गोष्टी हेमलकशाच्या . . . भाग १

Submitted by Nootan on 13 December, 2008 - 05:04

गोष्टी हेमलकशाच्या . . . भाग १

हेमलकशाला गेल्यापासून असं होतंय की कशा-कशाच्या म्हणून गोष्टी सांगू! शेवटी ठरवलं की ’गोष्टी हेमलकशाच्या. . . ’ असं म्हणूनच सगळं सांगावं. कुणाला सांगावं? तर अर्थातच . . . मायबोलीकरांना!

साधारणपणे आपण असं समजतो की मराठी टायपिंग जास्त कठीण - इंग्रजीपेक्षा. पण या माडिया मुलांनी मला धक्काच दिला. ३ आठवडे आमचं वर्डचंच Practical चाललं होत, खूप हळूहळू प्रगती होत होती. रोज रात्री अंथरुणावर अंग टाकताना मी स्वत:चीच समजूत घालायची की, ’असू दे, त्यांना हळूहळू जाऊ दे, त्यांच्या त्यांच्या गतीने शिकूदे. शहरी मुलांशी त्यांची तुलना नको करूस. एकाचवेळी इंग्रजी, कम्प्युटर, टायपिंग आणि माझं शहरी मराठी - चार-चार नव्या गोष्टींशी जुळवून घेणं सोपं नसणार.’

काही दिवसांनी वसतिगृहाच्या नव्या इमारतीत सगळी मुलं राहायला गेली. संगणक वर्गातला एक जण म्हणाला, "आमच्या खोलीतल्या मुलांची नावं टाईप करू?" वर्डच्या नेहमीच्या assignment ऐवजी त्याला हे काम करायचं होतं. मी ’बरं’ म्हटल. त्याने इंग्रजीत नावं टाईप केली, त्यात Autoshapes वगैरे घालून त्याने एक झकास Name Plate तयार केली, प्रिंटाऊट काढलं.

दुसर्‍या दिवशी अजून एक-दोघं म्हणाले, "आम्ही पण करू का?" मी ‘हो’ म्हटलं. शेवटी जे काही शिकतोय त्याचं व्यावहारिक application करता येणं जास्त महत्त्वाचं. मग संगणक वर्गात नाव दाखल न केलेली काही मुलं आली. त्यांना रविवारी बोलावलं, त्यांच्या याद्या त्यांनाच टाईप करायला लावल्या. होता-होता हा उद्योग वाढायलाच लागला.
आता तर छोटी मुलंही याद्या घेऊन यायला लागली. त्यांना शिकवण्यापेक्षा मीच त्यांच्या याद्या टाईप करून द्यायला लागले. जरा जास्तच load वाढायला लागलं. दिवसाचे २४ तास अशाने अपुरे पडायला लागले. अशातच एकदा ७वी-८वी ची दोन मुलं - हातात त्यांच्या खोलीतल्या मुलांच्या नावांची यादी घेऊन आली. त्यांच्या इंग्रजी अक्षर ओळखीचाही वांधा होता. आता? मनात आलं, मराठी फ़ॉण्ट तर लोड करून देऊ, त्यांचं त्यांना जमलं तर बरंच आहे, नाहीतर आपण आहोतच. आणि अक्षरश: १५ मिनिटांत त्यांची यादी त्यांनीच टाईप करून टाकली.

संध्याकाळी Regular Batch ची मुलं येण्यापूर्वी सगळ्या कम्प्युटर्सवर मराठी फ़ॉण्ट टाकला, १४ वेगवेगळ्या मराठी assignments तयार केल्या - माडिया भाषा, महुआचं झाड, माडिया भाषेतले उखाणे, कोडी - त्यांच्या printouts काढून ठेवल्या. संध्याकाळ्च्या मुलांनीही या मराठीतल्या assignments फ़टाफ़ट करून दाखवल्या. मग मी नवनीतच्या पुस्तकातलेच ’माहिती तंत्रज्ञाना’वरचे उतारे टाईप करायला सांगितले. दे दणादण मराठी टायपिंग सुरू झालं. पोरंही खूष. जिथे इंग्रजी assignments करायला आठवडेच्या आठवडे वाया जात होते तिथे प्रत्येकाच्या ५-६ assignments पूर्ण झाल्या होत्या!.
आणि आपण म्हणतो की मराठी टायपिंग जास्त अवघड!
दुसरा साक्षात्कार झाला, आपल्याला एकट्याला एक अख्खा कम्प्युटर अर्धा तास हात लावायला मिळणार या कल्पनेने केवढा स्वर्गप्राप्तीचा आनंद होऊ शकतो या गोष्टीचा. त्यांचे चेहरेच पाहायला हवे होते तुम्ही. आपल्याला या गोष्टीचं आता फ़ार अप्रूप उरलेलं नाहीय. पण कीबोर्डला-माऊसला हात लावताना त्यांच्या चेहर्‍यावर जे काही भीती, आनंद, उत्सुकता याचं blended expression जमा झालं होतं की बास्स. एखाद्याला काही शिकवताना, त्याचा माऊस हातात घ्यावा तर तो घामाने भिजलेला असायचा, एक चिमुकला थंडगार तळहात त्यावर! केवढं काय काय सांगायचा तो घामेजलेला माऊस, तो गार तळहात! माझ्या पोटात रडू, आनंद, आश्चर्य यांनी तयार केलेला एक खड्डा!
आपलं जसं इंग्रजीबाबत होतं तसं या माडिया मुलांचं मराठीबाबत होतं. सतत मराठी बोलणार्‍यांमध्ये वावरलं, इंग्रजीशी खूप काळ संबंधच आला नाही आणि एकाएकी अटळपणे इंग्रजीशी सामना करायची वेळ आली की आपण मराठी माणसं कसे वाचा हरवून बसतो, तसं काहीतरी. त्यांचे expressionless चेहरे हेच express करत असतात. जे आपलं इंग्रजीबाबत होतं ते त्यांचं मराठीबाबत होतं. कळतं सगळं - निदान मोठ्या मुलांना तरी. पण मराठीत चटाचट प्रतिक्रिया देणं घडत नाही. आणि इंग्रजी तर अजूनच दूरची गोष्ट.
पण संगणकाच्या बाबतीत आता एवढी माहिती मुलांना देणं अटळ होऊन बसलंय की Theory च्या वर्गात सग्गळ्ळं सांगता येत नाही. खूप सार्‍या गोष्टी आपल्याआपण पुस्तकं वाचून मिळवणं आवश्यक होऊन बसलंय. त्यातून मराठीतून संगणकाची माहिती देणारी पुस्तकं, पुन्हा ती रंजक आणि illustrative सुद्धा असायला हवीत. असा शोध घेता घेता नवनीतची ५ वी ते १० वी ची माहिती तंत्रज्ञान मालिका त्यातल्यात्यात बरी वाटली. महाग होती. एकच पुस्तक साधारण २५-३० रुपयांचं. पण आपले udy123 मायबोलीकर - त्यांनी दण्णकन ६००० रुपयांचा चेक पाठवला. चेक माझ्या हातात येईपर्यंत मी शेजारपाजारून ४ हजार उभे केले आणि नवनीतची माहिती तंत्रज्ञानावरची काही मराठी पुस्तकं घेतली आणि हेमलकशाला गेले. चेक देताच लोक बिरादरीने माझे पैसे लगेच परतही दिले.
मला सांगायचीय ती गोष्ट पुढेच आहे. मी पुस्तकं आणणार आहे असं तिथून निघतानाच मुलांना सांगून ठेवलं होतं. त्यामुळे गेल्यागेल्या मुलं विचारत होती की पुस्तकं कधी देणार आणि मोठी माणसं - विशेषत: शिक्षक - सांगत होते की मुलांना वाचनाची गोडीच नाही. मुलांच्या हातात पुस्तकं देऊन टाकू नका, वाचणार तर नाहीतच उलट फ़ाडाफ़ाडी करून वाया घालवतील. मला आतून वाटत होतं की त्यांना फ़ाडवणारच नाहीत एवढी छान पुस्तकं आहेत. पण तिथल्या जाणकारांचं मतही डोळ्याआड करण्याजोगं नव्हतं. शेवटी मुलांनाच विचारलं की, "काय करूया, तुमच्या ताब्यात तुमची पुस्तकं देऊन टाकू का? सांभाळून वापराल ना?" तर मुलंच म्हणाली, " नको".
मी चाटच. मुलंच म्हणतायत पुस्तकं आमच्या हातात देऊ नका? कदाचित बरोबर असेल सगळ्या मोठ्यांचं. पण म्ह्टलं तरीही विचारून पाहू,
" का रे? का नको?"
"पुस्तकं खराब होतील."
"अरे पण काळजी घ्या ना."
"हॉस्टेलमधली इतर मुलं खराब करतील." ऒह्‌! म्हणजे यांना पुस्तकं खराब व्हायला नकोयत, हेही नसे थोडके.
रोज वाचून झाल्यावर सुरक्षित राहावीत म्हणून पुस्तकं मी माझ्या ताब्यात ठेवायची असं ठरलं.
रोज संध्याकाळी ७ ते ९ संगणक वर्गाची वेळ ठरली होती. या २ तासात अर्ध्या-अर्ध्या तासांच्या ४ बॅचेस्‌ची Practicals असायची. ज्यांना पुस्तकं वाचायची असतील त्यांनी आपल्या Practical च्या वेळेव्यतिरिक्त येऊन पुस्तक वाचत बसायचं.
संगणक वर्गाचा हॉल म्हणजे पूर्वीचं गोडाऊन होतं. त्याचं 'Computer Lab.' मध्ये रुपांतर करायला या मुलांनीच खूप कष्ट घेतले होते. तीन बाजूंच्या भिंतींना लागून एकूण १४ कम्प्युटर्स, चौथ्या भिंतीवर फ़ळा आणि मध्यभागी २-२ मुलांचे ७ बाक अशी एकंदरित रचना. एकाच हॉलमध्ये Theory आणि Practical असं दोन्ही घेता येईल, हवं तेव्हा-हवं तसं Theory-Practical स्विचओव्हर करत-करत शिकवता येईल असा विचार या रचनेमागे होता - आहे.
तर एकाच हॉलमध्ये वाचत बसायची आणि Practical करायचीही सोय असल्यामुळे मला एकटीला दोन कामं एका वेळी manage करणंही शक्य होतं. ’यांना वाचायचं वेडंच नाही, ही कसली पुस्तकं वाचणार, गोष्टींची पुस्तकंसुद्धा वाचा, वाचा म्हणून मागे लागावं लागतं . . . ’ वगैरे वगैरे ऐकून मलाही जरा शंकाच होती की फ़ार कोणी येणार नाही पुस्तकं वाचायला. खरं तर मला मनातून हळूहळू वाटायला लागलं होतं की उगाचच ३-४ हजार पुस्तकांवर खर्च केले, त्यापेक्षा दुसरं काही तरी - audio-visuals वगैरे - घेतलं असतं तर बरं झालं असतं.
आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पावणेसात वाजता मी लॅब उघडायला निघाले तर अर्ध्या वाटेतच अकरावीतला सोमजी आणि इतर चौघेजण उभे - माझी वाट पाहात.
"काय रे, काय झालं?" माझ्या मनात नाही नाही ते संशय!
"पुस्तकं?"
मी जागच्याजागीच wonderstruck! मुलांच्या हातात लॅबची चावी दिली. मी लॅबमध्ये पोचेपर्यंत कपाटातून पुस्तकं काढून, टेबलावर मांडून ठेऊन, स्वत:ला एक-एक पुस्तक घेऊन पाचही जण बाकांवर बसले होते! Totally engrossed in reading - वाचन. चेहर्‍यांवरून समजतंच की वाचनाची acting चाललीय की खरंखरं वाचन. ही बाळं संपूर्ण हरवून गेली होती वाचण्यात, चित्रं बघण्यात.
हीच का ती मुलं - वाचनाची आवड नसणारी? पुस्तकांची किंमत नसणारी?
मला दिसली ती हावरटासारखी पुस्तकं मागून घेऊन वाचणारी मुलं, व्यवस्थित पुस्तकं ठेवणारी मुलं, कम्प्युटर लॅब, पुस्तकं आणि तिथला सगळा ’संसार’ नीट सांभाळणारी मुलं! नोव्हेंबरात पहिल्या बॅचच्या मुलांची परीक्षा घेतली आणि सरसकट सर्वांना एक एक पुस्तक ’देऊन’ टाकलं.
नवनीत प्रकाशन, त्यांचे लेखक आणि आर्टिस्टस्‌ आणि uday123 मायबोलीकर - या सगळ्यांच्याविना हा उपद्‌व्याप फ़ळाला आला नसता. धन्योहं!
संगणक वर्ग व्यवस्थित चालू झाला आणि अनिकेतनी एक झकास Dot Matrix Printer - नव्वा कोरा - माझ्या ताब्यात दिला! "तुम्हाला हवा तिथे लावा." मी अर्थातच कम्प्युटर लॅबमध्ये लावला. मुलांना त्यांच्या कामाचं Printout त्याचं त्यांनाच काढायला शिकवलं. पेनड्राईव्ह वापरून आपापली फ़ाईल Printer connected कम्प्युटरवर आणायची, प्रिंटरला कागद व्यवस्थित लावायचा . . . आता सगळं नीट करतात ही मुलं. शाळेचं ऑफ़िस, मंदावहिनीच्या घरून - जमेल तिथून पाठकोरे कागद गोळा करून आणायचे. रोजच्या रोज२०-३० प्रिंटाऊटस्‌ मुलं आपली-आपण काढतात. आणि Dot Matrix Printer म्हणजे एकदम भक्कम काम - sturdy and reliable.
केवळ तीनच आठवड्यांपूर्वी संगणकाला पहिल्यांदाच हात लावलेल्यांनी, इंग्रजीचा बाऊ वाटणार्‍यांनी, आपलं आपण प्रिंटाऊट्स‌ काढणं खरंतर एवढं सोपं नाहीय. पण Microsoft च्या User friendly बटणांनी खरंच चमत्कार केलाय. इंग्रजीशी काहीही संबंध येत नाही. ’कागद लावला, प्रिंटर चालू केला, आपल्या फ़ाईलच्या नावाव्र माऊसचं ’उलटं बटण’ (Right Clock) दाबून Print वर क्लिक करायचं, किंवा बटणबारमध्ये प्रिंटरच्या चित्रावर क्लिक करायचं की झालं.
पुन्हा बटणांवरच्या चित्रांची आणि त्या बटणामुळे घडणार्‍या कामाची संगती प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे लावू शकतो. एकदा एका मुलीच्या संगणकावरचं Insert Table चं टूलबारमधलं बटण कुठेतरी जागा बदलून गेलं होतं. तिने मला विचारलं, "ते डब्बे पाडायचं बटण कुठे गेलं?" वर्डमध्ये Table insert करण्याच्या क्रियेला ‘डब्बे पाडणं’, ‘खाने पाडणं’ अशी selfexplanatory नावं त्यांची त्यांनी देऊन टाकली. वर्ड चालू करणं च्या ऐवजी निळा डब्ल्यू आणला का, Excel च्या ऐवजी हिरवा एक्स, कम्प्युटर बंद करायचं ‘लाल बटण’ असं सगळं सुटसुटीत Nomenclature! बिचार्‍या बिल गेटस्‌ला माहीतही नसेल ही गंमत.
सर्वात जास्त unexpected मजा आणली ती x-ray च्या पिवळ्या कागदांनी. नव्या वसतिगृहातल्या नव्या खोल्यांच्या दारांवर लावायला सगळ्यांनाच याद्या करायच्या होत्या. पाठकोरे कागद तरी कुठून आणि किती आणणार? OPDतल्या बबनभाऊंना पाठकोरे कागद ठेऊन द्या असं मी सांगून ठेवलं होतंच. दवाखान्यातल्या डेटाएण्ट्री प्रोग्रामबाबत येणार्‍या अडचणी Jott Down करायला तिथल्या कम्प्युटरशेजारी काही कागद ठेवलेले असतात. एकदा त्यात काही पिवळे कागद होते. हे कसले कागद म्हणून विचारलं तर बबन भाऊ म्हणाले, "x-ray फ़िल्मबरोबर येतात हे कागद." मी म्हटलं मला थोडे द्या ना, मुलांच्या कामांची printouts काढायला."
बबनभाऊंनी रद्दीत देण्यासाठी ठेवलेला गठ्ठाच्या गठ्ठाच माझ्या स्वाधीन केला. माझ्या ध्यानीमनीही नव्हतं पण ते चमकदार, पिवळे कागद नव्या खोल्यांच्या दारांवर लावायला मुलांना एवढे आवडले की आता त्यावरच प्रिंटाऊट काढायला हवं असा हट्ट सुरू झाला.
सकाळी ९-१० चा सुमार. बुधवार - भामरगडच्या बाजाराचा दिवस, त्यामुळे OPDत ही गर्दी. चारही बाजूंना नुसते आवाजच आवाज - छोटी मुलं रडताहेत, कुणी कण्हताहेत, कुणी माडिया भाषेत बोलताहेत . . . माझं तोंड संगणकाकडे आणि पाठ गर्दीकडे, त्यामुळे कानात पडणा‍‍र्‍या आवाजावरून, स्वरांवरून मनात विविध चित्रं उभी राहात होती.
त्या सार्‍या कोलाहलात एक अगदी distinct आवाज, "बाबा, बाबा . . . ". सारखा एकच जप. (माडिया भाषेत बाबाला ’बाबा’च म्हणतात!)
मागे वळून पाहिलं तर एक ७-८ वर्षांचा मुलगा, चांगला गुट्गुटीत, त्याच्या बाबाला उचलून घ्यायला सांगत होता. मनात आलं, " जरा लाड्याच दिसतोय. एवढ्या मोठ्या मुलाला कुणी उचलून घेतं का?" जरा धाप लागल्यासारखं त्याचं बोलणं वाटत होतं पण otherwise ठीक वाटत होता. मी आपलं माझं काम पुन्हा सुरू ठेवलं.
थोड्या वेळाने बबनभाऊंचा आवाज ऐकू आला, "इथे काही नाही करता येणार. तो अगदी सिरियस आहे. भामरागडला न्या." बापरे, कोण सिरियस आहे, काय झालंय असं मनात येऊन मी मागे वळून पाहिलं तर तो मघासचाच मुलगा. त्याच्यामागे राधा सिस्टर चिमट्यात परीक्षानळी धरून उभी होती. मुलाची धाप जरा वाढल्यासारखी वाटत होती.
मला कळेना की, इथे जर काही होणार नसेल तर भामरागडला काय होणार? तिथले सरकारी डॉक्टरसुद्धा तिथल्याच emergency cases इथे आणतात!
त्या बापाचा चेहरा अगदी केविलवाणा आणि धक्का बसल्यासारखा झाला होता. मलाही कळेना चांगला हट्टाकट्टा दिसतोय मुलगा आणि बबनभाऊ ’सिरियस’ काय म्हणताहेत? त्या पोराचा बाबा एव्हाना जरा सावरून म्हणायला लागला होता की, "इथे काही होणार नसेल तर घरीच नेतो." त्याच्या डोक्यात बहुधा ’पुजारी’ (मांत्रिक वगैरे) हा एकमेव त्राता म्हणून दिसायला लागला असावा.
" बघतो, विचार करून सांगतो", असं म्हणत तो मुलाला घेऊन बाहेर कॉरिडॉरमध्ये गेला. बबनभाऊंनी तोपर्यंत पुढच्या पेशंट्ला तपासायला सुरूवातही केली होती. मी उगाचच curiosity म्हणून विचारलं, "भामरागडला त्याच्यावर काय उपचार करणार ते इथे नाही का होणार?"
बबनभाऊंनी हातातलं पेन हताशपणे खालीच ठेऊन दिलं. म्हणाले, "आपल्या दारात मरू नये एवढंच आता आपल्या हातात उरलंय. त्याचं total kidney failure झालंय. राधाच्या हातातल्या परीक्षानळीत पाहिलंत - त्याची urine albumin test करायला घेतली होती. थोडंसं albumin असलं तर urine जराशी दाट होते. याची पूर्ण गोठूनच गेली. त्याच्या फ़ुफ़्फ़ुसांत प्रचंड पाणी साठलंय म्हणून धाप लागलीय. अंगभर सूज चढलीय. ५-१० मिनिटांत त्याच्या नाकातून रक्त यायला लागेल, तोंडातून रक्त येईल."
एवढं ते बोलतायत तोवर राधा आलीच सांगत की त्याच्या नाकातून रक्त येतंय. मी कपाळाला हात लावला तर ती म्हणाली, "म्हणजे फ़ार नाही, थोडंसं टिपूसभर."
बबनभाऊंनी त्याला बेडवर घेऊन सलाईन लावून कसलं तरी इंजेक्शन द्यायला सांगितलं. त्या मुलाचा ’बाबा, बाबा’ चा जप चाललाच होता. आता त्यातली आर्तता वाढली होती किंवा एकूण सगळी case समजल्यामुळे मला आर्तता जाणवायला लागली होती की काय कुणास ठाऊक. त्याच्या अंगावरच्या सुजेला मी गुटगुटीतपणा समजले होते? एवढा सिरियस असेल तो? देवा!
आता ’बाबा बाबा’ चा आवाज जरा रुद्ध झाला होता. OPDच्या आत आम्ही सारेच आपापली कामं सोडून कॉरिडॉरमधल्या आवाजाचा हताशपणे वेध घेत बसलो होतो.
अक्षरश: १५ मिनिटांत दुसरी सिस्टर शारदा सांगत आली, "त्याला रक्ताचा गुळणा झाला." मला भयंकर रडू येत होतं पण रडताही येत नव्हतं. माझी reaction शक्यतो दिसू नये म्हणून मी आटोकाट प्रयत्न करत होते. कदाचित त्यामुळेच बबन भाऊंना माझी अवस्था कळली की काय कोण जाणे, त्यांनी राधाला सांगितलं की त्याला वॉर्डमध्ये - म्हणजे OPDच्या कॉरिडॉरपासून लांब - न्या. पण तेवढ्यात सगळा आवाजच बंद झाला. सगळीकडे भेसूर शांतता. सगळ्यांना एकाएकी समजूनच गेलं सगळं.
सगळी OPD संपल्यावर मी विचारलं, "त्याच्यावर काहीच उपचार करण्याजोगे नव्हते? असं कसं? काही तरी उपाय असेलच ना?" बबनभाऊ म्हणाले, "तात्काळ डायलिसिस एवढाच एक उपाय होता. अहेरी - म्हणजे इथून खाजगी गाडी लग्गेच सुरू केली तरी ७-८ तासांवरचं नागपूर गाठल्याशिवाय डायलिसिसची सोय नाही. म्हणजे ७ तास एवढा किमान वेळ जाणारच. मरण एवढाच तात्काळ उपाय - वेदनांपासून सुटका होण्याचा."
"मग तुम्ही भामरागडला न्यायला का सांगत होतात?"
"आपल्या दारात त्याचं मरण हताशपणे बघायची आपल्यावर वेळ येऊ नये म्हणून. पण तेच घडायचं होतं, तर आपण तरी काय करू शकतो? त्यातल्या त्यात त्याला वेदना कमी होतील एवढेच उपचार आपण करू शकलो. पण धाप लागली होती तो त्रास कसा कमी करणार?"
"पण एकाएकी तो एवढा सिरियस कसा झाला. बरेच दिवस झाले असतील ना?"
बबनभाऊ सांगायला लागले, "ताई, हे धानकापणीचे दिवस. सुगीच्या दिवसांत घरात कुणी मेलं तर घरातच पुरून आधी शेताकडे धाव घ्यायची अशी रीत. जाणारा तर गेला, पण बाकीच्यांच्या वर्षभराच्या किमान अन्नाच्या तरतुदीसाठी धान वाचवलं पाहिजे. शेतातलं काम झालं की मग सवडीने क्रियाकर्म.
"या पोराला याआधी कधी आपल्या दवाखान्यात आणलेलं मी पाहिलेलं नाहीय. नाहीतर आधी दुसर्‍या कुठल्या कारणासाठी जरी आला असता तरी काहीना काही diagnosis झालं असतं. याला बरेच दिवस धाप लागलेली असणार. नुसतीच धाप आहे, पोरंच आहे, धावपळ करतच असतं असा विचार करून दुर्लक्ष झालं असणार. नंतर धाप वाढली तरी, ’बघू, एवढी धानकापणी झाली की नेऊ’, असं करत करत वेळ गेला असणार."
मला काहीच सुचेना. पोटापायी एवढी ’कोरडी’ होतात माणसं?
विचार करता करता वाटायला लागलं, "ही माणसं निदान basic needs पायीतरी एवढी कोरडी होतात. पण तसं पाहिलं तर आज शहरातला कमावता माणूसही असाच वागतो की. कश्शासाठी म्हणून वेळच नसतो. स्वत:चं आरोग्य, कुटुंबियांचं आरोग्य सगळं पणाला लावून ’पैसा’, ’नोकरी टिकवणं’ या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. अगदी एवढं ताणलं नाही जात, पण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातंच. आणि या सगळ्यामागे धोरण तेच, जे माडियाचंही धोरण - ’बघू, एवढी धानकापणी झाली की. . ."

क्रमश: भेटूच भाग २ मध्ये.

गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/4810
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762

गुलमोहर: 

सुरेख लिहिलं आहेस नूतन. लांब असलं तरी अतिशय वाचनीय आहे, तेव्हा तू लिही, पूर्ण कर Happy

'ललित' विभाग बरोबर निवडला आहेस. आता या पुढे 'गोष्टी हेमलकशाच्या- भाग २' असा लिही. पुढचे क्रमांक देऊन तुझी सीरीज पूर्ण लिहून झाली की सगळे भाग एकापाठोपाठ वाचता येतील असे करून देतील इथले मॉडरेटर्स.
------------------------------------------
हवे ते लाभले असूनी निजेची याचना..
असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..

नूतन,
खूप छान लिहीलय तुम्ही. तुमच्या संगणक वर्गाला यश मिळतय हे वाचुन चांगलं वाटलं, अशी एक लेखामालाच लिहा म्हणजे अजुन तुमच्या कामाबद्दल आम्हाला माहिती कळेल.

उत्तम लेख. असंही वास्तव असत, नाही? वाचताना गुंतून जायला होतं. आत्ममग्न आयुष्य जगणार्‍या आणि त्याच चाकोरीतल्या 'स्वतः'चं कौतुक वाटणार्‍या लोकांपेक्षा (यात मीही आहे) तुम्ही हे खूप वेगळं करताय. खूप कौतुक आहे तुमचं.

पुढचा भागही लवकर लिहा.

नूतन, ह्या सगळ्या आठवणी शेअर करण्याबद्दल धन्यवाद. पुढच्या भागाची वाट पहाते आता.. Happy

सही नूतन.
आम्हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय अगदी.
पुढचे लिही. वाट बघतो.. Happy

--
.. नाही चिरा, नाही पणती.

नूतन, खूप कौतुक आहे तुमचं आणि या प्रकल्पात सहभागी सर्वांचं.

नूतन सुरेख लिहिलं आहे. पुढच्या भागांची वाट बघत आहे.

नूतन
मस्त लेख. मुलांची नव्या गोष्टी शिकायची क्षमता अन चिकाटी दोन्ही एकदम भावलं. किडनी फेल झालेल्यामुलाची गोष्ट वाचून अंगावर काटा आला एकदम...
इतक्या थराला गोष्टी जाईपर्यंत आईवडिलांना त्याची gravity कळत नाही हे केवढं दुर्दैव...

कॉम्प्युटर शिक्षणाकरता किंवा मुलांच्या पुस्तकांकरता आणखीनही काही प्लॅन असतील तर अवश्य इथे लिहा. मला मदत करायला आवडेल.

नुतन हे अनुभव आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठि खुप खुप धन्यवाद. आधि कम्प्युटर लॅब च यशस्वि चित्रण पाहुन खुप छान वाटल पण परिस्थिति किति ग.म्भिर आहे हे हि लगेच कळल. अश्या परिस्थित निराश न होता सातत्याने काम करणार्‍या तुम्हा सगळ्यांना पुढच्या वाटचालिसाठि खुप खुप शुभेछ्छा. शोनु म्हणालि तस काहि आवश्यकता वाटलि तर अवश्य इथे लिहा मला पण मदत करायला आवडेल.

नूतन,
संगणक शिकणार्‍या या मुलांबद्दल वाचून खूप खूप आनंद झाला. खरंच किती मोठ्ठं काम करता आहात तुम्ही!
त्या किडनीच्या विकाराने ग्रस्त मुलाबद्दल वाचताना रडू आलं मलापण तुम्ही तर प्रत्यक्ष हजर होता तिथे!

छान लिहिलंय, नूतन.... Happy

नूतन
किती भीषण वास्तव आहे हे. पण तुम्ही तिथे मुलांना कॉम्प्युटर शिकवण्याचे फार मोठे काम करताय! लिहीत रहा...........एरवी शहरात रहाणार्‍या आपल्यासारख्यांना दुर्गम खेड्यापाड्यात माणूस कोणत्या परिस्थितीत जगतो काही कल्पनाच नसते.

नूतन, वास्तव आहे... आणि जसं तुम्हाला भेटलं तस्सं उतरलय..... म्हणूनच आम्हालाही भिडतय थेट.
लिहीत रहा, खरच वाचण्यासारखच लिहिता आहात.

म्हणजे नकी काय झालं होतं त्याला? छान लिहिताय. वाचत रहावसं वाटतं.

त्याच्या किडनीज फेल झाल्या होत्या.

अतिषय सुंदर लेख! अगदी दाद यांच्या लिखाणाएवढा मनःस्पर्षी!
लेखन ही तशी सामान्य बाब! पण तुमचे काम मात्र असामान्य! त्याला सलाम! तुमच्या सगळ्या सहकार्यांना सुध्दा!

Nutan,

कॉम्प्युटर शिक्षणाकरता किंवा मुलांच्या पुस्तकांकरता आणखीनही काही प्लॅन असतील तर अवश्य इथे लिहा. मला मदत करायला आवडेल.

नितीनचंद्र यांचा "नूतन आपल्यात नाही" हा लेख वाचला होता.. नंतर दोन दिवसांपूर्वी हा लेख वाचला. सुन्न झालो होतो...

स्वं नूतनजींच्या कार्याला सलाम !!