उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १)

Submitted by ललिता-प्रीति on 20 October, 2020 - 01:11

आमच्या उत्तर युरोप भटकंतीची ती सुरुवात होती. भोज्जे पर्यटन करायचं नाही, प्रत्येक ठिकाण जाऊन पाहण्याचा अट्टहास करायचा नाही, निवांत मनाला वाटेल तसं फिरायचं, इतकंच ठरवून निघालो होतो. पहिला मुक्काम डेन्मार्कमधल्या ओडेन्स इथे होता.

01-Old-Odense-1.jpg

पहिल्याच दिवशी जुन्या ओडेन्स शहरात अक्षरशः वाट फुटेल तसे चाललो, फिरलो. जुन्या काळातली सुंदर लाकडी घरं, छोट्या शांत गल्ल्या, फरसबंदी रस्ते, पर्यटकांची तुरळक गर्दी...

01-Old-Odense-3.jpg

ओडेन्स हे हान्स क्रिसचियन अँडरसनचं जन्मगाव. अठराव्या शतकातलं त्याचं घर बाहेरून पाहिलं; आता तिथे एक म्युझियम आहे.

01-Odense-hans-andersen-house.jpg

एक-दोन ठिकाणी रस्त्यांमध्ये त्याच्या कथांमधल्या पात्रांचे पुतळे उभे केलेले दिसले. लहानपणी वाचलेल्या त्याच्या परिकथा अंधुक आठवत होत्या. त्यामुळे त्या पुतळ्यांचा संदर्भ तिथल्या तिथे लक्षात आला नाही; तरी ती कल्पना आवडलीच.

दिवसभराच्या पायपिटीनंतर घरी परतत होतो. ओडेन्स रेल्वे स्टेशनसमोरच ‘किंग्ज गार्डन’ ही एक मोठी बाग आहे. मुख्य रस्त्यालगतच ते छान, हिरवगार मोकळं मैदान दिसलं; मनात आलं, तिथे जाऊन बसलो. उत्तर युरोपमधला उन्हाळ्यातला लांबलेला दिवस, हवेतला ‘अहाहा’ गारवा, शांत वातावरण... मैदानाच्या एका कोपर्‍यात काही स्थानिक लोक हळूहळू जमायला लागले होते. एकंदर वातावरण उत्साही दिसत होतं. त्यांच्यासमोर एक छोटसं खुलं स्टेज उभारलेलं होतं. स्टेजच्या एका बाजूला तात्पुरते छोटे तंबू, तिथे जुजबी खायची-प्यायची व्यवस्था; हळूहळू वर्दळ वाढत होती. आम्ही डोळ्यांच्या एका कोपर्‍यातून तिकडे लक्ष ठेवून होतो. न राहवून मी मध्येच त्या दिशेला एक चक्करही मारून आले. कसला कार्यक्रम आहे, काय आहे, याची काही माहिती मिळते का बघितलं. एक छोटासा बोर्ड दिसला, भाषा डॅनिश असल्यामुळे त्यावर काय लिहिलं होतं ते समजलं नाही. कुठल्यातरी स्थानिक शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम नाहीतर एखाद्या डान्स-क्लासचा कार्यक्रम असावा असा मी अंदाज बांधला. तो कार्यक्रम बघण्याची उत्सुकता होतीच, मात्र अर्धा तास झाला तरी स्टेजवर काही सुरू होण्याची चिन्हं दिसेनात. नाईलाजाने आम्ही तिथून निघालो. आणि त्याच वेळी स्टेजच्या मागच्या बाजूने एक छान कॉश्च्युमधारी ग्रुप येताना दिसला. आम्ही थबकलोच.
थोड्याच वेळात सूत्रसंचालिका स्टेजवर आली आणि काहीतरी बोलली. कदाचित त्या कार्यक्रमाची थोडीफार पार्श्वभूमी सांगितली गेली असावी. ती समजायचा प्रश्नच नव्हता. मग टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या ग्रुपचं सादरीकरण सुरू झालं; पार्श्वसंगीत म्हणून कुठल्यातरी ऑपेराच्या वाटणार्‍या भारी वाद्यवृंदाची रेकॉर्ड लावलेली. ग्रुपमधले तरुण कलाकार, त्यांच्या लयबद्ध हालचाली, काही जागांवर प्रेक्षकांकडून येणारी दाद, खुलं मैदान, वरती मोकळं आकाश, मावळतीचं सोनेरी ऊन... सगळं वातावरण नजरबंदी, श्रवणबंदी करणारं! ते सोडून आमचे पाय निघेनात.

01-Odense-ballet-1.jpg

प्रेक्षक येत होते, जागा मिळेल तिथे ऐसपैस पथारी पसरून बसत होते. कुणीही कुणाला खाली बसा, बाजूला सरका, सांगत नव्हतं. विशेष उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे कुणीही आपल्या मोबाईलवर बॅलेचे फोटो किंवा व्हिडीओ काढण्याच्या फंदात पडलेलं नव्हतं. साडेसात-आठ वाजत आले होते; भूक लागायला लागली होती; दिवसभराची दमणूक होती; तरी आम्ही तिथे दहा-एक मिनिटं थांबून उभ्याउभ्याच तो पहिला परफॉर्मन्स बघितला.

01-Odense-ballet-3.jpg

तिथून निघालो तेव्हा वाटलं, का थांबलो आपण तिथे? नेमकं काय आवडलं आपल्याला त्यातलं? ना ती प्रस्तावना कळली होती, ना त्या नृत्यातून सांगितली गेलेली कथा समजली होती. बहुदा तिथल्या सगळ्या वातावरणाचा एकत्रित परिणाम, ते संगीत-नृत्य तिथल्या लोकांच्या आयुष्यातल्या विरंगुळ्याचा एक भाग असल्याची जाणीव, आपल्या विरंगुळ्याच्या कल्पनांपेक्षा असलेलं त्याचं वेगळेपण, असं ते सगळं मिश्रण होतं.

कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या त्या छोट्याशा फलकाचा मी सवयीने फोटो काढून ठेवला होता. रात्री सहज त्या फोटोतले डॅनिश शब्द मी इंटरनेटवर शोधले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो शाळेचा किंवा डान्स क्लासचा कार्यक्रम नव्हता, त्याचं नाव होतं ’द रॉयल कोपनहेगन समर बॅले’! २०१६ पासून कोपनहेगन शहरात या बॅलेचं आयोजन केलं जातं आहे. गेल्या वर्षीपासून हे कार्यक्रम डेन्मार्कच्या इतर काही शहरांमध्येही व्हायला लागले आहेत. त्यादिवशी तो बॅले ओडेन्स शहरात आला होता.
थोडक्यात, आम्ही आमच्या नकळतच अगदी योग्य वेळी योग्य जागी पोहोचलेलो होतो. त्या योगायोगाने आमच्या भटकंतीच्या पहिल्याच दिवशी आम्हाला एक झकास कल्चरल धक्का दिला होता. त्यात एक कलात्मक ‘सरप्राईज एलिमेंट’ होतं. पुढच्या महिन्याभराच्या प्रवासातल्या अशा ‘कल्चरल शॉक्स’ची ती सुरुवात होती.

--------------------------------------

भाग २ : https://www.maayboli.com/node/77075

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

हान्स क्रिसचियन अँडरसनचं गाव का हे? त्याचं नाव वाचल्यावर पटकन मला थंबेलिनाची आठवण झाली. वा! मस्त गाव दिसतं आहे.

मस्त !
मुशाफिरीतला लेख वाचला होताच, इथे पुन्हा वाचेनच. Happy

झकास !
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.