१. नमनाला घडाभर
माझ्या डिप्लोमा व बीईचा विषय होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स. बीई करताना कळले की हे सशाचे बीळ खूप खोल आहे. मी अभ्यासत असलेल्या विषयात करण्यासारखं खूप आहे, पुढे शिकण्यासारखं खूप आहे. विदेशात शिक्षण घेता येऊ शकते. त्यासंदर्भात माहिती गोळा करायला सुरवात केली आणि जाणवले हे सगळं कदाचित आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. आजपर्यंत सगळं आयुष्य मजेत कुठल्याही मोठ्या अपेक्षा स्वतःवर न लादता घालवलं आहे. पण हे करायचे असेल तर सगळा दृष्टिकोनच बदलायला हवा. जसे जसे ऍडमिशन प्रोसेस बद्दल वाचत गेलो तसे जाणवले की आतापर्यंतच्या माझ्या शैक्षणिक गुणवत्तेवर थोड्याफार नामांकित विदेशी विद्यापीठातूनही स्कॉलरशिपसकट प्रवेश मिळणे अवघड आहे. आणि जिथे प्रवेश मिळेल त्या विद्यापीठातील डिग्रीने काही फायदा होईल का? काही शिकायला मिळेल का? सगळ्या दृष्टीने खूप विचार केला. नंतर वाटले काय होईल? फारतर जिथून सुरवात करतोय तिथेच परत येईन. जास्त नुकसान होईल असे काहीच नाही पण जर झाला तर फायदाच होईल. नवीन देश, नवीन अनुभव मिळेल. खरंच काय हरकत आहे? गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर... म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या मास्टर्ससाठी ऍप्लिकेशन पाठवली. ज्यांनी होकार कळवले त्यातल्या कुणीही स्कॉलरशिप दिली नाही, तशी अपेक्षाही नव्हती. त्यातल्या त्यात एक चांगले विद्यापीठ निवडले आणि काठी नि घोंगडं घेऊन निघालो.
भारतातून येणारे इतर अनेक विद्यार्थी जसा जुगाड करतात तसाच मीही केला होता. खिशात एका सत्राची ट्युशन व दोनेक महिन्यांचा रोजचा खर्च इतकेच बरोबर होते. ह्या युनिव्हर्सिटीत मास्टर्सकरता कमीतकमी दोन वर्षे तरी लागणार होती. पुढचा जुगाड युनिव्हर्सिटीत येऊन करायचा होता. स्कॉलरशिप किंवा ट्युशन वेव्हर हा तो जुगाड. हे नसत जमलं तर गाशा गुंडाळून परत. इतका साधा हिशेब होता. [समयोचित गाणं]

