गोष्टी हेमलकशाच्या . . . भाग २

Submitted by Nootan on 13 December, 2008 - 07:36

तर,
OPDतला अजून एक प्रसंग.
८० च्या घरातली चिनाक्का, साठीच्या उंबर्‍यावरच्या आपल्या लेकाला - पेंटय्या - आंध्रप्रदेशातून इथे हेमलकशाला घेऊन आली होती. ती स्वत: खूप पूर्वी कधीतरी या दवाखान्यात आली होती. बबनभाऊ - rather इथले सगळेच जुने कार्यकर्ते - पेशंट identificationमध्ये भलतेच तरबेज. कितीही पूर्वी, एकदाच कधीतरी येऊन गेलेल्या पेशंटला, त्याच्या history सकट क्षणार्धात ओळखून ’सोडतात’.
तर बबनभाऊंनी चिनाक्काला लगेच ओळखलं. चिनाक्का आणि पेंटय्या - दोघांनाही तेलुगुशिवाय दुसरी भाषा येत नाही. इथे बबनभाऊंचं तेलुगुचं मोडकं-तोडकं ज्ञान हाच एक आशेचा किरण - बाकी सारा अंधार. बबनभाऊ झिंदाबाद!
पेंटय्याला नेमकं काय झालंय काही सांगता येत नव्हतं. दम लागत होता हे आणि हे एवढंच बाह्य लक्षण दिसत होतं.
रोज पहाटे ५ वाजता बबनभाऊ सगळ्या indoor पेशंटस‌ ना ’उठा, उठा’ करून उठवून OPD त आणतात. रात्रभर हे ’INDOOR' पेशंटस्‌ उघड्यावर, झाडाखाली, त्यांच्या सोयीसाठी बांधलेल्या घोटुलमध्ये, क्वचित कुणीतरी खोलीमध्ये झोपतात.
त्या दिवशी, पहाटेचा सगळ्यांचा औषधांचा डोस देऊन झाल्यावर बबनभाऊ घरी गेले आणि त्यानंतर चिनाक्का-पेंटय्या ही दोघं मायलेकरं आली. राधा सिस्टर आणि चिनाक्काची भाषीय जुगलबंदी झाली. त्यात राधाला एवढंच कळलं की चिनाक्काला एका मोबाईलनंबरवर फ़ोन करायचाय. जरा उजाडल्यावर कुणाला तरी सांगू असा विचार करून राधा तिच्या कामाला लागली.
पेशंटसाठीच्या सकाळच्या जेवणाची घंटा झाली. इथे तमाम सार्‍यांना विनामूल्य जेवण - पेशंटस्‌, त्यांचे नातेवाईक, प्रकल्पाचे पाहुणे-रावळे. पेंटय्या खाटेवर बसूनच जेवला.
पण थोड्यावेळाने पेंटय्याचा दम एवढा वाढला की त्याला respiratorच लावावा लागला. आधीच भाषेचा वांधा, त्यात पेंशंट स्वत:च बोलण्याच्या परिस्थितीपलिकडे पोचलेला. चिनाक्का आणि बबनभाऊंच्या शाब्दिक आणि हातवार्‍यांच्या देवाणघेवाणीतून काहीही हाती लागत नव्हतं. चिनाक्काकडच्या मोबाईलनंबरवर एकदा प्रकाशभाऊंच्या मोबाईलवरून, एकदा प्रकल्पाच्या landline वरून, एकदा दिगंतच्या मोबाईलवरून अशी दोनतीनदा फ़ोनाफ़ोनी झाली. दरवेळेस फ़ोन लावायचा, बबनभाऊंनी मोडक्यातोडक्या तेलुगुमध्ये काहीतरी बोलून म्हातारीच्या कानाशी फ़ोन धरायचा. चिनाक्का ’आम्ही लोकबिरादरीत आहोत. तू इकडे ये.’ असं - बहुधा असं - तिच्या दुसर्‍या लेकाला सांगत होती. मग बबनभाऊ जमेल तशा तेलुगुमध्ये तिला सांगायचे की, ’सिरियस आहे सांग’. मग कुठे ती पुढचं सांगायाची. कदाचित काय आणि कसं सांगावं हेच तिला सुचत नसावं.
खरंतर, ४ दिवस झालेले - नक्षलवाद्यांनी ’रस्ता बंद’ पुकारलाय. चिनाक्का दमेकरी लेकाला घेऊन इथवर आली हेच नवल. आता तिचा दुसरा मुलगा आंध्रातून निघणार कधी, ’रस्ता बंद’च्या काळात इथे पोचणार कधी आणि कसा. तसे हे नक्षलवादी सामान्यांना अडवत नाहीत म्हणा. पण वाहनंच बंद म्हटल्यावर काय करायचं?
पेंटय्याला दम कमी होण्याची, झोप लागण्याची औषधं सलाईनद्वारे देण्यापलिकडे काहीही करता येत नव्हतं.
दुपारनंतर मात्र चिनाक्काचा धीर सुटला. बारा वाजता आमच्या जेवणाची घंटा झाल्यावर आम्ही निघालो तर कॉरिडॉरमध्ये चिनाक्का मुळूमुळू रडत होती. लेकाच्या कपाळावरून हात फ़िरवत होती. त्या आईच्या मनात काय काय येत असेल, त्याचं तान्हेपण, बाळपण आणि आता तिला म्हातारीला मागे ठेऊन तो पुढच्या प्रवासाला निघालेला. तिला आतून कळत असणार पुढे काय वाढून ठेवलंय ते. किती आशेने तिने मुलाला इथवर आणलं. आल्यापासून त्याच्यात काही सुधारणा तर नव्ह्तीच, पण वेगवेगळ्या औषधांना प्रतिसाद देण्याऐवजी त्याची अवस्था खालावतच चालली होती.
जेवून आम्ही OPDत परततोय तर लेकाला कुशीत घेऊन चिनाक्का रडतेय - आवाज नाही, आक्रोश नाही. तान्ह्या बाळाने आईच्या कुशीत झोपावं तसं ते अनंताच्या प्रवासाला निघून गेलेलं, साठीच्या वयाचं ’लेकरू’ शांत विसावलं होतं.
चारच्या सुमारास बबनभाऊंचं चक्र सुरू झालं. अजून हिचा दुसरा मुलगा आला नाही. वाहनं बंद. आता याचं पुढे काय करायचं? चिनाक्काला पुढचं विचारावं म्हणून तिला बोलावलं तर मुलाचं कलेवर सोडून यायला ती तयारच होईना.
मी म्हटलं, "आता? हे असं किती वेळ ठेवता येतं?" माझ्या अगदी बाळबोध शंका. बबनभाऊ म्हणाले,
"आता काय, इथल्या पद्धतीप्रमाणे पुरायचं"
"पण त्यांच्यात अग्नि देत असतील तर?"
"इथे कोण करणार ते सगळं? इथल्याप्रमाणे इथं."
"पण कुठे पुरणार?"
" ताई, यापूर्वीही अशी बरेचदा वेळ आलीय. बिरादरीच्या जमिनीने अशा कित्येकांना सामावून घेतलंय."
म्हणजे, नुसते औषधोपचार अन्‌ नातेवाईकांसकट जेवणच नव्हे तर ही मृत्यूनंतरची क्रियाकर्मही करायची तयारी - मानसिक ! - ठेवायची. धन्य आहे.
शेवटी सकाळपर्यंत थांबायचं ठरलं, सकाळी चिनाक्काचा दुसरा मुलगा आला एकदाचा आणि पेंटय्याचा प्रश्न (मृत्यूनंतरचा) सुटला.
हेमलकसासारख्या आड्जागी आजही जायचं म्हणजे आपण शंभरदा विचार करतो, ’Planning' वगैरे करतो. आणि ही माणसं दमेकरी माणसाला घेऊन पार आंध्र प्रदेशातून इथे येतात, 'आशा' नावाची शक्ती त्यांना सगळ्या अडचणींवर मात करायला लावते.
सर्वार्थाने 'लोकबिरादरी' आहे ही!

गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762

गुलमोहर: 

जबरदस्त आहे! मुळापासून हलवून टाकणारं!

आयटीशी सहमत. खरच मुळापासून हलवणारं आहे, हे सगळं. इथे मन ठिकाणावर ठेऊन काम करू शकणार्‍या तुमच्यासारख्यांना साष्टांग नमस्कार!