच्या शिक्षणाकरता आणि मुलीच्या लग्नाकरता अशा बचती केल्या जातात. अगदी शिकल्यासवरलेल्या समाजातही. फार काय याच गोष्टी टिव्हीवरल्या जाहिरातींतूनही ठळक केलेल्या असतात.

या गोष्टींबद्दल वर बर्‍याच जणांनी उदबोधक चर्चा केली आहेच.

३. वैयक्तिक : हा एक वेगळाच लढा आहे. आपला आपल्याशी. शिक्षणाने आत्मभान येतं, अर्थार्जनाने आत्मनिर्भरता येते आणि या दोन्हीमुळे आपल्या आयुष्याच्या दोर्‍या आपल्या हाती ठेवण्याचा आत्मविश्वास येतो. स्वतःचे विचार, निर्णय आणि त्यांचे परिणाम पारखून घेऊन त्यांची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी आपल्याला एक स्वयंपूर्ण व्यक्ती बनवू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एक व्यक्ती आहोत आणि आपल्यालाही आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे हे प्रत्येक स्त्री ने लक्षात ठेवले पाहिजे.

उच्चशिक्षित, उच्चभ्रु स्त्रियादेखिल वैयक्तीक पातळीवर लढताना दिसत नाहीत. कारण दिलेल्या / सांगितलेल्या गोष्टी तशाच्या तशा स्विकारण्याची वृत्ती. हे का? आणि असच का? असे प्रश्न का बरं मनात येत नसतील? वरवर मॉडर्न कपडे घातले की झाले? विचारांचं काय? मुलींनी २०-२१ व्या वर्षी लग्न करावीत, वेळाच्यावेळी मुलं होऊ द्यावीत हे असे विचार आजुबाजुच्या मैत्रिणींकडून ऐकले की धक्काच बसतो. अशा कितीतरी तर्‍हा - माझी मुलगी आधीच सावळी आहे म्हणून 'तिला स्विमिंगला पाठवू नको' असे एकीने मला सांगितले की तो प्रसंग, 'जग किती वाईट आहे, मी माझ्या मुलींना एकटं कधीही कुठेही पाठवणार नाही' असं एका सधन घरातल्या मॉडर्न स्त्रीचं वक्तव्य, कोर्टात वकिली करणार्‍या बाईला स्लीवलेस घालायची नवर्‍याकडून बंदी, डॉक्टर असलेल्या स्त्रीयाही सणवार साजरे करताना मासिकपाळीचा अडसर मानताना पाहिल्या तेव्हा ..... कितीतरी प्रसंग. वैज्ञानिक दॄष्टिकोन, साच्यापेक्षा वेगळा विचार करून तो आमलात आणण्याची धमक प्रयत्नपूर्वक अंगी बाणवली पाहिजे. प्रत्येक आईने आपल्या मुलीकरता हे स्त्रीधन द्यायलाच हवं.

स्त्रीमुक्ती ही बहुपेडी, बहुआयामी आणि दीर्घकालीन अशी प्रोसेस आहे. फार दूरपासून छोट्या छोट्या पावलांनी चालत आजपर्यंत आली आहे, अजूनही फारशी मोठी झेप घेतलेली नाही. पण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहता निदान समाजमंथन सुरू आहे, जनजागरण होत आहे आणि यातूनच कधीतरी एक 'यशस्वी पहाट' येईलच अशी मी आशा बाळगून आहे.

ठमादेवी | 9 March, 2011 - 14:03
हे माझं मामीच्या खो ला उत्तर...
मला एक घटना आठवते इथे...
एक इंजीनिअर मुलगी... पण तिला लग्नानंतर नोकरी सोडायला भाग पाडलेलं. दोन मुलं होती तिला. एकदा माहेरी नागपूरला जाउन आईसोबत सासरी मुंबईत आली. सासरच्यांनी लहानग्या मुलाला घरात घेतलं आणि तिला बाहेर ठेव्लं... तीन दिवस ती रोज जायची. गयावया करायची... पण त्यांनी तिला घरात घेतलं नाही. शेवटी चौथ्या दिवशी तिला घरात रेकॉर्डरसमोर बसवून आपलं म्हणणं मान्य करायला लावल, सर्व अटी मान्य करायला लावल्या आणि मगच तिला घरात घेतलं गेलं... पण तिच्या आईने तिची साथ दिली नाही... वपुंच्या कथेची साधर्म्य असलेली ही प्रत्यक्षात घडलेली घटना अहे.
मामी म्हणते त्याप्रमाणे स्त्रीमुक्तीचा लढा खूप निरनिराळ्या पातळीवर लढला जातोय... आजच माझा एक मित्र म्हणाला, स्त्रीमुक्तीची सध्या भारतात रुजू पाहत असलेली संकल्पना ही ब्राह्मण स्त्रियांनी आणलेली आहे... त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना इतर समाजातल्या स्त्रियांना लागू होतातच असं नाही... त्याच्या मते आजच्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया गौरी देशपांडेचे विचार वाचून त्याप्रमाणे वागण्याचं ठरवतात पण त्यांना सावित्रीबाईंचे स्त्रीमुक्तीचे विचार माहीत नाहीत...
मला असं वाटतं की स्त्री मुक्ती म्हणजे केवळ स्त्रियांचा छळ थांबवणं नाही तर माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणं आहे... अर्थात, देणारं इथे कुणीच नाही. कुणालाही तो अधिकार नाही. भारतात नागरिकांना, मग तो स्त्री असो वा पुरूष कोणताही हक्क बहाल करण्याचा हक्क फक्त घटनेचा आहे... मात्र आपण आपले हक्क आणि त्याच्या मर्यादा ओळखणं आवश्यक... भारतातल्या बहुसंख्य स्त्रियांना हे हक्कच माहीत नाहीत...
कायदा आपल्या हक्कांचं संरक्षण करतो असं म्हणतात... पण भारतीय न्यायव्यवस्था ही इतकी भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे की तिच्याकडून न्यायाची अपेक्षा करणंच चूक आहे असं बहुसंख्य स्त्रियांना वाटतं. वर्षानुवर्षं लांबत चाललेले खटले पाहून हे मात्र पटतं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड...

मानुषी | 9 March, 2011 - 14:25
स्त्री मुक्ती विरोधातली काही उदाहरणे . .......
१) माझ्या मैत्रिणीला दुसरी मुलगी झाली. म्हणून भेटायला गेलो. हॉस्पिटलमधे सुतकी वातावरण. सासूबाई चेहेरा टाकून बसलेल्या. मी बाळ पाहिलं छान गुटगुटीत सुंदर निरोगी चमकदार डोळ्यांची मुलगी. मी मैत्रिणीचं अभिनंदन केलं. ती म्हणाली, " तूच पहिली अभिनंदन करणारी. सगळे सांत्वनासाठी येतात. पाठीवरून हात वगैरे फिरवतात. वर म्हणतात ...बेटर लक नेक्स्ट टाईम...आता तूच सांग...या बेटर लकसाठी मी अजून एक तिसरा चान्स घेऊ? आणि तेव्हाही काय गॅरंटी...मुलगाच होईल याची? तिसरा चान्स शक्यच नाही. नंतर माझ्या देखतच दोघी तीघी आल्या आणि तो सांत्वनाचा भयंकर कार्यक्रम झाला. अगदी तिच्या पाठीवरून हात वगैरे फिरवून. मला चीड आली होती...पण ! एक सुंदर निरोगी जीव जन्माला आलाय ही सेलेब्रेट करण्याची घटना नाही का? अश्या सांत्वनाला येणार्‍यांनी शेवटी मैत्रिणीला रडवलं.
इतकं सगळं होऊनही पुन्हा दोन वर्षांनी ती तिसर्‍यांदा प्रेग्नंट राहिली. मी म्हटलं...अगं ? तर म्हणाली घरात सासूबाई, नणंदा नवर्‍याला टोमणे मारून, समक्ष सांगून या ना त्या मार्गाने खूप त्रास देताहेत. मग आम्ही हा डिसिजन घेतला. आता परत "गणपती पाण्यात"....पण शेवटी तिला गणपतीच पावला(?)..........आणि ते(कुटुंब) सुखाने नांदू लागले. अशी खूप कुटुंबे आमच्या ग्रूपमधे आहेत की ज्यांना पहिल्या दोन मुली आहेत...आणि तिसरा मुलगा आहे.
आता ही सुशिक्षित मैत्रिण आणि तिचा सुशिक्षित नवरा समाजाच्या आणि कुटुंबातल्या इतर जेष्ठ व्यक्तींच्या दबावाला का बळी पडतात? आणि तिसर्‍या मुलाचा का निर्णय घेतात? जोपर्यंत मुलगा आणि मुलगी हा भेदभाव नष्ट होत नाही तोपर्यंत अश्या घटना घडतच रहाणार.
२) अजून एक शेजारी.... तीन पिढ्या ---एकत्र कुटुंब....म्हणजे ...दाजी आणि सावित्रीबाई यांची चार मुलं आणि त्यांची कुटुंबे.....या चार मुलांपैकी प्रत्यकाला कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार मुलं आहेत. हे सर्व एकत्र रहातात. यातील दाजींच्या मुलांपासून उदा. घेऊया. मुलांचे अती लाड आणि मुली नेहेमी धाकात. त्यामुळे एक चांगलं झालं.....मुली सगळ्या शिकल्या मोठ्या झाल्या. दाजींच्या नाती बी.ए., बी.कॉम होऊन काही तरी छोट्या मोठ्या नोकर्‍या करून आपापले संसार छान करताहेत. पण मुलं अगदी दाजींच्या मुलांपासून कुणीही शिकले नाहीत. कारण मुलांना रागवायचं नाही. आता दाजींचे दोन नातू....एक पोलीस आहे. याल दोन मुलं आहेत. यातली मुलगी वेल बिहेव्ह्ड, हुशार, रांगोळ्या वगैरे छान घालते.घरातही आईला मदत करते. कारण तिला धाकात ठवलं . दुसरा मुलगा आहे. पूर्णपणे वाह्यात. १० वर्षांचा असेल. पण भयंकर उनाड आहे. मग अती झालं की वडील(पोलिस) त्याला इतकं मारतात की अगदी त्याला जखमा होतात. पण पुन्हा लगेच येरे माझ्या मागल्या.
आता या दाजींच्या कुटुंबातली चौथी पिढी ...पण तेच चालू आहे.
पुन्हा तेच...मुलगा मुलगी भेदभाव...चांगले कपडे चांगलं अन्न, चांगल्या फॅसिलिटीज आधी घरातल्या मुलांना ...मग मुलींना....पण मग नंतरच्या करिअरच्या शर्यतीत ही मुलं मागे पडतात. कारण यांना कष्ट करण्याची, तडजोड करण्याची सवयच नसते. आणि शिक्षणाचे महत्व न समजल्यामुळे ....वेळच्या वेळी अभ्यास न केल्यामुळे उत्तम प्रतीच्या शिक्षणाला ही मुले मुकतात. स्वता:विषयी भ्रामक कल्पना घेऊन वावरतात.घरातल्या....विशेषतः बायकांनीच.....याला खत पाणी घातलेले असते...यांचा इगो पॅम्पर केलेला असतो. मग या मुलांची पुढची पिढी कॉन्व्हेन्ट/इंग्रजी माध्यमात जाते...घातली जाते. उत्तम शिक्षण म्हणजे इंग्रजी अशी गैरसमजूत ! इथेही स्त्रीयांनीच आपले विचार बदलण्याची गरज आहे.
३)माझी एक मैत्रीण. तिचा नवरा आय आयआयटीयन. भयंकर ब्रिलियंट. त्याची आमच्या गावात एम आय डीसीत इंडस्ट्री आहे. ही मैत्रीण बी.कॉम आहे. घरच्या व्यवसायात छान मदत करते. ती कालच सांगत होती..( आम्ही मैत्रीणींनी काल क्लबमधे women's day साजरा केला...तेव्हा आज नवर्‍याच्या जेवणाची घरी काय व्यवस्था केली यावर प्रत्येकीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकत होतो...तेव्हा ती हे बोलली.) ती म्हणाली ," माझं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही जेवत होतो...जेवता जेवता मला मिरची लागली तर ...मी नवर्‍याला म्हणाले, ...अनिल, पटकन पाणी दे ना प्लीज....(मी नवर्‍याला एकेरी संबोधते यावरच पहिला मोठा आक्षेप होता............दोनदा सांगितलं....अनिल उठलाच नाही....फक्त माझ्याकडे कटाक्ष टाकला. माझ्या तोंडात जाळ झालेला होता....मीच ऊठून शेवटी पाणी घेतलं. रात्री तो मला म्हणाला इथे आपल्या खोलीत काहीही सांग........तुला अगदी पाण्याची अंघोळ घाली.......पण तिथे आई, दादा, वहिनी यांच्यासमोर असं पाणी बिणी मागून माझ्या इज्जतीचा फालुदा करत जाऊ नको.
आता आय आय टी त उत्तम शिक्षण घेतलेल्या अनिलला बायकोला आधी माणूस म्हणून वागवायला पाहिजे हेही जर समजत नसेल तर ..............................?
त्याच्या घरी वर्षानुवर्षे जी पुरुषप्रधान संस्कृती जोपासली गेली त्याचे हे परिणाम. हे ही बदलणे स्त्रीच्याच हातात आहे.
४)समोर एक कुटुंब रहाते. हे जोडपं बँकेत नोकरी करते. त्यांना दोन मुली आहेत. त्या बाई किती तरी वर्षे मुलगा होण्यासाठी ट्रीटमेंट घेत होत्या. बर्‍याच वेळा त्यांनी अ‍ॅबोर्शन केल्याचं कानावर यायचं. हे बरीच वर्षं चाललं. नंतर मी तर ही गोष्ट विसरून गेले. मोठ्या मुली १८/२० वर्षाच्या झाल्या. बाई रस्त्यात भेटल्या. त्या प्रेग्नंट असाव्यातसं वाटलं. धक्काच बसला. तरी खूपच अशक्त आणि ढेपाळलेल्या वाटल्या. मी दाखलंच नाही की मला त्यांची गुड न्यूज(?) समजलीये. माहिती नाही ...पण मला खूप ऑकवर्ड वाटत होतं...आणि काय प्रतिक्रीया व्यक्त करावी याची मनात जुळवाजुळवच होईना. नंतर कधी तरी काही महिन्यांनी भेटल्या. तर चांगलंच लक्षात येईल एवढी प्रगती दिसत होती. मग मला दखल घ्यावीच लागली.
तर त्या म्हणाल्या.."म्हणजे काय...मला वाटलं ...मागच्या खेपेला आपणा रस्त्यात भेटलो तेव्हाच तुझ्या लक्षात आलं असेल". मी अभिनंदन केलं. तर म्हणाल्या, " अगं मुली काय जातील आपापल्या घरी लग्न करून...आपल्याला सांभाळायला उतार वयात कुणी नको का? आणि आपण एवढं कमावलंय, एवढी इस्टेट करून ठेवलीये त्याला वारस नको का? म्हणून घेतला गं हा डिसिजन."
यथावकाश त्या बाळंत झाल्या ...त्यांना जुळं झालं एक मुलगा, एक मुलगी. त्यांनी गर्भ लिंग चिकित्सा आधीच केली होती. मुलं मोठी होत होती. मुलांचे वडील गावातच पण खूप लांबच्या ब्रॅंचला जायचे.
या बाईंनी बँकेची कसलीशी परिक्षा दिली आणि त्यांची बदली ऑफिसरपदावर पुण्याला झाली. बाई पुण्याला गेल्या. फ्लॅट भाड्याने घेतला. मोठ्या मुलीतली २ नंबरची मुलगी पुण्यात शिकायला ठेवली. आता बाई आणि त्यांची ही २ नं ची मुलगी आता पुण्यात एकत्र राहू लागली. ही जुळी मुलं अजून प्राथमिक शाळेतच. सांभाळायाला बाई ठेवली. सगळा संसाराचा भार त्या सगळ्यात मोठ्या मुलीवर. तिला ग्रॅज्युएशननंतर पुण्यात एमबीएला अ‍ॅडमिशन मिळालेली. पण सर्वानुमते ती नाकारून या सर्वात मोठ्या मुलीने गावातच राहून आईचा संसार सांभाळला सुरवात केली. काही छोटे मोठे कोर्सेस ती करतेय. पण विशीतल्या मुलीला.... जुळी भावंडं, एकदा हार्ट अ‍ॅटेक येऊन गेलेले वडील यांची काळजी घेता घेता अभ्यास कसा जमेल? आता ही जुळी मुलं पूर्ण वेळ गल्लीतच पडीक असतात. पूर्णपणे अंडरनरिश्ड, आणि शरिरावर इतक्या ठिकाणी पडल्याझडल्याच्या, स्टिचेसच्या खुणा...कारण आमच्या गल्लीतून वहाने फार जोरात जातात आणि ही (खेळणारी सगळीच) मुलेही अंगात वारं भरल्यासारखी पळत असतात. त्यांना कित्येक वेळा छोटे मोठे अ‍ॅक्सिडेंट झालेत. आईची करिअर बाबतची अतिमहत्वाकांक्षा म्हणायची ....की मोठ्या कुटुंबासाठीची तरतूद करण्यासाठी हे सर्व करणां ओघानंच आलं असं म्हणायचं? पण त्या सर्वात मोठ्या मुलीवर अन्याय होत नाही का?
आता या बाई स्वता:वर किती अत्याचार अन्याय करून घेत आहेत..वर्षानुवर्षं!आधी मुलासाठी प्रयत्न...मग गर्भ लिंग चिकित्सा...मग अ‍ॅबॉर्शन्.......मग परत प्रयत्न........पहिल्या दोन मुली असूनही मुलगा पाहिजे हा अट्टाहास? या बाईंच्या हेल्थविषयी कुणीच विचार करत नाही? बाईंची मानसिकता काय होती? आणि ती घरातली मोठी मुलगी तिला आलेली चांगली संधी तिला गमावावी लागली.
अशी कित्येक उदाहरणे आजूबाजूला आहेत. हीच परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आपल्या सारख्या स्रियांनी करायला हवा....जो मला वाटतं आपण सार्‍याजणी ...आपल्याला जे संस्कार मिळाले...आपल्याला जी भेदभावरहित वागणूक मिळाली............करतच आहोत.

अश्विनीमामी | 9 March, 2011 - 15:11
इथे मांडलेल्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन.

माझे खालील मुद्दे:

१) प्रत्येक स्त्रीने माणूस म्हणूनच जगले पाहिजे.
२)पुरुष वर्चस्व हे केवळ सोशल कंडिशनिंग मधून आले आहे व एका शक्तिमान गटाने त्यांच्या हातातील शक्ती व सत्ता कायम राहावी म्हणून ह्या ५० % माणसांना त्यांच्या टाचेखाली राहायला शिकविले आहे भाग पाडले आहे. त्यातील काही माणसे उत्तम जेलरगिरी करतात. रूढी, धार्मिक रिच्यूअल्स मधून बायकांना सिस्टिमॅटिकली घाबरवून ठेवले जाते. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नाकारले जाते व मग जिवंत राहण्यासाठी प्रत्येक बाई कुठे तरी जमवून घेते. शारीरिक, मानसिक व भावनिक , वैचारिक या पातळ्यांवर. तसे तिला करावे लागू नये. त्याची खरे तर गरज नाही.
३)पुरुषांना घाबरण्याची काहीच गरज नाही हे प्रत्येक मुलीस शिकविले गेलेच पाहिजे.
४) आर्थिक स्वातंत्र्याशिवाय स्त्री स्वातंत्र्य हे व्यर्थ आहे.
५) स्त्रीयांच्या दृष्टीकोनातून अर्थव्यवस्था, जागतिक राजकारण उभारले गेले पाहिजे तरच व्यर्थ शस्त्रस्पर्धा,
दुसर्‍या राजवटींवर आपला हक्क गाजवायची खुमखुमी ( ज्यात हकनाक जीव जातात व पैसा वाया जातो - जो शिक्षण, इन्फ्रा, शेती मध्ये वापरता येइल. ) असे खास पुरुषी दुर्गूण बाजूला पडून सहकार, सामोपचार,
सर्वांनी मिळून राहणे व बालसंगोपन करणे अश्या स्त्री प्रव्रुत्तींना प्रोत्साहन मिळेल.
५) पुरुषप्रधान संस्क्रूतीत बाईस अब्यूज सहन करायला लावतात त्याची गरजच नाही. अब्यूज सहन करणार नाही अशी झीरो टॉलरन्स पॉलिसी हवी प्रत्येक स्त्रीची.
६) आपले शरीर, व आपले रिप्रॉडक्टिव राइट्स यावर स्त्रीचाच अंतिम हक्क हवा.
७) स्त्री भावनांना दुय्यम लेखले जाऊ नये.
८) मेन आर गुड अप टू अ पॉइंट. आफ्टर दॅट वी हॅव टू डिपेंड ऑन अवर ब्रेन्स

आशूडी | 9 March, 2011 - 16:20
खो देऊन लिहायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद अश्विनीमामी. तुमच्या ५,६ आणि ८ क्र ला जोरदार अनुमोदन.
इथे इतक्या सार्‍या लोकांनी आधीच मुद्देसूद लिहीले आहे की आता काय लिहू हा प्रश्नच! मुळात 'स्त्रीमुक्ती' म्हणजे 'स्त्री ला माणूस म्हणून जगण्याचा पुरुषांइतकाच समान हक्क' हा धागा सार्‍यांच्या पोस्टीतून स्पर्शून गेला. त्याच अनुषंगाने काही प्रसंग आठवले ते तसेच सांगते.
१. लग्न ठरवताना मुलीचे शिक्षण, पगार हा मुलापेक्षा अधिक असलेला मान्य नाही. मुलगी हवी तेवढी'च' शिकलेली आणि कमावणारी मात्र हवी. प्रेमविवाह असेल आणि अशी काही तडजोड त्या दोघांनाही मान्य असेल तरीही दोघांच्याही घरचे बजावून विचारत राहणार, "बघ हं, नाकापेक्षा मोती जड होईल!" पुढे 'आणीबाणी'च्या प्रसंगी सासू भात्यातले हे ब्रम्हास्त्र काढणारच, "तेव्हाच सांगितलेलं ऐकलं असतंस तर...! " म्हणजे मुलगी कमी शिकलेली, कमी कमावणारी असती तर हा भांडणाचा प्रसंग उद्भवलाच नसता का काय! घरात येणार्‍या पैशाला 'बायकोचा' म्हणून वेगळा वास असतो का?

२. आमच्या मुलाचे आम्ही लग्न ठरवत आहोत फार काही अपेक्षा नाहीत मुलीबद्दल. पण मुलगी एकुलती एक अजिबात नको. भाऊ असला तर उत्तम! का पण? नाही म्हटलं तरी आपल्या मुलावर तिच्या आईवडीलांची जबाबदारी येत नाही का? !!! (यापुढे शब्दगंगा वाहिली तरी शब्दांनी उमटलेले हे डाग कधीच पुसले जाणार नाहीत, आय नो च! )

३. काही कारणाने एका जोडप्याला अनेक वर्षे मूल होत नाही. त्याबद्दल अनेक प्रसंगात त्या स्त्रीला इतर अनेक स्त्रियांकडूनच नाही नाही ते ऐकवले जाते, अत्यंत हीन वागणूकही दिली जाते. त्या पुरुषाकडे कोणताही पुरुष अशा संशयी नजरेने कधीच पाहत नाही. मूल असणे ही पुरुषांच्या जीवनाची इतिकर्तव्यता कुठे आहे? काही दिवसात डॉक्टर कडून रिपोर्टस येतात. दोष पुरुषात असतो. एकमेकांना सांभाळून घेत, आधार देत दोघे घरी येतात. घरी आल्यावर बायको दोष आपल्यातच असल्याचे जाहीर करते. तिला दिली जाणारी घृणास्पद वागणूक चालूच राहते. पुरुषाला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करण्याचे सल्ले दिले जातात. पण त्याला 'सत्य' माहित असल्याने तो ते नाकारतो. त्यातून त्याला 'आजन्म एकपत्नीव्रती राम' असल्याचे पदक मिळते. त्याची सीता मात्र रोज नव्याने अग्निदिव्य पार करते. अशा शहीद होण्यातून तिने काय मिळवले? स्वतःत दोष असल्याची कबुली देऊन तिची ही पिळवणूक थांबवावीशी आजही त्या रामाला का वाटत नाही?

शिकून 'सुशिक्षित' झालेल्या खाऊनपिऊन सुखी माणसांच्या घरातल्या या कहाण्या. जिथे 'स्त्री' ला तिचे स्वतःचेच आयुष्यही जगण्याचा हक्क नाकारला जातोय तिथवर जाऊन पोहोचण्याची माझी तर छातीच नाही!

संयोजक खो (२)- चेतन
चेतन खो (१)- आशुतोष०७११
, चेतन खो (२)- श्यामली
आशुतोष०७११ खो (१)- ललिता_प्रीति, आशुतोष०७११ खो (२)- फारएण्ड
ललिता_प्रीति खो (१)- अश्विनी_के, ललिता_प्रीति खो (२)- अँकी
www.maayboli.com/node/24210

संयोजक खो (३)- सिंडरेला
सिंडरेला खो (१)- वैद्यबुवा, सिंडरेला खो (२)- नताशा-एक फुल
किंवा आगाऊ
आगाऊ खो (१) दाद, आगाऊ खो (२)- नानबा
वैद्यबुवा खो (१) साजिरा, वैद्यबुवा खो (२)- मैत्रेयी
साजिरा (खो) रैना साजिरा खो (२) झक्की
http://www.maayboli.com/node/24212

संयोजक खो (४)- दीपांजली
दीपांजली खो (१)- अंजली, दीपांजली (खो २)- सीमा
अंजली खो (१)- डेलिया, अंजली (खो२)- जागोमोहनप्यारे
सीमा खो (१)- पेशवा, सीमा खो (२)- मृणमयी
http://www.maayboli.com/node/24211

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्री-मुक्तीबद्दल बोलताना हमखास पुरुष विरुद्ध स्त्री, पुरुषाने स्त्रीवर गाजवलेले वर्चस्व ह्या विषयावर वाद सुरू होतात. मग मुद्दे येतात की स्त्री हीच स्त्रीची वैरी आहे, सासवा सुनांचा छळ करतात वगैरे वगैरे. इथे आपण एक महत्त्वाची बाब नजरेआड करतो - समाजात 'स्त्री'स पुरुषापेक्षा कमी लेखले जाते, समाज 'स्त्री'स कमी लेखतो. इथे समस्त पुरुष, समस्त स्त्रीया, उच्चवर्ग, गरीब असा भेदभाव वा विविध घटक स्वतंत्रपणे काम करत नसून संपूर्ण समाज 'स्त्री'स कमी लेखण्यास जबाबदार असतो. आणि समाजात तुम्ही-आम्ही सर्वच आलो.

वरती अनेकांनी स्त्री-मुक्ती, त्याची गरज, वैयक्तिक अनुभव दिलेले आहेत. पण नेमक्या कुठल्या टप्प्याशी समाज पोचला तर स्त्री मुक्त झाली असे म्हणता येईल? ह्याची आपल्याला यादी करता येईल का?
त्यादृष्टीने माझा एक प्रयत्नः

१. स्त्री-भृण/स्त्री-अर्भक हत्या संपूर्णपणे बंद होणे व स्त्री-पुरुष गुणोत्तर नैसर्गिक पातळीवर येणे - हा अत्यंत महत्त्वाचा निकष असेल कारण स्त्री-भृण/अर्भक हत्येसारखा अत्यंत नीच-निंदनीय प्रकार ह्या समाजात स्त्री म्हणुन जन्मास येण्यास दिली जाणारी टोकाची तुच्छता दर्शवतो.
२. सर्व प्रकारच्या व्यवसायातून व नोकरीतून स्त्री-पुरुषांचे प्रमाण हे समसमान असणे - इथे सर्वोच्च पदापासून सर्वात खालच्या पातळीवरील (नोकरीच्या) नोकर्‍या अपेक्षित आहेत. जेव्हा हे प्रमाण समान असेल तेव्हा ते अप्रत्यक्षपणे असे दर्शवेल की:
अ) शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध असणे व त्या संधींचा लाभ घेण्यात लिंगाधारीत भेदभाव न होणे - उदाहरणार्थ एखाद्या घरातील मुलगा व मुलगी ह्यांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षणाची संधी मिळणे, ना की मुलगा आहे म्हणुन पेमेंट सीटला प्रवेश व मुलगी आहे म्हणुन तिला मिळेल त्या ठिकाणी. अगदी उच्चवर्णीय मध्यमवर्गातदेखील सर्रास असे दिसून येईल की मुलीला १२वी नंतर पेमेंट सीटला MBBS ला प्रवेश मिळतो पण ती BAMS ला प्रवेश घेते पण त्याच घरातल्या मुलाला पेमेंट सीटचे पैसे भरून इंजिनीअरींग-मेडिकलला प्रवेश घेतला जातो.
ब) हा निकष पुरुष स्त्रीस आपल्यापेक्षा कनिष्ठ समजत नाहीत व स्त्री-अधिकारी हे समाजात सहजपणे सामावून घेतले जातात हे दर्शवतो.
३. लष्करात स्त्रीयांना समान संधी - हा निकष मुद्दाम वेगळा लिहिण्याचे कारण म्हणजे लष्करासारख्या नोकरीत स्त्रीयांना समान संधी मिळणे हे त्यांच्या शारिरीक क्षमतेबाबत भेदभाव न करण्याचे लक्षण आहे तसेच अधिक महत्त्वाचे म्हणजे लष्करातील नोकरीत घरापासून दूर इतर सहकर्मचार्‍यांसोबत एकत्र राहणे-अनेक महिने व्यतीत करणे ह्या वेगळ्या वातावरणात एक स्त्रीस स्त्री म्हणुन कुठलाही अडथळा येत नाही याचे लक्षण आहे. इथे लष्करातील कडक शिस्त व शिक्षा हे deterrent म्हणुन अपेक्षित नसून कुठल्याही बाह्य दबावाशिवाय सर्व सहकर्मचार्‍यांनी स्त्रीयांना समान वागणून देणे अपेक्षित आहे.
४. एखाद्या घटस्फोटीत/आपल्या जोडीदारापासून विभक्त राहणार्‍या व नवरा\जोडीदाराचे निधन झालेल्या स्त्रीस कुठल्याही पातळीवर ह्या कारणास्तव भेदभाव, त्रास न होणे. योनिशुचितेची बेगडी संकल्पना समाजाने मागे टाकल्याचे हे एक लक्षण असेल. अर्थात हा टप्पा येण्यासाठी स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा असणे, जोडीदारासोबत राहणे, वेळ व्यतीत करणे व त्यानंतर लग्नाचा निर्णय घेणे, लग्न अथवा एकत्र राहण्यातून दोन्ही जोडीदारांना वेगवेगळे होण्याची समान संधी उपलब्ध असणे व वेगळे झाल्यावर पुन्हा नवीन जोडीदार शोधताना 'ह्या पुर्वी एक जोडीदार होता' ह्या कारणास्तव संधी कमी न होणे हे निकष समाजात स्त्री मुक्त झाल्याचे असतीलच पण त्याजोडीने समाज संधी-समानतेच्या बाबतीत प्रगल्भ झाल्याचेदेखील लक्षण असेल.

टण्या, तुझा पहिला मुद्दा आवडला आणि पटला. ह्याचबरोबर मला 'हुंडा' घेणं हा प्रकारही बंद होणं गरजेचं वाटतं. बाकी समाजात बर्‍याच स्त्रिया (सासवा) सुनेने किती हुंडा आणायलाच हवा हे ठरवतात. मुळात सासूनेच हुंडा घ्यायचा नाही हे ठरवलं तर पुढचे प्रश्नही सुटतील जसे की हुंड्यावरुन छळ, मारहाण, सुनेला जाळणं इत्यादी.

ट्ण्या चान्गली पोस्ट.
सायो , हुंडा घेणे जरी अता बर्‍याच अंशी पांढरपेशा समाजात घडत नसले तरी आता एक नविन ट्रेंड सुरु झाला आहे. तो म्हण्जे लग्न धुमधडाक्यात करणे. आम्हाला काहीही नको (हे अगदी जोर देऊन सांगणार) पण आमचा एकच मुलगा आहे ,एव्हढा चांगला शिकला अआणि नोकरीत आहे ई. त्यामुळे लग्न धडाक्यात झालेच पाहिजे हा अग्रह. अर्थात लग्नाचा सर्व खर्च वधूपक्षाकडूनच. माझ्या नंणंदेचे लग्न नुकतेच झाले , तेव्हा वरपक्षाकडून हा अनुभव प्रत्यक्षात घेतला. पैशाची अक्षरशः उधळपट्टी.

इतरत्र कीतीही समानता दिसली तरी लग्नाच्या खर्च दोघात वाटून घेणारी उदा. उच्चवर्गीयात पण फारच कमी दिसतात.

संयोजकांना मला लिहायची संधी दिल्या बद्दल धन्यवाद !
अरुंधतिनी जितकं मुद्देसुद लिहिलय त्यात खरं तर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आल्यायेत पण तरीही माझे विचार मांडण्याचा हा प्रयत्न !

..................................................................................................................................

हा थ्रेड पाहिला तेंव्हा अमेरिकेत रिसेंटली पाहिलेल्या २ गोष्टी पटकन आठवल्या.
दोन्हीही स्त्रियांनी प्रोटेस्ट करणारी उदाहरणं , तसं म्हंटलं तर एकमेकां पासून खूप वेगळी पण थोडी फार एकाच कारणा साठी !

१ ) गेल्या ऑगस्ट मधे इथल्या( लॉस अ‍ॅन्जलेस) सुप्रसिध्द व्हेनिस बिच वर गेलो होतो, तिथे एक मोठा प्रोटेस्ट गृप होता ( स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी.)
एक मोठं ऑरगजायझेशन आहे स्त्रियां ' गो टॉपलेस्स इक्वालिटी राइट्स' साठी !
त्यांच्या म्हणण्या नुसार " अ‍ॅज लाँग अ‍ॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.'
त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्या प्रमाणे , अमेरिके सारख्या समान हक्काचा दावा करणार्‍या देशात स्त्रियांना या गोष्टी साठी अरेस्ट/ दंड होणे , अपमानस्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्स वर आणलेली गदा वाटते.

२) काही पाश्चात्त्य देशात ' बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्‍या माझ्या २ मोरक्कन मैत्रीणी, ' इफ आय कान्ट वेअर बुरखा , इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांना त्या सपोर्ट करायला जातात ( त्या स्वतः बुरखा घालत नाहीत, हिजाब घालतात.) !
पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्या सारखे वाटते !

या दोन गोष्टीं वरून उगीचच म.वि सोवनींच्या 'आपले मराठी अलंकार' पुस्तकतला 'सौभाग्य अलंकार' चॅप्टर आठवला.
'नथ' जी एक सुंदर दागिना म्हणून , परंपरा म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवली जाते त्याचं ओरिजिन कोणाला माहित आहे ?
ते जेंव्हा वाचाल तेंव्हा म. वि. सोवनीं सारखाच हा आलंकार 'इष्ट कि अनिष्ट', 'लज्जास्पद कि कि प्रतिष्ठेचा' हा विचार आपल्या मनातही नक्कीच येइल !
नाक टोचणे हेच मुळात हिन्दु धर्माच्या संस्कारात नाही.
हा दागिना मुस्लिम स्वार्‍यां बरोबर आपल्याकडे आला, तिथे त्या दागिन्याला 'बुलाक' (अर्थ : उंटाची वेसण ) म्हणायचे, आपल्याक्डे प्राकृत मधे' ण्त्थ ' म्हणाजे बैलाची वेसण ( ण्त्थ वरून नंतर नथ शब्द आला.) !
मुस्लिम समाजाच्या त्या वेळाच्या विचारसरणी नुसार गुरा ढोरांच्या मालकी हक्क साठी जे सोपस्कार करतात तोच सोपस्कार स्त्रियांना आपली मालमत्ता मानताना केला जायचा, जो विचार दुर्दैवनी त्या वेळी आपल्या समाजानेही सामावून घेतला.
त्या वेळी का नसेल केला स्त्रियांनी विरोध या सोपस्काराला ?
तेंव्हा खरच नव्हत्या का स्त्रियां साठी चळवळी, प्रोटेस्ट करायचय काही पध्दती ??
असो.... थोडक्यात समाजात निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या काळी स्त्रियांवर समाजानी अपापल्या परीने बंधनं घातलीयेत आणि जिथे समाज जसा आहे तिथे स्त्रीमुक्ती ची कल्पना पण बदलली आहे, बदलत आहे !

भारतीय समाजाच्या संदर्भात 'स्त्रीमुक्ति' हा शब्द ऐकला कि मला पटकन आठवते ती दूरदर्शन ला लागायची ती सरकारी जाहिरात !
एका लहान बाळाला( मुलीला) पाय बांधून , डोळे बांधून ठेवलय .
त्या नंतर संदेश येतो:
" उघडा तिचे डोळे, सोडा त्या बेड्या'
ज्या क्षणी ते सोडले जाते त्या क्षणी छोट्या परीचे हात पाय झाडून हर्षवायु झालेलं ते मनमुराद प्राइसलेस हसु !

खरच, स्त्रियांचे समान ह्क्क खूप दूरची गोष्ट आहे मुळात मुलीने जन्म घ्यावा कि नाही , मुलगी जन्मलेली जगु द्यायची कि नाही इथपासूनच समाज मुलीला कंट्रोल करायला सुरवात करतो !
वर अरुंधतिनी दिलेल्या ऑफिशिअली जन्म घेतलेल्या पण त्या नंतर कुठलही रेकॉर्ड नसणार्‍या मुलींचं प्रमाण एवढं आहे हे बघून खरच कमालीचं ह्ताश व्हायला होतं !

माझ्या स्त्रीमुक्तीच्या कल्पनां बद्दल बोलायचं झालं तर मुलीच्या जन्मा पासून समाजाचा जो अ‍ॅटिट्युड असतो तो बदलण्या पासून सुरवात झाली पाहिजे !
'मुलगी झाली' म्हणून आजही कित्येक स्त्रियांना ठिकाणी जी वागणुक मिळते ( ही वागणुक देणार्‍यां मधे स्त्री पुरुष दोन्ही आले) तिथ पासून चित्रं बदलायला पाहिजे!
आजही निरनिराळ्या कवितां मधून लेखां मधून ' आई -बहिण-पत्नी-सखी' अशा आपेक्षांनी भरलेल्या टायटल्स मधे 'स्त्रीत्त्व' बंदिस्त करण्यात येते.. ते बदलून मुळात आधी एक 'माणुस' म्हणून समाजानी स्त्री ला रिस्पेक्ट देणं सर्वात महत्वाचं आहे.
पात्रता असताना समाजात समान वागणुक न मिळणे , रुढी परंपरांच्या नावा खाली आपेक्षांची ओझी लादणे , हुंडा , सेक्शुअल हॅरेसमेन्ट, विचार आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसणे ( मग ते शिक्षण, उच्च शिक्षणाची तिची आवड, करिअर ऑप्शन्स, हॉबीज, लग्न कधी करावं / करु नये, मुलं कधी/किती व्हावीत / कि अजिबात नकोत, इन्व्हेस्टम्नेट्स करणे अशा महत्त्वाच्या गोष्टीं पासून ते अगदी छोटे रोजच्या दिनक्रमातल्या अनेक निर्णय जिथे आजही बर्‍याच शिकलेल्या स्त्रियांकडून सुध्द्दा 'नवर्‍याला विचारून मग सांगते' अशी उत्तरं सर्रास ऐकायला मिळातात.) या गोष्टी आधी बदलल्या पाहिजेत.

लहानपणी 'स्त्रीमुक्ति' हा शब्द पहिल्यांदा ऐकला जेंव्हा कॉलनीत ' मुलगी झाली हो' संगीतिका पाहिली तेंव्हा !
तेंव्हा काही तो गंभीर विषय समजण्या इतकी अक्कलही नव्हती पण त्या नाटकत हायलाइट केलेल्या काही गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या.
हे गाणं तर बहुतेक सगळ्यांनाच लक्षात असेल

" हिला मुलगी होउ दे, हिला मुलगी होउ दे
आणि हिलाही मुलगीssssच होउ दे
आणि तुला ग?
मला मात्र मुलगाsssच हवा
का?
कारण मुलगा म्हणजे वंशाचाssss दिवा ..

अरारारारारा.....मुलगी झाली
अता काय बाई करु
मुलगी झाली, अता हे रागावतील
मुलगी झाली, अता सासु बाई रुसतील
मुलगी झाली, उपास तपास केले तरी
तरीही मुलगीच झाली.."

त्या वेळी काही नीट समजत नसलं तरी ' मुलगी' झालेली काही लोकांना आवडत नाही हे मात्र ऐकून फार म्हणजे फार नवल वाटलं होतं !
अशा अनेक छोट्या गोष्टी ज्या त्या वेळी मुलगी झाली हो मधे सांगितल्या त्या थोड्या फार प्रमाणात आजही तशाच आहेत !
' मुलगी झाली हो' ला २० पेक्षा जास्त वर्षं झाली असतील, पण काय फरक पडलाय समजात :(.
इथेच आजुबाजुला किती तरी नॉर्थ इंडियन मैत्रीणी आहेत ज्या भयानक टेन्शन मधे असतात प्रेग्नंट असताना, सोनोग्राफी मधून मुलगी आहे हे समजलं तर काय म्हणून( ही कथा उच्च शिक्षित, चांगल्या हुद्द्यावर असणार्‍या, जॉइन्ट फॅमिली मधे न रहाणार्‍या अमेरिकेतल्या भारतीय मुलींची . )
अकोल्याला माझ्या ओळाखीच्या काही बायका प्रेग्नंट असताना 'मुलगा व्हावा' म्हणून कुठल्या तरी टिंपाट सो कॉल्ड डॉक्टर कडून औषध घ्यायला जातत हे पाहून अक्षरशः कानाखाली वाजवावीशी वाटते ( सॉरी फॉर माय हार्श वर्ड्स) ......... मला खरच समजत नाही कि या शिकलेल्या बायकांना एवढही सामान्य ज्ञान नाहीये का औषधं घेऊन मुलगा किंवा मुलगी होणे कंट्रोल करता येते कि नाही आणि स्वतः बायका असून या बायांना मुलगा होण्या साठी चालवलेला खटाटोप पटतो का यांच्या मनाला ????
मुळात वंशाचं नाव चालवणे खरच एवढं महत्त्वाचं आहे का ?
जर खरच महत्वाच वाटत असेल तर का नाही नियम बदलून मुलीला तिचं आडनाव कंटिन्यु करायला सांगत ?
मुलगा म्हतारपणी सांभाळेल या आशेनी मुलगा हवा असेल तर का नाही मुलींनाच लहानपणा पासून संस्कार देत पुढे आई वडिलांना सांभळणे त्यांचेही कर्तव्य आहे याची ?
लग्न झालं कि सासर ही तुझी पहिली प्रॉयॉरिटी अशी शिकवणी का दिली जाते मुलींना आणि का फॉलो करतात आजही अनेक मुली ?
एखादा मुलगा जेंव्हा म्हणतो कि त्याला इतक्यात लग्न करायचं नाही, त्याच्या अँबिशन्स,करिअर, घर, बॅक बॅलन्स या गोष्टीचा विचार करतो तेंव्हा त्याला सहज मान्यता मिळते पण मुलीने हा विचार पुढे केला तर तिला लवकर लग्न- बयोलॉजिकल सायकल-मुल होणे वगैरे गोष्टी समजावल्या लागतात !
पण मुळात त्या मुलीला कुठल्या मार्गाने जायचय हे कोणी विचारात घेत नाही.. एखाद्या मुलीच्या आयुष्यात नसेल मुल होणे, फॅमिली लाइफ लवकर सुरु करण्याला प्राधान्य तर समाजाला त्याचा काय प्रॉब्लेम आहे ?
तिला तिच्या अँबिशन्स नुसार का नाही जगु देत ?
हे आणि असे अनेक प्रश्न पडतात !

लहानपणी लक्षात राहिलेला अजुन एक किस्सा !
आमच्या कॉलनीत स्त्रीमुक्तीवर एक परिसंवाद ठेवला होता.
अनेक स्त्रिया , पुरुष खूप छान विचार मांडत होते, अचानक ऑर्गजायझर बाईच्या काय अंगात आलं कळलं नाही पण हिची टर्न आली तेंव्हा ती उठून तावातावाने पुढे आली म्हणे
" स्त्री ही स्वतंत्र आहेच .. घराघरात कुठली' भाजी- चटणी' करायची हे फक्त स्त्री च ठरवते' , इतर गोष्टी त्यापुढे काहे महत्त्वाच्या नाहीत!
त्यावर अर्थात अनेक प्रतिवाद , भांडणं, तिचं मत हाणून पाडणे आणि अगदी हशा सुध्दा पिकला !
पण खरच, फक्त चटणी भाकरी मर्जीप्रमाणे करण्यात धन्यता मानणार्‍या अनेक स्त्रिया आहेत हे भयानक डिप्रेसिंग आहे.
हे चित्रं बदलण्या साठी सर्व प्रथम स्त्रियांनी स्वतः खंबीर, कणखर अ‍ॅटिट्यड आणणं, ज्या गोष्टी पटत नाहीत , बंधनकारक वाटतत त्यांना विरोध करायची निदान हिंमत करणं, हुंडा पध्दतीने लग्न करायला स्वतः स्त्रियांनी विरोध करणं, मुलींने स्वतःहून आई वडिलांचा म्हातरपणचा आधार बनणं, स्त्रियां कडे बघण्याचा समाजाचा आणि काही विकृत पुरुष मनोवृत्तींना आळा घालण्या साठी लहानपणा पासून शालेय शिक्षणा बरोबरच सभ्यतेनी कसं वागावं याचं रितसर शिक्षण-धडे मुलांना देणे प्रचंड गरजेचं आहे !
महिला दिना निमित्त फक्त एक दिवस ही सगळी चर्चा करून पुन्हा उरलेले दिवस समाजाच्या अन्यायापुढे गुडघे टेकणे, बचावात्मक पवित्रा घेणे जेंव्हा बन्द होईल तेंव्हा स्त्री ने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकले असे म्हणायला हरकत नाही.

................................................................................................................................

पुढचा खो : अंजली आणि सीमा

यांना नाही जमलं तर पराग - पेशवा

डिजे, मस्तच पोस्ट. काहीकाही गोष्टी भयंकर चीड आणणार्‍या.

मला सध्यातरी खो नको. जमेल तर नी जमेल तसं लिहीन. तयार असेन तेव्हा सांगेन.

वा! कार्यक्रम छान सुरु आहे. अजून सगळे वाचले नाही, पण अरुंधतीने उत्तम सुरुवात करुन दिली आहे. चेतनने पाहिलेला दोन पिढ्यांतला फरक नेटकेपणाने मांडलाय. आणि आशुतोषला संपूर्ण अनुमोदन.

खूप छान लिहिताय सगळेजण. एकंदर वाचल्यावर वा टतंय की भारतच कशाला सगळीकडेच अजून खूप बदलाला वाव आहे. मुख्य म्हणजे मानसिकता बदलायला हवी.

सायो, जपानमध्ये होतीस तर तिथे काय परिस्थिती होती त्याची कल्पना आहे कां?

मी कोरियामध्ये राहातेय गेले वर्षभर, परंतू इथे तशी कोणा कोरियन लोकांमध्ये मिसळायची वेळ अजिबातच येत नाही. म्हणून इथे एका मैत्रिणीला इथल्या स्त्रियांबद्दल विचारले. ती इथे गेली ५ वर्ष राहातेय व लोकांमध्येही खूप मिसळते. त्याबद्दल थोडंसं....

कोरिया खूपच प्रगत देश आहे. अक्षरशः राखेतून सगळं निर्माण करावं तशी प्रगती केलीये त्यांनी. परंतू असं असलं तरी स्त्रियांना बाहेर दुय्यम स्थान आहे. चांगलं दिसा, चांगलं रहा आणि खूप काम करा अशीच अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. पुरूषांच्या (नवर्‍यांच्या) बाबतीत इथल्या बायका खूपच असुरक्षित असतात कारण पुरुषांमध्ये बाहेरख्यालीपणाचे प्रमाण खूप आहे. नवर्‍याचे पैसे आपल्या ताब्यात ठेवले तरच तो आपल्या ताब्यात राहील अशी त्यांची समजूत आहे. एखादी मुलगी/बाई शिकलेली आहे, करियर करायची इच्छा आहे, पण एकदा लग्न झाले की नंतर मुलांना कोणी सांभाळायचे हा प्रश्न? अर्थात ही जबाबदारी कायम बायकांचीच असते मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा. त्यामुळे इथेही लग्न करण्याचं प्रमाण कमी होत चाललंय किंवा लग्नं खूप उशीरा होतात.

डिजे आणि संयोजक धन्यवाद.
सर्वांच्या पोस्ट सुरेख. अनेक मुद्यांचा विचार झाला आहे.
आमच्या ऑफिसमधे आज 'महिला दिन' आहे हे कुणाला - अगदी बायकांनाही - माहित नाही. या सगळ्या अमेरिकेसारख्या स्वतंत्र देशात जन्मलेल्या, वाढलेल्या, सुशिक्षीत स्त्रिया. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरूवात इथेच अमेरीकेत घडलेल्या एका घटनेची आठवण म्हणून पाळण्यास सुरूवात झाली. मग इथे स्त्री 'मुक्त' आहे म्हणून या बायकांना 'आंतरराष्ट्रीय महिला दिना' विषयी काही माहिती नाही का? माझ्या मॅनेजरशी बोलताना - जी स्त्री आहे - जाणवलं--- she does not care. 'That is not my problem' हे तिचे शब्द होते. हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येणार नाही पण तरीही पुरेसं बोलकं आहे.
मुळात 'स्त्रीमुक्ती' म्हणजे काय? घरात? बाहेर? ऑफिसमधे? कुठे आणि कशापासून अपेक्षित आहे स्त्रीमुक्ती? कामापासून, अन्यायापासून किंवा अजून कशापासून? अरूंधतीनं दिलेली धक्कादायक आकडेवारी पाहून या टक्क्यांमधे असणार्‍या स्त्रियांनी 'स्त्रीमुक्ती' हा शब्द ऐकला तरी असेल का हा प्रश्न पडला. महिला दिन, मातृदिन निमीत्ताने 'स्त्रीत्व', 'स्त्रीत्वाचा सन्मान' अशा अर्थाचे बरेच काही लिहीलं गेलंलं काही प्रमाणात मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर वाचलं. पण हे 'स्त्रीत्व' म्हणजे काय? निसर्गादत्त शारीरीक वेगळेपण? त्याचं वेगळंपण एवढं अधोरेखित का करावं? स्त्रीला स्त्री म्हणून वेगळी वागणूक देणं समाजाकडून आणि खुद्द स्त्रीकडूनही अपेक्षित का केलं जातं? स्त्री आधी 'माणूस' आहे हे कसं विसरतो आपण? तिला 'माणूस' म्हणून वागणूक मिळाल्यानंतर पुढची पायरी 'स्त्री' म्हणून मिळणार्‍या 'सन्मानाची' येते. त्या पायरीवर स्त्रीयांनाही 'स्त्रीत्वा'ची जाणिव होते आणि मग अस्मितेचा, स्वत्वाचा, स्वतंत्रतेचा विचार होतो. स्त्रियांचा संघर्ष हा पुरूषांच्या बरोबरीनं स्थान मिळावं म्हणून खचितच नसावा. तिला माणूस असण्याचा हक्क मिळावा म्हणून असावा. अमेरीकेसारख्या पुढारलेल्या देशातही स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले गेले. अजूनही इथल्या स्त्रिया 'स्त्रीदाक्षिण्याची' अपेक्षा करतात. का? 'मला स्त्री म्हणून वेगळी वागणूक देण्या आधी माणूस म्हणून समान वागणूक द्या' असं यांना कधी वाटत नाही का? इथे मूल जन्मल्याबरोबर त्यांच्या कपड्यांचे, खोल्यांचे रंग ठरवण्यापासून स्त्री आणि पुरूष असणं अधोरेखित केलं जातं. खेळ आणि खेळाडूंना या देशात भरपूर ग्लॅमर आहे पण स्त्रियांच्या खेळांना पुरूषांच्या खेळाएवढी लोकप्रियता नाही. स्त्रियांनी पँट सूटस घालण्यावरून केले गेलेले विनोद ऐकले आणि त्या विनोदावर अगदी स्त्रियाही पोट धरून हसलेल्या पाहिल्या. इथे अमेरीकेतही 'स्त्री दाक्षिण्य' वगैरे गोष्टींची बायका अपेक्षा करतात, आणि इथले पुरूष त्याप्रमाणे त्यांना वागवतात. मला पूर्वीच्या जॉबमधे आलेला अनुभव मी मागे लिहीला होता. माझा अमेरीकेत आल्या नंतरचा पहिला जॉब. अगदी लहान कंपनी होती. ३-४ जणंच असू. माझा बॉस म्हणजे कंपनीचा मालक- वय ७० च्या आसपास. कुठे क्लायंटकडे जायचं असलं की स्वतः ड्राईव्ह करत यायचा. खरं तर त्यानं येण्याची गरज नसायची, पण बायकांनी ड्रायव्हिंग करणे यावर त्याचा विश्वास नव्हता. तस तो बोलून दाखवायचा, तसे विनोद करायचा. त्याची बायको त्याला हसून दाद द्यायची. तिला त्यात काही गैर, कमीपणा, अपमान कसा वाटलं नाही? गाडीत बसताना अथवा उतरताना बायकांसाठी गाडीचं दार उघडायचा किंवा बंद करायचा. त्याच्या बायकोचीही तशीच अपेक्षा असायची. का? अपंग माणसांना अशी मदत करणे मी समजू शकते, पण 'स्त्री दाक्षिण्याच्या' नावाखाली अशी वागणूक मला मान्य नसल्याचं मी पोलाईटली त्याला सांगितलं तर त्यावरही त्याने बरेच टोमणे मारले. त्याची बायको त्याला हसून अनुमोदन देत होती. एक माणूस म्हणून किंवा अगदी स्त्री म्हणूनही तिला यात काही गैर वाटलं नाही? तो पुरूषांना अशी वागणूक देत नव्हता तर केवळ एक स्त्री म्हणून मला वेगळी वागणूक का द्यावी त्यानं? माणूस म्हणून का वागवू नये? स्त्रीदाक्षिण्याच्या नावाखाली एक प्रकारे असमानताच अधोरेखित होत नाही का?
वर टण्यानं आणि डिजेनं लिहीलेले मुद्दे वाचून परत एकदा स्त्रीचं माणूस असणं अधोरेखित करावसं वाटलं. दीपांजली म्हणते तसं नथीला स्त्रीनं का विरोध केला नाही? कारण तिला 'आपण माणूस आहोत, जनावर नाही' याची जाणिवच नव्हती. दुर्दैवानं आज इतक्या वर्षा नंतरही ही जाणिव आहे असं मला म्हणवत नाही. लहान असताना एका अतिशय प्रख्यात, लोकप्रिय लेखकांनी त्यांच्या एका पुस्तकात 'उगाच नाही स्त्रियांना आणि शूद्रांना गायत्रीमंत्र म्हणायला मनाई केली' अशा अर्थाचं वाक्य वाचलेलं आणि खूप वाईट वाटलेलं आठवतय.
मुलगी जन्माला आल्यावर ते मूल आधी 'माणूस' आहे असा विचार केला गेला तर स्त्रीभ्रूण हत्या कमी होतील का? आमच्या ओळखीचं एक कुटुंब. सुशिक्षीत, घरात कमालीची श्रीमंती. कर्ती बाई/सासू समाज सेविका. त्या घरातली सून. तिला दोन मुली आहेत. पण मुलगा होण्यासाठी तिचा आटापिटा पाहिला आहे. नवस-सायास, गर्भलिंग चाचण्या आणि तब्बल चार गर्भपात झाल्यावर एकदाचा मुलगा झाला तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचा कृतार्थपणा मला हताश करून गेला. तिची मोठी मुलगी तेव्हा १७ वर्षांची होती. आई म्हणून मुलीला काय शिकवण दिली तिनं? काय उदाहरण समोर ठेवलं?
याचा अर्थ असा नाही की मला माझ्या 'स्त्री' असण्याचा अभिमान नाही. निसर्गदत्त वेगळेपण नक्कीच जपावं, त्याचा अभिमानही बाळगावा. पण ही पुढची पायरी झाली. त्याआधी स्त्रीनं आणि समाजानं तिचं माणूसपण समजून, जाणून घेतलं आणि मान्य केलं तर स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, असमानता हे सगळं बदलेल असा विश्वास वाटतो. स्त्री म्हणून 'सन्मान' देण्याआधी माणूस म्हणून वागणूक द्या.

सगळ्यांची सुंदर पोस्ट्स आहेत.
अंजली << स्त्री म्हणून 'सन्मान' देण्याआधी माणूस म्हणून वागणूक द्या.>> अगदी योग्य Happy

अंजली, छान पोस्ट. वर तू लिहिलेलं उदाहरण मागे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.

मामी ने पण मागितलाय. मला वाटतं तिला दे कारण ती तशी माबोवर नवीन असल्यामुळे आजवर यासंदर्भातल्या विषयांवर तिच्याकडून फारसं ऐकलं नाहीये.

मामी यांना खो हिरकु यांनी दिलेला आहे.
त्यामुळे अंजली आपला खो डेलिया आणि जागोमोहनप्यारे - अशी नोंद केली आहे.

सिंडरेला, 'खो' साठी धन्यवाद.
*****************
स्त्रीमुक्ती म्हणजे नेमके काय? मुक्ती कुणापासून? सामाजिक बंधनांपासून? पुरुषांच्या वर्चस्वापासून? की स्त्रीत्वाच्या मूलभूत वैशिष्ठ्यापासूनच? माझ्या मते याचे उत्तर प्रत्येक स्त्रीपरत्वे बदलणारे आहे त्यामुळे स्त्रीमुक्तीची एकचएक व्याख्या करणे अवघड आहे. स्त्रीला आत्मभान येणे आणि तिने पुरूषनिरपेक्ष विचार आणि कृती करायची संधी मिळणे हा माझ्या दृष्टीने स्त्रीमुक्तीचा संपूर्ण आविष्कार आहे.

ह्या निकषावर माझी आजी ही मी पाहिलेली सर्वात मुक्त स्त्री असेल. याच माणसाशी का लग्न केले या प्रश्नाचे, ' ही वॉज इन नीड.रिक्वायर्ड हेल्प इन हिज प्रोफेशन' असे अत्यंत प्रॅक्टीकल उत्तर देणारी, घरातल्या अर्थकारणावर आणि निर्णयप्रक्रियेवर घट्ट पकड असलेली, अत्यंत काटेकोर लाईफस्टाईल असलेली आणि तरीही स्वतःची मते आणि पद्धती मुलांवर अजिबात न लादणारी, अत्यंत स्वतंत्र स्त्री.
मात्र भावनिक पातळीवरील तिची ही अलिप्तता, कोरडेपणा घरातल्या इतर सर्वांनाच अस्वस्थ करतो. तिची सर्व मुले आज अनेकार्थाने यशस्वी आहेत आणि त्याचे श्रेय तिने त्यांना दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्याला आहेच. पण त्याचबरोबर आपल्या यशाने आपली आई आनंदी आहे का? मुळात ती व्यक्ती म्हणून काय आहे? हे त्यांच्यापैकी कोणालाच माहिती नाही ही बोचही आहे.

त्यामुळे एका बाजूला स्त्री स्वतंत्र झाली तरी तिच्याकडून अपेक्षित असलेल्या 'इमोशनल कोशंट'ची ही पूर्तता होणे गरजेचे आहे असे मला वाटते. इमोशनल कोशंटचे गृहितक आहे आणि त्याने स्त्री आणि पुरुष, दोघांवरही अन्याय होतो.
स्त्रीने किती भावनिक असावे याचा काय मापदंड आहे ते माहिती नाही, पण वैयक्तिकदृष्ट्या असे वाटते की माझ्या आजीसारखी माझी आई असती तर मला ते झेपले नसते! पण याच आजीबरोबर मी जेंव्हा पदवीची तीन वर्षे राहिलो तेंव्हा तिने मला पूर्ण स्वातंत्र्य आणि त्याबरोबर येणारी पूर्ण जबाबदारी; दोन्ही दिले. त्या अनुभवानेच मला 'मोठा' केले, जे माझ्या आईला शक्य झाले नसते, हेही खरे.
तिढा आहे तो असा आहे!

*****************
माझा खो - दाद किंवा मामी.

आगावा, दोन खो द्यायचेत. शक्यतो एक स्त्री आयडी आणि एक पुरूष आयडी असं बघ.
पोस्ट चांगलंय पण त्रोटक. थोडं अजून विस्तारात वाचायला आवडेल. अजूनही एडिट करू शकतोस.

चांगला उपक्रम संयोजक संयुक्ता! महिलादिनाविषयी असूनही संयुक्तापुरताच मर्यादित न ठेवल्याबद्दल विशेष आभार, कौतुक!
अरुंधती, आकडेवारी आजही थोड्याफार फरकाने तशीच असेल अशी मनातल्या मनात खेदकारक कबुलीही झाली!
खो मिळालेल्या सर्वांनी तोचतोचपणा टाळून नवे नवे विचार थोडक्यात मांडण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय!
अरुंधती, आशुतोष,अंजली, दीपांजली, टण्या तुमच्या पोस्ट विशेष आवडल्या! पटल्या. Happy

Pages