काही एक दिवसांपूर्वीची एक सुसकाळ.
माझा मोबाईल वाजला.
“हॅलो. मै फलाना कंपनी से बात कर रही हू. क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”
“बोला”
“सर, आपके इंटरनेट कनेक्शन का इस महिने का बिल रेडी है. क्या आज शाम को चेक कलेक्ट करने के लिए किसीको भेज सकती हू ?”
नेहमीप्रमाणेच लगेच उत्तर देण्याआधी एकदम डोक्यात लखलखाट झाला.
(कदाचित ही इसमी ‘बिलींग सायकल’ १५ तारखेची असतानाही ३-४ तारखेला फोन करते म्हणून ठराविक मासिक वैताग आला असावा.
किंवा
दर ५-६ दिवसांनी इंटरनेट बंद होणे व तक्रार केल्यावर ठराविक उत्तर मिळणे मग ते ७-८ तासात कधीतरी चालू होणे.. पुन्हा ५-६ दिवसांनी तेच वगैरे काही महीने होत असलेल्या गोष्टींचा साठलेला वैतागही असेल.)
“तुम्ही माझ्याशी हिंदीत का बोलताय ?”
“…”
(अग बोल बाई !)
“मी मराठी किंवा इंग्लिश मधे बोलू इच्छितो. हा माझा प्रेफरन्स तुमच्या रेकॉर्डला ठेवा हवं तर. ”
“ओके सर. आज संध्याकाळी पाठवू का ? ”
“आज आम्ही नाही आहोत संध्याकाळी कुणी घरी. उद्या पाठवा. प्लीज फोन करायला सांगा म्हणजे खेप पडणार नाही. ”
तिचे आभार ऐकून फोन ठेवतानाच माझ्या डोक्यात पक्की खात्री झाली ही इसमी उद्या फोन करेल तेव्हा हमखास हिंदीत बोलणार. रोज पाचशे फोन होत असणार हिचे. मी फोन केला तर ऑटोमेटेड मेसेज ने मी भाषा निवडू शकतो. तिने फोन केला तर ती हमखास तशीच बोलणार हिंदीमधे.
आणि वही हुआ जिसका डर था !
दुस-या दिवशी सकाळी तिचा परत फोन.
“… क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”
मनाची तयारी असूनही माझी काहीशी सटकली. आता नडायची वेळ आली !
“मी कालच तुम्हाला सांगितलं की तुमच्या कंपनीमधून फोन आला तर कृपया माझ्याशी मराठीमधे बोला. अशी काही लक्षात ठेवायची सोय नाही हे तुम्ही मला काल सांगितलं नाहीत. आज तुम्ही परत हिंदीमधे बोलत आहात. का बरं ? ”
“…”
“हॅलो.. ”
“हॅलो सर.. मी संध्याकाळी पाठवू का कोणाला चेकसाठी ? ”
(माझ्या डोक्यात स्वगत चालू : जाऊ देत आता. स्वत:ला शांतताप्रेमी म्हणवतोस. उगाच भांडण तंटा अजिबात आवडत नाही म्हणतोस. मग ह्या बिचारीला कशाला नडायचे ? पण ते काही नाही. जाऊ दे म्हणूनच मग हे सगळं होतं)
कंपनी विरुद्ध साठलेल्या वैतागाची बेरीज जास्त भरली !
“हो पाठवाच आज कुणाला तरी. पण तुम्ही मला उत्तर दिले नाहीत.”
“…”
“तुम्हाला अशा काही इंस्ट्रक्शन आहेत का हिंदीत सुरुवात करायची म्हणून ? ”
“…”
“हॅलो.. ”
“हॅलो सर.. ”
“आर यू अ महाराष्ट्रीयन ? तुमचे कॉल सेंटर पुण्यातच आहे ना ?”
“हो सर. ”
“मला एक सांगा. पुण्यात दोन मराठी माणसांनी एकमेकांशी हिंदीत का बोलायचे ? इन्फ़ॅक्ट, जगाच्या पाठीवर कुठेही..”
“…”
“मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचे आहे. ”
“…”
“हॅलो ? ”
“.. ओके सर. सिनियर मॅनेजरशी बोला. ”
अर्धा मिनिट खूडबूड.
“हॅलो. धिस इज अमुक तमुक. व्हॉटस द इश्यू सर ? ”
(आडनाव नीट ऐकू आले नाही पण बहुतांशी अमराठीच वाटतयं. यूपी कडचे. बहुतेक.)
“ऍक्चुअली नथिंग अगेंस्ट युअर रिप्रेझेंटेटिव. शी वॉज पोलाईट …”
त्याला थोडक्यात घटनाक्रम व ‘इश्यू’ सांगितला.
“या सर.. नो प्रॉब्लेम. आय विल टेल हर’ (आवाज घाईत असलेला. कदाचित हा त्याच्यासाठी ‘नॉन इश्यू’)
(अगदीच ‘कर्टली’ बोलायची गरज नाही म्हणून बोलावे)
“सी, इट्स नॉट दॅट आय डिसलाईक हिंदी.. ”
“येस सर. बट हिंदी इज अवर नॅशनल लॅंगवेज सर नो? ”
(देवा ! आता ह्याच्याशी ह्या विषयावर वाद घालायचा ! मला मराठीमधे ऐकायला बोलायला आवडेल ह्या सरळ अपेक्षेमधे चुकीचे काय आहे ? )
< सगळे विचार गिळून... थोडक्यात समारोप करण्यासाठी >
“सी…यू शूड स्टार्ट इन रिजनल लॅंग्वेज. ९०% ऑफ द पिपल आर कंफर्टेबल स्पिकिंग इन मराठी.. सो.. ”
“ओके सर बट वुई आर ऑल इंडीयन्स”
(दे ! मलाच डोस दे ! तू आणि मी कुठेही भारतात जाऊ शकतो, राहू शकतो ते इंडीयन आहोत म्हणूनच ना ? राष्ट्रगीताला उभे राहताना तुझ्या ह्रदयात होते तेच माझ्याही होते. नाही का? पण राष्ट्रप्रेमाशी ह्याचा काय संबंध ?
हिंदी ? हिंदीत मीच केलेला एखादा शेर ऐकवू का लेका ? कारण मराठीत केलेले काव्य तुला कळणार नाही. अनौपचारिक किंवा चपखल बसणा-या एखाद्या ‘ड्वायलॉक’ साठी ही हिंदी छान असते रे.
अर्थात काही गोष्टी खरचं डोक्यात जातात बघ. ‘लोकमान्य तिलक’ काय, ‘अंग्लैद’ काय ?.. अरे विशेष नाम तसेच नको का उच्चारायला ? उद्या मी ‘तिवारी’ ला ‘उधारी’ म्हटले तर चालेल का ?
आणि माझे अमराठी मित्र किंवा परिचयाचे लोक नाहीत काय ? मी पंजाबमधे बराच काळ - महिने किंवा वर्षे - जाणार असेन तर जुजबी का होईना पंजाबी भाषा अवगत करणे हे न्याय्य, व्यवहार्य व तर्कशुद्ध नाही का ? वीस वीस वर्षे महाराष्ट्रात राहून कामापुरती, जुजबी व्यवहरापुरती मराठीही शिकावी असे वाटत नसेल, शिकायची जरुरी भासत नसेल तर मराठी लोकांना आडमुठे संकुचित म्हणण्याचा अधिकार कुणी दिला यू. पी. वाल्यांना ? तेव्हा उत्तरेतली सो कॉल्ड ‘वॉर्म्थ’ कुठे जाते वागण्यातली ? त्या त्या प्रदेशाच्या भाषेला काडीचीही किंमत न देणे म्हणजे स्वभावातील मार्दव आणि सहिष्णुता? महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी हा कुठला न्याय ? गरज असताना/नसताना मला तेलगू, कन्नड, फ्रेंच, पंजाबी ढंगाची हिंदी, उर्दू, गुजराती,काश्मिरी वगैरे भाषांमधली २-४ (किंवा जास्त) वाक्ये तरी शिकाविशी वाटली ना ? हे महत्वाचे नाहीच का ?
बरं हे सगळे जाऊ देत. हा 'बिजिनेस कॉल' आहे ना? मग भूगोलातच बोलायचे तर मग देश कशाला ? आज जागतिक भाषा कुठली, आर्थिक किंवा अन्य औपचारिक व्यवहारांची ? इंग्लिश ना ? तुझ्या कंपनीचा ऑटोमेटेड मेसेज इंग्लिशमधेच सुरु होतो ना ? मग करा ना फोन इंग्लिशमधे ! थेट विशाल दृष्टीकोनच घेऊया ना.. आपण ग्लोबल सिटिझन्स नाही का ?
हेही समजून घेण्याची इच्छा नसेल तर जाऊ देत. मी कस्टमर आहे. मला मराठीतच बोलायचे आहे. तू करु शकत असशील तर सांग नाहीतर मी दुसरी कंपनी बघतो ! पूर्णविराम.)
“यू आर ऎब्सुल्यूटली राईट. वुई आर इंडियन्स. बट सी..”
पण मी पुढे काही बोलायच्या आतच तो म्हणाला
“ओके ओके. नो प्रॉब्लेम सर. आय विल नोट युअर प्रेफरन्स. आय विल ऑल्सो टॉक टू दि टॉप मॅनेजमेंट अबाऊट धिस.”
(डोंबल तुझे. पुढच्या महिन्यात मला हिंदीतच फोन येतो का नाही बघ. पण ठीक आहे. आपणहून म्हणतोय सांगेन वरिष्ठ अधिका-यांना सांगेन म्हणून, तर बास आता)
“ओके. थॅंक्स. ”
“थॅंक यू सर. ”
फोन खाली ठेवला.
कुठल्याही कारणाने, मनातले सगळे विचार जेव्हाच्या तेव्हा भरभर बोलले गेले नाहीत की आपण स्वत:वरच वैतागतो तसा वैतागलो !
तोच मला सोयीस्कर रित्या आडमुठा (किंवा ‘हुकलेला’) समजला असेल का ? तो त्या मुलीवर ती मराठी आहे म्हणून आता डूक धरेल का (किंबहुना सर्व मराठी ‘आडमुठ्या’ लोकांविषयी - केवळ माझ्यामुळे - त्याला अढी बसेल का) ?
की, सांगण्याची गरज नव्हती तरी तो विशेष आपणहून म्हणाला तसे.. ‘लोक मराठी मधे संवाद करण्याची मागणी करत आहेत’ असे खरेच तो वरिष्ठांना सांगेल ?
ह्म्म्म्म..
पण एकूण ‘इश्यू’ त्याच्या खरंच लक्षात आला असेल का ?
- राफा
मराठीची व्यवहारिक उपयोगिता
मराठीची व्यवहारिक उपयोगिता सिद्ध झाल्याशिवाय हे शक्य नाही.
खरे आहे.
म्हणुन हिंदि व इंग्रजीला व्यवहारातुन घालविणे क्रमप्राप्त आहे.
हे कसे होणार?
मराठी आजही व्यवहारात बच्चा आहे.
नि जोपर्यंत हे खरे असेल तोपर्यंत कितीहि हुषार, कर्तुत्ववान मराठी लोक असले तरी ते पैशासाठी इतर भाषांचीच कास धरणार. पैसे लागतातच ना? सगळेच थोडे तुकाराम? मग जरा स्वाभिमान बाजूला ठेवा! की काम झाले. आपला इतिहासच बघा ना. पैशासाठी खुशाल मुसलमानांची नोकरी पत्करून आपल्याच लोकांशी लढले. हुष्षार!
तामीळबद्दलः
त्यांची चित्रपटसृष्टी हिंदीला तोडीस तोड, इव्हन कधी कधी वरचढ आहे, त्यामुळे मनोरंजनासाठी ते हिंदीवर अवलंबून नाहीत. तिच गोष्ट संगीताची.
आणि असे त्यांनीच जगाला सांगितले नि त्यांच्या लोकांना ते पटले.
मराठी बाबत मात्रः
पण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा अभिमान आपण नाही बाळगला तर दुसरे तरी कशाला किंमत देतील
हेच खरे.
मराठी चित्रपट कमी दर्जाचे, मराठी साहित्य कमी दर्जाचे असे मराठी लोकांनीच ठरवले. नि एरवी चारशे वर्षापूर्वीचा इतिहास उकरून काढणार्या लोकांना गेल्या शंभर वर्षातल्या मराठी साहित्याचा शोध लागत नाही. ते वाचायचे कष्ट घेववत नाहीत. समजून घेण्याचे तर त्याहून नाही. पण दादोजींबद्दल नक्की माहिती!
मराठी लोक स्वतःच स्वतःला मारायला निघाले आहेत, तर लोक काय करणार?
राफा लेख अफलातूनच! आणि शिर्षक
राफा लेख अफलातूनच! आणि शिर्षक तर .... !!!
आपण मराठीतच बोलायचं काहीही झालं तरी. समोरचा मराठी असेल तर नक्कीच. आपोआप बोलतात समोरचेही मराठीत. >> अगदी अगदी पौर्णिमा!
दोन अपरिचित मराठींना अत्यंत उत्साहाने मराठीतच बोलताना मी अजूनतरी पाहिलेले नाही!>> मुंबईतलया असाल तर ९.०७ ची लेडीज स्पेशल पकडा नक्की बघाल!!
मी आमच्या ऑफीसजवळच्या नारळपाणीवाल्याला मराठी शिकवतेय... बरेचशे शब्द मराठीतून बोलतो माझ्याशी जसे जाड खोबरा वगैरे आता पाणीवाल्या नारळाला शहाळं म्हणतात हे शिकवतेय चार दिवस... ग्रास्पींग खूपच कमी आहे बै.. रोज सांगावं लागतं!
माझी मैत्रीण आणि मी ट्रेनमध्येही आवर्जून मराठीच बोलतो, आणि एखादीला नाहीच समजलं तर अगदीच वाईट्ट चेहरा करायचा की मराठी समजत नाही??
मैत्रीण रिचार्ज मागायला गेलेली, ट्र्म्पच १०० चं रिचार्ज द्या असं निम्मे शब्द इंग्रजीत सांगूनही तिथला सावळासा मुलगा "अॅ हिंदी मे बोलो हिंदी में" असं करंगळीने कान खाजवत ओरडला. तर ही बया "एवढं पण मराठी कळत नाही तर इथे कशाला झक मारायला येता? भोXXX जा.." म्हणून ऐकवून आली... मालक ओरडत होता... रूको मॅडम, रूको म्हणून! बापरे ती भयानक आहे !!
राफा आणि सर्व माबोकरांनी खुपच
राफा आणि सर्व माबोकरांनी खुपच साधक बाधक विचार नोंदवले आहेत, आनंद आहे!
भाषा या विषयाबाबत स्वानुभवातून आलेल्या काही गोष्टी आहेत, त्या इथे शेअर करतो आहे-
* मी मराठी कुटूंबात, महाराष्ट्रात जन्माला आलो, महाराष्ट्रात शिकलो, वाढलो म्हणून - मी मराठी भाषिक आहे, मी बोलतांना शक्यतो मराठीचा वापर करतो आणि तो करताना मला मूळीच संकोच, न्यूनगंड, बुजरेपणा वाटत नाही, मला महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा अभिमान आहे ! मराठी साहित्य, नियतकालिके, गीते, नाटके, चित्रपट, दूरदर्शन वरील मालिका, कार्यक्रम इ.इ. चा मी नियमित आस्वाद घेत असतो, त्यातुन मला फार फार आनंद मिळतो.
*महाराष्ट्र हा भारत देशाचा 'अविभाज्य' घटक आहे, मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, या देशाची संवैधानिक 'प्रथम' भाषा (राजभाषा) 'हिन्दी' आहे. हिन्दी भाषेचा सुद्धा मला अभिमान आहे, हिन्दी साहित्य, नियतकालिके, गीते, नाटके, चित्रपट, दूरदर्शन वरील मालिका, कार्यक्रम इ.इ. चा मी नियमित आस्वाद घेत असतो, त्यातुन मला फार फार आनंद मिळतो.
*मला हिन्दी चांगली अवगत आहे, इतर राज्यांत, रेल्वेच्या प्रवासात, हॉटेलमध्ये, केन्द्र सरकारी कार्यालयांमध्ये बरेचदा आपल्याला गरजेनुसार हिंदी भाषेचा वापर करावा लागतो आणि तो करताना मला मूळीच संकोच, न्यूनगंड, बुजरेपणा वाटत नाही.
*भारत हा या जगाचा 'अविभाज्य' घटक आहे, मी मानव असल्याचा मला अभिमान आहे, या जगात सर्वाधिक प्रचलीत असलेली भाषा 'इंग्लिश' आहे. मला ती ही चांगली अवगत आहे इतर राज्यांत, रेल्वेच्या प्रवासात, हॉटेलमध्ये, खाजगी कम्पन्यांच्या कार्यालयांमध्ये बरेचदा आपल्याला गरजेनुसार 'इंग्लिश' भाषेचा वापर करावा लागतो आणि तो करताना मला मूळीच संकोच, न्यूनगंड, बुजरेपणा वाटत नाही. 'इंग्लिश' साहित्य, नियतकालिके, गीते, नाटके, चित्रपट, दूरदर्शन वरील मालिका, कार्यक्रम इ.इ. चा मी नियमित आस्वाद घेत असतो, त्यातुन मला फार फार आनंद मिळतो.
मी केन्द्र सरकारी नौकरीत असल्याने, माझ्या वरिष्ठांशी हिन्दीत (जे बरेचसे अमराठी आहेत), सहकार्यांशी हिन्दी-मराठीत ( जे ५० - ५० % आहेत) संभाषण करत असतो, मात्र, सारे पत्रव्यवहार आदि फक्त 'इंग्लिश' मधेच होत असतात! भाषा या विषयावरून आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीही प्रॉब्लेम निर्माण झालेला नाही. माझी मुले, मराठी, हिन्दी, 'इंग्लिश यांबरोबरच अहिराणी बोली सुद्धा वापरतात !
हो, आणि एक मुख्य गोष्ट अशी, की, ICICI Bank, AirTel, Vodaphone, वेग-वेगळी Credit Cards यांच्या कॉल सेंटर चे सगळे कॉल आम्हाला मराठीतच येतात,त्यांची मराठीत संभाषण करायला कधीच, काहीच हरकत नसते! काही रिक्षावाले, भाजीवाले, पानवाले, इस्तरीवाले अमराठी आहेत, ते शक्यतो मोडकी-तोडकी मराठी, कामापुरती तरी बोलतातच (चक्क!).
ज्या भाषेत सहज शक्य आहे, त्या भाषेत बोलायचे आणि काम भागवायचे, असा मामला आहे सगळा!
मला खात्री आहे, की महाराष्ट्राचा काही अति-शहरी भाग सोडल्यास, इतरत्र सर्वांना हाच अनुभव येत असणार...!
असो ! वसुधैव कुटुंबकम् !
दोन मराठी माणसांनी एकमेकांशी
दोन मराठी माणसांनी एकमेकांशी हिंदीत का बोलायचे ?>>>> अगदी अगदी पटलं...पौर्णीमाला अनुमोदन!
मस्त लेख!
मेट्रो सिटी कुठलीही असली तरी
मेट्रो सिटी कुठलीही असली तरी तिथे पर राज्यीय लोक असण्याचे प्रमाण एकूणच जास्त आहे.. त्यामुळे कॉल सेंटरवाले हिंदीच वापरतात. पण नंतर आपण भाषा बदलली की तेही बदलतात.
लहान गावात सगळे मातृभाशाच बोलतात.. महानगरात गेले की ५ लोकाना भेटलो की १ दुसर्या राज्यातला.. त्यामुळे हिंदी आपोआपच तोंडात येते. खेड्यात हा प्रश्न येत नाही.. समोरचा मराठी बोलणाराच आहे हे मला माहीत असते.. पण कॉल सेंटरवाल्या बाईला कसे कळणार की समोरची व्यक्ती मराठी बोलणारीच आहे ते..
अप्रतिम राफा! कित्येकांची
अप्रतिम राफा!
कित्येकांची कळकळ शब्दांत मांडली आहे... फार आवडला लेख!
आणि `इश्यू' समजला असेल की नाही कोणी सांगावं? स्वतःच्या भाषेविषयी प्रेम, अभिमान असेल तरच दुस-याच्या लेखी त्यांच्या मातृभाषेचं महत्त्व काय हे कळू शकतं माणसाला... इथे मुळात त्याचीच वानवा असेल तर काय करणार?
Pages