भाग १ : https://www.maayboli.com/node/77055
भाग २ : https://www.maayboli.com/node/77075
----------
आमचा प्रवास सुरू होऊन १५-२० दिवस झाले होते.
मध्य-पूर्व डेन्मार्क, नॉर्वे, दक्षिण स्वीडन इथली भटकंती संपवून आम्ही आता इस्टोनियाची राजधानी टालिन (Tallinn) इथे आलो होतो.
टालिन आमच्या मूळ ट्रॅव्हल प्लॅनमध्ये नव्हतंच. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे चार(च) देश फिरायचं; नॉर्वे, स्वीडन, फिनलंडमध्ये प्रत्येकी एका आर्क्टिक सिटीत तरी किमान जायचं; असं आधी ठरवलं होतं. कारण होतं थंडी + midnight sun हे कॉम्बिनेशन!
त्याप्रमाणे ट्रॉम्सो (नॉर्वे) आणि रोवानिएमी (फिनलंड) इथला प्लॅन एकूण प्लॅनमध्ये फिट बसला. स्वीडनमध्ये किरुना किंवा अॅबिस्को ही दोन ठिकाणं शॉर्टलिस्ट केली होती. पण तिथे थेट विमान किंवा ट्रेन अप्रोच नव्हता. बस प्रवासच करावा लागणार होता. आम्हाला दोघांनाही मोशन-सिकनेसचा खूप त्रास होतो, त्यामुळे बसप्रवासावर आमची फुली असते. बसप्रवास टाळून किरुना किंवा अॅबिस्कोला कसं जाता येईल यावर आम्ही बराच काथ्याकूट केला. (सहा महिने आधी प्लॅनिंग केल्याचा हा फायदा होता. हाताशी भरपूर वेळ होता.) पण तसं काहीही शक्य नव्हतं.
मुळात त्या देशांमध्ये बाल्टिक समुद्राच्या आसपास एकवटलेल्या शहरा-गावांव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्यासाठी पब्लिक ट्रान्स्पोर्टचे खूपच मर्यादित पर्याय आहेत. नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे तिन्ही देश उत्तर-दक्षिण पसरलेले; उत्तरेला अगदी निमुळते होत गेलेले; तरीही एका देशातल्या उत्तरेतल्या गावातून दुसर्या देशातल्या उत्तरेतल्या ठिकाणी जायला बराच उलटा घास घ्यावा लागतो, असं दिसलं. म्हणजे नॉर्वेच्या उत्तरेकडून आधी खाली दक्षिणेला राजधानी ऑस्लोत यायचं, तिथून स्टॉकहोम (ते स्वीडनच्या दक्षिणेलाच आहे), आणि तिथून मग स्वीडनच्या उत्तरेकडच्या ठिकाणी विमान असेल तर विमानाने, नाहीतर विमान, ट्रेन, बस, असं मजल-दरमजल करत जायचं. तिथून फिनलंडसाठीही तेच.
थोडक्यात या सगळ्या गणितात स्वीडिश आर्क्टिक सिटी बसेना. त्यासाठी राखून ठेवलेले दोन दिवस रिकामे झाले. काही ना काही मार्ग सापडेलच म्हणत आम्ही दरम्यान पुढची फिनलंड, कोपनहेगन (शेवटचा स्टॉप) इथली airbnb बुकिंग्ज करून टाकली होती.
मग जरा बाल्टिक समुद्राच्या पश्चिम किनार्याकडे नजर वळवली. सेंट पीटर्सबर्ग (रशिया) आणि टालिन (इस्टोनिया) हे दोन पर्याय इंटरेस्टिंग होते. पैकी सें.पी.साठी शेंगेन विजा चालत नाही, वेगळा रशिया विजा आवश्यक असतो, असं समजलं. टालिनला तो काही प्रश्न नव्हता. अशा रितीने ध्यानीमनी नसताना टालिन आमच्या प्लॅनमध्ये आलं होतं.
आणि तिथे एक सरप्राइज आमची वाट बघत होतं.
तर इस्टोनियाची राजधानी टालिन.
९०च्या दशकापर्यंत हा देश रशियाच्या अधिपत्याखाली होता. आता मात्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. टालिनमध्ये आम्हाला मुख्य बघायचं होतं- ओल्ड टाउन. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी आवरून बाहेर पडलो आणि ओल्ड टाउनच्या दिशेला जाणारी ट्राम पकडली. किती स्टॉप्सनंतर आपल्याला उतरायचं आहे, त्या सगळ्या स्टॉप्सची नावं इत्यादी माहिती नेटवरून घेऊन ठेवली होती. ट्राममध्ये प्रत्येक स्टॉपच्या नावाची घोषणा होतच होती. तरी नावांची स्पेलिंग्ज आणि त्यांचे उच्चार यात बराच फरक होता. एकीकडे त्या जोड्या जुळवण्याची आमची कसरत सुरू होतीच. त्यातच एका स्टॉपवर चढलेल्या दोन बायकांमुळे ही कसरत जरा वेळ बाजूला पडली. त्या दोघींचे वेष वेगळे आणि लक्ष वेधून घेणारे होते. लाल-काळ्या रंगाचा पायघोळ स्कर्ट, वर पांढरं लांब हातांचं ब्लाऊज, त्यावर सुंदर कलाकुसर केलेलं लाल-काळ्या-पिवळ्या रंगांचं जॅकेट, डोक्याला तशाच कलाकुसरीचा स्कार्फ बांधलेला. त्यांच्या वेशभूषेत काहीतरी स्थानिक वैशिष्ट्य होतं इतकं नक्की. गंमत म्हणजे त्यांचं तिथे असणं आमच्याव्यतिरिक्त बाकी कुणालाच विशेष वेगळं वाटलेलं नव्हतं.
केवळ त्यांच्या त्या सुंदर वेशभूषेसाठी गुपचूप त्यांचा एखादा फोटो काढावा का असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. मात्र भरलेल्या ट्राममध्ये असा फोटो काढता येणं कठीण होतं. शिवाय ते मलाच प्रशस्तही वाटेना. त्यामुळे त्यांच्या लक्षात येणार नाही अशा बेताने त्यांचं निरीक्षण मी चालू ठेवलं. जेमतेम पाच एक मिनिटं हे सगळं झालं असेल. आणि त्या दोघी एका स्टॉपवर उतरून दिसेनाशाही झाल्या. मी मनोमन जराशी चुकचुकलेच.
पण आता आमचा स्टॉप कधी येतोय त्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. एक-दोन घोषणा ऐकल्या आणि जाणवलं, की आम्हाला हव्या असलेल्या रस्त्याऐवजी ट्रामने जरा वेगळाच रस्ता पकडला होता. (त्याचं कारण आम्हाला संध्याकाळी समजलं. त्यादिवशी टालिन ट्राम नेटवर्कमध्ये, त्याच्या ट्राफिक किंवा सॉफ्टवेअर कंट्रोलमध्ये काहीतरी मेजर घोळ झाला होता. संध्याकाळी आम्ही ओल्ड टाऊन बघून परतीच्या ट्राम स्टॉपवर जवळजवळ तासभर ट्रामची वाट पाहत उभे होतो. काही स्थानिक, रोज प्रवास करणारेही होते. कुणालाच काही माहिती नव्हतं. मग आम्ही आमच्या घराच्या दिशेने सरळ चालायला सुरुवात केली. तर वाटेत आपल्याकडे वाहनांचा ट्राफिक जॅम असतो तसा ट्राम्सचा ट्राफिक जॅम झालेला दिसला. कित्येक ट्राम्स एकामागे एक अडकून पडलेल्या होत्या. ट्राम्सचे सर्व रूट्स सर्क्युलर असल्यामुळे सगळंच ठप्प झालं होतं. पण ओल्ड टाऊनमधली भटकंती आणि त्याआधीचं सरप्राइज यामुळे दिवस असला भारी गेला होता, की त्या अतिरिक्त पायपीटीचं काहीही वाटलं नाही. असो.)
तर, आमच्या ट्रामने वेगळा रस्ता पकडल्याचं दिसल्यावर जरावेळ आम्ही गडबडलो. आपल्याला हवा असणारा स्टॉप कुठेतरी मागे राहिलाय हे लक्षात आलं आणि घाईघाईने आम्ही पुढच्या भलत्याच कुठल्यातरी स्टॉपवर उतरलो.
पुन्हा एकदा मोबाईलच्या नकाशात शोधाशोध करून आम्ही उलट दिशेला चालायला लागलो. वाटेत एका जोडरस्त्यावर गजबज-वर्दळ होती आणि तिथे ट्राममधल्या त्या दोघींसारख्या वेशभूषेतल्या आणखी बायका-मुली दिसत होत्या. आता माझी उत्सुकता चांगलीच चाळवली. आता त्यांच्या कपड्यांच्या रंगसंगतीमध्ये विविध प्रकारही दिसत होते. कुठे गडद तपकिरी रंग, त्यावर उठून दिसणारी फिक्या रंगाची कलाकुसर; कुठे इस्टोनियाच्या झेंड्यात असतो तसा आकर्षक निळा रंग; कुठे लाल गुलाबाचा सुंदर रंग; या सगळ्या रंगांसोबत उठून दिसणारा पांढरा रंग; डोक्यावरच्या मुकुटाचे नाहीतर स्कार्फचे विविध प्रकार, ते देखील सगळे एक से एक सुंदर...
पुन्हा एकदा त्यांच्या सुंदर घेरदार झग्यांचे पाठमोरे का होईना फोटो काढावेत असं मला फार वाटायला लागलं. त्या रस्त्यापाशी पोहोचलो. कुठल्यातरी मिरवणुकीची तयारी सुरू असलेली दिसत होती. तो रस्ता रहदारीसाठी बंद केलेला होता. तिथे रेंगाळणार्या आमच्यासारख्यांना रस्त्यावर न जाण्याबद्दल तिथले ट्रॅफिक पोलिस सांगत होते. आम्ही थोडा थोडा अंदाज घेत फुटपाथवरून हळूहळू पुढे सरकायचं ठरवलं. आपल्याकडे गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी रस्त्यावर दृश्य दिसतं साधारण तसंच वातावरण होतं; फक्त गर्दी एक दशांश करायची. आता आकर्षक रंगांचे, पारंपरिक कपडे घातलेले पुरुष, छोटी मुलंही दिसायला लागली होती. तरी बायकांची वेशभूषा फारच सुंदर वाटत होती.
...
आणखी थोडं पुढे गेल्यावर एका वाद्यवृंद पथकाच्या वादनाचा आवाज कानावर पडला. आम्ही त्या दिशेला वळलो. दहा-बारा जणांचं एक पथक, त्यात तरुण मुलं-मुली सगळे होते. आपल्याकडच्या ढोल-ताशासारखी कमरेला बांधलेली काही तालवाद्यं, लहान-मोठी क्लॅरिनेट्स; तरी तालवाद्यांची संख्या तुलनेने कमीच होती, त्यांच्यावर थापही अगदी हलकीच पडत होती. क्लॅरीनेट्स मात्र आघाडीवर होती.
आम्ही चार-पाच मिनिटं थांबून ते वादन ऐकलं. ते थांबल्यावर त्यांच्या पलीकडे उभ्या असलेल्या गटाने वादन सुरू केलं. आम्ही आमचा मोहरा लगेच तिकडे वळवला. त्या पथकात वादकांची संख्या जरा जास्त होती. आमच्यासारखेच इतर काही तुरळक पर्यटक तिथे होते. अजूनही ही वर्दळ नेमकी कशाची हे लक्षात येत नव्हतं. मी ओडेन्सप्रमाणे इथेही स्थानिक भाषेतला एखादा फलक दिसतो का ते शोधायचा प्रयत्न केला; पण तसंही काही दिसलं नाही. आणखी थोड्या अंतरावर प्रशस्त मोकळी जागा होती. तिथेही विविध पथकांची गर्दी वाढायला लागली होती. सर्वांचे पारंपरिक तरीही वेगवेगळ्या आकर्षक रंगांतले कपडे, प्रत्येकाच्या हातात कपड्यांच्याच रंगांचे छोटे छोटे झेंडे, नाहीतर लांब सॅटिनच्या रिबिनी; ती पथकं आळीपाळीने जयजयकार प्रकारच्या घोषणा देत होती.
ते सगळं उत्साही, उल्हसित वातावरण बघत आम्ही नुसते इकडे तिकडे फिरत होतो. ट्राममध्ये वाटलेली फोटो काढू की नको ही शंकाही आता मागे पडली होती. एका पथकाच्या चार-पाच बायका शेजारून जात असताना मी त्यांना विनंती केल्यावर त्या फोटो काढून घ्यायला लगेच तयार झाल्या. मी कॅमेरा सुरू केल्यावर त्यांनी मला एक झकास पोझही दिली. त्यांच्यापैकी एकीच्या हातात एक लहान फलक होता. मी त्याबद्दल त्यांना विचारलं. त्या फलकावर एक विशिष्ट कलाकुसरीचं भरतकाम केलेलं होतं, आणि तसंच भरतकाम त्यांच्या झग्याच्या काठांवरही होतं. ‘ती आमच्या गटाची निशाणी आहे’ असं त्यातल्या एकीने झग्याचा घेर फुलवत सांगितलं. तिला सांगताना आणि मला ते ऐकताना तेवढाच आनंद झाला होता.
आता मात्र आम्ही हे सगळं नेमकं काय आहे, याचा शोध घेण्याचं ठरवलं. हातात एकमेव साधन होतं- इंटरनेट. पण त्यावर तरी शोध घ्यायचा कसा? काहीच क्लू नव्हता. शेवटी सरळ ‘टालिन’ आणि त्यादिवशीची तारीख (सहा जुलै) असंच सर्च केलं, आणि पुन्हा एकदा आश्चर्याचा मोठा धक्का बसला- तिथलं उत्सवी वातावरण म्हणजे इस्टोनियाच्या ‘साँग अँड डान्स फेस्टिव्हल’ची तयारी होती. दर पाच वर्षांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टालिनमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. यात भाग घेणार्या पथकांमध्ये स्त्रिया-पुरूष-मुलं मिळून जवळपास ३० हजार हौशी कलाकार असतात. यंदा (२०१९) या उत्सवाचं १५०वं वर्ष आहे. इतकंच नव्हे तर हा फेस्टिवल युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समाविष्ट झालेला आहे... ही माहिती वाचल्यावर मला तर हर्षवायू व्हायचाच बाकी होता. योग्यवेळी योग्य जागी पोहोचणं कधीतरी समजू शकतो; पण हे म्हणजे अचाटच होतं!
त्या रस्त्यावर जमलेले ते एक एक गट आता वाजतगाजत मिरवणुकीतून दुसरीकडे एका स्टेडियमच्या दिशेने निघाले होते. उत्सवाचे प्रत्यक्ष कार्यक्रम तिथे होणार होते. ते ठिकाण आम्ही होतो तिथून लांब होतं. शिवाय आम्हाला ओल्ड टाऊन अजून बघायचं होतं. त्यामुळे त्या स्टेडियमच्या दिशेला जाण्याचा विचार आम्ही सोडून दिला; मात्र ती वाजतगाजत निघालेली मिरवणूक आम्ही तिथे जवळपास तासभर थांबून बघितली.
...
एक जरा मोठं पथक आमच्या पुढ्यातच थोडा वेळ थांबलं होतं. त्यातल्या काहींच्या हातात एक कापडी फलक होता. फलकावर इस्टोनियन भाषेतला एक शब्द होता. आम्ही त्याचा अर्थ विचारला तर ते त्यांच्या गटाचं नाव होतं. ते सर्वजण इस्टोनियाचाच भाग असलेल्या उत्तरेकडच्या एका बेटावरून मुद्दाम फेस्टिवलसाठी आलेले होते. ते बेट किती चिमुकलं आहे हेदेखील त्यातल्या दोघातिघांनी आम्हाला सांगितलं.
त्यांच्या चेहर्यावर ‘इन्क्लुजन’चा आनंद होता असं मला वाटून गेलं... आमच्या चेहर्यावरच्या आनंदाला कुठलं नाव द्यावं, हे मात्र सांगता आलं नसतं.
इस्टोनियातली ती मिरवणूक म्हणजे आमच्या ‘कल्चरल शॉक्स’च्या मालिकेचा कळसाध्याय मानायला मी अगदी एका पायावर तयार झाले असते; पण तसं व्हायचं नव्हतं...
सुरुवातीचा टालिन प्लॅनचा
सुरुवातीचा टालिन प्लॅनचा परिच्छेद आणि नंतर टालिन ट्रामबद्दलचा कंसातला मजकूर मूळ लेखात नाही. तो मी इथे अॅड केलाय. (सरप्राइज एलिमेंटशी त्याचा धागा जुळतो, म्हणून)
किती सुंदर दिसतायेत सगळे!!
किती सुंदर दिसतायेत सगळे!! उत्साही वातावरण
छान वर्णन अन अनुभव.
छान वर्णन अन अनुभव.
कोणत्या प्रवासाच्या देवतेची
कोणत्या प्रवासाच्या देवतेची आराधना केली होतीत? किती छान छान योग आले तुमच्या या ट्रिपमध्ये! सगळे फोटो मस्त आहेत. उत्सवी वातावरण अगदी कळून येतंय.
व्वा! सुंदर! ह्यावर्षी जायचा
व्वा! सुंदर! ह्यावर्षी जायचा बेत होता .....
जि सारखंच विचारते मी पण ?
मस्तच!
मस्तच!
ट्रॉम्सोला गेली होतीस? वा!
ट्रॉम्सोला गेली होतीस? वा! मस्तच गाव आहे ते! छान चाललाय तुझा प्रवास!
मस्त हा भाग पण !!
मस्त हा भाग पण !!
कोणत्या प्रवासाच्या देवतेची
कोणत्या प्रवासाच्या देवतेची आराधना केली होतीत? >>> हा योग खरंच अचाट होता. ट्रामचा गोंधळ झाला नसता तर आम्ही ठरलेल्या स्टॉपवर उतरून गेलो असतो. मग कदाचित हे काहीच समजलं नसतं. स्वीडनची आर्क्टिक सिटी रद्द झाली नसती तर मुळात टालिनलाच गेलो नसतो.
ट्रॉम्सोला गेली होतीस? वा! मस्तच गाव आहे ते! >>> हो, पण तिथे पावसाने टोटल पोपट केला आमचा. भयंकर बोचरा वारा, रिपरिप पाऊस, प्रचंड थंडी. midnight sun तर दूरच, दिवसाही सूर्यदर्शन झालं नाही. तरी त्यातही आम्ही गावात थोडंफार पायी फिरलो, पण ती मजा नाही आली. त्या मोठ्या ब्रिजवरून पलिकडे चालत जायचं आणि मग केबल कारनं वर जायचं असा प्लॅन होता, पण ब्रिजच्या अर्ध्यावर गेल्यावर पाऊस आणि समुद्रावरून येणारे वारे असह्य झाले. मग परत फिरलो. थंडीपासून बचाव म्हणून मध्येच तास-दोन तास आर्क्टिक म्युझियम पाहिलं, ते छान होतं.
हे किती मस्त आहे. आता
हे किती मस्त आहे. आता यापेक्षाही महान काहीतरी आहे म्हणजे खुपच विशेष असणार.
वाह मस्त!
वाह मस्त!
त्या सर्वात वरच्या पाचजणी आहेत त्यांचा ड्रेस कुठेतरी बघितल्यासारखा वाटत होतं. नंतर आठवलं नेस्लेच्या मिल्कमेडच्या डब्यावर अशा प्रकारचा ड्रेस असणार्या (गवळण म्हणायची का?) बाईचं चित्र असतं.
मस्त माहिती! चांगली हवा,
मस्त माहिती! चांगली हवा, किमान थोडी चहलपहल आणि फिरायला सेफ शहर असे असले की नवीन ठिकाणी चालत फिरायची मजा वेगळीच असते
बाय द वे, ती परेड, ते ड्रेसेस
बाय द वे, ती परेड, ते ड्रेसेस आणि झेंडे आणि त्यावरचे इंग्रजीसारखे वाटणारे शब्द पाहून गेम ऑफ थ्रोन्स मधल्या विविध "हाउसेस" ची परेड आहे असे वाटेल, त्यांचे Sigil वगैरे
चांगली हवा, किमान थोडी चहलपहल
चांगली हवा, किमान थोडी चहलपहल आणि फिरायला सेफ शहर असे असले की नवीन ठिकाणी चालत फिरायची मजा वेगळीच असते >>>
हो, टोटली! आम्ही फिरलो ती सर्वच ठिकाणं सेफ वाटली. प्लस रात्री ८-९ वाजेपर्यंत लख्ख उजेड होता सगळीकडेच.
वर्षा, निरिक्षण भारी आहे _/\_
वर्षा, निरिक्षण भारी आहे _/\_