फॉर इंग्लिश, प्रेस वन. हिंदी के लिए मराठी का गला दबाएँ ।

Submitted by राफा on 12 January, 2011 - 01:04

काही एक दिवसांपूर्वीची एक सुसकाळ.

माझा मोबाईल वाजला.

“हॅलो. मै फलाना कंपनी से बात कर रही हू. क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”

“बोला”

“सर, आपके इंटरनेट कनेक्शन का इस महिने का बिल रेडी है. क्या आज शाम को चेक कलेक्ट करने के लिए किसीको भेज सकती हू ?”

नेहमीप्रमाणेच लगेच उत्तर देण्याआधी एकदम डोक्यात लखलखाट झाला.
(कदाचित ही इसमी ‘बिलींग सायकल’ १५ तारखेची असतानाही ३-४ तारखेला फोन करते म्हणून ठराविक मासिक वैताग आला असावा.
किंवा
दर ५-६ दिवसांनी इंटरनेट बंद होणे व तक्रार केल्यावर ठराविक उत्तर मिळणे मग ते ७-८ तासात कधीतरी चालू होणे.. पुन्हा ५-६ दिवसांनी तेच वगैरे काही महीने होत असलेल्या गोष्टींचा साठलेला वैतागही असेल.)

“तुम्ही माझ्याशी हिंदीत का बोलताय ?”

“…”

(अग बोल बाई !)

“मी मराठी किंवा इंग्लिश मधे बोलू इच्छितो. हा माझा प्रेफरन्स तुमच्या रेकॉर्डला ठेवा हवं तर. ”

“ओके सर. आज संध्याकाळी पाठवू का ? ”

“आज आम्ही नाही आहोत संध्याकाळी कुणी घरी. उद्या पाठवा. प्लीज फोन करायला सांगा म्हणजे खेप पडणार नाही. ”

तिचे आभार ऐकून फोन ठेवतानाच माझ्या डोक्यात पक्की खात्री झाली ही इसमी उद्या फोन करेल तेव्हा हमखास हिंदीत बोलणार. रोज पाचशे फोन होत असणार हिचे. मी फोन केला तर ऑटोमेटेड मेसेज ने मी भाषा निवडू शकतो. तिने फोन केला तर ती हमखास तशीच बोलणार हिंदीमधे.

आणि वही हुआ जिसका डर था !

दुस-या दिवशी सकाळी तिचा परत फोन.

“… क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”

मनाची तयारी असूनही माझी काहीशी सटकली. आता नडायची वेळ आली !

“मी कालच तुम्हाला सांगितलं की तुमच्या कंपनीमधून फोन आला तर कृपया माझ्याशी मराठीमधे बोला. अशी काही लक्षात ठेवायची सोय नाही हे तुम्ही मला काल सांगितलं नाहीत. आज तुम्ही परत हिंदीमधे बोलत आहात. का बरं ? ”

“…”

“हॅलो.. ”

“हॅलो सर.. मी संध्याकाळी पाठवू का कोणाला चेकसाठी ? ”

(माझ्या डोक्यात स्वगत चालू : जाऊ देत आता. स्वत:ला शांतताप्रेमी म्हणवतोस. उगाच भांडण तंटा अजिबात आवडत नाही म्हणतोस. मग ह्या बिचारीला कशाला नडायचे ? पण ते काही नाही. जाऊ दे म्हणूनच मग हे सगळं होतं)

कंपनी विरुद्ध साठलेल्या वैतागाची बेरीज जास्त भरली !

“हो पाठवाच आज कुणाला तरी. पण तुम्ही मला उत्तर दिले नाहीत.”

“…”

“तुम्हाला अशा काही इंस्ट्रक्शन आहेत का हिंदीत सुरुवात करायची म्हणून ? ”

“…”

“हॅलो.. ”

“हॅलो सर.. ”

“आर यू अ महाराष्ट्रीयन ? तुमचे कॉल सेंटर पुण्यातच आहे ना ?”

“हो सर. ”

“मला एक सांगा. पुण्यात दोन मराठी माणसांनी एकमेकांशी हिंदीत का बोलायचे ? इन्फ़ॅक्ट, जगाच्या पाठीवर कुठेही..”

“…”

“मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचे आहे. ”

“…”

“हॅलो ? ”

“.. ओके सर. सिनियर मॅनेजरशी बोला. ”

अर्धा मिनिट खूडबूड.

“हॅलो. धिस इज अमुक तमुक. व्हॉटस द इश्यू सर ? ”

(आडनाव नीट ऐकू आले नाही पण बहुतांशी अमराठीच वाटतयं. यूपी कडचे. बहुतेक.)

“ऍक्चुअली नथिंग अगेंस्ट युअर रिप्रेझेंटेटिव. शी वॉज पोलाईट …”

त्याला थोडक्यात घटनाक्रम व ‘इश्यू’ सांगितला.

“या सर.. नो प्रॉब्लेम. आय विल टेल हर’ (आवाज घाईत असलेला. कदाचित हा त्याच्यासाठी ‘नॉन इश्यू’)

(अगदीच ‘कर्टली’ बोलायची गरज नाही म्हणून बोलावे)
“सी, इट्स नॉट दॅट आय डिसलाईक हिंदी.. ”

“येस सर. बट हिंदी इज अवर नॅशनल लॅंगवेज सर नो? ”

(देवा ! आता ह्याच्याशी ह्या विषयावर वाद घालायचा ! मला मराठीमधे ऐकायला बोलायला आवडेल ह्या सरळ अपेक्षेमधे चुकीचे काय आहे ? )

< सगळे विचार गिळून... थोडक्यात समारोप करण्यासाठी >

“सी…यू शूड स्टार्ट इन रिजनल लॅंग्वेज. ९०% ऑफ द पिपल आर कंफर्टेबल स्पिकिंग इन मराठी.. सो.. ”

“ओके सर बट वुई आर ऑल इंडीयन्स”

(दे ! मलाच डोस दे ! तू आणि मी कुठेही भारतात जाऊ शकतो, राहू शकतो ते इंडीयन आहोत म्हणूनच ना ? राष्ट्रगीताला उभे राहताना तुझ्या ह्रदयात होते तेच माझ्याही होते. नाही का? पण राष्ट्रप्रेमाशी ह्याचा काय संबंध ?

हिंदी ? हिंदीत मीच केलेला एखादा शेर ऐकवू का लेका ? कारण मराठीत केलेले काव्य तुला कळणार नाही. अनौपचारिक किंवा चपखल बसणा-या एखाद्या ‘ड्वायलॉक’ साठी ही हिंदी छान असते रे.
अर्थात काही गोष्टी खरचं डोक्यात जातात बघ. ‘लोकमान्य तिलक’ काय, ‘अंग्लैद’ काय ?.. अरे विशेष नाम तसेच नको का उच्चारायला ? उद्या मी ‘तिवारी’ ला ‘उधारी’ म्हटले तर चालेल का ?

आणि माझे अमराठी मित्र किंवा परिचयाचे लोक नाहीत काय ? मी पंजाबमधे बराच काळ - महिने किंवा वर्षे - जाणार असेन तर जुजबी का होईना पंजाबी भाषा अवगत करणे हे न्याय्य, व्यवहार्य व तर्कशुद्ध नाही का ? वीस वीस वर्षे महाराष्ट्रात राहून कामापुरती, जुजबी व्यवहरापुरती मराठीही शिकावी असे वाटत नसेल, शिकायची जरुरी भासत नसेल तर मराठी लोकांना आडमुठे संकुचित म्हणण्याचा अधिकार कुणी दिला यू. पी. वाल्यांना ? तेव्हा उत्तरेतली सो कॉल्ड ‘वॉर्म्थ’ कुठे जाते वागण्यातली ? त्या त्या प्रदेशाच्या भाषेला काडीचीही किंमत न देणे म्हणजे स्वभावातील मार्दव आणि सहिष्णुता? महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी हा कुठला न्याय ? गरज असताना/नसताना मला तेलगू, कन्नड, फ्रेंच, पंजाबी ढंगाची हिंदी, उर्दू, गुजराती,काश्मिरी वगैरे भाषांमधली २-४ (किंवा जास्त) वाक्ये तरी शिकाविशी वाटली ना ? हे महत्वाचे नाहीच का ?

बरं हे सगळे जाऊ देत. हा 'बिजिनेस कॉल' आहे ना? मग भूगोलातच बोलायचे तर मग देश कशाला ? आज जागतिक भाषा कुठली, आर्थिक किंवा अन्य औपचारिक व्यवहारांची ? इंग्लिश ना ? तुझ्या कंपनीचा ऑटोमेटेड मेसेज इंग्लिशमधेच सुरु होतो ना ? मग करा ना फोन इंग्लिशमधे ! थेट विशाल दृष्टीकोनच घेऊया ना.. आपण ग्लोबल सिटिझन्स नाही का ?

हेही समजून घेण्याची इच्छा नसेल तर जाऊ देत. मी कस्टमर आहे. मला मराठीतच बोलायचे आहे. तू करु शकत असशील तर सांग नाहीतर मी दुसरी कंपनी बघतो ! पूर्णविराम.)

“यू आर ऎब्सुल्यूटली राईट. वुई आर इंडियन्स. बट सी..”

पण मी पुढे काही बोलायच्या आतच तो म्हणाला

“ओके ओके. नो प्रॉब्लेम सर. आय विल नोट युअर प्रेफरन्स. आय विल ऑल्सो टॉक टू दि टॉप मॅनेजमेंट अबाऊट धिस.”

(डोंबल तुझे. पुढच्या महिन्यात मला हिंदीतच फोन येतो का नाही बघ. पण ठीक आहे. आपणहून म्हणतोय सांगेन वरिष्ठ अधिका-यांना सांगेन म्हणून, तर बास आता)

“ओके. थॅंक्स. ”

“थॅंक यू सर. ”

फोन खाली ठेवला.

कुठल्याही कारणाने, मनातले सगळे विचार जेव्हाच्या तेव्हा भरभर बोलले गेले नाहीत की आपण स्वत:वरच वैतागतो तसा वैतागलो !

तोच मला सोयीस्कर रित्या आडमुठा (किंवा ‘हुकलेला’) समजला असेल का ? तो त्या मुलीवर ती मराठी आहे म्हणून आता डूक धरेल का (किंबहुना सर्व मराठी ‘आडमुठ्या’ लोकांविषयी - केवळ माझ्यामुळे - त्याला अढी बसेल का) ?
की, सांगण्याची गरज नव्हती तरी तो विशेष आपणहून म्हणाला तसे.. ‘लोक मराठी मधे संवाद करण्याची मागणी करत आहेत’ असे खरेच तो वरिष्ठांना सांगेल ?

ह्म्म्म्म..

पण एकूण ‘इश्यू’ त्याच्या खरंच लक्षात आला असेल का ?


- राफा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आणी दक्षिण भारतीयांचं मला गणितच कळत नाहि.त्यांना हिंदिचा एवढा का तिटकारा आहे, ते लोकं बाकिच्यांशी ईंग्रजीत बोलतात.पण हिंदी नाहि.>>> भान, ह्या लिंकवर तुला अधिक माहिती मिळेल.

शिवाय माझ्या नवर्‍याने सांगितलेली कारणे, ज्यातली बरीच वर दिलेल्या लिंकमधेही सापडतील:
१. सगळ्यात आधी तमिळ भाषिकांचा विरोध उफाळून आला १९३७ मधे, जेंव्हा हिंदी शाळेत कम्पल्सरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी तमिळ पर्यायी भाषा म्हणून निवडता येणे शक्य होते. म्हणजे स्वतःची भाषा ऑप्शनला टाकून दुसरीच भाषा शिकण्याची सक्ती! त्यामुळे त्यांची भाषिक अस्मिता जागृत झाली.
२. हिंदी ही अतिशय नवीन भाषा आहे, त्या तुलनेने तमिळ भाषेची पाळंमुळं हजारो वर्षे जुनी आहेत. संस्कृत इतकीच, किंबहुना अधिकच... त्या भाषेत अतिशय उच्च दर्जाची साहित्यनिर्मिती झालेली आहे आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो, असे असतांना हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारणे त्यांच्या मुळीच पचनी पडत नाही. आणि हिंदीच का? दुसरी कुठलीही भारतीय भाषा का नाही? आणि हा प्रश्न हिंदी भाषिक नसणार्‍या आपल्या सगळ्यांना का पडत नाही? काही राजकारण्यांच्या सोयीसाठी त्यांनी आपल्या सगळ्यांवर ही भाषा लादली आणि आपण ती लादून घेतली, विरोध न करता. असे का? हा त्यांचा प्रश्न...( आपली मराठी सुद्धा हिंदीपेक्षा कितीतरी जुनी आणि अभिमानास्पद इतिहास असणारी भाषा आहे हे विसरून चालणार नाही. )
३. भारतातल्या बहुसंख्यांची भाषा हिंदी आहे, ही अर्ग्युमेंट पण चुकीचीच...ते खरे नाही.
४. हिंदी ही मराठी आणि हिंदीशी साम्य असणार्‍या भाषिकांसाठी शिकायला तुलनेने सोपी भाषा आहे, पण साऊथच्या लोकांसाठी हिंदी ही खास प्रयत्नपूर्वक शिकावी लागेल अशी भाषा आहे. दोन्ही भाषांमधे काडीचेही साम्य नाही.
५. त्यांना हिंदीचे एक्सपोजर आपल्यापेक्षा फारच कमी आहे. हिंदी फारशी कोणालाच समजत नाही तिकडे... न समजण्याचे ढोंग वगैरे नाही.आपण ज्या रामायण, महाभारत, जुनून वगैरे सिरियल्स मुळ हिंदीत पहायचो, त्या ते तमिळ डब्ड पहायचे.
६. त्यांची चित्रपटसृष्टी हिंदीला तोडीस तोड, इव्हन कधी कधी वरचढ आहे, त्यामुळे मनोरंजनासाठी ते हिंदीवर अवलंबून नाहीत. तिच गोष्ट संगीताची. त्यांच्याकडच्या सुमधूर संगीतामुळे त्यांच्याकडून हिंदी गाणी फारच कमी ऐकली जातात.
७. त्यांची लिपीसुद्धा पूर्णपणे वेगळी आहे.
८. सगळ्या भारतीयांसाठी एक भाषा निवडणे हा कोणा ना कोणावर अन्यायच....आणि इंग्लिश शिकले, तर जगात संधी मिळतील, तसेच भारतातही. तेंव्हा सर्व भारतीयांनी इंग्लिश शिकावे, तसेच हिंदी भाषिकांनीही... असे त्यांचे म्हणणे. हिंदी लोकांच्या सोयीसाठी आपण हिंदी शिकायचे, तसे आपल्या सोयीसाठी ते आपली भाषा शिकतील का? तेंव्हा तुझीही नको, माझीही नको, आपण वेगळीच भाषा शिकूया, जिच्यायोगे आपण सगळ्या जगाशी संवाद साधू शकतो, असा त्यांचा विचार!

माझ्या मते.........समोरचा कोणत्या हि भाषेत का बोलेना....आपण मराठी तुनच बोलावे.........

तो नाही सुधारत जाउ द्या.............आपन आपला बाणा सोडु नये.........

मी आज पूर्ण दिवसाचा अनुभव सान्गतो
मु.पो नाशिक
सकाळी ८ वा :पेपरवाला -संभाषण -मराठीतून
सकाळी ८ १०: दूध वाला:मराठी
स ८ ३० भाजी व फळवाला :मराठी संभाषण
सकाळी:१० वा: जर्मन बहुराष्ट्रीय कम्पनीत मीटींगः सर्व संवाद :मराठी:३/१० अमराठी
सकाळी ११ ३० वा :फ्रेंच कम्पनीत मीटिंगः २/४ सदस्य अमराठी:संभाषण मराठी
दुपारी २ वा जर्मन कंपनीत मीटिंगः जर्मन मुख्य अधिकार्‍याव्यतिरिक्त बहुतेक काम मराठीतून्(वेळोवेळी मतितार्थ त्याला इन्ग्रजीतून समजावण्यात येत होता-दाक्षिण्य म्हणून)
दु.३ ३० वा महाविद्यालयात परतः सर्व संभाषण मराठीतून
आणखी एक - ही समस्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी फारशी नाहीये(पुणे,मुंबई सोडून)
एक तर इथे सहज पणे हिंदी,इंग्रजी बोलणार्‍यांचा वर्ग कमी आहे व ते ही मराठी बोलण्याचा नेहमी प्रयत्न करतात ,एक अवडंबर न करता.
ही समस्या इथे का नाहिये? विचारवंत विश्लेषण करून लिहितील का?
धन्यवाद

आणि हिंदीच का? दुसरी कुठलीही भारतीय भाषा का नाही? आणि हा प्रश्न हिंदी भाषिक नसणार्‍या आपल्या सगळ्यांना का पडत नाही? काही राजकारण्यांच्या सोयीसाठी त्यांनी आपल्या सगळ्यांवर ही भाषा लादली आणि आपण ती लादून घेतली, विरोध न करता. असे का? हा त्यांचा प्रश्न...( आपली मराठी सुद्धा हिंदीपेक्षा कितीतरी जुनी आणि अभिमानास्पद इतिहास असणारी भाषा आहे हे विसरून चालणार नाही. )>>>>>>>>>>> दुसरी कोणतीहि भाषा असती तर त्यांनी स्विकारली असती? आणि विविध भाषा असलेल्या भारतात एक सामाईक भाषा हवीच,मग ती हिंदि का नको?

हिंदी ही मराठी आणि हिंदीशी साम्य असणार्‍या भाषिकांसाठी शिकायला तुलनेने सोपी भाषा आहे, पण साऊथच्या लोकांसाठी हिंदी ही खास प्रयत्नपूर्वक शिकावी लागेल अशी भाषा आहे. दोन्ही भाषांमधे काडीचेही साम्य नाही.>>>>>>>>> हे कारण तर त्यांना त्यांची भाषा सोडली तर प्रत्येक भाषेबाबत द्यावं लागेल. अगदी ईंग्रजीबाबत सुद्धा.

त्यांना हिंदीचे एक्सपोजर आपल्यापेक्षा फारच कमी आहे. हिंदी फारशी कोणालाच समजत नाही तिकडे... न समजण्याचे ढोंग वगैरे नाही.आपण ज्या रामायण, महाभारत, जुनून वगैरे सिरियल्स मुळ हिंदीत पहायचो, त्या ते तमिळ डब्ड पहायचे.>>>>>>> ह्याचं कारणही कदाचित हिंदीचा तिटकारा असेल.

आणि इंग्लिश शिकले, तर जगात संधी मिळतील, तसेच भारतातही. तेंव्हा सर्व भारतीयांनी इंग्लिश शिकावे, तसेच हिंदी भाषिकांनीही... असे त्यांचे म्हणणे.>>>>>>>>>> ईंग्रजीला विरोध बिलकुल नाहि,पण जेव्हा भारतात हिंदि किंवा ईंग्रजी बोलायची वेळ येते तेव्हा मलातरी हिंदि जवळची वाटते.:) आणि महाराष्ट्रात कधीहि मराठी.

बाकि,विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व.

सर्व प्रतिक्रियांचे पुन्हा एकदा आभार !

प्रत्येकाची आस्था, तळमळ, प्रयत्न (प्रसंगी व्यूहरचनाही Happy ) , सकारात्मक नोंदी, नकारात्मक गोष्टींचा मुकाबला करण्याची इच्छाशक्ती पाहून खूप आनंद वाटला.

'प्रथम मराठी व गरज पडली तरच दुसरी भाषा (अतिरेक न करता)' ह्यावर एकमत व्हावे. (हिंदी / इंग्लीश विषयी माझे मत ह्या आधीच्या प्रतिक्रियेमधे स्पष्टपणे नोंदवले आहे).

दुस-या भाषेबरोबर द्वेषपूर्ण लढाई पेक्षा आपल्या भाषेचे संरक्षण व संवर्धन अशी ही गोष्ट आहे. ती करत राहण्याचा (वैयक्तिक पातळीवर का होईना) आपल्या प्रतिक्रियांमुळे नवीन हुरूप आला.

पुन्हा हार्दिक धन्यवाद !!!

काही दिवसांपूर्वी केलेला एक शेर इथे देत आहे (लेखाशी व विषयाशी काही संबंध नाही. लेखात 'शेर ऐकवू का' वगैरे उल्लेख आहे तेव्हा गंमत म्हणून) :

बस यही था सुकूं, के सजा-ए-जिंदगी के दिन अब चंद है
सुनते है अब... के मौत को भी हम नही उतने पसंद है


- राफा

आता हा शेर तरी इथे हिंदीत का? कारण,
>>अनौपचारिक किंवा चपखल बसणा-या एखाद्या ‘ड्वायलॉक’ साठी ही हिंदी छान असते रे.<<
Wink

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही आवडले....
मला सौथ इंडिअन लोकांचा तिटकारा वगैरे नाही....मी SIES मध्ये शिकले...सौथ इंडिअन एजुकेशन सोसायटी ...शिक्षक बहुतौंशी सौथचे...विद्यार्थी मराठी, गुजराथी, सौथचे वगैरे...
त्यांना इंग्रजी चांगलेच येते पण हिंदी थोडे थोडे अन मराठी नाहीच...म्हणजे येत असले तरी येत नाही सांगणार...का? लाज वाटते का? त्यावेळेस इतक्या तीव्रतेने जाणवले नव्हते पण वाईट जरूर वाटले होते.

साधी गोष्ट आहे जर तुम्ही दक्षिणेत काम करत असाल तर सरळ हिंदी किंवा इंग्रजीत बोला...काय गरज त्यांची भाषा येते (येत असेल तर ) हे दाखवायची?

सीबीडी बेलापूर ला MGM हॉस्पिटलमध्ये दोनेक वर्षांपूर्वी मी गेले होते...तर ती डॉक्टर मी मराठी बोलले तरी इंग्रजीतच चालू...शेवटी मी इंग्रजीत तिला माझी समस्या सांगितली आणि नंतर त्यांच्या चीफ ला जाऊन भेटले आणि सांगितले, मेल सुद्धा लिहिली.....त्यांच्या चीफ्चे म्हणणे होते कि मी स्वतः शिकतोय आणि लोकांशी खुपदा मराठीत बोलतो पण दर ३ वर्षांनी बदली होते भारतात कुठेही...मग सगळ्याच भाषा कशा शिकणार? थोडे बोलणे झाले आणि मी तिथून निघाले.

सगळ्यांनीच जर त्या त्या वेळी आपला निषेध नोंदवला तर काही फरक पडेल. खास करून दाक्षिणात्य लोकांची मुजोरी फारच आहे आणि ते अजिबात पटत / आवडत नाही. आपल्या भाषेचा, संस्कृतीचा अभिमान आपण नाही बाळगला तर दुसरे तरी कशाला किंमत देतील? आणि

एक मुख्य गोष्ट हि कि आपण आपल्या मुलांना याचे महत्व आताच सांगितले पाहिजे...त्यांच्या मनावर आपल्या भाषेचा अभिमान (दुराभिमान नव्हे - दक्षिनात्यांसारखा) , संस्कृतीचे महत्व ठसवले पाहिजे...मी माझ्या लेकीशी मधून मधून बोलत असते...ती फक्त ५ वर्षाची आहे तरी...

या बाबतीत राजकारण्यांपेक्षा सामन्यांचाच जोर उपयोगी ठरेल.

दुसरी कोणतीहि भाषा असती तर त्यांनी स्विकारली असती? आणि विविध भाषा असलेल्या भारतात एक सामाईक भाषा हवीच,मग ती हिंदि का नको? >>> कुणी सांगावे? स्वीकारलीही असती जर सगळ्या लोकांचे मत विचारात घेऊन योग्य निर्णय घेतला असता तर... ह्या पानावरचे वाद वाच जरा.

हे कारण तर त्यांना त्यांची भाषा सोडली तर प्रत्येक भाषेबाबत द्यावं लागेल. अगदी ईंग्रजीबाबत सुद्धा.>>> हो! पण इंग्रजी स्वीकारण्यामागची भुमिका माझ्या पोस्टमधल्या शेवटच्या मुद्द्यात स्पष्ट केली आहेच ना!

ह्याचं कारणही कदाचित हिंदीचा तिटकारा असेल.>>> कदाचित नाही, तेच मुळ कारण आहे! १९३७ साली त्यांच्यावर हिंदी लादली गेली आणि ते हिंदीपासून इतके दूर गेले, की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ती भाषा अवगत नाहीये.

ईंग्रजीला विरोध बिलकुल नाहि,पण जेव्हा भारतात हिंदि किंवा ईंग्रजी बोलायची वेळ येते तेव्हा मलातरी हिंदि जवळची वाटते.स्मित आणि महाराष्ट्रात कधीहि मराठी.>>> ती तर मलाही वाटते आणि सगळ्या मराठी लोकांना वाटत असेल. त्याचं कारण आपण एकतर फार सहिष्णू धोरण स्वीकारतो. दुसरे म्हणजे आपली नुसती लिपीच एक नसून भाषेची रचनाही समांतर आहे. तिसरं म्हणजे, आपल्याला जवळची वाटणारी ही हिंदी भाषा आपण महाराष्ट्रात बोलतो, तेंव्हा आपल्याही नकळत कितीतरी मराठी शब्द मिसळून बोलतो. त्यामुळे आपल्याला योग्य शब्द आठवून बोलायचे फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. मायबोलीवर ह्या विषयावर एक धमाल धागा आहे. मराठी लोकांचे हिंदी.... नावाचा. तिच गोष्ट साऊथचे लोक करु शकत नाही. त्यांची भाषा पूर्णपणे वेगळी आहे.
शिवाय आपल्या दादासाहेब फाळकेंनी जरी चित्रपटसृष्टीची भारताला ओळख करुन दिली असली, तरी आपली मराठी चित्रपटसृष्टी पुढे जावी ह्या दृष्टीने मराठी माणसाने फारसे प्रयत्न केले नाहीत. उलट बॉलिवुडला आपल्या मुंबईत आरामात प्रस्थापित होऊ दिले. त्यांचे हिंदी सिनेमेच आपण पहात राहिलो आणि त्यांच्याच गाण्यांचे, डायलॉग्जचे, अभिनेत्यांचे गुणगान गात राहिलो. तेच अभिनेते आज मराठी कधीही बोलणार नाही असे ताठ मानेने सांगत असले, तरीही आपली अस्मिता जागृत होत नाही आणि त्यांच्यावरचे प्रेमही कमी होत नाही!

असो, राफा यांचे शेवटचे पोस्ट अतिशय भावले.

दुस-या भाषेबरोबर द्वेषपूर्ण लढाई पेक्षा आपल्या भाषेचे संरक्षण व संवर्धन अशी ही गोष्ट आहे.

जी पूर्णपणे मान्य... Happy

अतिशय सुंदर आणि आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा हा विषय आहे. काही गोष्टी मला इथे नमूद कराव्याशा वाटतायत ज्या सगळ्यांनाच माहित असाव्यात.

१) हिंदी हि राष्ट्रभाषा नाही.
२) कुणीही तुम्हाला हिंदी किंवा इतर भाषा बोलण्याची औपचारिक बळजबरी करू शकत नाही.

जे हिंदी भाषिक "हिंदी तो हमारी राष्ट्रभाषा है" हे मोठ्यामोठ्याने सांगतात ते काही खूप देशभक्त नसतात. तुमचं तोंड बंद करून, हिंदी तुमच्या गळ्यात उतरवायची हेच त्याचं ध्येय असत. हेच ते दक्षिण भारतात जावून बोलण्याची हिम्मतहि करत नाहीत, कारण आपण मराठीभाषीकच आपल्या भाषेवर ठाम नाही आहोत आणि ह्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत.

पण काही मराठी कवी होऊन गेले, त्यांच्या मराठी भाषेचे सौंदर्य, इ. चे कुणाला रसग्रहण करावेसे वाटत नाही.>>>

त्या पात्रतेचे कवी नाहीत मराठीत दुर्दैवाने!

===================================================

मराठीसाठी इनामदारांनी गायलेले अभिमान गीत का गायले जात नाही काही समजत नाही मला! प्रचंड आशा एकवटलेल्य होत्या त्या गीतावर अनेकांच्या!

===================================================

दोन्ही अवांतर प्रतिसाद दिल्यानंतरः

१. भाषा हे संवादाचे साधन आहे हे सगळ्यांना मान्य असेल बहुधा! 'मराठी' असून 'मराठी' का बोलत नाही या प्रश्नाचा विचार केल्यावर परप्रांतातील आलेल्या लोकांनी आपली भाषा अधिक्याने रुजवली असे एक कारण मला वाटते. ते टाळणे अशक्य वाटते व जरूरीचे आहे की नाही यावर एकमत नसणार असेही वाटते.

२. विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात घालणे हा चांगल उपाय आहे, पण तो होणे अवघड आहे.

३. लेखातील भावना प्रामाणिक आहेतच, लेख आवडलाच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

माझ्या निरिक्षणावर विचारवंत माबो करांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे!!!
का काहीच विचार करण्याजोगे नाही यात?
की विरोधाभास आहे म्हणून?????????????

हिंदी .. हिंदी .. हिंदी...
अरे कोण म्हणते आपण हिंदी वापरतो .. चुकीचा समज आहे ..
आपण उर्दू बोलतोय हिंदीच्या नावाखाली .. फक्त लिपी देवनागरी वापरतो !
तो राफा ने दिलेला शेर .. हिंदीत नाही उर्दूत आहे.
ह्या सगळ्या बॉलीवूडच्या गाण्यांमध्ये सुद्धा उर्दूच असते ..
हिंदी पहायची असेल तर एकदा कबीर वाचा .. एकदा एक तरी मुन्शी प्रेमचंद वाचा आणि मग सांगा ... आपण खरेच हिंदीत बोलतो का ते.

अरे ... जन्माने महाराष्ट्रीय लोकांना इथे मराठी येत नाही. ते आम्हाला ज्ञान देतात की आम्हीच मराठी सोडून हिंदीत बोलले पाहिजे.
सी सी डी सारख्या ठिकाणी आपण मराठी बोलत असू तर खरुज झालेल्या कुत्र्याकडे पाहावे तसे पाहतात.
ह्या असल्या स्वकियांशी बोलतांना परकीय भाषाच बरी ..
जर आम्हाला कमीच लेखणार असाल तर असले स्वकीय आम्हाला नकोत ... परकीयांचा भाषेत परकीय वागणूकच मिळेल.

राफा >> 'प्रथम मराठी व गरज पडली तरच दुसरी भाषा (अतिरेक न करता)' ह्यावर एकमत व्हावे...
दुस-या भाषेबरोबर द्वेषपूर्ण लढाई पेक्षा आपल्या भाषेचे संरक्षण व संवर्धन अशी ही गोष्ट आहे...>>
ह्या दोन्ही गोष्टी अतिशय पटल्या.. Happy

शिल्पा>>साधी गोष्ट आहे जर तुम्ही दक्षिणेत काम करत असाल तर सरळ हिंदी किंवा इंग्रजीत बोला...काय गरज त्यांची भाषा येते (येत असेल तर ) हे दाखवायची?>>
सानी म्हणल्या तसं त्यांच्यावर ज्यावेळी हिंदी लादली गेली तेव्हा खरंच ते स्वत: त्या भाषेपासुन इतके दूर गेले की त्यांच्या आत्ता-आत्तापर्यंतच्या पिढी मधले अनेक जण हिंदी बाबतीत एवढे प्रयत्नशील नाहियेत.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला कन्नड आमच्या काम करायला येणार्‍या बाईसाठी किंवा इतर अश्या अनेक कारणांसाठी शिकायला सुरू करावी लागली..! Happy
पण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा अभिमान आपण नाही बाळगला तर दुसरे तरी कशाला किंमत देतील?>>हे प्रचंड खरं आहे.. आणि काळाची गरज पण!

सानी तुमच्या प्रतिक्रिया तंतोतंत पटल्या..!

रेव्यु>>नाशिक मधली वागण्याची पद्धत आवडली.. वर शिल्पा यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने प्रयत्न केले तर हे अशक्य नाही.. Happy

रेव्यु, तुम्ही लक्षात आणून दिलेली वस्तुस्थिती अगदी खरी आहे. आपल्या नाशिकमधे रहाणारे सर्वभाषिक लोक आपल्याशी मराठीतूनच बोलतात. मी कधी कोणाशी हिंदीतून बोलल्याचे मला आठवत नाही आणि कोणीही अमराठी माझ्याशी हिंदीतून बोलल्याचे आठवत नाही. त्यांची मराठी भलेही तोडकी मोडकी असो! ते मराठीतूनच बोलतात! ही सुखावह गोष्ट आहे. तुम्ही अमराठी आणि परदेशी लोकांसोबत काम करतांनाही कायम आणि जाणीवपूर्वक मराठी बोलत आहात, ही देखिल स्वागतार्ह आणि कौतुकास्पद बाब आहे. अशीच भुमिका सर्वांनी घेतली, तर परिस्थिती लवकर बदलेल... Happy

मुग्धा, माझ्या मतांशी तुमची सहमती आणि त्या अनुषंगाने तुम्ही दिलेले तुमच्या अनुभवांचे दाखले पाहून खुप बरे वाटले... आवर्जून लिहिल्याबद्दल धन्स Happy

निळूभाऊ, तुमच्या मुद्द्याला जोरदार अनुमोदन!
<<<अरे कोण म्हणते आपण हिंदी वापरतो .. चुकीचा समज आहे ..
आपण उर्दू बोलतोय हिंदीच्या नावाखाली .. फक्त लिपी देवनागरी वापरतो !
>>>
मला इथे हिंदू मुसलमान वाद उकरायची इच्छा नाही, पण ह्या मुद्द्यावर बोलायचे, तर ते अपरिहार्य आहे! मला इकडे एक बंगलोरहून आलेले मुस्लिम जोडपे भेटले होते. मी त्यांना विचारले, तुम्ही तिकडे बंगलोरला असतांना हिंदी बोलता की कन्नड? तर ते म्हणाले आम्ही उर्दू बोलतो! मी अंतर्मुख झाले! अरे! हे असे जोर देऊन सांगायची काय गरज? ह्या दोन भाषांमधे एक लिपी सोडली तर काय फरक आहे? कोणीतरी ह्याच धाग्यावर की दुसरीकडे लिहिलेय, त्याप्रमाणे फार तर फार शुद्ध हिंदी म्हणजे संस्कृतमिश्रित नाहीतर ती उर्दूच की! पण त्या जोडप्याने आम्ही उर्दू बोलतो हे सांगतांना त्यांना काय अभिप्रेत होते, हे सुज्ञास सांगणे न लगे! कोणीही कितीही नाही म्हणाले, तरी ह्या भाषेचा उगम कुठे आहे, सगळे जाणतातच. माहिती नसणार्‍यांनी गुगलून पहावे.

आपणही नीट विचार केला, तर आपल्या सर्वांना इतकी अस्खलित (?) हिंदी (?) कशी काय येते, ह्याचे वर्षानुवर्षे आपल्यावर मुघलांनी केलेले राज्य, हेच उत्तर मिळेल... नंतर ब्रिटिशांनी भारतात व्यवहारासाठी हिंदी त्यांच्या सोयीसाठी निवडली आणि कॉग्रेसच्या राजवटीत ती आपल्यावर लादली गेली. आपल्याला मुळातच ती येत असल्याने ती शिकण्यात आपण विरोध दाखवला नाही आणि ती आपली राष्ट्रभाषा आहे असा सोयीस्कर प्रचार सुरु झाला, त्यावरही काहीच हरकत दाखवली नाही. हिंदी भाषिक आपल्या प्रांतात येऊन खुशाल आपल्याशी हिंदीत बोलले, तरी ही आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे त्यात गैर काय? असे समजून आपण त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलत राहिलो आणि प्रादेशिक भाषा शिकण्याची त्यांच्यावर कधीच सक्तीही केली नाही आणि तशी इच्छाही दर्शवली नाही.

असो, हा खुपच खोलात घेऊन जाणारा विषय आहे. तेंव्हा तुर्तास इथे थांबते.

आपण महाराष्ट्रीय लोक अतिशय हुष्षार. कुठलीहि भाषा घ्या, आम्ही ती उत्तम रीतीने बोलू शकतो. आणि हे इतरांना कळावे म्हणून आपण मुद्दाम इतर भाषेत बोलतो.
पण इतर राज्यातले लोक जाम मूर्ख हो! ते कसले शिकताहेत मराठी. शिवाय शहाणपणा दाखवण्या ऐवजी पैसे मिळवणे असले साधे उद्देश असतात त्यांचे.
आता आपण इतक्या सगळ्या भाषा बोलतो, इतका शहाणपणा दाखवतो तरी पैसे मिळवणे असल्या बाबतीत आपण जरा मागेच. पण आपल्याला नेमके त्याच वेळी मराठी आठवते - सोने चांदी आम्हा मृत्तिकेसमान!

पडलो तरी नाक वर!

त्यातून आजकाल एक तर कुणि मराठी शिकत नाहीत, वाचत नाहीत. कसे यावे मराठी त्यांच्या मनात? हिंदी, इंग्रजीच येणार.

तर जाउ दे. पूर्वी प्राकृत म्हणून एक भाषा होती, ती आता नाहीये. का? कुणि टिकवलीच नाही. तसेच मराठीचे. संस्कृत कसे फक्त काही लोकच शिकतात (निदान यूरोप, अमेरिकेत तरी) तसे मराठी पण कुठेतरी परदेशात शिकतील. मग एखाद्या गोर्‍या माणसाने सांगितले की मराठी भाषा सुंदर आहे, की मग महाराष्ट्रीय लोक ते इंग्रजी quote इथे देऊन म्हणतील, पहा आमचा उज्ज्वल इतिहास!

वर्तमानकाळाशी आपल्याला काही देणे घेणे नाही. आपले सगळे इतिहासात लक्ष, हजार वर्षांपूर्वी आपण कसे श्रेष्ठ होतो, चारशे वर्षांपूर्वी कसे शूर वीर लोक आमच्यात होते, वगैरे.

तर मराठी प्रेमी लोकांनो, आज नाही तरी चारशे वर्षांनी लोकांना आपल्या भाषेचे सौंदर्य, समृद्धि नक्की जाणवेल.

माझ्या निरिक्षणावर विचारवंत माबो करांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे!!!
का काहीच विचार करण्याजोगे नाही यात?
>>
रेव्यु, मी पूर्वी नाशिकमध्ये सहा महिने होतो (बॉश). त्यावरून माझे मत सांगतो.
नाशिक हे जरी इंडस्ट्रिअल शहर असले तरी तिथली इंडस्ट्री ही उत्पादन (मॅन्युफॅक्चरींग) इंडस्ट्री आहे. सहसा अशा इंडस्ट्रीमध्ये बहुतांश कामगार लोकांचा भरणा असतो. त्यामुळे जवळजवळ ९५% लोक स्थानिकच असतात. त्यामुळे मॅनेजर लोकही तिथलेच जास्त असतात. थोडेफार मॅनेजर लोक अमराठी असतील. तेही कमी. पण कामगार लोक मराठी असल्यामुळे त्यांनाही मराठी शिकावे लागते. तसेच कंपनी आंतराष्ट्रीय असली तरी बहुतांश लोकांचा कोणत्याही कारणास्तव अभारतीय लोकांशी संबंध येत नाही. त्यामुळे इंग्रजीचाही विशेष प्रश्न येत नाही. त्यामुळे मराठीचे अडत नाही कुठे.

याऊलट पुण्या मुंबईत सॉफ्ट्वेअर, डिझाईन, टेलीकॉम अशी इंडस्ट्री मोठी आहे. त्यामुळे उत्तम शिकलेले अमराठी लोक भरपूर इथे येतात, आणि मराठी लोक इतरत्र (बॅन्गलोर) जातात. या कंपन्या सहसा लोकांना कुठेही प्लेस करतात. भाषा किंवा राज्याचा प्रेफरन्स विचारात घेत नाहीत बहुतेक. तसेच बर्‍याच लोकांचा कामाच्या निमित्ताने अभारतीय लोकांशी संबंध येतो. या सगळ्यामुळे मराठीचे वांदे झाले आहेत.

दुस-या भाषेबरोबर द्वेषपूर्ण लढाई पेक्षा आपल्या भाषेचे संरक्षण व संवर्धन अशी ही गोष्ट आहे.
अनुमोदन. फक्त कसे?
फचिन यांनी वर लिहीलेले तर खरेच आहे.

कुण्या एका मराठी प्रेमी माणसाने 'मायबोली' काढली, की दूर दूर पसरलेल्या मराठी लोकांनी एकमेकांशी संपर्क साधावा, इतरांनी देवनागरी लिहिणे सोपे व्हावे म्हणून उत्तम काम केले, त्या दृष्टीने मायबोलीचे यश अनन्यसाधारण आहे. पण या मायबोलीचा उपयोग मराठीतील लेखन, कविता यांच्यावर चर्चा करण्या ऐवजी इथेहि लोक भराभरा इंग्रजी, हिंदी, उर्दू अश्या भाषांचा पाठपुरावा करतात. कविता, लेख मराठीत असला तरी शीर्षक हिंदी इंग्रजी, कारण त्याशिवाय लोकांचे लक्ष वेधून घेता येत नाही.
काही जाणते लोक म्हणतात - त्या पात्रतेचे कवी नाहीत मराठीत दुर्दैवाने!

तेंव्हा आता मायबोलीवरहि मायबोलीला काही मदत मिळणार नाही. तर आता मायबोलीच बदला -
उर्दुंन्ग्लिराठी. हीच आता सर्वांची मायबोली. मराठी हे नाव जुने झाले.

राफा, विचार करायला लावणारा लेख.
मला मुंबई विमानतळावर आलेला अनुभव...
इंग्रजीतल्या संक्षिप्त पण तिरसट अन तुसड्या प्रश्नाला विनम्रपणे उत्तर दिल्यास (एकतर चटकन चक्रमपणा करायला जमत नाही आणि आपला पासपोर्ट, सामानाची सुटका अन परिणामी ह्या व्यूहातून सुटका... शेंडीच "त्या"च्या हातात असल्याने) पुढले प्रश्नं अधिकच अधिकारवाणीने अन अनावश्यक "जागा दाखवणार्‍या" सुरात यायला लागतात.

मधेच अधिकारवाणीने अन किंचित तुसड्या स्वरात ... अन ते सुद्धा इंग्रजी सोडून मराठीत... बोलल्यास फार्फार चटकन सुटका होते. असा दोनदा अनुभव आहे. आता मी आधीच विचारते मराठी येतं का? येत नसल्यास 'नाही? का नाही?' वगैरे वगैरे. (पण ह्याचा उलटा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
असो... पौर्णिमाचं खरय... दोन मराठी एकमेकांना भेटल्यावर मराठीत बोलताना फार कमी ऐकलेत.

शैलजा,

ती चर्चा आपण स्वतंत धाग्यावर करू शकूच! येथे आधी कुणीतरी म्हणाले की 'नॉन मराठी कवींचेच रसग्रहण का' याबाबत तो प्रतिसाद दिला. असो!

-'बेफिकीर'!

एक कटु सत्य.
मराठीची व्यवहारिक उपयोगिता सिद्ध झाल्याशिवाय हे शक्य नाही.
म्हणुन हिंदि व इंग्रजीला व्यवहारातुन घालविणे क्रमप्राप्त आहे.
अन्यथा या दोन भाषांच्या अस्तित्वात नेहमीच मराठीची गळचेप होत राहणार.
कारण त्या दोन भाषांची व्यवहारिक उपयोगीता सिद्ध झाली आहे.
मराठी आजही व्यवहारात बच्चा आहे.

महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदी सक्तीने शिकवण्यात येते. त्यामुळे बहुतेक महाराष्टीयनांना हिंदी समजते व बोलता येते. याचा गैरफायदा घेऊन हिंदीभाषिक मराठी शिकत नाहीत कारण महाराष्ट्रीयन त्यांच्याशी हिंदीत व्यवहार करतात. त्यामुळे त्यांना मराठी शिकण्याची अजिबात गरज पडत नाही.

हिंदीचे वर्चस्व कमी करण्यासाठी शालेय शिक्षणात फक्त मराठी व इंग्लिश ह्या दोनच भाषा अनिवार्य असाव्यात. हिंदीचे स्थान इतर प्रादेशिक भाषांप्रमाणे (कन्नड, तामिळ, गुजराती इ.) ऐच्छिक असावे. ज्यांना हिंदी शिकाविशी वाटते त्यांनी शिकावी, पण ज्यांना शिकायची नाही त्यांच्यावर सक्ती नको.

दक्षिणेकडील राज्यांनी हाच उपाय वापरून त्यांच्या राज्यात हिंदीला (आणि पर्यायाने हिंदीभाषिकांना) डोईजड होऊन दिलेले नाही.

बेफिकीर, तरीही तुमचं खरंच असं मत असेल तर ते चुकीचंच आहे>>>

शैलजा,

आपलेही मत सापेक्षच आहे. इतरत्र बोलूयात किंवा तसा धागा निर्माण करूयात!

अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीर!

-'बेफिकीर'!

Pages