उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग २)

Submitted by ललिता-प्रीति on 22 October, 2020 - 01:05

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १) : https://www.maayboli.com/node/77055

----------

ओडेन्समध्ये ध्यानीमनी नसताना बॅले पाहायला मिळाला, त्याच्या चार-पाच दिवसांनंतरची गोष्ट.

ऑस्लो, नॉर्वेची राजधानी. तिथल्या प्रसिद्ध फ्रॉग्नर पार्कमधली ‘विजेलँड इन्स्टॉलेशन्स’ बघायची होती. गुस्ताव विजेलँड हा २०व्या शतकातला नॉर्वेतला नावाजलेला शिल्पकार. त्याने २० वर्षं खपून फ्रॉग्नर पार्कमध्ये ब्राँझ आणि ग्रॅनाइटचे जवळपास दोनशेहून अधिक मानवी पुतळे उभे केले. खुल्या जागेतला हा पुतळ्यांचा संग्रह इथे पाहता येतो.

02-oslo-vigeland-02.jpg

--

02-oslo-vigeland-04.jpg

एक-एक शिल्प पाहत पाहत आपण पुढे जात राहतो; शेवटी एक उंचच उंच अजस्त्र खांब आहे- ‘मोनोलिथ’; त्या एका खांबावर शंभर-सव्वाशे मनुष्याकृतींची शिल्पं आहेत. एकूणच हा संग्रह सुरुवातीपासूनच नजरेचा ठाव घेणारा आहे. (त्याबद्दलही सविस्तर लिहायचं मनात आहे.)

02-oslo-vigeland-01.jpg

सुरूवातीचे एक-दोन पुतळे पाहून होत नाहीत तोच कानावर एक ओळखीची लकेर आली- राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’मधली अ‍ॅकॉर्डियनवरची एक धून. त्या आवाजाच्या दिशेला पाहिलं तर एका कोपर्‍यात एक मध्यमवयीन मनुष्य लहानशा खुर्चीवर बसून खरंच अ‍ॅकॉर्डियन वाजवत होता. आम्ही ती धून ऐकून थबकलोय हे त्याच्या लक्षात आलं होतं. तो आमच्याकडे पाहून जरासा हसला आणि त्याने आपलं वादन सुरू ठेवलं. आम्ही त्याला जवळ जाऊन इंग्रजीतून सांगण्याचा प्रयत्न केला, की आम्ही भारतीय आहोत आणि ही धून भारतात खूप प्रसिद्ध आहे. त्याला आमचे उच्चार समजले नाहीत; आम्ही काय सांगू पाहत होतो तेही समजलं नाही. त्यातलं ‘इंडिया’ ताडून त्याने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला ‘आय अ‍ॅम फ्रॉम पोर्तुगाल’. घ्या! म्हणजे एका वेगळ्याच देशातला वादक, त्याच्या समोर उभे असलेले दोन श्रोते दुसर्‍याच कुठल्यातरी देशातले; हे तिघं आणखी तिसर्‍याच एका देशात त्या सुरावटीने ‘कनेक्ट’ झाले होते; आणि त्या वादकाला हे नेहमीचं असलं तरी त्या दोन श्रोत्यांना पुन्हा एकदा एक सुखद धक्का बसला होता.

दोन-तीन तासांनी सर्व शिल्पं, पुतळे बघून आम्ही परत आलो तोपर्यंत तो मनुष्य तिथून निघून गेलेला होता. मुळात त्याची आणि आमची गाठ पडण्याचं काही कारणच नव्हतं; पण ती पडली होती. आम्ही तिथे असतानाच त्याने ती ओळखीची धून वाजवली होती; परत एकदा आम्ही आमच्या नकळत योग्य वेळी योग्य जागी पोचलो होतो; एक मालिका सुरु झाली होती.
तरी या दोन अनुभवांनंतरही अशी मालिका सुरू झाली आहे अशी काही मनाने नोंद घेतलेली नव्हती. आणि ते बरंच होतं. मुद्दाम शोधायला सुरुवात केली असती, तर त्यात ती मजाच उरली नसती.

याच्या पुढच्याच दिवशी ऑस्लोच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये फिरत होतो. संसदेच्या इमारतीबाहेर पर्यावरणवाद्यांची सरकारविरोधी निदर्शनं सुरू होती. आत संसदेच्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता; त्यानंतर मंत्रिमंडळ दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर जाणार होतं; आणि बाहेर निदर्शक ’क्लायमेट डझन्ट गो ऑन अ व्हेकेशन’ अशा अर्थाच्या घोषणांसहित आपला निषेध व्यक्त करत होते.

02-oslo-parliament-square-2.jpg

चौकात त्यांची गडबड सुरू होती, पर्यटकांची गजबज होती; लख्ख ऊन होतं; कुणी फोटो काढत होते, कुणी उन्हात हिरवळीवर निवांत बसले होते, खातपीत होते; आम्हाला ऊन अजिबात नको होतं, त्यामुळे आम्ही अर्ध्या तासात तिथून निघालो. ज्या दिशेने आलो होतो त्याच्या उलट दिशा पकडली. हे अगदी सहज घडलं होतं; आणि उलट दिशेच्या चौकातल्या एका कोपर्‍यातून पुन्हा एक ओळखीची धून ऐकू आली- कॉलेजमध्ये असताना खूप लोकप्रिय झालेलं एक इंग्रजी प्रेमगीत- एक जण एका झाडाखाली उभा राहून व्हायलिनवर वाजवत होता.

02-oslo-parliament-square-1.jpg

एका क्षणात मी ती धून ओळखली. मन वीस-तीस वर्षं मागे गेलं. पार्लमेंट स्क्वेअर, तिथली शंभर-दोनशे वर्षं जुनी इमारत, दहा मिनिटांपूर्वी वाचलेला त्या इमारतीचा इतिहास, हे सगळं विसरायला झालं. तिथली माणसांची गजबज कानाआड गेली. मी त्या व्हायलीन वाजवणार्‍या माणसाच्या अगदी पुढ्यात जाऊन उभी राहिले. त्याचं वादन ऐकता ऐकता फोटो-व्हिडिओ काढायला सुरुवात केली. मग तेही ठेवूनच दिलं.

हे असे वादक सार्वजनिक ठिकाणी तल्लीन होऊन वादन करत असतात; तरी डोळ्यांच्या एका कोपर्‍यातून ते अवतीभोवती लक्ष ठेवून असतात. कोण ठेका धरून आवडीने ऐकत उभं आहे, कुणाला फक्त फोटो काढण्यात रस आहे, हे त्यांच्या लक्षात येतंच. काही मिनिटं जातात आणि खरोखर आवडीने ऐकत उभ्या असणार्‍या प्रत्येकाच्या डोळ्यांत ते क्षणभर का होईना थेट बघतात. समेवर आपली दाद गेली किंवा वादन संपल्यावर आपण टाळ्या वाजवल्या तर तेही हलकेच मान हलवून त्याचा स्वीकार करतात. इथेही ही देवाणघेवाण झालीच. माझं ते आवडतं गाणं संपलं, त्याने दुसरं कुठलंतरी गाणं वाजवायला सुरुवात केली. आम्ही तिथून निघालो... अशा ठिकाणी फार वेळ थांबायचं नसतं. आश्चर्याच्या धक्क्याचा ‘स्पाईक’ तसाच राहू दिलेला बरा असतो; तोच दीर्घकाळ लक्षात राहणारा असतो.

पण पुढल्या दहा-बारा दिवसांतच आम्हाला आणखी एक असा कल्चरल शॉक बसणार होता, की जिथे हा स्पाईकचा नियमही आम्ही अगदी आनंदाने गुंडाळून ठेवला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली. अजून सविस्तर वाचायला आवडेल. >>> + अजून एक Happy

लेखाच्या सुरुवातीला असलेली फ्रॉग्नर पार्क शाहरुखच्या या गाण्यातपण बघता येईल Happy

दिवाळी अंकासाठी म्हणून शब्दमर्यादा असेल. पण इथे तर ती नाही ना >>> तोच लेख इथे पोस्ट करते आहे, त्यात बदल न करता. शिवाय लेखाची थीम जशी आहे, त्यात बसणार्‍या महिन्याभरातल्या आठवणी, अनुभव इ. आहे. यामुळे याहून कंटेंट नाही वाढणार.
त्या प्रवासावरचे इतरही काही लेख लिहिण्याचं मनात आहेच. तेव्हा आणखी सविस्तर लिहिलं जाईलच.

मंदार, सही! Lol पूर्वी बर्‍याचदा ते गाणं पाहिलेलं आहे. पण प्रत्यक्ष त्या जागी गेल्यावर गाण्यात पाहिल्याचं आठवलं नाही. (ते बरंच म्हणायचं! Wink )

उमा, हो, विजेलँड इन्स्टॉलेशन्स आणि मोनोलिथबद्दल आणि जवळच्या विजेलँड म्युझियमबद्दलही लिहिण्याचा प्लॅन आहे. कारण ती स्कल्प्चर्स केवळ अप्रतिम आहेत.

मामी, ते गाणं - Nothing's gonna change my love for you. मी कॉलेजमध्ये असताना ते प्रथम ऐकलं. (तेव्हा दूरदर्शनवर बहुतेक ओस्वाल लोकरीची जाहिरात लागायची, त्यात बॅकग्राऊंडला ते गाणं वाजायचं. त्या जाहिरातीमुळे आपल्याकडे ते लोकप्रिय झालं बहुतेक.)

शिवाय लेखाची थीम जशी आहे, त्यात बसणार्‍या महिन्याभरातल्या आठवणी, अनुभव इ. आहे. यामुळे याहून कंटेंट नाही वाढणार.
>>>
अरेरे

त्या प्रवासावरचे इतरही काही लेख लिहिण्याचं मनात आहेच. तेव्हा आणखी सविस्तर लिहिलं जाईलच.
>>>>
अरेवा

Proud

माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मला vigeland मधील लहान मुलांचे sculpture ( especially दोन मुलगे हवेत हात उंचावून झेप घेतानाची पोझ मधले) आवडले. Angry boy पर्यटकांमध्यये विशेष लोकप्रिय असतो असं तेव्हा समजले. शिवाय पार्क मध्ये बालपण, तारूण्य , मध्यम वय, व्रृद्ध इ. सर्व अवस्था दर्शविणारे भव्य पुतले भारी वाटलं.

Akershus fortress , royal palace वरून दिसणारा शहराचा नजारा छान वाटतो

छान लिहिलय, अजून लिहिल्यास आवडेल

@ ललिता, मेरा नाम जोकर मधली ती फेमस ट्युन जीना यहा मरना यहा या गाण्यातली होती का? तसे असेल तर ती ट्युनच मुळात वेव्ज ऑफ द डेन्युब या प्रसिद्ध वॉल्ट्झमधली आहे. या दुव्यावर तू ऐकू शकतेस.

ती ट्युनच मुळात वेव्ज ऑफ द डेन्युब या प्रसिद्ध वॉल्ट्झमधली आहे >>>

हो, ती कुठलीतरी परदेशी ट्यून आहे हे माहिती होतं, पण ती मेरा नाम जोकरशी, त्यातल्या गाण्याशीच जोडली जाते.