गोष्टी हेमलकशाच्या भाग ५

Submitted by Nootan on 28 December, 2008 - 16:08

संध्याकाळी ७ ते ९ अशी संगणक वर्गाची वेळ असली तरी मी साडेसहा-पावणेसातलाच वर्ग उघडते. सगळे १४ च्या १४ PC नीट चालताहेत ना, सगळे माऊस smoothly वागतायत ना, My Documents च्या व्यातिरिक्त इकडेतिकडे कुठे फ़ाइल्स Save करून पडल्या नाहीयेत ना वगैरे वगैरे तपासलेलं असलं की सातच्या बॅचचं Practical बरोब्बर सातलाच सुरू करत येतं.
पहिल्या बॅचमधली काही मुलं सगळ्या बाबतीतच Fast होती - नवनव्या Commands पट्‌कन्‌ Graspही करत असत आणि त्यांचं आपापल्या मनानं विविध ठिकाणी application सुद्धा करत असत. योगेश सडमेक, रमेश मज्जी हे त्यांतले आघाडीवीर. चित्रं, graphics त्यांना चटकन समजत असत.
Network च्या प्रकारांचे मोठे तक्ते प्रयोगशाळेत लावावेत असं माझ्या मनात आलं. सतत डोळ्यासमोर अशी illustrations असली की आपापल्या grasping speedने त्या त्या कल्पना समजून घेता येतात. माझ्याकडे या चित्रांच्या soft files होत्या. पण इथे चांगला प्रिंटर, enlarged prints काढायची काहीच सोय नव्हती.
एकदा योगेश आणि रमेश, दोघांचंही नेमून दिलेलं काम संपलं होतं. त्यांच्या practical बॅचची अजून १५-२० मिनिटं बाकी होती. माझ्याकडच्या LAN, WAN वगैरेच्या चित्रांच्या soft files त्यांना दाखवल्या आणि अशी चित्रं हाताने काढता येतील का, असं विचारलं. दोघंही हरखून गेले, होऽऽ म्हणाले.
रेणुकाताईंकडून स्केचपेन्स, सचिनसरांकडून तक्त्यांसाठी मोठे कागद असा सगळा जामानिमा गोळा झाल्यावर, एका रविवारी सकाळी ८ वाजता या दोघांना प्रयोगशाळेत बोलावलं, त्यांच्या समोर सगळं सामान ठेवलं, त्या चित्रांची छोटी printouts अनघाने काढून दिली होती, ती त्यांच्यासमोर ठेवली. चार मोठे तक्ते, A1 साईझचे बनवायचे होते.
" किती दिवस लागतील?"
"आज संध्याकाळपर्यंत"
मला पहिला धक्का. पण तरी वाटलं, मुलं आहेत, उत्साहाच्या भरात वेळेचा नेमका अंदाज नसेल. तासाभराने, नऊच्या सुमारास माझ्या लक्षात आलं, मी इथेच बसून राहिले तर OPDतलं काम रखडेल आणि इथून हलले तर यांच्यावर कोण लक्ष ठेवणार? मी अजूनही पुण्याच्या मुलांसारखंच यांना समजत होते. मनात आलं, ही सगळी प्रयोगशाळा, ही स्केचपेन्स सगळं यांच्या भरवंशावर सोडावं की नाही. म्हटलं थोडा धोका पत्करून तर पाहू. विश्वास टाकला, की आपोआप जबाबदारीने वागतील. दोघांनाही समजावून दिलं की, "ही आपली प्रयोगशाळा आहे, आपण उभी केली आहे, सगळी प्रयोगशाळा तुमच्यावर सोपवून जातेय, सगळ्या सामानाची नीट काळजी घ्यायची, कोणाला आत येऊ द्यायचं नाही, दंगा करायचा नाही, मी OPDतच आहे, काही लागलं तर एकाने मला येऊन सांगायचं", वगैरे, वगैरे.
मी देहाने OPDत होते, पण मनाने शाळेतच. आपण आगाऊ साहस तर नाही ना करत आहोत, सगळ्या कामांचं आपण नीट scheduling च करत नाही, असे कसे overlap होतात कार्यक्रम . . . असं स्वत:लाच कोसत बसले.
शेवटी ११.३० वाजता गेलेच शाळेत. सगळं शांत, कुठेही दंगा नाही, गडबड नाही, दोघंही संपूर्ण समाधीमग्न होऊन तक्ते काढतायत. ९ ते ११.३० सलग अडीच तास एका जागी बसून ही गुणी बाळं काम करतायत. मला स्वत:च्या शंकेखोर स्वभावाची लाज वाटली. आणि चित्र तर माझ्या कल्पनेपेक्षा आप्रतिम काढली होती. एकाच छापाचे अनेक computers खूप ठिकाणी काढायचे होते, ते सर्व अगदी एकासारखे एक, जणू काही संगणकवरच Copy-Paste केलेयत. त्यांना म्हटलं, "मस्तच काढलेत तक्ते. उरलेले २ तक्ते आता जेवणानंतर करा."
"दोन तक्ते आधीच झालेत."
बाप रे! A1 साईझचे दोन तक्ते, अक्षरश: Engineering Drawing च्या precision ने फ़क्त अडीच तासांत पूर्ण? मला वाटलं होतं २-३ दिवस तरी लागतील, खूप ठिकाणी मला corrections सांगाव्या लागतील, त्यांना, ‘आधी पोन्सिलने काढा, मला दाखवा, मग स्केचपेन वापरा, आपल्याकडे एवढेच ४ कागद आहेत, वाया जायला नको’, वगैरे सतराशे साठ सूचना मी दिल्या होत्या. तर या पठ्ठ्यांनी Direct स्केचपेन्सनी अप्रतिम चित्रं काढली होती. कागद वाया जायाची बातच सोडा!
मी शांतपणे प्रयोगशाळेची चावी त्यांच्या ताब्यात दिली, म्हणजे जेवणानंतर पुन्हा चावीसाठी त्यांना माझ्यापर्यंत यायला नको.
संध्याकाळी ४ वाजता त्या दोघांनी चावी मला आणून दिली.
त्या दिवशी संध्याकाळच्या वर्गासाठीच मी साडेसहा वाजताच पोचले, धीरच धरवेना की सगळं असेल ना जागेवर? लॅब उघडली - सगळं जागच्या जागी, चारही तक्ते नीट गुंडाळून फ़ळ्याजवळच्या टेबलावर ठेवलेले, स्केचपेन्स बॉक्समध्ये ठेवलेली, खिडक्या-दिव्यांची बटणं व्यवस्थित बंद. माझ्या मनात आलं हीच शहरातल्या शाळेतली मुलं असती तर शिक्षकांच्या अपरोक्ष केवढा उपद्‌व्याप करून ठेवला असता! दिवसभर चावी ताब्यात दिल्याचा पश्चाताप झाला असता.

गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/4810
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762

गुलमोहर: 

रमेश आणि योगेश दोन्ही मुले आवडली. त्यांचे आमच्यातर्फेपण कौतुक करा.

नूतन,
तुमचे लेख आवड्ले....

अशा विपरित परिस्तिथीत काम करणारर्‍यांच खरच कोतुक वाटत....
शिवाय कोतुक मुलांचे आहेच..

रमेश आणि योगेश च खरच कौतुक आहे...