(पूर्वप्रसिद्धी - 'साहित्यप्रवाह' दिवाळी अंक २०२५)

मुंबई हा भारतीय क्रिकेटला एकाहून एक सरस क्रिकेटपटू पुरवणारा अविरत स्त्रोत राहिला आहे. मात्र भारतासाठी खेळू न शकलेल्या गुणवान मुंबईकर क्रिकेटपटूंची यादीही मोठी आहे. यातले एक नाव म्हणजे ‘मिलिंद दत्तात्रेय रेगे’. अष्टपैलू रेगेंनी यावर्षी आयुष्याच्या मैदानातून निरोप घेतला. मुंबई क्रिकेटशी या ना त्या स्वरूपात ५५ वर्षे निगडीत राहिलेल्या रेगेंना शब्दरूप श्रद्धांजली.
१६ फेब्रुवारी १९४९ ला मुंबईत जन्मलेल्या रेगेंची जडणघडण झाली ती ताडदेवमधील ‘भागीरथी सदन’ निवासी संकुलात. याच सोसायटीत महान फलंदाज सुनिल गावसकर यांचे कुटुंबही रहात असे. दोन्ही कुटुंबांचा चांगला स्नेह होता. मिलिंद यांच्यापेक्षा फक्त सहा महिन्यांनी लहान असलेल्या सुनिलबरोबर त्यांची बालपणापासूनच चांगली गट्टी जमली. दोघेही एकाच ‘सेंट झेविअर्स’ शाळेत जात. त्यामुळे दोघाचे अभ्यास, खेळ, मस्ती सारे काही एकत्रच होई. मिलिंद यांचा बराच वेळ गावसकरांच्या घरी जाई आणि त्यामुळे अनेकदा त्यांचे जेवणही तिथेच होई. सुनिलच्या आईने आम्हा दोघांचे बालपण घडवले असे ते आवर्जून सांगत.
याच भागीरथी सदनमध्ये सुनिलच्या जोडीने मिलिंद यांचे क्रिकेट बहरले. त्यांचा मोठा भाऊ ‘एसीसी’ कंपनीसाठी क्रिकेट खेळत असे. सुनिल यांचे वडील आणि काका चांगले क्लब क्रिकेटर होते, तर मामा माधव मंत्री भारतासाठी खेळले होते. शिवाय मिलिंद यांचे मेहुणे शरद दिवाडकर मुंबईसाठी खेळत होते. या सर्व पार्श्वभूमीमुळे मिलिंद यांना क्रिकेटची गोडी लागली. १९६० साली त्यांच्या शाळेने ‘हॅरिस शील्ड’ स्पर्धा प्रथमच जिंकली आणि मिलिंदना अधिकच प्रेरणा मिळाली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या प्रोत्साहनाने ते शाळेकडून क्रिकेट खेळू लागले. शाळेत ते चांगले सलामी फलंदाज आणि ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज म्हणून नाव कमवू लागले. लवकरच ते शालेय संघाचे कप्तान बनले. नंतर ते मोकळेपणाने सांगत की सुनिल त्यांच्यापेक्षा चांगला खेळाडू होता, पण मिलिंद केवळ उंच असल्याने आणि सुनिलपेक्षा काही दिवसांनी मोठे असल्याने त्यांना कर्णधारपद मिळाले. गावसकरना सलामी फलंदाज बनवण्याचे अप्रत्यक्ष श्रेयही त्यांच्याकडे जाते. एका आंतरशालेय स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाकडे चांगले वेगवान गोलंदाज असल्याने मिलिंदना सलामीला जायला भीती वाटली आणि त्यांनी सुनिलना सलामीला पाठवले. तेव्हा गावसकरांची कामगिरी प्रभावी झाल्याने पुढे ते कायमस्वरूपी सलामी फलंदाज बनले आणि भारताला एक महान सलामीवीर मिळाला.
शालेय क्रिकेट गाजवत असतानाच या दोघांची एक मोठी संधी मात्र हुकली. भारतीय शालेय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार होता आणि त्यात या दोघांची निवड नक्की होती. शिवाय मिलिंदना संघाचे कर्णधारपद मिळणेही जवळपास निश्चित होते. पण मॅट्रिकच्या परीक्षेच्या तयारीवर परिणाम होईल म्हणून त्यांच्या पालकांनी दोघांनाही या दौऱ्यावर जाऊ दिले नाही. काही दिवस याची त्यांना खंत वाटली पण आपले पालक आपल्या भल्याचाच विचार करतात हे माहीत असल्याने त्यांनी पुनः आपल्या स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. याचदरम्यान एका देशभरातल्या शालेय क्रिकेटपटूंच्या कॅम्पमध्ये त्यांना वसंत अमलाडी यांचे मार्गदर्शन लाभले ज्याचा त्यांना खूप फायदा झाला. या काळात मंत्री, पॉली उम्रीगर, मनोहर हर्डीकर, नरेन ताम्हाणे, वाडेकर हे त्यांचे क्रिकेटमधले प्रेरणास्थान होते. पुढे ‘सेंट झेविअर्स’ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर तेथे क्रिकेटला फारसा वाव नसल्याने ते क्लब क्रिकेट आणि कांगा लीग सामने खेळू लागले. दादर युनियन क्लबकडून खेळण्याची संधी मिळाल्याने व तेथे माधव मंत्री, नरेन ताम्हाणे यांसारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या खेळात भरपूर सुधारणा झाली. यामुळे १९६७ साली अवघ्या १८ व्या वर्षीच त्यांची मुंबईच्या रणजी संघात वर्णी लागली.
आपल्या दर्जेदार अष्टपैलू खेळाने मिलिंदनी लवकरच मुंबई संघातले स्थान बळकट केले. तेव्हाच्या बलाढ्य मुंबई संघात हर्डीकर, नाडकर्णी, वाडेकर, सुधीर नाईक, सरदेसाई, अशोक मंकड, इंजिनियर, सोलकर इत्यादी रथीमहारथी फलंदाजांची फळी असल्याने आणि नंतर त्यात गावसकर, रामनाथ पारकर यांची भर पडल्याने रेगेंना खालच्या क्रमांकावर फलंदाजीस जावे लागे व फलंदाजीची संधीही फार कमी मिळे. त्यामुळे पुढे ते प्रामुख्याने एक ऑफ स्पिनर म्हणून भूमिका बजावू लागले. या काळात मुंबईचा संघ अजेय होता ज्याने १९५८-५९ ते १९७२-७३ अशी सलग १५ वर्षे रणजी विजेतेपद मिळवले होते. यातील पाच वर्षे मिलिंद विजयी संघाचा भाग होते. दुसऱ्या बाजूला शिवलकर यांच्यासारखा महान डावखुरा फिरकीपटू असल्याने रेगेंवर फिरकी गोलंदाजीचा फार भार पडत नसे. साथीला रमाकांत देसाई, अब्दुल इस्माईल, अजित पै, सोलकर असे दर्जेदार गोलंदाज होतेच. १९७१ चा हंगाम मिलिंदसाठी सर्वात अविस्मरणीय ठरला, ज्यात त्यांनी महत्त्वाचे बळी घेतानाच चांगल्या धावाही केल्या. त्या वर्षीच्या अंतिम सामन्यात मुंबईने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राचा ४८ धावांनी पराभव केला. शेवटच्या डावात मुंबई आणि विजयाच्या मार्गात अडसर ठरलेल्या अर्धशतकवीर चंदू बोर्डेंचा रेगेंनी स्लिपमध्ये अफलातून असा झेल टिपला आणि मुंबईच्या विजय सुकर केला. महाराष्ट्राला जेतेपादपासून दूर ठेवणाऱ्या रेगेंच्या त्या झेलाची बोर्डे अजूनही आठवण काढतात.
रणजी खेळत असतानाच ‘टाटा स्पोर्ट्स क्लब’ने त्यांना हेरले आणि ते टाटासाठी ‘टाइम्स शील्ड’ स्पर्धा खेळू लागले. ‘टाटा स्टील’ मध्ये नोकरी मिळालीच शिवाय विविध गुणवान खेळाडूंबरोबर आणि विरुद्धदेखील सातत्याने खेळायला मिळाल्याने त्यांच्या खेळाचा सर्वांगीण विकास झाला. या काळात वाडेकर यांची शैलिदार फलंदाजी व नेतृत्वशैली, सोलकर यांचे अद्भुत क्षेत्ररक्षण आणि अष्टपैलू गुणवत्ता, रामनाथ पारकर यांचे चपळ क्षेत्ररक्षण आणि संघभावना, चंदू बोर्डे यांचे क्रीडाकौशल्य आणि व्यक्तिमत्व यांचा मिलिंदवर फार प्रभाव पडला. मुंबई संघ सातत्याने विजयी होत असल्याने त्यांना इराणी चषकात आणि पश्चिम विभागातर्फे दुलिप करंडकात खेळण्याचीही भरपूर संधी लाभली. गोलंदाजीत शिवलकर यांच्या सहाय्यकाची भूमिका उत्तम निभावत असतानाच कधी चुकून आघाडीची फळी कोसळली तर तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून संघाचा डाव सावरत असत. अश्या चांगल्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर एखाद्याला भारतीय संघातील प्रवेशाची आशा वाटली असती. मात्र प्रसन्ना आणि वेंकट असे जागतिक दर्जाचे ऑफ स्पिनर भारतीय संघात असताना आपल्याला संधी नाही हे रेगेंनी मनोमन जाणले होते.
कारकिर्दीत यशस्वी होत असतानाच रेगेंना अचानक एक धक्का मिळाला. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने डॉ. काळे आणि डॉ. आंब्रे यांच्या सुयोग्य उपचारांनी ते यातून लवकर बरे झाले. यात रेगेंचे मनोधैर्य आणि पत्नीची साथ हेही महत्त्वाचे ठरले. मात्र त्यांचे क्रिकेट संपले असेच बहुतेकांना वाटले. पण तसे व्हायचे नव्हते. स्वत: रेगेंची पुन्हा मैदानावर उतरण्याची इच्छा होतीच आणि त्याला त्यांची पत्नी आणि डॉक्टर यांनीही दुजोरा दिला. यामुळे योग्य त्या उपचारांना व्यायामाची जोड देऊन, कठोर मेहनत घेऊन एक वर्षानंतर ते पुन्हा मैदानावर उतरले. विशेष म्हणजे कांगा लीग आणि टाइम्स ढाल स्पर्धेतल्या आपल्या पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात शतकही ठोकले. दोन वर्षांच्या खंडानंतर त्यांचे मुंबईच्या रणजी संघातही पुनरागमन झाले. यानंतर चांगल्या कामगिरीच्या जोरावर आणि वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्यांना एक वर्ष मुंबई रणजी संघाचे कर्णधारपद भूषवता आले. पण कप्तान म्हणून त्यांच्या पदरी अपयश आले. यानंतर काही काळ खेळल्यावर त्यांना उमगले की यापुढे आपण अजून उच्च दर्जाचे क्रिकेट खेळू शकणार नाही किंवा भारतीय संघाचे दार ठोठावू शकणार नाही. शिवाय विज्ञान शाखेचे पदवीधर असलेल्या रेगेंना ‘टाटा स्टील’ कंपनीच्या कॉर्पोरेट क्षेत्रामधील करियर खुणावत होते. त्यामुळे वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्यांनी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी एकूण १२६ बळी घेतले आणि १५३२ धावा केल्या.
यापुढे रेगेंनी दादर युनियन, टाटा स्पोर्ट्स आणि सीसीआयसाठी क्लब क्रिकेट खेळले असले तरी त्यांनी मुंबईतील विविध स्तरावरील क्रिकेट व्यवस्थापन, निवड प्रक्रिया, समालोचन यांमध्ये जास्त रस घेतला. ते भारतातील सर्वात तरुण निवड समिती सदस्यांपैकी एक होते. एक निवडकर्ता म्हणून त्यांना माधव मंत्री, नरेन ताम्हाणे, रमाकांत देसाई, अजित वाडेकर, सुधीर नाईक या ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून खूप शिकता आले असे ते सांगत. अनेक वर्षे ते मुंबई क्रिकेट निवड समितीचे सदस्य वा अध्यक्ष राहिले. ‘एमसीए’च्या विविध समित्यांमध्ये काम करत रेगे मुंबई क्रिकेटशी जोडलेले राहत. दोन दशकांहून अधिक काळ ते टाटा स्पोर्ट्स क्लबचे सचिव आणि क्रिकेट सुधारणा समितीचे सचिव होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ‘मीडिया कमिटी’चे ते पश्चिम विभागाचे प्रतिनिधीही होते. २०२० मध्ये ते ‘एमसीए’चे विशेष सल्लागार झाले.
टाटा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष - आधी ‘जेआरडी’ आणि नंतर रतन टाटा यांनी त्यांच्यावर विश्वासाने क्लबसंबंधी अनेक जबाबदाऱ्या टाकल्या आणि त्यांनी त्या कार्यक्षमतेने निभावल्या. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मफतलाल स्पोर्ट्स क्लबचा क्रिकेट संघ बरखास्त करण्यात आला, तेव्हा तेथील गुणवान खेळाडूंना टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये सामावून घेण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. टाटामध्ये रवी शास्त्री, किरण मोरे, लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी, मिलिंद गुंजाळ, शिशिर हट्टंगडी, अॅलन सिप्पी अश्या अनेक गुणवान खेळाडूंना नोकरी आणि क्रिकेटची संधी दिली ज्यांनी पुढे मोठे नाव कमावले. ‘सीसीआय’साठीही त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, सौरव गांगुली, अॅबे कुरुविल्ला, साईराज बहुतुले, समीर दिघे, पारस म्हांब्रे यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना करारबद्ध केले. अल्पवयीन तेंडुलकरची ‘सीसीआय’साठी निवड करणे आणि त्याला क्लबहाऊसची सदस्यता मिळवून देणे यासाठी नियम बदलण्यात त्यांचे व्यवस्थापन आणि संवादकौशल्य कामी आले.
गुणग्राहकता, नेतृत्वगुण, अनुभवाचा फायदा तरुण पिढीला करून देणे आणि मनाचा मोकळेपणा हे त्यांचे मोठे गुण होते. पंधरा वर्षीय सचिनला मुंबई रणजी संघात घेण्यासाठी त्यांनीच निवड समिती अध्यक्ष नरेन ताम्हाणे यांना राजी केले. पृथ्वी शॉ यालाही कमी वयात संधी त्यांनीच दिली. विनोद कांबळी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या होनहार खेळाडूंना त्यांनी लहान वयातच हेरले होते. अजित आगरकरला एका वर्षी त्यांच्या निवड समितीने अनपेक्षितरित्या मुंबईचा कर्णधार बनवले आणि त्या वर्षी मुंबईने रणजी करंडक जिंकला. मुंबईच्या अनेक होतकरू क्रिकेटपटूंना मदत करण्यात आणि कारकीर्द घडविण्यात त्यांचे योगदान अतुलनीय राहीले. अनेक तरुण क्रिकेटपटूंसाठी रेगे हे विश्वासार्ह सल्लागार आणि प्रेरणास्त्रोत होते. रणजी सामन्यांच्यावेळी दूरचित्रवाणीवरील इंग्रजी समालोचक आणि खेळाचे विशेषतज्ञ म्हणून त्यांची भाषेवरील पकड, खेळाचे विवेचन करण्याची क्षमता आणि सर्वांशी संपर्क साधण्याची हातोटी नजरेत भरे.
आपले स्पर्धात्मक क्रिकेट संपल्यावर त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली ज्याचा त्यांना कॉर्पोरेट करियरमध्ये शिखर गाठण्यात उपयोग झाला. टाटा स्टीलच्या मुंबईच्या मुख्य कार्यालयात ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’चे प्रमुख म्हणून त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ काम केले. यापूर्वी तेथे त्यांनी ‘वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक’ म्हणून कार्यभार हाताळला. त्यामुळेच त्यांना शिक्षणाचे महत्त्व खूप वाटे आणि तसे ते तरुण क्रिकेटपटूंना कायम पटवून देत. क्रिकेटसंबंधी आणि इतरही पुस्तकांचे त्यांचे वाचन दांडगे होते, जे त्यांच्या बोलण्यातून निदर्शनास येई. खेळ आणि खेळाडूंच्या भल्यासाठी ते सडेतोडपणे बोलत आणि त्यासाठी वाईटपणा पत्करण्याची त्यांची तयारी असे. स्वत:च्या खेळाकडे, कारकिर्दीकडे ते अगदी तटस्थपणे पहात. भारतासाठी खेळण्याएवढी आपल्यात गुणवत्ता नव्हती किंवा तेव्हढी जिद्द (fire in the belly) नव्हती असे ते प्रांजळपणे कबूल करत.
मात्र ३५ वर्षे मुंबईच्या निवड समितीचा सदस्य किंवा अध्यक्ष राहूनही मुंबई क्रिकेट व्यवस्थापनाने त्याचा योग्य तो सन्मान राखला नाही आणि भारतीय क्रिकेट निवड समितीचा भाग होता आले नाही, ही काहीशी खंत त्यांना वाटे. पण अखेरच्या वर्षात ‘मुंबई क्रीडापत्रकार संघटने’द्वारा त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार दिला गेला आणि वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘एमसीए’द्वारा एका भव्य समारंभात अनेक जुन्याजाणत्या क्रिकेटपटूंबरोबर त्यांचा सत्कार झाला. या दोन घटनांनी त्यांच्या जखमांवर काहीशी फुंकर घातली गेली.
रेगे पंचावन्न वर्षे केवळ मुंबई क्रिकेटशी निगडीत नव्हते तर, भक्त देवाची जशी देहभान हरपून भक्ती करतो तशी त्यांनी मुंबई क्रिकेटची केली. याची प्रचिती त्यांचे १९ फेब्रुवारीला निधन होण्याआधी काही दिवस आली. त्यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याच्या सांगण्यानुसार, आजारपणामुळे इस्पितळात दाखल असतानाही ते सतत मुंबई विरुद्ध हरयाणा या रणजी उपांत्यपूर्व सामन्याच्या धावफलकाची चौकशी करत होते. जेव्हा त्यांना कळले की मुंबई हरयाणाला हरवून उपांत्य फेरीत पोहोचली आहे, तेव्हा त्यांच्या जीवाला काहीसा आराम पडलेला दिसला. अश्या या मुंबई क्रिकेटच्या महान कर्मयोग्याला सविनय आदरांजली.
(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
- गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)