गोष्टी हेमलकशाच्या भाग ४

Submitted by Nootan on 28 December, 2008 - 14:49

संपूर्ण सन्नाटा . . . , एकाएकी सगळीकडे पसरलेली शांतता . . . , दाट काळ्या शाईसारखा मिट्ट अंधार . . .
Just काही क्षणांपूर्वी या इथेच १४ मुलं १४ computersवर धडाधड काम करत होती, या ३० फ़ूट बाय ६० फ़ूट हॉलमध्ये १४ computersचा humming sound भरून राहिला होता, याच जागेत (पूर्वीचं गोडाऊन, आताची Computer Lab.) ४ ट्यूबलाईटस्‌, दोन पंखे, १४ मुलं, १४ computers आणि मी, सगळं full speedमध्ये ’चालू’ होतं आणि अचानक काय झालं होतं?
तर . . . वीज गेली होती!
डोळ्यात बोट गेलं तरी पत्ता लागणार नाही असा अंधार, हे वर्णन आजपर्यंत नुसतं वाचलं होतं, पण त्या दिवशी खरं कळलं म्हणजे नेमकं काय ते! माझंच बोट माझ्याच डोळ्यांपर्यंत आलं तरी माझं मलाच कळणार नाही असा मिट्ट अंधार . . .
काही दिवसांपूर्वीचीच ही गोष्ट. हेमलकशाला संगणक वर्ग सुरू होऊन काही महिने लोटले होते. वर्ग अगदी ऐन भरात आलेला असताना अचानक वीज गेली होती.
हे असं काही पुण्यात झालं असतं तर हो ऽऽऽऽ करून मुलांनी सगळी लॅब डोक्यावर घेतली असती. मी सुद्धा ही obvious reaction म्हणून सहजपणे स्वीकारलीही असती.
पण इथे? सगळं शांत. जणू काही मुलंही electric supply वर चालत होती आणि वीज जाताच त्यांचीही हालचाल, आवाज सगळं बंद पडलं होतं. शहरातल्या हुल्लडबाज मुलांना सरावलेल्या मला ही शांत reactionच पचनी पडत नव्हती.
ही फ़क्त एकच घटना सांगतेय. पण अशा अनेक प्रसंगांतून जाणवतं की कुठल्याही गोष्टीवर तीव्र reaction कधीच देत नाहीत ही मुलं. एखादी ट्यूबलाईट कमी वोल्टेजमुळे एकाएकी बंद पडायची, कीबोर्डवर कमी उजेड पडायचा आणि टायपिंग करताना खूप जवळून कीबोर्ड बघावा लागायचा, माऊस तर कित्येकदा अडकून बसायचे, पॉईंटर हलायचाच नाही, एखादा computerच अचानक बंद पडायचा, माझी चिडचिड व्हायची; पण मुलं शांत.
OPDतसुद्धा एखादा जरासा ’सुधारलेला’, बिगरआदिवासी पेशंट कधीकधी स्वत:चंच घोडं पुढं दामटायचा प्रयत्न करायचा, रांगेत पुढे घुसू पाहायाचा तेव्हाही मागचे आदिवासी पेशंट कधी चिडत नसत, भांडत नसत. दिगंत-अनघाचंच बारीक लक्ष असायचं, त्या घुसखोर बिगरआदिवासी पेशंटला ही दोघं बरोबर वठणीवर आणायची.
त्या दिवशी अचानक वीज गेली तेव्हा तर दोनतीन ठिकाणी माझी tools (छोटे स्क्रू ड्रायव्हर्स, पकड), windows आणि MS Office च्या setup सीडीज्‌, नवनीतची पुस्तकं असा माझ्या दृष्टीने ’महत्त्वाचा’ ऐवज सगळीकडे विखुरलेला होता. एव्हाना मुलं आपापल्या assignments बर्‍यापैकी independently करायला लागली होती, त्यामुळे मला इतर बंद पडलेले computers दुरुस्त करायला वेळ मिळत होता.
ही टूल्स, सीडीज् आणि पुस्तकं महामुश्किलीने जमवलेला संसार होता माझा. अंधारात कुणी पळवलं असतं काही तर पुण्य़ाला परतल्याशिवाय काहीही मिळवणं शक्य नव्हतं. पुण्यातल्या शहरी मुलांच्या एकेक उपद्‌व्यापांची ओळख असलेली मी, तशाच अपेक्षा याही मुलांकडून ठेवत होते, नकळत त्यांच्या सचोटीवर शंका घेत होते.
त्या दिवशी जशी अचानक वीज गेली तशीच अचानक आली आणि तोवर ही सगळी बाळं पुतळ्यासारखी आपापल्या जागी स्वस्थ बसून होती. वीज आल्यावर सगळं काही जागच्या जागी पाहून माझ्या जीवात जीव आला आणि त्याचबरोबर स्वत:च्याच शंकेखोरपणाची शरमही वाटली.
(पण मग दुसर्‍या दिवसापासून मी स्वत:बरोबर एक कंदील आणि काड्यापेटी ठेवायला लागले.)
गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/4810
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762

गुलमोहर: