गोष्टी हेमलकशाच्या भाग ६

Submitted by Nootan on 10 February, 2009 - 11:56

हेमलकशाला मी पहिल्यांदा गेले तेव्हा दवाखान्याचा डेटा एण्ट्री प्रोग्राम आणि शाळेच्या मुलांना संगणक शिकवणं अशा दोन जबाबदार्‍या मी स्वीकारल्या होत्या. जून २००८ मध्ये तिथे गेले तेव्हा कळलं की नाशिकच्या मुक्त विद्यापीठातर्फ़े एक संगणक शिक्षक आणि ८ लॅपटॉप अशी व्यवस्था झालेली आहे.
मी नेमकं काय करावं अशी चर्चा अनिकेतशी केली तेव्हा असं कळलं की संस्थेला देणगी रूपात ३०-४० संगणक मिळालेत, पण त्या सगळ्यांचे भाग सुटे करून पाठवले गेलेत. ते योग्य प्रकारे जोडून, संगणक प्रयोगशाळेची ’मांडणी’ करायची गरज आहे. एका ६० बाय ४० फ़ुटांच्या गोडाऊनमध्ये इतर टाकाऊ सामानाबरोबर ह्या ’देणगी’ तून आलेल्या संगणकांचे बॉक्सेस पण Dump केलेले होते.
संस्थेतले सचिन मुकावार आणि उज्ज्वला मॅडम यांना सोबत घेऊन ते सगळे मृतवत् संगणक बॉक्सेसमधून बाहेर काढले. जरा अंगमेहनतीचंच काम होतं ते ! त्यातून विदर्भातला उन्हाळ्याचा Peak Season, पाहिला पाऊस पडण्याच्या आधीचा घुसमट वाढवणारा काळ. सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज नाही. अगदी किमान हालचाल केली, नुसते हात हलवले तरी (किंवा खरंतर नाही हलवले तरीही) आंघोळ केल्यासारख्या घामाच्या धारा! त्या 60 X 40 फ़ुटांच्या आणि दीड मजला उंचीच्या गोडाऊनमध्ये एका कोपर्यात एक केविलवाणा पंखा फ़क्त बसवलेला होता. म्हणजे दुपारी वीज आल्यानंतरही उकाड्यात फ़ार काही बदल होणार नव्हताच.
तशी दिवसभर मी दवाखान्यात जिथे डेटा एण्ट्रीचं काम करत होते तिथे जनरेटर बॅक-अप होता, गवताच्या बॉक्सचा कूलर चालू असायचा. पण संध्याकाळी दवाखान्यातली डेटाएण्ट्री संपल्यावर शाळेच्या संगणकांचं काम करायला जावं तर तेव्हा तिथे अंधार असायचा, सकाळी दवाखाना सुरू होण्यापूर्वी जावं तर तेव्हा वीजच नसायची. कधी करावा हा उद्योग? शेवटी इलेक्ट्रिशियन भाऊजींनी अजून २-३ ट्यूबलाईटस् लावल्या आणि मग संध्याकाळी संगणक प्रयोगशाळेचं काम करणं शक्य झालं.
१९८८ साली इथे नावाला वीज आली आणि १९९० पासून पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा सुरू झाला, तोपर्यंत इथे मंडळी कशी राहात होती त्याची एक किरकोळ झलक मला मिळाली. लोक बिरादरीची आर्थिक परिस्थिती त्या काळापेक्षा आज बरी असली तरीही, डोकं झाकलं तर पाय उघडे आणि पाय झाकले तर डोकं उघडं एवढंच पांघरूण जेमतेम आहे. शेवटी संगणक शिक्षणापेक्षा अन्न-वस्त्र-निवारा या गरजा अधिक प्राधान्याने भागवल्या पाहिजेत, हेही तितकंच खरं.
पण तरीही तिथले इलेक्ट्रिशियन ’भाऊजी’ आणि ’चिमूलकर’ यांनी अजून एक पंखा, ४ ट्यूबलाईटस्, २-३ स्विचबोर्डस् असं काय काय त्या गोडाऊनमध्ये बसवून ’संगणक प्रयोगशाळा’ नावाचं एक देखणं शिल्प उभं केलं. रमेश, योगेशने नेटवर्किंगचे तक्ते लावून भिंती सुशोभित केल्या. सचिन मुकावारांनी एक फ़र्स्ट्क्लास ग्लास ब्लॅकबोर्ड बसवून एकदम ’लेक्चरहॉल’ चं रूप आणलं.
महिन्याभरात १६ संगणक जोडून चालू झाले. याचा मॉनिटर त्याला जोडून बघ, त्याचा माऊस बदलून बघ, कुणाची RAM वाढव, याची कनेक्शन्स पुन्हा घट्ट बसव, त्या एकावरचं WINDOWS reload कर, असं करता करता एक एक संगणक सुरू व्हायला लागला. पुण्याच्या एकेका फ़ेरीत एकेक गोष्ट मी नेत असे. साधं WINDOWS XP किंवा MS OFFICE चं लेटेस्ट व्हर्जन मिळवणंही मुश्किल. इथे पुण्यात नुसता मनात विचार आला तरी हजार पर्याय हाताशी उपलब्ध असतात.
मॉनिटर्स चेक करणं सगळ्यात जास्त घामटा काढणारं काम. एक मॉनिटर उचलून टेबलावर ठेव, वायर्स जोडून बघ, चालू झाला तर ठीक, नाहीतर तो उचलून खाली ठेव, दुसरा उचलून वर ठेव. असं weight lifting चाललं होतं.
हे सगळं करताना कधी कधी मनात यायचं की देणगी देणार्‍यांनी जरा चांगले संगणक का नाही दिले? पाश्चात्त्य देशांतला इलेक्टॉनिक कचरा जसा ’Community Service ’ च्या नावाखाली Developing Countries मध्ये dump केला जातो, तसंच काहीसं तर हे नव्हे? देणगी द्यायची तर चांगल्या वस्तूंची देणगी का नाही दिली जात?
इथे पाठवल्या जाणार्‍या कपड्यांबाबतही हाच अनुभव अनेकदा येतो. आलेल्या कपड्यांचं वयानुसार sorting करणं, त्यातल्या गलिच्छ कपड्यांची वेगळी वासलात लावणं ही कामं मंदावहिनी, अनघावहिनींनी करत बसावं? वैद्यकीय उपचारासारखं अधिक उपयुक्त काम करणार्‍यांची शक्ती आणि वेळ, जुन्या कपड्यांच्या व्यवस्थेमध्ये वाया जावी? इथे एकूणच कामांचा पसारा आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचं प्रमाण व्यस्तच. जर मंदावहिनींनी नाही केलं तर ही गाठोडी तशीच पडून राहाणार. प्रत्येकामागे काहीना काही कामाचा झक्कू आहेच. मंदावहिनींचं Time Planning चं कौशल्य अफ़ाट असल्यामुळे इतरांपेक्षा अधिक व्याप त्यांच्यामागे असूनही त्या अजून अधिक कामांसाठी वेळ देऊ शकतात.
संगणक उभारणीच्याबरोबरीने या संगणकांसाठी टेबलं, बसायला खुर्च्या-स्टुलं असा जामानिमा हळुहळू गोळा झाला. ही सगळी टेबलं-स्टुलं-खुर्च्या खरंतर comfortable नाहीयेत, उंच टेबलं, बुटकी स्टुलं आणि कीबोर्डवरचा कमी उजेड (आणि ५-वी-६वी ची चिमुरडी मुलं) यांमुळे सलग तासभर संगणकावर काम करणं जरा अवघड जातं. पण जिथे काहीच नव्हतं तिथे हे एवढंसुद्धा खूप आहे.
बहुतेक सगळ्यांवर MS Office लोड करावं लागलं, कारण ज्यांनी ’देणगी’ दिली त्यांना बहुधा MS Office लागतंच नव्हतं, त्यांचं स्वत:चं काहीतरी सॉफ़्टवेअर त्या संगणकांवर लोड केलेलं होतं, ते काढून टाकलं आणि मुलांना प्राथमिक ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रोग्राम लोड केले.
आता लोक बिरादरी प्रकल्पामध्ये प्राथमिक संगणक वर्ग व्यवस्थित सुरू झालेत. १४ संगणक व्यवस्थित चालू आहेत. मायबोलीच्या माध्यमातून उदय लंकेंनी पाठवलेल्या देणगीतून नवनीतची माहिती तंत्रज्ञानाची मराठी, उत्तम illustrations असलेली पुस्तकं मुलांना मिळाली आहेत.

Comp_Lab_1.jpg

जानेवारीपर्यंत जराशी आकाराला आलेली ही ’संगणक प्रयोगशाळा’

अनिकेतने एक झकास नवा कोरा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणून बसवला. संस्थेने या कामासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून एक स्वतंत्र शिक्षक नेमला आहे. दुपारी १२ ते ५ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळात अर्ध्या-पाऊण तासांच्या, १४-१४ मुलांच्या ८-९ बॅचेस दिवसभरात इथे येतात, आपल्या पूर्वजांच्या आदिम संस्कतीला आधुनिक तंत्रयुगाची जोड देऊन आपलं भविष्य उज्ज्वल करण्याची स्वप्नं बघतात. कित्येक ज्ञात-अज्ञात हातांनी हे स्वप्नशिल्प उभं केलंय, त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
पण हे ’देणगी’तून आलेले संगणक हळुहळू एकेक करून बंद पडणार. जुलैमध्ये १६ संगणक चालू होते, आज जानेवारीत २-३ बंद पडलेत. उन्हाळ्यात तर या दोन पंख्यांच्या ’वेंटिलेशन’च्या ताकदीवर अजून किती संगणक वैदर्भीय उन्हाळ्यात तग धरतील कोणास ठाऊक ! तसंही या आडभागात येऊन ’Computer Maintenance' कोण करणार. बिरादरीच्या आवारात इतरत्रही संगणकांची संख्या वाढतेच आहे - दवाखान्यात, संस्थेच्या कार्यालयात, प्रकाशभाऊ-विलासभाऊ-दिगंत यांच्या घरी, शाळेच्या कार्यालयात, मुख्याध्यापकांच्या घरी - ही संख्या काळानुरूप वाढतच राहाणार. त्यामुळे नवे संगणक आपले आपणच बनवले, जुन्यांच मेंटेनन्स स्वत:च करू शकलो तर चांगलं, या विचाराने आता संगणक जुळणीचा पुढचा उपक्रम हाती घ्यायचा विचार करतेय.
विज्ञान आश्रम, पाबळ यांनी विविध विषयांवरच्या सीडीज 'लोक बिरादरी प्रकल्पा'ला भेट दिल्या होत्या. त्यापैकी ’संगणक जुळणी’ च्या सीडीज डिसेंबर जानेवारीत काही मुलांना दाखवल्या, जुने संगणक त्यांच्याकडून Dissemble-Assemble करून घेतले.
Comp_Lab_2.jpg

Comp_Lab_3.jpg

हे सोमजी आणि राकेश - जुन्या संगणकांवर हात ’साफ़’ करून घेतायत.

देणगी म्हणून मिळालेल्या संगणकांपैकी १४ संगणक व्यवस्थित चालताहेत. अजून १५-२० संगणकांचे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, हार्ड डिस्क, सीडी ड्राइव्हज, SMPS चांगले आहेत. फ़क्त मदरबोर्ड आणि प्रोसेसर्स नवे घेतले तर हे सर्व संगणक assemble करून वापरता येतील.
अशा पद्धतीने जनं पण चालू अवस्थेतले भाग वापरून फ़क्त रु.५ ते ६ हजारांत एक संगणक 'उभा' करता येतो, मुलांना स्वत: assembling शिकता येतं, देणगीतून आलेल्या आणि काळाबरोबर टाकाऊ झालेल्या संगणकीय सामानातून उपयुक्त सामान कामी आणता येतं.
हा असा उपद्व्याप पूर्वी पुण्याच्या ’विद्यार्थी साहाय्यक समिती’ या संस्थेत यशस्वीरित्या राबवला होता. तेव्हा ग्रामीण भागातून दहावी पास होऊन आलेल्या त्या मुलांच्या चेहर्‍यांवर ’संगणक assemble' केल्याचा जो आनंद पाहिला होता त्याला तोड नाही. तेव्हा त्या मुलांना या क्षेत्राचं जे वेड लागलं त्यातून त्यांनी याच क्षेत्रात शिक्षण घेतलं. एकजण BE (Comp.) झाला आणि आता पुण्यात स्वत:चा ’Computer Hardware-Software Supplier' चा व्यवसाय करतोय, दुसरा BE (IT) करून HSBC या सॉफ़्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीत सॉफ़्टवेअर इंजिनिसर आहे, तिसरा IBM मध्ये Application Engineer आहे.
आता पुन्हा हेमलकशाला हाच उपक्रम राबवावा अशी इच्छा आहे. यासाठी आर्थिक मदत (रु.५०००/- एका संगणकासाठी) मिळवण्याच्या प्रयत्नात सध्या आहे. आज संस्थेकडे कदाचित या कामासाठी अर्थबळ असेलही. पण मला आपलं असं वाटतं की तो पैसा इतर अधिक आवश्यक गरजांसाठी आहे. तसं पाहिलं तर संगणक जुळणी आणि मेंटेनन्स हे तसं जास्तीचं काम - थोडसं मीच माझ्या मनाने वाढवलेलं. म्हणून या कामासाठी आधीच्या गंगाजळीतला पैसा वापरण्यापेक्षा नव्याने, निव्वळ या कामासाठी म्हणून पैसा उभा करावा असं वाटतंय.
गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/4810
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गुलमोहर: 

नुतन, छान आहे तुमच लिखाण. तुमच्या मुळे "तिथली" अजुन ओळख झाली. तुम्हाला विचारपुस मधे लिहिलय.

नूतन,

पहिल्यांदाच तुम्हाला वाचतोय आणि लिहितोय.
तुम्ही जे कार्य करता आहात त्यासाठी शुभेच्छा!

शरद

नुतनताई तुम्ही हेमलकशाची एक वेगेळी ओळख करुन दिलीत. आज तुम्ही आमच्यातुन खुप दुर निघुन गेलात पण तुमचं कार्य सदैव आमच्यासोबत , हेमलकशाच्या मुलांसोबत कायम राहील . ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो.