भारतातील असुरक्षित शहरे आणि तेथील अनुभव

Submitted by हर्ट on 21 January, 2011 - 12:58

मी एक बातमी वाचली ज्यात लिहिले आहे की दिल्ली नंतर बंगलोर आणि मग मुंबई भारतातील असुरक्षित शहरे आहेत. भारतात तुम्हाला कुठल्या शहराचा कुठला वाईट अनुभव आला त्याबद्दल इथे चर्चा अपेक्षित आहे. चांगला अनुभव आला असेल तर तेही लिहा जेणेकरुन लोकांचे समज गैरसमज टळतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मदत्_समिती, मी 'समाज' ह्या ग्रुप मधेच तर उघडला हा धागा. 'समाज किंवा तत्सम' ह्या नावाचा ग्रुप मला दिसत नाहीये.

मी एक बातमी वाचली ज्यात लिहिले आहे की दिल्ली नंतर बंगलोर आणि मग मुंबई भारतातील असुरक्षित शहरे आहेत

मी मुंबई सोडून इतर कुठेही एकटी आणि तीही रात्रीची फिरलेली नाही. मुंबईत मी रात्री १२ पर्यंत एकटी फिरलेय आणि कधीच असुरक्षित वाटले नाही. टॅक्सीत बसल्याबरोबर ड्रायवरची बडबड सुरू होते ती उतरेपर्यंत संपतच नाही. त्यामुळे आपल्याला झोप येत नाही व तो बाबा बरोबर घेऊन जातोय ना यावरही लक्ष ठेवता येते.

दिल्लीबद्दल खुप ऐकलेय. मी तरी तिथे संध्याकाळनंतर एकटी बाहेर पडणार नाही. पण दिल्लीत राहुन आलेले कलिग्स सांगतात की, एवढे काही तिथे वाईट नाही. काही एरीयाच बेकार आहेत, इतरत्र ठिक आहे.

अनुभव व्यक्तीसापेक्ष असणार आहेत..
तरीही कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने मला चेन्नई खुप खुप छान वाटले. माझं यापुर्वी मुंबई आणि हैद्राबाद मधे वास्तव्य होतं...तसा काही वाईट अनुभव आला नाही..पण तरीही इथे जितकं पॅट्रोलिंग आणि कडक पहारा असतो तेवढा मी कुठेच बघितला नाही...

चेन्नाई, हैदराबाद, त्रिवेंद्रम अतिशय सुरक्षित..... केरळात कुठेही जा अतिशय सुरक्षित आहे.

क्राईम रेट किती तरी प्रचंड आहे तिथे
कुठेतरी वाचलेले की दिल्लीत कोणाही फडतुस माणसाला, त्याने अनुक एक गुन्हा केला म्हणुन ताब्यात घेतले तर अर्ध्या तासाच्या आत कुठल्यातरी एम्पीबिम्पीचा नाहीतर अन्य कुठल्याही वजनदार माणसाचा फोन येतो, पोलिसांना ऐकुन घ्यावे लागते आणि वर त्या फडतुसाला सोडावेही लागते. कुठल्या फडतुसाचे कुठल्या वजनदाराशी कसले लागेबांधे आहेत ते न कळण्यासारखे असल्यामुळे पोलिस उगाच कोणालाही आत करायच्या भानगडीत पडत नाहीत.. बायकांची छेड काढण्यासारख्या प्रकाराकडे पोलिस गुन्हा म्हणुनपाहातही नाहीत Sad

नव्या मुंबईत हल्ली गस्त खुप वाढलीय. मोटरसायकलवरुन गस्त घालणारे पोलिस चोहीकडे दिसतात.

मुंबईत आणि पुण्यात रात्री अपरात्री भरपूर फिरलेली आहे.
पुण्यात स्वतःचं व्हेइकल असल्याने काहीच प्रॉब्लेम नसायचा. पब्लिक ट्रान्स्पोर्ट बद्दल काही सांगता येणार नाही.
मुंबईत टॅक्सी, रिक्षा, ट्रेन, बस अश्या सगळ्या गोष्टीतून रात्री अपरात्री फिरलेली आहे. मला तरी प्रॉब्लेम नाही आला.
पावणेदहा वाजता मधल्या लेडिजमधे चढायची चूक एकदा केली होती ती चूक सोडून...

मध्यंतरी मी एकटाच जम्मु काश्मीर ला गेलेलो.....

अनुभव छान आला.......कुठे ही फिरायचो...तिकड ची दुकाने (लाल चौक भागातील) ८ पर्यंत बंद होतात....थंडी मुळे...अजुन काही कारणाने...काश्मीर सारख्या ठिकाणी मी रात्री ११ वाजे पर्यत फिरत होतो....

एकदा असे मजेत एका काश्मीरी शी बोलता बोलता सहज बोललो तुमच्या इथे दहशदवादी जास्त असतात वगैरे वगैरे..... त्या वर त्याने मला एकच प्रश्न केला....." साहब..आप यहॉ रात रात घुम रहे हो....कुछ तकलीफ नही हुयी ना....ऐसे हि आप रात को अकेले बिहार में घुम के दिखा दो.........? "

मी निरुत्तर होतो......

मुंबई हमखास सुरक्षित आहे अजुनही...... आणि रात्रीची मुंबई तर खूपच सुंदर....... रात्री इथे भटकण्याची मजा काही औरच.......

रात्रीची मुंबई मस्त असते. रात्री भटकणे मुंबईत तेही टाउन साइडला ही कहर धमाल असते. आणि ग्रुप असेल बरोबर तुमच्या तर खासच.

भुंगा / नीधप, ये हुई ना बात !!
तसे बघायला गेलात तर असुरक्षित भाग, सगळ्याच शहरात असतात. आपल्याकडे मिडियाला स्वातंत्र्य असल्याने, तूम्हाला दिल्लीच्या सर्व बातम्या कळतात (कदाचित जास्त फुगवून) बाकी देशातल्या शहरांच्या कळणारही नाहीत. दिल्लीला जास्तच बदनाम केले जातेय, असे मला वाटते.

दिल्लीमधे रहाणार्‍या लोकांनी मला दिल्लीबद्दल वॉर्न केलेले आहे.
अपरात्री शूटबिट संपवून जेव्हा स्वतःची कार नसलेल्या अनेक बाया(असिस्टंटस, हेअर ड्रेसर्स, ज्युनियर आर्टीस्टस इत्यादी) आपापल्या घरी सुखरूप पोचतात ना मुंबईत त्याचं माझ्या ओळखीच्या बहुतेक दिल्लीकरांना कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे.
मी दिल्लीत खूप कमी फिरलीये आणि तीही दिवसाढवळ्याच फिरलीये. पण दिल्लीकरांनीच सांगितल्यावर हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची माझी हिंमत पण नाही आणि तशी गरज पण निर्माण झालेली नाही. गरज म्हणजे कामाधामासंदर्भाने रात्री अपरात्री एकटे कुठे जाण्याची गरज.
जोधपूर मधे आम्ही नाटकाच्या दौर्‍याला गेलो होतो. प्रयोग संपवून हॉटेलच्या इथे आलो. उशीर (म्हणजे ८:३०) वाजून गेलेले होते त्यामुळे जिथे उतरलो होतो तिथे जेवण मिळणार नव्हते. म्हणून आम्ही कोपर्‍यावरच्या पावभाजी/ ज्यूस स्टॉल सदृश हॉटेलात गेलो. तिथून हॉटेलमधे पोचत असताना ४ मुली आणि ६ मुलगे गप्पाटप्पा करत चाललेत तेही ९:३० च्या आसपास हे दृश्य कुणालाही झेपत नव्हतं. रस्त्यावरून जाणारा प्रत्येक मनुष्य आम्हाला चौघींना कसा न्याहाळत होता ते आमचं आम्हाला माहीत. आमचं सुदैव म्हणून हॉटेल जवळ होतं. आमचं सुदैव म्हणून लोकांना न्याहाळण्यापलिकडे काही करायची इच्छा झाली नाही इतकंच.
तर मुद्दा इतकाच की उत्तरेतील शहरांपेक्षा मुंबई केव्हाही सेफ.

दिनेशदा, २००३ चा एक किस्सा सांगतो दिल्लीचा.......

ईंजिनिअरिंग संपवून नुकताच जॉबला सुरुवात झाली आणि एकदम नॉर्थ्ची जबाबदारी येऊन पडली. जबाबदारी अश्यासाठी की, तिथे आमच्या कंपनीचा प्रेझेन्सच नव्हता..... आणि डिलर फिक्स करायला तिथे जायची वेळ आली. आधीच बरेच सुरसरम्य कथा ऐकलेल्या, जन्मात दिल्लीचे तोंड नव्हते पाहिलेले..... त्यात दिल्लीचे विमानतळ खूप लांब आहे, रात्रीचे विमान असेल तर म्हणे संध्याकाळीच एअरपोर्ट्वर पोचा असे अनाहूत सल्ले काहीनी दिले, का तर टॅक्सीवाले लुबाडतात.....

तश्या अवस्थेत दोन तीन दिवस दिल्लीत फिरलो. गुरगाव (तेंव्हा डेव्हलपमेंट होत होती, फारच थोड्या ठिकाणी डीएलेफ चे टॉवर्स होते), फरिदाबाद हे भाग म्हणजे अक्शरशः सकाळ्ला भलतेच आणि रात्री भलतेच असे होते. म्हणजे सकाळी जिथे चकाचक ऑफिसचे वातावरण तिथेच रात्री आजुबाजुला खाटा, माच टाकून गाववाले कंपू करून बसलेले. (अगदी आपल्या मायबोलीकरांसारखे :फिदी:). पहिल्यांदाच पाहिल्याने वेगळेच वाटले पण विशेष त्रास नाही झाला, अर्थात दिवसभर डिलरच्या बरोबर गाडीतून फिरल्यावर कसला होणार त्रास?..... पण फिरताना एका ठिकाणापासून दुसरीकडे जाताना रस्त्यात बरेच भाग सुनसान येतात हे जाणवले.... ऐकिवात येणार्‍या लुबाडणुकीच्या घटना घडायला अगदी आयडियल स्पॉट्स.....

तर, सगळे काम उरकून डिलरने मला जायच्या दिवशी "ब्रिस्टल" हॉटेलजवळ सोडले....... तिथून मग एअरपोर्ट्वर जायचे म्हण्णून टॅक्सी शोधमोहिम सुरू झाली.... मी एकटाच, खांद्यावर ट्रेकिंगसारखी मोठी सॅक..... संध्याकाळचे ७ वाजून गेलेले. माझे फ्लाईट होते लेट नाईट...... कंपनीच्या पैसे वाचवा मोहिमेचा आम्हाला भुर्दंड.

शोधत शोधत ब्रिस्टॉलच्या मागच्या भागात , खरंतर त्याला खंडहरच म्हटले पाहिजे, पोचलो...... मिणमिणत्या दिव्यात सगळ्या टॅक्सीवाल्यांचा थवा तिथे हुक्का फुकत बसलेला...... बिचकत बिचकत आत शिरलो आणि विचारले, "एअरपोर्ट जाना है"........

तिथे बसलेल्या माणसाने बहुधा तो म्होरक्या असावा, गब्बरसारखे विचारले "कितने आदमी है"........ मी आपला "अकेला हूं" म्हटले....... अवस्था अगदी कालियासारखीच होती माझी, "सरदार" म्हटले नाही एवढंच.. Happy

मला वर पासून खालपर्यंत न्याहाळून "जा रे इसको पहुचा के आ"....... असे फर्मान त्याने सोडले....

आईशप्पथ, आधीचे सगळे ऐकलेले.... त्यात तो सगळा खंडहरचा माहौल..... आणि ह्या पठ्याने न्याहाळत सोडलेले फर्मान "जा रे इसको पहुचा के आ"........ मी तडक उलटा फिरलो..... तर तो टॅक्सीवाला आणि आणखी दोघे माझ्या मागे अरे छोडते है ना..... क्या हुवा??? पण मी कसला थांबतोय.... मुख्य रस्त्यापर्यंत ते मागे आले माझ्या....... मी सरळ एक थ्री व्हीलर टेंपो पकडला..... त्यात बसून एका बस स्टॉपपर्यंत गेलो..... तिथून बस पकडून एअरपोर्टच्या जवळ उतरलो..... आता टर्मिनलपर्यंत १० मिनिटांचा वॉक होता..... चालता चालाता एका पोलिसाने विचारले किधर जा रहे हो??? म्हटले "एअरपोर्ट"..... तो बहुधा एअरपोर्टवर ड्युटी करणारा होता, त्याने एक टॅक्सी थांबवली, म्हणाला आओ बैथो मेरे साथ..... आली का पंचाईत????? आता ह्यात तरी बसावं का??? कळत नव्हतं.... पण धीर करून बसलो आणि सुखरूप पोचलो.....

आता या प्रसंगात कदाचित मनातली भिती असल्याने हे वाटले-घडले असेलही, पण एवढे मात्र नक्की की एकट्या दुकट्याला, स्त्रियांना मुंबईइतके बिनधास्त रात्री अपरात्री दिल्लीत फिरणे सोपे नाही किंबहुना अशक्यच आहे. राजधानी असुनही.......

आता अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर गेल्या महिन्यात एका मित्राची ट्रान्सफर दिल्लीत झाली. लॉजिस्टिक फिल्ड.... त्यामुळे सगळी वेअरहाऊसेस सिटीच्या बाहेर....... तिथेच रहायची सोय. तिथे पोचायला तो म्हणाला ७ च्या आत पोचावे लागते.... उशीर झाला तर साईटवरच रहायचे कारण एकतादुकटा किंवा बाईकवर असेल तर सरळ रस्त्यात ग्रूपने येऊन गावकरी अडवतात आणि लूटतात......... आताच १० दिवसांपुर्वी नाईलाजाने अश्या अवेळी त्याला तिथून जावे लागले आणि तोच प्रकार घडला..... पठ्याला आपला महागडा मोबाईल मुकाट्याने द्यावा लागला..... शीर सलामत तो मोबाईल पचास.....!!!!

ता.क. या प्रकारांना महिन्याभरात कंटाळून मित्र जॉब सोडून परत आलाय मुंबईत...... म्हणतोय गड्या आपली मुंबईच बरी Happy

गुरगावमध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या घरमालकांचा १० वर्षांचा नातू किडनॅप केला कुणीतरी..खंडणी (किती ते माहीत नाही) दिल्यावर एका दिवसात सहीसलामत घरी सोडला!! पोलिसांना पत्ताही नाही!
बरं हा घरमालक काही फार श्रीमंत वगैरे पण नाही..

गुरगावमध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या घरमालकांचा १० वर्षांचा नातू किडनॅप केला कुणीतरी

असले प्रकार युपी बिहारमध्ये नियमीत घडतात असे तिथले कलिग्स सांगतात. आपण जरा पैसे बाळगुन आहोत हे दाखवायची चोरी आहे तिथे Happy

दिल्लीत मी पुर्वी रात्री एकटा फिरलो आहे. आता परिस्थिती जास्त बिघडली आहे वाटतं.
मुंबईत पहाटे दोन वाजताही, घरातून बाहेर पडत असतो. नो प्रॉबलेम.
बॉम्बे सेंट्रल परिसरात आख्खी रात्र काढली आहे.

बांगरुळू चे पण नाव आहे यादीत, त्याबद्दल कुणी लिहिले नाही ते ?
खरं तर अशा याद्या, नेमक्या कशाच्या आधारावर करतात, ते पण प्रकाशित झाले पाहिजे.

आपण भारतातील शहरांबद्दल बोलतो आहोत, आफ्रिकेतील अनेक देशांत, अंधार पडल्यावर घराबाहेर पडायची चोरी असते (आणि घरात बसायचीदेखील !!).

साऊथची बहुतांश शहरं तशी सुरक्षितच आहेत...... प्रादेशिक अस्मितेमुळे अजुनतरी तिथे "बिहारीबाबू"चा प्रवेश फार झालेला नाहिये..... आणि जर नीट निरिक्षण केले तर असं लक्षात येईल कि बहुतांश शहरात "सुरक्षित" न वाटायला घडणारे प्रकार हे मोअर ऑर लेस बिहार्‍यांचेच प्रताप आहेत.......

नाही म्हणायला चेन्नाईत टॅक्सीवाले मात्र लुबाडतात आणि कितिही प्रयत्न करा ईंग्लिश हिंदी बोलतच नाहीत, अजुनही. आणि ते काय बोलतात ते आपल्याला कळत नाही.

भुंग्याच्या पहिल्या परिच्छेदाविषयी सहमत!

मी दिल्लीत बरीच वर्षे राहिलोय. तिथलं कल्चर आपल्यापेक्षा खूप वेगळं आहे. रात्री मुली सेफ फिरू शकत नाहीत हे सत्य आहे.

मुंबईत फोर्टसारख्या एरियात रात्री आठ साडेआठ नंतर एकट्या दुकट्याने फिरू नये हा माझा अनुभव. कारण सर्व ऑफिसेस ओस पडलेली असतात. युनिव्हर्सिटी, हायकोर्टाच्या जवळपासचा भाग अगदीच सुनसान असतो. रस्त्यावर भिकारी, प्यालेले नाहीतर जरा विचित्र लोक हिंडताना दिसतात. रस्त्यावर वर्दळ असते ती वेगाने जाणार्‍या कार्स, टॅक्सीजची. मुंबईतही असे अनेक स्पॉट्स आहेत, जे रात्री सुनसान असतात, जरा अंधार - झाडी असते, फार वर्दळ नसते, कोणी तर्र होऊन हेलपाडत चाललेले असते. अशी ठिकाणे तर कोणत्याही शहरात आढळतील. तर एकट्या दुकट्याने, पायी जात असाल तर अशी ठिकाणे शक्यतो टाळावीत हेच बरे! बाकी मुंबईत मी रात्री अपरात्री फिरलेली आहे, भटकलेली आहे. जोवर तुम्ही गर्दीत आहात तोवर तुम्हाला काहीच त्रास नाही. तरीही माहित नसलेल्या भागात रात्री उशीरा जाणे टाळावे.

बंगलोरला रात्री नऊ साडेनवालाच दुकाने, हॉटेल्स वगैरे बंद होऊ लागतात. काही कमर्शियल एरियात दुकाने उशीरा पर्यंत उघडी असतात. पण मी पाहिलेल्या बंगलोरमध्ये रात्री दहा नंतर रस्त्यांवर वाहनांखेरीज बर्‍यापैकी शुकशुकाट असतो. तरीही बंगलोर हिंडायला तसे सेफ आहे. तुमचे स्वतःचे वाहन असेल तर अजूनच चांगले. कारण कित्येकदा रिक्षाने रात्री उशीरा हिंडताना मला रिक्षावाल्याने थोडी ''चढवली'' असल्याचे लक्षात आले आहे. काही काही भाग, रस्ते अगदीच निर्जन आहेत, तिथे रात्री एकट्याने हिंडू नये शक्यतो. पण बाकी बंगलोर पहाटे - दिवसा हिंडायला तरी खूपच सेफ आहे.

पुण्यात दिवसा - रात्री वगैरे सर्व वेळांना पायी/ वाहनाने/ रिक्षाने/ बसने भटकले आहे. परिचित शहर असल्यामुळे जरी आजूबाजूची माणसे कधी ठीक वाटली नाहीत किंवा एरिया अगदीच निर्जन असला तरी असुरक्षित कधीच वाटले नाहीए. फक्त कँटोन्मेन्ट, कोरेगावपार्क, कोंढवा ह्यांसारख्या एरियात काही वेळा रात्री उशीरा हिंडताना आपण उगाच इथे एकटे आलो असे वाटून गेले आहे.

माझ्या मते सर्व लहान - मोठ्या शहरांमध्ये काही भाग अगदी सुरक्षित असतो, तर काही भाग तुलनेने निर्जन, अंधारा किंवा अविकसित असल्यामुळे तिथे गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त असते. अशा भागाची माहिती त्या शहरात हिंडण्या अगोदर करून घेतली तर उगाच होणारा त्रास वाचेल. किंवा आपण ज्या भागात जाणार आहोत त्या भागाची माहिती तरी इतरांना विचारून करून घ्यावी. ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने किंवा पर्यटनासाठी जर एकट्याने नव्या शहरात जायची वेळ आली तर ही माहिती फार उपयुक्त ठरते.

गोव्याचाही रात्री हिंडण्याचा अनुभव कोणाला असेल तर जरूर द्या. दिवसाढवळ्या गोवा शहर हिंडायला अतिशय सुरक्षित आहे हे मलाही माहित आहे. Happy

गोवा म्हणजे निदान पणजी तरी अत्यंत सेफ आहे........ पणजी चर्चजवळच्या हॉटेलमधे मी नेहमी उतरतो आणि रात्री ११ पर्यंत मस्त गल्ल्य्यातून भटकलो आहे...... काही ठिकाणी अगदी हॉलीवूडच्या भयपटासारखा सीन समोर दिसतो.... पानांची सळसळ, चर्च आणि सुनसान रस्ते..... पण खूपच सेफ.....

मी एकदा रात्री झोप येत नव्हती म्हणून २ वाजता पण उठून पणजीच्या ब्रीजजवळ भटकून आलोय. सगळीकडे नीरव शांतता..... आणि शांत समुद्र..... मस्त वाटते.

कोलकात्याला नांदीकार साठी आम्ही गेलो होतो. परतीच्या आदल्या दिवशी आम्हाला महोत्सवाच्या इथून यायला उशीर झाला (म्हणजे ९). सगळ्यांनाच मिठाई घ्यायची होती. आमच्यातल्या दोन मुलांनी सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायची ठरलं कारण हॉटेलच्या बाहेर पडल्यावर आजूबाजूचा परिसर दिवसा सुद्धा जरा गमतीशीर वाटतच होता. ते दोघं गेले. दुकान एक गल्ली पलिकडेच होतं त्यामुळे सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला त्यांना जास्त वेळ लागायची गरज नव्हती पण बराच वेळ झाला तरी या दोघांचा पत्ता नाही. आम्ही टेन्शनमधे. तेव्हा मोबाइल बोकाळलेले नव्हते. शेवटी रिकाम्या हातांनी दोन गडी परत आले. ते जातानाच रस्ता चुकले आणि भलतीकडेच गेले आणि एवढा वेळ झाला तरी दुकान कसं येत नाही म्हणून कुणाला तरी विचारलं तर त्या माणसाने त्यांना भलत्याच वस्तीचा रस्ता दाखवला. तिथे पोचल्यावर त्यांना लक्षात आला घोळ पण परत यायचा रस्ता कुणाला विचारावा तेही कळेना. सगळ्या गल्ल्या सारख्या दिसत होत्या. त्यात परत कोणी डिसेंट माणूस दिसला तर तो हिंदी बोलेचना. आपलंच डोकं लढवत हे लोक रस्ता शोधत होते. आणि परत परत तिथेच येत होते. मग त्यांना पोलिस दिसला एक शेवटी त्याला विचारलं. त्याने सांगितलेल्या रस्त्याने अक्षरशः ५ मिनिटात ते दोघे हॉटेलात पोचले.

गोष्टीचे तात्पर्यः शक्यतो युनिफॉर्ममधील माणसाला रस्ता विचारावा. Happy

गोव्यातली जुनी घरे पाहिली तर लक्षात येते की खिडक्यांना गज/ग्रील वगैरे काही नाही. घरेही विस्कळित्पणे मान्डल्यासारखी. पण कधी असुरक्षित वाटत नाही. मी गोव्यात चोविस तासांच्या कुठल्याही प्रहरी फिरलेलो आहे . गंमत म्हणून चांदण्या रात्रिइ हेडलाईट बंद करून दुचाकीवरून भटकंतीही केली आहे. पण भीती कश्याचीच नाही.

नाही म्हणायला तिथेही काही चोरीमारीचे फ़ुटकळ प्रकार होताहेत... साधारण २५ एक वर्षांपूर्वी 'खून' होणे हा प्रकार पहिल्यांदा झाल्याचे डिचोली वगैरे भागातले लोक सांगतात. अतिशयोक्ती मानली तरी असुरक्षितता हा प्रकार अगदीच नाही म्हणावे इतकाच आहे.

माझ्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार चोरी,दरोडेखोरी ई प्रकार करण्याचाही आळस गोवेकरांच्यात भरलेला आहे. Happy

अकु, फोर्ट मधली ती परिस्थिती, गेल्या २५ वर्षांपासून तशीच आहे. मुख्य रस्त्यावरचे विक्रेते आता जरा उशीरा बंद करतात, पुर्वी तेही ७ वाजता बंद करत. मग त्या अंधार्‍या गल्ल्यात, वेश्यांचे साम्राज्य असे. जी पी ओ, चा भाग पण तसाच. मग पुढे सिटीबँक, सुविधा मधे जरा जाग दिसायची. कुलाबा कॉजवे, ताज च्या मागचा भाग, तर आणखी वाईट. पण व्ही टी स्टेशनचा भाग गजबजलेला असतो. रात्रीच्या काही गाड्या येतात / जातात.

गोव्यात रात्री आणि अतिपहाटेही मला धोका वाटला नाही, पण मी मोठ्या गावांबद्दल बोलतोय. बीचजवळ परिस्थिती तशी नसावी. गर्दुले आता तिथे जास्त प्रमाणात आहेत.

पुण्यातला खास वस्तीतला अनुभव... पूर्वी जाधव नाट्य संसार हे सर्वात जास्त स्टॉक असलेले आणि सर्वात स्वस्त असे ड्रेपरीचे दुकान बुधवारात ऐन वस्तीत होते. त्यामुळे ११ वी पासून गॅदरींगचे/ नाटकाचे कपडे आणायला त्या वस्तीत जाण्याची सवय झाली होती. शूटचे कपडे सिलेक्ट करायचे असतील तर कधी कधी उशीर पण व्हायचा.
मंडई ते बोहरी आळी हा रस्ता पण कधी कधी तिथून जायचा (शॉर्टकट आहे). पण कधी वाईट अनुभव आला नाही. मला वाटतं अश्या वस्त्यांमधे डिसेंट दिसणार्‍या मुलींना काही त्रास होत नाही.

गोव्याला मी हिंडलीये रात्री अपरात्री. पणजी, म्हापसा, डिचोली असा तालुका किंवा शहरी भाग सोडला तर बाकी सगळीकडे सुनसान असतं. घरही एकमेकांपासून लांब, मधे मधे कुळागरं रस्त्याला लागून, दिवे नाहीत असा प्रकार असतो त्यामुळे भितीदायक वाटू शकतं पण खरंतर टूरिस्टसनी भरलेल्या कोस्टल गोव्यापेक्षा(कलंगुट, पणजी इत्यादी) डिचोली, सांखळी, वाळपई, केरी इत्यादी पूर्वेकडचा भाग एरवी जास्त सुरक्षित आहे.
साउथ गोवा फारसं माहीत नाही मला.

हा पण तुम्ही पर्यावरण चळवळीत असाल... प्रचंड जंगलं जाऊन मायनिंग (कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही... बेकायदेशीर जास्त) येण्याच्या विरोधात असाल.. आणि विकलेही जात नसाल तर तुमची सुरक्षितता उडत जाऊ शकते. आणि ते पूर्वेकडच्या भागात जास्त.

लहानपणी आम्ही खेळताना, मैत्रीणीकडे, क्लासला वगैरे जाताना आईबाबांना कधीही टेन्शन आले नव्हते. मस्त आमच्या एरीयात हुंदडत असायचो. आणि एरीयाची व्याख्याही भरपूर मोकळीढाकळी होती. आता पाहिले तर माझ्या सोसायटीत जागोजागी वॉचमेन आहेत, गार्डन पाचव्या मजल्यावर आहे. तिथे केवळ सोसायटीतलीच लोकं येऊ शकतात वगैरे वगैरे असताना, मुलीला सहसा एकटं पाठवायची हिंमत होत नाही. काळ बदलला, लोकांची नियत बदलली, आपणही बदलेलं बरं.

Pages