हातभर

देखणे शहर [तरही]

Submitted by क्रांति on 19 September, 2011 - 09:33

तरहीची ओळ देखणी, वेड लावणारी आहे, हा माझा यथातथा प्रयत्न.

काहिली म्हणे, "माझे सावलीत घर होते,
या इथे कधीकाळी देखणे शहर होते!"

लाभले कधी येथे जल तृषार्त पांथस्था,
आणि भूक शमवाया अन्न घासभर होते

तूच गंध लुटला अन् नाव मात्र वार्‍याचे?
सांग, कोण दोघांतुन जास्त खोडकर होते?

चांगले दिसेना, पण छिद्र नेमके दिसते!
फक्त तेवढ्यापुरती पारखी नजर होते!

नीज येत नाही की जाग पाळती डोळे?
घालमेल स्वप्नांची मात्र रात्रभर होते!

नाव जाणण्यासाठी तोडलेस तू ज्याला,
त्या अनाम नात्याला केवढे पदर होते!

जाणत्या चुका त्यांच्या, भोगणार शिक्षा मी,
हद्द त्यात, माफीचे पत्र हातभर होते!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - हातभर