अशीही एक दिवाळी

Submitted by मिरिंडा on 29 October, 2026 - 22:56

           मनोहरपंत एका खाजगी कंपनीत गेले दहा वर्षं कामाला होते. ही त्यांची जास्तीत जास्त टिकलेली नोकरी. कंपनीत सारखी कामगारांची बोनस वरून तर कधी पगारवाढी साठी आंदोलनं होत होती . मागच्याच वर्षी आठ दिवसाचा संप झाला होता. पण युनियन स्ट्रॉंग नसल्याने मॅनेजमेंटने कामगारांच्या तोंडाला पानं पुसली. सध्याच्या दिवाळीचा बोनस कपंनीने धंदा तोट्यात असल्याने नाकारला होता.पण युनियन लीडर मेनन मुळे संप टळला होता. त्याने कंपनीकडून उशिरा का होईना पण बोनस देऊ असं लिहून घेतलं होतं. पण आज दिवाळी चार दिवसावर आल्यावर कंपनीने काही कामगार कमी केले. त्यात नेमकं मनोहरपंतांच नावं होतं.
           खाली मान घालून पंत चाळीच्या पायऱ्या चढू लागले. मधेच खालच्या हुलबुजक्या परंजपे आजींनी विचारलं, " काय मिळाला की नाही, या वेळेला तरी बोनस? "पंत काहीच बोलले नाहीत. तरीही आजी म्हणाल्या," मिळालेला दिसत नाही आहे." पंत खाली मान घालून दुसऱ्या मजल्यावरच्या आपल्या खोलीकडे जाऊ लागले. दिवाळी चालू झाल्याने प्रत्येकाच्या घरासमोर पणत्या होत्या. आता त्यांनी रुमालाने चेहरा पुसला. जणूकाही सगळ्या भावनाच पुसल्या. चेहऱ्यावर उसना उत्साह आणीत ते आपल्या खोलीकडे वळले. बाहेरच त्यांचा धाकटा मुलगा सचिन, त्यांना पाहून उत्साहाने ओरडला, " आप्पा आले, आप्पा आले. " त्यांच्या हातातली बॅग घेतं त्याने विचारलं, "फटाके आणलेत ना? "
" त्यांनी कपाळाला हात लावीत म्हंटले, " अरे विसरलोच की. " असं म्हंटल्यावर, तो हातातली बॅग फेकून म्हणाला, " तुम्ही कधीच वेळेवर फटाके आणीत नाही. " त्याची आईच त्याला ओरडली., " अरे ते आत्ताच कामावरून आल्येत त्यांना जरा हातपाय वगैरे तर धूऊ दे. " 
           मग आप्पांना आठवलं, आपण दोन हजार रुपये दीनानाथ कडून उसने आणल्येत. त्यांनी सचिनला लगेचच बाजारात जाऊन फटाके आणणार असल्याचे सांगितलं. त्यावर आनंद त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, " काही गरज नाही. दिवाळी उद्यापासून सूरू होणार. एवढं काय त्यात ? ". दीनानाथ दलाल त्यांच्याच कपंनीत भरमसाठ व्याजाने हातउसने पैसे देणारा माणूस. कधी नव्हे ते आप्पांनी त्याच्याकडून पैसे आणले होते....... अजून आप्पांनी आपल्याला कामावरून कमी केल्याच सांगितलं नव्हतं. आनंदाने जून मधे प्रिंटिंग टेकनॉलॉजिच्या डिप्लोमाची परीक्षा दिली होती. सरकारी खाक्या. रिझल्ट कधी लागणार माहिती नव्हतं.
        रात्री आप्पांनी सरलाबाईंना खरी परिस्थिती सांगितली. ते ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आनंदलाही ते सांगितलं. त्यावर तो म्हणाला, "पण उसने पैसे कशाला आणायचे? मला रिझल्ट लागल्यावर कुठेतरी काम मिळालंच असतं. जाऊन द्या बघू पुढे.... " असं म्हणून सगळेच झोपले. सकाळी फटाके आणि थोडयाफार उधारीवर किराणा सामान आणलं गेलं......
दिवाळी एका दडपणाखालीच जात होती. 
         भाऊबीजेचा दिवस. प्रभामामा आला होता. हास्यविनोद चालू होते पण एका दडपणाखालीच. मामाकडून मिळालेले भाऊबीजेचे 300 रुपये उधारी फेडण्यासाठी उपयोगी पडतील म्हणून सरलाबाईंनी बाजूला काढून ठेवले. बाबांनी दिलेले 100 रुपये आनंदाने त्याची बहीण श्वेताला ओवाळणीत घातले.  अशा रीतीने दिवाळी साजरी होतहोती..... तेवढ्यात परांजपे आजी आल्या. दिवाळीच फराळाचं घेऊन. गप्पा मारता मारता त्यांनी प्रभा मामासमोर गौप्यस्फ़ोट केला. " काय हॊ कपंनीची कमाल आहे. बोनस तर दिलाच नाही. पण काही लोकांना कामावरून कमी केलं. त्यात पंत आणि आमचा दिलप्या पण आहे हॊ. काय करणार सांगा बरं.!"
असं म्हणून त्या डोळे पुसू लागल्या. निदान त्यांनी प्रभा मामासमोर तरी हे बोलायला नको होतं. त्या वरमल्या. आणि मान खाली घालून बसल्या. त्यावर मामा म्हणाला, " काय ग ताई! एवढी महत्वाची गोष्ट पण मला सांगितलीच नाहीस ती. " मग जरावेळ विचित्र शांतता पसरली. तेवढ्यात दरवाजा वाजला दारात पोस्टमन.....
       आता याने काय बातमी आणली म्हणून सगळेच धास्तावले. पोस्टमन बॅगेतून कागद काढीत म्हणाला, " घ्या, पंत मनिऑर्डर आहे. सरकारची. आपला आनंदा परीक्षेत जिल्ह्यात पहिला आला. त्याला हे पाच हजार रुपयाच पारितोषिक मिळाल आहे..... " असं म्हणून त्याने पाचशेच्या दहा नोटा काढून आनंदाची सही घेऊन त्याच्या हातात ठेवल्या. सगळ्यांना या परमेश्वरी लीले बद्दल काय म्हणावं कळेना. शेवटी सरलाबाई म्हणाल्या, " परमेश्वर एका हाताने काढून घेतो पण दुसऱ्या हाताने देतो. " त्यांच्या डोळ्याचं पाणी खळेना. परांजपे आजी मिठाचा खडा टाकायला आल्या होत्या. पण परमेश्वराने लाज राखली.
         अर्थातच, दिवाळी झाल्यावर दीनानाथाच दोन हजाराचं कर्ज मनोहरपंतांनी ताबडतोब फेडलं. आनंदालाही लवकरच चांगला जॉब मिळाला. मनोहरपंतांची कपंनी लवकरच बंद पडली. पण लिहून दिल्याप्रमाणे बोनस मात्र कपंनीने दिला. तो दीड लाख होता. कामाबाबत मात्र कोर्टाच्या फेऱ्या चालू झाल्या.
         कधी कधी असाही अनुभव येतो. शेवटी     "त्यालाच " काळजी असते हेच खरं.

अरुण कोर्डे
©® ९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users