जीवनज्योती कृषी डायरी - भाग ८ 'ना कुछ मेरा, ना कुछ तेरा'
मध्यंतरी काही कारणामुळे दोन आठवडे शेतावर जाता आलं नाही. आपापले काम-धंदे सोडून शेती करायला लागलो, त्याला आता पाच वर्ष झाली. पाच वर्षात शेताचा इतका लळा लागला आहे, की बाहेरगावी गेल्यामुळे किंवा काही वैयक्तिक अडचणींमुळे जर काही दिवसांची गॅप झाली, तर माझ्या डोळ्यासमोर शेताचा रस्ता, तिथली झाडं येऊ लागतात! त्यामुळे शाळेत असताना ट्रीपला जायच्या दिवशी ज्या उत्साहाने उठायचो, तशाच उत्साहाने उठून, आवरून डबा, पाणी, शेताचे कपडे अशा ठरलेल्या गोष्टी घेऊन निघालो. दर वेळी जाताना साधारणपणे त्याच वेळी, त्याच रस्त्याने, त्याच गाडीत बसून आणि आम्हीच दोघं जातो. परिणामी आमचं सगळं सेम टू सेम असतं.