कुरडूची भाजी (डोंगराळ भाजी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 July, 2009 - 02:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ जुड्या कुरडूची पाने खुडून, धुवून (तिन ते चार पाण्यात धुवावीत)
२ कांदे बारीक चिरुन
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२-३ मिरच्या चिरुन
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
१ टोमॅटो बारीक चिरुन
पाव वाटी ओल खोबर करडवुन
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
२ चमचे तेल

क्रमवार पाककृती: 

भांड्यात तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी मग हिंग, हळद, कांदा घालून जरा परतवावे. आता लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेउन जरा शिजू द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मिठ, साखर घालावी. परत ढवळून ३-४ मिनीटांनी ओल खोबर घालाव व गॅस बंद करावा.
SDC10286.jpgSDC10287.jpg

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही भाजी डोंगरात मिळते. बाजारात कातकरणी घेउन येतात. चव साधारण माठाच्या भाजी प्रमाणेच असते. ह्यात चणाडाळ, मुगडाळ घालुनही ही भाजी करता येते. टोमॅटोच्या ऐवजी अर्धा लिंबूही चालेल.

माहितीचा स्रोत: 
भाजीवाली कातकरीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या भाजीचा (शिजलेल्या नाही) फोटो टाकता येईल का? तरोटा म्हणून अशीच एक भाजी बघितलीय, जी पावसाळ्यात उगवते.

फोटो आहे. तो कसा लोड करायचा समजत नाही खुप प्रयत्न केला पण जमत नाही.

कुरडुची भाजी आताशी पावसातच उगवते. खुप छान लागते. गावात असताना खाल्लीय. उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर किती छान लागते भाजी. परसात हवी तितकी मिळते. Happy

अरे बापरे .किती दिवसानी या भाजीची आठवण करून दिली. लहानपणी काय आवडायची . आताही आवडते पण मिळत नाही Sad

करडई का कुरडू म्हण्जे? करडईची पण अशीच करतात भाजी. आम्ही लहानपणी दूरच्या मारूती मंदीरात शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी चालत जायचो. बरच लांब होतं ते पटरीनं जाव लागे अन वाटेत काही अंतरावर दोन्ही बाजूने लावलेली करडई. कोवळी पाने खुडून आणायची भाजीला. करडई घ्यायला कोणी नाही म्हणत नाही, कारण खुडली की दामदुप्प्टीनं येते.. तसही खुडायचा कंटाळा असेल तर बाजारात पण १० पैसे पाव मिळायचा पाला.. Happy

मी पण तेच विचारणार होते अ‍ॅना. करडईची भाजी आम्ही लसुणाचे तुकडे, कांदा,हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्यांची फोडणी घालुन अन दाण्याचं कुट घालुन करतो.. ईकडे नाही बघितली मी, पण आईकडे गेले की अजुनही नेहेमीच खाल्ली जाते.

आणि अल्पना कोवळ्या मेथीचा, कोवळ्या करडईचा घोळाणा? ( कच्ची बारीक चिरून वरून नुस्ती किंवा लसणीची फोडणी) :लाळ टपकणारी बाहुली:

अनघा मी पण तेच विचारणार होते. करडईच्या भाजीत व्यंजन म्हणुन मी चणा डाळ्/मुग डाळ घालते. बाकी कांदा, मिरची, लसुण सेमच पण नंतर भाजी शिजल्यावर वरुन पुन्हा तेल गरम करुन त्यात लसणी तळुन ते तेल लसणीसकट भाजीवर टाकायच खमंग लागते भाजी. हि भाजी मिरची घालुन वाफवुन कुस्करुन ताकात घालुन त्या ताकाची कढी करतो तशी कढी केली तरी छान लागते (करडई किंवा पालक असा ताकातला छान लागतो)

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

काय एकेक आठवण करुन देता आहात लोकहो Sad

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

हो हो, ताकातला पालक व करडई पण छानच लागते.. Happy डाळीचं पीठ पेरून ही बहुतेक सगळ्या भाज्या खमंग होतात.. Happy पालेभाजीला लसण तर मस्ट.. Happy

करडई आणि कुरडू वेगळ्या भाज्या आहेत. करडई एरवीही मिळते, कुर्डू मात्र पावसाळ्यातले काहि दिवसच मिळते.

होय होय, या दोन्ही भाज्या वेगळ्या आहेत...

रेसिपी मध्ये डाउन लोड करता येत नाही. इथे टाकतेय फोटो.

SDC10286.jpgSDC10287.jpg

ही कुरडूची भाजी आहे. ही डोंगरात पाउस पडल्यावर मिळते. डोंगरातील कातकरी विकायला आणतात.

बहुतेक तांदुळजा आहे हा.. असाच दिसतो तांदुळजा.. तांदळाच्या कण्या घालुन सुध्दा भाजी करतेत हेची.. Happy

इथे रानभाज्या म्हणून एक बा.फ. आहे तिथे चर्चा होती या भाज्यांची. तादुळजा असा नसतो. त्याची पाने त्रिकोणी असतात व त्याला किरमीजी रंगाचे तूरे येतात. या कुरडूला पांढरे तुरे येतात. केनी कुरडू अशी जोडी असते. ( जशी चुका चाकवत असते तशी )
याच दिवसात फोणशी, मसाल्याची पाने, कंटोळी, वाघाटी, भुईफोडं पण बाजारात असतात. मुंबईला, दादर, बोरिवली भागात या भाज्या मिळतात.

हो का?
फोणशी, मसाल्याची पाने, कंटोळी, वाघाटी, भुईफोडं >> ह्या नाही पाहिल्या मी भाज्या. बहुतेक मराठवाड्यात नसतील मिळत..

हो ग अ‍ॅना..आपल्याकडे नसतात ह्या भाज्या... या मुंबईच्या आसपासच्या भाज्या.

एक तर मी चंदन बटवा नावाची भाजी खाल्लीय- आई करायची मी लहान असताना.

भाग्य, ती भाजी सहज मिळते आता. थोडी जांभळट पाने असतात. ताक घालून करतात.
भारंगी, भारंगीची फुले, शेवळे, कोरल, घोळ, राजघोळ या पण भाज्या मिळतील आता (आपल्याकडे ) या सर्व कृति आहेत इथे.

भाग्या आमच्याकडे पण करतात चंदनबटवा.. खाल्लीये मी.

आमच्या बाजुच्या पारसिक हिलवर ही भाजी भरपुर उगवुन येते हे मला माहितच नव्हते. शेजारचे आजोबा रोज मॉर्निंगवॉकवरुन येताना घरी आणतात. काल कसला पाला भरुन आणताहेत म्हणुन विचारले तर म्हणाले कुर्डु आणलीये.... Happy

काल दोन रानभाज्यांचे दर्शन झाले - कुर्डु आणि कवळा.. त्यातला कवळा काल खाल्ला, कुर्डुसाठी मी उद्या उठुन जाते पार्सिक हिलवर.. Happy दिनेशनी टाकलेला तांदुळजा पण कॉलनीत पाहिलाय भरपुर... असेच डोळे जागेवर ठेऊन इकडेतिकडे शोधत बसले तर सगळ्या भाज्या सापडतील.. Happy

जागु ताई तुला कुडाचि फुलाचि भाजि माहित आहे का ? असेल तर प्लिज टाक ना फोटो सहित>>> परवाच ई टीव्हीवर खाद्यभ्रमंतीमध्ये ही भाजी करून दाखवली. Happy

Pages