आजारलाय

देव आजारलाय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 20 October, 2017 - 06:56

देव आजारलाय

माणसात सतत राहून
देव आता आजारलाय

गाभाऱ्याला छोटसे दार
एकच छोटा झरोका
अव्याहत लोक येरझार
श्वासही कोंडलाय
देव आता आजारलाय

धूप , उदबत्त्यांचा धूर
वर हार फुलांचा पूर
जीव गुदमरलाय
देव आता आजारलाय

पुजाऱ्यांची रोजची कटकट
घंटेची कर्णकर्कश सूरावट
हे हवे ते हवेची वटवट
ऐकून जीव विटलाय
देव आता आजारलाय

अंधार पांघरून झोपलाय
समईच्या उजेडात निश्चल
नैवद्यही घशाखाली उतरत नाय
देव आता आजारलाय

Subscribe to RSS - आजारलाय