देव आजारलाय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 20 October, 2017 - 06:56

देव आजारलाय

माणसात सतत राहून
देव आता आजारलाय

गाभाऱ्याला छोटसे दार
एकच छोटा झरोका
अव्याहत लोक येरझार
श्वासही कोंडलाय
देव आता आजारलाय

धूप , उदबत्त्यांचा धूर
वर हार फुलांचा पूर
जीव गुदमरलाय
देव आता आजारलाय

पुजाऱ्यांची रोजची कटकट
घंटेची कर्णकर्कश सूरावट
हे हवे ते हवेची वटवट
ऐकून जीव विटलाय
देव आता आजारलाय

अंधार पांघरून झोपलाय
समईच्या उजेडात निश्चल
नैवद्यही घशाखाली उतरत नाय
देव आता आजारलाय

नाम्याची त्याला खीर हवी
नाथांनी तूपाची वाटी द्यावी
जनीचं जातं ओढायचयं
देवाला आता बरं व्हायचय
देवाला आता बरं व्हायचय

दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम!
शेवटचे कडवे तर अगदी सर्व भाविकांचे मनोगत मांडलय

VB, अक्षयजी , सायुरीजी ,मेघाजी , स्वप्नीलजी , अंबज्ञजी धन्यवाद !
शेवटच्या दोन कडव्यांविषयी -
माणसात राहून मानवी व्यापारी वृत्तीने आजारलेला देव समईच्या उजेडात मरणासन्न पडलाय अंधार पांघरून ( डोळ्यावर कातडे ओढून ). सभोवताली काय चाललयं यात त्याला रस नाही .

शेवटी त्याला बरं व्हायचयं .
औषध - नामदेवाची निरागस भक्ती , नाथांची भूतदया आणि हे मिळाल्यावर तो परमात्मा भक्त होवू इछितो जनीचे जाते ओढून .

शशांकजी आपली पाठीवर थाप कोण अपृप असते . कविवर्य ना धो महानोरांचे शब्द आठवतात " प्रभुकुंजवर टाळी सहज वाजत नाही" . आपण बरे लिहितो हा आत्मविश्वास मिळतो

अनंतजी धन्यवाद

विजयाजी धन्यवाद
सुंदर प्रतिसादासाठी
शशांकजी आपली साहित्यिक श्रीमंती मला भावते . मला बरेच काही देवून जाते . तुक्याचे धान्य कोठारच ते ! किती उपसावे .
पुनश्च आभार !

अप्रतिम!
शेवटचे कडवे तर अगदी सर्व भाविकांचे मनोगत मांडलय!!!!
आवडली!!!!!!!!!!!

विभाग्रजजी खूप धन्यवाद !
मंडळी याच विषयाला वाहीलेला एक अप्रतिम अभंग सर्वशृत मायबोलीकर शशांकजी यांचा पूर्वी (२०११) लिहिलेला पुढील लिंकवर आहे .https://www.maayboli.com/node/25087

नेहमीच स्वतः बद्दल या देवाकडे मागताना त्यालाही काही भावना, इच्छा आकांक्षा असतील हेच विसरून गेलोय आपण...
माझ्या बाळ-बुद्धीला एकच उपाय सुचतोय त्यालाही तुम्हा आम्हा सारखी रविवारची सुट्टी असावी...!!!