रानभूल

रानभूल

Submitted by दत्तात्रय साळुंके on 14 June, 2019 - 07:43

रानभूल

थाप डफावर देत
वीज आभाळी कडाडे
इंद्राच्या हो दरबारी
रंभा अत्तर शिंपडे

गंध अत्तराचा ओला
माती वेडीपिशी झाली
फेर धरुनी रानात
मोर पावले नाचली

रानोवनी पानथळ
त्याची रुपेरी नशा
पेरते व्हा पेरते व्हा
बोले फांदीत पावशा

नंदी ओढीतो पाभार
दोर सदाशिवा हाती
रासणं धरी पार्वती
झाली पावन धरती

बीज पेरता तिफन
ओली माती हुंकारली
स्पर्श पिवळा उन्हाचा
रानाला या रानभुली
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रानभूल