गोष्टी हेमलकशाच्या . . . भाग ३

Submitted by Nootan on 22 December, 2008 - 00:15

मायबोलीकरांनो, एक विनंती आहे -माझ्या या लिखाणाला तुम्ही दाद देताय त्याबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे - कायमच ऋणात राहू इच्छिते.
पण हेमलकशाला चाललेल्या कामाचं कौतुक माझ्या पदरात नका टाकू. त्या सार्‍या कौतुकाचे धनी आहेत - आमटे कुटुंबीय, बबनभाऊ - आणि मूळ शिल्पकार आपले बाबा आमटे! त्यांनी हेमलकशाचं स्वप्न पाहिलं, प्रकाशभाऊंनी ते स्वप्न स्वत:च्या खांद्यावर पेललं, मंदावहिनी, दिगंत, अनघा, अनिकेत यांनी साथ दिली आणि last but not the least हेमलकशाचे सारे पडद्यामागचे कलाकार - बबनभाऊ, दवाखान्यातले प्रकाशभाऊ, प्रवीण भाऊ, दादा, विलासभाऊ, रेणुकाताई- कितीतरी मंडळी.
या सार्‍यांनी उभा केलेला हा प्रचंड वटवृक्ष आहे. मी फ़क्त त्याच्या सावलीत उभी राहून, तिथल्या रोजच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतेय फ़क्त.

ही सारी मंडळी जुन्या काळच्या गोष्टी सांगतात, त्या ऐकताना असं वाटतं, आज आपण किती क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींसाठी कुरकुर करतो!
१९८८ साली इथे वीज आली. म्हणजे त्यापूर्वी साधे दिवेही नव्हते, पंख्याची तर बातच सोडा. ४७-४८ डिग्रीज्‌ पर्यंतच्या तापमानात पंखा नाही? सकाळी सूर्य उगवल्याशिवाय आणि तो मावळेपर्यंतच सारे कारभार आटपायचे!
विलासभाऊंनी केरोसीनवर चालणारा फ़्रीज बनवला होता - कशासाठी? - तर वाघोबांचा खाऊ - मांस वगैरे - preserve करण्यासाठी!
हे विलासभाऊ, त्यांचा पुण्यातला ऐन भरात चाललेला Refrigerating Appliances चा धंदा मोडीत काढून इथे हेमलकशाला आले. काहीतरी वेगळं करायची धुंदी, बेधडक वागायची तारुण्यातली मस्ती त्यांना इथे घेऊन आली, इथेच रमले, इथलेच झाले.
तरुणपणापर्यंत पुण्यात वाढलेला हा तरुण, इथे वीज, टेलिफ़ोन नसताना कसा काय रमला?
साधी पोळीची कणीक मिळत नसे म्हणे. रोज उठून भात खाणं. प्रकाशभाऊंना पोळी प्रिय. साधनाताईंच्या पोटात तुटायचं. लेकाला गव्हाची पोळी मिळत नाही म्हणून ती माऊली गव्हाच्या पिठाचं पोतं घेऊन वरोर्‍याहून यायची. नागेपल्लीपर्यंत गाडीने यायचं, सोबत १-२ कार्यकर्ते. नागेपल्लीच्यापुढे ६५ किलोमीटरवर हेमलकसा!
मजल दरमजल करत चालत ते अंतर पार करून हेमलकसा गाठायचं. पावसाळ्यात तर निव्वळ अशक्य. बांदिया नदी आणि अनेक छोटेमोठे नाले-ओढे धो-धो वाहात असत. मग आल्यागेल्याच्या हाती हेमलकशाला निरोप पोचवायचा, तिकडून दादा, विलासभाऊ असे कोण कोण यायचे,
डोंगी - म्हणजे छॊटी पसरट होडी - घेऊन प्रवास करत नागोपल्लीला पोचायचं. हे एवढ सारं एका साध्या पोळीसाठी!
पुन्हा हेमलकशाच्या दमट हवेमुळे लवकरच पिठात आळ्या व्हायच्या. म्हणजे वर्षाची साठवणूक वगैरेही शक्य नाही.
वीज नाही त्यामुळे गहू भरून ठेवले तरी जात्यावर दळण दळायचं. प्रकाशभाऊ, विलासभाऊ सगळेच दळण दळायला बसत.
विचार करा - ही असली life style १९८८ साली - केवळ वीसच वर्षांपूर्वी. आठवून पाहा बरं त्या काळात आपण कसे जगत होतो.
पुन्हा, या सार्‍यांनी स्वत:हून स्वीकारलेली ही life style - कोणी लादलेली किंवा ’नशिबाने’ वाट्याला आलेली नाही. आज या सार्‍यांच्या तोंडून ’त्या’ कथा ऐकताना जाणवतं की खरंतर हे सगळे literal धमाल करत जगले असणार, आपण काही ’समाजसेवा’ करतोय, हालअपेष्टा ’भोगतोय’ असं काहीही त्यांच्या मनात उगवलंच नसणार - वेळच नसणार असल्या विचारांना.

आजही OPDतला दिवस असो की शाळेतला - दिवसभरात काही ना काही ’सनसनाटी’ घडतंच, आणि मग सारी ’बिरादरी’ गोळा होते.

परवाचाच प्रसंग - दोन-अडीजचा सुमार. दुपारच्या OPDत रोजच्याप्रमाणे काम चालू होतं,
प्रवीणभाऊंपाशी केसपेपर काढणार्‍यांची हीऽऽ गर्दी, मी आणि जगदीश कम्प्युटरवर डेटा एन्ट्री करतोय,
दिगंत-अनघा बाहेरगावी गेल्यामुळे Doctors' Desk वर बबनभाऊंची पेशंटस्‌ बरोबर ’जुगलबंदी’ चाललेली - ’बाऽऽ आस्ता (काय होतंय), वंजा तो हा (जीभ दाखव) - वगैरे.
राधाकडे इंजेक्शन घेणार्‍यांची गर्दी, छोट्या मुलांची रडारड,
शारदा, राजा यांची पेशंटस्‌ ना गोळ्या समजावण्याची धडपड - सक्रे, पियाले, नुल्पे (सकाळ, दुपार, संध्याकाळ).
आणि तेवढ्यात एकाएकी गडबड-गोंधळ. कसला आवाज म्हणून एकदोघं बाहेर धावले आणि सांगत आले, "करीनाला पिल्लू झालं".
करीना म्हणजे बिरादरीच्या आवारात मुक्तपणे चरत फ़िरणारी एक ’गाढवीण’. अतिशय तडतडी, active, आजूबाजूच्यांना मजेने सतत लाथा मारणारी. त्यामुळे ती मुळात गरोदर होती याचाच कोणाला पत्ता नव्हता. पिल्लू झालं तेव्हा कळलं की ’करीना गरोदर होती.’
ऐन दसर्‍याच्या दिवशी पेशंटस्‌ साठी बांधलेल्या एका इमारतीत तिला एक छान छॊटसं पिल्लू झालं होतें, शाळेतल्या मुलींनी ते पाहिलं, पिल्लू जवळून पाहायाची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देईना. पिल्लाजवळ करीना येऊ देणार नाही म्हणून करीनाला दूर हटवण्यासाठी त्यांनी दगड मारले. छोट्या मुलींचा साधा-सोपा, छोटा विचार.
झालं, दगडांमुळे करीना बिथरली. अंगावर धावून यायला लागली, लाथा झाडायला लागली. तिच्याभोवती हीऽऽ गर्दी - शाळेतली मुलं, शिक्षकवृंद, बिरादरीतले पाहुणे, Animal Rescue Center पाहायला आलेले, घोटुलमधले Indoor पेशंटस्‌, त्यांचे नातेवाईक, अकाऊंटस्‌ सेक्शनमधले मनोहरमामा, मेस वगैरे इतर विभागातले कार्यकर्ते.
कमाल म्हणजे हा सारा drama पाहायला OPDतलेही सारेच धावले, प्रवीणभाऊ, बबनभाऊ, राधा, शारदा, जगदीश एवढंच नव्हे तर पेशंटस्‌ सुद्धा - अगदी पाच मिनिटांपूर्वी कण्हणारे, मलेरियाच्या तापाने फ़णफ़णलेले सुद्धा!
कोणतीही छोटी घटनादेखील इथे ’सनसनाटी’ ठरते ती अशी!
मग पुढचा एक-दीड तास अतिशय धांदलीचा - करीनाचं पिल्लू आधी उचलून आणलं, मेसशेजारच्या मोठ्या, मोकळ्या पिंजर्‍यात ठेवलं, नंतर करीनाला मोठ्या मुस्श्कीलीने तिथं आणलं, तिला पाणी आणि गव्हाचा कोंडा वगैरे खाऊ दिला, पिलाला दूध पाजणं वगैरे, वगैरे वगैरे. . .
त्यानंतर पेशंटसना अक्षरश: हाकारून पुन्हा OPDत बोलावावं लागलं. सारे आपलं आजारपणच जणू विसरून गेले.

एक प्रसंग आठवला की अनेक प्रसंगांची मालिकाच आठवते. पण पुढच्या भागात सांगते.
Bye.

गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/4810
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ -http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762

गुलमोहर: 

हे एवढ सारं एका साध्या पोळीसाठी!>> ह्याच्यापुढे एकही पोळी मी वाया जाओ देणार नाही माझ्या घरी.
करिना गाढवीण गरोदर होती. >> लै भारी Happy
हा सारा ड्रामा पाहायला सारेच धावले, पेशंटस्‌ सुद्धा - अगदी पाच मिनिटांपूर्वी कण्हणारे, मलेरियाच्या तापाने फ़णफ़णलेले सुद्धा! >>
मस्तच लिहिते आहेस. आभारी. हेमल्कशाला कसं जायचं?

नूतन,
तुम्ही छानच लिहीताय लेखमाला.
प्रत्येक लेखमालेच्या भागात शेवटी इतर लेखमालांची लिंक द्याल का म्हणजे मग न वाचलेल्यांना सगळे भाग सलग वाचता येतील आणि मायबोलीवर ते शोधत बसावे लागणार नाहीत.

मी अशी जाते -
पुणे ते चंद्रपूर - सायं. ८ वाजता शनिवारवाडा - AC Volvo by Chintamani-Ganaraj (१२ तास)
चंद्रपूर ते आलापल्ली - एस.टी. - पुण्यातून निघाल्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी ९-१० च्या सुमारास - ३ तास
आलापल्ली ते हेमलकसा - दुसरी एस. टी. - २ तास
संध्याकाळी ४ पर्यंत हेमलकसा (अधला मधला वाया जाणारा वेळ धरून आलापल्लीहून हेमलकशाला जाणारी शेवटची एस. टी. संध्या. ५.३० पकडायचीच)
मुंबई-बल्लारशहा रेल्वेनेही जाता येतं. पुण्याहूनही अनेक पर्याय आहेत. कुठून निघायचंय त्यावर बरंचसं अवलंबून.
कधी निघत्येस?

लिंक कशा द्यायच्या तेच शोधतेय. सापडत नाहीय. मदत समितीलाही विचारलंय. वाट पाहतेय.

काहीतरी उलट्यापालट्या उड्या मारून प्रत्येक भागामध्ये इतर भागांची लिंक देणं जमलंय.

नूतन, सुरेख लिहीते आहेस. तू लिहील्याशिवाय ते आमच्यापर्यंत पोचणार कसं?

हेमलश्याला चाललेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी तर शब्द अपुरे आहेत. पण तु जे काय करते आहेस तेही तितकच महत्त्वाचं. आपलं सुखा समाधानाचं, चाकोरीतलं आयुष्य सोडून 'कुणा दुसर्‍यासाठी काहीतरी' करण्याची तळमळ जेव्हा तुम्हाला कृती करायला भाग पाडते, आणि तुम्ही ती निस्पृहपणे करता तेव्हा तुमच्याइतकं मोठं काही नाही !!!

बाय द वे, डिजिटल कॅमेरा असेल जवळ तर लेखाबरोबर फोटो पाठवत जाणार का?

नव्या गाढवबाळाला बघायचय. Happy नाव काय ठेवलंय? आईचं नाव तर मस्तच!

मृण्मयी, please, don't praise me, संकोचायला होतं. सुखासमाधानाचं आयुष्य सोडून वगैरे असं काहीही मी केलेलं नाहीय.
आपण ज्याला सुखसमाधान म्हणतो ते फ़क्त काही काळापुरतं असतं. लगेचच आपल्याला पुढचं सुख खुणावतं, आधीचं उणावतं.
Whereas हेमलकसा किंवा तत्सम ठिकाणी काम केलं जी ultimate तॄप्ती मिळते ती कधी उणावत नाही.
निस्पृहता फ़ार मोठा शब्द झाला. संसार, अर्थार्जन यापलिकडे मी काही उपयुक्त काम करू शकते हे माझ्यापाशी मला सिद्ध करता आलं हा माझा स्वार्थ साधला आहे मी. उलट स्वत:च्या परीक्षेसाठी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपण हा प्रकल्प ‘वापरला’ की काय हा विचार त्रस्त करतो मला.
बाबा, आमटे कुटुंबीय, सुरुवातीच्या प्रतिकूल काळात तिथे नेटाने राहून काम करणारे कार्यकर्ते हे खरे निस्पृह.

आज सगळ्या आधुनिक सुविधा आहेत तिथे, प्रवासाची साधनं आहेत, दर महिन्यातले काही दिवस तिथे राहाणं हे खरंच फ़ार कठीण नाहीय.
डिजिटल कॅमेरा नं! मी हेमलकशाला जायचं ठरवल्यावर घरचे, ओळखीचे सगळ्यांनी सुचवलं होतं हे! पण मी टाळलं - अजून तरी टाळणं जमलंय.
कॅमेर्‍याचंही नं एक उगीचंच व्यवधान बाळगत राहावं लागतं. नि:संग होऊन डोळ्यांनी टिपायचं आणि मेंदूत साठवायचं असा सोपा विचार तेव्हा केला.
संगणक वर्ग आपण सुरू करू शकू, त्याला असा छान प्रतिसाद मिळेल, ’गोष्टी हेमलकशाच्या’ हे सदर लिहू शकू, त्यालाही मायबोलीकर एवढा अविस्मरणीय प्रतिसाद देतील असं स्वप्नातही तेव्हा नव्हतं.
पण आता वाटतंय की शब्दांतून जर तुमच्याशी share करतेय तर थोडीशी visuals आणि जमलं तर audios सुद्धा share करूया.
८ जानेवारीनंतर मी तिथे जाणार आहे, तेव्हा आमटेंना विचारून हे काम नक्की करीन.
सुचवल्याबद्दल बरं वाटलं.
(माझं थोडंसं संन्याशाच्या लंगोटीसारखं झालंय, होता होता फ़ारच गुंतत चाललेय मी!)

नव्या गाढवबाळाचं नाव 'दसरी' ठेवलं होतं - दसर्‍याच्या दिवशी जन्मली म्हणून. माडियांमध्ये ‘दसरी’ मुलीचं आणि ‘दसर्‍या’ किंवा ‘दसरू’ मुलाचं नाव असतंच.
पण ही ‘करीना’ची ‘दसरी’ बिचारी जेमतेम १० दिवसच जगली. दसर्‍याला जन्मली आणि कोजागिरीच्या दिवशी गेली. तिच्या आईने तिला कधी पाजलंच नाही, त्यामुळे दुबळी राहिली असावी, किंवा जन्मजात काही दोष असावा. करीनाने तिला ‘आपलं बाळ’ मानलंच नाही की काय असंही वाटतं. कारण दोघींना एका पिंजर्‍यात आणल्यावर करीनाने तिला दोनदा लाथा मारल्या. आम्ही सगळे OPDच्या मागच्या जाळीतून पाहात होतो, पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. शेवटी करीनाला पिंजर्‍यातच पण दसरीपासून लांब बांधून ठेवलं, हाताने दूध काढून बाटलीने दसरीला पाजलं. पण दसरी नीट प्यायचीच नाही. तिचा शी-सू चा सुद्धा काहीतरी problem होता.
तिथे एवढे सारे डॉक्टर, प्राणीप्रेमी आहेत, सगळ्या शक्यता अजमावून पाहिल्या. पण जर जन्मदात्या आईनेच जन्मानंतर पाजलं नाही, शी-सू ची जागा नीट चाटून साफ़ केली नाही, हुंगलं नाही, वर आणखी लाथा घातल्या, तर काय नेमकं त्या बाळाचं बिनसलं, बिघडलं ते इतरांना कसं कळणार?
पण दसरी होती मात्र cute!
असं म्हणतातही की, सगळ्या प्राण्यांत गाढवाचं बाळ जास्त सुंदर दिसतं. खरंच दिसतं.

आई गं, पिल्लु बिचारं!

खरंच जमलं तर (आणि अर्थात आमटे कुटुंबीयांची संमती असल्यास) फोटो नक्की टाक लेखांबरोबर.

,

छान लिहिले आहे हे लेख वाचायचे राहुनच गेले होते.

खरच बाबा, आमटे कुटुंबीय यांबद्द्ल आम्ही काय बोलणार ________________^__________