रानभूल

Submitted by दत्तात्रय साळुंके on 14 June, 2019 - 07:43

रानभूल

थाप डफावर देत
वीज आभाळी कडाडे
इंद्राच्या हो दरबारी
रंभा अत्तर शिंपडे

गंध अत्तराचा ओला
माती वेडीपिशी झाली
फेर धरुनी रानात
मोर पावले नाचली

रानोवनी पानथळ
त्याची रुपेरी नशा
पेरते व्हा पेरते व्हा
बोले फांदीत पावशा

नंदी ओढीतो पाभार
दोर सदाशिवा हाती
रासणं धरी पार्वती
झाली पावन धरती

बीज पेरता तिफन
ओली माती हुंकारली
स्पर्श पिवळा उन्हाचा
रानाला या रानभुली
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वा!
एकदम मस्त!
अगदी वाफसा असलेल्या रानात घेऊन गेली कविता.

anjali_kool, सिध्दि,जोतिराम, राजेंद्र देवी
खूप आभार, कविता वाचलीत, आवडल्याचे कळविलेत.

@आनंद तुमचा अधलामधला आनंददायी प्रतिसाद सुखावतो. धन्यवाद...
@ आसा- तुमचा प्रतिसाद चोखंदळ असतो पण अप्रूप असतो. धन्यवाद...
@ निरु तुमचा प्रतिसाद लिहायला हुरुप आणेल. धन्यवाद.