देखणे शहर [तरही]

Submitted by क्रांति on 19 September, 2011 - 09:33

तरहीची ओळ देखणी, वेड लावणारी आहे, हा माझा यथातथा प्रयत्न.

काहिली म्हणे, "माझे सावलीत घर होते,
या इथे कधीकाळी देखणे शहर होते!"

लाभले कधी येथे जल तृषार्त पांथस्था,
आणि भूक शमवाया अन्न घासभर होते

तूच गंध लुटला अन् नाव मात्र वार्‍याचे?
सांग, कोण दोघांतुन जास्त खोडकर होते?

चांगले दिसेना, पण छिद्र नेमके दिसते!
फक्त तेवढ्यापुरती पारखी नजर होते!

नीज येत नाही की जाग पाळती डोळे?
घालमेल स्वप्नांची मात्र रात्रभर होते!

नाव जाणण्यासाठी तोडलेस तू ज्याला,
त्या अनाम नात्याला केवढे पदर होते!

जाणत्या चुका त्यांच्या, भोगणार शिक्षा मी,
हद्द त्यात, माफीचे पत्र हातभर होते!

नेहमीच दु:खाने दु:ख जाणले माझे,
सांत्वनास माझ्या ते नेमके हजर होते!

गुलमोहर: 

प्रामाणिकपणे सांगू क्रांती...
या मध्ये टिपीक्कल क्रांती ट्च मिसिंग वाटला. Sad

खूप खूप स्वागत... अगदी मन भरून आलं...

नेहमीच दु:खाने दु:ख जाणले माझे,
सांत्वनास माझ्या ते नेमके हजर होते!..पारंपारीक पण मांडणी आवडली!..

Happy

तूच गंध लुटला अन् नाव मात्र वार्‍याचे?
सांग, कोण दोघांतुन जास्त खोडकर होते?...सही!

चांगले दिसेना, पण छिद्र नेमके दिसते!
फक्त तेवढ्यापुरती पारखी नजर होते!...मस्त आशय...भिडला ग!

नाव जाणण्यासाठी तोडलेस तू ज्याला,
त्या अनाम नात्याला केवढे पदर होते!... नाही समजला:-(

नेहमीच दु:खाने दु:ख जाणले माझे,
सांत्वनास माझ्या ते नेमके हजर होते!...अप्रतिम...

(तरीही प्राजुशी सहमत)

काहिली म्हणे, "माझे सावलीत घर होते,
या इथे कधीकाळी देखणे शहर होते!">>> वा वा वा! (विरामचिन्हे एकदा काढूनही बघा) Happy

तूच गंध लुटला अन् नाव मात्र वार्‍याचे?
सांग, कोण दोघांतुन जास्त खोडकर होते?>>> छानच! Happy

नाव जाणण्यासाठी तोडलेस तू ज्याला,
त्या अनाम नात्याला केवढे पदर होते!>>> सुंदर शेर क्रांती! (केवढे पदर होते - ४) Happy

जाणत्या चुका त्यांच्या, भोगणार शिक्षा मी,
हद्द त्यात, माफीचे पत्र हातभर होते!>> हा हा!

नेहमीच दु:खाने दु:ख जाणले माझे,
सांत्वनास माझ्या ते नेमके हजर होते!>> हम्म!

गझल आवडली.

-'बेफिकीर'!

(आपण सहसा तरही गझल उपक्रमात लिहीत नाही काय? मिसर्‍याच्या स्तुतीबद्दल धन्यवाद!)

तरहीत गझलकाराला खुलता येत नाही हेच खरे... तरीही सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद क्रांतीजी Happy

छान...

धन्यवाद मंडळी. Happy

सुप्रिया, काही नात्यांना नाव नाही देता येत, पण नेमकी अशीच नाती खूप खूप जवळची, प्रत्येक नात्याचं मोल निभावणारी असतात. पण "तो तुझा कोण?" किंवा "ती तुझी कोण लागते?" या प्रश्नांची उत्तरं नसल्यानं ही नाती निभावणंही कठीण होतं! लोक काय म्हणतील या विचारानं अशा नात्यांची तीव्र गरज असूनही बरेचदा ती तोडावी लागतात, असं काहीसं. Happy

बेफिकीरजी,
(आपण सहसा तरही गझल उपक्रमात लिहीत नाही काय? मिसर्‍याच्या स्तुतीबद्दल धन्यवाद!)
याबद्दल
कधी कधी रुळलेल्या वाटा चुकवतात तरहीचे मिसरे
सदासर्वदा कुठे मनाला भुलवतात तरहीचे मिसरे? Happy

कधी कधी रुळलेल्या वाटा चुकवतात तरहीचे मिसरे
सदासर्वदा कुठे मनाला भुलवतात तरहीचे मिसरे? >>>

मस्त! Happy

आता यावरच एक तरही मालिका होऊन जाऊदेत!

कधी कधी रुळलेल्या वाटा चुकवतात रस्ते
कधी कधी चुकलेल्या वाटा रुळवतात रस्ते

मस्त गझल होईल! Happy आपणच करा प्रथम!

-'बेफिकीर'!

लाभले कधी येथे जल तृषार्त पांथस्था,
आणि भूक शमवाया अन्न घासभर होते

तूच गंध लुटला अन् नाव मात्र वार्‍याचे?
सांग, कोण दोघांतुन जास्त खोडकर होते?

चांगले दिसेना, पण छिद्र नेमके दिसते!
फक्त तेवढ्यापुरती पारखी नजर होते!

भन्नाट शेर .जाम सुंदर ग़झल.

नाव जाणण्यासाठी तोडलेस तू ज्याला,
त्या अनाम नात्याला केवढे पदर होते!
वुआआआह!!!!

घालमेल स्वप्नांची मात्र रात्रभर होते! - वाह! Happy

मतलाही सुंदर..
Happy

तूच गंध लुटला अन् नाव मात्र वार्‍याचे?
सांग, कोण दोघांतुन जास्त खोडकर होते?>>> मस्त .. फक्त 'दोघांतुन' खटकला...

नाव जाणण्यासाठी तोडलेस तू ज्याला,
त्या अनाम नात्याला केवढे पदर होते!>>> सुरेखच

नेहमीच दु:खाने दु:ख जाणले माझे,
सांत्वनास माझ्या ते नेमके हजर होते!>> मस्त

एकंदर गझल मस्तच