फॉर इंग्लिश, प्रेस वन. हिंदी के लिए मराठी का गला दबाएँ ।

Submitted by राफा on 12 January, 2011 - 01:04

काही एक दिवसांपूर्वीची एक सुसकाळ.

माझा मोबाईल वाजला.

“हॅलो. मै फलाना कंपनी से बात कर रही हू. क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”

“बोला”

“सर, आपके इंटरनेट कनेक्शन का इस महिने का बिल रेडी है. क्या आज शाम को चेक कलेक्ट करने के लिए किसीको भेज सकती हू ?”

नेहमीप्रमाणेच लगेच उत्तर देण्याआधी एकदम डोक्यात लखलखाट झाला.
(कदाचित ही इसमी ‘बिलींग सायकल’ १५ तारखेची असतानाही ३-४ तारखेला फोन करते म्हणून ठराविक मासिक वैताग आला असावा.
किंवा
दर ५-६ दिवसांनी इंटरनेट बंद होणे व तक्रार केल्यावर ठराविक उत्तर मिळणे मग ते ७-८ तासात कधीतरी चालू होणे.. पुन्हा ५-६ दिवसांनी तेच वगैरे काही महीने होत असलेल्या गोष्टींचा साठलेला वैतागही असेल.)

“तुम्ही माझ्याशी हिंदीत का बोलताय ?”

“…”

(अग बोल बाई !)

“मी मराठी किंवा इंग्लिश मधे बोलू इच्छितो. हा माझा प्रेफरन्स तुमच्या रेकॉर्डला ठेवा हवं तर. ”

“ओके सर. आज संध्याकाळी पाठवू का ? ”

“आज आम्ही नाही आहोत संध्याकाळी कुणी घरी. उद्या पाठवा. प्लीज फोन करायला सांगा म्हणजे खेप पडणार नाही. ”

तिचे आभार ऐकून फोन ठेवतानाच माझ्या डोक्यात पक्की खात्री झाली ही इसमी उद्या फोन करेल तेव्हा हमखास हिंदीत बोलणार. रोज पाचशे फोन होत असणार हिचे. मी फोन केला तर ऑटोमेटेड मेसेज ने मी भाषा निवडू शकतो. तिने फोन केला तर ती हमखास तशीच बोलणार हिंदीमधे.

आणि वही हुआ जिसका डर था !

दुस-या दिवशी सकाळी तिचा परत फोन.

“… क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”

मनाची तयारी असूनही माझी काहीशी सटकली. आता नडायची वेळ आली !

“मी कालच तुम्हाला सांगितलं की तुमच्या कंपनीमधून फोन आला तर कृपया माझ्याशी मराठीमधे बोला. अशी काही लक्षात ठेवायची सोय नाही हे तुम्ही मला काल सांगितलं नाहीत. आज तुम्ही परत हिंदीमधे बोलत आहात. का बरं ? ”

“…”

“हॅलो.. ”

“हॅलो सर.. मी संध्याकाळी पाठवू का कोणाला चेकसाठी ? ”

(माझ्या डोक्यात स्वगत चालू : जाऊ देत आता. स्वत:ला शांतताप्रेमी म्हणवतोस. उगाच भांडण तंटा अजिबात आवडत नाही म्हणतोस. मग ह्या बिचारीला कशाला नडायचे ? पण ते काही नाही. जाऊ दे म्हणूनच मग हे सगळं होतं)

कंपनी विरुद्ध साठलेल्या वैतागाची बेरीज जास्त भरली !

“हो पाठवाच आज कुणाला तरी. पण तुम्ही मला उत्तर दिले नाहीत.”

“…”

“तुम्हाला अशा काही इंस्ट्रक्शन आहेत का हिंदीत सुरुवात करायची म्हणून ? ”

“…”

“हॅलो.. ”

“हॅलो सर.. ”

“आर यू अ महाराष्ट्रीयन ? तुमचे कॉल सेंटर पुण्यातच आहे ना ?”

“हो सर. ”

“मला एक सांगा. पुण्यात दोन मराठी माणसांनी एकमेकांशी हिंदीत का बोलायचे ? इन्फ़ॅक्ट, जगाच्या पाठीवर कुठेही..”

“…”

“मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचे आहे. ”

“…”

“हॅलो ? ”

“.. ओके सर. सिनियर मॅनेजरशी बोला. ”

अर्धा मिनिट खूडबूड.

“हॅलो. धिस इज अमुक तमुक. व्हॉटस द इश्यू सर ? ”

(आडनाव नीट ऐकू आले नाही पण बहुतांशी अमराठीच वाटतयं. यूपी कडचे. बहुतेक.)

“ऍक्चुअली नथिंग अगेंस्ट युअर रिप्रेझेंटेटिव. शी वॉज पोलाईट …”

त्याला थोडक्यात घटनाक्रम व ‘इश्यू’ सांगितला.

“या सर.. नो प्रॉब्लेम. आय विल टेल हर’ (आवाज घाईत असलेला. कदाचित हा त्याच्यासाठी ‘नॉन इश्यू’)

(अगदीच ‘कर्टली’ बोलायची गरज नाही म्हणून बोलावे)
“सी, इट्स नॉट दॅट आय डिसलाईक हिंदी.. ”

“येस सर. बट हिंदी इज अवर नॅशनल लॅंगवेज सर नो? ”

(देवा ! आता ह्याच्याशी ह्या विषयावर वाद घालायचा ! मला मराठीमधे ऐकायला बोलायला आवडेल ह्या सरळ अपेक्षेमधे चुकीचे काय आहे ? )

< सगळे विचार गिळून... थोडक्यात समारोप करण्यासाठी >

“सी…यू शूड स्टार्ट इन रिजनल लॅंग्वेज. ९०% ऑफ द पिपल आर कंफर्टेबल स्पिकिंग इन मराठी.. सो.. ”

“ओके सर बट वुई आर ऑल इंडीयन्स”

(दे ! मलाच डोस दे ! तू आणि मी कुठेही भारतात जाऊ शकतो, राहू शकतो ते इंडीयन आहोत म्हणूनच ना ? राष्ट्रगीताला उभे राहताना तुझ्या ह्रदयात होते तेच माझ्याही होते. नाही का? पण राष्ट्रप्रेमाशी ह्याचा काय संबंध ?

हिंदी ? हिंदीत मीच केलेला एखादा शेर ऐकवू का लेका ? कारण मराठीत केलेले काव्य तुला कळणार नाही. अनौपचारिक किंवा चपखल बसणा-या एखाद्या ‘ड्वायलॉक’ साठी ही हिंदी छान असते रे.
अर्थात काही गोष्टी खरचं डोक्यात जातात बघ. ‘लोकमान्य तिलक’ काय, ‘अंग्लैद’ काय ?.. अरे विशेष नाम तसेच नको का उच्चारायला ? उद्या मी ‘तिवारी’ ला ‘उधारी’ म्हटले तर चालेल का ?

आणि माझे अमराठी मित्र किंवा परिचयाचे लोक नाहीत काय ? मी पंजाबमधे बराच काळ - महिने किंवा वर्षे - जाणार असेन तर जुजबी का होईना पंजाबी भाषा अवगत करणे हे न्याय्य, व्यवहार्य व तर्कशुद्ध नाही का ? वीस वीस वर्षे महाराष्ट्रात राहून कामापुरती, जुजबी व्यवहरापुरती मराठीही शिकावी असे वाटत नसेल, शिकायची जरुरी भासत नसेल तर मराठी लोकांना आडमुठे संकुचित म्हणण्याचा अधिकार कुणी दिला यू. पी. वाल्यांना ? तेव्हा उत्तरेतली सो कॉल्ड ‘वॉर्म्थ’ कुठे जाते वागण्यातली ? त्या त्या प्रदेशाच्या भाषेला काडीचीही किंमत न देणे म्हणजे स्वभावातील मार्दव आणि सहिष्णुता? महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी हा कुठला न्याय ? गरज असताना/नसताना मला तेलगू, कन्नड, फ्रेंच, पंजाबी ढंगाची हिंदी, उर्दू, गुजराती,काश्मिरी वगैरे भाषांमधली २-४ (किंवा जास्त) वाक्ये तरी शिकाविशी वाटली ना ? हे महत्वाचे नाहीच का ?

बरं हे सगळे जाऊ देत. हा 'बिजिनेस कॉल' आहे ना? मग भूगोलातच बोलायचे तर मग देश कशाला ? आज जागतिक भाषा कुठली, आर्थिक किंवा अन्य औपचारिक व्यवहारांची ? इंग्लिश ना ? तुझ्या कंपनीचा ऑटोमेटेड मेसेज इंग्लिशमधेच सुरु होतो ना ? मग करा ना फोन इंग्लिशमधे ! थेट विशाल दृष्टीकोनच घेऊया ना.. आपण ग्लोबल सिटिझन्स नाही का ?

हेही समजून घेण्याची इच्छा नसेल तर जाऊ देत. मी कस्टमर आहे. मला मराठीतच बोलायचे आहे. तू करु शकत असशील तर सांग नाहीतर मी दुसरी कंपनी बघतो ! पूर्णविराम.)

“यू आर ऎब्सुल्यूटली राईट. वुई आर इंडियन्स. बट सी..”

पण मी पुढे काही बोलायच्या आतच तो म्हणाला

“ओके ओके. नो प्रॉब्लेम सर. आय विल नोट युअर प्रेफरन्स. आय विल ऑल्सो टॉक टू दि टॉप मॅनेजमेंट अबाऊट धिस.”

(डोंबल तुझे. पुढच्या महिन्यात मला हिंदीतच फोन येतो का नाही बघ. पण ठीक आहे. आपणहून म्हणतोय सांगेन वरिष्ठ अधिका-यांना सांगेन म्हणून, तर बास आता)

“ओके. थॅंक्स. ”

“थॅंक यू सर. ”

फोन खाली ठेवला.

कुठल्याही कारणाने, मनातले सगळे विचार जेव्हाच्या तेव्हा भरभर बोलले गेले नाहीत की आपण स्वत:वरच वैतागतो तसा वैतागलो !

तोच मला सोयीस्कर रित्या आडमुठा (किंवा ‘हुकलेला’) समजला असेल का ? तो त्या मुलीवर ती मराठी आहे म्हणून आता डूक धरेल का (किंबहुना सर्व मराठी ‘आडमुठ्या’ लोकांविषयी - केवळ माझ्यामुळे - त्याला अढी बसेल का) ?
की, सांगण्याची गरज नव्हती तरी तो विशेष आपणहून म्हणाला तसे.. ‘लोक मराठी मधे संवाद करण्याची मागणी करत आहेत’ असे खरेच तो वरिष्ठांना सांगेल ?

ह्म्म्म्म..

पण एकूण ‘इश्यू’ त्याच्या खरंच लक्षात आला असेल का ?


- राफा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Happy छान... Happy (मराठीतुन प्रतिक्रिया.. :-D)

कुठल्याही कारणाने, मनातले सगळे विचार जेव्हाच्या तेव्हा भरभर बोलले गेले नाहीत की आपण स्वत:वरच वैतागतो तसा वैतागलो ---> खरय... Happy

http://merakuchhsaman.blogspot.com/

मस्त मला कायम खूप भाषांत बोलावे लागते. हैद्राबादी हिंदी, तेलुगु, तामिळ, ओरिया, आणि माय मराठी व मग इंग्रजी सुद्धा. व कायम स्विच करावे लागते. तुझी चिड चिड समजू शकते मी. ग्राहकांशी त्यांच्या मातॄभाषेत बोलले कि ते काय खुलतात. कितीही त्रास झाला असला तरी समजून घेतात. पण कॉर्पोरेट जगतात
अशी काळजी किती लोक घेतात. सीआर एम सीआर एम करून डोके खातात निव्वळ.

पण एकूण ‘इश्यू’ त्याच्या खरंच लक्षात आला असेल का ?>> हे जरा कठिण वाटतय

पण लेखन चांगले आहे. आणि सगळे जण अस करायला लागले तर नक्कि काहितरी बदल घडेल.

राफा, अफाट लिहीलं आहेस. शिर्षक गमतीशीर असलं तरी विचार करायला लावणारं आहे. तुझ्या लिहीण्याच्या शैलीचा अन लिखाणाचा मी पंखा झालोय केव्हाच.

छान लिहिलय,
मला पण बंगलोर मधे आल्यावर विचार डोक्यात आला . मी IBM मध्ये काम करतो . इथे अगदी मोठ्या अक्षरात कन्नड मधे प्रत्येक बिल्डिंग वर IBM लिहिणारी आणी कर्नाट्क दिवस साजरा करणारी कंपनी (आणी अशा इतर सर्व कंपन्या) पुण्यात मराठी मधे छोटीशी पाटी लावायला का खळ्खळ करतात ? यात दोष कुणाचा , त्यांचा की आपला ? Sad

राफा, चांगलं लिहिलंय.

पण तुम्ही वर लिहिलेलं नाही पटलं. म्हणजे <<मी मराठी किंवा इंग्लिश मधे बोलू इच्छितो. हा माझा प्रेफरन्स तुमच्या रेकॉर्डला ठेवा हवं >> इंग्लिश तरी कां? मग हिंदी काय वाईट आहे, निदान राष्ट्रभाषा तरी आहे. इंग्लिश कोणती भाषा आहे? ह्म्म, आता आपल्यापैकी बर्‍याचजणांना तीच जवळची वाटते हे आपलेच दुर्भाग्य आहे.

तोच मला सोयीस्कर रित्या आडमुठा (किंवा ‘हुकलेला’) समजला असेल का ? तो त्या मुलीवर ती मराठी आहे म्हणून आता डूक धरेल का (किंबहुना सर्व मराठी ‘आडमुठ्या’ लोकांविषयी - केवळ माझ्यामुळे - त्याला अढी बसेल का) ?
.....
अगदी प्रातिनिधिक ...अगदी मनातलं...

महाराष्ट्र ना धड उत्तर भारतात ना दक्षिण भारतात्..त्यामुळे कात्रीत सापडलेला..
दक्षिण भारतीयाला हिंदी हमारी राष्ट्रभाषा(?) है असे उत्तर 'त्या' मॅनेजरने दिले असते का?

माझा टाटा स्कायचा अनुभवः

कॉल सुरू झाल्यानंतर मी 'योग्य' तो क्रमांक दाबुन 'मराठी' भाषा निवडली.
कोल उचलला गेल्यानंतरः
मी: हेलो...
को.से.: हेलो सर मै <अमुक तमुक> बात कर रहा हु. मै आपकी किस प्रकार की सहायता कर सकता हु?
मी: <दोन मराठी माणस एकमेकांशी हिंदितच बोलतात या नियमाला स्मरुन मी हे ग्रुहित धरल की मी मराठी भाषा निवडली आहे म्हणजे बोलणारा मराठीच असेल, आणि इथे मी मराठीत माझी समस्या सांगायला सुरुवात केली...>
ती अर्ध्यातच थांबवुन...
को.से.: सर क्या आप प्लिज हिंदी मे बात कर सकते है ?
मी: कोल सुरु होताना मी मराठी सिलेक्ट केले होत.
को.से.: सर इस वक्त हमारे सभी मराठी बोलनेवाले ओफिसर दुसरे कॉल मे व्यस्त है.
मी: हा ठिक आहे मराठी ला ट्रन्स्फर करा
को.से. : सर आप मुझे आपकी समस्या बता दे तो मै आपकी कुछ सहायता कर सकता हू
मी: मराठी मधे ट्रान्स्फर करा प्लिज
को.से.: थोडा देर इंतजार करना पडेगा सर
मी: ठीक आहे मी वाट बघतो
को.से.: सर लेकीन इंग्लिश या हिंदी मे बात करने मे क्या प्रोब्लेम है?
मी(मनात: आ** * तुझ्या) (शक्य तितक्या शांत राहत): हा मराठी डिपार्टमेंट्ला ट्रन्स्फर करा

मग त्याने कॊल मराठीला ट्रांस्फर केला.
१ मिन संगिइत वाजल्यानंतर एका मुलीने फोन घेतला:
मी तिला माझा टेक्निकल इशु सांगितला आणि माझा प्रोब्लेम सोल्व झाला.
मग शेवटि मी तिला विचारल की मी मराठि सेलेक्टा केलेले असतानाही माझा कॉल 'तिकडे' गेलाच कसा? तिने परत तेच उत्तर दिल की सगळे मराठी वाले ओफिसर बिझि होते.
मी तिला विचारल की हे कॉल सेंटर कुठे आहे?
उत्तरः पुणे

सारांशः
१. आपण ग्राहकांनिच जर सक्ती केली आणि मराठीचा आग्रह धरला तर आणि तरच 'ते' लोक सुधारतील.
२. मराठी ओफिसर बिझि आहेत म्झणुन तुम्हि कोल हिंदी ला ट्रन्फर करुच कसा शक्ता? हिच गोष्टा कर्नाटकात करुन दाखावा बर? मग कोलच्या सुरुवातील मराठी सिलेक्ट करण्याचा पर्याय दिलातच कशाला? आणि तोहि शेवटि? इंग्रजि, हिंदि, मराठी या क्रमाणे? तेही महाराष्ट्रात?
३. मुळातच मराठि बोलणारॆ ओफिसर कमि नेमले जात असणार म्हणुन तर त्यांना माझा कॊल हिंदि ला ट्रान्फर करावा लागला ना? पुण्यातल्या कोल सेटरमधे मराठी माणस जास्त नकोत का?
४. मी एकदा कॊल मराठी डिपार्टमेंटला ट्रन्फर करायला सांगितल्या नंतर मलाच उद्दम पणे इंग्रजी/हिंदीत बोलायला काय प्रोब्लेम् आहे अस विचारण्याची हिमतच कशी होते या लोकांची?
५. त्याला मी मरठीत बोलत असलेल सगळ कळत होत, मग त्या ****ला मराठीत बोलायला काय प्रोब्लेम होता?
६. टाटा स्कायवाल्यांणि कमीत कमी माझा कोल उशीरा क होइन मराठी मधे घेतला पण आजपर्यंत MTNL च्या लोकल ओफिस मधल्या बाइशी नेहमी मराठी बोलतो आनी ति मुद्दाम माझ्याशि (साइथे इंडियन एसेंट मधे) हिंदितच बोलते. या लोकांना मराठी कळत तर बोलायला का येत नाही?
७. त्यला माहिति होत की "अरे ये तो मरठि कोलर है मै इसको यु हॆडल कर लुंगा." म्हणुनच तर त्याने एवढ ताणुन धरल ना? कारण त्यांना अनुभव असणार की एकदा सांगीतल्यानंतर सगळे मराठी कस्टमर हिंदीत बोलायला तयार होतात म्हाणुन. तेच त्याने माझ्याबाबतीत करण्याचा प्रयतन केला. मराठी लोकांना कमी लेखण्याची आणि ग्रुहीत धरण्याची ही परंपरा कधी बदलेल? ते आपण कस्टमरच काही प्रमाणात बदलु शकतो.

सुचना: वरील प्रसंग १००% खरा आहे. तो मला जसा आठवला तसा लिहिला आहे.

को.से. = कॊल सेंटर

आडोला अनुमोदन.

मराठी किंवा इंग्लिशपेक्षा मराठी किंवा हिंदी हा पर्याय केव्हाही स्विकारार्ह आहे. Happy

>>> “येस सर. बट हिंदी इज अवर नॅशनल लॅंगवेज सर नो? ”

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही हे त्याला सांगा. घटनेच्या कोणत्याही कलमात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा उल्लेख नाही. भारतातल्या सर्व १४ भाषांना घटनेने समान महत्व दिलेले आहे.

आत्तापर्यंत आलेल्या सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार !

@आऊटडोअर्स व मंजूडी : तुम्हाला माझे एक मत पटले नाही तरीही त्या तुमच्या प्रतिक्रियेचेही स्वागतच आहे. फक्त एकच गोष्ट स्पष्ट करु इच्छितो : मला हिंदीपेक्षा इंग्लीश आवडते का किंवा का आवडते हा मुद्दा नाहीच. (दोन्ही भाषांची गंमत, उपयोग आणि मर्यादा माझ्यापुरते वेगवेगळे आहेत. )

हिंदी आपल्यावर लादले का जाते हा मुद्दा आहे. मराठीचे प्रेम व आग्रह हा मुद्दा आहे. दोन मराठी माणसांनी कारण नसताना हिंदीमधे का बोलायचे हा मुद्दा आहे.

शिवाय तुमच्या माहितीसाठी सांगतो : ब-याच जबाबदार लोकांनी 'हिंदी राष्ट्रभाषा नाहीच व तसा सोयीस्कर (अप्)प्रचार केला गेला आहे' अशा प्रकारचे अतिशय आग्रही लेख / मते / निरीक्षणे नोंदवली आहेत (मी चुकत नसेन तर मायबोलीवर सुद्धा).

आजच मला ही माहिती मिळाली आहे बघा हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !

बाकीच्या भारतीय भाषांबद्दल त्या त्या भाषिकांच्या प्रेमाबद्दल, त्या भाषांच्या सामर्थ्याबद्दल, सौंदर्याबद्दल बहुतांश हिंदी भाषिक लोकांची अनास्था व असहिष्णूता हा मुद्दा आहे. शिवाय हे दुस-या राज्यात (अर्थातच महाराष्ट्रातच !) जाऊन शिरजोरी करतात तो मुद्दा आहे. एक जण दुस-याचा योग्य तो आदर करत नसेल / त्याच्या हक्कांची जाणीव ठेवत नसेल तर दुस-याने काय करावे बरे ?

शिवाय हे महाराष्ट्रातच घडते. कुठल्याही कंपनीचा प्रतिनिधी आपल्याशी बिनदिक्कत हिंदी बोलायला चालू का करतो ? ('हिंदी येते की नाही, बोलायचे आहे की नाही' हे न विचारताच). तो त्यावेळी तर मराठी बोलत नसतोच पण गरज पडली नाही तर महाराष्ट्रात राहूनही कधीही मराठी शिकणार नसतो ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत.

Happy मराठी माणुस मुळातच खुप समजुतदार आहे, परप्रातियाना त्रास होवु नये म्हणुन स्व:ताच हिंदी, इंग्लिश शिकतो आणि मराठीचा वापर फक्त घरात करतो...

राफा, भावना पोचल्या!
माझी एक कलिग पुण्यात गेली २० वर्षे होती आणि मराठी येत नाही हे ठासून सांगते, डोकं सटकतच अशा वेळेला.
मी अलिकडे रिक्षावाले, दुकानदार, वेटर हिंदी बोलायला लागले की मख्ख चेहरा करतो आणि वैताग म्हणजे ९०% वेळी ती व्यक्ती मराठीच असते.

राफा, मस्तच लेख.

मी देखिल टाटास्कायवाल्यांशी आवर्जून मराठीतच बोलते. कालच त्यांच्याशी बोलताना मराठी सिलेक्ट केल्यावरही अमराठी माणूस फोनवर आला. पण मी नेटाने मराठीत बोलत राहिल्यावर तोही बर्‍यापैकी मराठीत बोलू लागला.

मी रिक्षावाल्यांशीही मराठीतच बोलते. रिक्षा धोबीआळीतून घ्या सांगताना "रिक्षा धोबीआलीसे लो" असं बोलणार्‍या सहप्रवाश्याला रिक्षावाल्यासमोरच मराठीतच बोल असं बिन्धास्त सांगते Proud .

नाशिकमध्ये हा अनुभव नाही.बहुतेक व्यवहार मराठीत चालतो.टेलिमार्केटिंग सोडले तर!!

राफा, तुमची मुद्द्यांची पोस्ट आवडली.
>>मराठीतच बोलते. रिक्षा धोबीआळीतून घ्या सांगताना "रिक्षा धोबीआलीसे लो" असं बिन्धास्त>> आँ?

Happy
आपण मराठीतच बोलायचं काहीही झालं तरी. समोरचा मराठी असेल तर नक्कीच. आपोआप बोलतात समोरचेही मराठीत.

कधी पाहिलंय- दोन अनोळखी अमहाराष्ट्रीय लोक एकत्र आले, कोणतेही असो- गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, आंध्रा- की लगेच आपल्या भाषेत उत्साहाने कुचकुचायला लागतात. दोन अपरिचित मराठींना अत्यंत उत्साहाने मराठीतच बोलताना मी अजूनतरी पाहिलेले नाही! Uhoh

इसमी >>> Happy Happy Happy
राफा अफलातून लिहिले आहेस. मस्त!!!
खरंच, किती लोकांना मराठी लोकांसारखा विचार करता येतो, किती लोकं दुसरी (हिंदी आणि इंग्लिश सोडून) भाषा शिकतात?

राजधानी हा राज्याचा आरसा असतो.

मुंबईचं लोकल मराठी पब्लिक 'पंजाब सिंध गुजरात द्राविड उत्कल बंगा' यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे... मग काय होणार दुसरं? कॉल सेंटर असणार मुंबईत आणि लोक हे असले , मग दुसरं काय होणार? कॉल सेंटर उचलून कोल्हापुरात/सोलापुरात आणून ठेवा, मग बघा काय होतंय ते !

मग हिंदी काय वाईट आहे, निदान राष्ट्रभाषा तरी आहे.>>>...
मुळात भारताला राष्ट्रभाषा नाहीचेय...

मस्तच लेख... पण हेही तितकच खरं आहे की दोन मराठी लोक एकत्र भेटले की ईंग्रजी किंवा हिंदीत बोलणं पसंत करतात... रस्त्यात, ट्रेनमधे आणि ऑफिसातही... कारण काय... तर आपण काय बोलतोय हे सगळ्यांना कळावे म्हणुन हिंदीत... (कॉर्पोरेट लॅन्गवेज ईंग्रजी आहे हे सोयीस्कररीत्या विसरुन)

Pages