आलू बंजारा

Submitted by Vega on 30 September, 2010 - 14:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ गोल, छोटे-छोटे बटाटे (आधीच सालं काढून, टोचून, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे),
१ वाटी बारीक चिरलेला शेपू, १ वाटी रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर, १ कांदा उभा चिरलेला,
२-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबिर, ठेचलेले आले+लसूण १ चमचा, २ सुक्या लाल बेडगी मिर्च्या,
१ चमचा लाल तिखट (काश्मिरी मिर्चीचे तिखट...रंग छान येतो भाजीला), अर्धा चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे+जिरे पूड, चिमूटभर हिंग, आवश्यकतेनुसार मीठ, चिरलेला अर्धा टोमॅटो आणि छोट्या लिंबा एवढा गूळ.

क्रमवार पाककृती: 

ही भाजी मातीच्या भांड्यात करायची आहे. तेव्हा, बाजारातून (जिथे माठ, मातीच्या कुंड्या मिळतात त्यांच्याकडून) आधीच एक कॅसेरॉलच्या आकाराचे मातीचे भाजलेले भांडे (तुळतुळीत पॉलिश्ड दिसते हे भांडे) आणि त्यावर मातीचेच झाकण असा सेट आणून ठेवावा.

मातीचे भांडे स्वच्छ धुवून कोरडे करून गॅसवर ठेवावे. त्यात अर्धी पळी तेल घालून मंद आचेवर ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात आले+लसूण ठेचा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.

नंतर चिमूटभर हिंग टाकून त्यात लाल मिर्च्यांचे तुकडे, लाल तिखट, हळद, धणे+जिरे पूड आणि गरम मसाला वगैरे जिन्नस टाकावे.

त्यावर चिरलेला कांदा टाकावा (कांदा गुलाबी होईपर्यंत परतण्याची गरज नाही).
नंतर चिरलेला शेपू, सोललेले बटाटे आणि भिजवलेले मसूर टाकून एकदा सगळे मिश्रण परतून घ्यावे.

नंतर सगळे मिश्रण बुडून वर एक इंच राहील इतके पाणी टाकावे.
चवीनुसार मीठ टाकावे. चिरलेली कोथिंबिर टाकावी.

मिश्रण व्यवस्थित ढवळून त्या भांड्यावर मातीचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावे.

बटाटे आणि मसूर ब-यापैकी शिजल्यावर, चिरलेला टोमॅटो आणि गूळ घालावा.
पुन्हा एक वाफ येऊ द्यावी.

आलू बंजारा तयार!

वाढणी/प्रमाण: 
मिताहारी २-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

मातीचे भांडे वापरल्याने शिजलेल्या अन्नब्रह्माला एक वेगळाच खमंग परिमळ येतो. त्यासाठी मातीच्या भांड्यावर मातीचेच झाकण वापरणे गरजेचे आहे! झाकणावरून परावर्तीत होणारी वाफ पुन्हा पदार्थात मिसळते. खमंगपणा द्विगुणित होतो तो त्यामुळेच!

ही भाजी गरमागरम पोळी, किंवा नुसत्या गरम भाताबरोबर एकदम खास; म्हणजे पॉश लागते!

मूळ पाकृ मध्ये टोमॅटो, गूळ, कोथिंबिर, आले हे जिन्नस नव्हते. ते मी प्रयोगाखातर घातले. तसेच मूळ पाकृमध्ये त्यांनी बटाटा चिरून फोडी वापरल्या. मी छोटे गोल बटाटे वापरले एवढाच बदल!

बटाटे, कांदा, मसूर आणि शेपू हे प्रमुख घटक पदार्थ!

सतत फिरतीवर असणा-या बंजारा (लमाणी) लोकांना नॉन-स्टिक पॅन्स, प्रेशर कुकर वगैरे घेऊन फिरणे कसे जमणार? त्यामुळे, एखादे मातीचे भांडे घेऊन त्यात जिन्नस फक्त कोंबायचे आणि शिजवून खायचे अशी सोप्पी, सोयीस्कर पद्धत असावी लमाण्यांची...असा माझा अंदाज!

ज्यांना मातीचे भांडे मिळवणे शक्य नाही, त्यांनी आपल्या नेहमीच्या कढईत आलू बंजारा करून पहावा! शेपूचा नेहमीचा उग्र वास ह्या भाजीत अजिबात जाणवत नाही.
बेमिसाल चव लागते!

माहितीचा स्रोत: 
काही दिवसांपूर्वी टीव्ही वरील एका कार्यक्रमात ही पाकृ पाहिली होती. कोणी अमरजी नामक बल्लवाचार्य होते! पाकृ लिहून घेतली नाही, पण मुख्य घटक आणि कृती मी आठवणीत जपून ठेवली होती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचीन, धन्यवाद!
मी कुंभाराकडून मातीचं भांडं आणलं! स्वैंपाकासाठी हवे आहे असे त्याला सांगावे!

मातीचे भांडे नसूनही आज आलू बंजारा केली होती ( मातीचे भांडे आणेपर्यंत धीर धरवला नाही . Wink ) , अप्रतिम हा एकच शब्द आहे . आता मात्र मातीचे भांडे आणायलाच हवे . Happy . पाककृती इथे दिल्याबद्दल धन्यवाद .

आजच केली खुपच छान झाली. माझ्याकडेही मातीचे भांडे नाहिये त्यामुळे साध्याच भांड्यात केली.(संपदाला अनुमोदन,मातीचे भांडे आणेपर्यंत धीर धरवला नाही )
माझ्याकडे ओल्याखोबर्‍याची चटणी १-२ चमचे उरली होती ती पण घातली खुप छान लागत होती भाजी.
पाककृती बद्दल धन्यवाद.

आलु बंजारा थोडा बदल करुन केली..शेपु नव्हता म्हणुन कसुरी मेथी-१ टी स्पुन घातली..तिखट अर्धा चमचाच घातले..प्रेशर कुकर मधे केली..गॅस अगदी कमी ठेवला.व एक शिटी येवु दिली..भाजी मस्त झाली..

आज इथे शेपू, बाळबटाटे, कोथिंबिर सगळ एकाच वेळी मिळणे, घरात मातीचे भांडे असणे, आणि ऑफिसमधुन आल्यावर मला स्लो कुकींगचा इंटरेस्ट येणे हे सगळे आलुबंजारा योग एकत्र आल्याने आलुबंजारा शिजवलाच.
अप्रतिम लागतोय Happy पुन्हा शेपु मिळाला कि करणारच.
रेसिपी बद्दल धन्यवाद.

या रेसिपीचा अजुन एक फायदा असा की थंडीमुळे घरातली कमी झालेली ह्युमिडीटी चांगलीच म्हणजे अगदी ६५% पर्यंत वाढली. Lol

काल जेवायला भाच्चा आला होता. आलु बंजाराच्या प्रेमातच पडला. मातीच्या भांड्यात बनवायची असते हे कळाल्यावर त्याच्या एका कुंभार मित्राकडून हव्या त्या आकाराचे भांडे बनवून मला देण्याचे आश्वासन मिळाले आहे. Happy

imagesCA5ECADH.jpg
अशी मातीची भांडी नविन आणल्यावर वापरण्याआधी त्यांवर एक छोटीशी प्रक्रिया करावी लागते, म्हणजे ती लवकर तडकत नाहित, ऐन वेळी घात करत नाहित आणि शहाण्यासारखी पुष्कळ काळ टिकतात....!
imagesCA75AX6F.jpg

खापराचं भांडं नविन आणलं की-
१) नुस्त्या पाण्याने विसळून घ्या,
२) पाण्याने अगदी काठोकाठ भरुन घ्या,
३) पाण्याने भरलेले भांडे, गॅसवर, फूल फ्लेम वर, झाकण न ठेवता तापायला ठेवा,
४) पाणी उकळायला लागले की गॅस बंद करा, तसेच गार होऊ द्या,
५) गार झालेले पाणी हलकेच ओतून द्या आणि पालथे घालून निथळायला ठेउन द्या, पूर्ण कोरडे होऊ द्या,
६) कोरड्या भांड्यात १ चमचा तेल (खाण्याचे, कुठले ही) घालून कापूस किंवा कापड्याच्या बोळ्याने तळाला आणि आतल्या सगळ्या भागाला व्यवस्थित पसरवून घ्या.
७) तेल लावलेले भांडे परत गॅसवर थोडे तापवून घ्या, गार करुन घ्या..
आता भांडे वापरायला तयार....
imagesCADN9500.jpg

ही सगळी प्रक्रिया सोपी आहे, पण वेळ फार लागतो.

गिरिश, काही ठिकाणी ही सगळी प्रक्रिया करुन मगच भांडी विकायला ठेवतात. मी घेतलेले भांडे असेच आहे. त्यामुळे मला हे सगळी उठाठेव करावी लागली नाही Happy

काही जणं, ही ' मृद्वाडगी ' (किंवा 'मृद्भगोणी', मृच्छकटिक च्या चालीवर) डायरेक्ट कुंभारा कडून उचलून आणायचं म्हणाताहेत, त्यांच्या साठी सूचना देवून ठेवली आहे! Happy

मांडे भाजण्या साठी खापर वापरतात, त्याला सुद्धा ही प्रक्रिया करतात, पण तेल मात्र बाहेरुन लावतात.
काही जण 'लोणचं' सुद्धा अश्या मातीच्या, घट्ट झाकणाच्या भांड्यामध्ये घालतात, त्यासाठीही आधी ही सगळी प्रक्रिया करतात, मग आतुन हींगाची धूरी देऊन निर्जंतूक करुन घेतात.

आलू बंजारा काल करून बघितली, नेहेमीच्या नॉन स्टिक कढईत .. छान झाली होती .. गूळ आणि कोथींबीर घातली नाही ..

काल करताना माझ्या हातून पाणी जास्त घातलं गेलं शिजवताना .. पुढच्या वेळी पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर अजून छान लागेल .. तसंच मातीच्या भांड्यात करण्यानेही चव अजून चांगली येत असावी .. Happy

काल करुन बघितली. छान झाली होती...वास तर मस्तच सुटला होता....!! मी पण गूळ नाही घातला.
बित्तु...धन्यवाद!

आज परत एकदा बंजारा योग आला ..

घरी मसूर नव्हते त्यामुळे लाल चवळी आणि मूग असं रँडम कॉम्बिनेशन वापरलं होतं ..

ही अतिशय कमी कष्टांत प्रचंड चविष्ट होणारी रेसिपी आहे .. बित्तू, तुझे परत एकदा आभार ..

हा फोटो (पार्ल्यातल्या कोणाला 'इंतकाम' वगैरे मोडमध्ये जायचं असल्यास ही संधी चुकवू नका! :p)

sashal_banjara_600.jpg

(जो काही ओबडधोबड फोटो होता तो सुबक करण्याचं श्रेय बित्तूलाच .. :))

वरचा फोटो पहाता पाणी ज्यास्त झालेलं दिसतय, मसाला ही नीट मिळून आलेला वाटत नाही(ते बटाटे गळले नाहीत वाटते). तर्री चा रंग खूप लाल नाही आलाय. मिरची एकच का? संपलेल्या होत्या का? मध्येच पांढरे काय दिसतेय ते? Happy

झंपीताई, तुम्ही संक्रांत माझ्यावर साजरी करायचं नक्की केलेलं दिसतंय .. छान! Happy माझ्या वरच्या आमंत्रणाचा स्वीकार केल्यबद्दल धन्यवाद ..

सशलबाई, संक्रात १५ तारखेला होती. विसरलात काय? तुमचे कुठले आमंत्रण? आँ...
तुम्ही म्हणत असाल संक्रात तर हे वाण समजा परत केलेलं.

Pages