पोकळी

एक उंबरा

Submitted by पुरंदरे शशांक on 12 November, 2024 - 00:12

एक उंबरा

एक उंबरा घरा,मनाचा
जरा जरासा वाट अडवुनि
स्वस्थ बसावा

एक कोपरा घरा,मनाचा
गर्द ताटवा, अजाण वेडा
बहरुन जावा

एक अंगण घरा,मनाचे
उदारतेने अनाहूताला
देत विसावा

एक मार्ग हा घरा,मनाचा
हात धरोनी, माणुसकीचा
स्पर्शत जावा

एक झरोका घरा,मनाचा
स्वच्छ प्रकाशे लखलखणारा
तेवत जावा

एक पायरी घरा,मनाची
जाता येता, अवचितवेळी
आधार व्हावी

एक पोकळी घरा,मनाची
अथांगता अन तरीही स्तब्धता
देत विसावा

एक असोशी घरा, मनाची
अविरत धारा, उगेउगेची
देत रहावी

Subscribe to RSS - पोकळी