काही एक दिवसांपूर्वीची एक सुसकाळ.
माझा मोबाईल वाजला.
“हॅलो. मै फलाना कंपनी से बात कर रही हू. क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”
“बोला”
“सर, आपके इंटरनेट कनेक्शन का इस महिने का बिल रेडी है. क्या आज शाम को चेक कलेक्ट करने के लिए किसीको भेज सकती हू ?”
नेहमीप्रमाणेच लगेच उत्तर देण्याआधी एकदम डोक्यात लखलखाट झाला.
(कदाचित ही इसमी ‘बिलींग सायकल’ १५ तारखेची असतानाही ३-४ तारखेला फोन करते म्हणून ठराविक मासिक वैताग आला असावा.
किंवा
दर ५-६ दिवसांनी इंटरनेट बंद होणे व तक्रार केल्यावर ठराविक उत्तर मिळणे मग ते ७-८ तासात कधीतरी चालू होणे.. पुन्हा ५-६ दिवसांनी तेच वगैरे काही महीने होत असलेल्या गोष्टींचा साठलेला वैतागही असेल.)
“तुम्ही माझ्याशी हिंदीत का बोलताय ?”
“…”
(अग बोल बाई !)
“मी मराठी किंवा इंग्लिश मधे बोलू इच्छितो. हा माझा प्रेफरन्स तुमच्या रेकॉर्डला ठेवा हवं तर. ”
“ओके सर. आज संध्याकाळी पाठवू का ? ”
“आज आम्ही नाही आहोत संध्याकाळी कुणी घरी. उद्या पाठवा. प्लीज फोन करायला सांगा म्हणजे खेप पडणार नाही. ”
तिचे आभार ऐकून फोन ठेवतानाच माझ्या डोक्यात पक्की खात्री झाली ही इसमी उद्या फोन करेल तेव्हा हमखास हिंदीत बोलणार. रोज पाचशे फोन होत असणार हिचे. मी फोन केला तर ऑटोमेटेड मेसेज ने मी भाषा निवडू शकतो. तिने फोन केला तर ती हमखास तशीच बोलणार हिंदीमधे.
आणि वही हुआ जिसका डर था !
दुस-या दिवशी सकाळी तिचा परत फोन.
“… क्या मै राहुल फाटकजी से बात कर सकती हू ?”
मनाची तयारी असूनही माझी काहीशी सटकली. आता नडायची वेळ आली !
“मी कालच तुम्हाला सांगितलं की तुमच्या कंपनीमधून फोन आला तर कृपया माझ्याशी मराठीमधे बोला. अशी काही लक्षात ठेवायची सोय नाही हे तुम्ही मला काल सांगितलं नाहीत. आज तुम्ही परत हिंदीमधे बोलत आहात. का बरं ? ”
“…”
“हॅलो.. ”
“हॅलो सर.. मी संध्याकाळी पाठवू का कोणाला चेकसाठी ? ”
(माझ्या डोक्यात स्वगत चालू : जाऊ देत आता. स्वत:ला शांतताप्रेमी म्हणवतोस. उगाच भांडण तंटा अजिबात आवडत नाही म्हणतोस. मग ह्या बिचारीला कशाला नडायचे ? पण ते काही नाही. जाऊ दे म्हणूनच मग हे सगळं होतं)
कंपनी विरुद्ध साठलेल्या वैतागाची बेरीज जास्त भरली !
“हो पाठवाच आज कुणाला तरी. पण तुम्ही मला उत्तर दिले नाहीत.”
“…”
“तुम्हाला अशा काही इंस्ट्रक्शन आहेत का हिंदीत सुरुवात करायची म्हणून ? ”
“…”
“हॅलो.. ”
“हॅलो सर.. ”
“आर यू अ महाराष्ट्रीयन ? तुमचे कॉल सेंटर पुण्यातच आहे ना ?”
“हो सर. ”
“मला एक सांगा. पुण्यात दोन मराठी माणसांनी एकमेकांशी हिंदीत का बोलायचे ? इन्फ़ॅक्ट, जगाच्या पाठीवर कुठेही..”
“…”
“मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचे आहे. ”
“…”
“हॅलो ? ”
“.. ओके सर. सिनियर मॅनेजरशी बोला. ”
अर्धा मिनिट खूडबूड.
“हॅलो. धिस इज अमुक तमुक. व्हॉटस द इश्यू सर ? ”
(आडनाव नीट ऐकू आले नाही पण बहुतांशी अमराठीच वाटतयं. यूपी कडचे. बहुतेक.)
“ऍक्चुअली नथिंग अगेंस्ट युअर रिप्रेझेंटेटिव. शी वॉज पोलाईट …”
त्याला थोडक्यात घटनाक्रम व ‘इश्यू’ सांगितला.
“या सर.. नो प्रॉब्लेम. आय विल टेल हर’ (आवाज घाईत असलेला. कदाचित हा त्याच्यासाठी ‘नॉन इश्यू’)
(अगदीच ‘कर्टली’ बोलायची गरज नाही म्हणून बोलावे)
“सी, इट्स नॉट दॅट आय डिसलाईक हिंदी.. ”
“येस सर. बट हिंदी इज अवर नॅशनल लॅंगवेज सर नो? ”
(देवा ! आता ह्याच्याशी ह्या विषयावर वाद घालायचा ! मला मराठीमधे ऐकायला बोलायला आवडेल ह्या सरळ अपेक्षेमधे चुकीचे काय आहे ? )
< सगळे विचार गिळून... थोडक्यात समारोप करण्यासाठी >
“सी…यू शूड स्टार्ट इन रिजनल लॅंग्वेज. ९०% ऑफ द पिपल आर कंफर्टेबल स्पिकिंग इन मराठी.. सो.. ”
“ओके सर बट वुई आर ऑल इंडीयन्स”
(दे ! मलाच डोस दे ! तू आणि मी कुठेही भारतात जाऊ शकतो, राहू शकतो ते इंडीयन आहोत म्हणूनच ना ? राष्ट्रगीताला उभे राहताना तुझ्या ह्रदयात होते तेच माझ्याही होते. नाही का? पण राष्ट्रप्रेमाशी ह्याचा काय संबंध ?
हिंदी ? हिंदीत मीच केलेला एखादा शेर ऐकवू का लेका ? कारण मराठीत केलेले काव्य तुला कळणार नाही. अनौपचारिक किंवा चपखल बसणा-या एखाद्या ‘ड्वायलॉक’ साठी ही हिंदी छान असते रे.
अर्थात काही गोष्टी खरचं डोक्यात जातात बघ. ‘लोकमान्य तिलक’ काय, ‘अंग्लैद’ काय ?.. अरे विशेष नाम तसेच नको का उच्चारायला ? उद्या मी ‘तिवारी’ ला ‘उधारी’ म्हटले तर चालेल का ?
आणि माझे अमराठी मित्र किंवा परिचयाचे लोक नाहीत काय ? मी पंजाबमधे बराच काळ - महिने किंवा वर्षे - जाणार असेन तर जुजबी का होईना पंजाबी भाषा अवगत करणे हे न्याय्य, व्यवहार्य व तर्कशुद्ध नाही का ? वीस वीस वर्षे महाराष्ट्रात राहून कामापुरती, जुजबी व्यवहरापुरती मराठीही शिकावी असे वाटत नसेल, शिकायची जरुरी भासत नसेल तर मराठी लोकांना आडमुठे संकुचित म्हणण्याचा अधिकार कुणी दिला यू. पी. वाल्यांना ? तेव्हा उत्तरेतली सो कॉल्ड ‘वॉर्म्थ’ कुठे जाते वागण्यातली ? त्या त्या प्रदेशाच्या भाषेला काडीचीही किंमत न देणे म्हणजे स्वभावातील मार्दव आणि सहिष्णुता? महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी हा कुठला न्याय ? गरज असताना/नसताना मला तेलगू, कन्नड, फ्रेंच, पंजाबी ढंगाची हिंदी, उर्दू, गुजराती,काश्मिरी वगैरे भाषांमधली २-४ (किंवा जास्त) वाक्ये तरी शिकाविशी वाटली ना ? हे महत्वाचे नाहीच का ?
बरं हे सगळे जाऊ देत. हा 'बिजिनेस कॉल' आहे ना? मग भूगोलातच बोलायचे तर मग देश कशाला ? आज जागतिक भाषा कुठली, आर्थिक किंवा अन्य औपचारिक व्यवहारांची ? इंग्लिश ना ? तुझ्या कंपनीचा ऑटोमेटेड मेसेज इंग्लिशमधेच सुरु होतो ना ? मग करा ना फोन इंग्लिशमधे ! थेट विशाल दृष्टीकोनच घेऊया ना.. आपण ग्लोबल सिटिझन्स नाही का ?
हेही समजून घेण्याची इच्छा नसेल तर जाऊ देत. मी कस्टमर आहे. मला मराठीतच बोलायचे आहे. तू करु शकत असशील तर सांग नाहीतर मी दुसरी कंपनी बघतो ! पूर्णविराम.)
“यू आर ऎब्सुल्यूटली राईट. वुई आर इंडियन्स. बट सी..”
पण मी पुढे काही बोलायच्या आतच तो म्हणाला
“ओके ओके. नो प्रॉब्लेम सर. आय विल नोट युअर प्रेफरन्स. आय विल ऑल्सो टॉक टू दि टॉप मॅनेजमेंट अबाऊट धिस.”
(डोंबल तुझे. पुढच्या महिन्यात मला हिंदीतच फोन येतो का नाही बघ. पण ठीक आहे. आपणहून म्हणतोय सांगेन वरिष्ठ अधिका-यांना सांगेन म्हणून, तर बास आता)
“ओके. थॅंक्स. ”
“थॅंक यू सर. ”
फोन खाली ठेवला.
कुठल्याही कारणाने, मनातले सगळे विचार जेव्हाच्या तेव्हा भरभर बोलले गेले नाहीत की आपण स्वत:वरच वैतागतो तसा वैतागलो !
तोच मला सोयीस्कर रित्या आडमुठा (किंवा ‘हुकलेला’) समजला असेल का ? तो त्या मुलीवर ती मराठी आहे म्हणून आता डूक धरेल का (किंबहुना सर्व मराठी ‘आडमुठ्या’ लोकांविषयी - केवळ माझ्यामुळे - त्याला अढी बसेल का) ?
की, सांगण्याची गरज नव्हती तरी तो विशेष आपणहून म्हणाला तसे.. ‘लोक मराठी मधे संवाद करण्याची मागणी करत आहेत’ असे खरेच तो वरिष्ठांना सांगेल ?
ह्म्म्म्म..
पण एकूण ‘इश्यू’ त्याच्या खरंच लक्षात आला असेल का ?
- राफा
राफा मस्त एकदम.. मीही
राफा
मस्त एकदम..
मीही समोरचा कोणीही असेल तरीही मराठीतच धडाकेबाज सुरवात करते. ९०% समोरचा मराठी निघतो, पण त्यांना मुळात मराठीतुन शब्दही तोंडातुन काढायचा नाही अशा सुचना असतात बहुतेक
मोबाईलवर आणि टेलेफोनवर जे
मोबाईलवर आणि टेलेफोनवर जे मराठी ऐकायला मिळते ते हिंदीचे शब्दशः भाषांतर असते.
'या वेळी आमच्या सगळ्या लाईन्स व्यस्त आहेत' हे इतक्या वेळा ऐकलेय. आता मराठी व्यस्त आणि हिंदी व्यस्त यांचा अर्थ एकच आहे का?
वर कोणीतरी लिहिलेय 'मी ..... पसंत करते'. आता हिंदीतले पसंद करना आणि मराठीतले पसंत करणे यांचा अर्थ सारखाच आहे का?
पण कानावर हे शब्दप्रयोग इतक्यांदा आदळतात की आपणही तसेच बोलायला लागतो.
राफा...अगदी मनातलं
राफा...अगदी मनातलं लिहिलंय..
भरत्तजी
>>दक्षिण भारतीयाला हिंदी हमारी राष्ट्रभाषा(?) है असे उत्तर 'त्या' मॅनेजरने दिले असते का?>>
नसते दिले..देतही नाहीत...तिथे बरोबर कानडी ऑप्शन दाबलं की कन्नड मधे संवाद असतो..
मी बंग्लोरला काम करते...एकदा माझ्या पीएम शी माझं बोलणं चालू असताना तिने मला विचारलं तु कन्नड का नाही शिकत..मी म्हटलं शिकत्ये कामचलाऊ का होईना यायला हवं...तर मला म्हणते ओह! मराठी लोक एवढे ओपन माइंडेड असतात असं वाटलं नव्हतं (का बुवा? हा माझ्या मनातला प्रश्न)..
मग म्हणाली मी नसते शिकले कधी मराठी किंवा हिंदी कारण हिंदी पेक्षा कन्नड जुनी असल्याकारणाने ती राष्ट्रभाषा असायला हवी! आणि मला माझ्या भाषेतच बोलायला बरं वाटतं.(हे मी पूर्वी सुद्धा लिहलंय बहुदा)
पण मग असं सगळ्यांनाच वाटू शकतं..
महाराष्ट्रीय लोक सहिष्णु असतात वगैरे असं इतरांनी बोलुन दाखवलं की काही जण खुष होतात...पण तेच अपाण आक्रमक पावित्रा घेतला की ती मात्र आपली संकुचीत वृत्ती असा समज केला आणि पसरवला जातो...
असं का!!?
एखाद्या मराठीच माणसानेच जरा
एखाद्या मराठीच माणसानेच जरा वेगळे -उत्साहवर्धक असले तरीही- निरिक्षण दिले तर त्याची कशी पायमल्ली होते/त्या प्रतिसादास्/निरिक्षणास कसे दुर्लक्षित केले जाते .याचे एक प्रातिनिधिक उदाहरण इथेच दिसत आहे!!!!
“ओके ओके. नो प्रॉब्लेम सर. आय
“ओके ओके. नो प्रॉब्लेम सर. आय विल नोट युअर प्रेफरन्स. आय विल ऑल्सो टॉक टू दि टॉप मॅनेजमेंट अबाऊट धिस.” >> यावर तू सरळ म्हणायचंस की मी तुमचा कस्टमर आहे आणि मला मुद्दाम फक्तं मराठीतच संभाषण सुरु होईल अशी सोय करुन हवी..इंडियन वगैरे जरी असलो तरी मला दुसरि कुठलीच भाषा येत नाही...(हे ही हिंदीत बोलायचं) म्हणजे येतील ठिकाणावर..
रेव्यु..मला कळल नाही तुम्हाला
रेव्यु..मला कळल नाही तुम्हाला काय म्हणायचय ते..माझ्या प्रतिसादानन्तर लगेच तुमचा दिसतोय म्हणून मला वाटले तुम्ही माझ्या प्रतिसादाला उत्तर दिलय...नसेल तर चुभुद्याघ्या..
राहुल, छान लिहिलंय आणि योग्य
राहुल, छान लिहिलंय आणि योग्य विषयाला हात घातलात तुम्ही.
आपण मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण
ग्राहक म्हणून असतो तिथल्या लोकांनी मराठीत संवाद करावा असा
आग्रह धरला पाहिजे.
(याचबरोबर आपल्याला हिंदी अथवा इंग्रजी देखील चांगलं बोलता
येतं हेही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे.)
राफा माझ्या जिवाची अशीच
राफा माझ्या जिवाची अशीच घालमेल होते नेहेमी. मुळात त्या रेकॉर्डेड मेसेजप्रमाणे बटणे दाबुन तुम्ही जरी मराठी हा पर्याय निवडला तरी समोरचा माणुस मराठीमधुन बोलतो. मी शांतपणे त्याला कृपया मराठीमधुन बोला किंवा मराठी बोलणारा मदतनीस आणा असे सांगतो. मराठी, हिंदी, इंग्रजी वाद ठिक आहे पण एखाद्या माणसाला मराठीच येत असेल तर त्याने फोन, इंटरनेट, विमा या गोष्टी वापरुच नये का? का वापरल्या तरी फोनवर मदत घेऊ नये?
राफा, प्रचंड आवडला हा लेख.
राफा, प्रचंड आवडला हा लेख.
मस्त मला पण आवडले....
मस्त मला पण आवडले....
राफा..खूप आवडला लेख..
राफा..खूप आवडला लेख..
आपण मराठीतच बोलायचं काहीही
आपण मराठीतच बोलायचं काहीही झालं तरी. समोरचा मराठी असेल तर नक्कीच. आपोआप बोलतात समोरचेही मराठीत. >>>> अगदी अगदी..
मी आणि माझा एक मित्र मुंबईत किंवा पुण्यात कुठेही कोणाशीही मराठीतच बोलतो मग त्या समोरच्याने इंग्रजी, हिंदी, गुजराथी कुठल्याही भाषेत रिप्लाय केला तरी... आपोआप लोकं सरळ होतात...
पौर्णिमाना अनुमोदन. कोणी
पौर्णिमाना अनुमोदन. कोणी हिंदी किंवा इतर भाषेत बोललं तरी आपण मराठी बोलायला काहीच हरकत नाहीये. सहसा आपण ग्राहक असताना समोरचा माणूस आपसुकच मराठीत बोलेल (येत असेल तर किंवा इच्छा असेल तर). अशी एक बाजू जर आपल्या सारख्या मराठीत बोलू इच्छिणार्यांनी लावून धरली तर काही दिवस, महिने किंवा वर्षांनी पलिकडून आधी मराठीच ऐकू येइल.
मी पण मराठीत बोलावं या मताचा
मी पण मराठीत बोलावं या मताचा आहे. (आणि इ-मेल पासुन... रिक्षा, हॉटेल, फोन सगळीकडे अमलात देखिल आणतो.
हिंदी राष्ट्रभाषा आहे का नाही हे मला नक्की माहिती नाही पण विकीवर हे दिसलं...
Official language(s) Hindi, English[hide]
Hindi in the Devanagari script is the official language of the Union[5] and English the "subsidiary official language".[6]
References
[5] http://india.gov.in/knowindia/official_language.php
[6] http://www.rajbhasha.gov.in/preseng.htm
अर्थात, याचा मी लावलेला अर्थ असा की, केंद्राच्या 'सरकारी' कामांसाठी हिंदी आणि इंग्रजी या सरकारमान्य भाषा आहेत... पण इतर ठिकाणी वैयक्तिक/व्यवसाईक पातळीवर हिंदी बोलण्याची सक्ती/आग्रह कोणी करु शकत नाही. बरोबर??
राहुल, एकदम योग्य विषयावर
राहुल, एकदम योग्य विषयावर लिहिले आहे.... माझा काही महिन्यांपूर्वी माझ्या कानपुरी मैत्रिणीशी आणि राजस्थानी मित्राशी वाद झाला, तोही (खेदाने सांगावे लागेल,) एका जर्मन मित्रासमोर!!! आम्ही तिघे हिंदीतून संवाद साधत असतांना ह्या जर्मन मित्राने विचारले, की तुम्हा तिघांची भाषा एकच आहे का? मी म्हणाले, नाही. त्यावर त्याला आश्चर्य वाटले, की मला कशी काय या लोकांची भाषा येते. त्यावर हे माझे हिंदी भाषिक मित्र-मैत्रिणी एकाच वेळी, एकाच सूरात म्हणाले, कारण ती आमची राष्ट्रभाषा आहे.... झालं! माझं टाळकं सरकलं... मी म्हणाले... "धिस इज युवर मिसअन्डरस्टॅन्डिंग... हिंदी इजन्ट अवर नॅशनल लॅन्ग्वेज... इट्स वन ऑफ द ऑफिशिअल लॅन्वेजेस ऑफ इंडिया....जस्ट लाईक मराठी इज!!!!" दोघांचे चेहरे खाडकन उतरले! ते इतके संतापले, की बस्स!!!!!...
मी त्यांना हिंदीतून समजावले, ह्या जर्मन माणसासमोर आपापसात वाद नको. मी इमेलने तुम्हाला पुरावा पाठवते...
गंमत म्हणजे, मी सुद्धा कितीतरी काळ ह्याच गैरसमजात वावरत होते. माझ्या नवर्यामुळेच (तो तमिळ भाषिक आहे.) मला ही गोष्ट समजली. मी त्याला एकदा म्हणाले, की तू हिंदी शिक... ती आपली राष्ट्रभाषा आहे...म्हणजे तू सगळ्या भारतीयांशी संवाद साधू शकशील, तर त्यावर तो म्हणाला, "हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, हा एक फार मोठा गैरसमज आहे. जरा गुगलून पहा!" नंतर तो म्हणाला, "मी तुझ्याशी लग्न केलेय, मी तुझी भाषा शिकेन!"
जसे तमिळ लोक तीव्रतेने हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही हे सांगतात, तसेच जर्मन लोकही इंग्रजीला जागतिक भाषा मानायला तयार नाहीत... माझ्या भाषेवर माझे प्रेम होतेच, पण ते जर्मन आणि तमिळ लोकांचे आपापल्या भाषेवर असलेले प्रेम बघून अधिकच वाढीस लागले....
आजकाल अमेरिकेत सुद्धा इंग्रजी
आजकाल अमेरिकेत सुद्धा इंग्रजी चालत नाही. आमचे लॉन कापणारा कुणितरी रशियन का पूर्व युरोपमधला माणूस आहे. त्याला इंग्रजी धड येत नाही. घर साफ करायला बाई येते तिला पण इंग्रजी येत नाही. ती पण कुठल्या देशातून आलिय देव जाणे.
बाहेरहि स्पॅनिश बोलणारे खूप आहेत, पण तरी आपण इंग्रजीत बोललो तर समजेल अश्या इंग्रजीत बोलतात.
सुदैवाने अजून कुणि स्पॅनिशमधे बोला, वगैरे म्हणत नाहीत.
मी २००५ साली सहा महिने पुण्यात होतो. शिंदे नि देशपांडे आडनाव असलेले दोघेजण आप आपसात हिंदीतून बोलत होते. मी मराठीतून बोललो तरी ते हिंदीच. मी विचारले का? तर म्हणे सवय झालीय.
आमचे एक मित्र नुकतेच भारतात जाऊन आले. त्यांनी सांगितले आजकाल इंग्रजीतून बोलणे, इंग्रजी शब्द वापरणे हे सभ्यतेचे, सुशिक्षिततेचे व सुसंस्कृत असण्याचे लक्षण समजले जाते.
अनेक कारणे आहेत हिंदीतून बोलण्याची. जे नेहेमी कानावर पडते ते लोक बोलतात. हिंदी सिनेमे लोकप्रिय म्हणून त्यातले संवाद लोकप्रिय. खुद्द राज ठाकरेला हिंदी सिनेमातला संवाद आठवला! "क्या सॉल्लीड मारा " वगैरे. मुले आ़़जकाल इंग्रजीतून शिकतात नि हिंदी सिनेमे बघतात. (म्हणजे सर्व भाषा नि शिक्षण यांचे वाट्टोळे! जाउ दे, तो विषय वेगळा!)
मायबोलीवर काय कमी हिंदी, इंग्रजी शीर्षके असतात का? त्यांना काय मराठीत लिहीता येत नाही? पण हिंदी, इंग्रजी शब्दप्रयोग जास्त लोकप्रिय असतात, लक्ष वेधून घेतात.
अनेक वर्षांपूर्वी इंटरनेट सुरु झाले, मायबोली सुरु झाली म्हणून मी मोठ्या उत्साहाने म्हंटले आता आपण फक्त मराठीतून बोलू. त्यावर काय नाना थेरं झाली ती मी माझ्या पानावर एकदा लिहीली होती.
आता हा विषय फार जुना झाला. माझ्या मते आता एकच भाषा - बॉलिवूड भाषा - सर्वांना समजेल अशी.
शेवटी हम सब इंडियन्स नो?
अनेक वर्षांपूर्वी इंटरनेट
अनेक वर्षांपूर्वी इंटरनेट सुरु झाले, मायबोली सुरु झाली म्हणून मी मोठ्या उत्साहाने म्हंटले आता आपण फक्त मराठीतून बोलू. त्यावर काय नाना थेरं झाली ती मी माझ्या पानावर एकदा लिहीली होती.>.तुम्ही देवनागरीमधून लिहू असे म्हणत होता त्यावर थेर झाली होती ना हो झक्कि ? मराठी मधे तर आधीहि बोलत होतेच ना.
अनेक वर्षांपूर्वी इंटरनेट
अनेक वर्षांपूर्वी इंटरनेट सुरु झाले, मायबोली सुरु झाली म्हणून मी मोठ्या उत्साहाने म्हंटले आता आपण फक्त मराठीतून बोलू. त्यावर काय नाना थेरं झाली ती मी माझ्या पानावर एकदा लिहीली होती.>>>> म्हणजे, मराठी लोकांनी मराठीतून बोलायला विरोध केला होता का?
मराठी लोकांनी मराठीतून
मराठी लोकांनी मराठीतून बोलायला विरोध केला होता का?
नाही हो, पूर्वी देवनागरी लिहीणे जरा कठीणच होते. मग इंग्रजी कीबोर्ड वापरायचा तर इंग्रजीतूनच लिहिणे सोपे असेहि काही लोक म्हणत. शिवाय बर्याच जणांना वाटत असे की इंग्लंड, अमेरिकेत मायबोली, म्हणजे इंग्लिश, अमेरिकन लोक वाचतात! मग त्यांना समजावे म्हणून ते इंग्रजीत लिहीत.
शिवाय काही लोक म्हणत, तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? आम्हाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे. आता आम्ही मुद्दामच इंग्रजीतून लिहू, काय करणार आहात तुम्ही?
आणि मराठी नक्की कुठचे? पुण्याचे? नागपूरचे? खेडेगावातले? ज्ञानेश्वरांचे? वगैरे वगैरे प्रश्न उद्भवले.
शिवाय वास्तवतेचे दर्शन गोष्टीतून, कवितेतून करायचे तर वास्तवात तर हिंदी नि इंग्रजीच बोलतात ना!
असे अनेक प्रश्न. शेवटी मला इंटरनेटवर खूप मराठी सापडले, नि मी मायबोलीकरांच्या नादी लागणे सोडले.
हिंदी ही राष्ट्रभाषा - नॅशनल
हिंदी ही राष्ट्रभाषा - नॅशनल लँग्वेज नाही..राजभाषा ऑफिश्यिल लॅन्ग्वेज आहे.
घटनेतल्या या तरतूदी :
. Official language of the Union.
1. The official language of the Union shall be Hindi in Devanagari script. The form of numerals to be used for the official purposes of the Union shall be the international form of Indian numerals.
2. Notwithstanding anything in clause (1), for a period of fifteen years from the commencement of this Constitution, the English language shall continue to be used for all the official purposes of the Union for which it was being used immediately before such commencement
यानंतर आला THE OFFICIAL LANGUAGES ACT, 1963
(AS AMENDED, 1967) त्याअन्वये
3. Continuation of English Language for official purposes of the Union and for use in Parliament-
(1) Nothwithstanding the expiration of the period of fifteen years from the commencement of the Constitution, the English language may, as from the appointed day, continue to be used in addition to Hindi,
1. for all the official purposes of the Union for which it was being used immediately before that day; and
2. for the transaction of business in Parliament:
Provided that the English language shall be used for purposes of communication between the Union and a State which has not adopted Hindi as its Official Language:
Provided further that where Hindi is used for purposes of communication between one State which has adopted Hindi as its official language and another State which has not adopted Hindi as its Official Language, such communication in Hindi shall be accompanied by a translation of the same in the English language
राज्यांची राजभाषा हिंदीपेक्षा निराळी असू शकते.
REGIONAL LANGUAGES
Article 345. Official language or languages of a State- subject to the provisions of articles 346 and 347, the legislature of a State may by law adopt any one or more of the languages in use in the State or Hindi as the Language or Languages to be used for all or any of the official purposes of that State.
संदर्भ :http://rajbhasha.nic.in/consteng.htm
चांगले लिहिले आहे. व्यक्त
चांगले लिहिले आहे. व्यक्त केलेल्या मतांना अनुमोदन.
पण अगदीच अमराठी वापरायची वेळ आली तर इंग्रजीपेक्षा हिंदी कधीही योग्य वाटते.
पूनमशी सहमत आहे. समोरचा कोणत्याही भाषेत बोलला तरी आपण मराठीतच बोलायचे. लोक आपोआप लायनीवर येतात.
पण ते जर्मन आणि तमिळ लोकांचे आपापल्या भाषेवर असलेले प्रेम बघून अधिकच वाढीस लागले
>> अहो ते जर्मन लोक फार शहाणे आहेत. ते लोक टेक्निकल गोष्टींसाठीही त्यांचीच भाषा वापरतात. जर्मन आणि जपानी भाषांचे इंग्रजीत अनुवाद करणे ह्या एका गोष्टीवर भारतात मोठी सर्व्हिस इंडस्ट्री उभी आहे. भारतात अनेक भाषा असल्यामुळे टेक्निकल जरी शक्य नसले तरी किमान आपापल्या भाषेत शिकणे आणि बोलणे हे तर करायलाच पाहिजे.
हिंदी ही राज्यघटनेप्रमाणे
हिंदी ही राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रभाषा नसली तरी, पुष्कळ लोक बोलतात, त्यांना समजते, या अर्थाने बहुधा हे लोक म्हणत असतील की ही राष्ट्रभाषा आहे. हिंदी सिनेमांच्या अफाट लोकप्रियतेचा परिणाम. दक्षिणेतली राज्ये सोडली तर इतरत्र लोक कबूल करतात की त्यांना हिंदी कळते. दक्षिणेतले लोक कबूल करत नाहीत इतकेच.
दुर्दैवाने मराठीत सध्या, उत्तम दर्जाचे, अतिशय लोकप्रिय असे काहीहि नाही,(नाटक, सिनेमा, लेख, कविता इ.) की ज्यासाठी लोकांना वाटेल की मराठी शिकावे, मराठी म्हणी, मराठी वाक्प्रचार वापरावेत. मराठी लोकांनाहि इतर भाषाच आठवतात.
मायबोलीवर तर कथा, कवितेचे शीर्षक मराठीत द्यायचेच नाही असा कायदा दिसतो! शेरो शायरीचे रसग्रहण आहे, इलियटच्या कविता आहेत. चांगले आहे, पण काही मराठी कवी होऊन गेले, त्यांच्या मराठी भाषेचे सौंदर्य, इ. चे कुणाला रसग्रहण करावेसे वाटत नाही. मराठीहि चांगली भाषा आहे हे इथल्या बर्याच लोकांना माहित तरी आहे का?
अॅडमिन, आता या साईटला मायबोली, हितगूज असले नाव न देता काहीतरी इंग्रजी, हिंदी नाव द्या, म्हणजे माझ्या सारख्याची दिशाभूल होणार नाही.
एक सबंध दिवस कुणि गरज नसताना , इंग्रजी, हिंदी शब्द वापरल्याशिवाय मराठी बोलून दाखवू शकेल का पुण्यात?
पुढल्या वर्षी येईन तेंव्हा अगदी लक्ष देऊन ऐकीन नि नोंद ठेवीन कोण मराठीत बोलतात नि कोण हिन्द्मरैंग्लिश* मधे बोलतात. ज्याने त्याने स्वतः स्वतःशीच याची नोंद घ्यावी.
*हिन्दी+मराठी+इंग्लिश या तिन्ही भाषांच्या व्याकरणाचा खून करत बोललेली भाषा. आज महाराष्ट्रात, निदान पुण्या मुंबईत तरी हीच भाषा प्रचलित आहे. तेंव्हा मुकाट्याने आता तीच भाषा बरोबर असे समजा.
मी तरी असेच समजतो.
कधी काळी भारतात जाण्याचे दुर्दैव ओढवले तर काही जुनी मराठी पुस्तके घेऊन येईन. वाईटातहि, त्यातल्या त्यात चांगले शोधायचे.
साउथ इंडीअन्सबद्द्ल लिहीले
साउथ इंडीअन्सबद्द्ल लिहीले आहे ते अगदी खरे आहे, एकत्र आल्यावर ते अजिबात दुसर्या भाषेत बोलत नाहीत, आम्हाला हिंदी कळत नाही, आम्ही हिंदी सिनेमे पहात नाही हे सांगताना त्यांना काय अभिमान वाटतो.
राफा,छान लेख.
राफा,छान लेख.
>>> (दे ! मलाच
>>> (दे ! मलाच .......................बघतो ! पूर्णविराम.)
या दरम्यान, मधे दिलेले विवेचन हे मराठीचाच आग्रह का यास कुणाच्या काही शन्काकुशन्का असतील तर त्यास चपखल उत्तर आहे!
साला अस्ले लेख इमेलमधुन फिरत नाहीत का? फिरवायला पायज्येत.
(मी हल्ली माझ्याशी कुणी हिन्दीत बोलायला आले तर कपाळाला आठ्या घालून, नुक्तिच धारदार शिन्गे फुटलेल्या तरण्या मारक्या बैलासारखा आव चेहर्यावर आणून असा काही तुच्छ कटाक्ष टाकतो की ब्बस्स रे बस्स! समोरचा मारवाडी असो, गुज्जु असो, दक्षिणी असो वा युपिबिहारी! चट्ट वठणीवर येऊन तोडकेमोडके का होईना, मराठीत बोलतात, अन ते नै बोल्ले तरी मी मराठीच सुरू ठेवतो, साल्ल्यान्नो गिर्हाईक म्हणून माझी गरज मी खुन्टीला टान्गुन ठेवू शकतो कधीही, धन्द्याची-पोटापाण्याची गरज मात्र तुम्हाला जास्त आहे!)
>>>> कधी काळी भारतात जाण्याचे
>>>> कधी काळी भारतात जाण्याचे दुर्दैव ओढवले तर काही जुनी मराठी पुस्तके घेऊन येईन. <<<
तिकडच्या चिल्लरबरोबर माझ्याकरताही काही जुनी मराठी पुस्तके "अमेरिकेतुन" घेऊन या!
तसही सन्स्कृतची पुस्तके जर्मनीतूनच आणावी लागतील येत्या काही वर्षात असे दिस्तेच आहे!
छान लेख.. आणि शिर्षक तर एकदमच
छान लेख.. आणि शिर्षक तर एकदमच मस्त ..
सहि.....लेख आणि प्रतिसाद
सहि.....लेख आणि प्रतिसाद दोन्हि.....
राफा, जुनीच दारू नव्या
राफा,
जुनीच दारू नव्या बाटलीत... पण नशा (मराठीची) टीकून आहे..
पण अगदीच अमराठी वापरायची वेळ
पण अगदीच अमराठी वापरायची वेळ आली तर इंग्रजीपेक्षा हिंदी कधीही योग्य वाटते.>>>>>>>>>> अनुमोदन, हिंदी भारतीय भाषा तरी आहे.
आणी दक्षिण भारतीयांचं मला गणितच कळत नाहि.त्यांना हिंदिचा एवढा का तिटकारा आहे, ते लोकं बाकिच्यांशी ईंग्रजीत बोलतात.पण हिंदी नाहि.
Pages