थांबणे सोसेल तोवर लागते चालायला..

Submitted by मी मुक्ता.. on 6 February, 2011 - 23:12

जीवनावर संधिछाया लागल्या पसरायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला..

दात माझे, ओठ माझे, दोष कोणाचा असे
चेहरे माझेच होते, मजसवे भांडायला...

मांडला बाजार ज्यांनी ते पुजारी थोर रे
देव आता मंदिरातुन लागला निसटायला..

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला...

उदर भरता छान होती दशदिशा स्वर्गापरी,
लागते पण भाकरी असली क्षुधा शमवायला..

गुलमोहर: 

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला..>>> व्वाह आणि आह - दोन्ही! (मला 'श्वास' ऐवजी 'योग' असेही सुचले.)

मतला व भाकरीही आवडले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला...
व्व्व्व्वाह!!!! Happy

चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला
क्या बात है!!

@बेफिकीरजी,
Happy योग पण सुंदरच.. श्वास आणि भास हे दोन शब्द सुचलेले... शेवटी श्वास टाकला.. Happy
धन्यवाद..!

@आनंदयात्री,
आभार.. Happy

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला...

उदर भरता छान होती दशदिशा स्वर्गापरी,
लागते पण भाकरी असली क्षुधा शमवायला..>>>>

अप्रतिम शेर!! व्वा! व्वा!!

मी मुक्ता,

आपण म्हणालात म्हणून काही मनचे लिहिण्याची गुस्ताखी!

श्वास रेशमी असण्यासाठी एकमेकांच्या निकट असणे आवश्यक असायला हवे. पण येथे तर 'चाहुल' लागल्यावर चांदणे पसरते असे आहे. म्हणजे ज्याची चाहुल लागते तो / ती मुळात 'या' ठिकाणी नसणार! त्यामुळे भास अधिक योग्य ठरावे. (अवांतर - रेशमी हे विशेषण येथे काहीसे नक्षीदार वाटले. भास किंवा श्वास रेशमी असण्याऐवजी लाघवी हा शब्द कदाचित अधिक अचूक ठरावा)

आपले स्वातंत्र्य व त्याचा आदर आहेच!

धन्यवाद व चुभुद्याघ्या!

-'बेफिकीर'!

आपल्या प्रतिक्रिया आणि सल्ले नेहमीच स्वागतार्ह असतात बेफिकीरजी.. Happy

लाघवी हा शब्द गोड आहेच.. पण लाघवी रोमॅटीक आहे, रेशमी हॉट.. Lol म्हणुन तो वापरुन पाहिला.. ह्म्म... आणि भास लिहिलेला खोडला मी.. असा विचार केला की भास कायमच होत रहाणार.. पण श्वासाची चाहुल म्हणजे तिच्या/त्याच्या जवळ येण्याची खुण.. आणि या खुणेमुळेच चांदणे पसरायला लागते असं काहीसं... पण अजुनही भास डोक्यातुन जात नाहीये... Happy

@विजयजी,
आभार.. Happy

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला...

आहे तस्साच्या तसाही शेर सुंदर आहेच...
मी घेतलेला अर्थ असा-
प्रेमात पडल्यावर सगळंच 'रेशमी' होऊन जातं, तसं त्या काळचे काही श्वास असे रेशमी होते की नुसत्या चाहुलीनेच चांदणे पसरू लागायचे. यात काही श्वास आणि असे ही शब्दयोजना महत्त्वाची वाटते..
चाहूल कोणाची/कशाची आहे हे declare केलेले नाही, हीच गंमत आहे...
(सर्वकाही माझे मत!!)
चुभूद्याघ्या...
Happy

श्वास असेल तर रेशमी हे ठीक आहे, पण श्वासाचा चाहुलीशी संबंध कमी आणि भासाचा चाहुलीशी खूपच जवळचा संबंध म्हणूम मला भास अधिक योग्य वाटला होता.

धन्यवाद!

आनंदयात्री,
व्वा.. अजुनच छान.. Happy सुंदर उलगडलत अगदी.. Happy मला आता त्या शेरापेक्षा तुमचं स्पष्टिकरणच सुंदर वाटायला लागलय.. Happy

मुक्ता,
(शेर नसता तर स्पष्टीकरण कुठून आलं असतं?? :P)
actually गझलेमध्ये तंत्र असलं तरी a = b आणि b = c म्हणून a = c अशी लॉजिक नेहमीच नाही चालत तिथे...
दोन्ही मिसरे घट्ट बांधलेले असावेतच हे जरी खरं असलं तरी ते रिलेशन कधीकधी काव्यमयही असू शकतं...
(पुन्हा एकदा ही माझी वैयक्तिक मतं आहेत..)
शेवटी काय, गझल काय किंवा कविता काय, its all about expressing oneself...
Happy
आणि म्हणूनच सर्व या शेराचा मला लागलेला अर्थच मला जास्त आवडला... Happy
शेवटी शेरामधल्या प्रत्येक शब्दाची काही जबाबदारी आहेच की!! ती इथे नेमकी पार पाडली गेलीये..
अभिनंदन! आणि थांबतो आता.. Happy

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला..

अफाट शेर.

खूप छान गझल. आवडलीच. Happy