मराठी : लेखन घडते कसे?

Submitted by कुमार१ on 26 February, 2024 - 22:20

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ (https://www.maayboli.com/node/83383) या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :

ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.

या उपक्रमाद्वारे इच्छुक लेखक आपले मनोगत इथे व्यक्त करतील. ते कशा प्रकारे व्यक्त करायचे याची पूर्ण मुभा लेखकांना आहेच. तरीसुद्धा उपक्रमात एक सुसूत्रता असावी म्हणून काही मार्गदर्शक प्रश्न खाली देत आहे. ते योग्य वाटल्यास त्या प्रश्नांचा जरूर आधार घ्यावा. आजच्या दिनाचे औचित्य लक्षात घेऊन फक्त मराठी भाषेतील लेखनासंबंधीच लिहावे.

प्रश्न

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.

२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही

३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी

४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.

५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?

६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.

निव्वळ लेखन या कलेमध्ये लेखक त्याच्या वाचकांसाठी व्यक्ती म्हणून अदृश्य असतो; तो त्याच्या शब्दांमार्फतच वाचकांपुढे येतो. सध्याच्या युगात ‘निव्वळ लेखन’ या कलेपुढे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत निव्वळ लेखन ही कला भविष्यात किती काळ स्वीकारली जाईल, यासंबंधी तुमचे विचार जरूर लिहा.

वरील मनोगताची सुरुवात माझ्यापासून करत नाही. ते मी चर्चा समारोपाच्या वेळेस लिहीन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !

टीप : जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही.

अग्रिम धन्यवाद !
*************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतुराज,
'वरातीमागून घोडे' >>> काही हरकत नाही. स्वागत आहेच ! खरडत रहा ..

एखाद्या विषयावर उत्स्फूर्तपणे काही सुचल्यास लगेच न लिहिता त्यावर मनन, चिन्तन करून मग ते लिहावे
>>> हे आवडले

नेहेमी प्रमाणे डॉक्टरांचा विचार प्रवर्तक धागा. त्यांचे वैद्यकीय विषयांवरचे धागे देखील माहितीप्रद आणि सर्वसामान्यांना समजतील असे असतात.>>अगदी बरोबर आहे.
छानच धागा आहे हा. डॉक्टरांनी बऱ्याच लेखकांच्या काळजाला हात घालणारी साद घातली आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खूप छान मनोगतं वाचायला मिळाली. लेखक शब्दाची व्याख्या मुळात त्यांनी इतकी समावेशक ठेवली त्यामुळे लिहितं होताना कुणाला संकोच वाटला असला तरी फार काळ टिकला नाही.
धन्यवाद सगळ्यांनाच. इथले मनोगत लिहिते झालेले लेखक व लिहविता (?) धनी डॉक्टर यांनाही.
अस्मिता म्हणाली तशी म. भा. गौरव दिनासंबंधीची रुखरुख नाहीशी झाली

I have put a lot of myself into this narration. I could get rid of many memories by writing about them. They were harbouring inside me for too long. It was a kind of catharsis, the purging of emotions. It was most liberating.>>
शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

१. लिहितं होताना कुणाला संकोच वाटला असला तरी फार काळ टिकला नाही. >>>> ही आनंदाची गोष्ट आहे.
..
२. the purging of emotions. >>>
हा अशक्य सुंदर शब्दप्रयोग आहे - अगदी पूर्ण अर्थाने भावना व्यक्त करणारा... निचरा..

सुंदर उपक्रम आणि प्रतिसाद !

प्रत्येकाच्या लिहिण्यामागे इतका विचार, भावना, कष्ट आणि involvement आहे हे वाचून भारावलो.

लिहिते राहण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

अनिंद्य तुम्ही लिहा. तुमचे लेख खूप अभ्यासपूर्ण, कष्ट घेउन लिहीलेले असतात +१
दिसला नाहीत बरेच दिवसात, hope everything is fine! Happy
------
नवीन प्रतिक्रिया वाचल्या- आवडल्या. हा धागा रोज थोडा थोडा वाचतेय.

समारोपांनंतर लिहिणे खरं तर औचित्यभंग होईल पण आचार्य नि कुमार ह्यांची माफी मागून - लिखाणाची प्रेरणा थोडी वेगळी आहे म्हणून थोडेसे लिहितो .... Happy

पराग ने लिहिलय तसे हस्तलिखित मासिके, कुमार, शाळेची नियतकालीके , टिमवी च्या निबंधस्पर्धा वगैरे मधले "लिखाण" वगळता इंजिनयरींगला गेल्यावर काही लिहिले नव्हते. कधी लिहावेसे वाटले नव्हते असे म्हणणे योग्य ठरेल. १९९८-९९ मधे - मायबोलीच्या सुरूवातीच्या दिवसांमधे (जेंव्हा देवनागरी मधे लिहिण्याची सुविधा उपलब्ध नव्हती - रोमन स्क्रिप्ट मधे मराठी लिहिले जात असे - मिंग्लिश ) काही चांगले लिहिणार्‍या लोकांशी ओळख झाली त्यात गणेश नावाचा एक आयडी होता. माझ्या आठवणी प्रमाणे तो मायबोली वरच पहिला दीर्घ कथा लेखक. क्रमशः टाकून लिहिलेल्या त्याच्या कथांची आतुरतेने वाट पाहिली जाई. ओघवती शैली नि खिळवून ठेवणारी कथा मांडणी असे. त्यात कधी तरी पेशवा जॉईन झाला. त्याच्या मुक्त छंद कविता वाचून दिग्मूढ व्हायला होत असे. अचाट विषय - रथाचे चक्र काढणारा कर्ण, शेवटच्या घटिकेचा शिवाजी नि संभाजी ह्या 'बाप-लेका'मधला संवाद असा काही विलक्षण प्रकार असे. ह्या दोघांचे लिखाण वाचले कि मनात कुठे तरी काही तरी उसळून येत असे. कुठे तरी व्यक्त होण्याची उर्मी उफाळत येत असे. त्याच एका तिरीमिरीमधे मी एका मनस्वी स्वभावच्या मुलीचे मनोगत अशा स्वरुपात एक लघु कथा लिहिली. तिला नावही दिलेले नव्हते. मायबोलीवर टाकली नि अर्ध्या तासात त्यावर पहिली पोस्ट आली ती पेशव्याची होती - जी त्याने त्या लघु कथेचा पुढचा भाग - फक्त त्या मुलीच्या प्रियकराच्या द्रूष्टीकोनातून लिहिली होती म्हणून लिहिली होती. याहू मेसेजर वर त्याने मेसेज करून "त्या प्रतिक्रियेबद्दल राग मानू नकोस - फक्त तू लिहिलेले वाचून मला उत्तर म्हणून पुढे लिहावेसे वाटले - हीच माझी पोचपावती" अशा स्वरुपाचे काही तरी पोस्ट होते. पेशव्या सारख्या सिद्धहस्त मनुष्याला माझ्या लिखाणा वरून पुढे लिहावेसे वाटाले ह्यावरून माझी गाडी थेट आकाशात पोहचली. नंतर एका दिवसानंतर परत उत्तर काय द्यायचे ते सुचेना म्हणून मी स्पिन द यार्न टाईप्स मधे पुढचा भाग मुलीच्या कल्पनेमधून टाकला. दरम्यान मायबोलीकरांनी लवकर पुढे लिहा असा तगादा सुरू केला होता. बस्स - फक्त एव्हढ्याशा छोट्या प्रसंगातून आम्ही एकमेकांना उत्तरे देत आहोत अशा थाटामधे 'त्या वळणावर' नावाची कथा म्हणा कादंबरी म्हणा लिहिली होती. एकमेकांशी कधीही कथा कशी पुढे न्यायची - कसा शेवट करायचा इत्यादी बद्दल कसलीही चर्चा केली नाही. समोरच्याने लिहिलेले वाचून पुढचा धागा नेत राहायचा. नंतर काही वर्षांनी स्वाती (आंबोळे कि परांगदा झालेली स्वाती ते आठवत नाही) म्हणाली म्हणून एकट्यानेच वळणाचा दुसरा भाग लिहायचा निष्फळ प्रयत्न केला होता. कोणा तरी सज्जन आयडी ने जुने वळण देवनागरी मधे बदललेले होते पण मी करंटेपणाने सेव्ह केले नाही.

काहि महिन्यांनंतर ह्या प्रकाराची टर उडावायला म्हणून मी नि हवाहवाई ह्या आयडी ने हलक्या फुलक्या स्वरुपात म्हणता येईल अशी एकमेकांच्या प्रेमात पडत गेलेल्या मध्यमवर्गीय मुला-मुली ची डायरी 'डायरी दोघांची' लिहिली. लोकांनी ती पण भरपूर डोक्यावर घेतली. बर्‍याच मायबोलीकरांना त्यांचे सुप्त प्रेमभंग नि क्रशेस वगैरे त्यातून आठवले असे वन ऑन वन गप्पांमधे सांगितले गेले होते हे लोकप्रियतेचे कारण.

मायबोलीचा पहिला दिवाळी अंक काढण्याची जबाबदारी आम्ही निवडक लोकांनी डोक्यावर घेतली तेंव्हा दिवाळीला जेमतेम ५-६ दिवस होते. बाबापुता करून लोकांकडून साहित्य गोळा करून घेतले नि अनुक्रमणिका बनवताना अगदीच त्रोटक वाटते आहे असे वाटल्यामूळे तेंव्हाच्या अचाट काँफिडन्स मधे वात्रटिका लिहिल्या होत्या (नशिबाने तो प्रकार - वात्रटिका लिहिणे हा, अंक नाही - तिथेच थांबला)

थोडक्यात, कोणी तरी काही लिहिले म्हणून माझ्याकडून काही तरी लिहिले गेले - तत्कालीन लोकांना ते आवडले होते - (स्वयंसुखासाठी खरंच आवडले होते असे धरून चालतो कारण न आवडलेल्या गोष्टींना तेंव्हा लोक न घाबरता फीडबॅक देत असत हे views and comments ह्या सेक्शनची एकंदर साईझ बघता लक्षात येते. सौजन्य वगैरे नंतर सुरू झाले ) ह्यातले बरेचसे आता जुन्या मायबोलीवर आहे कि नाही त्याचीही कल्पना नाही.

===========

वर काही जणांनी त्यांच्या लिखाणप्रक्रियेचे विवेचन केलय. भारावून टाकणारे वाटले कि लोक किती बारकाईने विचार करतात ते. भरत नि अस्मिताचे पोस्ट्स पॉज घ्यायला लावणार्‍या आहेत.

असामी, छान पोस्ट.
आता सर्वांची मनोगते वाचता आली. छानच लिहीले आहे.
ऑर्कुटची आठवण झाली.

असामी, छान मनोगत.
मी सुद्धा जुन्या मायबोलीवर होतो पण तेव्हा देवनागरी लेखन चालू झालेले होते.

समारोपांनंतर लिहिणे खरं तर औचित्यभंग होईल. >>
असे कोणीही मनात आणू नका. धागा कायमचा खुला आहे. Happy
कधीही लिहू शकता. वाचताना आनंद होत आहे

असामी, तू मायबोलीवर लिहायचास हे मला अजिबात माहिती नव्हतं.
मॅटिनीला जुने सिनेमे रिलीज व्हायचे तसं जुन्या मायबोलीवरच्या लोकांनी काही निवडक लेखन पुन्हा पोस्ट करा की...

असामी
दोन लेखकात एक कथानक छान कल्पना आहे....
छान अनुभव कथन....

माझे मनोगत झाले असले तरी त्याला एक पुरवणी जोडतोय. त्या निमित्ताने एका लेखनप्रकाराकडे वाचकांचे लक्ष वेधतो. ज्या काळी मी फक्त दैनिकांमध्येच पत्रलेखन करीत होतो तेव्हा पत्रलेखकांची संमेलने होत. एका संमेलनात एका ज्येष्ठ संपादकांनी असे सांगितले,

“नियमित पत्रलेखन करणारे लेखक हे एक प्रकारे छोटे संपादकच असतात. कित्येक वेळा पत्रलेखनाच्या सदरामधून आम्हाला आमच्या अग्रलेखाचे विषय मिळालेले आहेत”.

त्यानंतर सन 2000 मध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने एका संपादित पुस्तकाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम प्रथम केला. या पुस्तकाला ‘पत्रलेखक गौरवग्रंथ’ असे नाव दिले होते आणि त्यात निवडक लेखकांची पूर्वी प्रसिद्ध झालेली पत्रे छापली होती. त्यामध्ये माझ्या ‘गर्भलिंग निदानाविरोधात’ लिहिलेल्या पत्राचाही समावेश होता.

मराठी साहित्यात वलयांकित व्यक्तींनी आपल्या कुटुंबीयांना किंवा परिचितांना लिहिलेली पत्रे या स्वरूपाची पुस्तके अल्प प्रमाणात आहेत. परंतु, अनेकांची पत्रे एकत्र संकलित करून पुस्तक करण्याचा पत्रकार संघाचा तो उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण होता.

फार छान मनोगतं वाचायला मिळताहेत या उपक्रमामुळे. आपापल्या लिखाणाकडे आणि त्यामागच्या प्रेरणांकडे अंतर्मुख होऊन बघताना त्या आरशात प्रत्येकाला दिसलेली प्रतिबिंब हृद्य आहेत. तो आरसा दाखवल्याबद्दल कुमारसरांचे आभार. Happy

असामी, तू म्हणतोस ती स्वाती मी नाही हे नक्की. माझ्या मायबोली पदार्पणाआधीचे दिसताहेत हे उद्योग उल्लेख. Proud Happy

आता मलाही या आरशात डोकवायचा मोह होतो आहे. लिहिते जमल्यास एकदोन दिवसांत.

असामीचे वाचुन लक्षात आले, पेशवे गायब झालाय. परत ये म्हणावं.

मनोगतं नुसती चाळली आहेत, पुर्ण नाही वाचली. वाचणार आहेच.

मला कथा/कादंबर्‍या लिहिणार्‍या लेखकांच्या डोक्यात इतके सलग तपशीलवार विचार/घटना किती जलद वेगाने उमटत असतील याचे नेहमीच फार कुतुहल वाटत आले आहे. ते विचार झरझर डोक्यात उमटत जातात की विचार करुन आठवावं लागतं हे कधीतरी जाणून घ्यायचंय.
स्वतःला कणभरही लेखनकला अवगत नसल्याने (कथा वगैरे तर फार लांबची गोष्ट), मनात विचारांची पालवी, झाड, फांद्या काहीही फुटतच नसल्याने याचे उत्तर ऐकायला, ही कला कितव्या वर्षी अवगत झाली वगैरे वगैरे हे कथालेखकांकडुन वाचायला फार आवडेल. प्लीज ज्यांना जमेल त्यांनी हे पण लिहा.

मायबोली आणि अन्य काही संस्थळांवर उत्तम टीकाही वाचायला मिळाली. टीकेचं महत्व समजलं.
बहुधा स्वाती आंबोळे यांचीच टीका मायबोलीवर वाचली. अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर सतीश तांबे, मुरली खैरनार, गणेश मतकरी अशांची टीका आजही वाचायला मिळते.
वसंत बापटांच्या कवितेवर विंदांनी लिहीलेली टीका वाचायला मिळाली.
बापटांनीही तीन कवींवर लिहीलेले आहे. आनंद माडगूळकर घरी यायचे तेव्हां टीका कशी शिकवते, कधी कधी खच्ची करते यावर एकदा बोलले होते.
टीकेमुळे लेखकात सुधारणा होते. फक्त स्तुती ऐकायची सवय असणे हे घातक आहे.
ऑर्कुटच्या काळात जे प्रामाणिकपणे लिखाण कसे वाटले हे सांगताना नकारात्मक बाजू दाखवायचे त्यांचा राग येई. पण आज त्यांचेच मुद्दे लक्षात आहे. वाह छान केव्हांच विस्मरणात गेले. थोड्या काळाने का होईना जे सत्य आहे ते मेंदूचा ताबा घेतेच.

मांडव न उतरवता सोहळा सुरू ठेवायची Happy
>>>
मुख्य मांडव उतरला असला तरी त्यानंतर उभे राहणारे 'उप'मांडव आवडले आणि त्यांचे नेहमीच स्वागत असेल !
तिकडे प्रतिसाद दिला आहे

कुमार सरांचे मन:पुर्वक आभार. त्यांच्या उपक्रमामुळे अक्षरशः मेजवानी मिळतेय. इथली नवीन मनोगते, प्रतिक्रिया आणि नवीन प्रवेशिका. मजा येतेय.

वाचतोय.
नवीन प्रतिक्रिया वाचल्या- आवडल्या. छान धागा.

पांढऱ्यावर काळे - उचलले बोट बडवला कळफलक

डॉ. कुमारांच्या धाग्यामुळे अनेकांना लिहायला प्रेरणा मिळाली. कित्येकांनी प्रतिक्रिया दिल्या, काही सदस्यांनी स्वतंत्र लेख लिहिले तेव्हा विचार केला ह्या सगळ्या दिग्गजांच्या मांदियाळी मध्ये काही ओळी खरडण्याचे धाडस करावे. अगदीच उपमांडव नाही तर कमीत कमी उपमांडवासाठी एखादी काठी व्हावे.

शाळेत असताना निबंध लेखनाला बरेच वेळा चांगला शेरा मिळायचा. काही गुरुजनांनी तर वर्गासमोर निबंध वाचायला लावल्याचे आठवते. वाचनाची आवड होती परंतु त्याला शिस्त नव्हती. अगदी अधाशासारखे जे हाती पडेल ते वाचायचो, वाण समान बांधून आणलेले वर्तमानपत्राचे कागद देखील सोडायचो नाही.

शालेय जीवनानंतर तेव्हा उपलब्ध असलेल्या दोन धोपट मार्गांपैकी एक मार्ग पकडून घिसाडी व्हायचे ठरल्यावर मराठीचा संबंध संपला. एका आंग्लमाध्यमिक वर्गमित्रामुळे इंग्रजीतील बाबुराव अर्नाळकर, जेम्स हॅडली चेस ह्यांचा परिचय झाला. त्यांच्या साध्या, सोप्या आणि ओघवत्या भाषेमुळे (मराठीत सिम्पल अँड ल्युसिड लँग्वेज) इंग्रजी वाचनाचा सराव झाला. मग पुढे थोडे फार इंग्रजी वाचन झाले.

शिक्षण संपल्यावर
पाँच बरस का भोला भाला अब तो बीस भयो ।
मकर पच्चीसी माया कारन, देश विदेश गयो ॥
अशी अवस्था झाली आणि जीवनाच्या रामरगाड्यात अडकलो. लेखन मागे पडले, नाही म्हणायला साहेब मंडळींनी एक दोन वेळा माझे ड्रॉफ्टिंग चांगले आहे असे कौतूक केले खरे परंतु ते तेव्हढ्या पुरतेच.

पुढे भाकरीच्या चंद्राच्या शोधार्थ साता समुद्रापल्याड कर्मभूमीत आलो. अक्षर अगदीच वाईट नसले तरी हाताने लिहायचा कंटाळा असल्याने फारसे पत्र व्यवहार झाले नाहीत, इ-मेल पाठवायचो परंतु ते आंग्ल भाषेत असत. अगदी चित्रदर्शी वर्णन आहे असे कौतुक असले तरी मराठीत लिहायची मज्जा त्यात नसे.

Y2K नंतर माहिती तंत्रज्ञानाचा जणू स्फोट झाला आणि आंतरजालाचा जोरात प्रसार झाला. घरी असताना फारतर एक किंवा दोन छापील वृत्तपत्रे वाचायचो, आता मात्र झाडून सगळे, आंजावर असतील नसतील ती मराठी वृत्तपत्रे वाचायला लागलो. एकदा अचानक माबोचा शोध लागला आणि एखादा खजिना समोर आल्यासारखे वाटले. अधाश्यासारखे वाचन केले परंतु बराच काळ केवळ वाचनमात्र होतो.

पुढे सदस्यत्व घेण्याचे धाडस केले. तुम्हाला हवे ते सदस्य नाम घेता येते ही माझ्यासाठी मोठी पर्वणी होती कारण माझे खरे नाव ठेवताना कोणी मला शष्प विचारले नव्हते की माझ्या मतांचा विचार केला नव्हता. बऱ्याच विचारांती मराठीतील पहिला शिलालेख लिहिणारे "श्री चामुंडराये करवियले" ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन चामुंडराय सदस्य नाम घेण्याचे ठरवले (त्या वेळी वेगवेगळ्या सदस्यनामांच्या प्रसव वेदना आठवतात).

अंगभूत काकदृष्टी आणि छिद्रान्वेषी, वक्रोक्तिपूर्ण स्वभावामुळे सुरवातीला काही कवितांचे विडंबन केले परंतु ती केवळ शाब्दिक तोडफोड होती, वरीजनल कवीची प्रतिभा खरी! कवितेला फारसा ट्यार्पि नाही हे लवकरच लक्षात आले त्यामुळे काही पद्य विडंबन केले, काही लेख लिहिले. येथील पांडित्यपूर्ण, विद्वत्तापूर्ण आणि आपापल्या क्षेत्रात प्रथितयश लेखकांपुढे / लेखिकांपुढे आपण य:कश्चित आहोत ही जाणीव झाली तरी देखील नाउमेद न होता अधून मधून काहीबाही खरडत असतो.

असो, प्रतिसाद फारच मोठा झाला बहुधा. तो तुम्ही शांतपणे वाचलात त्याबद्दल आपला ऋणी आहे. कळावे, लोभ असावा.

प्रश्न

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण. १९९५ साली 'नवा बहर' नावाचे पहिले पुस्तक (मराठी गजला) झाले. २०१९ साली दुसरे पुस्तक 'घेतली भरारी ...' (मराठी गजला आणि कविता) झाले. २०२२ साली आत्म अनुभवांचे (सैनिकी अनुभव) 'सैनिक हिमालयाचा' या पुस्तकाच्या दोन प्रिंट आवृत्ती झाल्या आणि २०२३ साली ई पुस्तक झाले. त्याशिवाय करकायद्यांवरील दोन पुस्तके (फक्त माझ्या क्लायंटसाठी० आहेत.

२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही

३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी

४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो. कविता, कथा ,ललित

५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ? कवितेचे प्रेरणास्रोत - कवयित्री शांता ज. शेळके आणी गजलांसाठी इलाही जमादार

६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव. लोक फारसे वाचत नाहीत. खूप जाहिरात करावी लागते.

Pages