आवळ्याचे लोणचे

Submitted by मंजूडी on 17 December, 2012 - 07:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. आवळे - पातळ आणि उभ्या फोडी करून साधारण दीड वाट्या
२. लाल मोहरी - पाव वाटी
३. फोडणीसाठी तेल - अर्धी वाटी
४. काळी मोहरी - पाव चमचा
५. हिंग - अर्धा टेबलस्पून
६. हळद - अर्धा चमचा
७. मेथ्या - अर्धा चमचा
८. मीठ
९. हिरव्या मिरच्यांचे तुकडे साधारण पाव वाटी (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

१. छोट्या कढईत मेथ्या किंचीत तेलावर तळून घेऊन बाजूला ठेवा.
२. मग बाकी तेल घेऊन चांगल्यापैकी तापवून काळी मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करून ठेवा.
२. आवळे स्वच्छ धुवून त्याच्या अगदी पातळ आणि उभ्या फोडी करून घ्या. त्यावर लगेच मीठ घालून चांगले कालवून घ्या, नाहीतर आवळे काळे पडतील.
३. हिरवी मिरची वापरणार असाल तर छोटे तुकडे आवळ्याच्या फोडींबरोबर एकत्र कालवून ठेवा.
४. मिक्सरच्या छोट्या भांड्यात लाल मोहरी आणि तळलेल्या मेथ्या घेऊन त्याची पावडर करून घ्या. मोहरी चांगली बारीक झाली पाहिजे. मग त्यात पाव वाटी पाणी घालून चांगले वाटून घ्या. ह्यालाच मोहरी फेसवणे म्हणतात.
५. ही फेसवलेली मोहरी आवळ्याच्या तुकड्यांच्यात नीट कालवून घ्या.
६. एव्हाना करून ठेवलेली फोडणी थंड झाली असेल, तीही ह्या आवळ्यांच्यात घालून व्यवस्थित कालवून घ्या.
७. चव घेऊन हवे असल्यास मीठाचे प्रमाण वाढवा.
८. लोणचे तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
एक छोटी बाटली भरून.
अधिक टिपा: 

१. मोहरी फेसवण्यासाठी पाण्याचा वापर केल्यामुळे हे लोणचे टिकाऊ नाही. मोठ्या प्रमाणावर केले तर आवळ्याच्या फोडींचा करकरीतपणा कमी होतो आणि लाल मोहरीही सौम्य होत जाते. थंडीच्या दिवसात मुंबईच्या हवेत हे लोणचे साधारण पाच सहा दिवस चांगले राहील, त्यानंतर लोणचे शिल्लक राहिलेच तर फ्रिजमधे ठेवा.
२. दीड वाटी आवळ्याच्या फोडींना पाव वाटी लाल मोहरी हे प्रमाण मध्यम झणझणीत आहे, लोणचं भसकन् नाकात जात नाही. आपल्या आवडीप्रमाणे लाल मोहरीचे प्रमाण कमी जास्त करावे.
३. आवळ्यांचा आंबटपणा पुरेसा होतो. अजून आंबट हवे असल्यास लिंबू पिळता येईल.
४. आवळे किसून घेतले तरी चालतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!! चटकदार !!!! करायला हवे आता या पद्धतीने.
मी लोणच्याचा नेहमीचा मसाला वापरुन करते..कच्चे आवळे व उकडुन ही..२-३ महिने टिकते मुंबईत फ्रीज बाहेर्.तेल वर पर्यंत घालते.

छान लोणचे.
मोहरी फेसलेले लोणचे टिकते जास्त दिवस. ते फेसलेल्या मोहरीचे मिश्रणही टिकाऊ असते.

मस्त. आजच जुन्या मा.बो. वर हे लोणचे शोधत होते.
लाल मोहरीला ऑप्शन काळी मोहरी चालेल का? मिरच्या नको असतील तर. तिखट चालेल?

वा छान्च रेसेपी.. नक्की करुन बघणार . Happy

मी आजच केले पण सोप्या पद्धतीने... आवळे वाफवले.. बीया वेगळ्या केल्या.. केप्र लोणचे मसाला घातल.. हिग,जिरे मोहरी ची फोडणी आनि मीठ..लगेच तयार खायला .. Happy

लाल तिखटही चालते. मी वापरते मिरचीला ऑप्शन म्हणून.

वाफवून घेतले तर त्याच पाण्यात मोहरी फेसवायची. त्यातच लाल तिखट, मेथीदाणे घालून मिक्सर मधून फिरवायचं

धनश्री, काळी मोहरी वाटली की कडू होते असा माझा अनुभव आहे, सगळ्यांना तो अनुभव येतोच असे नाही. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर प्रयोग करून पाहणे Wink
लाल तिखटाने लोणच्याचा रंग लाल होतो. आम्हाला आवळ्याचं लोणचं पिवळं पहायची सवय आहे, त्यामुळे आवळ्याचं लाल लोणचं ही कल्पना सहन होत नाही. Happy अर्थातच, हे प्रत्येकाच्या आवडीवर आहे. खरंतर लाल मोहरी फेसवल्यावर कुठल्याच तिखटाची गरज नसते. हिरव्या मिरच्या घातल्या तरी त्या केवळ स्वादापुरत्याच असतात. आणि फोड करकरीत हवी असते म्हणून आम्ही आवळे कच्चेच घेतो, वाफवून/ शिजवून घेत नाही.

घरी आवळ्याचे मोठे झाडच आहे. त्यामूळे सर्व प्रकार होतात. मोर आवळा, लोंचे, सुपारी. शिवाय शेजारी पाजारी भरपुर वाटुन टाकतो. आता थोडा बार उरला आहे झाडाला.

आज ह्या आवळ्याच्या लोणच्याचा मुहूर्त लागला ... लाल मोहरी मस्त चढते आणि आवळ्याचा मूळ स्वाद अबाधित! छानच!